काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने -३

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
22 Feb 2013 - 8:05 pm

काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने-1
काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने-2

आणखी काही नामवंत रसायने...
कामवाली उर्फ मोलकरीण
हे एक अत्यंत नामांकित ठसकेबाज व जहाल रसायन आहे.
‘कामाची वाट लावते ती कामवाली’ अशी काहीशी या रसायनाची व्याख्या करता येईल.
हे रसायन ‘असून अडचण नसून खोळंबा’ यापेक्षा जरा वरच्या श्रेणीत म्हणजे ‘धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं’ या प्रकारात मोडते. पगार देवून कामवालीला काम देतो म्हणजे आपण तिच्यावर कृपा करत नसून पगार घेऊन (तरी का होईना ) आपल्या घरातील काम करून तीच आपल्यावर अनंत उपकार करत असते, हे संबंधितांनी कधीही विसरू नये.
कधीच वेळेवर न येणे, सुमारे पंधरा मिनिटात धुणे, भांडी अन फरशी ही तिन्ही कामे मोठ्या सफाईने (?) उरकणे, वेळी-अवेळी शंभर-दोनशे रुपये हक्काने आगाऊ मागणे (पैसे मागण्यापूर्वी बाई बाहेर गेल्यात अन साहेब एकटेच आहेत असे विशेषत्वाने पाहिले जाते. ), न सांगता दांडी मारणे इ. गुणवैशिष्ट्यांनी हे रसायन युक्त असते. याशिवाय, आपल्याकडे पाहुणे आले आहेत याचे तिला अंतर्ज्ञान असल्याने ते येताच कामवालीची सासू दवाखान्यात अॅशड्मिट होणे, नवऱ्याला अपघात होणे (म्हणजे रात्री जास्ती झाल्यामुळे गटारात पडून हात-पाय मोडणे), मुलाला ताप येणे, इ. रासायनिक गुणधर्म यासमयी बरोब्बर व्यक्त होतात. घरच्या गृहिणीला यासमयी अत्यंत धोरणीपणे व प्रसंगावधानाने वागून पेचप्रसंगावर मात करावी लागते. तोंडात गुळाचा खडा ठेवून बोलावे लागते. ‘दारच्या नारळाचं शहाळं काढलेलं आहे ते येवून घेऊन जा सासूसाठी अन तशीच चार भांडी घासून दे..’ किंवा ‘बिब्याच्या तेलाची बाटली काढून ठेवते मुक्या मारावर लावायला. मग येवून घेऊन जा. कपडे भिजवून ठेवलेत, तेही धुवून टाक मग जाता जाता....’ अशासारखी राजकीय वक्तव्ये केली तर या रसायनापुढे या आणीबाणीच्या प्रसंगी काही निभाव लागतो.

याशिवाय, रसायनाच्या कार्यादरम्यान ‘बाई, सायेब कसे वो बावळट, मगाशी परटाला इस्त्री केल्यालीच कपडे देत हुते बगा परत इस्त्रीला...!’, ‘तुमच्या चिंटूला सांगा बरं, मी पुसलेल्या वल्ल्या फरशीवर पाय देतो सारका, मग म्हणशीला, मी पुसलीच नाय म्हणून...’, किंवा, ‘राहिलं आसल एखांदं शीत भांड्यान्ला...मग काय झालं, जरा पाणी मारून घ्या कि वाईच..’इ. फसफसणारी बायप्रोडक्ट्स हसतमुखाने झेलावी लागतात. विशेषत: नोकरदार गृहिणीलासर्व स्वाभिमान गहाण ठेवून अन सर्व जहालपणा सोसून या रसायनाला शरण जावे लागते. अन्यथा कुत्रेच काय, वाघोबासुद्धा हाल खात नाही.
एवंगुणविशिष्ट असे हे रसायन जरा तरुण अन नखरेल असल्यास मात्र गृहिणीस अत्यंत सावधगिरी बाळगावी लागते. रसायनाशी नवरोजींचा एकांत-योग घडू नये, याची विशेष खबरदारी घ्यावी लागते. अन्यथा होऊ घातलेल्या स्फोटाची तीव्रता इतकी असते की प्रसंगी घर-संसाराच्या ठिकऱ्या उडू शकतात.

