चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग-३ (अंतीम)

लाल टोपी's picture
लाल टोपी in जनातलं, मनातलं
23 May 2013 - 1:27 am

यापूर्वीचे भागः
चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग-१
चॅलेंजर अंतरिक्षयान दुर्घटना भाग-२
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अपघातानंतर लगेचच जमिनीवर आणि समुद्रात शोध कार्य हाती घेतले गेले. त्यावेळी ही सर्वात मोठी शोध मोहीम होती मात्र अवकाशातून यानाचे मोठे अवशेष कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन विमाने आणि जहाजांना एक तासापर्यंत रोखून ठेवण्यात आले होते. मात्र सर्वात प्रथम अंतराळवीर असलेली केबीन शोधण्यावर लक्ष केंद्रीत केले गेले कारण चित्रीकरणात ही केबीन सुस्थितीत स्पेस शटल पासून वेगळी झाल्याचे दिसत होते. काही तासात दोन पॅराशुट महासागारात पडतांना दिसली अनेकांना ती अंतराळवीरांची असावीत असेच वाटले मात्र नासाशी संबंधीत अधिकारी जाणून होते की स्पेस शटल मधून बाहेर पडण्याची काहीच व्यवस्था नाही. नंतर जाहीर करण्यात आले की ते सॉलिड रॉकेट बुस्टर होते. अथक परीश्रमानंतरही पुढील तीन महिने ही केबीन सापडली नाही अखेर २८ एप्रिलला सुस्थितीत असणारी अंतराळवीरांची केबीन अ‍ॅटलांटिक महासागरात सापडली तपासणीत धक्कादायक माहिती समोर आली. सर्व अंतरळवीरांचे मृतदेह अजूनही खुर्चीच्या पट्ट्या बांधलेल्या अवस्थेत होते. त्यांचा मृत्यू नक्की कधी झाला असावा याबद्दल अनेक तर्क करण्यात आले. मात्र संशोधकांच्या मते चॅलेंजर च्या स्फोटानंतरही एकाहून अधिक अंतराळवीर वाचले असावेत. स्फोट झाला त्यावेळी यान ४९००० फुटांवर होते स्फोटाच्या दणक्यामुळे सुटी झालेली केबीन ६४००० फुट उंचीपर्यंत वर फेकली गेली. त्यानंतर २ मिनिट ४५ सेकंदांनी ताशी ३२० कि.मी. या वेगाने अ‍ॅटलांटिक महासागरात कोसळली. स्फोट होताच विद्युत प्रवाह आणि ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला. मात्र आणीबाणीच्या वेळी उपयोग करण्याची ऑक्सिजनचा पुरवठा करणारी स्वतंत्र यंत्रणा अंतरळवीरांच्या हेल्मेट मध्ये होती. ४ पैकी तीन ऑक्सिजनची पाकिटे अंशत: वापरली गेल्याचे तपासात आढळून आले होते. याचा अर्थ स्फोटानंतरही काही अंतराळ वीर जिवंत असावेत असा अंदाज काढण्यात आला मात्र ते किती वेळ शुद्धीत होते हे सांगता येत नाही. शवविच्छेदानाच्या अहवालात मृत्यूचे निश्चित कारण आणि वेळ शोधण्यास अपयश आले. मात्र संशोधकांच्या मते केबीन पाण्यावर पडतांना जो आघात झाला तो फारच जोरदार असावा त्यातून बचावाने केवळ अशक्य होते.
crew
संपूर्ण अमेरीका या घटनेने सुन्न झाली. अपघाताचे स्वरूप पाहता अंधुकशी आशा असली तरीही अंतराळवीर जिवंत असणे अशक्यप्राय होते. २८ जानेवारी, १९८६ पर्यंत अंतराळविरांना काही अपघात जरूर झाले होते. परंतु हे सर्व अपघात मुख्यत: प्रशिक्षणाच्या वेळी झाले होते तर अपोलो -१ या मोहीमेच्या रंगीत तालीमीच्या वेळी १९६७ मध्ये आग लागून सहभागी तीन अंतराळवीर मृत्युमुखी पडले होते. मात्र प्रत्यक्ष मोहिमेमध्ये अंतराळवीर गमावण्याची अमेरीकेतील ही पहिलीच घटना होती. राष्ट्राध्यक्ष रेगन त्याच दिवशी नियोजित कार्यक्रमानुसार वार्षिक राष्ट्रीय संबोधन करणार होते. मात्र या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर हे संबोधन एक आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले. मात्र त्यांनी अंतराळवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. काही दिवसांतच त्यांनी विशेष चौकशी समिती नेमून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. या समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्य सचिव (स्टेट सेक्रेटरी) विल्यम रॉजर्स यांच्याबरोबरच माजी अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग, माजी वैमानिक प्रशिक्षक चक येगर हे सदस्य होते. या समितीचे निष्कर्ष काय होते ते पाहण्यापूर्वी या विषयातील अभ्यासकांनी केलेली कारण मिमांसा पाहू.
