विंगेत गलबला - कट्यार मिपावर अवतरली हो !!!

Primary tabs

स्रुजा's picture
स्रुजा in लेखमाला
24 Jan 2017 - 9:29 am

जगभरात हिंदी सिनेमे वितरित होणं ही नवीन गोष्ट नाहीये. भारतात दणकून आपटलेले सिनेमेसुद्धा 'ओव्हरसीज' गल्ल्यांवर आपापल्या निर्मात्यांचे पांग फेडतात! हिंदी अजिबात न कळणारा प्रेक्षकदेखील चकाचक कपडे, घरं , आपल्यासारख्यांच्या पाचपन्नास लग्नांचा खर्च निघेल अशी मोठमोठाली लग्नं वगैरे बघून भारताबद्दल गैरसमज करून घ्यायला आवर्जून जातात. मराठी प्रेक्षक मात्र यात आपली अभिजात मराठी आवड आणि भूक म्हणावी तशी आणि तेवढ्या प्रमाणात भागवू शकत नाही, ही खंत मला वाटतं प्रत्येक परदेशी मराठी माणसाच्या मनात कुठे ना कुठेतरी असतेच. त्यातही अजरामर दंतकथा बनलेलं 'कट्यार'सारखं शिवधनुष्य जेव्हा सुबोध भावेसारखा खतरनाक माणूस उचलून त्याला सिनेमाचा चाप लावतो, तेव्हा तर "च्यामारी! आता भारतवारी प्लान करायला हवी" म्हणून माझ्यासारखे अनेक जण बॅगा भरायला घेतात. पण कालातीत ठरलेली ही मराठमोळी कलाकृती स्थळाच्या बंधनाला काय भीक घालणार? कट्यारने रंगभूमीवरून पडद्यावर आगमन केलं, तेच मुळी झोकात! फक्त भारतातच नाही, तर जगभरातल्या प्रेक्षकांच्या काळजात घुसून खर्‍या अर्थाने ती 'लार्जर दॅन लाइफ' झाली. महेश काळे, पूर्वा गुजर-काळे आणि त्यांच्या आधुनिक गुरुकुलने ( आयसीएमए फाउंडेशनने) हा अद्भुत प्रकार घडवून आणला आणि आमच्यासारख्या लोकांना आपापल्या शहरात कट्यार सिनेमागृहात पाहायचं भाग्य लाभलं.

गोष्ट पडद्यावर अवतरली की तिथे तिचा प्रवास संपत नाही. प्रेक्षकांच्या जवळच्या पडद्यावर ती 'दिसणं' महत्त्वाचं.. त्याशिवाय ती मुक्कामी पोहोचणार कशी? तीन पिढ्या झाल्या, आजही सुसंगत आणि सदाबहार असलेलील्या कट्यारसारख्या गोष्टीने तिच्या मुक्कामी जाताना आणि पोहोचल्यावरदेखील संपर्कात आलेल्या प्रत्येकाला झळाळून सोडलं - प्रेक्षक तर अक्षरशः न्हाऊन निघाले! एका एका वीकांताला उत्तर अमेरिकेत ३०-३० शहरं गाजवण्याची कट्यारची पुण्याई होतीच... गंगा स्वर्गातून पृथ्वीवर यायचीच होती.. पण भगीरथाशिवाय नाही! कट्यारच्या आणि प्रेक्षकांच्यादेखील भाग्याने तिला पूर्वा काळे, महेश काळे आणि सुबोध भावे यासारख्या भगीरथांनी वाट काढून दिली आणि या गंगेच्या दर्शनाने मराठी प्रेक्षक धन्य झाला.

फक्त भारतीयच नाही, तर ज्या परदेशी नागरिकांनी कट्यार पाहिला, तेदेखील सिनेमा पाहून भारावून गेले होते.

कट्यारच्या परदेशातील वितरणासंबंधी आणि आयसीएमएच्या इतर कामासंदर्भात पूर्वा गुजर-काळे यांच्याशी गप्पा मारायचा योग आला. ती मुलाखत त्यांच्याच शब्दात इथे देत आहे. बोजड मराठी शब्द टाळायचा मुद्दाम प्रयत्न केला आहे आणि होता होईल तो त्यांच्याच भाषेत आहे तशी उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे.

