त्यांचाच जीव घे तू ..

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
21 Apr 2013 - 10:48 am

त्यांचाच जीव घे तू .....

हा लावतो पुढारी घामास भाव सस्ता
म्हणुनी यमास झाला गिळण्यास गाव सस्ता

मातीत राबताना इतके कळून आले
फुकटात ठोस जखमा! प्रत्येक घाव सस्ता!!

पर्जन्य, पीकपाणी, दुष्काळ, कर्ज, देणी
शांती महागडी अन केवळ तणाव सस्ता

मरतोय अन्नदाता पर्वा न शासकांना
करतात भाषणे ते आणून आव सस्ता

लाठी उगारताना, बंदूक रोखताना
का वाटला तुला रे माझा उठाव सस्ता?

सत्याग्रहास आता रक्तात माखवावे
शिकवू चला नव्याने क्रांतीस डाव सस्ता

शोधून शोषकांना तू लाव फास त्यांना
त्यांचाच जीव घेणे उरला बचाव सस्ता

शेतीत राबणाऱ्या खंबीर हो 'अभय' तू
एकीत चालण्याचा करूया सराव सस्ता

- गंगाधर मुटे
--------------------------------

अभय-गझलअभय-लेखनमराठी गझलवीररसकवितागझल

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

21 Apr 2013 - 6:27 pm | पक पक पक

ओ मस्त आहे हो.... :) झक्कास..

मुक्त विहारि's picture

21 Apr 2013 - 7:09 pm | मुक्त विहारि

"शेतीत राबणाऱ्या खंबीर हो 'अभय' तू
एकीत चालण्याचा करूया सराव सस्ता"

त्या दिवसापासुन हिंदुस्थानाचा सुवर्ण-काळ सुरु होइल.

इन्दुसुता's picture

22 Apr 2013 - 1:45 am | इन्दुसुता

मुक्त विहारी म्हणतात ते खरय ! :(

रेवती's picture

22 Apr 2013 - 2:41 am | रेवती

गझल आवडली.

स्पंदना's picture

22 Apr 2013 - 7:54 am | स्पंदना

कल्पना आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Apr 2013 - 8:33 am | अत्रुप्त आत्मा

छान गझल...

मूकवाचक's picture

25 Apr 2013 - 8:56 am | मूकवाचक

गझल वाचून चार ओळी सुचल्या:

पैशामधून सत्ता सत्तेमधून पैसा
भावुक अन अडाणी मतदार आहे सस्ता

ते 'जाणते' पुढारी जात्यंध माजलेले
मातीत राबतो जो खाईल तोच खस्ता

गंगाधर मुटे's picture

25 Apr 2013 - 11:17 am | गंगाधर मुटे

सुंदर ओळी झाल्यात.
फक्त वृत्त सांभाळण्यासाठी खालीलप्रमाणे बदल करावा लागेल.

पैशामधून सत्ता सत्तेमधून पैसा
भावूक अन अडाणी मतदार खूप सस्ता..... सुंदर स्वतंत्र व्दिपदी होतोय.

ते 'जाणते' पुढारी जात्यंध माजलेले
मातीत राबतो जो खाईल तोच खस्ता...... सुंदर स्वतंत्र व्दिपदी होतोय.

निरन्जन वहालेकर's picture

22 Apr 2013 - 11:14 am | निरन्जन वहालेकर

"शोधून शोषकांना तू लाव फास त्यांना
त्यांचाच जीव घेणे उरला बचाव सस्ता"
परफेक्ट उपाय.
आवडली गझल ! ! !

गंगाधर मुटे's picture

22 Apr 2013 - 8:15 pm | गंगाधर मुटे

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.

ही गझलसुद्धा आंतरजालावर तुरळकप्रमाणावर का होईना पण स्वीकारली गेली, ही बाब माझ्यासाठी आनंददायी आणि प्रेरणादायी आहे.

अर्धवटराव's picture

23 Apr 2013 - 1:17 am | अर्धवटराव

मागे अण्णा हजारे उपोषण प्रकरणी मिपावर बरीच (अपेक्षीत) चर्चा झाली होती. त्यावेळी, भ्रष्टाचाराने गांजलेला शेतकरी स्वतःच्या गळ्यात फास अडकवण्याआधि व्यवस्थेतील दोन-चार जणांना संपवेल, असा काहिसा मुद्दा निघाला होता. एका आंदोलक शेतकर्‍याच्या गजलीत आज तेच भाव बघुन थोडी काळजी वाटायला लागलीये.

अर्धवटराव

गंगाधर मुटे's picture

24 Apr 2013 - 5:10 pm | गंगाधर मुटे

अर्धवटराव कशी गंमत आहे बघा.
३ लाख शेतकरी आत्महत्त्या करून मेलेत पण कुण्णाला म्हणून काळजी नाहीये.

पण तो जर का "व्यवस्थेतल्या" एखाद्याला मारणार असेल तर त्या एकासाठी तुम्हाला देखील काळजी पडलीय. ;(

- ज्या दिवशी त्या आत्महत्या करणार्‍याला हे गमक कळेल की, अरे आपण स्वतःच मरणे म्हणजे निष्कारणच जीव गमावणे आहे. पण सोबत एखाद्याला घेऊन मेलो तर हा देश हादरेल.मरणोप्रांत आपला फोटो टीव्हीवर झळकेल, ब्रेकींग न्यूज होईल. पेपरचे रकानेच्या रकाने भरून येईल.... तर त्यास सोबत एखाद्याला घेऊन मरणे केव्हाही परवडेल. ;) -

परिस्थिती खरच इतकी बीकट होत चालली आहे याचीच चिंता आहे. 'अभय' ला इतकं निर्वाणीचं लिहावं लागतय.... अर्धवटराव
गंगाधर मुटे's picture

24 Apr 2013 - 6:57 pm | गंगाधर मुटे

क्षमस्व अर्धवटराव,
तुम्हाला शेतकर्‍यांची नव्हे तर त्याला आत्महत्तेला प्रवृत्त करणार्‍या व्यवस्थेची काळजी पडली की काय, असा मी चुकीचा अर्थ घेतला होता. दिलगीर आहे. :)

अविनाशकुलकर्णी's picture

24 Apr 2013 - 5:58 pm | अविनाशकुलकर्णी

कविता आवडली …फ़ार भयानक परिस्थिती आहे…ग़ंमत म्हणजे समाजात एका व्यवसाय करणारा दुसरा व्यवसाय करणा~या च्या दुःखाबाबत आपला संबंधच नाही असे वागताना दिसतो.-९२-९ ५ च्या दरम्यान लाखो कामगार बेकार झाले ।गिरणॆ कामगार देशोधडीस लागले सारे जणच ह्या चक्रातून जात आहेत। गेले आहेत।
शेत क~यानॆ हिंमत धरून मुकाबला करावा …………
सरकारी नोकरी हि एकच शाश्वत नोकरी आहे। ………।
आत्मा हत्ये बद्दल अनेक नेते विचार वंत यांनी आपापली मते व्यक्त केली आहेतच।