काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने -३
काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने-1
काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने-2
आणखी काही नामवंत रसायने...
कामवाली उर्फ मोलकरीण
हे एक अत्यंत नामांकित ठसकेबाज व जहाल रसायन आहे.
‘कामाची वाट लावते ती कामवाली’ अशी काहीशी या रसायनाची व्याख्या करता येईल.
हे रसायन ‘असून अडचण नसून खोळंबा’ यापेक्षा जरा वरच्या श्रेणीत म्हणजे ‘धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं’ या प्रकारात मोडते. पगार देवून कामवालीला काम देतो म्हणजे आपण तिच्यावर कृपा करत नसून पगार घेऊन (तरी का होईना ) आपल्या घरातील काम करून तीच आपल्यावर अनंत उपकार करत असते, हे संबंधितांनी कधीही विसरू नये.
कधीच वेळेवर न येणे, सुमारे पंधरा मिनिटात धुणे, भांडी अन फरशी ही तिन्ही कामे मोठ्या सफाईने (?) उरकणे, वेळी-अवेळी शंभर-दोनशे रुपये हक्काने आगाऊ मागणे (पैसे मागण्यापूर्वी बाई बाहेर गेल्यात अन साहेब एकटेच आहेत असे विशेषत्वाने पाहिले जाते. ), न सांगता दांडी मारणे इ. गुणवैशिष्ट्यांनी हे रसायन युक्त असते. याशिवाय, आपल्याकडे पाहुणे आले आहेत याचे तिला अंतर्ज्ञान असल्याने ते येताच कामवालीची सासू दवाखान्यात अॅशड्मिट होणे, नवऱ्याला अपघात होणे (म्हणजे रात्री जास्ती झाल्यामुळे गटारात पडून हात-पाय मोडणे), मुलाला ताप येणे, इ. रासायनिक गुणधर्म यासमयी बरोब्बर व्यक्त होतात. घरच्या गृहिणीला यासमयी अत्यंत धोरणीपणे व प्रसंगावधानाने वागून पेचप्रसंगावर मात करावी लागते. तोंडात गुळाचा खडा ठेवून बोलावे लागते. ‘दारच्या नारळाचं शहाळं काढलेलं आहे ते येवून घेऊन जा सासूसाठी अन तशीच चार भांडी घासून दे..’ किंवा ‘बिब्याच्या तेलाची बाटली काढून ठेवते मुक्या मारावर लावायला. मग येवून घेऊन जा. कपडे भिजवून ठेवलेत, तेही धुवून टाक मग जाता जाता....’ अशासारखी राजकीय वक्तव्ये केली तर या रसायनापुढे या आणीबाणीच्या प्रसंगी काही निभाव लागतो.
याशिवाय, रसायनाच्या कार्यादरम्यान ‘बाई, सायेब कसे वो बावळट, मगाशी परटाला इस्त्री केल्यालीच कपडे देत हुते बगा परत इस्त्रीला...!’, ‘तुमच्या चिंटूला सांगा बरं, मी पुसलेल्या वल्ल्या फरशीवर पाय देतो सारका, मग म्हणशीला, मी पुसलीच नाय म्हणून...’, किंवा, ‘राहिलं आसल एखांदं शीत भांड्यान्ला...मग काय झालं, जरा पाणी मारून घ्या कि वाईच..’इ. फसफसणारी बायप्रोडक्ट्स हसतमुखाने झेलावी लागतात. विशेषत: नोकरदार गृहिणीलासर्व स्वाभिमान गहाण ठेवून अन सर्व जहालपणा सोसून या रसायनाला शरण जावे लागते. अन्यथा कुत्रेच काय, वाघोबासुद्धा हाल खात नाही.
एवंगुणविशिष्ट असे हे रसायन जरा तरुण अन नखरेल असल्यास मात्र गृहिणीस अत्यंत सावधगिरी बाळगावी लागते. रसायनाशी नवरोजींचा एकांत-योग घडू नये, याची विशेष खबरदारी घ्यावी लागते. अन्यथा होऊ घातलेल्या स्फोटाची तीव्रता इतकी असते की प्रसंगी घर-संसाराच्या ठिकऱ्या उडू शकतात.
