विशेषांक - गोष्ट : आजची आणि आत्तापर्यंतची

गोष्ट तशी छोटी...'s picture
गोष्ट तशी छोटी... in लेखमाला
16 Jan 2017 - 8:25 am

गोष्टीची वेणट्री
नमस्कार रसिकहो. आज आपल्या गोष्टीचा शुभारंभाचा प्रयोग! रंगीत तालमी झाल्या, कपडेपट तयार झाले, मेकप चढले, रंगमंच सजला, तिसरी घंटा झाली... मनातली धाकधुक पात्रांच्या मुखवट्याआड लपवून आता पडदा उघडायची हीच ती वेळ... पडद्यावर गोष्ट जिवंत करणार्‍या पडद्यामागच्या आणि पडद्यावरच्या ज्ञात-अज्ञात हातांना समर्पित हा खेळ तुमच्यासमोर आजपासून मांडतोय... या खेळात एक खास 'प्रवेश' असणार आहे - रोज एका सेलेब्रिटीचा... विंगेत गलबला झाला की ते आल्याचं चाणाक्ष रसिकांना कळेलच! चला तर मग.. नाट्यदेवतेला नमन करून आज खेळाची 'नांदी' करतायत पुढील कलाकारः

  चलत्चित्रणाची तोंडओळख - एस
  गोष्ट.. च्या आवाहनानंतर आलेला हा पहिला वहिला लेख! या जबरदस्त लेखाने आणि एस भाऊंच्या समजूतदार सहकार्याने आपल्या गोष्टीचं पहिलं पान झोकात लिहिलं गेलं. याच लेखाने उपक्रमाचा श्रीगणेशा करावा हे ओघानेच आलं. या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्यात मोलाचा वाटा उचलणारा, आमच्या जिव्हाळ्याचा हा लेख आज तुमच्यासमोर आणताना विशेष आनंद होतो आहे..

   ओरिजिनल खान !! - संदीप चित्रे
   मिपाच्या 'स्टार' लेखकांपैकी एक नाव! त्यांच्याकडून सिनेक्षेत्रातल्या एका 'स्टार'बद्दल वाचणे हा एक अनोखा योग. गोष्टीच्या आजच्या प्रयोगात या तारायुगुलाची हजेरी रसिकांसाठी पर्वणी ठरेल, यात शंका नाही.

    विंगेत गलबला : पुष्कर श्रोत्री आले बरं का!!!
    गोष्टीला पडद्यावर आणणं ज्यांच्याशिवाय शक्य नाही, त्या अभिनेत्यांच्या मांदियाळीत हे नाव गौरवाने घेतलं जातं. आघाडीच्या या कलाकाराने मिसळपावसारख्या हौशी, डिजिटल फोरमसाठी कौतुकाने वेळ काढणं यापेक्षा मोठी पावती असू शकत नाही. पाहू या त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...

     "चित्रकथी"- साभार शिल्पा धेंडे
     हा ' गोष्ट तशी छोटी'च्या शिरपेचातला मानाचा तुरा! दृकश्राव्य माध्यमाची ही आदि-माय म्हणता येईल. अनेक वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून आंध्र प्रदेशात गेलेली ही एक अनवट कला. इंटरनेटच्या जमान्यात तर केव्हाच मागे पडलेली. पण आजच्या ह्या जगड्व्याळ सिनेमा इंडस्ट्रीची जननी म्हणावी इतकी महत्त्वाची. पडद्यावर सादर होणारी ही पहिलीच गोष्ट असेल.

      सिनेमा नावाचं हत्यार - पिंपातला उंदीर
      सिनेमा म्हणजे केवळ मनोरंजन की लोकजागृतीचे साधन? की सत्तेच्या बुद्धिबळातील एक हुकुमी मोहरा? बदलत चाललेल्या जगाच्या राजकारणात सिनेमा कधीच निव्वळ व्यवसाय नव्हता. आर्थिक आणि सामाजिक गणितांपलीकडे असलेल्या या सिने-मितीबद्दल जाणून घ्या पिंपातला उंदीर या लाडक्या मिपाकराकडून!

