मनरक्षिता (३)
मनरक्षिता (१)
मनरक्षिता (२)
सकाळी उठल्यावर चैतीला सपान आठवलं. अंघोळ वगैरे आवरून आज्जीने दिलेला डबा घेतला अन भीत भीतच ती शाळेत गेली.
मास्तर अजून शाळेत आला नव्हता !
तासाभरानं महादू शिपाई सांगत आला. ‘पोरानु, मास्तरला फाटेच्या पारी लकवा मारलाय. एक हात अन एका बाजूच्या अंगावरनं सगळं वारं गेलंय. उठायसुदिक यीना झालंया..!!
‘हुर्रे’ करून सगळी पोरं उधळली.
चैती सपान आठवत घरी आली. पण कुणालाच सपनाबद्दल काय बोलली नाही. आज्जीला सुद्धा !
चार दिवसांनी शाळेत नव्या बाई हजर झाल्या. हसऱ्या, गोड बोलणाऱ्या. चैती हुरूपानं शाळेत जाऊ लागली.
बघता बघता एक यत्ता सरली. चैती दुसऱ्या यत्तेत गेली. मैतरणी, खेळगडी, अभ्यास यात हळूहळू रमून गेली.
शाळा सुटल्यावर रिकाम्या मैदानात खेळ रंगे. सगळी पोरं एकाच चणीची. फक्त सुताराचा नाम्या थोराड होता. एकेका यत्तेत दोनदोनदा गचके खाल्लेला. गडी शाळेत शोभायचाच नाही. वर्गात कधीतरीच दिसणार, पण पोरात दंगामस्ती अन मारामारी करायला मातर पुढं. पोरीच काय, पोरंसुद्धा त्याला टरकून असत. अन तो खुशाल खोड्या काढून मनाला येईल त्याला बुकलत असे.
त्या दिवशी पोरं अन पोरी फरशांचे तुकडे मांडून लगोरी खेळत होत्या. तोच नाम्या आला अन त्यानं मुद्दाम पायानं लगोरीचा ढीग उधळून दिला. चैतीनं सगळ्यांना जवळ बोलावून कानात कुचूकुचू केलं अन सर्वांनी मिळून नाम्याला चारी बाजूनी घेरलं. दांडू, पट्टी, छडी, दोरी जे मिळेल त्यानं सर्वांनी नाम्याला ब-बदडलं. तेव्हापासनं त्याची दादागिरी बंद झाली.
नाम्याला जरा वचक बसला खरा, पण चैतीवर त्यानं डूख धरला. त्यानंतर कुठे दिसेल तिथे तो तिला खुन्नस करू लागला. विखारी नजरेनं तिला कुरतडू लागला. तिच्या कोवळ्या काळजाचा ठाव सुटल्यासारखं झालं. दडपणानं जीव काचून गेला. जेवता घास नीटपणी पोटात जाईनासा झाला.
….त्या दिवशी येरवाळीच घरातलं पाणी संपलं. शाळेची वेळ चुकेल म्हणून चैती आज्जीची वाट न पाहता एकटीच कळशी घेऊन आडावर गेली. आडावर अजून वर्दळ सुरु झाली नव्हती. सरसर पाणी खेचून बादलीतून कळशीत ओतताना कुठूनसा अचानक नाम्या उगवला अन काय समजायच्या आतच त्यानं चैतीला खच्चून धक्का दिला.
चैतीला ओरडायलासुद्धा सुधरलं नाही. अन सुचलं तेव्हा, ओरडायला आ केलेल्या तोंडात अन नाकात भराभरा विहिरीचं थंडगार पाणी जाऊ लागलं. हातपाय मारून ती कशीबशी धडपडत जईवर चढून थरथरत उभी राहिली. दोन मिनिटांनी जरा हुश्शार झाल्यावर ती खच्चून ओरडली, ‘आज्जे, आज्जे गं…’ .
तवर घागर घेऊन आलेल्या हौसामावशीनं तिला विहिरीत पडलेली पाहून आरडून चार बाप्ये गोळा केले. रहाटाच्या दोराचा फास करून विहिरीत सोडला गेला. एक बाप्या विहिरीत उतरला अन त्यानं चैतीच्या कमरेला दोर पक्का बांधला. बाकीच्यांनी तो वर ओढला अन ती वर आली.