सेल्समन :
तुम्ही अतिशय महत्वाच्या घरगुती कामात असताना किंवा हापिसला दांडी मारून टीव्हीवर लागलेला आवडीचा चित्रपट पाहत असताना एकदम बेल वाजते. अशा (अ) वेळी दारात उपस्थित झालेल्या चिकट रसायनाला ‘सेल्समन’ म्हणतात. नारदमुनींच्या नंतर कोणत्याही स्थळी, कोणत्याही काळी, अन कोणत्याही (अ)वेळी उपस्थित होण्याचा परवाना याला साक्षात जगदीश्वराने दिलेला आहे.
याचाही शब्दनाद ‘शेजारी’ या रसायनासारखाच , किंबहुना जास्तच मधुर असतो. चिकटपणाची मात्रा मात्र सर्वोच्च असते. याच्या पोतडीतून वैश्विक ज्ञानकोशापासून ते झुरळे मारण्याच्या औषधापर्यंत काहीही निघू शकते. अन जे काही निघते त्याच्या अद्भुत गुणांचे वर्णन करताना याच्या रसवन्तीवर साक्षात ‘याकुन्देंदुतुषार..’ वाली सरस्वती नर्तन करते. विविध पदार्थांबद्दलचे याचे अगाध ज्ञान पाहून ज्ञानियाचा राजादेखील तोंडात बोट घातल्याशिवाय राहणार नाही. आपल्या घरातील किंवा वापरातील एखादी वस्तू कशी कुचकामी आहे अन त्याच्या पोतडीतील, तिचीच सहधर्मी वस्तू कशी उपयुक्त, टिकाऊ, वाजवी मूल्याची आहे हे आपल्या बुद्धीला मुळीच उमगत नसताना याच्या तरल बुद्धीला व भेदक नजरेला मात्र सहज उमगते आणि ते आपल्या गळी उतरवण्याचे अमोघ कार्य तो हां हां म्हणता पार पाडतो. या वस्तूचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती या सेल्समनजवळचा अखेरचा ‘पीस’ असतो अन केवळ आपले सद्भाग्य म्हणून त्याने उदार मनाने तो अत्यंत सवलतीच्या दरात देऊ केलेला असतो.
पुरुष-वर्गापेक्षा स्त्री-वर्गावर या रसायनाचा परिणाम लवकर होतो असे आढळले आहे. स्त्रियांचा विश्वास संपादन करणे हा दुर्गम पुरुषार्थ कोणत्याही आम पुरुषापेक्षा या रसायनाला उत्तम-रित्या जमतो. त्यामुळे शक्यतो याचा स्वर नाद घरातील स्त्री-वर्गाच्या कानावर पडण्याआधीच याची बोळवण करावी. अन्यथा खिशाला मोठीच चाट बसण्याची शक्यता असते.
जमून आलेल्या वेळेचा सत्यानाश, आर्थिक खड्डा अन अविरत बडबड सहन करावी लागणे या किरकोळ बाबींशिवाय शिवाय इतर काही उपद्रव या रसायनापासून होत नाही. तथापि, हेही नको असल्यास खालील उपायांचा अवलंब करावा.
१. ‘आम्ही आता xxxx या महत्वाच्या कामासाठी बाहेर निघालो आहोत’ असे , कुलूप हातात घेऊन सांगावे.
२. कालच हीच वस्तू आपण दुसऱ्या सेल्समनकडून घेतली असल्याचे सांगावे.
३. सांगितलेल्या किमतीच्या सुमारे एक पंचमांश किमतीत वस्तू मागावी.
४. स्वत:च एखादी एजन्सी घेऊन ठेवावी व दारी आलेल्या सेल्समनला आपलीच वस्तू घेण्याचा आग्रह करावा.
यापैकी एका तरी उपायाचा हमखास परिणाम होऊन हे चिकट रसायन अखेरीस बाहेरचा रस्ता धरते.