       विंगेत गलबला - एलिझाबेथ - आपलं.. मधुगंधा कुलकर्णी आल्या बरं का!
       आजचा खास 'प्रवेश' हा अशा एका व्यक्तीचा आहे, जिच्या कल्पक प्रतिभेतून एलिझाबेथ एकादशीसारखं रत्न जन्माला आलं. याच प्रतिभेने जान्हवी-श्रीलादेखील घरोघरी पोहोचवलं. होसुमीयाघ ते एलिझाबेथ एवढी प्रचंड मोठी रेंज असलेल्या लेखिकेकडूनच जाणून घेऊ या पडद्यावर दिसणार्‍या गोष्टीची पडद्यामागची गोष्ट!

        मेमॉयर्स ऑफ गेइशा - पद्मावति
        गेईशा - एका सर्वांगसुंदर मुखवट्यामागचं विदारक सत्य. आर्थर गोल्डनच्या सशक्त लेखणीतुन उतरलेली आणि स्पिलबर्ग आणि रॉब मार्शल यांच्या प्रतिभेतून पडद्यावर अवतरलेली ही जपानी मोनालिसा.. तिच्या सुंदर पण गूढ हास्यामागे कल्पनेपेक्षा भयानक सत्य आहे. या सिनेमाच्या निमित्ताने एक नव्या संस्कृतीचं दालन आपल्यासमोर खुलं करते आहे पद्मावति. उत्तम अभिरुचीच्या जोडीला प्रभावी लेखनशैलीने लिहीलेला हा लेख या उपक्रमासाठी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

         "लीके"(एक माध्यम- धार्मिक शिकवणीचं) - बाजीप्रभु
         कोकणातला दशावतार, उत्तर भारतातली रामलीला, हे लोकनाट्याचे प्रकार आपण ऐकले, पाहिले असतील. असाच एक खेळ थायलंडमधेही रंगतो, 'लीके' त्याचं नाव. काय असतो हा प्रकार? आपल्या लेखनात अभ्यासपूर्ण छाप सोडणार्‍या मिपाकर बाजीप्रभुंचा हा लेख आपले थायलंड बद्दलचे स्टिरीओटाईप्स मोडून काढणार हे नक्की. एका अनोळखी संस्कृतीचा हा लोभस पैलू वाचकांना नक्की आवडेल.

          विंगेत गलबला - अप्सरेचा पदन्यास - अर्चना जोगळेकर
          ८० आणि ९० च्या दशकात मराठी आणि हिंदी सिने-रसिकांच्या मनावर राज्य करणारी ही भूतलावरची अप्सरा. आपल्या अद्भुत नृत्यकौशल्याने आणि अभिनय-दिग्दर्शनकलेने स्वत:चं एक खास स्थान अर्चना जोगळेकरने निर्माण केलं आणि ते आजही अबाधित आहे. मिपा यूट्यूब चॅनलमध्ये त्यांची मुलाखत झळकणे हे आपल्या मिपासाठी निश्चितच गौरवशाली आहे. ही मुलाखत आपल्यासमोर आणण्यासाठी नवमिपाकर रोशनीचे आभार !

           कांचन कराई - आपला आवाज आपली ओळख
           कांचन कराई हे नाव मराठी आंतरजालाला नवीन नाही. प्रसिद्ध व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि एक जुन्या मिपाकर म्हणून त्या आपल्याला सुपरिचित आहेतच. व्हॉइस ओव्हरच्या क्षेत्रासंबंधी त्यांनी दिलेली ही माहिती, ह्या क्षेत्रात येऊ पाहणार्‍यांना अत्यंत उपयुक्त असेल ह्यात शंकाच नाही!