नाम्याचं नाव कुणाला बोलली नाही ती. रात्री जेवणं झाल्यावर आज्जीजवळ आडवी झाल्यावर मात्र तो धसका तिच्या काळजाच्या तळातून वर आला. आज्जीच्या मंद घोरण्याचा आवाज ऐकू यायला लागला अन खोल रुतलेला काटा तेल सोडताच वर यावा तशी मनातली नाम्याची धास्ती भसकन वर आली. चैतीनं आईचा आठव केला. घाबऱ्या मनाला कसंतरी काबूत आणलं अन डोळे मिटले.
...भयाची अन असहायतेची परमावधी ! त्या तणावाखाली पुन्हा एकदा ती अज्ञात कळ दाबली गेली. पुन्हा एकदा ती विद्दुल्लतेसारखी संवेदनेची लाट वर उसळली. तिने चैतीला वेढून घेतले अन आपल्यासवे अथांग अपरिचित विश्वात घेऊन गेली.
…..नाम्या विहिरीच्या काठावर उभा होता. विहिरीतल्या अर्धवट प्रकाशात जईवर अंग चोरून उभ्या असलेल्या चैतीला खालून वर पाहताना त्याच्या काळ्याशार चेहेऱ्यावर, तोंडातले पांढरे दात, कुऱ्हाडीच्या चमकत्या पात्यासारखे वाटले. खी: खी: करून हसता हसता त्याने आपले हात पुढे केले अन तो विहिरीच्या काठावरून खाली वाकला. एकाएकी त्याचे हात लांब लांब झाले. सापागत वळवळत चैतीच्या दिशेने झेपावले.
….तिने इकडे तिकडे पाहिले. नाम्याची सावली पडून विहिरीचे पाणीसुद्धा काळेशार दिसत होते. तिचा घास घ्यायला टपलेले…. तिने विहिरीच्या भिंतीला चिकटून त्या हातांचा स्पर्श टाळण्याचा आटोकाट प्रयत्ने केला…. पण अखेर ते हात तिच्यापर्यंत येऊन पोचलेच ! किंकाळी मारण्यासाठी तिने तोंड उघडले, तोच कुणीतरी नाम्याचा हात धरून खेचला. एक झटका बसून नाम्या धाडकन विहिरीत पडला. .पट्टीचा पोहणारा असूनही, विहिरीच्या पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला….
सपान किती अन खरं किती याची जाणीव धुरकट झाली…अन चैती गाढ झोपेच्या अंधारात बुडाली.
सक्काळी सक्काळी सरावनी सांगत आली.
‘नाम्याला हिरीतल्या हडळीनं झपाटलं ! राती हिरीच्या कट्ट्यावर चोरून विडी वढत बसला हुता म्हनं अन येकायेकी हिरीतच पडला ! दोराला धरून वर आला खरा, पन तापानं जळाया लागलाय. आन झोपेत जाबडतोय…ये हडळी, माझा हात सोड, म्हणून..!’
चैतीच्या डोळ्यात खोलवर एक सुटकेचा सुस्कारा उमटला. दानम्माच्या किरपेचा अन आईच्या मायेचा पदर हातात गवसल्यागत ती अंतर्यामी आश्वस्त झाली.
….अन मग गावात एक अनोखं सत्र सुरु झालं.
….सदानकदा वस्सकन पोराबाळांच्या अंगावर येणारा किराणावाला किशाबा , रात्रीतनं मधुमेहाची साखर वाढून तोंडाला फेस येऊन दोघांच्या आधारानं दवाखान्याला गेला, त्याच्या आदल्या दिवशी त्यानं चैतीच्या हातातले दहा रुपये काढून घेतले अन तिला साखर न देता तसंच हाकलून दिलं होतं , हे गावाला माहित नव्हतं.
….एकट्या-दुकट्या मुलांना गाठून त्यांच्यावर तरबत्तर होणाऱ्या दारुड्या संत्याला, ज्या राती पिपळावरच्या समंधानं झपाटलं, त्या संध्याकाळी, गल्लीच्या तोंडावरच, शाळेतून घरी येताना चैती त्याच्या तावडीत गावली होती, हेही गावकऱ्यांना कधी समजलं नाही.