डॉक्टर :
हे रसायन अत्यंत प्रतिष्ठित , किमती अन वेळखाऊ असते. इतके की याच्या दर्शनासाठी रांगा लावाव्या लागतात. किमान दोन ते पाच तास इतका वेळ हाताशी ठेवूनच या रसायनाच्या वाटेला जावे. इतके दुष्प्राप्य असल्यामुळे याची उपेक्षा करूजाल तर बिलकुल चालणार नाही. कारण सर्दी, पडसे, पोटदुखी इ. किरकोळ दुखण्यांपासून ते अस्थिभंग, हृदयविकार इ. गंभीर दुखण्यांपर्यंत कोणत्याही प्रसंगी याच्या शिवाय गत्यंतरच नसते. त्यामुळे कोणी टाळू म्हटले तरी याचा संपर्क टाळता येत नाही.
याचा चेहेरामोहरा कडक पांढरा, इस्त्रीबाज व शब्द अतिशय संक्षिप्त आणि आखीव असतो.
‘आडवे झोपा’
‘आ करा’
‘कुठे दुखतंय ?’
‘रात्री काय खाल्ले ?’
‘या गोळ्या १ रात्री १ सकाळी..’
‘दोन दिवस अंघोळ नको..’
यापलीकडचे शब्द याच्या मुखातून उमटताना आजवर सहसा कुणी पाहिले नाही. पेशंटचे दुखणे कितीही गंभीर असो अथवा कितीही साधे , याच्या गांभीर्याची मात्रा चळत नाही. तपासून झाल्यानंतर पेपर वाचून घडी घालून ठेवावा तितक्या निर्विकारपणे रुग्णाला, निदान न सांगता औषध लिहून देण्याचा गुणधर्म, या रसायनाचा कमलपत्र-सम अलिप्तपणा सिद्ध करतो. ‘मुलगा झाला आहे’ अन ‘हर्निया झाला आहे’ ही दोन्ही वाक्ये सारख्याच निर्विकारपणे सांगण्याचा अद्भूत गुणविशेष या रसायनाच्या अंगी आहे.
सर्वसाधारणत: संवादीपणाचा अभाव हा या रसायनाचा एक ठळक गुणधर्म आहे. तसेच इतर आम रसायनांप्रमाणे दिलखुलास हास्य, चक्कीजाळ वैताग, झान्ज आणणारा संताप, झोंबणारे दु:ख यांनी हे रसायन कधी बाधित होत नाही.
तथापि अलीकडे या रसायनाला ‘तपासण्या’ या घातक जंतूची बाधा झालेली दिसते. ‘तपासण्या’ केल्याशिवाय याची मतिच पुढे चालत नाही. तसेच तपासण्या केल्यानंतरही, दिलेले औषध दुखणे नष्ट करेलच याची शाश्वती बाळगू नये. जुन्या आवृत्तीतील डॉक्टरांच्या औषधाला तपासण्यांची बाधा नसूनही ‘रामबाण’ गुण येत असे. तसेच पेशंटला तपासण्यांच्या निमित्ताने फुटबॉलच्या चेंडूसारखे या डॉक्टरकडून त्या डॉक्टरकडे पाठवायची फ्याशनही जुन्या आवृत्तीत दिसत नसे. मूळ जुन्या रासायनिक आवृत्तीचे सध्या अवयवपरत्वे वेगेवेगळे उपप्रकार पाहायला मिळतात. जसे, कानाचा डॉक्टर, नाकाचा डॉक्टर, हृदयाचा डॉक्टर, हाडांचा डॉक्टर इ. इ.
याच्या रासायनिक प्रक्रीयेदरम्यान उत्पन्न होणाऱ्या ‘बिल’ नामक पदार्थाबाबत विशेष जागृत राहावे. अन्यथा पुन्हा औषध मागवण्याची पाळी येते.

(समाप्त.)

विज्ञानविरंगुळा

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

22 Feb 2013 - 8:22 pm | आदूबाळ

रसायने एकच नंबर! सेल्समन रसायनामध्ये "मल्टी लेव्हल मार्केटिंग"वाले हे पेशल रसायन आहे. काही रसायनं आपल्या खर्या रूपात न भेटता वेगळ्याच रूपात भेटतात तसे हे एम एल एम वाले परिचितांच्या रूपाने येतात!

