बदल हा माणसाचा स्थायीभाव आहे. बदलतो तो माणूस. बदलला म्हणून माणूस इथवर पोहोचला. असली बदलाबदलीची वाक्ये ऐकून, वाचून कान आता किटले नि डोळे विटले आहेत. अस्मादिक 'ठेविले अनंते तैसेचि रहावे' या तुकारामी प्रवृत्तीचे. त्यामुळे बदलाचं वारं काही झेपत नाही. मग तो बदल वैयक्तिक असो की सार्वजनिक. वैयक्तिक बाबतीत लिहायचं तर, अगदी हाफिसमधली जागा असो, खुर्ची असो, कम्प्युटर असो की आणखी काही. यातलं काही काही बदललेलं चालत नाही. मालकाने पैसे मोजून ठेवून घेतलं असलं तरी या 'ठेविले अनंते' वृत्तीचा माज मात्र त्याला सहन करावाच लागतो. कारण माझ्याकडून होणार्या कामातूनच त्याला 'चित्ती समाधान' लाभत असतं.