स्रुजा: कट्यारच्या स्क्रिनिंगचा माझा आणि आमच्या कमिटीचा अत्यंत सुखद आणि सुंदर अनुभव होता. फार समृद्ध करून गेला हा अनुभव आम्हाला.. आणि मला वाटतं ज्या वीकांताला तो कॅनडामध्ये प्रदर्शित झाला त्या वीकांताला कॅनडा आणि अमेरिका मिळून एकूण ७० स्क्रीनिंग झाले होते?

हो, तो म्हणजे ६ - ७ डिसेंबरचा वीकांत आमच्यासाठी फार मोठा आणि महत्त्वाचा वीकांत होता. एकूण ३० शहरांमध्ये तो त्या दोन दिवसात तो दाखवला गेला, ७० शोज झाले. आम्ही ते काही दिवस २४ तास काम करत होतो. "ऑन कॉल" असल्यासारखं सगळं वातावरण होतं, जिथे तिथे युद्धघाई! कुठे काही कमी पडू नये म्हणून आमची धावपळ चालू होती. आणि मला अजूनही आठवतंय मी सुबोधला मेसेज पाठवला की आज आणि उद्यामध्ये ३० शहरांमध्ये कट्यारचे ७० शोज आहेत तेव्हा त्याला एक क्षणभर वाटलं की मी काही तरी चुकीचं टाईप केलंय. आणि त्याचा पुढच्याच क्षणी मला फोन आला. आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर तो इथे प्रदर्शित करू असं त्यालाही वाटलं नव्हतं. पण मला वाटतं की मुळात कलाकृतीच इतकी सशक्त जेव्हा असते तेव्हा हे असे चमत्कार घडून येतातच. शिवाय कट्यारच्या बाबतीत लोकांचा खूप रेटा होता. भरपूर मागणी होतीच , आयसीएमए ची भूमिका ही त्या मागणीची, त्या मार्केटची गरज पाहून सुविधा उपलब्ध करून देण्याची होती. वुई वेअर द एनेबलर्स इन धिस ईक्वेशन. खरं काम सुबोधने आणि त्याच्या टीमने अफलातून केलं होतं! वितरण करताना कधी कधी तुम्हाला "मागणी" येण्यासाठी बाजारात तशी पूर्वपीठिका करावी लागते. कट्यारची ही पूर्वपीठिका आम्हाला बनवावीच लागली नाही इतकं सुंदर काम सुबोध आणि त्याच्या क्रिएटिव टीम ने केलं होतं. लोकांची प्रचंड मागणी होती, आम्ही फक्त लागेल ती मदत केली आणि कट्यारला लोकांपर्यंत पोहोचवलं.

a

स्रुजा: पण मग ही मागणी तुमच्यापर्यंत कशी पोहोचली? मुळात "कट्यार"चं उत्तर अमेरिकेत स्क्रीनिंग करायचं हे कधी आणि कसं ठरलं?

महेश ( काळे) आधीपासून कट्यारशी संबंधित होताच. सूरसंगम नंतर आपल्याकडे शास्त्रीय संगीतावर आधारीत सिनेमा ही आलाच नव्हता. त्या पार्श्वभूमीवर कट्यार येतो आहे असं जेव्हा लोकांना कळलं तेव्हा सगळीकडे आपोआपच एक उत्साहाचं वातावरण तयार झालं. आयसीएमएचं काम देखील शास्त्रीय संगीताला समर्पित आहे. आज शास्त्रीय संगीताचं माझ्यामते थोडं व्यावसायिकीकरण झालंय पण आयसीएमएसाठी आजही शास्त्रीय संगीत हे एक जीवनमूल्य आहे. त्यामुळे कट्यारचं स्क्रीनिंग निदान बे एरिया मध्ये तरी करावं अशी खूप इच्छा होती. सुरुवातीला आम्ही काही मोठ्या मराठी मंडळांना आपणहून विचारलं होतं आणि त्यांनी ताबडतोब स्क्रीनिंगची प्राथमिक तयारी सुरू देखील केली. भारतात आणि अमेरिकेत बे एरियामध्ये कट्यार एकाच दिवशी प्रदर्शित झाला. आजवर मराठी सिनेमा अमेरिकेत भारतात एकत्र या आधी कधीच प्रदर्शित झाला नव्हता. जे सिनेमे इथे यायचे ते २-२ महिने उशिरा यायचे पण कट्यार मात्र त्याच दिवशी आला!
अनायासे दिवाळी होती. आम्ही फराळ मागवला होता चितळ्यांचा . ए - एम - सीच्या सगळ्यात मोठ्या स्क्रीनचं बुकिंग केलं होतं. तिथे आम्ही २ शोज केले त्या दोन दिवसात. त्यांनी पण आम्हाला एक वेगळा, फक्त आमच्यासाठीचा रस्ता आणि गेट दिलं. तो आम्ही पणत्या, रांगोळ्या काढून सजवला. लोकं पैठण्या नेसून, ठेवणीतले कपडे घालून आले होते. ए एम सी मध्ये असा अगदी खास भारतीय सणासुदीचं वातावरण लोकांनी कधी पाहिलं नव्हतं आणि त्या दिवशी सलमान खानचा प्रेम रतन धन पायो पण रिलीज झाला होता आणि हंगर गेम्स पण! त्यामुळे मोठी स्क्रीन मिळवायला पण सुरुवातीला अडचणी आल्या. ते लोकं देखील आम्हाला ही स्क्रीन द्यायला तयार नव्हते पण आम्ही ती मिळवली आणि स्क्रीनिंगच्या दिवशी जो काही जल्लोष, आनंद सोहळा झाला, तो बघून थिएटरवाले पण थक्क होते. पण आम्हाला हे करायचंच होतं आणि शेवटी ते कट्यारचंच यश आहे. या सोहळ्याने कट्यार एक "अनुभव" बनला.

अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट झाली ती म्हणजे बे एरिया मधले भारतीय अमराठी आणि अमेरिकन प्रेक्षक शास्त्रीय संगीत ऐकायला, महेशचं नाव माहिती होतं म्हणून आले आणि ते सिनेमा बघून अक्षरशः भारावून गेले. त्यांनी बाहेर जाऊन सिनेमाचं भरभरून कौतुक केलं आणि त्यानंतर मागणी प्रचंड वाढली! ती मागणी कट्यारच्या अप्रतिम संगीतामुळे, मूळ कथेच्या उंचीमुळेच निर्माण झाली होती. बातमी पसरत गेली आणि आम्हाला आजूबाजूच्या छोट्या मोठ्या मंडळांकडून आपणाहून चौकशीचे ईमेल्स , फोन्स यायला लागले. मग आम्ही देखील झडझडून कामाला लागलो. आजूबाजूच्या शहरांत जसजसे शो व्हायला लागले तसे त्यांच्या आजूबाजूची शहरं पण आम्हाला संपर्क करायला लागली. आयसीएमए प्रत्येक शो नंतर फेबु वर, ट्विटर वर टॅग होत होतं. त्याने लोकांना कुणाला विचारायचं हे चटकन कळायला लागलं. आणि आयसीएमएची भूमिका पहिल्यापासून सुस्पष्ट होती. जास्तीत जास्त लोकांपर्यंत - मग त्यांचा किती ही छोटा ग्रुप असला तरी - कट्यार पोहोचला पाहिजे. आणि लोकांना केंद्रस्थानी ठेवूनच आम्ही आमची पूर्ण योजना आखली.

स्रुजा : कट्यारच्या स्क्रिनिंगच्या वेळी प्रकर्षाने जाणवलेला मुद्दा म्हणजे अतिशय व्यावसायिक ( प्रोफेशनल) आणि बारीक सारीक गोष्टींचा विचार करून केलेलं नियोजन! त्याबरोबर तुमची वैयक्तिक आणि भावनिक गुंतवणूक छोट्या मोठ्या शहरांना स्क्रिनिंगचा एक सुंदर अनुभव देत होती.