काही रसायनांची फर्माईशः (पोस्त मागणारे) पोष्टमन, सोसायटीच्या चेअरमनच्या घरची कामं करणारे आणि रात्री खुर्चीत झोपणारे वॉचमन, वेळीअवेळी पकडून अमकेतमके बाबा कसे पॉवरफुल आहेत हे सांगून त्यांची पुस्तकं विकू पहाणारे लोक.

चौकटराजा's picture

26 Feb 2013 - 9:41 pm | चौकटराजा

"मल्टी लेव्हल मार्केटिंग"वाले हे कार्सिनोजेनिक रसायन आहे. एकदा तुमच्यात घुसले की मेलात ? कसची इंडिका कसचं काय ?

ह्या भागातली रसायनेही आवडली, विषय निघालाच आहे म्हणून विचारतो, ह्या अ‍ॅमवेवाल्यांना कसं वाटेला लावायचं हो. जवळचा नातेवाईकच मागे लागला आहे.

सस्नेह's picture

28 Feb 2013 - 9:51 pm | सस्नेह

तुम्ही रामदेवबाबांची एजन्सी घ्या अन नातेवाईकाला प्रथम रामदेव प्रॉडक्ट गळ्यात मारा . मग सांगा ही औषधे घेत असताना सहा महिने इतर काही घ्यायचे नसते...तेव्हा सहा महिन्यांनी या ! अ

तुमचा अभिषेक's picture

22 Feb 2013 - 8:26 pm | तुमचा अभिषेक

‘मुलगा झाला आहे’ अन ‘हर्निया झाला आहे’ ही दोन्ही वाक्ये सारख्याच निर्विकारपणे सांगण्याचा अद्भूत गुणविशेष या रसायनाच्या अंगी आहे.
>>>>>>>>
हा हा अगदी अगदी.. पण हा खरेच यांचा गुण असतो हे मात्र नक्की..
आयुष्यात लहान वयात खूप अनुभव घेतलेत मी या डॉक्टर नामक रसायनाचे.. :)

शुचि's picture

22 Feb 2013 - 8:27 pm | शुचि

मोलकरणीचे काय अफलातून वर्णन केले आहेस स्नेहांकिता :)

पैसा's picture

22 Feb 2013 - 10:11 pm | पैसा

मोलकरीण आणि सेल्समन यक्दम परफेक्ट! पण तिसरे डॉक्टर नामक रसायन माझ्या कुंडलीत भाग्ययोगात पडलेले आहे. त्यामुळे त्यातला बराचसा भाग माझ्या अनुभवात नाही!

बॅटमॅन's picture

22 Feb 2013 - 10:14 pm | बॅटमॅन

सगळेच भारी, पण मोलकरीण आणि मुलगा-हर्निया अद्वैत साधणारा डॉक्टर हे लै क्लास आहेत. टुपी काडतु :)

प्रचेतस's picture

22 Feb 2013 - 10:27 pm | प्रचेतस

ही रसायने पण लै भारी.

श्रीरंग_जोशी's picture

22 Feb 2013 - 10:36 pm | श्रीरंग_जोशी

नायट्रस ऑक्साईडहून कितीतरी अधिक प्रमाणात हसवणारी पण हळूच चिमटे काढून जाणारी...

लेखमालिका संपल्याने वाईट वाटत आहे...

रेवती's picture

22 Feb 2013 - 10:44 pm | रेवती

लै भारी हो तै!
मोलकरीण आपल्या दारात दिसली की बहुतेक सगळ्या मालकिणींचा जीव भांड्यात पडतो. भारतातील सगळ्या मोलकरणी तश्या बर्या भेटल्या पण वयाने माझ्यापेक्षा कैच्याकै मोठ्या असल्याने माझ्यावरच गाजवायच्या.
सेल्समन तर नक्को बुवा!
आमचे डागदरही हार्निया आणि मुलगा झाल्यावर जसे सांगतात तसेच आहेत.

किसन शिंदे's picture

22 Feb 2013 - 11:19 pm | किसन शिंदे

खि खि खि..

डागदर लै भारी!!

यसवायजी's picture

22 Feb 2013 - 11:40 pm | यसवायजी

लै भारी..
----------
(तिसरा भाग वाचायच्या आधीच प्रतीक्रिया देत आहे.)
:)

अभ्या..'s picture

22 Feb 2013 - 11:48 pm | अभ्या..

नेहमीप्रमाणेच अप्रतिम लिखाण.
आता अजून काही रसायनांवर संशोधन चालू करायला हरकत नाही. येउद्या ते पण प्रबंध.

