ओरिजिनल खान !!

संदीप चित्रे's picture
संदीप चित्रे in लेखमाला
16 Jan 2017 - 8:07 am

*/

ऐन तारुण्यात तो देखणा होता ह्यात वादच नाही!

तो अभिनेता कसा होता ह्यावर दुमत असू शकतं.

तो स्टाइलबाज होता ह्यात वादच नाही!

त्याचा स्टाइलबाजपणा कधी धेडगुजरी वाटायचा, ह्यावर दुमत असू शकतं.

त्याच्या दिग्दर्शनाचे काही चित्रपट तुफान चालले ह्यात वादच नाही!

तो किती चांगला दिग्दर्शक होता ह्यावर दुमत असू शकतं.

तो ‘नंबर १' स्टार नव्हता, ह्यात वादच नाही!

पण लोकप्रिय ‘खान' स्टार्समध्ये फिरोज खान नक्की होता, ह्यावर दुमत असू शकत नाही!

Firoz Khan

रईस राहणी, उंची मद्य, खूबसूरतीचा सहवास अशा काही बाबतींत तो असंख्य पुरुषांसाठी ‘भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसी?’ अशा कॅटेगरीत होता. असंख्य बायकांसाठी तो ‘ओनिडा' टीव्हीच्या गाजलेल्या जाहिरातीसारखा ‘नेबर्स एन्व्ही, ओनर्स प्राईड' होता. फिरोज खानवर लिहायला बरेच विषय मिळतील, पण सध्या तरी हा लेख त्याच्या ४-५ सिनेमांपुरता ठेवतो! ‘एफ. के. इंटरनॅशनल' ह्या त्याच्या बॅनरखाली निर्मिलेल्या आणि त्याने दिग्दर्शित केलेल्या सिनेमांची नावं एका शब्दाची आणि मस्त खटकेदार असायची. ‘पाप को जिंदा जलाकर राख कर दूंगा' वगैरे लांबलचक नावांपेक्षा ‘कुर्बानी', ‘जांबाज' अशी पकड घेणारी नावं.

‘अपराध' पाहिला, तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. फिरोज खानने दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा!

Aparadh

अर्थातच त्याच्या स्टाइलिशपणाला मोकळं रान मिळालं होतं. युरोपमधलं शूटिंग आणि त्यातही रेसर कार्सचं त्या काळातलं दुर्मीळ दर्शन! तसं पाहिलं, तर त्याच्या चित्रपटांची काही खास वैशिष्ट्यं होती. एक म्हणजे ‘क्लास'चं माहीत नाही, पण 'मास'ला आवडेल अशी दिलखुश मांडणी! चकाचक बंगले, गाड्या, शानोशौकत असा माहौल! दुसरं म्हणजे त्याने दिग्दर्शित केलेल्या सिनेमात एक खास वेगवान / थरारक सीन असायचाच, जो प्रेक्षकांना अनपेक्षित असायचा. आपल्या यार-दोस्तांना सिनेमाबद्दल सांगताना माणसं तो सीन रंगवून रंगवून सांगायची आणि वर म्हणायची “येड्या, बाकी सोड! त्या एका सीनसाठी तरी पिच्चर बघ!". ‘अपराध'मध्ये सुरुवातीलाच कार रेसिंग ही खासियत होती. तिसरं म्हणजे दिग्दर्शक फिरोज खानला कुठलं संगीत लोकप्रिय होईल ते ओळखण्याचा कान होता. “हमारे सिवा तुम्हारे और कितने दीवाने हैं आणि तुम मिले.. प्यार से.. मुझे जीना गवारा हुआ ही गाणी त्याचा पुरावा आहेत. कल्याणजी-आनंदजींनी त्याच्या सिनेमात काही तुफान लोकप्रिय गाणी दिली आहेत. आणि लास्ट बट नॉट लीस्ट..हॉट हिरॉईन! ‘अपराध'मध्ये समुद्रकिनार्‍यावर पहुडलेली, संपूर्ण पडद्यावर अपूर्ण कपड्यांत दिसणारी.... मुमताज! मग समुद्राच्या लाटांसारखी खळखळून हसणारी.. मुमताज! काळ्या रंगाच्या (चक्क!) टू पीस बिकिनीमधली…. मुमताज! मला थेट्रातली एकटक शांतता अजूनही आठवतेय! (चालले.. आता काही जण लगेच 'यू ट्युब'वर चालले!!)

