चाचणीचा निकाल आणि चाचणीचा निष्कर्ष

धनंजय's picture
धनंजय in विशेष
21 Sep 2012 - 12:49 pm
श्रीगणेश लेखमाला २०१२

चाचणी म्हणजे काय?

एखाद्या शंकेबाबत शहानिशा करायचे ठरवले तर काय करावे? चाचणी करावी. हे तर आपल्याला ठाऊकच आहे. स्वयंपाकघरात शितावरून आपण भाताची परीक्षा करतो. शीत शिजले असेल, तर पुरता भात शिजला; शीत कच्चे, तर पुरता भात कच्चा. मॅट्रिकच्या परीक्षेपूर्वी आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना चाचणी परीक्षा देत. चाचणी परीक्षेच्या निकालावरून विद्यार्थ्याच्या मॅट्रिक तयारीबाबत शाळा आडाखे बांधे. आणि त्यावरून विद्यार्थ्यांना मॅट्रिक परीक्षेचे अर्ज भरू देई. वैद्यकात थोड्याशा रक्ताची चाचणी करून शरीरभर पसरलेल्या रोगाबाबत अंदाज करतात. कारखान्यात घाऊक मालापैकी थोड्याच नगांना कसाला लावतात. काही हजार लोकांची सर्वेक्षण-चाचणी करून पूर्ण देशाच्या अर्थकारणाबाबत काही अंदाज लावतात. आयुष्यातल्या क्षुल्लक वैयक्तिक बाबींपासून देशाच्या परिस्थितीपर्यंत सर्व स्तरांवर "चाचण्या" केलेल्या दिसतात.

चाचणी म्हणजे कधीकधी मोठ्या समूहातला मोजका नमुना (sample survey) असू शकतो, पण सर्व चाचण्या तशा नसतात. उदाहरणार्थ मॅट्रिकच्या आधीच्या चाचणी परीक्षेत सर्वच विषयांचे पूर्ण परीक्षापत्र असते, आणि सर्वच विद्यार्थ्यांची चाचणी घेतात. तर चाचणीचे वैशिष्ट्य काय? जे काय खरेच जाणायचे असेल, त्याचा निर्देश चाचणी देते, पण चाचणी म्हणजे थेट दर्शन किंवा मोजमाप नव्हे. म्हणूनच जेव्हा काहीतरी पुरते आणि थेट अनुभवात येते, तेव्हा त्याला आपण "चाचणी" म्हणत नाही.

चाचण्या स्खलनशील असतात :

हे आपण कधीकधी विसरतो. पण विचार करता आपल्याला ठाऊकच असते : जे-जे थेट नाही ते-ते काही प्रमाणात स्खलनशील असते. क्वचित शितावरून भाताची परीक्षा चुकतेच. चुकते म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारे चुकू शकते : (१) शीत शिजलेले असते, पण पुरता भात शिजलेला नसतो. किंवा त्याउलट (२) शीत कच्चे असते, भात मात्र शिजलेला असतो. दोन वेगवेगळ्या प्रकारच्या चुकांचे परिणाम विरुद्ध टोकाचे असतात. पहिल्या परिस्थितीत आपण शिजवणे थांबवतो, आणि कच्चा भात ताटात वाढतो, तर दुसर्‍या परिस्थितीत आपण भात अधिक वेळ शिजत ठेवतो, आणि गच्चगोळा भात ताटात वाढतो.

निकाल आणि निष्कर्ष यांच्यातला फरक :

चाचणी शिताच्या बाबतीत स्खलनशील नसते! ते शीत खरोखरच शिजलेले असते, किंवा कच्चे असते - हा चाचणीचा "निकाल" होय. निकाल म्हणजे शिताचे थेट अनुभवलेले रूप. त्यात चूक ते काय? चुकू शकतो तो पूर्ण भाताबाबतचा निष्कर्ष. निकाल आणि निष्कर्ष यांच्यामध्ये फरक करणे जरुरीचे असते.

चाचणीचा निष्कर्ष कितपत चुकतो, हे जाणलेले बरे :

निकाल काळजीपूर्वक लावला, तरी निष्कर्ष कधीकधी चुकतो. म्हणून काय आपण धीर गाळून बसतो काय? तर नव्हे. अमुक चाचणी स्खलनशील, तमुकसुद्धा स्खलनशील, मग ही घ्या वा ती घ्या, काय फरक पडतो... असे उदासीन व्हावे काय? मुळीच नव्हे. कारण स्खलनशीलतेतही उजवेडावे असते.काही चाचण्या अधिक स्खलनशील असतात, तर काही चाचण्या कमी स्खलनशील असतात. जर चाचणीचा निष्कर्ष चुकणे महागात पडणार असेल, तर परवडेल तितकी किमान-स्खलनशील चाचणी निवडली पाहिजे. त्यामुळे स्खलनाचा दर किती त्याचे मोजमाप करणे आवश्यक आहे.

