एलियनायटीसेलिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जनातलं, मनातलं
13 Sep 2008 - 6:25 pm

{डिस्केमर} या कथेतली बरीचशी पात्रं खरी आहेत, आणि बय्राचशा घटनाही. कोणतं पात्र कोण, कोणत्या खय्रा, कोणत्या खोट्या हे ज्याने त्याने ठरवावं.
या गोष्टीसाठी प्रेरणा आनंदयात्री (हो तोच तो आंद्या ****), विजुभाऊ, माझी परमसखी मेघना आणि माझा एकमेव नातू टारूबाळ. मी आत्तापर्यंत फक्त एकमेव साय-फाय कादंबरी वाचली आहे, कार्ल सॅगनची "Contact" आणि एक साय-फाय मालिका पाहिली आहे, "Futurama". त्यातून काही कल्पना घेतल्या आहेत; इतर विज्ञानकथांशी या कथेचं साधर्म्य आढळलं तर इंग्रजीत जसं म्हणतात, wise people think alike, ते आठवा. {डिस्क्लेमर संपलं}

ईयनचं ईमेल आलं हे सांगणारं की मला मँचेस्टर विद्यापीठात PhD करण्यासाठी प्रवेश मिळाला आहे, आणि कनवटीला थोडे पैसे लागण्याची व्यवस्थाही, काय बोलावं मला सुचलंच नाही. मी काकांकडे होते, काका काकूंना लगेचच सांगितलं; बरोबर अशाच वेळी दादाचा मोबाईल लागत नाही आणि मी खूप चरफडते. पण त्याला काकांनी लावल्यावर लगेच फोन लागला. त्या महिन्याचं फोनचं बिल नेहेमीच्या दुप्पट आलं. अर्थातच सगळेच माझ्यावर जाम खूष होते त्यामुळे काही आरडाओरडा नाही झाला! मी BSc ला सुरूवात केली तेव्हा बाबांना माझ्या करीयरविषयी सल्ले देणारे लोक आता एकदम पुढे होते माझं कौतुक करण्यात! दोन-चार महिन्यांपूर्वी अनेकविध कारणांमुळे आलेली निराशा कुठल्याकुठे पळाली आणि आता मी यादी बनवायला लागले. तीन वर्ष सायबाच्या देशात जाऊन रहायचं होतं. फुकटचे, निरुपयोगी आणि क्वचित राग आणणारे सल्ले देणाय्रांची नेहेमीप्रमाणे याही वेळेला कमतरता नव्हती. पण मी मात्र फक्त योगेशचं ऐकायचं ठरवलं. योगेश आधी तीन वर्ष केंब्रिजला शिकायला होता आणि शिवाय त्याचे सल्ले नेहेमीच मानण्याजोगे असतात अशी त्याची प्रतिमा, त्यामुळे त्याचे सल्ले घेतले. खरेदी सुरू होती आणि एकीकडे एक प्रोजेक्ट करत होते तेही संपवत आणलं होतं.

कुर्ला स्टेशनमधे गाडी शिरत होती आणि फोन वाजला. "मी निरुपम बोलतोय, अजून एखाद तासानी येऊ का पुस्तक न्यायला?", त्याला रसलचं "Why I am not a Christian?" हवं होतं. "ये, मी आत्ता कुर्ल्यात पोहोचत्ये, गाडी बदलून तासाभरात घरी पोहोचायला पाहिजे." "ठीक आहे, ईमेलमधे मी तुला म्हटलं होतं ना, ती कार्ल सॅगनची Contact कादंबरी आणतो". खरंतर मला कादंबय्रा वाचायचा प्रचंड कंटाळा येतो, पण निरूपमला नाही म्हणायची इच्छा नव्हती. का कोण जाणे, तो हळूहळू आवडायला लागला होता, अगदी पूर्वी जेवढा विक्षिप्त होता तेवढा काही तो आता नाही वाटायचा; काय माहित मी पण थोडी बदलले आहे का नाही ते! पुस्तकांची अदलाबदली केली आणि मी एकदम "भक्तिभावा"नी Contact वाचायला सुरूवात केली. शिवाय दीडेक महिन्यात निघायचं होतं मँचेस्टरसाठी!