एखाद्या क्लासिक कादंबरीची आणि तितक्याच क्लासिक सिनेमाची पार वाट लावावी, तो आपला सिनेमा म्हणून भारतीय रूपड्यात सादर करावा आणि लोकांना तो सिनेमा आवडावा.. ह्या सगळ्यांत ‘धर्मात्मा' सिनेमाची सर कुणालाही यायची नाही!!

Dharmatma

मार्लन ब्रांडोने अजरामर केलला ‘गॉडफादर'! त्या भूमिकेत प्रेमनाथ म्हणजे ‘धर्मात्मा'! प्रेमनाथ?!! पण सिनेमात काही मसाला असा होताच, ज्यामुळे ‘धर्मात्मा' लोकांना आवडला. सिनेमाचं अफगाणिस्तानमधलं शूटिंग हा एक उत्सुकतेचा भाग होता. मघाशी म्हणालो ना, तसा ह्या सिनेमातही वेगवान / थरारक सीन होता तो म्हणजे ‘बुझकशी'चा! वार्‍याच्या वेगाने दौडणार्‍या घोड्यावर बसून, प्रतिस्पर्ध्याकडून चाबकाचे फटके खाणारा आणि दात-ओठ खात चाबकाचे फटके देणारा डॅनी डेन्झोन्ग्पा लोकांच्या लक्षात राहिला. सिनेमातल्या रेश्मावर एकतर्फी प्रेम करणारा डॅनी! (‘बुझकशी' ह्या खेळाचा थरार नंतर काही वर्षांनी हिंदी सिनेमात पुन्हा बघायला मिळाला तो बच्चनच्या ‘खुदा गवाह'मध्ये! काय योगायोग, त्यातही डॅनी आहे!) फिरोजच्या ‘अपराध'मध्ये मुमताज होती, तर ‘धर्मात्मा'मध्ये हेमा मालिनी आणि रेखा! मेरी गलियों से लोगों की यारी बढ गई , क्या खूब लगती हो, तेरे चेहरे में वो जादू है अशा अवीट गोडीच्या गाण्यांमधे ‘ड्रीम गर्ल' हेमा मालिनीला बघण्यासाठी आणि ‘तुमने कभी किसी से प्यार किया है?’ ह्या गाण्यात पिवळी साडी आणि हॉल्टर नेकमधल्या रेखाला बघण्यासाठी प्रेक्षक बाकीचा ‘धर्मात्मा' सहन करायचे! आत्ताही खातरीनं सांगतो की नुसतं ‘क्या खूब लगती हो' गाणं ऐका आणि पहिल्या दहा सेकंदात गाणं तुमचा कब्जा घेतं की नाही ते सांगा! आणि हे नुसतं ऐकताना हां! आता विचार करा की भर थिएटरमध्ये हे गाणं चालू आहे आणि पडाद्यावर हेमा मालिनी! हिट् है भाय!

हिंदी सिनेमाचा इतिहास लिहिताना ‘धर्मात्मा' एका वेगळ्या कारणासाठी मात्र नमूद केलाच पाहिजे. ‘शोले'तल्या ऑल टाइम क्लासिक गब्बर सिंगच्या भूमिकेतला अमजद खान आपल्याला दिला धर्मात्माने! काय, चमकलात? गब्बर डॅनीने साकारावा असं ठरत होतं. पण डॅनीने ‘धर्मात्मा'साठी तारखा आधीच कबूल केल्या होत्या. अर्थात डॅनीलाही श्रेय द्यायला पाहिजे की ‘शोले'सारख्या सिनेमासाठीही आधी केलेली कमिटमेंट तोडली नाही. १९७५ सालीच आणि ‘धर्मात्मा'शिवाय आणखी एक, हिंदी सिनेमाच्या इतिहासातला महत्त्वाचा, सिनेमा झळकला होता -- ’दीवार'! सिर्फ नाम ही काफी है!