अचूकतेची अथवा स्खलशीलतेची मोजमापे :

अचूकता आणि तिच्या व्यस्त प्रमाणात स्खलनशीलता ही काही एक-मितीची बाब नाही. अचूकतेच्या म्हणा, स्खलनशीलतेच्या म्हणा, अनेक मिती असतात. आपण शिता-भाताच्या उदाहरणात दोन प्रकारच्या चुका बघितल्या - एखादी चाचणी एका बाजूची चूक अधिक करत असेल, तर दुसरी कुठली चाचणी दुसर्‍या बाजूची चूक अधिक करत असेल.शिता-भाताचे उदाहरण बाजूला ठेवून आपण याकरिता वैद्यकातले उदाहरण घेऊया. मधुमेह म्हणजे साखरेचा उपयोग आणि निचरा करण्याबाबत शरिराचा दोष. हा दोष जर थेटच बघायचा असेल, तर भरपूर गोड अन्न खाऊन साखरेचा निचरा होतो की नाही ते थेटच मोजावे लागेल. परंतु साधारणपणे डॉक्टर एकदाच आणि थोडेसेच रक्त चाचणी करण्यासाठी घेतो. रक्ताच्या वेगवेगळ्या चाचण्या करता येतात : विरघळलेली साखर मोजणे ही नेहमीची चाचणी अनशापोटी करावी लागते, तर हिमोग्लोबिन प्रथिनाशी संयुक्त साखर (HbA1c) मोजायची चाचणी सोयीस्कररीत्या दिवसात कधीही करता येते. म्हणजे थेट साखरेचा निचरा मोजत नाही - रक्तातील एककालिक चाचणीचा निकाल बघून निष्कर्ष लावतात. "फार जास्त साखर" निकालानुसार "पुरेसा निचरा नाही" असा निष्कर्ष लावतात, वा "साखर जास्त नाही" निकलानुसार "निचरा पुरेसा आहे" असा निष्कर्ष लावतात. आता या नव्या HbA1c चाचणीत किती प्रमाण असले (उदाहरणार्थ >६.५ की >७.०) तर "साखर अधिक" म्हणावे, ही बाब अजून नीट ठरलेली नाही. खरे म्हटले तर हे दोन निकालाचे स्तर म्हणजे दोन वेगवेगळ्या चाचण्या आहेत. अर्थात कुठलाही स्तर घेतला तरी चाचणी स्खलनशील आहे, त्या स्खलनाच्या वेगवेगळ्या मिती कुठल्या ते पाहूया.

चाचणीची "संवेदनक्षमता" (sensitivity): मधुमेह झालेल्या रुग्णांपैकी किती टक्क्यांमध्ये रक्ताची चाचणी केल्यास "साखर जास्त" असे आढळेल? ही टक्केवारी म्हणजे त्या चाचणीची संवेदनक्षमता.

चाचणीची विशिष्टता : (specificity) मधुमेह नाही अशा बिगररुग्णांपैकी किती टक्क्यांमध्ये रक्ताची चाचणी केल्यास "साखर जास्त नाही" असे आढळेल? ही टक्केवारी म्हणजे त्या चाचणीची विशिष्टता.

(लक्षात असू द्या, मधुमेह हे फक्त उदाहरण झाले. संवेदनक्षमता आणि विशिष्टता ही अचूकतेच्या दोन मितींची मोजमापे कुठल्याही चाचणीबाबत वापरता येतात - वैद्यकाबाहेरच्या चाचण्यांबाबतही वापरता येतात.)

वर सांगितलेल्या दोन स्तरांची संवेदनक्षमता आणि विशिष्टता मला एका अभ्यासनिबंधांत सापडली (कुमार व साथी : http://jcem.endojournals.org/content/95/6/2832.full)

HbA1c स्तर

>६.५

> ७.०

संवेदनक्षमता

६५%

४२%

विशिष्टता

८८%

९२%

(विशेष सूचना : फक्त एखाददुसर्‍या सर्वेक्षणावरून चाचण्यांबाबत अखेरचा निर्णय करू नये. येथे फक्त उदाहरणाकरिता हे आकडे दिले आहेत.)