योगेशच्या सल्ल्याप्रमाणे अनेक लोकांनी आणून दिलेल्या अनेकविध गोष्टी घरातच ठेवल्या. फ्रिजतर पार भरून गेला होता. दादातर म्हणालाही नंतर त्या सगळ्या नारळाच्या वड्या, काजूकतरी, लाडू, चिवडे त्याला दोन महिने पुरले. चला माझ्या परदेशगमनाचा त्याला तेवढातरी फायदा! शिवाय आता खायला आवडणाय्रा गोष्टी बनवण्याची माझी तयारी काकूनी अगदी प्रेमानी करून घेतली. गंमत म्हणजे योगेशपण तेव्हा लंडनला एक वर्षाकरता आला होता, कसलातरी डिप्लोमा करायला. एकाच विमानातून आलो लंडनला आम्ही! मुंबईला विमानतळाबाहेर दादा, दोन मैत्रिणी, निरुपम असे लोक माझ्याकडून आणि योगेशकडून त्याचे आई-बाबा, त्याची बायको आणि स्वाती, बहिण, असे आले होते. स्वाती आणि माझी आधीपासून थोडी ओळख होतीच. मी घाम पुसत होते तेव्हा तिनी लगेच आपल्या बर्वे या आडनावाला जागून खडूसपणा दाखवलाच, "आता तीन वर्ष येणार नाही आहे घाम, तर आत्ता काय तो पुसून घे! आणि हो, उगाच फार तक्रारी नको करूस तिकडे, तू आधीच फार तक्रारखोर. तुला दीडशे वर्षांच्या गुलामगिरीचा बदला घ्यायला नाही पाठवत आहोत!". मी तिच्या कुत्सित बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. मी आयुष्यात पहिल्यांदा विमानात बसून, पहिल्यांदाच भारताबाहेर, सायबाच्या देशात आले.

लंडनला विमान जमिनीवर उतरलं, सूर्य नुकताच उगवत होता. क्षितीजावर एखाद अंशाचं वर्तुळ सोडून बाकी सगळ्या आकाशात पांढुरके ढग होते. त्याआडून सूर्य डोकावत होता. योगेश म्हणाला, "बघून घे सूर्य, पुन्हा कधी मिळेल सांगता येत नाही". म्या आज्ञाधारी बालकानी लगेचच अर्धवट झोपेमुळे अर्धवट मिटलेले डोळे अर्धवट उघडले आणि सूर्यदर्शन घेतलं. काल ठाण्यातून जसा दिसला तसाच होता तो! पण असं काही बोलण्याची फारशी इच्छा नव्हती. योगेश हा एकदम भला माणूस, त्याच्यासमोर असली भंकस काय करायची, गप्प बसले. पण काल मी ठाण्यात होते, आणि आज लंडनमधे, आणि हे काहीतरी वेगळंच आहे हे जाणवत होतं. लंडनच्या हीथ्रो विमानतळावर उतरलो, योगेशनी त्याचं सामान घेतलं, त्याला "बाय" केलं आणि मी माझं पुढचं, मँचेस्टरकडे जाणारं विमान कधी, कुठे, कसं याच्या चौकशीला गेले! इमिग्रेशनचे सोपस्कार उरकत असतानाच त्या ऑफिसरनी गप्पा मारायला सुरुवात केली. हे माझ्यासाठी नवीनच, विमानतळावरची कर्मचारी माझ्याशी साता जन्माची मैत्रीण असल्याच्या थाटात चौकश्या करत होती, "तू कुठची?", "पासपोर्टावरून समजत नाही, भारतीय आहे मी!" हे वाक्य गिळून, "मी मुंबईची, भारतातून आले." असं तिच्या प्रश्नाएवढंच मैत्रीपूर्ण उत्तर दिलं. (आता लंडनच्या विमानतळावरून मुंबई आणि ठाणे फार काही निराळे नाहीत याची संबंधितांनी दखल घ्यावी.) तीपण काही कमी नव्हती स्नेहवर्धक बोलण्याच्या बाबतीत, "मला माहित आहे मुंबई भारतात आहे! आणि आता तुम्ही पुन्हा बॉम्बेचं मुंबई केलंत, मुळचं नाव परत जागी!". आता मात्र मी मनातून वरमले, "हो, हो" म्हटलं. "मग, युकेमधे कुठे? शिकणार काय, आणि रहाणार कुठे?". याही प्रश्नाचं उत्तर मला माहित होतं, "मला मँचेस्टर विद्यापीठात PhD करण्यासाठी प्रवेश मिळाला आहे, तिथे "जॉड्रल बँक ऑबझर्व्हेटरी"मधे! आणि रहाणार तिथेच जवळच एका घरात. विद्यापीठाचंच आहे ते घर, विद्यार्थ्यांसाठीच". "वाव्वा, मस्त", मावशीनी पासपोर्टावर ठप्पे उमटवले आणि मी मँचेस्टरच्या विमानाच्या गेटकडे कूच केलं.