मोदक's picture

1 Mar 2013 - 1:25 am | मोदक

हे घ्या आमच्याकडून एक रसायन.

कॅब ड्रायव्हर.

(आयटी / आयटीतले नॉनआयटी / कॉलसेंटर व शिफ्टमध्ये काम करणारे बरेचजण दैनंदिन प्रवासासाठी पिवळ्या नंबरप्लेटची इंडिका उर्फ कॅब मधून ये-जा करतात). सर्वसाधारणपणे ऑफिसला पोहोचण्याच्या आधी एखादा तास कॅबमध्ये बसणे अपेक्षीत असते कारण अगदी लॉगीन करण्याच्या वेळेस पोहोचणे अपेक्षीत नसल्याने १५ मिनीटे ते अर्धा तास आधी गाडी पोहोचेल अशा बेताने सर्व पिकअप योजलेले असतात.

कॅबचा पिकप भले दुपारी १ चा असो, पण सकाळी ८ वाजताच ट्रान्स्पोर्ट कडून फोन येतो.

ट्रान्स्पोर्ट सुपरवाईजर - "सर, पिकप के लिये ३४७ नंबर का कॅब एक बजे आयेगा."

एम्प्लॉयी - (निमूटपणे) "थँक यू सर!"

(या कॉलला खरेतर काही अर्थ नसतो.. कारण येणारी कॅब कोणत्याही नंबरची असू शकते. कारण विचारले तर पेटंट कारण मिळते - ती कॅब पंक्चर झाली!)

आपल्याला वाटते आता काळजी मिटली, वेळेवर कॅब येईल, पण असे नसते.. खरी मजा आता सुरू झालेली असते.

साधारणपणे १२:१५ ला आपण भोजनात मग्न असताना फोन वाजतो.

बीप बीप...

आपण अगदी दुसर्‍याच रिंगला फोन उचलला तर संभाषण ऐकू येते.

ड्रायव्हर - ए राम्या ऽ ऽ, आरं त्या सराला लाईनवर घ्ये की.

एम्प्लॉयी - (त्रासून) बोला कुठे आहात तुम्ही..?

राम्या उर्फ सुपरवाईजर - (एम्प्लॉयीला कॉल कनेक्ट झाल्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून) - तू कुठे पोचलास?

ड्रायव्हर - मी त्या पिकप पाईंटवर पोचलोय, तू त्या सराला लाईनवर घे आधी.

एम्प्लॉयी - (रागाने) हॅलो..

सुपरवाईजर - (ओशाळून..) सॉरी हां सर. सर गाडी पिकअप पॉईंटवर पोहोचली आहे, तुम्ही ड्राईव्हर ला पत्ता सांगता का..?

एम्प्लॉयी नवीन असला तर ड्रायव्हरला पोष्टल अ‍ॅड्रेस सांगायला लागतो. पण तो सांगून फायदा काय..? तो अ‍ॅड्रेस तर त्याच्याकडे पिकप रोस्टरवरती असतोच.. एम्प्लॉयी जुना असला तर सरळ ड्रायव्हरला विचारतो. "तुम्ही कुठे आहात..?"

ड्रायव्हर - सर इथे बघा दोन रिक्शा थांबल्यात, वडापावची गाडी आहे. पानपट्टी आहे, मोबाईलचे दुकान आहे. (असे शक्य तितके जनरलाईज्ड वर्णन)

एम्प्लॉयी - (गोंधळून) नक्की कुठे आहात ते सांगा.

ड्रायव्हर - इथेच की सर, आशिर्वाद किराणा दुकानासमोर थांबलोय. (शिवाजी चौक, गांधी रोड या नावांप्रमाणे आशिर्वाद किराणा दुकानही प्रत्येक गावात सापडेल! त्यामुळे एम्प्लॉयी अजून गोंधळून जातो.

एम्प्लॉयी - (वैतागून.. हो वैतागूनच! कारण जेवण निम्म्यात राहिलेले असते.) नक्की कुठे आहात ते पुन्हा सांगा.

