नाहि चिरा...नाहि पणती....

सौरभ वैशंपायन's picture
सौरभ वैशंपायन in जनातलं, मनातलं
23 Aug 2008 - 11:34 pm

सैनिक स्वत: स्वतंत्र विचार करत नाहि. त्याने तो करावा अशी अपेक्षाहि नसते. तो शिस्त पाळतो, सज्ज राहतो. काहि ठराविक शब्दांचा उच्चार झाला कि तो यंत्रवत काम करतो. पण त्याचे मन सुद्धा यंत्राप्रमाणेच निर्विकार असेल का? नक्किच नाहि!

युद्धाच्यावेळी त्याचा विचारांवर ताबा नसतो, शत्रुला मारायचे या एकाच विचाराने तो पिसाट झाला असतो. पण शीतयुद्धासारख्या परीस्थितीत वर्षानुवर्षे सतत दक्ष अवस्थेत त्याला ’तिष्ठत’ रहावे लागते. कधी आसामच्या किर्र जंगलात, कधी चटके लावणार्‍या थर किंवा कच्छच्या वाळवंटात आणि कधी-कधी सियाचीनसारख्या जगातल्या सर्वात उंच रणभूमीवर हाडं गोठवणार्‍या बर्फाळ थंडीत, तो सज्ज असतो. युद्धभूमी वरचा ताण कमी करण्यासाठी त्याचे पोस्टिंग दुसर्‍या ठिकाणी केले जाते. कधी १०-१५ दिवसांची सुट्टि देखिल मिळते. एरवी त्यांची काळजी घेणारे त्यांच्यापासुन शेकडो मैल दुर असतात.

समुद्रसपाटीपासुन १५ हजार फुट उंचीवरील भागात पहारा देत असलेले सैनिक....दिवसाचे प्रतिकुल २४ तास....0 अंशाखालील -५/-७ तापमान....हिवाळ्यात तेच तापमान -२० पर्यंत घसरते.... हिमवादळे...खाण्यापिण्याचे हाल....सगळा मामला रसद घेउन येणार्‍या हॅलिकॉप्टरवर....एका क्षणात वातावरणात टोकाचे होणारे बदल...रसद मिळेलच याची शाश्वती नाहि. शिवाय शत्रु पुढे तर येत नाहि ना? यावर घारीसारखे लक्ष ठेवणे, थोडक्यात मानसिक अवस्थेची कठोर चाचणीच असते. या सर्व अवस्थांत भारतीय सैनिक न कुरकुरता राहतात. मात्र एव्हढे हाल असुन भत्ता मात्र कमी मिळतो. बर्‍याचदा तो इतका कमी असतो की घर देखिल नीट चालत नाहि. याबाबत सैनिकांत असंतोष आहे, क्वचित ते बोलुनहि दाखवतात, पण त्यामुळे त्यांच्या कर्तव्यात काडिमात्र कसुर होत नाहि.

उंच बर्फाळ ठिकाणी जवानावर अनेक ताण असतात. त्यावर अनेक मानसिक आघात होत असतात. क्षण दर क्षण त्याचे मन एकलकोंडे जिवन जगत असते. काहि ठीकाणी जवानांना ६ महिनेच राहण्याची परवानगी असते. अन्यथा त्याच्या मनावर विपरीत परीणाम होण्याची शक्यता असते. अशा एकलकोंडेपणामुळे कधीतरी विचारांची वादळे उठतात व जवान दडपणाखाली जातो. उंच शिखरे-धुकं-कुंद वातावरण-निर्मनुष्य प्रदेश-घरची आठवण-कर्तव्याचा ताण आणि मानवी शरीराच्या नैसर्गीक गरजा या ताणांचा परीपाक होतो, त्यामुळे जवान "ब्लॅंक" होतो, त्याचा मेंदुवर ताबा राहत नाहि, संमोहन केल्यागत तो भरकटतो व काहिवेळा उंचावरुन खाली पडतो. क्वचित त्याला वेडाचे झटके येतात. तो चिड-चिडा होतो त्यामुळे तो हिंसकही बनतो - एका ताबा सुटलेल्या क्षणी दुसर्‍यांवर तरी गोळ्या चालवतो किंवा स्वत:वर तरी. अशा घटना घडत असल्याने जवानांची दरवेळी वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग केली जाते. सामान्य नागरीक जिथे अर्धा तास देखिल थांबण्यास तयार होणार नाहि तिथे हे जवान ६-६ महिने राहतात.

