Skip to main content

मन पाऊस पाऊस... (अष्टाक्षरी)

लेखक वेणू यांनी मंगळवार, 10/04/2012 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
मन पाऊस पाऊस चिंब अंगण- ओसरी, कुंद गारव्याची हवा गंध मातीचा पसरी.. मन पाऊस पाऊस होते गालिचा हिरवा, टेक क्षणभर तू ही नको होऊस पारवा! मन पाऊस पाऊस पाणी डोळ्यांच्या द्रोणात, अवखळ ओघळते मंद हवेच्या झोकात! मन पाऊस पाऊस थेंब थेंबाने रुजतो, ध्यास रुजे त्याच्यासवे कोंब आशेला फुटतो.. मन झिम्माड पाऊस आठवांची बरसात माझ्या काजळात ओल्या फुले उद्याची पहाट!! मन पाऊस मेघांचा सुटे मळभ जीवांचे रंग आसमानी झाले तुझ्या माझ्या नशीबाचे! मन इतके बरसे, दु:खं झाली मातीमोल सल काढले खुडून सरे पापण्यांची ओल...! असे चित्र पावसाचे, जणू इवला कोलाज सार्‍या आठवणी खुळ्या त्यांत मावल्या सहज..! मन पाऊस पाऊस म्हणे कसा बरसला? अगं मनातच होता तुला आज गवसला..!
लेखनविषय:

वाचने 2297
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

मन इतके बरसे, दु:खं झाली मातीमोल सल काढले खुडून सरे पापण्यांची ओल...!
अप्रतीम !

छान लिहिलंय. मुख्य म्हणजे पावसाशी संबधित असूनही ऊगाचच हळवं तरल असं वाटलं नाही. पावसाची विविध रूपं आणि त्यांच्याशी एकरूप होणा-या मनाच्या अवस्था फार छान शब्दात पकडल्या आहेत.

किती तरल आणि मनाचे ठाव घेणारे लिखाण.. मान गये!! तुम्हाला सलाम!
मन पाऊस पाऊस थेंब थेंबाने रुजतो, ध्यास रुजे त्याच्यासवे कोंब आशेला फुटतो.. असे चित्र पावसाचे, जणू इवला कोलाज सार्‍या आठवणी खुळ्या त्यांत मावल्या सहज..!
सुंदर!

मन वढाय वढाय उभ्या पिकातले ढोर किती हाकला हाकला फिरी येत पिकावर ह्या बहिणाबाईंच्या कवितेची सय आली. वेणू, सहज सुंदर वेणू, मोकळी सरळ अंतरातली सादच जणू प्रकटली येथ अशाच कल्पनारम्य कवितांकरता हार्दिक शुभेच्छा!

खूपच गोड. मन पाऊस पाऊस म्हणे कसा बरसला? अगं मनातच होता तुला आज गवसला..! आजच्या ग्रीष्मकाहिलीत गरज त्याचीच जास्त!

मस्त कविता...आणि त्यातला नाद पण छान आहे. >>असे चित्र पावसाचे, जणू इवला कोलाज सार्‍या आठवणी खुळ्या त्यांत मावल्या सहज.. >> हे पण आवडले.. नवी कल्पना वाटली. >>मन पाऊस पाऊस म्हणे कसा बरसला? अगं मनातच होता तुला आज गवसला..!>> हे खूप आवडले. पु.ले. शु.