सिनेमा दिग्दर्शकाच्या कारकिर्दीत एक असा सिनेमा असतो की बाकी काही नाही, तरी तो सिनेमाच दिग्दर्शकाची ओळख बनतो! रमेश सिप्पीचा ’शोले' होता, तर फिरोज खानचा ‘कुर्बानी'!

Qurbani

तो एक दे मार मसाला सिनेमा होता, पण तुफान चालला होता. तिकीट खिडकीवर लोकांच्या उड्या पडणं म्हणजे काय असतं, ते आमच्या पुण्यात अल्पना टॉकीजला मी स्वतः अनुभवलंय! शाळेत असताना अभ्यासू वगैरे असलेला शिरगोपीकर हा आमचा मित्र कॉलेजच्या दिवसांत ‘कुर्बानी' बघायला गेलो, तर लोकांच्या खांद्यावरून वगैरे चढत तिकीट खिडकीपर्यंत पोहोचला होता आणि धक्काबुक्की करत तिकिटं घेऊन आला होता! तगडा विनोद खन्ना, स्वतः फिरोज खान ह्यांचा ‘कुर्बानी' ! नेहमीच्या खलनायकी भूमिकेपेक्षा वेगळ्या अशा, च्युइंगम चघळत नर्मविनोदी बोलणार्‍या, इन्स्पेक्टरच्या भूमिकेतल्या अमजद खानचा ‘कुर्बानी' ! एक गाजलेला सीन होता, तो म्हणजे नवी कोरी मर्सिडीझ गाडी खिळखिळी करण्याचा! फिरोज खानच्या एन्ट्रीच्या सीनमध्ये मग्रूर अमरीश पुरीला उद्देशून “भगवान तो हो नहीं सकते, इन्सान तो लगते नहीं, और शैतान से मैं नहीं डरता” असा त्याचा धासू डायलॉग कानावर पडला की मर्सिडीझचा खुळखुळा होताना बघायला पिक्चरच्या रिपीट ऑडियन्समधले प्रेक्षक सावरून बसायचे. गाण्यांच्या बाबतीत म्हणाल, तर ‘अपराध', ‘धर्मात्मा', आणि ‘कुर्बानी'मध्ये संगीतकार कल्याणजी-आनंदजी ह्या जोडगोळीने एक से एक लोकप्रिय गाणी दिली आहेत! ‘लैला मैं लैला’ गाणं सुरू झालं की त्याच्या बीट्सवर बसल्या जागीही पाय थिरकायला लागतात! शिवाय त्या गाण्यातला ‘ओ लैला.. गुलू गुलू’ म्हणणारा अमजद खान भाव खाऊन गेला होता. ‘आप जैसा कोई मेरी जिंदगी में आए’ हे सॉलिड म्हणजे सॉलिडच हिट झालेलं गाणं होतं. नाझिया हसन ह्या एकदम ताज्या आवाजाची हवा झाली होती. ते गाणं इतकं गाजलं होतं की शा़ळेतली पोरंही बिन्धास्त ते गाणं गुणगुणताना म्हणायची, “आप जैसा कोई मेरी जिंदगी में आयें तो बाप बन जायें... हां हां हां बाप बन जायें!" यारी-दोस्तीबद्दल प्राण-बच्चनच्या ‘यारी है ईमान मेरा, यार मेरी जिंदगी' ह्या गाण्याची आठवण करून देणारं गाणं म्हणजे ‘कुर्बानी कुर्बानी कुर्बानी’! प्रेक्षक टाळ्या-शिट्यांनी थिएटर दणाणून टाकायचे! ‘हम तुम्हे चाहते हैं ऐसे’ हेसुद्धा छान गाणं आहे. ‘मरनेवाला कोई जिंदगी चाहता हो जैसे" -- क्या बात है इंदिवरसाब, बहोत खूब लिखा है! ‘क्या देखते हो, सूरत तुम्हारी’ ह्या गाण्याबद्दल आम्हा मित्रांमधला एक रनिंग जोक होता की ह्या गाण्याचा मुखडा म्हणजे धडधडीतपणे खोटं बोलणं आहे! “क्या देखते हो?" ह्या झीनत अमानच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे फिरोज खान म्हणतो “सूरत तुम्हारी!" काय रे देवा! किती खोटं बोलावं माणसाने? झीनत अमानकडे बघूनच कळतं नुसती सूरत कसा बघत राहील? ‘कुर्बानी' पिक्चरमधे झीनत अमान म्हणाजे - उफ्फ! एका वाक्यात सांगायचं तर झीनत अमानला बघत एक आख्खी पिढी ‘वयात आली'!!!