पहिल्या भागाच्या सुरुवातीला आपण स्पेस शटलची रचना पाहिली. त्याच माहितीच्या आधारावर चॅलेंजरवर २८ जानेवारीच्या त्या विनाशकारी वेळी काय घडले होते याची संगती लावण्याचा प्रयत्न करू या. कोणतेही विनाशकारी अपघात एकाच चुकीचा परीणाम नसतात तर विविध चुका आणि मानवी नियंत्रणाबाहेरील परिस्थितीजन्य घडामोडी यांच्या एकामागून एक घडलेल्या मालिकेचा परिपाक असतात. (धन्यवाद गवि)
पहिली चूक या अपघातामध्ये खलनायाकाची भूमिका वठवणा-या O रिंग. प्राथमिक आणि दुय्यम अशा दोन्ही O रिंग सॉलिड रॉकेट बुस्टर आणि बाह्य इंधन टाकी याच्या सांध्याजवळ व्यवस्थितपणे सील केलेल्या नव्हत्या. या सांध्याचे सील तकलादू असल्यामुळे २७६० अंश सेल्शियस इतके ऊष्ण वायू सॉलिड रॉकेट बुस्टर मधून बाहेर पडू शकले आणि विनाशकारी घटनांची मालिका सुरु झाली.
दुसरे कारण प्रत्यक्ष प्रक्षेपणाच्या आधीच्या रात्री असलेले अतिशय थंड तापमान (-८ अंश सेल्शियस) तसेच प्रक्षेपणाच्या दिवशीचे सकाळचे तापमानही (+२ अंश सेल्शियस) या आधीच्या कोणत्याही प्रक्षेपणाच्या वेळच्या तापमानपेक्षा खूपच कमी होते. यापूर्वी जानेवरी १९८५ मध्ये डिस्कवरी शटलचे प्रक्षेपण +११ इतक्या कमी तापमानात झाले होते. त्यामुळेच 'मोर्ट्न थिओकिल' कंपनीच्या तंत्रज्ञाना उड्डाण पुढे ढकलावे असे वाटत होते. विशेषत: या कंपनीचा एक इंजिनिअर रॉजर बीस्जोली याने तीव्र विरोध केला होता. नासा चे शास्त्रज्ञ अशाही परिस्थितीत प्रक्षेपण करायचेच अशा विचारात असतांना १९८५ च्या जानेवारी मधील डिस्कवरीच्या प्रक्षेपणाच्या वेळी O रिंग जवळपास पूर्ण जळून गेली होती आणि केवळ काही इंच भाग शिल्लक राहिल्यामुळे त्यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नव्हती असे त्या प्रक्षेपणाच्या वेळी वापरण्यात आलेल्या सॉलिड रॉकेट बुस्टरच्या परिक्षणात दिसून आल्याचे पुरावेच त्याने नासासमोर ठेवले होते. त्यावेळी तापमान +११ होते हेही स्पष्ट केले. मात्र O रींग मुळेच अशा प्रकारची दुर्घटना घडेल असा निष्कर्ष ठामपणे करता येत नाही असे म्हणुन जानेवारी अखेरीस प्रक्षेपण करणे भाग आहे असे नासाच्या अधिका-यांनी मतदान करून एकमताने ठरवले.
अर्थातच नासाचे अधिकारी पूर्णत: चूक नव्हते. मात्र आणखी दोन महत्वाच्या घडामोडी या प्रक्षेपणाच्या वेळेस घडल्या ज्याकडे दुर्लक्ष झाले आणि स्पेस शटल पूर्णत: नष्ट झाले. पहिली घटना म्हणजे प्रक्षेपणाच्या आधीच्या रात्री आणि प्रक्षेपणाच्या सकाळी असलेली वा-याची दिशा. बाह्य इंधन टाकीत उणे २५३ अंश सेल्शियस इतका थंड द्रव हायड्रोजन आणि उणे १८४ अंश सेल्शियस इतका थंड द्रव ऑक्सिजन साठवलेला असतो त्यामुळे या टाकीच्या बाजूने वाहणारी हवा अत्याधिक थंड होऊन टाकीच्या मागे खालच्या बाजूला जमा होते या घटनेचे चित्रिकरण इन्फ्रारेड कॅमे-याने २७ जानेवारीच्या रात्री केले होते.हवेच्या या हालचालीवर पूर्ण लक्ष देण्यात आले होते आणि थंड हवेचा प्रवाह वरून खालच्या दिशेने जात आहे असे दिसूनही आले होते. खरंतर ही काही फारशी काळजी करण्यासारखी बाब नव्हती मागच्या भागात आपण पाहिले की प्रक्षेपणाच्या पॅडवर बर्फ जमा झाले होते. वास्तविक बाह्य इंधन टाकीत असलेल्या अति थंड द्रावणामुळे गरम वातावरणात देखील अशा प्रकारे बर्फ जमा होऊ शकते. याठिकाणी घडलेली वाईट गोष्ट ही होती की खालच्या बाजूला जमा होणारी अतिशय थंड हवा उजव्या सॉलिड रॉकेट बुस्टरच्या बाजूला जमा होत होती ज्याठिकाणी जुळणी काही अंशी सदोष होती. हवेचा प्रवाह कसा प्रवास करीत होता हे खालच्या छायाचित्रातील बाणांच्या दिशेने स्पष्ट होते.

