ग्रेससारख्या श्रेष्ठ कविच्या कवितेचा अर्थ आपण आपल्या सामान्य सीमित जीवनाच्या अनुभवांच्या चौकटीतच शोधायला निघतो..... तिथे अर्थ अपुरा राहू शकतो कारण कदाचित अशा कविच्या अनुभवाचे, कल्पनेचे आणि प्रतिभेचे क्षितिज नक्कीच आपल्यापेक्षा अधिक विस्तृत असतं.... !!!
भय इथले संपत नाही..मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो..तू मला शिकविली गीते
या जगात, तु गेल्यावर मी भयभीत झालो आहे, आई तु मला जीवन जगण्यास शिकवलेस पण तरी मला तुझी आता खुप आठवण येते आहे
तु शिकवलेले सगळे मी व्यवहारात आणतो आहे पण भयामुळे दिवस संपल्यावर.
संध्याकाळ ही एक परिस्थीती संपुन दूसरी सुरु होण्याची रुपक आहे,
संध्याकाळ ही केवळ "भय इथले संपत नाही" म्हणत दुर्बल मनाची अवस्था नाही! ही वैचारिक स्थित्यंतराची कलाटणी आहे!
ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
ते झरे शितल चंद्रप्रमाणे आहेत, ती धरती एक रक्ताची माया देती आहे
तरी तुझ्या विचारांच्या झाडात तुझ्या रुपासहीत मी निजतो पुन्हा तुझ्याच आठवणीत उगवण्यास
चंद्र सजणांचे झरे .. वेगळेच वाटते आहे ना, नाहि. चंद्र हा जसा कलेकले ने बदलतो तसेच येथील प्रितीचे आहे.
ती प्रिती शाश्वत नाहिये. म्हनुन प्रेमाचे झरे आटतात म्हणुन चंद्र सजनाचे व्यवहारी रुपक येथे योजले आहे.
म्हणुन झाडांची उपमा घेवून, सुक्ष्म विचारांची बी होउन पुनःजन्म घेण्याचे कवी बोलतो आहे.
त्या वेळी नाजूक भोळ्या, वार्याला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती
तुझ्या विचारात असताना त्या वेळा कधी निघुन जातात त्या कळत नाहीत
तरी तुला पहाताना(शोधताना) दुरवर क्षितीजांची तोरणे माझ्या मनाच्या दारावर दस्तक देती .
हे विश्वच माझे घर आहे. कारण तु नाहियेस.. पण माझ्या विश्वातील कणाकणात तु आहेस का हा विचार काही जात नाहि. आणि मग क्षितिजापलिकडे तुला नजर शोधते आहे.
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला
तुझे ते बोल माझे पुर्ण आयुष्य स्पर्शून गेले
माझ्या आयुश्याच्या वनवासात तेच माझे सोबती आहेत
जसे सीतेच्या वनवासातील राघव . भले तु माझ्या सोबत प्रत्यक्ष नाही, पण जशी रामाची साथ सितेला वनवासात, तसेच तुझे बोल आहेत माझ्या साठी
देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ, फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब
देऊळ आहे येथे पलीकडे, तरीही तुझ्या आठवणींचा फ़ुटका खांब माझ्यापाशी आहे आणि थरथरत्या डोळ्यात आता आठवणींशिवाय काहीच नाही. हा आसवे म्हणशिल तर मीच त्यात एक उरला सुरला थेंब आहे .
देऊळ म्हणजे ईश्वर आहे तेथे, पण फुटलेल्या खांबातुन प्रकटणारा देव म्हणजे त्याचे अस्तित्व सर्वत्र आहे, अशी तुझी ओंजळ सर्वत्र आहे, मला अनुभवाचे दान तीच देते आहे. माझे अस्तित्व फक्त बुबळापासुन तुझा शोध घेणारा एक थेंब आहे फक्त .
संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने
संध्याकाळी मी, तू सांगितल्या प्रमाणे नटलेलो जगासंगे, सभोवताली आठवणींच्या क्षितीजासोबत निळाईत आकाशाची राने
संध्ये समयी आता पांढर्या कमळाप्रमाणे आहे मी, कदाचीत अस्तित्व संपत आल्याची जाणीव येते आहे मनात म्हणुन हे आकाश मला कवेत घेण्यास येते आहे जणु
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
स्त्रोत्रात माझी इंद्रिये अवघी का गुनगुनती ही दु:ख सारी
अग चांदण्या सम शितल स्मरणे तुझी सरता संपत नाहीत
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई
तू सांगीतल्या प्रमाणे मी जगतो संध्याकाळी अन रात्री
पण
मेंदुतुन आता, निश्पर्ण वाळलेले विचार गळुन जात आहेत, एक स्थितप्रज्ञता येत आहे.
कदाचीत हे धुके म्हणजे माझ्या समाधी ची वेळ जवळ आली आहे हेच तर सांगत नाहित .
-- शब्दमेघ
अवांतर :
कवि ग्रेस, हे माझे अत्यंत आवडते कवी. मनातुन काही केल्या जात नाहीत.
त्यांचे या कवितेचे रसग्रहण हे माझ्या कुवतीप्रमाणे आहे..
चु.भु.दे.घे.
जाता जाता : त्यांना भेटण्यासाठी गेलो असता , त्यांच्या प्रेरणे पासुन लिहिलेल्या कवितेंवर त्यांची सहि घेतली होती.
त्या कविता
http://www.misalpav.com/node/17166 आई .. मिटलेला श्वास..
प्रतिक्रिया
28 Mar 2012 - 4:46 am | चौकटराजा
भय इथले संपत नाही .
28 Mar 2012 - 5:25 am | सांजसंध्या
ग्रेसजींची ही कविता पंडितजींमुळे सर्वांना माहिती झाली. कोलाज पेंटिंग प्रत्येकाला वेगवेगळं दिसतं. रसग्रहण म्हणजे अर्थ सांगणे नाही. त्या काव्यातल्या रसाचे ग्रहण करणे म्हणजे रसग्रहण.. या कवितेत अनेक सौंदर्यस्थळं आहेत. त्या सौंदर्यस्थळांच्या दर्शनाने रसिक दिपून जातो.
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला
तो बोल आयुष्य कसा स्पर्शून गेला हे सांगताना कवी प्राचीन प्रतिमांचा आधार घेतो. त्या बोलाचं महत्व कवीच्या आयुष्यात किती आहे हे तुलनेने सांगताना सीतेला वनवासात रामाच्या शेल्याचं जे महत्व असेल तितकं.. प्रतिमांच्या अशा तुलनेतून भावनांची तीव्रता आपल्यापर्यंत पोहोचत राहते हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य अनुभवायचं.. अर्थ शोधत बसण्याने त्यातली गंमत कमी होते असं मला वाटतं.
28 Mar 2012 - 8:13 am | शैलेन्द्र
बरोब्बर..
तुम्हांला तो शब्द, ती ओळ, ती कविता कुठे भिडतेय हे तुम्हीच ठरवा, तुम्हीच अनुभवा.. आणी तुम्हीच धुंद व्हा त्या कैफात.. तुमचा अनुभव हा फक्त तुमचा.. युनीक.. म्हणुन ति कविताही फक्त तुमच्यापुरतीच.. वेगळी.. दोन-चार सौंदर्यस्थळ सुटली तरी हरकत नाही.. तुमची स्वतःची दोन चार नविन तुम्हाला सापडतातच.. जी इतर कुणालाही दिसत नाही.. कधिकधी तर तुम्हाला सगळ्या कवितेचा अर्थच वेगळा लागतो.. तो तुमच्या पुरता खराही असतो..
:)
बाकी लेख छान..
28 Mar 2012 - 1:42 pm | गणेशा
धन्यवाद सर्वांचे !