एखाद्या चाचणीची संवेदनक्षमता आणि विशिष्टता दोन्ही वरचढ असली, तर निवड सोपी असते. परंतु तक्त्यात लक्षात आलीच असेल, अशी ही बाब पुष्कळदा दिसते : संवेदनक्षमता जास्त असली तर विशिष्टता कमी असते. आणि त्याचा व्यत्यासही दिसतो - विशिष्टता जास्त असली तर संवेदनक्षमता कमी असते. त्यामुळे या ठिकाणी शृंगापत्ती आहे : आखूडशिंगी ती बहुदुधी नाही, आणि बहुदुधी ती आखूडशिंगी नाही!

चाचणीच्या निष्कर्षाच्या अचूकतेबाबत या मिती समर्पक आहेत काय?

संवेदनक्षमता आणि विशिष्टता या मिती अर्थपूर्ण आहेत, पण चाचणीच्या निष्कर्षाच्या अचूकतेबाबत समर्पक नाहीत. वरील मितींचा तार्किक पाया पुढीलप्रमाणे :

जर मधुमेह तर किती टक्के चाचणीत-साखर-जास्त (संवेदनक्षमता)

जर मधुमेह-नाही तर किती टक्के चाचणीत-साखर-जास्त-नाही (विशिष्टता)

पण आपले प्रत्यक्ष निष्कर्ष व्यत्यासाचे असतात :

जर चाचणीत-साखर-जास्त तर किती टक्के मधुमेह (होकारात्मक चाचणीचे मूल्य positive predictive value)

जर चाचणीत-साखर-जास्त-नाही तर किती टक्के मधुमेह-नाही (नकारात्मक चाचणीचे मूल्य negative predictive value)

(नोंद घ्यावी : जर-तर च्या कलमांचे क्रम व्यत्यासामुळे पालटले आहेत)

आणि जर-तर या तार्किक मांडणीचा व्यत्यास थेट होत नाही, त्याची नीट व्यवस्था लावावी लागते.

चाचणीची ही दोन मूल्ये संवेदनक्षमता-विशिष्टतेवर अवलंबून असतात, हे तर आहेच.पण व्यवस्था लावताना आणखी कशावर अवलंबून असतात, हे पहिल्यांदा अनपेक्षित आणि आश्चर्यकारक वाटू शकेल. त्या समाजात मधुमेहाचे प्रमाण कितपत आहे, त्यावर ही दोन चाचणी-मूल्ये अवलंबून असतात. थोडाच विचार केल्यास ही बाब स्पष्ट होईल.

कमी संवेदनक्षमता असल्यामुळे होणारे प्रमाद फक्त मधुमेहाच्या रुग्णांमध्ये होतात. जर समाजात मधुमेहाचे प्रमाण थोडे असेल तर हे प्रमादही थोडे असतात. जर समाजात मधुमेहाचे प्रमाण फार असेल, तर हे प्रमाद मोठ्या संख्येने होतात. त्याउलट कमी विशिष्टता असल्यामुळे होणारे प्रमाद फक्त बिगर-मधुमेही व्यक्तींमध्ये होतात. जर समाजात मधुमेहाचे प्रमाण थोडे असेल तर उरलेल्या बिगर-मधुमेह्यांमध्ये हे प्रमादही फार असतात.जर समाजात मधुमेहाचे प्रमाण फार असेल, तर उर्वरित थोड्या बिगरमधुमेह्यांत हे प्रमाद थोडे होतात.

समजा भारताच्या एखाद्या जिल्ह्यात १०,००,००० लोकसंख्येत मधुमेहाचे प्रमाण केवळ १०% (१,००,००० व्यक्ती) असेल तर चुका कशा होतील? आधी HbA1c >६.५ चाचणी बघूया.

त्या १,००,००० मधुमेह्यांपैकी ६५% चाचणी"+" सापडतीत = ६५,००० (हे चांगले)

पण १,००,०००-६५,००० = ३५,००० चाचणी"-" सापडतील (हे स्खलनशील झाले)

तसेच ९,००,००० बिगरमधुमेह्यांपैकी ८८% चाचणी"-" सापडतीत = ७,९२,००० (हे चांगले)

पण ९,००,००० - ७,९२,००० = १,०८,००० चाचणी"+" सापडतील (हे स्खलनशील झाले)

अबब! १,०८,००० + ६५,००० = १,७३,००० चाचण्या"+" सापडतील पण त्यांच्यापैकी फक्त ६५,००० खरे मधुमेही असतील. म्हणजे होकारात्मक चाचणीचे मूल्य ३७.६% आहे (इतके काही वाईट नाही). तर नकारात्मक चाचणीचे मूल्य ९५.८% आहे (हे तरी बरे.)