विमान मँचेस्टरला उतरलं. आता इथेच तीन वर्ष काढयची, पोटात पुन्हा थोडं ढवळलं. लोकं सामान घेऊन रांगेत शिस्तशीरपणे दारं उघडण्याची वाट बघत होती. इयन मला न्यायला येणार होता. आता याला कसं ओळखणार हा माझा प्रश्न त्याने कधीच निकाली लावला होता, "एक पांढरी दाढी आणि झालरटाईप लांब पांढरे केस असणारा मी हे तर तुला नक्की समजेल. आणि मी शोधे एखादी दमलेली, भारतीय मुलगी!" इयन कधीकधी गोष्टी एवढ्या सोप्या बनवतो की मला जरा धास्तीच वाटते. मी "ठीक आहे" याच्यापुढे ईमेलवर काय बोलणार होते? विमानतळाबाहेर आले, त्याने वर्णन केलं होता तसा एक "सांताक्लॉज" दिसला; हातात एक कागद होता, त्यावर अत्यंत गचाळ अक्षरात लिहिलं होतं Jodrell Bank Observatory. त्याचं लक्ष नव्हतं माझ्याकडे, मीच पुढ्यात उभी राहिले आणि म्हटलं, "तू इयन का? मी संहिता, संहिता जोशी."

क्रमशः

या गोष्टीचं नाव आणि हे वरचं लिखाण पाहून प्रश्न पडलाच असेल तुम्हाला की या दोन गोष्टींचा संबंध काय? नसेल पडला तर आता पडू द्यात. कारण आता पुढे उत्तर आहे.
एलियन्स कोण ते तर आपल्याला सगळ्यांनाच माहित असतं. एलिनायटीस म्हणजे हृतिक रोशनला जो रोग झाला होता ना "कोई मिल गया"मधे, तो! आणि तो चित्रपट पाहून मला झाला तो रोगः "एलिनायटीसेलिया"!! आणि संबंध काय ते पुढच्या भागांमधे कळेलच!

बालकथाविनोदसमाजदेशांतरविज्ञानविचारविरंगुळा

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

13 Sep 2008 - 6:37 pm | आनंदयात्री

>> "तू इयन का? मी संहिता, संहिता जोशी."

बाँड .. जेम्स बाँड ... मस्त !! :)
मिपावर बाँडपटाची मस्त सुरुवात झालीये ;) आता पाहुयात ही लेडी बाँड काय काय धुमाकुळ घालतेय म्यांचेष्टरात !

-
आपलाच

(प्रेरणादायी) आंद्या हलकट

"तू इयन का? मी संहिता, संहिता जोशी."
हे जबरा ... एकदम इष्टाइलीत ... (मी बाळ ... टारूबाळ =)) )

विमानतळावरची कर्मचारी माझ्याशी साता जन्माची मैत्रीण असल्याच्या थाटात चौकश्या करत होती, "तू कुठची?", "पासपोर्टावरून समजत नाही, भारतीय आहे मी!"