याचं श्रेय आमच्या सगळ्या टीमला जातं. खुप समर्पित आणि आपापल्या क्षेत्रात अत्यंत हुशार आणि यशस्वी असलेले लोकं आमच्या टीम मध्ये होते / आहेत. डॉल्बीमध्ये सिनेमा टेक्नॉलॉजीवर मी स्वतः गेली १२ वर्षे काम करते. माझी इतरही टीम ही तांत्रिक क्षेत्रातलीच आहे. डिजीटल सिनेमा पॅकेजिंग ( डी सी पी हार्ड डिस्क्स) मध्ये आम्ही कट्यार आणायचा ठरवला कारण ब्लु रे मध्ये कम्प्रेसिंग वापरलं जातं. ४ जीबीचा ब्लु रे मधला सिनेमा आणि डी सी पी चा ३०० जी बीचा सिनेमा यात क्वालिटीमध्ये निश्चितच फरक पडतो. आणि आम्हाला तिथे अजिबात तडजोड करायची नव्हती. दुसरं म्हणजे याच्यात डिजीटल सिनेमा इनिशिएटिव्हला कम्प्लायंट असल्याने पायरसीला आपोआप आळा बसला होता. त्या मध्ये आम्ही प्रत्येक प्लेलिस्ट साठी एक एक केडीएम की होती त्याने देखील एन्क्रिप्शनची सुरक्षा पातळी वाढली. आम्ही शक्य तेवढी सगळी प्रोसेस ऑटोमेट केली होती. एकूण भारतीय सिनेमांची पायरसी लक्षात घेता आम्हाला चुकांना वाव द्यायचा नव्हता आणि स्क्रीनिंग क्वालिटी मध्ये पण तडजोड नको होती. आणि मंडळातली लोकं, जी स्क्रीन करत होती, त्यांना शेवटापर्यंत हे होईल की नाही याचा ताण नको म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी चाचणी करवून घेतली. आमच्याकडचं काम त्याने वाढलं पण आमचा मुख्य उद्देश्य स्थानिक स्क्रिनिंग टीमचा अनुभव ताणविरहित करणे हा होता.

स्रुजा: हो, पण ७० शोज २ दिवसात म्हणजे तेवढ्या चाचण्या पण झाल्या असणार!

हो ते मात्र झालं पण आम्ही एक एक जण एका एका कामाला समर्पित होतो. आणि ते बरंच झालं कारण बर्‍याच छोट्या मंडळांना सिनेमागृहांकडून त्रास झाला. हेतुतः नाही पण माहिती निम्मीच पाठवली गेली, कधी चुकीची पाठवली गेली. बरं ही तांत्रिक माहिती केडीएम कीज एनेबल करायला, डी सी पी सुरू करायला अत्यंत गरजेची होती. त्यामुळे चाचणीत काही गडबड झाली की आम्हाला इकडून ते नियंत्रित करणं आणि ऐन शोच्या वेळेस ते टाळणं शक्य व्हायचं.
आणि आमच्यासाठी देखील तो एक छान अनुभव होता. खूप काही शिकायला मिळालं त्यातून. तसं आम्ही बे एरिया मध्येच मर्यादित काम आजवर करत आलो पण वेगवेगळ्या शहरातली माणसं भेटली, त्यांच्याशी संपर्कातून अजून काही नवीन कळलं. एकूणच काम करताना फार मजा आली !

स्रुजा: मला वाटतं स्क्रिनिंग करणार्‍या छोट्या मंडळांचा अनुभव देखील अतिशय सुंदर होता. छोट्या ग्रुपसाठी (१००-१५०) , ते ही एकच शोसाठी थिएटर बुक करणार्‍यांना सिनेमागृहाचे मालक फार गांभीर्याने घेत नव्हते. यापूर्वी आलेल्या हिंदी निर्मात्यांच्या काहीशा उर्मट अनुभवाचीही त्याला पार्श्वभूमी होती. पण मला आठवतंय एका क्षणी सिनेमा स्क्रीन होईल की नाही असे तांत्रिक मुद्दे आम्हाला अडवायला लागले होते त्यामुळे आमची थोडी धावपळ झाली. पण त्याच सुमारास तुमच्या फाउंडेशनकडून आम्हाला फोन आला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची धावपळ होते आहे आता पण सिनेमा सुरू झाला की तुम्ही आयोजक सगळं विसरून सिनेमा नक्की एन्जॉय करा. कारण बर्‍याचदा आम्ही पाहतो की आयोजकांनाच इतर व्यापांमुळे सिनेमा नीट पाहता येत नाही. पण तुम्ही असं करू नका आणि तांत्रिक बाबींचा ताण तर मुळीच घेऊ नका. आम्हाला तिकडे विमानाने येऊन तुम्हाला सिनेमाची कॉपी द्यावी लागली तरी चालेल पण सिनेमाचा शो तुमच्याकडे ठरल्या दिवशी होणारच! आमच्यासाठी हा अतिशय हृदय अनुभव होता.
एवढंच नाही तर स्क्रिनिंग पूर्ण झाल्यावर आमच्या शहरातल्या सिनेमागृहाने काही नियम आपणाहून शिथिल केले, एकूण प्रोसेस बघून त्यांचा आविर्भाव बदलला होता, ही मला वाटतं तुमच्या टीमच्या व्यावसायिकतेला मिळालेली दाद होती !

