.वि.ल.भावे (१८७१-१९२६)
ठाण्याच्या एका सुखवस्तु घराण्यात श्री.भाव्यांचा जन्म झाला. शालेय अभ्यासात फार लक्ष नसले तरी निसर्ग निरिक्षणाचा नाद असल्याने ते तासंतास भटकण्यात घालवावयाचे व पुढे त्यांनी यावर लिखाणही केले. त्यांनी मिठाच्या व्यवसायाला सुरवात केली व त्यात यश व पैसाही मिळवला. व्यवसायासंबंधी त्यांनी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर भरपूर प्रवास केला व त्यावेळी संतांची माहिती व त्यांचे साहित्य याबद्दल बरीच सामग्री गोळा केली. या करिता त्यांनी कर्नाटक व तामिळनाडूतही प्रवास केला. त्यांनी वयाच्या बाविसाव्या वर्षी म्हणजे १८९३ ला "मराठी ग्रंथसंग्रहालय" स्थापन केले. महाराष्ट्रातील हे पहिले मराठी ग्रंथसंग्रहालय म्हणावयास हरकत नाही. वाचनालय व संग्रहालय असे दोन भाग पाडून एक वाचकांकरता व दुसरा संशोधकांकरिता अशी व्यवस्था केली. दुर्मिळ ग्रंथांच्या संग्रहाचा उपयोग लो. टिळकांना त्यांच्या चिरोल खटल्यात झाला. ठाण्यानंतर मुंबईत व इतर ठिकाणी ग्रंथालये सुरू झाली. १९०३ साली त्यांनी महाराष्ट्र कवि नावाचे मासिक काढले, चार-साडेचार वर्षे चालविले व त्यात १८१८ पूर्वीच्या कवींचे अप्रसिद्ध काव्य छापून मराठीची अमूल्य सेवा केली. नेपोलिअनचे त्यांनी लिहलेले चरित्र आजही मराठीतील सर्वोत्तम चरित्र म्हणावयास हरकत नाही.
मराठीने कायमचे ऋणी रहावे अशी दोन फार महत्वाची कामे श्री. भाव्यांनी केली. पहिले त्यांनी महानुभावी वाङ्मयाचा महाराष्ट्राला परिचय करून दिला व दुसरे म्हणजे "महाराष्ट्र सारस्वत" हा ग्रंथ लिहला.
(१) बर्याच जणांना कल्पना नसेल की महानुभाव या पंथातील लोकांनी ज्ञानेश्वरपूर्व काळापासून मराठीत ग्रंथसंपदा सुरू केली व एका अंदाजाप्रमाणे मराठीतील आजपर्यंतचे इतर सर्व लेखन एकत्र केले तरी त्यापेक्षा महानुभावी लेखन जास्त असावे. श्री. भावे यांच्यापूर्वी हे सर्व लेखन अप्रकाशित व अज्ञात होते. याचे कारण अगदी सुरवातीपासून पंथाबाहेरील लोकांना ते मिळू नये म्हणून सांकेतिक लिपीत लिहले गेले व इतर कोणाला त्याचा सुगावा लागू दिला नाही.सांकेतिक लिपी उकलून दाखविण्याचा मान इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांचा.पण या पंथातील महंतांशी/मठाधिपतींशी मैत्री करून श्री. भाव्यांनी या वाङ्मयाला प्रकाशात आणून लोकांना त्याची ओळख करून दिली. "सरस्वतीच्या मंदिरातील एक अज्ञात दालन" हा त्यांचा लेख १९२४ साली प्रसिद्ध झाला. त्या नंतर आजपर्यंत अनेक संशोधकांनी अथक श्रमाने विपुल महानुभावी साहित्य प्रसिद्ध केले आहे. मराठीतली पहिली कवियत्री ही महानुभावी. या साहित्याची ओळख पुढे करून घेऊ.
(२) प्राचीन मराठी साहित्याची माहिती आपणास पाहिजे असेल तर श्री. भावे यांचा "महाराष्ट्र सारस्वत" हा ग्रंथ (व त्याला श्री.तुळपुळे यांनी
जोडलेली पुरवणी) हे दोन ग्रंथ आपल्या संग्रही ठेवा. सामान्यत: बहुश्रुत वाचकाला (व बर्याच प्राध्यापकांनाही) पुरून उरावे असे हे ग्रंथ. अभ्यासू संशोधक सोडले तर इतरांना यां बाहेर काही लागणार नाही. सुरवातीला श्री. भावे यांनी हा एक प्रबंध लिहला. नंतर त्यात भर घालून पुस्तक लिहले. त्यांच्या सुधारित आवृत्याही काढल्या. जर कोणाला विकीवर प्राचीन मराठी गद्य, काव्य, लेखक, कवि यांच्यावर १५-२० लेख टाकावयाचे असतील तर माझ्याकडील दोनही भाग मी आनंदाने द्यावयास तयार आहे. एक अप्रतिम संग्राह्य ग्रंथ. या पासून प्रेरणा घेऊन अनेक विद्वानांनी निरनिराळ्या विषयांवर प्रबंध लिहले आहेत.