ही कंसातली वाक्ये बोलायला पुणेरीपणा हवा तोंडावर :)

फुकटचे, निरुपयोगी आणि क्वचित राग आणणारे सल्ले देणाय्रांची नेहेमीप्रमाणे याही वेळेला कमतरता नव्हती.
हे मात्र पटलं ... शेवटी टारानंदांनी म्हंटलंच आहे ... " ऐकावे जनाचे .. करावे योगेशचे "

सर्किटगिरी :
मांडणी : ८/१०
शैली : ८/१०
डिस्क्लेमर : १२/१०
लेखलांबी : ५/१० (जरा मोठं लिहावे, लगेच क्रमशः पाहून मुड जातो नाय तर)
==================
एकुण : ३३/४०

अँटिक आज्जींचा अँटीक नातू
-- ( टारूबाळ )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

वैशाली हसमनीस's picture

13 Sep 2008 - 6:39 pm | वैशाली हसमनीस

सुरेख !अजून येऊ द्या.मजा येइल वाचायला.

स्वाती दिनेश's picture

13 Sep 2008 - 6:48 pm | स्वाती दिनेश

सुरुवात झक्कास झाली आहे..लिही लवकर लवकर पुढचं..
स्वाती

स्वाती राजेश's picture

13 Sep 2008 - 6:55 pm | स्वाती राजेश

मस्त वाटले...
सुरवात खूपच छान केली आहे....उत्सुकता लागली आहे...पुढील कथानकाची.....
लवकर पाठव (लिही).
दिसण्यावरून जरी तू भारतीय वाटली नसशील पण तुझ्या दिलेल्या उत्तरामूळे कदाचित ओळखले असेल...:)

अवलिया's picture

13 Sep 2008 - 6:59 pm | अवलिया

वा
पहीला भाग अतिशय चांगला झाला आहे. अर्थातच मिपावरच्या तुमच्या प्रतिमेला विपरीत असे लेखन आहे. क्षणाक्षणाला दणके बसण्याची यस्टीची सवय असलेल्या आम्हाला हा विमानप्रवास पोटातले पाणी न हलवाणारा असा सुखप्रद ठरला याचे श्रेय अर्थात लेखन शैलीतील बदलाला.
पुढे काय ती उत्कंठा आहेच पण एलिनायटीसेलिया या नावाचा काही पुसटसा असा संदर्भ आला असता तर बरे असे वाटते. कारण नाव व आतील लेख जरा मेळ खात नाहीत असे वाटते. असो. आपली प्रतिभा आहेच त्यामुळे इतर सर्व गोष्टींबरोबर नावाचा पण खुलासा होईल/व्हावा ही अपेक्षा तुमच्या बुद्धीचा विचार करता जास्त नाही हे वेगळे सांगायला नको

लवकरात लवकर पुढील भाग टाकावा

(परग्रहावरुन भरकटत वायुयोनीत भ्रमण करणारा) नाना

चकली's picture

13 Sep 2008 - 7:34 pm | चकली

पुढे काय होते याची उत्सुकता आहे!

चकली
http://chakali.blogspot.com

सहज's picture

13 Sep 2008 - 7:41 pm | सहज

लवकर येउ दे पुढचे भाग.

सखाराम_गटणे™'s picture

13 Sep 2008 - 7:50 pm | सखाराम_गटणे™

लिखाण चांगले आहे,
चांगली जोरदार मालिका होउ देत.
कथेला वेग आहे.

पुढच्या भागाची वाट पहात आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

13 Sep 2008 - 9:02 pm | प्रकाश घाटपांडे


मी घाम पुसत होते तेव्हा तिनी लगेच आपल्या बर्वे या आडनावाला जागून खडूसपणा दाखवलाच


आन तु दाखवला तर तो ईक्शिप्तपना काय? आता खर्‍या खोट्याचे मिश्रन जर बेमालुन क्याल त मंग ख्वॉट खर वाटनार आन खर ख्वॉट वाटनार!
(१_६ संक्षिप्त)
प्रकाश घाटपांडे

मनिष's picture

13 Sep 2008 - 9:09 pm | मनिष

येऊ देत, वाचतो आहे! :)
-मनिष
अवांतर : तात्या क्रमशः वाल्यांना दंड नाही तर निदान आठवड्यात पुढचा भाग लिहिला नाही तर १ आठवडा मिपा वरील अकाऊंट सस्पेंड करण्याची शिक्षा द्यावी! नुसता डोक्याल भुंगा लावून ठेवतात.... :(

मेघना भुस्कुटे's picture

13 Sep 2008 - 9:52 pm | मेघना भुस्कुटे

बरोबर आहे. क्रमशः कसलं लिहिता च्यायला? आम्ही आपलं टांगून ठेवल्याचा किती राग आला तरी झक मारत पुढचं वाचायला हजर. काय करूपण शकत नाही. दंडच ठेवा तात्या.