ड्रायव्हर - (डब्बल वैतागून!) आता काय सांगू सर.. हां ऽ ऽ महाराष्ट्र बँकेसमोर आहे मी!

एम्प्लॉयी - (चिडून) मग हे आधी सांगायचे नाही का..? एक काम करा, तिथून सरळ या आणि दुसरा राईट टर्न घ्या, मग तिसरा लेफ्ट. तिथे बाहेर थांबतो मी.

ड्रायव्हर - एक मिनीट हां सर.. (गाडीला स्टार्टर मारल्याचा आवाज, हँड ब्रेक रिलीज केल्याचा कर्रर्रर्र असा आवाज, वगैरे आवाज ऐकू येतात. मग गाडी चालवत चालवत पुन्हा..) हां सर, दुसरा लेफ्ट..

एम्प्लॉयी च्या तोंडातून चिडून "पिचिक!!" असा आवाज बाहेर पडतो.

राम्या उर्फ सुपरवाईजर - (अरे हो! हा मनुष्य हे सगळे संभाषण नीट लक्ष देवून ऐकत असतो कारण हा कॉल त्याच्या फोनवरून पॅच केलेला असतो. बर्‍याच कंपन्यांमध्ये ड्रायव्हरकडे एम्प्लॉईचे फोन नंबर न देण्याची पॉलिसी असते.) अरं ए ऽ ऽ नीट ऐक की.. दुसरा राईट, मग तिसरा लेफ्ट.

ड्रायव्हर - बरं बरं.

(फोन चालूच असतो..)

ड्रायव्हर - सर, केळ्याच्या गाडी पासून आत येवू का..?

एम्प्लॉयी - दु स रा रा ई ट, ति स रा ले फ्ट (या भावना मात्र व्यक्त करता येणार नाहीत!)

ड्रायव्हर - सर तुम्ही "रोजलँड" मध्ये र्‍हाता का हो..?

एम्प्लॉयी - हो!!!

ड्रायव्हर - सर मग मागच्या आठवड्यात तुमचा पिकअप केला आहे मी!

एम्प्लॉयी - (हताशपणे) आता या लवकर!!!

राम्या उर्फ सुपरवाईजर - थॅक्यू सर, पुढचे पिकअप माहिती आहेत का. ते समीर सर आहेत... ते..

एम्प्लॉयी - (बोलणे अर्ध्यात तोडून) गाडीत बसल्यावर फोन करतो.

फोन कट. (इतके रामायण झाल्याने अर्धे राहिलेले जेवण भराभरा संपवण्याच्या मागे एम्प्लॉयी लागतो)

**************************************************************************

कॅब ड्रायव्हर हे जबरदस्त रसायन आहे. रिकाम्या वाळवंटात ऊंट पळवायला मिळाला आहे अशा आविर्भावात गल्लीबोळातून इंडीका पळवत असतात. सिग्नल तोडणे, लेन कटींग, एखाद्याच्या जवळून गाडी जोरात नेवून त्याला घाबरवणे (हेच जर एखादी असेल तर बर्‍याचदा जास्ती जवळीकता दाखवण्याचीही हुक्की येवू शकते.)लोक शिव्या घालत आहेत, खिडकीवर टक टक करून कोणीतरी काहीतरी सांगत आहे वगैरे प्रकाराकडे स्थितप्रज्ञासारखे दुर्लक्ष करणे असे खेळ हे लोक लीलया करतात.

आपल्याला झोप आली आहे / येते आहे हे मान्य करण्याची आजिबात तयारी नसते. ड्यूटीवर असताना झोप आली या वास्तवाला कुळाला बट्टा लागेल या निग्रहाने नाकारत असतात. धुवॉंधार ड्राईव्हिंग बद्दल जर एम्प्लॉयीने कुरकूर करायचा प्रयत्न केला तर "सर, रेकॉर्ड आहे आपले, १५ वर्षात टच झाला नाहीये अजून" असे तडकाफडकी उत्तर मिळते. (मी एकदा अशा उत्तराला "मग रेकॉर्ड मोडू नका आज!" असे खवट उत्तर दिले होते)
ड्रायव्हरला झोप येते आहे असे दिसले की एखाद्या रस्त्याचा / गावाचा विषय काढायचा. बस्स! ते गाव, त्या गावाचे वैशिष्ट्य, आजूबाजूची गावे, यात्रा होत असली तर यात्रा, गावाजवळचे धाबे / हॉटेल / खाणावळ, गावात चालणारे राजकारण, त्यांच्या पार्ट्या अशी इथ्यंभूत माहिती मिळते.

