मन पाऊस पाऊस
चिंब अंगण- ओसरी,
कुंद गारव्याची हवा
गंध मातीचा पसरी..
मन पाऊस पाऊस
होते गालिचा हिरवा,
टेक क्षणभर तू ही
नको होऊस पारवा!
मन पाऊस पाऊस
पाणी डोळ्यांच्या द्रोणात,
अवखळ ओघळते
मंद हवेच्या झोकात!
मन पाऊस पाऊस
थेंब थेंबाने रुजतो,
ध्यास रुजे त्याच्यासवे
कोंब आशेला फुटतो..
मन झिम्माड पाऊस
आठवांची बरसात
माझ्या काजळात ओल्या
फुले उद्याची पहाट!!
मन पाऊस मेघांचा
सुटे मळभ जीवांचे
रंग आसमानी झाले
तुझ्या माझ्या नशीबाचे!
मन इतके बरसे,
दु:खं झाली मातीमोल
सल काढले खुडून
सरे पापण्यांची ओल...!
असे चित्र पावसाचे,
जणू इवला कोलाज
सार्या आठवणी खुळ्या
त्यांत मावल्या सहज..!
मन पाऊस पाऊस
म्हणे कसा बरसला?
अगं मनातच होता
तुला आज गवसला..!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2333
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच !
अप्रतीम !
आवडलं
छान लिहिलंय. मुख्य म्हणजे पावसाशी संबधित असूनही ऊगाचच हळवं तरल असं वाटलं नाही. पावसाची विविध रूपं आणि त्यांच्याशी एकरूप होणा-या मनाच्या अवस्था फार छान शब्दात पकडल्या आहेत.
+१
In reply to आवडलं by चाणक्य
+१
सुंदर लिहिले आहे.. हे वाचून
सुंदर लिहिले आहे..
हे वाचून फुलवा यांनी लिहिलेली ही कविता आठवली - https://www.misalpav.com/node/9151
राघव
पाऊस आवडला.
पाऊस आवडला.
अप्रतिम!!
किती तरल आणि मनाचे ठाव घेणारे लिखाण.. मान गये!! तुम्हाला सलाम!
सुंदर!
चिंब जाहलो...येकदम झकास..
चिंब जाहलो...येकदम झकास.. :-)
सर्वांचे आभार मित्र
सर्वांचे आभार मित्र मैत्रिणींनो :)
नितांतसुंदर, सहजरम्य अष्टाक्षरी. आवडली.
मन वढाय वढाय
उभ्या पिकातले ढोर
किती हाकला हाकला
फिरी येत पिकावर
ह्या बहिणाबाईंच्या कवितेची सय आली.
वेणू, सहज सुंदर
वेणू, मोकळी सरळ
अंतरातली सादच
जणू प्रकटली येथ
अशाच कल्पनारम्य कवितांकरता हार्दिक शुभेच्छा!
वा! सुरेख उतरलं आहे!
वा! सुरेख उतरलं आहे!
खूपच गोड. मन पाऊस पाऊस म्हणे
खूपच गोड.
मन पाऊस पाऊस
म्हणे कसा बरसला?
अगं मनातच होता
तुला आज गवसला..!
आजच्या ग्रीष्मकाहिलीत गरज त्याचीच जास्त!
क्या बात है.
कविता आवडली.
मनःपूर्वक आभारी आहे, सार्या
मनःपूर्वक आभारी आहे, सार्या प्रतिसादकांचे :)
मस्त कविता...
मस्त कविता...आणि त्यातला नाद पण छान आहे.
>>असे चित्र पावसाचे,
जणू इवला कोलाज
सार्या आठवणी खुळ्या
त्यांत मावल्या सहज..
>>
हे पण आवडले.. नवी कल्पना वाटली.
>>मन पाऊस पाऊस
म्हणे कसा बरसला?
अगं मनातच होता
तुला आज गवसला..!>>
हे खूप आवडले.
पु.ले. शु.
सुंदर कविता. आवडली.
सुंदर कविता. आवडली.