अळवावरचे पाणी (नागपूर डायरी-२)

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
19 May 2016 - 7:48 am

अळवावरचे पाणी (नागपूर डायरी-२)

दीर्घ काल नागपूरला रहाण्याचा गेल्या पंचेचाळीस वर्षातला हा पहिलाच प्रसंग. त्यामुळे पंचेचाळीस डिग्री तापमान, (कदाचित त्यामुळे) जिकडे तिकडे अंगात भिनलेली सुस्ताई, सतत ऐकू येणारा नकारात्मक दृष्टीकोन, अशा कित्येक गोष्टीना आता सामोरे जावे लागणार आहे या काळजीने मी पछाडलो होतो. पण सगळ्यात जास्त त्रास देणारी त्रुटी म्हणजे विनासायास मिळणारे, विसंबून रहाता येईल असे जनता वाहन. आणि माजलेले उर्मट ऑटो रिक्षा चालक. या आधी नागपूरला जेव्हा आलो, तेव्हा फक्त दोन तीन आठवड्यांच्या सुट्टीसाठी असायचो. मजा करायला आलो आहोत, तर कशाला मनाला लावून आपलीच मजा किरकिरी करायची? छोट्या मोठ्या असुविधांकडे दुर्लक्ष करण्याकडे कल असायचा. कसे तरी करून हे दोन आठवडे काढले, की जायचेच आहे नेहमीच्या सरळ सुखकर जीवनात परत! आपल्याकडे आलेले, वाजवी भाडे नाकारून रिक्षात नुसती झोप काढीत बसलेल्या ऑटो चालकाकडे दुर्लक्ष करून जसे जमेल तसे आपले लक्ष्य गाठायचे. मुंबई पुण्यातल्या सुखी लोकांचा हेवा करीत इथे केव्हा मिटर प्रमाणे चालविणारे चालक येतील याची स्वप्ने पहात उसासे टाकायचे.

त्यावेळी देखील कधी कधी दिवसभरासाठी ड्रायव्हर व कार बोलावून लांबची वा वेळ लागणारी कामे उरकून घेता यायचीच. पण हे सगळे जमवायला करावी लागणारी मशक्कत, दुसऱ्यावर विसंबून रहाणे, कधी ऐन वेळी त्याचे धोका देणे, प्रवासात एसी बंद करून पेट्रोल वाचविणे, संशय येईल इतके जास्त पेट्रोल भरायला लागणे वगैरे कटकटींमुळे त्या प्रवासाचे सुख विशेष लाभायचे नाही. पैसे खर्च करून सुख मिळविता येत नाही ही म्हण पटायची!

आता इतके वर्षांनी लांबलचक मुक्कामाला नागपूरला आल्यावर पहिले पोटात गोळा उठला तो वाहनाच्या काळजीने. अर्थात कोणी म्हणेल, ही काही मोठी समस्या नाही. कार भाड्याने घ्यायची, किंवा कोणाची स्कूटर. पण इथली सतत अंगावर येणारी रहदारी, पार्किंगसाठी लोकांची शोधाशोध पाहून तो विचार थंडावला. शिवाय कधी वेळ आलीच, तर इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसेन्सला चहापाण्याचा खर्च केवढ्यात पडेल, ती एक (भलेही काल्पनिक) डोकेदुखी होतीच. म्हटले बघुया. आले अंगावर, घेतले शिंगावर.

फक्त स्वत:वरच विसंबून रहाण्याच्या बाण्यामुळे, पहिल्या वेळेस, मी भर उन्हात घरापासून बँकेपर्यंत पायी चालत गेलो. बाहेर पंचेचाळीस तापमान असावे. मी आपला पूर्ण चेहरा शुभ्र कापडात झाकून, हातातील पिशवीत पाण्याची बाटली, कांदा वगैरे जय्यत तयारीनिशी मजल दरमजल करीत बँकेत पोहोचलो. जेमतेम एक दीड किलोमीटर अंतर असेल. सिंगापूरच्या भन्नाट वाहत्या रस्त्याच्या बाजूने सोप्या फुटपाथवर थंड हवेच्या झुळका घेत चालणे वेगळे. इथे तप्त उन्हाच्या झोतांमध्ये, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाना टाळणे, त्यांचे उष्ण कार्बन फव्वारे श्वासात मिसळत इथल्या खडबडीत रस्त्यावर चालणे, आजूबाजूला पडलेले कचऱ्याचे ढीग चुकवणे, हातातली कागदपत्रांची पिशवी जपणे... ही सगळी दिव्ये करून बँकेत पोहोचलो.