air

इन्फ्रारेड कॅमे-याने याठिकाणी जमा झालेले बर्फ तपासण्याची नियमीत पध्दत येथेही वापरण्यात आली होती. निव्वळ योगायोगाने उजव्या सॉलिड रॉकेट बुस्टरच्या जुळणीच्या भागावर या कॅमे-याने चित्रीकरण झाले होते त्यावेळी तेथील तापमान उणे १३ आहे हे स्पष्टपणे नोंदवले गेले होते. हे तापमान ज्या वातावरणामध्ये O रींग काम करू शकेल अशा पद्धतीने बनवली गेली होती त्यापेक्षा कितीतरी पटींनी कमी होते. त्या दिवशी जर हवा वाहण्याची दिशा जर इतर कोणतीही असती तर O रिंग एवढी थंड झाली नसती, तीने कार्यक्षमतेने कार्य केले असते आणि पुढची दुर्घटना टाळली असती. या घटनेचा आणखी एक पैलू म्हणजे जमलेल्या बर्फाचे निरीक्षण करणा-या गटाने ही बाब प्रक्षेपणाचे निर्णय घेणा-या गटाला कळवलीच नाही कारण त्यांचे काम फक्त जमा झालेल्या बर्फाच्या नोंदी घेऊन ती माहिती पोहोचवणे एवढेच होते त्यांनी इतर कोणतीही माहिती देणे अपेक्षीत नव्हते. जर O रिंग जवळ -१३ इतके तापमान आहे ही माहिती नासा अथवा 'मोर्ट्न थिओकिल' च्या इंजिनिअरना कळली असती तर त्याच क्षणी अपयशी ठरणारे प्रक्षेपण रद्द झाले असते.
विनाशकारी कारणांच्या मालिकेतील तिसरे कारण O रींगचे अपयश. या O रिंगच्या मूळ रचनेतच दोष होता. ही बाब उड्डाणाशी संबंधीत सर्वांनाच ठाऊक होती की स्पेस शटलच्या या भागात काही दोष निर्माण झाला तर ते प्रक्षेपणाच्या पॅडवरच नष्ट होईल. इतक्या थंड हवेमुळे लवचिकता गमाउन देखील O रिंगने आपले काम अंशत: पार पाडले होते. प्रक्षेपणाच्या पॅड वरील कॅमे-याने टिपलेल्या छायाचित्रांनुसार बाह्य टाकी आणि उजव्या सॉलिड रॉकेट बुस्टरच्या जुळणीच्या भागाजवळून काळ्या रंगाचा धूर प्रक्षेपणाला एक सेकंद होण्यापूर्वीच म्हणजे (०.६७) पहिल्यांदा दिसला होता. जर सांधे व्यवस्थीत सील केले नसतील तर त्यातून होणा-या गरम हवेच्या गळतीमुळे रबरी O रींगच्या ज्वलनामुळे असा धूर दिसू शकतो. O रिंगचे ज्वलन दर्शवणारा हा धूर आणखी आठ वेळा बाहेर येतांना ०.८६ सेकंदांपासून २.५० सेकंदांपर्यंत खाली दाखवल्या प्रमाणे दिसला होता. त्यानंतर हा धूर पुन्हा दिसला नाही.
black