यमे - एकदम नवीच आहे शैली. एलियनायटिस! लवकर लिव यार. (बाकी तू सायंटिष्ट म्हटल्यावर, तुझ्याकडे विज्ञानकथेची फर्माइश पुढे-मागे करणारच होते, दे टाळी!)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2008 - 11:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

यमे - एकदम नवीच आहे शैली. एलियनायटिस! लवकर लिव यार. (बाकी तू सायंटिष्ट म्हटल्यावर, तुझ्याकडे विज्ञानकथेची फर्माइश पुढे-मागे करणारच होते, दे टाळी!)

घे टाळी!
पण ही शैली थोडी तुझ्याकडून आणि टारूकडून थोडथोडी उधार घेतली आहे. आणि अर्थात थोडं माझं योगदानही, मराठी भाषेला! ;-)
आणि विज्ञानकथेची फर्माईश पहिले त्या हाफचड्डी हलकटनी केली. :-)

(मैत्रीण) अदिती

मेघना भुस्कुटे's picture

14 Sep 2008 - 1:33 pm | मेघना भुस्कुटे

हमसे पेहले? च्यामारी...
ठीक आहे, तो इतकं योग्य क्वचितच वागतो. इस बार मुआफ कर दिया!
तू लवकर लवकर लिही हां, एकतर क्रमश:... त्यात आणि उशीर नको. ते रामदासकाका तिकडे दोयुग्माचं घोंगडं भिजत घालून कुठे परागंदा झालेत कुणास ठाऊक. त्यात आणि तुझी भर नको.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2008 - 1:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आत्ता दुसरा भागच लिहित आहे,कडचित आज सांच्यापर्यंत होईल दुसरा भाग पूर्ण! तुझी काही स्पेशल डिमांड असेल तर कळव! ;-)

मेघना भुस्कुटे's picture

14 Sep 2008 - 1:40 pm | मेघना भुस्कुटे

माझे इतके लाड केल्याबद्दल आभार. पण एक अनाहूत सल्ला - वाचक गेले खड्ड्यात, आपल्याला हवं तेच आणि तेच लिहायचं.
आता इतका उद्धटपणा केलाच आहे, तर अजून एक सल्ला- तुझ्या गोष्टीतले एलियन्स पृथ्वीचं भलं किंवा वाटोळं करायला आलेत असं कायतरी दाखवून प्लीज प्लीज प्लीज रसभंग करू नकोस. ;)
(सल्ले फाट्यावर मारून स्वतःला हवं तेच केलंस तरी यत्किंचितही न रागावणारी तुझी मैत्रीण) मेघना

आनंदयात्री's picture

14 Sep 2008 - 11:13 pm | आनंदयात्री

कथेमधे अधुनमधुन काही टंच एलियनी पण येउ द्या !

मेघना भुस्कुटे's picture

14 Sep 2008 - 11:27 pm | मेघना भुस्कुटे

आंद्या? लेका विज्ञानकथा वाचतोहेस की 'तसली' पुस्तकं? बघितलंस यमे, म्हणून सांगत होते, वाचक गेले खड्ड्यात. ;)

आनंदयात्री's picture

15 Sep 2008 - 12:07 am | आनंदयात्री

नुसतीच विज्ञानकथा लिहलीतर रुक्षपणा येईल म्हणुन तसे म्हटले होते. साय फाय मुव्हीज मधे पण जर का टंच फिरंगी हिरोनी जर नाही दाखवल्या तर काय चालतील ते पिक्चर ? डोमलं ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2008 - 9:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आंद्या टंच एलियनी येतील, पण त्यांचे फोटो नाही आहेत माझ्याकडे! ;-)

आनंदयात्री's picture

15 Sep 2008 - 12:37 pm | आनंदयात्री

इनोबा म्हणे या हरहुन्नरी चित्रकाराकडे तुझ्याकरवी घाउक ऑर्डर देतो !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2008 - 12:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> इनोबा म्हणे या हरहुन्नरी चित्रकाराकडे तुझ्याकरवी घाउक ऑर्डर देतो !!