वाळवंटी प्रदेशाबाबत बोलायंच झालच तर उंची आणि तापमान हे सोडल्यास बाकि गोष्टिही थोड्या सौम्य मात्र त्याच पठडितल्या असतात. इथे मानसिक ताण वाढवायला ’मृगजळ’ कारणीभूत ठरते. आजहि थर-कच्छ या वाळवंटात सीमेजवळचा शेकडो km. भाग हा निर्मनुष्य आहे. USA-जर्मनी सारख्या देशांच्या सैनिकांना वाळवंटि प्रदेशात काम करायची वेळ आलीच तर रेतीने पायांच्या बोटांच्या बेचक्यांत इजा होऊ नये म्हणुन ४ प्रकारच्या पावडरींचा वापर केला जातो. USA च्या जवानांचे तंबु देखिल "controlled tempreture" असतात. त्यांची प्रोफेशनॅलिझम व व्यक्तीस्वतंत्र्य या दोन गोष्टींवरुन काळजी घेतली जाते. त्यांना बुलेट-प्रुफ जॅकेट्स मिळतात. भारतीय सैनिकाचे असले ’लाड’ होत नाहित. त्यांचे ’हाल’ असतात.

आणि जवानांचे हे हाल १९६२ च्या चीन युद्धपासुन चालु आहेत. त्यावेळी सरहद्दीजवळील सैनिकांना गरम कपडे, कड्तुसे आणि अत्याधुनिक रायफलिंची कमतरता भासली होती हा सत्य इतिहास आहे. त्याचे खापर कृष्णमेनन यांच्यावर फोडण्यात आले. त्यांनी राजिनामा देखिल दिला पण गेलेला भूभाग आणि शहिद झालेले जवान परत येणार आहेत का? अदुरदर्शी नेते "भाई-भाई" आणि ’पंचशील’ तत्वे या भोंगळ आणि भोळसट गोष्टींमुळे शत्रुला मिठ्या मारतात आणि त्याची किंमत राष्ट्राला चुकवावि लागते. मग ते १९६२ असो किंवा १९९९ चे कारगिल असो.

शस्त्रास्त्रे किंवा इतर सामग्रीच नव्हे तर सैनिकाला सर्वात जास्त गरज असते ती मनोधैर्याची. विजय होत असणार्‍या सैन्याचे मनोबल केव्हाहि उंचच असते. मात्र पराजयाचे रुपांतर विजयात करणे हि त्या सैनिकाची उच्च कसोटी असते. ऑक्टोबर १९४८ मध्ये पाकिस्तानने कश्मीरवरती हल्ला केला. खरंतर काश्मीर हा पाकिस्तानात जावा या करीता पं.नेहरु, सरदार पटेल, आचार्य कृपलानि व लॉर्ड माऊंटबॅटन यांनी राजा हरीसिंग याला परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला कि "पाकिस्तानात जा!!" कारण - बहुसंख्य जनता मुस्लिम होती. राजा हरीसिंगला त्याच्या डोग्रा घराण्याची सत्ता टिकवायची होती शेख अब्दुल्ला उर्फ शेर-ए-कश्मीर ती पालथी घालतील म्हणुन राजा हरीसिंग यांना भारतात यायचे होते, तर शेख अब्दुल्ला यांना "आझाद काश्मीर" पाहिजे होता. कोणीच कोणाचे ऐकेना. शेवटी शेख अब्दुल्ला यांनी सरळ पाकशी संधान बांधुन घुसखुर बोलावले. हरीसिंगांचे राखिव सैन्य त्या हल्ल्यासमोर पाचोळ्यासारखे उडुन गेले. त्यांच्या सैन्यातील मुस्लिमांनी ऐनवेळी पलटी मारली ते फितुर झाले. लोण्यातुन सुरी फिरावी तसे घुसखोर श्रीनगरच्या वेशीवर थडकले. लुटालुट आणि बलात्कार यांना ऊत आला शेवटी पाकिस्तान आपल्याला स्वतंत्र करत नसुन गुलाम करतोय हे लक्षात आल्यावर "शेर-ए-कश्मीर" शेपटाला आग लागल्यासारखा दिल्लीला आला.व नेहरुंना काश्मीर वाचवायला सैन्य पाठवा असे सांगु लागला.