१९१८च्या सुमारास अत्यंत फायदेशीर असा मिठाचा व्यवसाय बंद केला. कारण... वाङ्मयसेवेस पुरेसा वेळ मिळावा ! श्री. भावे यांनी लो. टिळकांस त्यांच्या खटल्याच्या खर्चाकरिता एक लाख रु. उसने दिले होते व म. अण्णासाहेब कर्वे यांना महिला विद्यापीठाकरिता रु. ५०,००० ची देणगी. श्री. भावे यांचे देहावसन पुणे येथे वयाच्या ५५ व्या वर्षी झाले.
आज ही माहिती देण्याचे कारण पुढील दोन लेख. (१) "महाराष्ट्र सारस्वत " व " उदंड जाहले काव्य" . दोहोंचाही कै. भावे यांच्याशी संबंध आहे.
शरद
प्रतिक्रिया
31 Jul 2010 - 11:03 am | प्रदीप
आढावा, भाव्यांच्या कार्यावरील , तसेच महानुभावावरील पुढील लेखांची प्रतिक्षा करतो.
शरदराव, मिपावर आपले स्वागत असो. येथे आपण केलेली कवितांची रसग्रहणे व इतर साहित्यावरील लेख वाचावयास मिळतील अशी आशा आहे.
31 Jul 2010 - 11:22 am | llपुण्याचे पेशवेll
महाराष्ट्र सारस्वत वाचले आहे. :) मस्तं पुस्तक आहे.
31 Jul 2010 - 11:40 am | चिरोटा
महाराष्ट्राला योगदान देणार्या एका व्यक्तिमत्वाची ओळख करुन दिल्याबद्दल अभिनंदन
----
31 Jul 2010 - 1:25 pm | बिपिन कार्यकर्ते
सर्वप्रथम शरदरावांचे मिपावर स्वागत. त्यांच्या लेखणीतून असेच सतत काहीतरी वाचायला मिळावे ही इच्छा.
कै. वि. ल. भावे यांचे नाव आणि त्यांचे कर्तृत्व पहिल्यांदा कळले ते पुलंच्या प्राचीन मराठी साहित्याचा गाळिव इतिहास या दणकेबाज पुस्तकातून. किंबहुना हे पुस्तक विलंच्या महाराष्ट्र सारस्वताचे विडंबनच म्हणायला पाहिजे. त्यानंतर पुण्याचे पेशवे यांच्या कृपेने महाराष्ट्र सारस्वताचे दोन्ही भाग वाचायला मिळाले. मराठी साहित्याचा एवढा जबरदस्त इतिहास आणि आढावा घेणे हे खरोखर मेहनतीचे काम. शिवाय नुसते वाचन असून भागत नाही, व्यासंग / चिंतन / मनन तेवढ्याच तोडीचे पाहिजे. हे सगळे विलंनी केले आणि पुढील पिढ्यांना उपकृत करून ठेवले.
29 Jan 2013 - 12:16 am | लाल टोपी
महाराष्ट्र सारस्वताच्या या दोन भागांचे दुवे मिळतील का?
29 Jan 2013 - 12:22 am | बॅटमॅन
वेल, पहिल्या भागाचा नाही पण दुसर्या भागाचा दुवा नेटवर आहे.
हा घ्या.
29 Jan 2013 - 12:25 am | बॅटमॅन
सॉरी, लिंक गंडली.
http://www.dli.ernet.in/
या वेबसाईटवर जाऊन "Maharashtra Sarswat" हे सर्चला द्या. दुसरा भाग मिळेल. पहिला भाग माहिती नाही कुठेय , पाहिले पाहिजे.
29 Jan 2013 - 12:50 am | लाल टोपी
गुगल सर्च वर प्रयत्न करुन पाहिला पण नाही सापडलं
31 Jul 2010 - 9:25 pm | आनंदयात्री
लेख उत्तम झाला आहे. भाव्यांच्या कार्याची ओळख आवडली.
धन्यवाद.
31 Jul 2010 - 11:37 pm | निखिल देशपांडे
लेख आवडला..
वि. ल. भावे यांचा कार्याची ओळख करुन देण्याबद्दल धन्यवाद.
1 Aug 2010 - 12:53 pm | पुष्करिणी
माहितीपूर्ण लेख आवडला. पुढील लेखांच्या प्रतिक्षेत.
28 Jan 2013 - 2:45 pm | बॅटमॅन
हा धागा मुद्दाम वर काढतोय. एका विस्मरणात गेलेल्या पायोनियरची आठवण रहावी म्हणून. भाव्यांचे महाराष्ट्र सारस्वत आणि पर्शरामतात्या गोडबोल्यांचे नवनीत ही अजरामर पुस्तके आहेत. नेपोलियन चरित्रदेखील सुंदर आहे, अगदी जिव्हाळ्याने लिहिलेले आहे.
28 Jan 2013 - 4:21 pm | तर्री
माहिती आवडली.
बॅटमॅन - धन्यवाद.