ठीक आहे .... पण मेघना चिडली तर आपण तिघांनाही महागात पडेल! :-D

आनंदयात्री's picture

15 Sep 2008 - 1:05 pm | आनंदयात्री

मेघनाची कुठं चित्रं काढाय्चीत ??

(मेघना एलियनीन आहे की काय ?)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2008 - 2:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> मेघनाची कुठं चित्रं काढाय्चीत ??
नाही, आम्ही आता चित्रं काढणार आहोत.

>> (मेघना एलियनीन आहे की काय ?)
एय, माझ्या मैत्रिणीला काय बोलाचा नाय हा, आदुगरच सांगून ठिवते! तूच मेल्या गुरूवरून आलेला गेंडा! तुझंच नाव टाकते थांब एलियन म्हणून!

मेघना भुस्कुटे's picture

15 Sep 2008 - 2:48 pm | मेघना भुस्कुटे

गुरूवरून आलेला गेंडा...
=))
=))
=))
यमे, यमे - लेकी बालिष्टर का नाही झालीस?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2008 - 3:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> गुरूवरून आलेला गेंडा...
या मधे थोडं फिजिक्सपण आहे ... गुरूत्वाकर्षण जास झालं की माणसाचा (आकारानी) गेंडा होतो! ;-)
(ह. घे रे आंद्या)

>> यमे, यमे - लेकी बालिष्टर का नाही झालीस?
माजी आय बी ह्येच मनायची! :-D

धनंजय's picture

13 Sep 2008 - 10:04 pm | धनंजय

येऊ देत पुढचे भाग.

खुद्द सांताक्लॉझशी बाँडपणा करायचा म्हणजे... नाताळच्या दिवशी भेट म्हणून कोळशाचा तुकडा मिळेल!!!

प्राजु's picture

14 Sep 2008 - 12:12 am | प्राजु

येऊदे अजूनही..
क्रमशः लिहिणार्‍यांमध्ये आणखी एका बॉण्ड वुमन ची भर पडली. वाचते आहे... लवकर लिहि गं आदिती.

(स्वगत : क्रमशः लिहिणार्‍यांचा जाहीर निषेध करावा का? :W उगाच टांगणीला लाऊन ठेवतात)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विजुभाऊ's picture

15 Sep 2008 - 10:05 am | विजुभाऊ

तू इयन का? मी संहिता, संहिता जोशी."
क्रमशः

क्रमश: लिहिणारांच्या सत्काराच्या यादीत अ़जून एक नाव. वेलकम संहीता , संहीता जोशी.
::::कधीकाळी एम असणारा ( कधीतरी प्रतिसाद सुद्धा क्रमशः लिहीलेला)
विजुभौ
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मदनबाण's picture

14 Sep 2008 - 4:07 am | मदनबाण

ह्म्म,, यम्मी ताई वाचतोय बरं,,,लवकर टाक बघु पुढचा भाग...

(हे एलियन लोक हल्ली गायी पळवतात म्हणे) :-- http://www.youtube.com/watch?v=go8sdakDqqE
मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

प्रभाकर पेठकर's picture

14 Sep 2008 - 9:13 am | प्रभाकर पेठकर

फार सुरेख लिहीलं आहे. ओघवती की काय म्हणतात तशी शैली आहे. प्रत्यक्ष प्रवासात (किंवा परदेशगमनात) जसजसे विचार मनात येत गेले, जशा जशा भावना बदलत गेल्या, त्या तशा तशा शब्दांकित करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे असे म्हणता येईल.
क्रमशः चा बाऊ नाही. अजून जरा तपशील दिले तरी वाचायला मजाच येईल. सोबत काही फोटो पाहायला मिळाले तर दुधात साखर (छे: छे: साखर आणि केशर) असेच वाटेल. नविन व्यक्ती कथानकात येताना त्यांच्याबद्दल जास्त माहिती वाचायला मिळावी ही इच्छा.

पुढील भागांबद्दल मनात उत्कंठा आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2008 - 11:16 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

काका आणि खरंतर सगळेच लोक्स,

Constructive comments (याला मराठीत काय म्हणतात?) बद्दल धन्यवाद! आता त्याप्रमाणे पुढच्या भागात थोडेतरी बदल दिसतील याची खात्री ठेवा.