शैलेंद्र, अगदी बरोबर..
प्रत्येकास अर्थ वेगळा लागतो..
पण प्रत्येकाचे अर्थ जर जाणुन घेतले तर खुप छान वाटते. कोणाचे ही अर्थ चुकीचे नसतात.
प्रत्येकाच्या विचारांची झेप.. परिघ आणि अनुभव यावर ते अवलंबुन असतात.
आणि म्हणुन रसग्रहण एकाने नाहि तर अनेकांनी करुन त्याचा अर्थ सांगितला तर मस्त वाटेल.
28 Mar 2012 - 6:15 am | अत्रुप्त आत्मा
--^--^--^--
28 Mar 2012 - 10:23 am | तर्री
त्यांची कविता त्यांचे अनुभव घेवून ऊभी राहिली आहे. ती अनुभव सिध्द कविता!
कोणता ही महान कलावंत आयुष्याकडे कसा पहातो , त्याची अनुभव घेण्याची मानसिकता कशी आहे आणि त्याचे व्यक्त होण्याचे साधन कोणते आहे ह्या वर त्याच्या कलाकृतीचा पोत ठरतो असे माझे मत आहे.
आयुष्यात अनेक दु:खे भोगुन "पु.ल." सदैव प्रसन्न लिहित राहिले. तर काही अती प्रसिध्द श्रीमंत खासदार की वगैरे लाभलेले लेखक सदा "रडके , सडके लिहित राहिले "
कवीराज ग्रेस आपले अनुभव अत्यंत प्रामाणिकपणे कवितेमध्ये गुंफत राहिले. कोणताही आवेश , अभिनिवेश वगळून त्यांची कविता घडत गेली. आणि म्हणुनच ती आपल्या सारख्या खंबीर रसिकांना भावली.
कवी ग्रेस अत्यंत दुर्बोध कवी होते तरिही ही दुर्बोधता क्लिष्ट नाही. त्यांचे अनुभव आपल्या पर्यंत पोहोचले. आपण कवितेला पूर्ण "भोगु" शकलो, आणि तेच महत्वाचे.
परत महाकविला प्रणाम.
अजुन काही कवितांचे परिक्षण करायला हरकत नाही.
28 Mar 2012 - 11:30 am | मृत्युन्जय
गणेशा तुच रे तुच. मला खात्री आहे की ग्रेसांच्या एका कवितेतल्या एका वाक्याचा अर्थ तुच समजावुन सांगु शकशीलः
वस्त्रांत द्रौपदीच्या तो कृष्ण नागडा होता (संदर्भ ती गेली तेव्हा रिमझिम...)
28 Mar 2012 - 2:14 pm | गणेशा
मृत्युंजय साहेब,
" ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता" ही माझी (बर्याच जनांची पण असेनच) खुप आवडती कविता.
अर्थ प्रत्येकाचे खरेच वेगवेगळे असतात, प्रत्यकाचे परिमान वेगळे.
मी माझ्यापरिने बोलतो, पण येथे अनेक लोक आहेत ते त्यांच्या परिने पण सांगतील. तुम्हाला कविता वाचताना, किंवा अर्थ पाहताना जो अर्थ आवडेल तेच त्या शब्दांचे मोल.
अर्थ सांगायला आवडत नव्हते ग्रेस यांना. पण वाचकाने अर्थ त्याच्या म्हणण्याने घेवून वाचल्याने त्यांना नक्कीच आनंद होत असणार.
आई आता या जगातुन गेली आहे, तेंव्हाचे वर्णन कवी अत्यंत करुन पणे या कवितेत करतात.
...
आता माझ्या आयुष्यात जे काही आहे त्याला तु नसल्याने माझ्याठायी काहीच मुल्य नाहि.. तु नाहिस तर माझे सर्व संपले आहे जनु.