परंपरेप्रमाणे ‘जांबाज'मधेही चकाचक बंगले, गाड्या, शानोशौकत असा माहौल होता. पण अमली पदार्थ (ड्रग्ज) चुकूनही ट्राय करायचे नाहीत, हे मनावर बिंबवण्यात ‘जांबाज'चा मोठा वाटा होता. (तसंच दूरदर्शनवर पाहिलेली ‘सुबह' ही मालिकाही महत्त्वाची होती.)

Jambaz

‘जांबाज'मध्ये घोड्यांची भरधाव रेस आहे आणि शिवाय छातीचे ठोके वाढवणारं ‘रशियन रुले'चंही एक दृश्य आहे. रिव्हॉल्वरमध्ये एकच गोळी भरायची, चेंबर गरागरा फिरवायचं. आता गोळी नक्की कुठे आहे ते सांगता येत नाही. पैज लावायची आणि रिव्हॉल्वर स्वतःच्या डोक्याला लावून ट्रिगर दाबायचा. जगला तर पैज जिंकला! ह्यापेक्षा मोठा जुगार आणखी कुठलाही असू शकत नाही! ‘हर किसी को नहीं मिलता यहां प्यार जिंदगी में' गाणं इतकं गाजलं होतं की आता त्याचं रीमिक्स रूपही गाजतंय! ‘हर किसी को...'मध्ये त्या काळात अनेक जणांच्या दिल की धडकन श्रीदेवी होती, तर ‘प्यार लो प्यार लो' गाण्यात वेगवेगळ्या काळातल्या अनेक जणांच्या दिल की धडकन रेखा होती! पण ‘जांबाज'मधला हॉट भाग म्हणजे डिंपल! एक तर तिच्या केसांचा फॉल पाहून बायकाही वेड्या होतात! ‘जानेजाना ओ जानेजाना' गाणं बघताना शेवटी असं वाटतं की घोड्यांच्या तबेल्यातलं वाळकं गवत पेट घेईल!

Dayawan Yelgar

‘दयावान’ आणि ‘यल्गार’ एका परिच्छेदात संपवायचे चित्रपट आहेत! ‘धर्मात्मा'मध्ये ‘गॉडफादर'ची वाट लावली होती, तर ‘दयावान’ची वक्रदृष्टी ‘नायकन'वर पडली होती! तुलना करायची, तर कमल हसनने साकारलेल्या ‘नायकन'शी विनोद खन्नाचा ‘दयावान’ कुठेच टक्कर देऊ शकत नव्हता. ‘दयावान’ 'मध्ये लक्षात राहण्यासारखी एकच म्हणजे मा-धु-री! ‘आज फिर तुम पे प्यार आया है' गाण्यात तिला आणि विनोद खन्नाला बघून अनेक जण विनोद खन्नावर जळून कोळसा झाले असतील. ‘यल्गार' तर लक्षात राहिलाय तो महेश इनामदार ह्या माझ्या मित्राच्या हजरजबाबी कॉमेंटमुळे. निलायम थिएटरमध्ये आम्ही काही मित्र गेलो होतो. ‘आखिर तुम्हे आना है, जरा देर लगेगी' हे गाणं चालू होतं. भल्या मोठ्या बंगल्यात जांभळ्या साडीतली नगमा आणि बाहेर पावसात चिबं ओला संजय दत्त. दोघांचं आपलं नाचणं-गाणं चालू होतं. अचानक महेश म्हणाला, “च्यायला, हा फिरोज खान म्हातारा झाला. कुणाला पावसात भिजवायचं ते कळत नाही त्याला!"