हा एक घडलेला किस्सा.

एकदा माझा सकाळी ०५:०० ला पिकअप झाला व काही अनाकलनीय कारणाने लकडी पुलाचा सिग्नल त्या भल्यापहाटे सुरू होता. (तोच तो लकडी पूल जिथे दिवसा दुचाकींना प्रवेश नाहीये आणि त्या मुद्द्यावरून मिलीटरी स्टूडंट्सनी वाहतूक पोलीसांना धोपटले होते!)
तर.. काही अनाकलनीय कारणाने लकडी पुलाचा सिग्नल त्या भल्यापहाटे सुरू होता. ड्रायव्हरने सिग्नल बघून गाडी थांबवली व सर्वजण सिग्नल हिरवा होण्याची वाट बघू लागले.
थोड्या वेळाने सिग्नल हिरवा झाला पण गाडी हलेना. इतक्या पहाटे वर्दळही नव्हती. त्यामुळे मागून एकही हॉर्न वाजला नाही. ५ ~ १० सेकंदांनंतर समोरच्या एम्प्लॉयीला काहीतरी वेगळे जाणवले, त्याने झोपलेल्या ड्रायव्हरला उठवले व नंतर गाडी मार्गस्थ झाली. :-D

बाकी रसायनांप्रमाणे वरील वर्णन मात्र सरसकट सर्वच ड्रायव्हरना लागू नाही. ४८ तास सलग ड्यूटी करणारे, तरीही गाडी सेफ चालवणारे ड्रायव्हर असतात. ग्रॅज्यूएशन / पोस्ट ग्रॅज्यूएशन शिक्षण घेतले आहे मात्र परिस्थितीमुळे हे काम करणारे लोकही असतात. सलग १९ तासांची ड्यूटी करून गळून रूमवर निघालो असताना "सर लै दमलाय, चला चहा घेवूया" असे म्हणून रात्री ३ वाजता (स्वतःचे किलोमीटर रनींग वाया घालवत) चहाची टपरी शोधणारेही ड्रायव्हर असतात.
सैन्यामधून रिटायर होणारे कांहीजण जसे सिक्यूरिटीच्या पोझीशनला नोकरी करतात अगदी तसाच सैन्यातला एक ड्रायव्हर कॅबवर लाभला होता बरेच महिने... १८ चाकी कंटेनर चालवणारा एक जण जर कॅब चालवू लागला तर तो ती गाडी कसा चालवेल ते सुद्धा याची देहा अनुभवले आहे.. या दोघांबद्दल पुन्हा कधितरी. :-)

अभ्या..'s picture

1 Mar 2013 - 1:47 am | अभ्या..

जब्र्रा झालेय. मस्त आणि ईंटरेस्टींग अ‍ॅडीशन. अगदी पैठणीच्या पदरासारखी.(डिझाइन वेगळे पण पूरक, दोन्हीही अप्रतिम सुंदर)
कॅबमधले डॅशवरचे तुळजाभवानी नायतर स्वामीसमर्थ पण मेन्शन करायचे की बहुतेक कॅब ड्रायव्हर सोलापूर उस्मानाबाद नायतर लातूर जिल्ह्यातले असतात असे वाटते.

श्रीरंग_जोशी's picture

1 Mar 2013 - 1:51 am | श्रीरंग_जोशी

कॅबचालकांबरोबर फारच जुजबी संबंध आला असला तरी बहुतांश याच पठडीतले वाटले.

रेवती's picture

1 Mar 2013 - 3:20 am | रेवती

ड्रायव्हरांनी सगळ्या स्रीवर्गास ताई नाहीतर बेहेनजी म्हणायचं होतं ते चालू केलं का रे?

मोदक's picture

2 Mar 2013 - 10:14 am | मोदक

नाही..