यावेळेपर्यंत अ‍ॅल्युमिनियम ऑक्साईडचे चे आवरण तयार होउन उघडलेला सांधा पुन्हा जोडला गेला असावा आणि पुढील ७२ सेकंद सुरळीतपणे पार पडले.
अपघाताला कारणीभूत ठरलेली चौथी आणि शेवटची घटना जर घडली नसती तर कदाचित हे आवरण सॉलिड रॉकेट बुस्टर स्पेस शटलपासून वेगळे होईपर्यंत टिकले असते ज्याचा उल्लेख मागील भागात आला आहे. प्रक्षेपणाला ५६ सेकंद झाल्यानंतर आणि स्पेस शटल पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात वरच्या थरात पोहोचल्यावर स्पेस शटलच्या या आधीच्या २४ मोहिमांमध्ये कधीही जाणवला नाही इतका अतिरीक्त हवेचा दबाव स्पेस शटलवर आला. त्यात शटल हेलपाटल्यागेल्यामुळे मोठ्या प्रमाणत हालचाल झाली ही अनपेक्षीत हालचाल शेवटचा घाव घालण्यास पुरेशी ठरली आणि अ‍ॅल्युमिनियम ऑक्साईडचे आवरण नष्ट झाले आणि ५८.७८ सेकंदांनंतर आगीची पहिली ठिणगी पडली.
आता पाहू रॉजर्स समितीचे निष्कर्ष:
अपेक्षेप्रमाणे सॉलिड रॉकेट बुस्टरच्या जुळणीत O रींगच्या अतिशय थंड हवामानामुळे ठीसूळ्पणा येवून गरम वायू रोखण्यात आलेल्या अपयशामुळे आगीच्या ज्वाळा बाहेर पसरून बाह्य इंधन टाकीला आग लागली त्यामुळे संपूर्ण स्पेस शटल जळून नष्ट झाले असा निष्कर्ष काढला.
सॉलिड रॉकेट बुस्टरच्या आराखानाचे काम करणा-या 'मोर्ट्न थिओकिल' संभाव्य धोक्याकडे पुरेशा गांभिर्याने लक्ष पुरवले न गेल्याचा ठपकाही ठेवण्यात आला. नासाला देखील या धोक्यांची जाणीव असूनही योग्य वेळी कार्यवाही न करण्याबद्दल जबाबदार धरण्यात आले. भावी काळात असा अपघात पुन्हा घडू नये म्हणुन सुरक्षीत मोहिमांसाठी नऊ सुचना करण्यात आल्या. (तरीही २००३ मध्ये 'कोलंबिया' ची दुर्घटना घडलीच).
या अपघातानंतर नासाच्या व्यवस्थापनाच्या पद्धतीत बदल करण्यात आले. स्पेस शटलच्या आगामी योजना दोन वर्षांसाठी थांबवण्यात आल्या.
अनेक अभियांत्रिकी अभ्यासक्रमात हा अपघात 'केस स्टडी'साठी निवडला गेला आहे.
आता स्पेस शटल इतिहास जमा झाले आहेत. ८ ते २० जुलै, २०११ दरम्यानची शेवटची मोहीम पूर्ण करून स्पेस शटल 'अ‍ॅटलांटिस' परतले आणि १३५ मोहिमांची नासाच्या अनोख्या सफरीची इतिश्री झाली.

--समाप्त

ही लेखमालिका विविध लेख, अहवाल यांचा अभ्यास करून वेगवेगळी महिती संकलीत करून जास्तीत जास्त रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विविध मुद्द्यांच्या अनुशंगाने आलेली तांत्रिक माहिती कदाचित कंटाळवाणी वाटली तरी परिपूर्णतेच्या द्र्ष्टीने गरजेची होती हे लक्षात घ्यावे ही विनंती.

विज्ञानलेख

प्रतिक्रिया

उपास's picture

23 May 2013 - 1:35 am | उपास

खूप आवडले. २००५ च्या कोलंबिया दुर्घटनेबद्दलही लिहिलेत तर वाचायला नक्कीच आवडेल!

श्रीरंग_जोशी's picture

23 May 2013 - 2:04 am | श्रीरंग_जोशी

अशा विषयांवर वाचायला सोपे वाटत असले तरी लेखन करणे नक्कीच आव्हानात्मक असते. तीनही भाग चांगले जमले आहेत. याचप्रकारे चांद्रयान मोहिमेबद्दल वाचायला आवडेल.

तारखेची चूक

तरीही २००५ मध्ये 'कोलंबिया' ची दुर्घटना घडलीच

कोलंबिया अवकाशयानाला अपघात १ फेब्रुवारी २००३ या तारखेला झाला होता. कृपया संपादकांना विनंती करून दुरूस्ती करून घ्यावी.