            "पृथ्वी थिएटर: गोष्ट एका स्वप्नपूर्तीची - विशाखा राऊत
            सिनेसृष्टीचं झगमगतं वलय दारी पाणी भरत असताना, थिएटरची ओढ त्याला स्वतःकडे खेचून घेत होती. थिएटरला त्याचं गतवैभव परत मिळवून देण्यासाठी त्याने आयुष्य वेचलं. या झाडाला त्याच्या पश्चात का होईना पण रसाळ गोमटी फळं लागली. या ध्यासवेड्या कलाकाराच्या स्वप्नपूर्तीची कहाणी वाचा विशाखा राऊतच्या प्रभावी शब्दांत.

             विंगेत गलबला - आपले नाटक्या उर्फ माधव कर्‍हाडे
             मिपाने आजवर अनेक होतकरू लेखकांना हक्काचं व्यासपीठ दिलं. होतकरू लेखक नंतर अंगच्या प्रतिभेमुळे प्रस्थापित झाले. मिपा आणि मिपाकर कौतुकाने आणि अभिमानाने त्यांचे दाखले देतात. आज अशाच एका यशस्वी निर्माते-दिग्दर्शक मिपाकराची मुलाखत घेण्याचा मणिकांचन योग जुळून आलाय. 'थिएटर विथ अ कॉझ' ही आगळीवेगळी संकल्पना यशस्वीरित्या राबवणारे मिपाकर नाटक्या यांची मुलाखत आजच्या सेलेब्रिटी सदरात!

              क कथेचा प पटकथेचा - बोका ए आझम
              'गोष्ट...'चं आवाहन आलं आणि पहिली खरड बोकोबांची! उपक्रमात कसा सहभाग घेता येईल याचा त्यांनी तातडीने विचार सुरू केला होता. आम्ही तो शुभशकुन मानला आणि जोमाने कामाला लागलो. मिपाच्या या लाडक्या आणि सिद्धहस्त लेखकाने कथेला पडद्यावर आणणार्‍या जीवनवाहिनीवर - पटकथेवर लेख देऊन तो शकुन खरा ठरवला!

               ग्लोब थिएटर - पद्मावति
               नाट्यसृष्टीचा पितामह - विलियम शेक्सपिअर! खुद्द त्याने स्थापन केलेल्या या वास्तूचा इतिहास त्याच्या साहित्याइतकाच नाट्यमय .. नाटक अक्षरशः जगलेला हा वेडा पीर जेव्हा विशारद म्हणून लाभतो, तेव्हा त्याची वास्तूदेखील फार वेगळा वारसा सांगत नाही. ग्लोब थिएटर खास लंडनहून मिपाचॅनलवर कॅमेर्‍यात बंदिस्त केलंय पद्मावतिने. तिच्या गोड आवाजाने व्हिडिओची शान वाढवलीये, हे तुम्हाला ऐकताक्षणी कळेलच!

                विंगेत गलबला - प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रभाकर भावे !!!! - सूड
                कलाकार कितीही सुंदर देखणे असले, तरी तत्कालीन प्रकाशयोजना, प्रसंग याचा विचार करून केलेली रंगभूषा ते देखणेपण वाढवतं. त्यासाठी काम करत असतात पडद्यामागे असलेले रंगभूषेत पारंगत असलेले लोक. आपल्या ‘गोष्ट तशी छोटी’ या संकल्पनेनिमित्त आपण जाणून घेणार आहोत अशाच एका ज्येष्ठ रंगभूषाकाराबद्दल - प्रभाकर भावे यांच्याबद्दल!! सूडने ही मुलाखत खास त्याच्या शैलीत आणि मेहनत करुन 'रंगवली' आहे.