सेल्समन :
तुम्ही अतिशय महत्वाच्या घरगुती कामात असताना किंवा हापिसला दांडी मारून टीव्हीवर लागलेला आवडीचा चित्रपट पाहत असताना एकदम बेल वाजते. अशा (अ) वेळी दारात उपस्थित झालेल्या चिकट रसायनाला ‘सेल्समन’ म्हणतात. नारदमुनींच्या नंतर कोणत्याही स्थळी, कोणत्याही काळी, अन कोणत्याही (अ)वेळी उपस्थित होण्याचा परवाना याला साक्षात जगदीश्वराने दिलेला आहे.
याचाही शब्दनाद ‘शेजारी’ या रसायनासारखाच , किंबहुना जास्तच मधुर असतो. चिकटपणाची मात्रा मात्र सर्वोच्च असते. याच्या पोतडीतून वैश्विक ज्ञानकोशापासून ते झुरळे मारण्याच्या औषधापर्यंत काहीही निघू शकते. अन जे काही निघते त्याच्या अद्भुत गुणांचे वर्णन करताना याच्या रसवन्तीवर साक्षात ‘याकुन्देंदुतुषार..’ वाली सरस्वती नर्तन करते. विविध पदार्थांबद्दलचे याचे अगाध ज्ञान पाहून ज्ञानियाचा राजादेखील तोंडात बोट घातल्याशिवाय राहणार नाही. आपल्या घरातील किंवा वापरातील एखादी वस्तू कशी कुचकामी आहे अन त्याच्या पोतडीतील, तिचीच सहधर्मी वस्तू कशी उपयुक्त, टिकाऊ, वाजवी मूल्याची आहे हे आपल्या बुद्धीला मुळीच उमगत नसताना याच्या तरल बुद्धीला व भेदक नजरेला मात्र सहज उमगते आणि ते आपल्या गळी उतरवण्याचे अमोघ कार्य तो हां हां म्हणता पार पाडतो. या वस्तूचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती या सेल्समनजवळचा अखेरचा ‘पीस’ असतो अन केवळ आपले सद्भाग्य म्हणून त्याने उदार मनाने तो अत्यंत सवलतीच्या दरात देऊ केलेला असतो.
पुरुष-वर्गापेक्षा स्त्री-वर्गावर या रसायनाचा परिणाम लवकर होतो असे आढळले आहे. स्त्रियांचा विश्वास संपादन करणे हा दुर्गम पुरुषार्थ कोणत्याही आम पुरुषापेक्षा या रसायनाला उत्तम-रित्या जमतो. त्यामुळे शक्यतो याचा स्वर नाद घरातील स्त्री-वर्गाच्या कानावर पडण्याआधीच याची बोळवण करावी. अन्यथा खिशाला मोठीच चाट बसण्याची शक्यता असते.
जमून आलेल्या वेळेचा सत्यानाश, आर्थिक खड्डा अन अविरत बडबड सहन करावी लागणे या किरकोळ बाबींशिवाय शिवाय इतर काही उपद्रव या रसायनापासून होत नाही. तथापि, हेही नको असल्यास खालील उपायांचा अवलंब करावा.
१. ‘आम्ही आता xxxx या महत्वाच्या कामासाठी बाहेर निघालो आहोत’ असे , कुलूप हातात घेऊन सांगावे.
२. कालच हीच वस्तू आपण दुसऱ्या सेल्समनकडून घेतली असल्याचे सांगावे.
३. सांगितलेल्या किमतीच्या सुमारे एक पंचमांश किमतीत वस्तू मागावी.
४. स्वत:च एखादी एजन्सी घेऊन ठेवावी व दारी आलेल्या सेल्समनला आपलीच वस्तू घेण्याचा आग्रह करावा.
यापैकी एका तरी उपायाचा हमखास परिणाम होऊन हे चिकट रसायन अखेरीस बाहेरचा रस्ता धरते.
डॉक्टर :
हे रसायन अत्यंत प्रतिष्ठित , किमती अन वेळखाऊ असते. इतके की याच्या दर्शनासाठी रांगा लावाव्या लागतात. किमान दोन ते पाच तास इतका वेळ हाताशी ठेवूनच या रसायनाच्या वाटेला जावे. इतके दुष्प्राप्य असल्यामुळे याची उपेक्षा करूजाल तर बिलकुल चालणार नाही. कारण सर्दी, पडसे, पोटदुखी इ. किरकोळ दुखण्यांपासून ते अस्थिभंग, हृदयविकार इ. गंभीर दुखण्यांपर्यंत कोणत्याही प्रसंगी याच्या शिवाय गत्यंतरच नसते. त्यामुळे कोणी टाळू म्हटले तरी याचा संपर्क टाळता येत नाही.