हीच बाब आपण HbA1c >७.० बाबत बघूया, आणि शिवाय दुसर्‍या एखाद्या समाजात बघूया - उदाहरणार्थ एखाद्या मेद-सुधार-क्लिनिकमध्ये मधुमेहाचे प्रमाण ६०% असेल :

HbA1c स्तर

>६.५

> ७.०

मधुमेहाचे प्रमाण १०%

होकार-मूल्य

३७.५%

५.५%

नकार-मूल्य

९५.८%

९३.५%

मधुमेहाचे प्रमाण ६०%

होकार-मूल्य

८९.०%

४४.१%

नकार-मूल्य

६२.६%

५१.४%

या तक्त्यावरून दोन गोष्टी अधिक स्पष्ट होतात :

(१) चाचणीचा निकाल नव्हे, तर जो निष्कर्ष आहे, त्याचे होकार आणि नकारमूल्य "त्या समाजात मधुमेहाचे प्रमाण किती आहे" या बाबीवर कितपत अवलंबून आहे, आणि

(२) केवळ संवेदनक्षमता आणि विशिष्टता पाहिल्यास HbA1c >६.५ वा >७.० मध्ये भला मोठा फरक असेल असे स्पष्ट दिसत नाही. पण विवक्षित समाज-परिस्थितीच्या संदर्भात फारच मोठा फरक आहे, हे होकार आणि नकारमूल्यांतून दिसून येते.

सारांश : चाचण्या स्वभावतः स्खलनशील असतात. परंतु ती स्खलनशीलता चार वेगवेगळ्या मितींमध्ये मोजता येते : (१) संवेदनक्षमता (२) विशिष्टता (३) होकारमूल्य (४) नकारमूल्य. पैकी संवेदनशीलता आणि विशिष्टता चाचणीत अंगभूत असतात, आणि "जे शोधायचे ते त्या समाजात किती प्रमाणात आहे" यावर अवलंबून नसतात. पण निष्कर्ष किती अचूक आहेत, हे जोखण्याकरिता होकारमूल्य आणि नकारमूल्य या मिती समर्पक आहेत. आणि त्या मात्र "जे शोधायचे ते त्या समाजात किती प्रमाणात आहे" या अवलंबून असतात. कुठल्याही चाचणीच्या निष्कर्षांच्या स्खलनशीलता वा अचूकता जाणली, तर चाचणीच्या मर्यादा समजतात, आणि चाचणीचा सदुपयोग करता येतो.

प्रतिक्रिया

पैसा's picture

21 Sep 2012 - 1:46 pm | पैसा

धनंजय यांच्याकडून आणखी एक उत्तम लेख. आता फक्त वर वर वाचला आहे, पण लेखाचं मूल्य लक्षात यायला तेवढं पुरेसं आहे. मांडणी आणि विषय आवडला आहे. आणखी काही प्रतिसाद आल्यानंतर परत येते.

मन१'s picture

21 Sep 2012 - 3:05 pm | मन१

वेलकम ब्याक धन्याशेट.
किती दिवसांनी पहायला मिळतय सांख्यिकी संदर्भात इतकं छान.
सध्या फक्त वरवर चाळलाय लेख.
पुन्हा फुरसतीत वाचावा लागेल.

गवि's picture

21 Sep 2012 - 4:01 pm | गवि

वा वा.. मस्त मांडणी...

स्पिन आणि स्नाउट (SpIN आणि SnOUT) आठवले. लक्षात ठेवायला सोपं जातं. :)

SpIN- Specificity rules Positives In - meaning that on a test with high specificity if you test positive chances are you got the disease.. अशा टेस्ट कन्फर्मेट्री टेस्ट म्हणून वापरतात..

SnOUT - Sencitivity rules Negatives Out - meaning that on a test with high sencitivity if you test negative chances are you don't have the disease अशा टेस्ट स्क्रीनिंग टेस्ट म्हणून वापरतात..

मिसळपाव's picture

21 Sep 2012 - 4:21 pm | मिसळपाव

हा बहुतेक धनंजयने लिहिला आहे! परत एकदा नीट वाचावा लागेल. धनंजयचा म्हणजे क्लिष्ट असेल पण फटी नाहि सापडायच्या! मला पहिल्या एक दोन परीच्छेदात, का कुणास ठाउक, पण 'अनुभवावरनं देवाचं आस्तित्व मान्य करावं का?' या वर असेल असं वाटंत होतं.