                 किस्सा झाला ना राव ! - नाटक्या
                 शाळेतल्या नाटकात लुटुपुटीचा राजा - राणी - सैनिक. सारखं सारखं काय या शेंबड्या राजाचं ऐकायचं? छोटा सैनिक शत्रू सोडून आपल्याच राजाला ढुशी मारतो आणि सभागृह हास्यकल्लोळात बुडून जाते! शाळेतून बाहेर पडलं तरी खर्‍या रंगभूमीवर कधीकधी चिडका सैनिक आणि शेंबडा राजा असतोच.. सेलेब्रिटी मिपाकर नाटक्याकडून जाणून घेऊ या असे भन्नाट किस्से, ज्यांनी वेगळंच नाट्य घडवलं ;)

                  "माय फेअर लेडी आणि किंग्ज स्पीच - पिशी अबोली
                  दोन सकृतदर्शनी अतिशय भिन्न कथांमध्ये मानवी स्वभावाच्या समान व्यथांचा धागा शोधणं हा तिचा हातखंडा! वरवर दिसणार्‍या वेगवेगळ्या जीवन-परीक्षांच्या आड मानवजातीचा एक चिरंतन झगडा पिशी अबोलीने याही लेखात नेमका टिपलाय... या सुंदर लेखासाठी तिचे आभार!!

                   विंगेत गलबला - निपुण धर्माधिकारी काउचवर येताहेत !!!!
                   कॉलेजच्या एकांकिकांपासून सुरुवात करून संगीत नाटकं ते भाडिपा - कास्टिंग काउच असा एक विलक्षण प्रवास आहे या अभिनेता-दिग्दर्शकाचा. कास्टिंग काउचमधून मराठीमधील वेबसिरीज सुरू करणारे नवीन पिढीचे हे 'कुल' प्रतिनिधी. त्यांच्याशी कॅमेर्‍यावर बातचीत केलीये मिपाकर मंदार भालेरावने!! पाहू या ’गोष्ट तशी छोटी’च्या आजच्या खेळात

                    चित्रपटव्यवसायाचं अर्थकारण - आदुबाळ
                    सबसे बडा रुपय्या!

                    नाटक सिनेमा.. मनोरंजन वगैरे ठीक आहे हो.. पण दामाजीपंतांचे काय?! दमड्या मिळाल्याशिवाय डोंबारीसुद्धा खेळ करत नाही. मग एवढ्या मोठ्या चित्रपटसृष्टीचे गणित करा बरे! आपल्या खिशातून तिकिटासाठी गेलेला पैसा फिरतो तरी कसा? मिपाचे अर्थतज्ज्ञ आदुबाळ सांगताहेत पैशाची गोष्ट!

                     a

                     जाहिरातस्य कथा रम्यः - संदीप डांगे
                     जाहिरात म्हणजे पासष्टावी कला. आपल्याला सतत भेटणारी सर्वात लहान गोष्ट! काही सेकंदातच आपल्याला हसवणारी.. विचारात पाडणारी.. एका ट्यूनसरशी जुन्या आठवणींनी हळवं करणारी! आणि ह्या विषयावर अधिकारवाणीने डांगेअण्णांशिवाय आणखी कोण लिहिणार?!

                      पर्दाफाश - धनंजय
                      रंगमंचावर घडणारं नाट्य आणि आपण ह्यात असतो केवळ एक पडदा! ह्या दोन जगांमध्ये आखलेली सीमारेषा.. पण ही सीमारेषाच नाहीशी होते, तेव्हा प्रेक्षकच नाटकाचा एक भाग होत असेल का?! मिपाचे जुन्या आणि अत्यंत आवडते लेखक धनंजय ह्यांनी लेख आणि चित्रफीत ह्या दोन्ही माध्यमांतून घडवलेली ही आगळीवेगळी नाट्यसफर!

                       वलारमोर्गुलिस - कॅप्टन जॅक स्पॅरो
                       स्कोरी देमालाय्ती त्यिम्प्तिर त्यिमिस, एर्रिनिस य्या मोर्घुलिस - काल्पनिक जगाच्या वास्तव भाषा! हे आभासी जग प्रत्यक्षात आणायला अनेक वेड्या पीरांचा हात लागला. त्यातलेच अर्क वेडे तर पार या खोट्या जगाची खरी भाषाही घेऊन आले! कॅप्टन जॅक स्पॅरो सांगतोय एक अनोखी आणि मनोरंजक गोष्ट : आभासी जगातल्या प्रत्यक्ष भाषेच्या जन्माची!