लाल टोपी's picture

23 May 2013 - 9:23 am | लाल टोपी

धन्यवाद रंगाजी आणि
सं.मं. आपणहून चूक दुरुस्त केल्याबद्दल विशेष आभार.

श्रीरंग_जोशी's picture

24 May 2013 - 4:26 am | श्रीरंग_जोशी

त्यात काय विशेष!!

काही वर्षांपूर्वी केनेडी स्पेस सेंटर ला भेट दिलेली असल्याने तुम्ही लिहिलेले बहुतांश वर्णन समजायला सोपे गेले. तिथली रॉकेट लॉन्च सिम्युलेटरची राईड घेण्याचा अनुभव फारच थरारक होता.

मस्त लेखन..

आणखी येवूद्यात!!

प्रभाकर पेठकर's picture

23 May 2013 - 3:09 am | प्रभाकर पेठकर

ज्ञानात भर टाकणार्‍या, तपशिलवार लेखनाच्या, तिन्ही भागांनी खिळवून ठेवले होते. दुर्दैवी अंतराळवीरांचा मृत्यू अंगावर काटा आणणारा आहे.

रेवती's picture

23 May 2013 - 8:32 am | रेवती

बापरे! भयानक!
तीन्ही भाग वाचले.

सौंदाळा's picture

23 May 2013 - 9:51 am | सौंदाळा

माहीतीपूर्ण मालिका.
लिहीत रहा.

बाप रे किती वाईट झाले.

माहितीपूर्ण लेखमाला. धन्यवाद.

रानी १३'s picture

23 May 2013 - 3:11 pm | रानी १३

२००३ च्या कोलंबिया दुर्घटनेबद्दलही लिहाच!!!!!!!!!!

लाल टोपी's picture

24 May 2013 - 12:23 am | लाल टोपी

@ उपास, रानी.. जरुर लिहिन काही दिवसांनी

किलमाऊस्की's picture

24 May 2013 - 12:34 am | किलमाऊस्की

हा सुद्धा भाग आवडला फक्त थोडा टेक्निकल असल्याने दोनदा वाचावा लागला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 May 2013 - 12:45 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेखमाला...

अशा घटनांबद्दल बर्‍याचदा वर्तमानपत्रांत आलेल्या माहितीपेक्षा जास्त माहिती वाचली जात नाही. या मालिकेमुळे खूपच माहिती मिळाली. उत्तम संशोधीत लेखमालिकेसाठी अनेक धन्यवाद !

२००३ च्या कोलंबिया दुर्घटनेबद्दल तुमचे लेखन वाचायला आवडेल.

मुक्त विहारि's picture

24 May 2013 - 8:53 am | मुक्त विहारि

आवडली..

सस्नेह's picture

24 May 2013 - 1:52 pm | सस्नेह

अत्यंत सुसूत्र मांडणी अन उत्कंठावर्धक तसेच रोचक शैली.
आवडले.

सुहास झेले's picture

24 May 2013 - 2:30 pm | सुहास झेले

अतिशय सुंदर लेखमालिका पूर्ण केल्याबद्दल मनापासून अभिनंदन .. :) :)

इतके डिटेलिंग आणि इतकी माहिती जमवणे नक्कीच सोप्पे नसावे. कोलंबियाबद्दल नक्कीच वाचायला आवडेल.

स्मिता.'s picture

24 May 2013 - 2:46 pm | स्मिता.

अतिशय माहितीपूर्ण लेखमालिका आहे. तांत्रिक माहिती जास्त असली तरी ती एकंदर घटना समजून घेण्यासाठी गरजेचीच होती. सगळे भाग आवडले. आणखी लिहीत रहा.

पैसा's picture

24 May 2013 - 5:20 pm | पैसा

अतिशय माहितीपूर्ण मालिका. कोलंबिया बद्दल जरूर लिहा.

लाल टोपी's picture

25 May 2013 - 1:00 am | लाल टोपी

आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे ही मालिका आठवडाभरात पूर्ण करु शकलो. सर्वांचे मनापासुन आभार.

मेघनाद's picture

30 May 2013 - 9:50 am | मेघनाद

अतिशय रोमांचक … हा सर्व प्रसंग मराठीत वाचायला उपलब्ध केल्यामुळे आपले शतशः आभार

ज्ञानोबाचे पैजार's picture

31 May 2013 - 3:24 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त मस्त मस्त.
तिनही भाग छान जमले होते. भरपुर नवी माहिती मिळाली.
(दिसायला टिचभर असलेली ओ रींग काय प्रताप करु शकते हे माहित असलेला)

सोन्याभाऊ's picture

9 Sep 2017 - 9:41 pm | सोन्याभाऊ

भरपूर बारकावे कळले.