परंतु तरीही तुझ्यामागे, मला जगण्याचा तु जो रस्ता दाखवला आहे ( 'कंदील एकटा होता' या आधीच्या ओळीतुन येणारा अर्थ) त्या रस्त्यावर आता मी चालणार आहे. धुरकट का असेना पण मला तु दाखवलेला रस्ता दिसतो आहे आई.
आणि त्यावर चालताना माझे रक्त कोणाला वाढायला लागले तरी मला त्याचा काही गहिवर नाही. मी योगी आहे आता, माझ्याकडे माझे असे काहीच नाही.. जे आहे ते इतरांना देण्यासाठीच माझ्याकडे आले आहे, ह्या सृष्टीत मी जसा आलोय तेव्हडाच मी आहे, बाकी माझे सर्व काही मी दान करणार आहे.
स्वताला योगी, निस्वार्थ सेवा करणारा सांगताना कवी म्हणतात .. आपले असे काय असते.. आपण नागडे या जगात येतो आणि नागडेच जातो. येथलेच सर्व आहे.. येथेच द्यावयाचे आहे.
द्रौपदिला वस्त्र पुरवणारा कृष्ण ही असाच नागडा होता.
28 Mar 2012 - 2:37 pm | मृत्युन्जय
गणेशा साहेब
जसे तुम्ही आणि शैलेंद्र म्हणालात तसे , या वाक्याचा अर्थ अनेकांनी अनेक प्रकारे लावला आहे. मी माझ्यापरीने तो वेगळा लावला होता.
वस्त्रांत द्रौपदीचा तो कृष्ण नागडा होता:
द्रौपदीला अक्षय वस्त्र पुरवले त्याने. तसेच अक्षय संचित आहे माझ्याकडे. पण एक तु निघुन गेलीस आणि अक्षय वसदेखील्(म्हणजे सुख संपत्ती) असुन देखील आता मला ती काही उपयोगाची नाही. वस्त्र असुनसुद्धा मी नग्न झालो कारण काय तर एक तु आयुष्यातुन निघुन गेलीस. आता अजुन उरलय तरी काय? आणि उरलेल्याची किंमत तरी काय?
बादवे, ऐकीव माहितीनुसार हे काव्य ग्रेसांनी त्यांच्या आईच्या मृत्युवर नव्हे तर आईने त्यांना सोडुन जाण्यावर लिहिले आहे. कळत्या न कळत्या वयात त्यांची आई त्यांना सोडुन निघुन गेली. त्याचे शल्य ग्रेसांच्या मनात आयुष्यभर राहिले. अर्थात पुनरुच्चार करु इच्छितो की माहिती ऐकीव आहे.
28 Mar 2012 - 2:47 pm | सांजसंध्या
ऑर्कुटावर त्यांना भेटून आलेल्या एका कवयित्रीने लिहीलंय तसं.. ग्रेस या नावाने कम्युनिटी आहे तिथं. ते महत्वाचं नसायला पाहीजे असं वाटतं
28 Mar 2012 - 2:54 pm | मृत्युन्जय
महत्वाचे आहे. कवितेचा संपुर्ण अर्थ बदलुन जातो. कविता अजुन आर्त होते असे माझे तरी मत आहे.
28 Mar 2012 - 12:32 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
खुप दिवस वाट पहावी लागली.
त्यांना भेटण्याचे भाग्य लाभले तुला...
फार काही बोलण्यासारखे उरले नाही आता.....
__/\__
28 Mar 2012 - 2:41 pm | यकु
रसग्रहण आणि चर्चा आवडली.
मूळ कविता वाचताना उगाच दोन्ही नारकर आठवत होते.. ;-)
28 Mar 2012 - 6:55 pm | गणेशा
सर्वांचे मनापासुन आभार..
कवितेच्या या प्रवासात दिलेल्या साथीला अभिवादन..
धन्यवाद ..
28 Mar 2012 - 10:00 pm | पाषाणभेद
रसग्रहण आवडले व या कवितेचा उलगडलेला पैलू जाणवू लागला.