                        Mise en scene - सिनेमाची भाषा! - अकिरा
                        आपल्यासाठी सिनेमा ही मनोरंजनासाठी पाहण्याची एक गोष्ट. पण अनेकांसाठी सिनेमा हा 'शिकण्याचा' विषय आहे. त्याला त्याची एक भाषा आहे, संकल्पना आहेत. आपल्याला सिनेमा आवडतो. पण तो नक्की का आवडला हे मात्र शब्दांत सांगणे अवघड. अशा वेळी दिग्दर्शकाने नक्की काय जादू केलेली असते, हे उलगडून सांगताहेत नवमिपाकर अकिरा!

                         विंगेत गलबला - सतीश राजवाडे येत आहेत हो!!!
                         अभिनयामुळे लक्षात राहिलेल्या कलाकृती अनेक असतात, परंतु एखाद्या सिनेमावर किंवा मालिकेवर काही दिग्दर्शक इतके उत्कृष्ट संस्कार करतात की ती कलाकृती सर्वात आधी दिग्दर्शकाच्या नावाने प्रेक्षकांच्या लक्षात राहते. सतीश राजवाडे हे नाव अशा दिग्दर्शकांपैकी आहे. एका मृगजळापासून सुरू झालेला प्रवास लग्नाच्या, प्रेमाच्या गोष्टी सांगत इतका सुरेख झाला की आज रसिक आपणहोऊन विचारताना दिसतात की ’’तो’ सध्या काय करतो?’
                         सतीश राजवाडेंसोबत गप्पा मारताहेत ज्योती अळवणी ’गोष्ट तशी छोटी’च्या आजच्या खेळात

                          बेख्डेल टेस्ट - यशोधरा
                          सिनेमा हे समाजाचं प्रतिबिंब की सिनेमातून बदलतं जनमानस? काहीही खरं असलं, तरी एक चाचणी आहे जी समाजाच्या आणि सिनेमांच्यादेखील तथाकथित पुढारलेपणाचे फुगे फटाफट फोडते आहे. काय आहे ही चाचणी? जाणून घ्या आपल्या संयत लेखणीने मिपाकरांची भरभरून दाद मिळवणार्‍या यशोधराकडून.

                           साईट (SITE) आणि खेडा प्रकल्प - प्रदीप

                           आजच्या ह्या डिजिटल युगाची नांदी कैक वर्षांपूर्वी खेडा प्रकल्पासारख्या लहानशा प्रयत्नांतून झालेली आहे. आणि आपले भाग्य असे की ह्या प्रकल्पाशी निगडित प्रदीपदा एक मिपाकर आहेत. डॉ. विक्रम साराभाईंसारख्या एका दूरदर्शी शास्त्रज्ञाने घडवलेल्या क्रांतीची गोष्ट!

                            विंगेत गलबला - महेश काळे - पूर्वा काळे आणि आयसीएमए फाउंडेशन
                            'कट्यार' नावाच्या दंतकथेला सातासमुद्रापार यशस्वीपणे नेऊन पोहोचवणार्‍या दोन किमयागारांची ही गोष्ट! शास्त्रीय संगीत दोघांचाही श्वास. परदेशी राहून मूळ मातीची ओढ जपू पाहणार्‍या प्रत्येक भारतीय मनाला प्रेरणादायी आणि दिलासादायी प्रवास आहे महेश काळे आणि पूर्वा गुजर काळे यांचा. जाणून घेऊ या 'गोष्ट..'च्या आजच्या खेळात.

                             विंगेत गलबला - कास्टिंग काउचचे रिंगमास्टर सारंग साठे येत आहेत हो! खट्ट्याक!
                             मराठीतली पहिली वेबसिरिज आणणार्‍या भाडीपाची सुरुवात करणारा हा मनुष्य आहे एकदम शांतीत क्रांती! अभिनय, दिग्दर्शन, कॅमेरा, लेखन.. सगळीकडे लीलया संचार करणार्‍या ह्या अफाट माणसाची ही त्याला साजेशा पद्धतीने घेतलेली मुलाखत!