अवांतर - पैसाताईला कसं कळलं कि लेख धनंजय चा आहे? संपादक म्हणून कि माझ्या नजरेतून सुटतंय? तिने उल्लेख केला नसता तर लेखक कळणार नाहि.

पैसा's picture

21 Sep 2012 - 5:10 pm | पैसा

नवे लेखन दुव्यावर लेख कोणाचा आहे ते कळतंय. लेखात कुठेही लेखकाचं नाव दिसत नाही हा एक किडा आहे. आणि तो काढावा लागेल.

मिसळपाव's picture

21 Sep 2012 - 5:42 pm | मिसळपाव

'प्रत्येक सदरातले पाच नवे लेख' हे पान गेलंच म्हणायचं? 'नवे लेखन' हे खरं म्हणजे 'नवे प्रतिसाद' आहे. ते पान नको असं नाहि पण योग्य नाव हवं. आणि 'नवे लेख' असं पान सुद्धा हवं!

विसुनाना's picture

21 Sep 2012 - 4:34 pm | विसुनाना

चाचणी-निकाल आणि निष्कर्ष यांच्याबाबत मुद्देसूद माहिती देणारा लेख आवडला.

मिसळपाव's picture

21 Sep 2012 - 4:57 pm | मिसळपाव

१. "कमी संवेदनक्षमता असल्यामुळे होणारे प्रमाद फक्त मधुमेहाच्या रुग्णांमध्ये होतात. जर समाजात मधुमेहाचे प्रमाण थोडे असेल तर हे प्रमादही थोडे असतात. जर समाजात मधुमेहाचे प्रमाण फार असेल, तर हे प्रमाद मोठ्या संख्येने होतात. "
संवेदनक्षमता हि मधुमेह किती तीव्र आहे यावरहि अवलंबून असेल नाहि का? तर मग त्याची संगती वरच्या वाक्यात कशी लागेल?

२. "......तर नकारात्मक चाचणीचे मूल्य ९५.८% आहे (हे तरी बरे.)"
हा ९५.८% आकडा कसा काढला कळलं नाहि. (उपलब्ध आकड्यांची भागाभाग करून कुठले आकडे वापरलेत ते काढता येईल. पण तां कांय खरा नाय) लवकर सांग कारण हे कळलं तरच त्यापुढचे लेखातले आकडे कळतील!

>> २. "......तर नकारात्मक चाचणीचे मूल्य ९५.८% आहे (हे तरी बरे.)"
> हा ९५.८% आकडा कसा काढला कळलं नाहि.
हा आकडा आदल्या आकड्यासारखाच काढला, आणि लेख थोडा कमी अंकबंबाळ व्हावा म्हणून ताळा दिलेला नाही. जर १,००,००० मधुमेही आहेत, तर १०,००,००० पैकी ९,००,००० बिगरमधुमेही आहेत.

त्या ९,००,००० बिगरमधुमेह्यांपैकी ८८% चाचणी"-" सापडतीत = ७,९२,००० (हे चांगले)
पण ९,००,०००-७,९२,००० = १,०८,००० चाचणी"+" सापडतील (हे स्खलनशील झाले)

तसेच त्या १,००,००० मधुमेह्यांपैकी ६५% चाचणी"+" सापडतीत = ६५,००० (हे चांगले)
पण १,००,०००-६५,००० = ३५,००० चाचणी"-" सापडतील (हे स्खलनशील झाले)

७,९२,००० + ३५,००० = ८,२७,००० चाचण्या"-" सापडतील पण त्यांच्यापैकी ७,९२,०००/८,२७,००० = ९५.७% खरे बिगर-मधुमेही असतील. म्हणजे नकारात्मक चाचणीचे मूल्य ९५.८% आहे (हे तरी बरे.)

- - -
प्रश्न १ थोडक्यात :
संवेदनक्षमता म्हणजे मधुमेह्यांमध्ये होणार्‍या सर्व चुकांचा सारांश आहे. पुन्हा शितावरून भाताच्या परीक्षेचे उदाहरण घ्या. भात पूर्ण शिजलेला असूनही ते एक शीत कच्चे राहिले, तर ती चूक आहे, हे खरे. आणि भात अति-शिजला तर तर एखादे शीत कच्चे राहायची शक्यता कमी-कमी होत जाईल, हेदेखील खरे. परंतु "चाचणी करण्यालायक पुरेसा किंवा अधिक शिजलेला भात असल्यास चाचणीचे शीतही पूर्ण शिजल्याची शक्यता" हीच संवेदनक्षमता होय. त्यामुळे तुमचा तीव्रतेबाबतचा मुद्दा बरोबर आहे, परंतु त्यामुळे वरील वाक्यात तितकासा घोटाळा होत नाही. कारण संवेदनक्षमता १००% पेक्षा कमी असणे या हा आकड्यात मधुमेहाच्या कमी-अधिक तीव्रतेमुळे होणारे प्रमाद सारांशरूपाने आलेले आहेत.