राज हरीसिंगचे न ऐकणारे नेहरु मात्र पाकिस्तानची मदत मागणार्‍या शेख अब्दुल्लासाठी मात्र सैन्य पाठविन म्हणुन तयार झाले कारण - शेख अब्दुल्ला म्हणजेच कश्मीरी जनता. नेहरु शेवटी लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या मागे लागले - "सैन्य पाठवा!" कारण - फाळणी नंतर जवळपास ८ महिने भारत-पाक या दोन्ही देशांचे "चीफ ऑफ आर्मी स्टाफ" हे ब्रिटिश होते. आणि त्या दोघांचे "बाप" होते लॉर्ड माऊंटबॅटन. आता कोणता शहाणा आपलेच दोन अधीकारी तिसर्‍याच देशांसाठी एकमेकांशी झुंजवेल? लॉर्ड माऊंटबॅटन टाळाटाळ करु लागले त्यांनी विलिनीकरणाचा मुद्दा काढला कारण तेव्हा कश्मीर स्वतंत्र होते. आणि राजा तयार असला तरी जनतेचे प्रतिनीधी शेख अब्दुल्ला भारतात विलीन होण्यास तयार नव्हते त्यांना "आझाद कश्मीरच" हवे होते. इथेच सगळ गाडं अडत होतं. सरते शेवटी नेहरुंनी वैतागुन अब्दुल्ला यांना तुमचे तुम्ही बघुन घ्या असे सांगितल्यावर "तात्पुरते विलिनीकरण" असा तोडगा निघाला. नाराजीने लॉर्ड माऊंटबॅटन सुद्धा सैन्य पाठवायला तयार झाले. मेजर सेन यांच्या अधीपत्याखाली एक ब्रिगेड पाठवण्यात आली. मे.सेन जाण्याआधी महात्मा गांधींना भेटायला गेले तेव्हा आवेशपूर्ण आशिर्वाद देण्याऐवजी "महात्मा" म्हणाला - "युद्ध हा मानव जातीला लागलेला मोठ्ठा कलंक आहे! असो! तुम्ही तुमचे काम करा!"

असा थंड प्रतिसाद घेउन मे.सेन श्रीनगर मध्ये पोहचले. १० हजारपेक्षा जास्त घुसखोरांना त्यांनी एका ब्रिगेड्च्या जोरावर हुसकावत-हाकलत "डोमेल" या लष्करी दृष्ट्या महत्वाच्या ठिकाणापर्यंत मागे हटवले. ते अजुन मदत मागत होते जेणे करुन आत्ता पाय लावुन पळुन गेलेले घुसखोर एकत्र आले आणि उलटले तर दमलेले भारतीय सैन्य त्यांना जास्तवेळ थोपवु शकणार नाहित.पण मदत मिळण्याऐवजी त्यांच्यावरच्या ब्रिटिश अधीकार्‍याने त्यांच्याच सैन्यातील काहि प्लाटुनच परत बोलावल्या. निदान डोमेल सारखे महत्वाचे ठिकाण घेउ द्या असे सेन म्हणत होते तेव्हा नेहरुच म्हणले डोमेल जाऊ दे! एकहि पाऊल पुढे जाऊ नका. आता असे नेते असल्यावर सैन्य कच नाहि खाणार?