                              The Show Must Go On
                              खेळ उभा राहिला, रंगला... हा हा म्हणता आता पडदा पडायची वेळ आली. खेळ सुरू असताना तुम्ही आम्हाला भरभरुन प्रेम दिलं, प्रोत्साहन दिलंत. आज तुमच्या प्रेमाची आठवण सोबत घेऊन परत जायची वेळ आली आहे. लोभ आहेच तो वाढू द्या...

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

16 Jan 2017 - 5:05 pm | पद्मावति

क्या बात है! मस्तच.

सई कोडोलीकर's picture

16 Jan 2017 - 6:18 pm | सई कोडोलीकर

अरे वा! प्लेजंट सरप्राईज. नव्या मेजवानीबद्दल धन्यवाद.

यशोधरा's picture

16 Jan 2017 - 6:18 pm | यशोधरा

हां, आता ठीक झालं. मस्तच सुरुवात झाली आहे उपक्रमाची.
११४६ वाचने!

आनंदयात्री's picture

16 Jan 2017 - 8:12 pm | आनंदयात्री

अरे वा आम्हा वाचकांना मेजवानी आहे हि लेखमाला. धन्यवाद.

वरच्या लेखनाच्या फॉरमॅटसाठी वापरलेली css मिपाच्या css शी कान्फ्लिक्टिंग आहे, ती दुरुस्त करावी हि विनंती.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Jan 2017 - 9:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं सुरुवात. चला लौकर येउंद्या!

ज्योति अळवणी's picture

16 Jan 2017 - 11:03 pm | ज्योति अळवणी

मुखपृष्ठ आणि त्यामागची संकल्पना दोन्ही आवडले

कंजूस's picture

17 Jan 2017 - 7:02 am | कंजूस

दिवाळी अंक आणि टिव्हि चानेल्सवर या मुलाखतींचा सतत भडिमार होतच असतो.

लाल टोपी's picture

17 Jan 2017 - 9:16 am | लाल टोपी

अतिशय उत्तम उपक्रम! असे काही उपक्रम पाहिले की मिपाकर असल्याचा अभिमान वाटतो.

ग्रेंजर's picture

17 Jan 2017 - 5:05 pm | ग्रेंजर

+111

विशाखा पाटील's picture

17 Jan 2017 - 11:46 am | विशाखा पाटील

छान उपक्रम! अभिनंदन!

प्रीत-मोहर's picture

17 Jan 2017 - 12:31 pm | प्रीत-मोहर

मस्त!! आता एकेक वाचायला घेते निवांत. ह्या उपक्रमात सहभाग घ्यायची इच्छा होती. परत कधीतरी लिहेन्च ते. :(

बाजीप्रभू's picture

17 Jan 2017 - 12:40 pm | बाजीप्रभू

आवडलं!!

स्मिता.'s picture

17 Jan 2017 - 4:07 pm | स्मिता.

गोष्ट तशी छोटी हा उपक्रम माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच यशस्वी झालाय! दृष्टिआडच्या फार मोठ्या सृष्टिची त्यातून ओळख होतेय. लेखमालेत येणार्‍या नननवीन लेखांवर डोळा ठेवून बसलेय. लेख आला की फडशा पाडणं चालू आहे :)
या उपक्रमाशी निगडीत सर्व सदस्यांचं अभिनंदन!!

या अनुक्रमणिकेतल्या लेखांच्या नावावर क्लिक केल्यास त्या लेखावर जाता आले पाहिजे, असे सुचवतो.