याचा चेहेरामोहरा कडक पांढरा, इस्त्रीबाज व शब्द अतिशय संक्षिप्त आणि आखीव असतो.
‘आडवे झोपा’
‘आ करा’
‘कुठे दुखतंय ?’
‘रात्री काय खाल्ले ?’
‘या गोळ्या १ रात्री १ सकाळी..’
‘दोन दिवस अंघोळ नको..’
यापलीकडचे शब्द याच्या मुखातून उमटताना आजवर सहसा कुणी पाहिले नाही. पेशंटचे दुखणे कितीही गंभीर असो अथवा कितीही साधे , याच्या गांभीर्याची मात्रा चळत नाही. तपासून झाल्यानंतर पेपर वाचून घडी घालून ठेवावा तितक्या निर्विकारपणे रुग्णाला, निदान न सांगता औषध लिहून देण्याचा गुणधर्म, या रसायनाचा कमलपत्र-सम अलिप्तपणा सिद्ध करतो. ‘मुलगा झाला आहे’ अन ‘हर्निया झाला आहे’ ही दोन्ही वाक्ये सारख्याच निर्विकारपणे सांगण्याचा अद्भूत गुणविशेष या रसायनाच्या अंगी आहे.
सर्वसाधारणत: संवादीपणाचा अभाव हा या रसायनाचा एक ठळक गुणधर्म आहे. तसेच इतर आम रसायनांप्रमाणे दिलखुलास हास्य, चक्कीजाळ वैताग, झान्ज आणणारा संताप, झोंबणारे दु:ख यांनी हे रसायन कधी बाधित होत नाही.
तथापि अलीकडे या रसायनाला ‘तपासण्या’ या घातक जंतूची बाधा झालेली दिसते. ‘तपासण्या’ केल्याशिवाय याची मतिच पुढे चालत नाही. तसेच तपासण्या केल्यानंतरही, दिलेले औषध दुखणे नष्ट करेलच याची शाश्वती बाळगू नये. जुन्या आवृत्तीतील डॉक्टरांच्या औषधाला तपासण्यांची बाधा नसूनही ‘रामबाण’ गुण येत असे. तसेच पेशंटला तपासण्यांच्या निमित्ताने फुटबॉलच्या चेंडूसारखे या डॉक्टरकडून त्या डॉक्टरकडे पाठवायची फ्याशनही जुन्या आवृत्तीत दिसत नसे. मूळ जुन्या रासायनिक आवृत्तीचे सध्या अवयवपरत्वे वेगेवेगळे उपप्रकार पाहायला मिळतात. जसे, कानाचा डॉक्टर, नाकाचा डॉक्टर, हृदयाचा डॉक्टर, हाडांचा डॉक्टर इ. इ.
याच्या रासायनिक प्रक्रीयेदरम्यान उत्पन्न होणाऱ्या ‘बिल’ नामक पदार्थाबाबत विशेष जागृत राहावे. अन्यथा पुन्हा औषध मागवण्याची पाळी येते.
(समाप्त.)
Book traversal links for काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने -३
वर्गीकरण
प्रतिक्रिया
रसायने एकच नंबर! सेल्समन
हे
ह्या भागातली रसायनेही आवडली,
सोप्पं आहे !
‘मुलगा झाला आहे’ अन ‘हर्निया
मजेशीरच
मजेशीर!
सगळेच भारी, पण मोलकरीण आणि
ही रसायने पण लै भारी.
लाजवाब रसायने...
लै भारी हो तै!
खि खि खि.. डागदर लै भारी!!
लै भारी..
अप्रतिम
कॅब ड्रायव्हर
मस्त एकदम
चित्रण आवडले
ड्रायव्हरांनी सगळ्या
नाही..
असे हे रसायन जरा तरुण अन नखरेल असल्यास मात्र
मस्त मस्त लिहिलंय सगळं.,
स्नेहा...........
मोलकरीण
>> मोलकरणींकडे हल्ली मोबाईल
फारच छान
तिन्ही रसायन'शाळा' एकदम
मी काही ते
नो समाप्त हं स्नेहांकिता? ते
अगदि अप्रतिम निवेदन . मोलकरीण
रसायनांच्या तीनही भागांच्या
आमच्या जखमेवरची खपली काढल्या
हा ही भाग उत्तम.
मोलकरीण या रसायनाशी जास्त
विनोदी लेखन आवडले