काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
6 Feb 2013 - 10:08 pm

बालपणातली आठवण अशी की आजारी पडलो, की आई-वडील किंवा आजी-मावशी बरोबर (औषधाच्या) बाटल्या घेऊन दवाखान्यात जायचो. तिथं एक (च) डॉक्टर अन एक कंपाउंडर असायचा. डॉक्टरकाका तपासायचे अन एका कागदावर चार ‘अर्वाच्य’ (पक्षी-वाचता न येणारे ) शब्द खरडून द्यायचे. मग कंपाउंडरकाका मागच्या कपाटातून भरलेल्या असंख्य बाटल्यांपैकी काहींची बुचे फिरवून एका पत्र्याच्या पांढऱ्या मगात त्याचे ‘मिक्स्चर’ बनवीत अन आमच्या बाटल्यांमध्ये भरून देत. अन पुढे चार दिवस आम्ही ते मिक्स्चर अन वहीच्या कागदाने बांधलेल्या पुडीतल्या गोळ्या पोटात ढकलायचो. चार दिवसांनी तब्येत खडखडीत !
दरवेळी त्या मिक्स्चरचा रंग, वास, चव अन एकूण बाज निराळाच असे. कागदावर खरडलेल्या त्या चार अगम्य शब्दांमधून पाचसात बाटल्यांची अन दोन-तीन गोळ्यांची नावे वाचता येणारा तो कंपाउंडर बघून डोक्याचा गोईंदा होई.
जरा मोठं झाल्यावर आम्ही कंपाउंडरकाकांना मस्का लावून याचं ‘शिक्रेट’ काय ? म्हणून विचारलं. तर ते हसून डोळा मारून म्हणाले ‘अरे मुलानो, मी डॉक्टरसायबाकडं नोकरीला लागलो तेव्हा माझ्यात अन त्यांच्यात एक करार झालाय. त्यांना वाटेल ते त्यांनी लिहायचं अन मला वाटेल ते मी द्यायचं. दोघांनी एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करायची नाही....! पण हे कुणाला सांगू नका बरं का !’
पुढं आणखी जरा मोठं झाल्यावर केमिस्ट्री नावाचा एक छळवादी विषय कॉलेजच्या अभ्यासात फतकल मारून बसला. त्यात लांबच लांब रासायनिक सूत्रे असत.
NaCl + AgNO3→ NaNO3+ AgCl
NH4OH + HBr→ H2O + NH4Br
..NH4OH + HBr केल्यावर H2O + NH4Br बाहेर येतं, हे पाहून आम्हाला कावळीच्या अंड्यातून कोंबडीचं पिल्लू बाहेर पडल्यासारखं वाटे. अन हे सगळं तडातडा फळ्यावर लिहिणारे ‘चेमिस्ट्री’चे सर धडाधड चौकार अन षटकार लगावणाऱ्या गावस्करपेक्षा ग्रेट वाटत.
पण या सगळ्या रसायनकारांपेक्षा श्रेष्ठ एक ‘चेमिस्ट’ वरती बसलेला आहे हे समजलं , ते त्याच्या या ‘माणसं’ नावाच्या अजब रासायनिक करामती पाहिल्यावर ! देवबाप्पाच्या कल्पकतेची खरी कमाल झाली आहे ती माणूस हे रसायन बनवताना. यापैकी काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने आमच्या दैनंदिन जीवनात सॉलिड धमाल उडवून देताहेत.
यापैकी काही रासायनिक मिक्स्चरे अगदी नामांकित आहेत. त्याचे काही नमुने .
१. बस कंडक्टर.
हे रसायन बऱ्यापैकी स्फोटक असते म्हणून त्यास काळजीपूर्वक हाताळावे लागते. यष्टीमार्गाने प्रवास करणाऱ्या पाशिंजरांचा याच्याशी वारंवार संपर्क येतो. यामध्ये ‘सौजन्य’ हा घटक अभावानेच आढळतो. ( यष्टी महामंडळ अधून मधून ‘सौजन्य सप्ताह’ साजरा करून सौजन्याचा अभाव भरून काढण्याचा प्रयत्न करत असते. पण एकंदरीत सौजन्याच्या झऱ्याला पाणीच कमी. )