एस भाऊ, तुम्ही वेब एलेमेंट वर कुठे ही क्लिक केलं तरी धागा उघडेल - यात लेखांचं नाव देखील आलं. पण तसं होत नसेल तर मात्र काही तरी अडचण आहे. काल तुम्ही हे म्हणल्यावर मी बर्‍याच वेगवेगळ्या डिव्हाईसेस वरुन तपासून पाहिलं .. प्रत्येक वेळी शिर्षकाजवळ क्लिक करुन धागा उघडतो आहे. तुम्हाला ती अडचण येते आहे काय? वेल्लाच्या एका जुन्या मशिन वर हा धागा हवा तसा दिसत नाही. तुम्हाला टाईल्स दिसतायेत ना प्रत्येक लेखासाठीच्या? की नुसतं टेक्स्ट दिसतंय?

तसं फक्त पुष्कर श्रोत्रींच्या मुलाखतीच्या धाग्यावर होतंय. बाकीचे धागे उघडत नाहीत टॅब वर क्लिक करून.

आता दिसताहेत धागे क्लिक केल्यावर. धन्यवाद!

गवि's picture

17 Jan 2017 - 5:01 pm | गवि

दमदार मटेरियल आणि उत्कृष्ट मांडणी.

क्युडोस... !!

सामान्य वाचक's picture

17 Jan 2017 - 9:04 pm | सामान्य वाचक

आणि मस्त जमलं पण आहे

उत्तम उपक्रम!! सावकाश वाचेन/ बघेन.

अप्रतिम! ! अनुक्रमणिकेपासुन लेखांपर्यंत सगळच सर्वोत्तम.लेख वाचते आहेच.

अप्रतिम! ! अनुक्रमणिकेपासुन लेखांपर्यंत सगळच सर्वोत्तम.लेख वाचते आहेच.

अप्रतिम! ! अनुक्रमणिकेपासुन लेखांपर्यंत सगळच सर्वोत्तम.लेख वाचते आहेच.

अप्रतिम! ! अनुक्रमणिकेपासुन लेखांपर्यंत सगळच सर्वोत्तम.लेख वाचते आहेच.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jan 2017 - 11:50 pm | अत्रुप्त आत्मा

लै आवडले.

संदीप डांगे's picture

18 Jan 2017 - 8:39 am | संदीप डांगे

हा उपक्रम सर्व कौतुकांच्या लक्षावधी योजने पुढे आहे. न भूतो न भविष्यति असा उर्ध्वगामी प्रकार करुन ठेवलाय तुम्ही लोकांनी....

स्पेष्यल छ्ब्बीसमधला डॉयलॉग 'सृजा आणी पिरासाठी' थोडा बदलूनः "कहने को तो तुम दो ही हो, पर पूरा उधम मचाये रक्खे हो!"

सर्व लेखांवर सवडीने प्रतिक्रिया देईन. आणि सर्व वाचनमात्र सदस्य आयडींना नम्र विनंती, कॄपया प्रतिसाद द्या. ३० हजार सदस्य आहेत असं आपण म्हणतोय. प्रत्येक लेखावर दिसू द्या....

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Jan 2017 - 10:25 am | कैलासवासी सोन्याबापु

स्रुजा ताई पिरा ताई अन समस्त गोष्ट टीम चे मनःपूर्वक अभिनंदन! हि मालिका असली अस्सल झाली आहे का ज्याचे नाव ते. इतक्या सुंदर मालिकेचा मला एक भाग होता आले नाही हे दुःखद आहे अन ते सतत जाणवणे (मलाच) ह्या लेखमालेचे एक बलस्थान आहे असेच म्हणतो. :)

हेच बोल्तो. इच्छा असूनही भाग घेणे शक्य झाले नाही याचे दु:ख आहेच. :(

सस्नेह's picture

18 Jan 2017 - 1:27 pm | सस्नेह

फारच मस्त अभिनव उपक्रम. मला व्यापामुळे या प्रकरणाचा अभ्यास करून सहभाग घेता आला नाही याबद्दल खेद वाटतोय.