समस्त ड्रायव्हरांनी असहकाराने ती सुचना धुडकावून लावली. :-D

गृहिणीस अत्यंत सावधगिरी बाळगावी लागते. रसायनाशी नवरोजींचा एकांत-योग घडू नये, याची विशेष खबरदारी घ्यावी लागते

माझ्या ओळखीत एकाची बायको गेल्यावर (वर गेल्यावर) त्यानं मोलकरणीशी लग्न केलं आणि मोलकरणीचं मोल कमालीचं वाढलं!

५० फक्त's picture

23 Feb 2013 - 9:49 am | ५० फक्त

मस्त मस्त लिहिलंय सगळं.,

निवेदिता-ताई's picture

23 Feb 2013 - 10:08 am | निवेदिता-ताई

लै भारी.........छानच लिहिलय ......

अजुन्ही रसायने येउदेत.....जसे की वकील, सरकारी नोकर इ. इ.

तिमा's picture

23 Feb 2013 - 10:08 am | तिमा

मोलकरणींकडे हल्ली मोबाईल पण असतो. पण तो मालकिणींचे फोन उचलण्यासाठी नसतो. फोन न उचलण्याची अनेक कारणे दिली जातात.
डॉक्टरांचं रसायन फारसं पटलं नाही. मला भेटलेले सगळे डॉ. भरपूर आणि अघळपघळ गप्पा मारणारे होते,(अगदी बाहेर मोठ्ठी लाईन असली तरी!)

यसवायजी's picture

23 Feb 2013 - 11:27 am | यसवायजी

>> मोलकरणींकडे हल्ली मोबाईल पण असतो >>
त्या मोबाईलचा वापर धुणी-भांडी करताना, time-pass म्हणुन mp3 ऐकायला होतो. ;)

सुबोध खरे's picture

23 Feb 2013 - 10:26 am | सुबोध खरे

फारच छान

प्यारे१'s picture

23 Feb 2013 - 7:49 pm | प्यारे१

तिन्ही रसायन'शाळा' एकदम वाचल्या.
लई भारी.... !

मुक्त विहारि's picture

23 Feb 2013 - 9:21 pm | मुक्त विहारि

समाप्त वाचलेच नाही..

त्यामुळे अजून रसायने येवू द्या.

नो समाप्त हं स्नेहांकिता? ते समाप्त सोडुन बाकि सगळी रसायने चालतील.

भाषा अतिशय सुरेख! फार आवडली वर्णन शैली.

लौंगी मिरची's picture

26 Feb 2013 - 5:35 am | लौंगी मिरची

अगदि अप्रतिम निवेदन . मोलकरीण फार आवडली . आधीचे दोन भाग , त्याची लिंक मिळु शकते का ?

रसायनांच्या तीनही भागांच्या सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे आभार !

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Feb 2013 - 4:49 pm | ज्ञानोबाचे पैजार

आमच्या जखमेवरची खपली काढल्या बद्दल स्नेहांकिता ताईंचा निशेढ...

साला..आमच्या घरी कटाक्षाने म्हातार्‍या मोलकरणींची नेमणुक होते. एक म्हातारी मेली तर दुसरी म्हातारीच आणली जाते. दुसर्‍यांच्या मोलकरणी बघुन नुसता जळफळाट होतो. त्यांच्या मोलकरणी कशा तरुण आणि ... जाउदे.... असत एकेकाच नशिब.

मृत्युन्जय's picture

28 Feb 2013 - 8:24 pm | मृत्युन्जय

हा ही भाग उत्तम.

मोलकरीण या रसायनाशी जास्त संबंध आला नाही आणि जेव्हा आला तेव्हा खुर्चीवर बसून हुकुम सोडून सर्व कामे त्वरेने करुन घेतली आहेत.

सेल्समन हे रसायन स्वतः सेल्समनचे काम केल्याने जाणूनच आहे.

डॉक्टर म्हणजे कधी कधी खिशाला चाट लावणारे रसायन आहे, हे मात्र मान्य करतो. पण सगळेच डॉक्टर हे सारखेच नसतात. या अनुभवाबद्दल पुन्हा कधीतरी..

सर्जेराव's picture

10 Dec 2013 - 10:12 am | सर्जेराव

विनोदी लेखन आवडले