दहशतवाद हा भारताच्या पाचवीला पूजलेला आहे. अतिरेकी कारवाया करायला कोण मदत करतो हे सांगायला ब्रह्मदेवाची गरज नाहिये. तरीहि परत-परत "शांती-शांती-शांती" करुन लहोरला बस पाठवायची हुक्की नेत्यांना येते. पाक त्यांचे काम सोडत नाहि आणि आपण आपले. ६० वर्षांनी देखिल त्यात खंड पडलेला नाहिये. या परोक्षयुद्धाला पाकिस्तानची गुप्तहेर संघटना "I.S.I." मदत करते, यालाच ते "हजार जख्मसे लहुलुहान करना" असे म्हणतात. कारण आपण भारता विरुद्ध कधीच युद्ध करुन जिंकु शकत नाहि हे पाकला माहित आहे. अतिरेकि कारवायांना कसलेच नीती-नियम नसतात. फक्त दहशतीने आपले अस्तित्व दाखवणे इतकाच त्यांचा उद्देश असतो. आणि सैनिक हे त्यांचे प्रमुख लक्ष्य असते.

या कारवाया रोखण्यासाठीच मग सैनिकांना वेळी-अवेळी एखदे झडतीसत्र किंवा ऑपरेशन हाती घ्यावे लागते. त्यात ओल्या बरोबर सुकेही जळते. सैनिकांना सामान्य नागरीकांना त्रास द्यायचा नसतो पण दहशतवादि सामान्य माणसाआड लपल्याने "इंद्राय-तक्षकाय स्वाह:" असे म्हणुन इंद्राच्यामागे लपलेल्या तक्षकासाठी इंद्राचाहि स्वाहा:कार करावा लागतो. जी गोष्ट काश्मीरची तीच आसाम,नागालॅंडची. तिथल्या सर्वसामान्य जनतेत भारतीय सैनिकांबाबत चीड आहे. काश्मीरमध्ये "आझाद-कश्मीर" वाले तर आसाम-नागालॅंड मध्ये "माओवादि" हैदोस घालत आहेत. नागालॅंड मध्ये काहि महिलांनी भारतीय सैनिकांचा निषेध करण्यासाठी नग्न मोर्चा काढला होता, त्यांच्या हातात फलक होते "They raped us!" आणि आपल्या शरीराची भूक भागवण्यासाठी खरोखरच काहि सैनिकांनी तिथल्या स्त्रीयांवर अत्याचार केले होते. त्या भयानक चुकिचे परीणाम भारतीय सैन्य भोगत आहे. आज नागा लोकं भारतीय सैनिकावर भरवसा ठेवत नाहित. ज्यांचे रक्षण करायचे आहे तेच अविश्वास दाखवणार असतिल तर सैन्याच्या मनावर विपरीत परीणाम होणारच.

पंजाब, नागालॅंड, आसाम या ठीकाणी नक्षल्वाद दडपण्यासाठी पोलिस असमर्थ होते म्हणुन निम-लष्करीदलाची स्थापना केली. मात्र तरीहि "ऑपरेशन ब्लु-स्टार" करावेच लागले ना? इतर काहिवेळा अंतर्गत बाबींसाठी लष्कराला पाचारण का करावे लागते? आणि नक्षलवादच नव्हे तर प्रक्षोभक भाषणांनी नेते जनतेची डोकी भडकवतात आणि मग लष्कराला बोलवावे लागते. कश्मीरमध्ये तर हे वरचेवर होत असते. लष्करावर पडणारा हा ताण तुटेपर्यंत ताणु नये ये राज्यकर्त्यांना आणि जनतेलाहि समजायला हवे. Enough is Enough!