फारच नितांतसुंदर उपक्रम.. फार आवडले सारेच लेख. व्हिडीओ अजून पहायचे आहेत. सर्वांचेच हार्दिक अभिनंदन. इतके उत्तम कंटेंट आम्हा मिपाकरांपुढे आणण्यासाठी किती श्रम पडले असतील याची केवळ कल्पनाच करू शकतो. पुन:श्च स्रुजाताई, पिराताई, सर्व सहभागी लेखक आणि सर्वच मिपाकरांचे अभिनंदन.

पूर्वाविवेक's picture

19 Jan 2017 - 12:43 pm | पूर्वाविवेक

फारच सुंदर उपक्रम. सहभागी सर्वांचेच हार्दिक अभिनंदन.
माझ्या दुसऱ्या व्यापांमुळे यासाठी लिहिलेला लेख अपूर्ण राहिला. :(

तांत्रिक बाबींमधे फारच कच्चा असल्याने आधी हो म्हणूनही नंतर प्रत्यक्ष व्हिडीओ / दृक माध्यमात काहीच करता आलं नाही. क्षमस्व.
मी नुसताच खूप विचार केला. बनवायला जमलं नाही.

तुम्ही खरोखर सुंदर उपक्रम केलात. पुन्हा एकदा प्रचंड कौतुक.

नंदन's picture

19 Jan 2017 - 4:24 pm | नंदन

'त्याच चर्चा, तेच विषय आणि तीच हाणामारी' असे निव्वळ नि:श्वास टाकत न बसता; सातत्याने, उत्साहाने आणि नवनवीन सदस्यांच्या सहभागाने रंगणारे निरनिराळे उपक्रम हे मिपाचं वैशिष्ट्य आहे. त्याच मांदियाळीत हा विशेषांकही शोभून दिसणारा आहे. चलत्-चित्रणाच्या संग्राह्य आणि माहितीपूर्ण लेखापासून वाचायला सुरुवात केली आहे; आता बाकीचेही निवांत वाचेन.

सुरेख प्रवास सुरू आहे या उपक्रमाचा.. बरेच दिवस पुरणारा खजिना मिळाला आहे.

स्रुजा, पिरा, वेल्लाश्री, एसराव, सर्व संयोजकांचे आणि भाग घेतलेल्या सर्वांचे भरपूर आभार..!!

हे लेख साकारताना आलेले मजेशीर अनुभव, अचानक सुचलेल्या कल्पना असे सगळे एकत्र करून या उपक्रमाबद्दल तुम्ही सर्वांनी एक एक लेख लिहावा अशी आग्रहाची सुचवणूक..!!

अतिशय सुरेख !! सर्व सहभागी मंंडळींंनी ही एक सर्वांंगसुंंदर भेट वाचकांंसाठी सादर केली आहे. पिलियन रायडर आणि स्रुजा यांंचे खास अभिनंंदन.

सई कोडोलीकर's picture

24 Jan 2017 - 4:36 pm | सई कोडोलीकर

किती, काय काय आणि कधी वाचायचं अशी परिस्थिती झाली आहे ह्या उपक्रमामुळे. संबंधीत सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद आणि आभार. सावकाश, निवांतपणे वाचणार आहे एकेक.

ग्रेंजर's picture

25 Jan 2017 - 1:11 pm | ग्रेंजर

अगदी हेच म्हणते :)

ज्योति अळवणी's picture

29 Jan 2017 - 7:40 pm | ज्योति अळवणी

अप्रतिम! दुसरा शब्दच नाही.

दीपा माने's picture

1 Feb 2017 - 4:50 am | दीपा माने

मिपाकरांच्या बुध्दीला योग्य प्रकारे चालना दिल्यावर किती अमोल साहित्य रूप घेऊ शकते हे केवळ आत्ताच वाचलेल्या प्रतिसादातून कळाले. अजून लेख वाचायचे आहेत. प्रतिसाद नंतर देईनच. सर्व मिपाकर संयोजक आणि लेखकांचे मन:पुर्वक आभार!

पिलीयन रायडर's picture

4 Mar 2017 - 8:50 am | पिलीयन रायडर

सर्वांचेच आभार!!

(एक चाचणी करायला हा प्रतिसाद टाकत आहे.)