अरे वा! फोन करणारा नक्की भास्कर रानडे असणार. महेश कायम म्हणतो अगदी छोटं काम हाती घेतलं तरी ते कसंही करावं असं नाही. त्यातही चांगल्या पद्धतीने करायला हरकत नाही. मला सिनेमा सिस्टिमची माहिती होतीच पण जमलेली टीम देखील तळमळीने काम करत होती. कट्यारची स्केल इतकी मोठं असण्याचं प्रमुख कारण हे चित्रपटातील कलाकारांची तळमळ तर आहेच पण त्याकेह्रीज सोशल मीडियाचा वापर हे ही आहे. सुबोध, महेश आणि झी च्या निखिल सानेंनी या संदर्भात लागेल ती मदत केली. पूर्ण विश्वासाने त्यांनी आय सी एम ए ला काम करू दिलं. शिवाय अमेरिकेतून - प्रतिभा आठवले आणि भास्कर रानडे ह्यांनी झोकून देऊन काम केले. त्यांच्या अत्यंत बिझी कामातून त्यांनी इकडे जे योगदान दिलं त्याला तोड नाही.
आणि कट्यार आज ही किती सुसंगत आहे बघ. कट्यारच्या स्क्रिनिंगसाठी आम्हाला एका शहरातून ३ वेगवेगळ्या मंडळाकडून फोन आला. आम्ही स्थानिक भांडणांमध्ये पडायचं नाही हे ठामपणे ठरवलं होतं. आम्ही तुमच्या शहरात एका बॅनरखाली शो करू असं सांगितल्यावर तीन एकमेकांशी अजिबात न पटणार्‍या संस्था एकत्र आल्या आणि पुढे जाऊन त्यांनी एकत्र संस्था स्थापन केली. एका चांगल्या उद्देश्यासाठी दोन भिन्न मतप्रवाह एकत्र येणं ही कट्यारची फिलॉसॉफी ! ते कट्यारचं तत्त्वज्ञान असं प्रत्यक्षात घडताना पाहणं हा अनुभवच वेगळा होता. जिथे लहान संस्था होत्या तिथे लोकांनी पदरचे पैसे घालून कट्यारचा शो केला. आणि त्यांतून मिळालेला नफासुद्धा आयसीएमएला देऊ केला! एक आजी खास कट्यारसाठी घराबाहेर पडल्या होत्या खूप दिवसांनी. मायनस २२ मध्ये विंडचिल असताना, पार्किंगची जागा मिळेल की नाही हे नक्की नसतानाही पाऊण तास आधी लोक येऊन बाहेर थांबले होते - केवळ सिनेमाची सुरवात चुकवायची नाही म्हणून!

स्रुजा : हे सगळं घडवून आणायला टीम पण तशीच लागते! अशी टीम जमवणं हे देखील आय सी एम एचं एक यशच आहे.

हो, खरंय. आमची टीम मोठी आहे बरीच आणि खूप स्वयंसेवक मनापासून , उत्साहाने अगदी भरघोस योगदान देतात. आयसीएमए उभीच राहिली मुळात शास्त्रीय संगीताचं संवर्धन करण्यासाठी. We want to preserve , nurture and celebrate Indian classical music.. शास्त्रीय संगीताला अजूनही मुख्य प्रवाहात म्हणावं तितकं स्थान नाहीये, ते मिळवून देण्यासाठी आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत राहतो. आणि महेश बद्दल इथे मी बोलेन कारण मुळात सुरुवात तिथूनच होते. हे सगळे स्वयंसेवक महेशचे विद्यार्थी आहेत. आम्हा दोघांना शास्त्रीय संगीताबद्दल मनापासून आस्था आहे , त्याचा प्रचंड ध्यास आहे. महेश इथे शिकवतो, आणि इथे खूप सक्रिय विद्यार्थी मिळतात देखील. आमच्या घरात सगळीकडे गाण्याचा रियाज चालू असतो, लोकं नवीन कार्यक्रमाच्या नियोजनात गुंतलेले असतात . आमच्या घराला एका गुरुकुलाचं रूप त्यामुळे आलंय. जवळ जवळ १५० लोकांची टीम आहे. प्रत्येक जणाचा सहभाग वेगळ्या स्वरूपाचा, वेगवेगळ्या कार्यक्रमात असतो. कुणी संगीतात , कुणी तंत्रज्ञानात, कुणी कुठल्या धर्मदाय संस्थेसाठीच्या कार्यकमात असं योगदान देतो. आमच्याकडे एक युथ क्वॉड आहे त्यांनी महेशच्या एका निरोपावर स्वतःच्या प्रेरणेने गाण्याचे फार्मर्स मार्केट मध्ये, रस्त्यावर शोज करून ५-१० हजार डॉलर्सची देणगी नेपाळच्या भूकंपग्रस्तांना दिली होती. अशा खूप गोष्टी चालू असतात, आयसीएमएच्या टीम कडून. शास्त्रीय संगीत या सगळ्याचा गाभा आहे.