हे रसायन एकसारखा घंटानाद (यष्टीच्या बेलचा ) व शंखनाद करीत असते.
‘दरवाजातली मंडळी खाली उतरा...’
‘ओ टोपीवाले, मागे सरा , बक्कळ जागा आहे तिकडे..’
‘बाssस, चला उरलेले मागच्या गाडीने या...’
‘शंभराची नोट कुणाला दावता ? सुटे पंचवीस काढा कि राव..!’
‘ए आज्जे, काय नातवाच्या बारशाचं जेवान हाय का ? जा कि तिकडं पाठीमागं बस जा..’
असे अनंत डायलॉग, गिरणीतून अखंड बाहेर पडणाऱ्या पिठासारखे याच्या मुखातून बाहेर पडत असतात.
शक्यतो खिशात सुटे पैसे, नाणी बाळगल्यास याचा विशेष उपद्रव होत नाही. आपल्या गळ्यात अडकवलेल्या ब्यागेतील नाण्यांचा गल्ला रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीप्रमाणे सुरक्षित ठेवून वर पाशिंजरानाच सुटे पैसे न बाळगल्याबद्दल शेलकी मुक्ताफळे वाहण्याचा व त्यावरून ‘बा’चा’बा’ची करण्याचा जन्मसिद्ध हक्क यास राष्ट्रपतींनी दिलेला असतो.
हे रसायन प्रवासभर बसमध्ये सतत प्रवाहित होत असते. (म्हणून त्यास कधी कधी वाहक असे म्हणतात.)
मात्र, मनात येईल तेव्हा दाराशेजारच्या ‘शीट’वर बसण्याचा अबाधित हक्क त्याने राखून ठेवलेला असतो. मिक्स्चर अंमळ मवाळ असेल तर कधी कधी तो हा हक्क पाशिंजरामधल्या बायाबापड्यांना देऊ करतो. मात्र मिक्स्चर फिमेल असेल तर ही शक्यता उद्भवत नाही. हो, अलीकडे या रसायनात ‘लेडी कंडक्टर’ नावाचा प्रकार बराच रुळला आहे. हा रसायनप्रकार आणखी खतरनाक असतो.
बस कंडक्टर हे रसायन मराठदेशी बनलेले असेल तर इतर देशांपेक्षा विशेष झणझणीत असते. सर्वांनी एकदा अवश्य चाखून पाहावे.
२. बस ‘डायवर’.
या रसायनाचे स्थान रसायन-सारणीमध्ये क्र. १. च्या म्हणजे कंडक्टरच्या पुढच्या रांगेत टोकाचे असते.
याची स्फोटकता क्र. १. पेक्षा थोडी वरच्या श्रेणीची असते. हे रसायन सदैव लोखंडी जाळीमध्ये स्थित असल्याने पाशिंजरांचा याच्याशी थेट संपर्क येत नाही. तथापि पाशिंजरांनी जाळीच्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास स्फोटजनक परिस्थिती उद्भवते.
रस्त्यावरच्या वाहनधारकांसाठी हे रसायन भलतेच घातक असते. रस्त्यावरच्या वाहनधारकांना, आपल्या बुडाला हे रसायन यष्टीसह येऊन चिकटू नये याची विशेष खबरदारी घ्यावी लागते.
याचा कर्णा-नादाशी जास्त संबध असतो, तथापि,
‘दिसत नाय तर चष्मा घाल !’ ,
‘कानाला मशीन लाव, मशीन !’,
‘ए मावशे, कडंकडंनं जा..’,
‘कोंबडीच्च्या, गाडी चालिवतोस का इमान ?’
असा शंखनादही याच्यातून अधून मधून (तंबाखूचा मुखरस सांभाळून ) उमटत असतो. पाशिंजरांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता फाट्यावर मारणे, तसेच मनात येईल तेव्हा बेफाम वेगात गाडी चालन करून व गचागच ब्रेक लावून पाशिंजरांना एकमेकां लोटांगणे घडवणे हे याचे ब्रीद असते. तथापि, पाशिंजरांना घाई असताना वेगमर्यादेचे नीचतम उद्दिष्ट गाठणे याला अगत्याचे वाटत असते.
एकंदरीत या रसायनाशी आमलोकांचा डायरेक्ट संपर्क येत नसल्याने फारसे उपद्रवी नाही.
(क्रमश:)

विनोदरेखाटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

ह्यात अब्याची चित्रं होती .. ती कुठेय्त गं ?? :(

स्नेहा तुझे लेख अधाश्यासारखे , हपापल्यासारखे , अगदि वसवसल्यासरखे माझ्याकडुन
वाचले जातात .. यावर उपाय नाहि ...
नेहेमीसारखच अगदि खुसखुशित :)
क्रमशः काका ना का आणलस बै :-/

आत्ता कुठं रंग भरायला लागला होता तर आता तो क्रमश:
पुढचे लेखन कधी येईल अशी वाट बघते. येणारी पात्रं कोणकोण आहेत हे कळवल्यास आम्ही आमचे आन्भव तयार ठिवू. ;)

अभ्या..'s picture

6 Feb 2013 - 11:17 pm | अभ्या..

स्नेहातै मला माफ कर गं. :(
मी चित्रे काढायची जबाबदारी घेतली खरी पण असे काही प्रसंग आले की ती पोहोचलीच नाहीत तुझ्यापर्यंत.
तुझ्या इतक्या छान लेखाला सजवायला जमलेच नाही. :(
अर्थात हे शब्दचित्रच इतकं जिवंत आहे की खरे पाहता मीच संधी दवडली ती प्रसिध्द व्हायची.
खूपच छान आणि जिवंत.

सोत्रि's picture

6 Feb 2013 - 11:22 pm | सोत्रि

झक्कास!

-(अजब रसायन) सोकाजी

पैसा's picture

6 Feb 2013 - 11:22 pm | पैसा

बस डरायवर आणि कंडक्तर यांना माझी ही आदरांजली.

सस्नेह's picture

7 Feb 2013 - 1:40 pm | सस्नेह

आदरांजली. >>>a

अत्रुप्त आत्मा's picture

7 Feb 2013 - 12:01 am | अत्रुप्त आत्मा

जोरदार टाळ्या.............. :-)

शुचि's picture

7 Feb 2013 - 1:08 am | शुचि

हहपुवा

स्पंदना's picture

7 Feb 2013 - 4:07 am | स्पंदना

"अर्वाच्य" या शब्दाचा इतका चपखल उपयोग आजवर नव्हता वाचला. इथेच पहिला साष्टांग स्विकारा स्नेहाताई.

माझ्यात अन त्यांच्यात एक करार झालाय. त्यांना वाटेल ते त्यांनी लिहायचं अन मला वाटेल ते मी द्यायचं. दोघांनी एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करायची नाही

येथे आम्ही निर्वाणलो आहोत. पुढच सगळ अजागतिक अवश्तेत वाचत आहे.

अभ्यासात फतकल मारून बसला

अग किती समर्पक भाषा ती स्नेहे? मारते का काय आज मला.

हे रसायन मराठदेशी बनलेले असेल तर इतर देशांपेक्षा विशेष झणझणीत असते

शमत! पण मला एक सांग रोज त्याच त्याच मार्गाने जायच खिडकी बाहेर पहाण्याजोग अस काही उरलेल नसल्याने कायतरी जीवाची मजा नग का तेला? म ते अस बनत असाव "रसायनात्मक" काय म्हणते तू?

एकंदरीत क्रमशःची वाट पहात आमच पित्त नामक रसायन खवळले आहे याची नोंद ठेवा "चेमिस्ट"बाई!

चौकटराजा's picture

7 Feb 2013 - 6:47 am | चौकटराजा

हे लिखाण पूज्य पी यल देस्पॉन्दे ष्टाईलीत झाले आहे.पण या दोन जय विजय वर का संपवले ब्वा ? तिसरी एक रसायनाची जात आहे ते रेडिओ एक्टीव्ह कंपाउन्ड आहे. ते एका काचेच्या कंपाउंडा मागे बसलेले असते. त्याला कंट्रोलर असे म्हणतात. याचे विशेष असे की ते सदैव त्रासलेलेच असते. " एमेचो पंचवीस सत्रा, गाडी ची वेळ झाली आहे गाडी हलवा लवकर " किंवा" फलाट क्र. चार पुंणे इचलकरंजी ...पुणे इचलकरंजी गाडी शिरवळ सातारा .. कराड.. मार्गे ..." असे रेडीएशन सारखे करणारे हे चेमिकल असते.मधून मधून चहाची प्रकिया यावर वर केली की रेडेएशन कमी होते.असे संशोधाअंती आढलले आहे. पण हे चहा हे द्रव्य एसटी कॅटीन मधील पैसे न देता घेतलेले असेल तरच रासायनिक प्रकिया होते असेही आढलले आहे.

सस्नेह's picture

7 Feb 2013 - 1:43 pm | सस्नेह

हेबी रसायन भारी....

५० फक्त's picture

7 Feb 2013 - 7:54 am | ५० फक्त

सुरुवात आवडली, आता प्रवासाच्या प्रतिक्षेत.