वेळ मिळाल्यास आणखी विस्तार करेन. (म्हणजे "मधुमेह" ही एकच गोष्ट नसून "मधुमेह-प्रकार१, प्रकार२" असे वेगवेगळे रोग असले तर? कदाचित आपण तीव्रतेनुसार प्रकार पाडू. किंवा बाल-मधुमेह, जरठ-मधुमेह असे प्रकार पाडू. तर वेगवेगळ्या प्रकारांकरिता चाचणीची संवेदनक्षमता तसेच विशिष्टता वेगवेगळी असू शकेल. परंतु येथे "मधुमेह" हे उदाहरण म्हणून घेतले आहे, आणि उदाहरणापुरते मानले आहे, की "मधुमेह" ही एकसंध संकल्पना आहे. मधुमेहाऐवजी आपण वेगळे कुठलेही उदाहरण घेऊ शकतो. या मितींवरती युद्धशास्त्रात बराच अभ्यास झाला आहे. "शोधायची वस्तू=विमान" आणि "चाचणी=रेडारवर अमुक-मोठा ठिपका दिसणे". जेथवर "विमान" ही एकजिनसी संकल्पना मानता येते, तेथेवर या चार मिती पुरतात. मात्र "मोठे विमान", "छोटे विमान" किंवा "प्रोपेलर विमान" "जेट विमान" हे वेगवेगळे जिन्नस मानले, तर या चार मिती प्रत्येक जिन्नसाकरिता ठरवता येतात.)

मिसळपाव's picture

21 Sep 2012 - 8:57 pm | मिसळपाव

या उदाहरणात, "१०% लोकाना मधुमेह आहे" या गृहितकावर सगळे आकडे अवलंबून आहेत. पण प्रत्यक्ष व्यवहारात काहि हि सोय नसते. किंवा असेलच असं नाहि हे तर नक्कि. त्यामुळे एकंदरीतच, "रक्तदाब ८० ते १२० च्या दरम्यान असावा" यासारखं अनुमान काढताना निव्वळ शंभर निरोगी लोकांचा रक्तदाब मोजून उपयोग नाहि, चाचणी बद्दलचे पण बरेच मुद्दे लक्षात घेणं आवश्यक आहे हा बोध झाला! रोचक आहे प्रकरण.

मग "रक्तदाब ८० ते १२० च्या दरम्यान असावा" हे (आणि यासम इतर प्रमाणं) प्रत्येक देश ठरवतो की WHO? किंवा जास्त अचूक प्रश्न म्हणजे "प्रत्येक देशाने आपापल्या समाजाचा अभ्यास करून, त्या समाजाला उपलब्ध साधनांचा विचार करून ठरवावं का?"

लेखन खूपच आवडले कारण समजले. वैद्यकशास्त्र न शिकलेल्याला जेवढं समजेल तेवढच समजलं पण सध्या मी याच्याशी संबंधित पुस्तक वाचत असल्याने बरे वाटले.
चौदा पंधरा वर्षाची असताना एकदा डाँ.नी चाचण्या करून मला डायबिटीस असल्याचे निदान केले. काही दिवस अमूक खायचे नाही नी तमूक वर्ज्य असे काढले. दोनेक महिन्यात पुन्हा सगळ्या चाचण्या नॉर्मल आल्या व ते पथ्याचे ग्रहण सुटले. शिवाय आजीआजोबा व बाबांना डायबिटीस असल्याने अगदी लहानपणापासून याबद्दल उत्सुकता होतीच. ती पुरेशी शमली म्हणायची. धन्यवाद.

धनंजयः माझ्या समजण्याची खात्री करून घेण्यासाठी विचारतो; तुम्हाला 'हे चांगले' आणि 'हे स्खलनशील' यामधून खालच्या आकृतीत दिलेलंच अपेक्षित आहे का?

(मूळ आकृती विकिपिडियावरून, मराठी जोडणी माझी, चुकीची असल्यास सांगा.)

गवि: 'spIN आणि snOUT' reminder आवडलं!

धनंजय's picture

22 Sep 2012 - 12:35 am | धनंजय

तक्त्यात "बरे/स्खलनशील" निर्देश अगदी बरोबर आहे.