स्रुजा: आय सी एम ए चे पुढचे प्रकल्प काय असणार आहेत? कट्यारच्या घवघवीत यशानंतर बाकी सिनेमांच्या वितरणाच्या काही योजना आहेत का?

जरूर. काही जुळून आलं तर जरूर मनावर घेऊ. पण आयसीएमए चं मुख्य काम - जे शास्त्रीय संगीताचं संवर्धन - ते अजून जोमाने करायच्या योजना आहेत. आणि आमच्या मते कुठलीही गोष्ट संवर्धन करून ठेवायची असेल तर ती वाहती हवी - काळाशी सुसंगत हवी. याचं एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी बरोबर एक " साँग ऑफ द डिव्हाईन " नावाचा कार्यक्रम केला होता. दोन भिन्न संस्कृती एकाच रंगमंचावर आल्या - महेश काळे आणि स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीची संगीत प्राध्यापक अ‍ॅना शुल्ट्झ ने तो कार्यक्रम सादर केला. महेशच्या कीर्तनाच्या कार्यक्रमात तिने सूत्रसंचालन केलं होतं. आणि भारतीय - अभारतीय लोकांचा त्या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आम्ही हौशेने कीर्तनाचा कार्यक्रम म्हणून उपस्थित भारतीयांना बुक्का लावला. अभारतीय लोकांना मात्र आवडेल न आवडेल म्हणून आम्ही आधी आपण हून लावत नव्हतो. पण ते आमच्या स्वयंसेवकांना हाका मारायला लागले. आम्हाला ही लावूनद्या असं आग्रहाने सांगायला लागले. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात गं पण त्यांनी वीण घट्ट होत जाते.

महेश स्टॅनफर्ड मध्ये संगीतावर लेक्चर्स पण देतो. आयसीएमए "मीलान्ज बाय द बे" नावाचा एक कार्यक्रम आम्ही एशिया वीक मध्ये करतो. त्याला ही भारतीयांबरोबर अ भारतीयांची लक्षणीय उपस्थिती असते. मुख्य प्रवाह किंवा काळाशी सुसंगत मी जे म्हणते ते हेच.

स्रुजा: आयसीएमए साठी काही मदत करायची असेल किंवा स्वयंसेवक म्हणुन काम करायचं असेल तर आम्ही काय करू शकतो?

तुम्ही व्हर्चुअली आमच्या कामात नक्कीच सहभागी होऊ शकता. आयसीएमए चा एक स्कॉलरशीप प्रोग्राम आहे. होतकरू संगीत विद्यार्थ्यांचा खर्च आम्ही त्याद्वारे उचलतो. यासाठी असे विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करू शकतात. या कामाची व्याप्ती वाढवायची असेल तर आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणाच्या कम्युनिटीजची गरज आहेच. पैसे हा फक्त एक भाग झाला पण वेळ देऊ शकणे तुमचा ही आमच्यासाठी सर्वात जास्त मदत असेल. उदाहरणार्थ आमचं एक अ‍ॅप येतंय - तुम्ही आम्हाला ते टेस्ट करायला मदत करू शकता. ते डेव्हलप करायला टेस्ट करू शकता. अशा अनेक समांतर चळवळी चालू असतात त्यात तुमच्या वेळेची आम्हाला नितांत गरज आहे.

नक्कीच करु. माझी खात्री आहे तुमच्या या संगीत दिंडीत सहभागी होण्यासाठी प्रत्येक मराठी - भारतीय माणुस आनंदाने तयार होईल. तुमचे आभार मानून मी औपचारिकता पाळणार नाही. इतक्या विलक्षण अनुभवासाठी मी आणि आमचे वाचक तुमच्या , महेश काळेच्या आणि आयसीएमए फाऊंडेशनच्या ऋणातच राहू इच्छितो.