इथे कधी एका चकरेत काम होत नाही हे माहित होतेच, पण म्हटले, अच्छे दिन वगैरे आले आहेत. बघुया. कदाचित एकाच चकरेत आता काम होईल देखील. छे! पुन्हा येण्याचे खेकटे अडकवलेच कि त्यांनी. मग काय, पुन्हा सगळी दिव्ये करून छान लालसर रंगावर भाजलेला मी घरी परत आलो. मग मात्र, चित्रा जास्त ओरडायच्या आधी माझे मीच ठरविले, इथे आता कधीही भर उन्हात चालायचे नाही! आता या वयात नसती साहसे नको!

ठरवले तर ठरवले. पण मग इतकी सगळी कामे घरबसल्या कशी होणार? थोडे गुगलले, आणि समजले, की आता इथे ओला टॅक्सी हा अॅप मिळतो. वाहवा! हे अॅप म्हणजे खरंच आजच्या युगातले अल्लादिनचे चिराग! ओला टॅक्सी हे नागपूरला (आणि इतरही शहरांना) मिळालेले उत्तम वरदान आहे. मी जेव्हा जेव्हा बोलावण्यासाठी अॅप उघडले, तेव्हा नकाशावर दोन चार तरी ओला आपल्या आसपास दिसायच्याच! आणि बोलाविले की शहाण्यासारख्या पाच मिनटात दारात हजर! काहीही बोलायचे काम नाही. जिथे पाहिजे तिथे सोडणार, अगदी नेमून दिलेले भाडे मागणार. भाडयाचा तुम्ही स्वत: आधीच अंदाज करू शकता. चालक कधी टीप मागणार नाही, उरलेले पैसे परत करेल, व्यवस्थित बोलेल! आणखी काय पाहिजे प्रवाशाला? हे नागपूरच आहे की सिंगापूर? मग मी जेव्हा पाहिजे तेव्हा “ओला ओला” एसीमध्ये “ओले ओले” गाऊ लागलो.

ओलाच्या अनुभवावरून मग कोणीसे सांगितलेले जुगनू ऑटोरिक्षा अॅप डाऊनलोडले. ही सर्विस देखील स्वस्त न मस्त! नाहीतर आतापर्यंत घरापासून फक्त दीड किमी अंतरावर जायचे असेल तरी ऑटोपर्यंत जाऊन चालकाला विनंती करणे, मग त्याचे पन्नास साठ असे अवाजवी भाडे ऐकून चिडणे... घासाघीस करायला तयार न होता त्याचे रिक्षात झोपून रहाणे, सगळे आता संपले! घर बसल्या जुगनू बोलावली. तो माझ्या घरापर्यंत येत असलेला मार्ग, तो आता कुठे आला आहे, सगळे नकाशावर दिसत होते. चार मिनटे.. दोन.. एक.. बरोब्बर काउंटडाउन सुरु होता. पुन्हा तसाच सुंदर अनुभव. तिथे पोहोचल्यावर बील फक्त ३३ रुपये. चाळीस दिले तर सात परत करायला लागला. म्हटले, ठेव तुझ्याच जवळ. You made my day म्हणजे काय ते आज कळले! आणि एकदा तर मी जेव्हा जुगनू बोलावली, तेव्हा आसपास एकही नव्हती. मग ते अॅप चक्क सॉरी म्हणाले. म्हटलं, सॉरी तर सॉरी! तू आतापर्यंत इतका शहाण्यासारखा वागलाय, तर जाउदे, मी पण मनावर घेत नाही. पण काय आश्चर्य! दुसऱ्या दिवशी जुगणूचा चक्क मेसेज आला.. “ We apologize that you could not find an auto yesterday. In compensation, we offer you 20% discount for your next ride within three days!”
आता बोला! असे गुणी अॅप मदतीला असूनही नागपूरचे ऑटो चालक अजूनही बदलले नाहीत! पण हरकत नाही. जे जे अकार्यक्षम आहे ते ते विनाश पावणारच! हे मी नाही डार्विन म्हणून गेलाय, तेव्हा ऑटो चालकांचे तो डार्विनच बघून घेईल! आपल्याला चिंता नाही!

(क्रमश:)
jugnu

वावरप्रकटन

प्रतिक्रिया

"ओला आणि जुगनू"च्या माहितीबद्दल धन्यवाद.

संजय पाटिल's picture

20 May 2016 - 1:15 pm | संजय पाटिल

डार्वीन फक्त अ‍ॅटो वाल्यांचं नाहि, सगळ्यांचच बघणार आहे..

पैसा's picture

20 May 2016 - 1:35 pm | पैसा

मस्त लिहिताय!