(निबंधात या ठिकाणी माझी शब्द निवडायची चूक झाली, ती सुधारतो : या ठिकाणी मी "स्खलनशील" शब्द वापरायला नको होता, "प्रामादिक" शब्द वापरायला हवा होता. "स्खलनशील" म्हणजे "चुका करू शकते असे". येथे तर चूक झालेलीच आहे = प्रामादिक.)

विकास's picture

22 Sep 2012 - 12:41 am | विकास

लेख आणि मांडणी आवडली. अधिक नंतर सावकाशीने!

चित्रा's picture

22 Sep 2012 - 5:45 am | चित्रा

लेख आवडला.
परंतु एक प्रश्न - एफडीए किंवा तशाच इतर रेग्युलेट करणार्‍या संस्थांची संमती प्रक्रिया कशी असते? रिपोर्टसाठी चाचणीच्या चारही मितींचा उपयोग केला जावा, अशी व्यवस्था असते का?

एखाद्या चाचणीकरिता अनुमती देताना मुख्यतः दोन मिती बघतात, संवेदनक्षमता आणि विशिष्टता. कारण बर्‍यापैकी संवेदनक्षम आणि विशिष्टतायुक्त चाचणी समाजाच्या कुठल्यातरी उपविभागात चांगल्या होकार/नकार मूल्यांची असेल. आणि कुठल्या उपविभागात वापरणार त्या संदर्भात (सापेक्ष) होकार/नकारमूल्य ठरणार असल्यामुळे कुठले निरपेक्ष होकार-नकार मूल्य देताही येत नाही. अर्थात चाचणीचा वापर करणार्‍यांनी "आपण ज्या गटात ही चाचणी वापरणार आहोत त्यात होकार/नकार मूल्य किती आहे" याचे भान ठेवावे.

एक पाठ्यपुस्तक लेखक डॉ. लियॉन गॉर्डिस चांगले उदाहरण देतात : इलेक्ट्रोकार्डियोग्रॅममध्ये "अमुक" दिसले तर त्यापासून काय निष्कर्ष काढावा? एखादा जनरल प्रॅक्टिशनर आपल्या अनुभवातून खरोखर सांगू शकतो : "माझ्या प्रॅक्टिसमध्ये ईसीजीमध्ये 'अमुक' असलेले लोक क्वचितच हृद्रोगी असतात". (येथे "क्वचित" म्हणजे होकारमूल्य फार कमी या अर्थी आहे.) मात्र त्याच "अमुक"बाबत हृद्रोगतज्ज्ञ आपल्या अनुभवातून खरोखर सांगू शकते : "माझ्या प्रॅक्टिसमध्ये ईसीजीमध्ये 'अमुक' असलेले लोक बहुतेक वेळा हृद्रोगी असतात". (येथे "बहुतेक वेळा" म्हणजे होकारमूल्य मोठे या अर्थी आहे.)

हे दोघेही खरे बोलत आहेत, ते कसे? जनरल प्रॅक्टिस करणार्‍याच्या प्रॅक्टिसमध्ये हृदयाने ठाकठीक असलेले, वेगळीच कुठली तक्रार असलेले लोक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे ईसीजीमध्ये ते "अमुक" चुकून दिसते, असे लोक बघण्याचे प्रसंग जनरल प्रॅक्टिसमध्ये पुष्कळदा येतात. म्हणून जनरल प्रॅक्टिशनर आपले अनुभव ठीकच सांगत असतो, आणि निष्कर्षही ठीकच लावत असतो. हृद्रोगतज्ज्ञाची प्रॅक्टिस वेगळी असते. ज्यांचे हृदय ठाकठीक आहे, असे फारच थोडे रुग्ण तिच्या समोर येतात. त्यामुळे जनरल प्रॅक्टिशनरला दिसणारे प्रमाद तिच्या प्रॅक्टिसमध्ये होण्याचे अवसरच थोडे असतात. म्हणून तिच्या प्रॅक्टिसमध्ये ती योग्यच निष्कर्ष लावत असते...

वरील उदाहरण देण्याचे कारण असे : एफडीए चाचणीसाठी अनुमती देते, ती अनुमती दोघा डॉक्टरांकरिता असते. प्रत्येक डॉक्टराने आपली परिस्थिती ओळखून निष्कर्ष योग्य रीत्या लावावे, ही अपेक्षा असते.