किसन शिंदे's picture

7 Feb 2013 - 7:59 am | किसन शिंदे

मस्त लिहलंय.

नगरीनिरंजन's picture

7 Feb 2013 - 8:20 am | नगरीनिरंजन

झकास!
लेख उघडायच्या आधीच चटपटीत काहीतरी वाचायला मिळणार हे माहित होतं आणि तसंच झालं.
अत्यंत ताजीतवानी भाषा आणि मार्मिक निरीक्षण.
'अर्वाच्य लिखाण, वाहक, "ए आज्जे..."' वगैरे एकदम मज्जेदार! पुभाप्र.

प्रचेतस's picture

7 Feb 2013 - 9:06 am | प्रचेतस

एकदम खुसखुशित

मुक्त विहारि's picture

7 Feb 2013 - 9:23 am | मुक्त विहारि

हे असे लेख शक्यतो शनिवार किंवा रविवारी टाकत जा.

आम्ही ऑफीस मध्ये काम करतो.हा असा तोंड दाबून हास्याचा मार सहन होत नाही.कोरियन कं.त हसण्याला मनाई आहे.

ऋषिकेश's picture

7 Feb 2013 - 9:25 am | ऋषिकेश

चुरचुरीत लेखन!! आवल्डे
क्रमश: आहे हे बरेच आहे :)

चटपटीत मसाला आवडला..

- पिंगू

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Feb 2013 - 10:19 am | ज्ञानोबाचे पैजार

खुसखुशीत खमंग खरपुस अशी पाककॄती खाता खाता पटकन संपली.
जीभ चाळवली आहे, पोटात भरपुर भुक आहे पुढची डिश लवकर बनवा,
पैजारबुवा,

मन१'s picture

7 Feb 2013 - 10:45 am | मन१

आवडले.
दिवसभरातली मला सापडालेली दुसरी वाचनखूण.

मृत्युन्जय's picture

7 Feb 2013 - 11:11 am | मृत्युन्जय

मस्त लिव्हलय हो स्नेहाताई

मनराव's picture

7 Feb 2013 - 11:25 am | मनराव

आवडेश......

(पुढचे रसायने कोणते असेल या विचारात असलेला) - मनराव

आदूबाळ's picture

7 Feb 2013 - 12:10 pm | आदूबाळ

स्नेहांकितातै, लेख आवडला!

पुण्यातल्या प्येमटीचा गियर टाकताना त्याचा एक भयावह आवाज येतो. रावण खाकरल्यावर असाच आवाज येत असावा! आणि बर्याच प्येमटींना हॉर्न नसतो. त्यामुळे समोर आलेल्या अडग्या दुचाकीवाल्याला हटवण्यासाठी श्री श्री डायवर महोदय क्लच दाबून अ‍ॅक्सिलरेटर हाणतात. प्येमटीचं इंजिन डरकाळी फोडतं आणि मुजरिम दुचाकीस्वाराची पळापळ होते!

छोटा डॉन's picture

7 Feb 2013 - 2:02 pm | छोटा डॉन

>>पुण्यातल्या प्येमटीचा गियर टाकताना त्याचा एक भयावह आवाज येतो. रावण खाकरल्यावर असाच आवाज येत असावा!
=)) =)) =))
रावण खाकरल्याचे वाचुन हसुन हसुन मेलो.

बादवे, मुळ लेखही उच्च आहे.
पुढच्या भागास शुभेच्छा आणि वाट बघत आहे.

- छोटा डॉन

मैत्र's picture

7 Feb 2013 - 7:54 pm | मैत्र

लेख आवडला पण हा प्रतिसाद कमाल आवडल्या गेला आहे!!
रावण खाकरणे.. याहून पर्फेक्ट वर्णन होऊच शकत नाही त्या गियर बदलाचं.
आणि मुजरिम दुचाकीस्वाराची भूमिका बर्‍याचदा बजावल्यामुळे ते वर्णन एकदम मस्त आवडून गेलं आहे!!

सस्नेह's picture

8 Feb 2013 - 10:23 am | सस्नेह

रावणाचे खाकरणे >>
इतकी उच्च उपमा यापूर्वी फक्त एकदाच ऐकली होती.
कॉलेजात पुढच्या बाकावर बसणारा साठ्या बारा महिने सर्दीकर. तासाला दोन चार शिंका द्यायचा. त्या शिंकेचा ध्वनी ‘ठीस्स.स्स.स्स...’ असा काही वेगळाच असे.
एकदा हा ठिसकल्यावर मागे बसणाऱ्या नायडूने कॉमेंट मारली..
‘पडला ब्वा साठ्याच्या ट्रकचा न्युमॅटिक गिअर....’