सैनिकांसाठी कोणीच संप करत नाहि, कोणी आंदोलने करत नाहि. मिग विमाने उडती शवपेटी ठरत असताना तरुण वैमानिक-सैनिकांचा जीव धोक्यात टाकला जातोय. पण त्याचे कोणाला काहिच घेणे-देणे नाहिये. "रंग दे बसंती" फक्त चित्रपटांपुरतेच असते. इस्त्राएलचे २ सैनिक हमासने काय बंदी बनवले? इस्त्राएलने अख्खी रणगाड्यांची रांगच गाझापट्टीवर रोखली. आमच्या २ जणांना सोडा अन्यथा तुमच्या २०० जणांची प्रेते उचलायची तयारी ठेवा अशी ताकिद देऊन ती खरी देखिल केली, त्या दोन सैनिकांना सोडवलेही. मान्य आहे इस्राएलच्यापाठीशी अमेरीका उभी राहते, पण तिथे लढण्यासाठी ती येत नाहि ते काम इस्रायली सैनिकांनाच करावे लागते, आणि म्हणुनच इस्राएल त्यांच्या सैनिकांची काळजी घेते. आमचे "कॅ.सौरभ कालिया" बंदी बनवले जातात, 0 पॉईंट वरुन त्यांना गोळी घातली जाते, त्यांचा मृतदेह विटंबना करुन परत पाठवतात आणि आम्ही मात्र शांततेची गाणी गातो. भारताच्या तिन्ही दलांचे मिळुन २० लाख सैन्य आहे. त्या हिशोबाने किमान ५०० नागरीकांचे रक्षण एक सैनिक करतो असे सरळ-साधे उत्तर येते. याचा अर्थ जर आपला एक जवान युद्धात, अतिरेकी कारवायात अथवा विमान दुर्घटनेत गमावला तर ५०० जीव संपले असा हिशोब मांडता येतो. पण कोणालाच या इतक्या मौल्यवान जीवाची किंमत नाहि असे दिसतेय. आज-कालच्या दिवसात तरुण फारसे सैन्यात जात नाहित. उलट सैन्यातील मोठे अधिकारी काहि वर्ष सेवा करुन निवृत्त होतात, कारण मोठ्या कंपनींत त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळते. दुसरीकडे लोकसंख्या वाढतेय, असे होत राहिले तर उद्या १००० भारतीयांचे रक्षण एक सैनिक करेल, जे सैनिकांवर खुप ताण निर्माण करेल.

रणांगणावर सैन्याने जिंकलेली युद्धे, नेते चर्चेच्या टेबलवरती हरतात. हा भारताचा इतिहास आहे. जेते असतानाहि १९६५ साली आपण ताश्कंद येथे गेलो. त्यात एक पंतप्रधान गमावला. वास्तविक "आम्ही सांगु त्या ठिकाणी पांढरे निशाण घेउन या आणि सांगु तेथे बिनशर्त सही करा!" असे सांगु शकलो असतो अमेरीका-रशिया कितीही म्हणत असले तरी ६०-७० कोटी भारतीय जनतेचा आवाज नक्किच जास्त मोठा ठरला असता. १९७१ साली देखिल जनता व लष्कर नाराज होऊन पाकच्या पंतप्रधानाला(भुट्टो) पदच्युत करेल जीव देखिल घेइल म्हणुन ऐनवेळी सिमला कराराला शक्य तितके सौम्य रुप दिले. सिमला करार हा जेता म्हणुन केला की ’तह’ म्हणुन केला गेला? ९५ हजार सैनिक त्यांचे कैद होते आपले नाहि. जनता-लष्कर त्या पंतप्रधानांना काहि का करेनात? अशी किड वेळिच ठेचलेली बरी असते. "युद्ध करताना कुठे गेली होती अक्कल?" असे विचारुन एका काना-मात्रेचा फरक न करता सिमला करार व्हायला पाहिजे होता. आणि इतके करुन शेवटी झाले काय? गेलाच ना भुट्टो फासावर? बेनझीर भुट्टो देखिल २००७ मध्ये मारली गेली तेव्हा शेवटच्या भाषणात भारता विरुद्ध गरळ ओकलीच होती ना? मग दया-माया कसली? शत्रुला शत्रु सारखेच वागवा. संधी मिळताच चिरडुन टाकावा अन्यथा घोरी जिंकला तर पृथ्वीराज चे मरण नक्की असते.

