मन पाऊस पाऊस... (अष्टाक्षरी)

वेणू's picture
वेणू in जे न देखे रवी...
10 Apr 2012 - 3:16 pm

मन पाऊस पाऊस
चिंब अंगण- ओसरी,
कुंद गारव्याची हवा
गंध मातीचा पसरी..

मन पाऊस पाऊस
होते गालिचा हिरवा,
टेक क्षणभर तू ही
नको होऊस पारवा!

मन पाऊस पाऊस
पाणी डोळ्यांच्या द्रोणात,
अवखळ ओघळते
मंद हवेच्या झोकात!

मन पाऊस पाऊस
थेंब थेंबाने रुजतो,
ध्यास रुजे त्याच्यासवे
कोंब आशेला फुटतो..

मन झिम्माड पाऊस
आठवांची बरसात
माझ्या काजळात ओल्या
फुले उद्याची पहाट!!

मन पाऊस मेघांचा
सुटे मळभ जीवांचे
रंग आसमानी झाले
तुझ्या माझ्या नशीबाचे!

मन इतके बरसे,
दु:खं झाली मातीमोल
सल काढले खुडून
सरे पापण्यांची ओल...!

असे चित्र पावसाचे,
जणू इवला कोलाज
सार्‍या आठवणी खुळ्या
त्यांत मावल्या सहज..!

मन पाऊस पाऊस
म्हणे कसा बरसला?
अगं मनातच होता
तुला आज गवसला..!

कविता

प्रतिक्रिया

पहाटवारा's picture

10 Apr 2012 - 3:20 pm | पहाटवारा

मन इतके बरसे,
दु:खं झाली मातीमोल
सल काढले खुडून
सरे पापण्यांची ओल...!

अप्रतीम !

चाणक्य's picture

10 Apr 2012 - 3:22 pm | चाणक्य

छान लिहिलंय. मुख्य म्हणजे पावसाशी संबधित असूनही ऊगाचच हळवं तरल असं वाटलं नाही. पावसाची विविध रूपं आणि त्यांच्याशी एकरूप होणा-या मनाच्या अवस्था फार छान शब्दात पकडल्या आहेत.

मूकवाचक's picture

13 Apr 2012 - 10:16 am | मूकवाचक

+१

सुंदर लिहिले आहे..
हे वाचून फुलवा यांनी लिहिलेली ही कविता आठवली - http://www.misalpav.com/node/9151

राघव

प्रचेतस's picture

10 Apr 2012 - 4:49 pm | प्रचेतस

पाऊस आवडला.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

10 Apr 2012 - 5:29 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

किती तरल आणि मनाचे ठाव घेणारे लिखाण.. मान गये!! तुम्हाला सलाम!

मन पाऊस पाऊस
थेंब थेंबाने रुजतो,
ध्यास रुजे त्याच्यासवे
कोंब आशेला फुटतो..

असे चित्र पावसाचे,
जणू इवला कोलाज
सार्‍या आठवणी खुळ्या
त्यांत मावल्या सहज..!

सुंदर!

अत्रुप्त आत्मा's picture

10 Apr 2012 - 5:41 pm | अत्रुप्त आत्मा

चिंब जाहलो...येकदम झकास.. :-)

वेणू's picture

11 Apr 2012 - 9:25 am | वेणू

सर्वांचे आभार मित्र मैत्रिणींनो :)

मन वढाय वढाय
उभ्या पिकातले ढोर
किती हाकला हाकला
फिरी येत पिकावर

ह्या बहिणाबाईंच्या कवितेची सय आली.

वेणू, सहज सुंदर
वेणू, मोकळी सरळ
अंतरातली सादच
जणू प्रकटली येथ

अशाच कल्पनारम्य कवितांकरता हार्दिक शुभेच्छा!

मेघवेडा's picture

11 Apr 2012 - 3:12 pm | मेघवेडा

वा! सुरेख उतरलं आहे!

प्यारे१'s picture

11 Apr 2012 - 3:28 pm | प्यारे१

खूपच गोड.

मन पाऊस पाऊस
म्हणे कसा बरसला?
अगं मनातच होता
तुला आज गवसला..!

आजच्या ग्रीष्मकाहिलीत गरज त्याचीच जास्त!

अभिजीत राजवाडे's picture

11 Apr 2012 - 5:34 pm | अभिजीत राजवाडे

कविता आवडली.

मनःपूर्वक आभारी आहे, सार्‍या प्रतिसादकांचे :)

Pearl's picture

12 Apr 2012 - 5:50 pm | Pearl

मस्त कविता...आणि त्यातला नाद पण छान आहे.

>>असे चित्र पावसाचे,
जणू इवला कोलाज
सार्‍या आठवणी खुळ्या
त्यांत मावल्या सहज..
>>

हे पण आवडले.. नवी कल्पना वाटली.

>>मन पाऊस पाऊस
म्हणे कसा बरसला?
अगं मनातच होता
तुला आज गवसला..!>>

हे खूप आवडले.

पु.ले. शु.

कवितानागेश's picture

12 Apr 2012 - 5:58 pm | कवितानागेश

सुंदर कविता. आवडली.