शेतातल्या पेरूच्या झाडाचे दोन पेरू घेतले म्हणून चैतीला अन तिच्या मैतरणीना चिंचेचा फोकाने झोडपल्या दिवशी मध्यराती नागूअण्णाच्या अंगावर नागीण उठली अन कायम वर्गातल्या पोरांच्या अघोरी खोड्या काढणाऱ्या नाऱ्याच्या बोटाला ज्या दिवशी इंगळी डसली त्याच्या आदल्या दिवशी त्यानं चैतीच्या दप्तरात खेकडे घालून ठेवले होते, याचा संबंध जोडण्याचं कुणाला काहीच कारण नव्हतं !
…पण हे सगळे अजुनी एका लक्ष्मणरेषेच्या बाहेर होते. यातल्या कुणाला अजून तिला थेट इजा करण्याची दुर्बुद्धी झाली नव्हती. त्यांच्या विकृतीच्या लवलवत्या ज्वाळांची धग अद्यापि तिच्या निरागसतेला होरपळू लागली नव्हती.
…अन म्हणून तिचं भय आटोक्यात होतं… अन लक्ष्मणरेषेच्या पलीकडील अनर्थसुद्धा !
चैतीची शाळा सुखरूप पार पडली अन उगवतीच्या सूर्याने धरतीला उजळावे तशा तारुण्याच्या खुणा तिचा देह उजळू लागल्या. पिंगट तपकिरी डोळ्यात चंद्रज्योती पेटल्या. आईचे देखणे रूप घेतलेली चैती शुक्राच्या चांदणीगत चमकू लागली. पण तिच्या रुपाला एक वेगळीच धार होती. नजरेत असं काही होतं, की, दुसऱ्यांदा तिला न्याहाळू गेलेला गडी तिच्या, कोऱ्या पात्यासारख्या लखलखीत नजरेला नजर काही भिडवू शकत नसे.
दहावीचा निकाल लागला अन तिचं कौतुक साजरं करून आजी रातच्याला झोपली, ती परत काही उठली नाही. पिकलं पान झोपेतच गळून पडलं. एका रात्रीत चैतीला दाही दिशा उघड्या झाल्या.
कुणीतरी तिच्या चुलत्याला निरोप दिला. अन तो हजर झाला.
सोळावं वरीस लागलेल्या चैतीला बघून त्याची नजर फाटली. तीन दिवस होईपर्यंत त्यानं कळ काढली अन चौथ्या दिवशी चैतीला सामान बांधायला सांगितले.
‘चैतू बाळ, आता मी अन तुझी चुलती हेच तुझे मायबाप बरं. आन आम्हालाबी तुझाच आधार. तवा समदा पसारा गोळा कर. दोनपरी यष्टी हाय आपल्या गावाला जायला.’
तो मायेनं बोलत हुता, तरी पण चैतीला त्याच्या नजरेतल्या धगीचा चटका बसल्याशिवाय राहिला नाही..!
दोन बोचकी घेऊन चैती चुलत्यामागून गाडीत चढली तेव्हा तिला माहिती नव्हतं, उद्या आपल्याला काय सपान पडणार आहे ते.
…अन तिचं धुमारलेलं तारुण्य पाहून पेटलेल्या चुलत्याला माहिती नव्हते की तिला त्याचं किती भ्या वाटणार आहे ते…..!
( समाप्त ).
Book traversal links for मनरक्षिता (३)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ह्म्म... चैती स्वतःचं सतत
छान कथा.
कथा आवडली.
गूढ
आँ...? आता अजुन कसली वळणे ?
धन्यवाद!
धन्यवाद.
अरे हो ! खरंच की. , खलपात्रे
समाप्त??
मस्त ग!
आवडली
कथा आवडली. नेहमीच्या
कथा आवडली.
कथा आवडली.
कथा आवडली.
*****
हे काय?
कथा..
हा भागही छान झालाय, पण कथा
वाचक आणि प्रतिसादकांचे 'मना
नवीन कथा पण येऊ दे स्नेहातै.
कथा आवडली
मस्त कथा.
जबराट कथा..........थोडी अजून
अरे हो ! खरंच की. , खलपात्रे