१९६५ साली दिल्लीत आपण सायबर जेट आणि पॅटन टॅंक या अमेरीकेच्या तात्कालीन सर्वात प्रगत अश्या युद्ध साहित्याचे "प्रदर्शन" लावले होते जे पाकिस्तान विरुद्ध जिंकले होते अथवा उध्वस्त केले होते - "हे बघा, भंगारच्या भावत विकायला काढले आहेत भारतीय सैनिकांनी!" म्हणुन. १९७१ साली देखिल पाकचे ९५,००० सैनिक शरण आणले, दोन देशांच्या युद्धात एकाच वेळी इतके सैनिक शरण यायची जगाच्या इतीहासातील ती पहिलीच वेळ होती. मात्र लाहोर - १ किमी. अशा लिहीलेल्या मैलाच्या दगडापासुन आपले सैन्य मागे बोलावले गेले.

जीव देउन, रक्त सांडुन किंवा आयुष्यभरासाठी पंगु होऊन सैनिक युद्ध जिंकतात. नेते मात्र चर्चा करुन ’माघार’ घेतात. आपल्याच शहीद झालेल्या साथीदारांच्या रक्तरेषेवरुन जवान मागे फिरतात. पुढे त्रयस्थ देशांच्या सांगण्यावरुन चर्चेची कधीच न संपणारी गुर्‍हाळे चालत राहतात. "झाले गेले विसरुन जाऊ" अशी भाकड तत्वज्ञान असलेली आणि कधीच चाल न बदलणारी शांततेची गाणी एकतर्फीच गायली जातात. पण मागे उरतात - तिरंग्यात लपेटलेले मृतदेह....२१ फैरींची सलामी.... सन्मानपत्रके व पदके...आणि सरतेशेवटी अस्थिकलशातील पाण्यावर पसरलेली मुठभर राख आणि २-४ बुड्बुडे बस्स!!!

- सौरभ वैशंपायन(मुंबई).

धोरणइतिहासभूगोलविचारलेखमतप्रश्नोत्तरेवाद

प्रतिक्रिया

II राजे II's picture

24 Aug 2008 - 1:45 pm | II राजे II (not verified)

जीव देउन, रक्त सांडुन किंवा आयुष्यभरासाठी पंगु होऊन सैनिक युद्ध जिंकतात. नेते मात्र चर्चा करुन ’माघार’ घेतात. आपल्याच शहीद झालेल्या साथीदारांच्या रक्तरेषेवरुन जवान मागे फिरतात. पुढे त्रयस्थ देशांच्या सांगण्यावरुन चर्चेची कधीच न संपणारी गुर्‍हाळे चालत राहतात. "झाले गेले विसरुन जाऊ" अशी भाकड तत्वज्ञान असलेली आणि कधीच चाल न बदलणारी शांततेची गाणी एकतर्फीच गायली जातात. पण मागे उरतात - तिरंग्यात लपेटलेले मृतदेह....२१ फैरींची सलामी.... सन्मानपत्रके व पदके...आणि सरतेशेवटी अस्थिकलशातील पाण्यावर पसरलेली मुठभर राख आणि २-४ बुड्बुडे बस्स!!!

हिजडे सत्ताधारी असल्यावर हेच होत राहणार नेहमी !
भारताचे शुरवीर पुत्र असेच नाहक बळी जात रहणार... व आमचे सत्ताधारी... कधी बस सेवा तर कधी ट्रेन सेवा... कधी ईफ्तेहार पार्टी करत... ये दोस्ती... हम नही छोडेंगे म्हणणार तर... ते पाकड पाठीमागून खंजरावर खंजर मारुन... पुन्हा पुन्हा जख्मा ओल्या करत राहणार... हिंदुंची संघटना म्हणून सत्तेत आलेली भाजपा... एक अणूबॉम्ब फोडून चुप्प बसली .... व पाकने कारगील पर्यंत धडक मारली..

पाक शत्रु राष्ट्र आहे... पण त्यांच्या जवळ एक जिद्द आहे... भारताला संपवण्याची .... अनेकवेळा प्रयत्न केले... अनेक सरकार बदलले... अनेक नेते त्यांचे मारले गेले पण जो नवीन आला त्याचा विचार व उद्देश पक्का होता... युध्द.... समोरासमोर नाही तर छुप्पे युध्द... व आमच्या भारतात.... महात्मा होते.... लोहपुरुष होते... कमालीची जिद्द असलेली इंद्रा गांधी होती... ए सरकार कुछ नही कर सकती... असे म्हनून मोठा पॉज घेणारे वाजपयी आहेत.... तोडक्या तोडक्या हिंदी मध्ये गेली १५ वर्ष मी पण भारतीय आहे म्हनून गळा फाडणारी सोनिया आहे .. पण कोठेच दुरवर एक जिद्दी चेहरा दिसत नाही आहे जो पाकचें कंबरडे मोडू शकेल.... त्यांना सरळ सरळ आवाहन देऊन... गरज पडलीच तर युध्दाची तयारी करत असलेला दिसत नाही आहे..... !