आणि आता पुढच्या भागापासून फोटोपण येणार मधूनमधून!

(स्वयंघोषित पुतणी) अदिती

मेघना भुस्कुटे's picture

14 Sep 2008 - 1:35 pm | मेघना भुस्कुटे

विधायक प्रतिक्रिया.

विसोबा खेचर's picture

14 Sep 2008 - 9:18 am | विसोबा खेचर

सह्ही लिहिलं आहे, शैलीही मस्त! :)

यमे, जियो....

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Sep 2008 - 9:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लय भारी लिहुन झाला ह्यो भाग , पुढचा भाग फोट्टोसहीत येऊन दे !!!

-दिलीप बिरुटे
(एक तृतिय सारांश )

भडकमकर मास्तर's picture

14 Sep 2008 - 1:35 pm | भडकमकर मास्तर

विज्ञानकथा म्हणजे अर्थातच फिक्शन पण इथे त्याला सत्याची जोडणी ..... ( आतापर्यंत तरी मस्त चाललंय पण पुढे विज्ञानकथा सुरू होईल तेव्हा मग एकदम तो गिअर बदलताना धक्के बसतील की काय अशी भीती.... स्मूथ ट्रान्जिशनच्या अपेक्षेत आहे...) :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2008 - 1:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बसतील की काय अशी भीती.... स्मूथ ट्रान्जिशनच्या अपेक्षेत आहे...

प्रयत्न करते ... :-)

नंदन's picture

14 Sep 2008 - 2:46 pm | नंदन

पहिला भाग मस्तच. पुढच्या भागांची वाट पाहतो आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

ऋषिकेश's picture

14 Sep 2008 - 4:21 pm | ऋषिकेश

आयला.. एक्दमच सह्ही!
कित्ती दिवसांनी मनातल्या मनातही एकही चांगली-वाईट कमेंट/शेरा/पीजे असं काहिहि न मारता वाचलं.. अगदी ओघवती शैली..
खुप खुप खुप आवडली.. आता पुढचा भाग वाचतो..

मी क्रमश: वाला असल्याने क्रमशः परफेक्ट ;)
क्रमशः गिरीचा विजय असो!

-(क्रमशः गिर) ऋषिकेश

विनायक प्रभू's picture

14 Sep 2008 - 7:16 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
जमले तर आयन रॅड वाच. आण्खी वाढेल विक्षिप्तपणा.
तुझा आण्खी एक काका
वि.प्र.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Sep 2008 - 7:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काका (हे जास्त चांगलं वाटलं),

>> जमले तर आयन रॅड वाच. आण्खी वाढेल विक्षिप्तपणा.
:-)
तो/ती/ते काय आहे?

अदिती

अवांतरः माझा विक्षिप्तपणा आणखी वाढला तर काय होईल यावरही एक गोष्ट लिहिता येईल! :-)

पक्या's picture

15 Sep 2008 - 12:52 am | पक्या

लेखनाची ओघवती शैली असल्याने मजा आली वाचायला...पुढचा भाग लवकर टाका.

मनस्वी's picture

15 Sep 2008 - 11:59 am | मनस्वी

मस्त लिहिले आहेस संहिता.. पुढचे भाग पटापट टाक!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

प्रगती's picture

15 Sep 2008 - 2:31 pm | प्रगती

उत्कंठा वाढली आहे.
"तुला दीडशे वर्षांच्या गुलामगिरीचा बदला घ्यायला नाही पाठवत आहोत" ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Sep 2008 - 2:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"तुला दीडशे वर्षांच्या गुलामगिरीचा बदला घ्यायला नाही पाठवत आहोत"

हे वाक्य ती असंच बोलली होती .... आणि हे माझं डोकं नाही! :-)

उर्मिला००'s picture

17 Sep 2008 - 12:20 pm | उर्मिला००

मस्त॑!छान!अतिशय ओघवत्या भाषेत लिहिता तुम्ही.अभिनन्दन!

इंटरनेटस्नेही's picture

7 Oct 2010 - 3:07 am | इंटरनेटस्नेही

मिपावरील काही सर्वोत्तम लेखांपैकी एक. खरोखर छान, आवडला. :)