दादा कोंडके's picture

11 Feb 2013 - 6:02 pm | दादा कोंडके

हा हा.
हा आवाज पहिल्यांदाच ऐकल्यावर दिल्लीचा मित्र घाबरून, "अबे ये बिना क्लचके ही गियर घुमा रहा है क्या?" असं म्हणला होता. :D

चिगो's picture

7 Feb 2013 - 1:55 pm | चिगो

एकदम खुसखुशीत लिखाण..
"अर्वाच्य" वरची कोटि एकदम उच्च. पुभाप्र..

अमोल केळकर's picture

7 Feb 2013 - 2:07 pm | अमोल केळकर

छान लेखन :)

अमोल केळकर
(केमिकल इंजिनीअर)
मला इथे भेटा

इनिगोय's picture

7 Feb 2013 - 3:14 pm | इनिगोय

ल्येख लई उच्च्च आणि प्रतिक्रिया त्याहून हुच्च्च! ;)

अर्वाच्य!! कावळीच्या अंड्यातून कोंबडीचं पिल्लू!! :))

"वरती बसलेला चेमिस्ट" म्हणजे तर कहानीमें एक्दम ट्विस्ट!!

दुसरा भागपण येऊंदे लगोलग..

चाणक्य's picture

7 Feb 2013 - 4:56 pm | चाणक्य

बाकीच्या रसायनांची फार वाट बघायला लावू नका..

बॅटमॅन's picture

7 Feb 2013 - 5:02 pm | बॅटमॅन

रसायनशास्त्रातले नोबेल द्यायला पाहिजे तुम्हांस यासाठी!!!! लै भारी लेख बगा =)) 8)

तिमा's picture

7 Feb 2013 - 5:50 pm | तिमा

भारी लेख . अशीच वेगवेगळी रसायने येऊ द्यात. वाचताना मजा आली.

- ति. रसायने

नाना चेंगट's picture

7 Feb 2013 - 11:13 pm | नाना चेंगट

पुढचा भाग कधी ?

स्नेहाकाकु लैच भारी लिवलय पु भा परतिक्शेत ;)

हासिनी's picture

8 Feb 2013 - 4:15 pm | हासिनी

लेख छान...पुढचा लेख कधी?

मनीषा's picture

8 Feb 2013 - 4:20 pm | मनीषा

रासायनिक किस्से आवडले.
पुढील रसायनांच्या प्रतिक्षेत ......

लीलाधर's picture

9 Feb 2013 - 12:08 am | लीलाधर

येक णंबर बगा आवडेश. पुढील भाग लौकर येऊद्यात प्रतिक्षेत आहोत.

श्रिया's picture

9 Feb 2013 - 9:50 am | श्रिया

छान. खुसखुशीत रसायनाचा लिखाणात चांगला वापर केलाय.

अनुजा कुलकर्णी's picture

11 Feb 2013 - 5:44 pm | अनुजा कुलकर्णी

छान लिहले आहे. कंड्क्तर बायका जास्त त्रासदाय्क असतात.

मी-सौरभ's picture

11 Feb 2013 - 6:06 pm | मी-सौरभ

लई भा हा री ही

अद्द्या's picture

13 Feb 2013 - 12:40 pm | अद्द्या

लई भारी ..=))
पण.. वर कोणी तरी म्हटल्या प्रमाणे..
शनिवार-रविवार धरून असं काही तरी टाकीत जा..
एकटाच हसाय लागलो ..
समोरच्या केबिन मधून "बॉस " नावाचं एसिड लगेच रियाक्ट होतो..
त्याला मराठी पण येत नाही .. दायल्युट पण नाही करता यॆत

सस्नेह's picture

13 Feb 2013 - 8:21 pm | सस्नेह

आगामी रसायनांमध्ये 'बॉस' नावाचे रसायनपण आहे..

चावटमेला's picture

13 Feb 2013 - 2:03 pm | चावटमेला

सगळीच रसायनं आवडली.
पुलेशु

jaypal's picture

13 Feb 2013 - 2:13 pm | jaypal

केमीकल लोचा झाला वाटत. नाय तर हा धागा कसा काय नजरेतुन निसटला.
स्नेहांकिता हसुन हसुन फुटलोय. धागा बुक्मार्कवलाय. ;-)