ते आमच्या घरापर्यंत येऊन बॉम्ब फोडून निघून जातात आरामात... पकडने तर दुर .. त्यांचे साधे ठस्से पण भेटत नाहीत.... न्युज चॅनलवर सिमीचे ठीकाणे कार्य पध्दती, योजना (अहमदाबाद बॉम्ब हल्ल्यापुर्वीच ) व्यवस्थीत ..... ये देखो, एसे बनाते ने बॉम्ब.... करत सब से तेज कालच दाखवत होता... व वर ही पुस्ती .... यह टेप अहमदाबाद बॉम्ब हल्ला होणे के पुर्व का आहे... सिर्फ हमारे चॅनेल पर... !
रोज एक शार्प शुटर आरामात टिव्हीवर कार्यक्रम करुन जात आहे.. गेली तीन दिवस बघतो आहे.. पण कोठे हे नाही पाहीले वाचले की पोलिसांनी त्याला पकड्ले अथवा नाही ?

तुम्ही आम्ही सामान्य जण ..... असेच काहीतरी मोठ मोठे लेख व प्रतिसाद लिहणार्...व शांत पणे सिगरेटचे घोट घेत... ह्या देशाच काही खरं नाही म्हणत... रात्री कुठ्ला चित्रपट पाहयचा आहे ह्याची तयारी करणार... अथवा कोठे तरी बस मध्ये, बाजारामध्ये... लोकल ट्रेन मध्ये.. एखादा दहशतवादी बॉम्ब फोडेल व त्यात कोठे तरी कोप-यात.. रक्ताच्या थारोळ्यात हात कोठेतरी पडलेला व पायाचा अतापत्ता नसलेला आपला मृतदेहा कडे पाहून तो न्युज चॅनेल वाला म्हणत असेल " आप देख रे हे ... बॉम्ब ब्लास्ट हुवा है .... अभी अभी... सबसे तेज... सिर्फ हम आप के लिए लाये है !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

मदनबाण's picture

24 Aug 2008 - 6:31 pm | मदनबाण

१००% सहमत...

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

स्वप्निल..'s picture

25 Aug 2008 - 8:51 pm | स्वप्निल..

राजे,

पुर्ण सहमत तुमच्याशी. मला पण असेच वाटते.

स्वप्निल..

डॉ.प्रसाद दाढे's picture

24 Aug 2008 - 8:29 pm | डॉ.प्रसाद दाढे

सध्या भारतीय लष्करात तरूण जायला नाखूष आहेत ह्याची बरीच कारणे आहेत. मुख्य कारण कामाच्या मानाने कमी पगार असावे (सहाव्या वेतन आयोगात कदाचित बर्‍यापैकी वाढ मिळेल)
इतरही बरीच ग॑भीर कारणे आहेत
- बाबू लोका॑ची अमर्याद सत्ता
- भ्रष्टाचार
- कालबाह्य नियम
- सरकारचे 'गरज सरो..' धोरण
- सतत बदलीची टा॑गती तलवार त्यामुळे स॑साराची, मुला॑च्या शिक्षणाची आबाळ
- धोक्याचे काम

सौरभ वैशंपायन's picture

24 Aug 2008 - 10:17 pm | सौरभ वैशंपायन

आज आपल्यात जागरुकता नाहि.

तुम्हि आमच्या जवानांची आणि शेतकर्‍यांची योग्य काळजी घ्याल तरच तुम्हांला खुर्ची उबवायला मिळेल हे सत्ताधिशांना सांगण्याची गरज आहे.