चौकटराजा's picture

22 Sep 2012 - 6:53 am | चौकटराजा

भारतातील ५० टक्के ६ पेक्षा कमी गॅस सिलेंडरचा वापर करतात.- ग्रेट अर्थ तज्ञ मनमोहन सिंग.
याचा अर्थ भारतातील ५० टक्के लोक थंड पाण्याने आंघोळ करतात, स्वयंपाकासाठी सर्रास केरोसिनचा वापर करतात किंवा अर्ध कच्चा स्वयंपाक करतात. हा आमचा निष्कर्ष आहे. आता एनर्जी क्रायसिस एव्हढा मोठा असताना यांच्या तीलच एकाला प्रधानंमंत्री का करीत नाहीत ?
एक वाक्य आठवते- A man with his foot in fire can be a " happy man " in statistics .

नाना चेंगट's picture

22 Sep 2012 - 10:52 am | नाना चेंगट

किंवा ते जेवत नाहीत, त्यांना जेवणाची गरज नसते. किंवा त्यांना भुक लागत नाही, किंवा ते भीक मागून इतरांनी केलेला स्वयंपाक हादडतात किंवा कसेही. असे अनेक निष्कर्ष काढता येतात.
हवे ते आधी ठरवून त्यावरुन डाटा मिळवायचा आणि मांडणी करायची हे १९७० नंतरचे प्रमुख वैशिष्ट आहे. असो. मनमोहना ! तु राजा स्वप्नातला हेच खरे.

बाकी लेख ठीक.

नितिन थत्ते's picture

22 Sep 2012 - 11:01 am | नितिन थत्ते

ग्रेट

एकदा वाचला. मांडणी आवडली. परत एकदा वाचतो.
असे ज्ञान कण वेचलेले बरे. :)

लेखन एकदा वाचल्यावर कळतंय असं वाटता वाटता काहितरी राहतंय असं वाटलं
आता पुन्हा एकदा वाचतो

पैसा's picture

24 Sep 2012 - 9:13 pm | पैसा

एकाच चाचणीचा निकाल हा चाचणी २ किंवा ३ वेगवेगळ्या माणसांनी केली तरी एकच राहील ना? पण निष्कर्ष हा चाचणी करणार्‍यांनी काढायचा असतो. इतर बदलू शकणार्‍या काही परिस्थितींमुळे एका चाचणीचा निकाल एकच असला तरी २ माणसांनी काढलेले निष्कर्ष मात्र वेगवेगळे असू शकतील. चाचणी करणार्‍या व्यक्तीने घेतलेली गृहीतके, त्याचे ज्ञान आणि विचार करण्याची पद्धत यामुळे निष्कर्षांवर परिणाम नक्कीच होत असावेत.

धनंजय's picture

25 Sep 2012 - 1:29 am | धनंजय

> एका चाचणीचा निकाल एकच असला तरी २ माणसांनी काढलेले
> निष्कर्ष मात्र वेगवेगळे असू शकतील. चाचणी करणार्‍या व्यक्तीने
> घेतलेली _गृहीतके_, त्याचे ज्ञान आणि विचार करण्याची पद्धत यामुळे
> निष्कर्षांवर परिणाम नक्कीच होत असावेत.

अगदी अगदी. या सर्वांपैकी "गृहीतके" किंवा संदर्भचौकट विशेष महत्त्वाची. कारण निष्कर्ष वेगवेगळे असले, तरी दोघांनी एकमेकांना आपली-आपली गृहीतके सांगितली, तर तफावतीची वासलात लावता येते.
"गाय लंगडी आहे" हा निकाल एकसारखा असेल. पण "ती (वासरांत) शाहाणी आहे" हा एका माणसाचा निष्कर्ष आणि "ती (गायींच्या कळपात) मागे पडेल." हा दुसर्‍या माणसाचा निष्कर्ष वेगवेगळा असेल. पण एकदा का (कंसातली) गृहीतके त्या दोघांनी एकमेकांना सांगितली, तर तफावतीची व्यवस्था लागते. व्यवस्था लागते, म्हणजे असा अर्थ नव्हे, की दोन्ही निष्कर्ष एकाच वेळी ठीक आहेत. वापरण्यासारखा संदर्भ वासरांचा आहे, की धडधाकट कळपाचा आहे, याबाबत दोघे चर्चा करू शकतात, आणि दोनअपिकी योग्य कुठला तो निष्कर्ष निवडू शकतात.

"विचार करायची पद्धत वेगळी" ही बाब त्या मानाने नाठाळ आहे. अर्थात, पुष्कळदा "विचार करायची पद्धत" म्हणजे अनेक गुंतागुंतीची आणि वेगवेगळी गृहीतके असतात. ती दोघांनी सबुरीने एकमेकांना समजावून सांगितली, तर वरीलसारखीच व्यवस्था लागू शकते.