मराठी संगीत नाटकाचं एक सुवर्णयुग रंगभूमीवर येऊन गेलं . आजही ते मराठी मनाला भुरळ घालतं, आजही ते "मराठी"पणाचं एक अविभाज्य अंग आहे. उच्च आणि अभिजात अभिरुचीचं आजही लागू असलेलं ते एक मापटं ! जुन्या वैभवाच्या आठवणीने सुस्कारे सोडायचे की काळाच्या कोंदणात त्याचं रूप नव्याने खुलवायचं हे आपणच ठरवायचं. काळे दांपत्य आणि आयसीएमए फाऊंडेशन दिमाखात आपलं गतवैभव अंगाखांद्यावर मिरवतंय. या नव्या साजात, नव्या आवाजात त्याचं मुळ खानदानी सौंदर्य प्रसन्नपणे हसतंय. देश प्रदेशाच्या सीमारेषा त्याने सहजपणे ओलांडल्यात. कट्यारसारख्या पिढीजात वारशाला जेंव्हा आधुनिक तंत्रज्ञानाची अमोघ जोड मिळते तेंव्हा पुढच्या अजुन काही पिढ्यांना मुळांशी जोडणारा जीवनरस तयार होतो. कोण म्हणतं आपल्या परंपरांना आज किंमत नाही? आपल्या मुलांना त्यांच्या मातीची ओढ नाही. आपली माती, आपल्या परंपरा आज स्थळ - भाषा - काळाची बंधनं तोडून त्यांच्या मुला नातवंडांसाठी नवनवीन क्षितिजं पादाक्रांत करायला सज्ज आहेत. आपण फक्त खुल्या मनाने त्यांना आवाज द्यायचा आहे.

प्रतिक्रिया

पैसा's picture

24 Jan 2017 - 12:54 pm | पैसा

मुलाखत आवडली.

पहिला व्हिडिओ डाउनलोड लिंक, file size 6.5 MB, High quality

दुसरा व्हिडिओ डाउनलोड लिंक, file size 30 MB, High quality

Video डाउनलोड करून पाहिले.
मुलाखत आवडली.

पद्मावति's picture

24 Jan 2017 - 2:19 pm | पद्मावति

वाह, मुलाखत फारच आवडली. मस्तं.
ओटावा मराठी मंडाळाचा वीडियो पण खूप आवडला.
परदेशात आपल्या भाषेशी, चित्रपटाशी नाते टिकवून ठेवण्याची धडपड खरोखर कौतुकास्पद आहे.

एस's picture

24 Jan 2017 - 2:40 pm | एस

मुलाखत आवडली.

छान झलिये मुलाखत.विडियोपण आवडला.

यशोधरा's picture

24 Jan 2017 - 5:52 pm | यशोधरा

झकास झाली आहे मुलाखत!

विशाखा राऊत's picture

24 Jan 2017 - 9:23 pm | विशाखा राऊत

खुप छान मुलाखत.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jan 2017 - 9:56 pm | अत्रुप्त आत्मा

छान मुलाखत आहे.

कौशी's picture

25 Jan 2017 - 3:44 am | कौशी

छान झाली मुलाखत....

ज्योति अळवणी's picture

25 Jan 2017 - 9:18 am | ज्योति अळवणी

मुलाखत आणि व्हिडीओ दोन्ही मस्त

ज्योति अळवणी's picture

25 Jan 2017 - 9:18 am | ज्योति अळवणी

मुलाखत आणि व्हिडीओ दोन्ही मस्त

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

25 Jan 2017 - 11:43 am | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त झालीये मुलाखत...

मनिमौ's picture

25 Jan 2017 - 10:32 pm | मनिमौ

सिनेमा सर्वांपर्यंत पोचावा या साठी केलेली तयारी आणी कळकळ दोन्ही पोचली

मुलाखत आवडली. इतके प्रचंड काम एका चित्रपटाच्या स्क्रिनिंग्जसाठी करावे लागते हे समजले.

नूतन सावंत's picture

2 Feb 2017 - 10:38 am | नूतन सावंत

वाह! सृजा.
सुरेख झाली आहे मुलाखत.खूप नवी माहिती मिळाली.दोन्ही विडओही छान आहेत.