मी आधी लिहिलंय की ह्या लेखाचा विषय फिरोज खानच्या ४-५ सिनेमांपुरताच ठेवतो. पण त्याच्या एका गाण्याचा उल्लेख केल्याशिवाय (निदान माझ्यापुरता तरी) हा लेख पूर्ण करता येणार नाही. एखादं गाणं असतं, जे आपल्याला ऐकताच आवडतं. म्हणजे आपण वरचेवर ते गाणं ऐकत राहतो असं नाही, पण मनाच्या एका कोपर्‍यात कुठे तरी ते गाणं असं छानपैकी कायमचा तळ ठोकून राहतं. फिरोज खान आणि शर्मिला टागोरचं ‘सफर' सिनेमातलं ‘जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे' हे माझ्यासाठी अशाच प्रकारचं गाणं आहे. एक एक करत माणसं काळाच्या पडद्याआड जातात, तसा आता फिरोज खानही गेलाय. पण तो असा होता की ज्याच्याबद्दल इंग्लिशमधलं एक वाक्य समर्पक आहे – ‘यू मे लाइक हिम ऑर हेट हिम, बट यू कॅनॉट इग्नोर हिम!'

प्रतिक्रिया

झक्कास लेख!

पैसा's picture

16 Jan 2017 - 1:52 pm | पैसा

कॉलेजला आताना डोक्यत समांतर सिनेमाच चांगले वगैरे भुतं होती. त्यामुळे खानावळीच्या वाटेला कधी गेले नाही. गाणी मात्र सुपर डुपर हिट असायची नक्कीच!

यशोधरा's picture

16 Jan 2017 - 2:05 pm | यशोधरा

मस्त लिहिलंय संदीप! बरेच दिवसांनी तुझा लेख पाहिला!
आता लिहित रहा.

मराठी_माणूस's picture

16 Jan 2017 - 2:47 pm | मराठी_माणूस

छान लेख.
अजुन एक चित्रपट उल्लेख करण्याजोगा , "खोटे सिक्के".

आदूबाळ's picture

16 Jan 2017 - 2:51 pm | आदूबाळ

मस्त लिहिलंय संदीपदादा!

विशुमित's picture

16 Jan 2017 - 3:23 pm | विशुमित

खूप छान लिहलंय...!!

लय भारी लेख. ही खानावळ आवडत नाही, पण लेख फक्कड जमलाय!

लाडू's picture

16 Jan 2017 - 4:41 pm | लाडू

छान लेख.

मराठी कथालेखक's picture

16 Jan 2017 - 4:44 pm | मराठी कथालेखक

मला संजय गुप्ताची दिग्दर्शनाची शैली काहीशी फिरोझ खान सारखी वाटते .. संजय फिरोझखानकडे असिस्टंट होता की काय ते शोधले पाहिजे..
अवांतर : बाकी मला हिरो म्हणूण फिरोझ खानपेक्षा त्याचा मुलगा फरदीन खूप चांगला वाटतो. सॉफिस्टीकेटेड लूक्स आणि मस्त व्यक्तिमत्व, अभिनय पण बरा होता. पण आता त्याचं रुप त्याने पुर्णपणे गमावलंय..मला त्याच्याबद्दल वाईट वाटतं.. त्याने जे गमावलंय ते खूप मौल्यवान होतं.. सिनेमातल्या अगदी आघाडीच्या नायकांकडेही असं रुप नाही.

Nitin Palkar's picture

16 Jan 2017 - 8:30 pm | Nitin Palkar

अतिशय सुंदर लेख! विस्मृतीत गेलेल्या 'खानाच्या' आठवणी जागा झाल्या! अपराध या चित्रपटात फिरोझ खानचं नाव राम खन्ना होतं हे अजून आठवतं

Madhavi1992's picture

16 Jan 2017 - 8:45 pm | Madhavi1992

मस्त जमलाय लेख. आवडला

अरेच्च्या! या मनुष्याचे इतके शिनेमे दिग्दर्शित करणे, अभिनय (?) करणे वगैरे माहीतच नव्हते. वर उल्लेखलेले सिनेमे फारसे माहीत नाहीत पण हम तुम्हे चाहते है ऐसे हे एकच गाणं माहितिये. बाकी गाणी फक्त कधीतरी ऐकलियेत. तुझं चित्रपटप्रेम दिसून येतय संदीप. पूर्वी अमिताभप्रेमामुळे एक मस्त लेख लिहिला होतास ते आठवले. हे लेखनही छान झालय.

स्टाइलबाज खानावरचा लेख आवडला.नेमक वर्णन जमलय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jan 2017 - 10:43 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर लेख !

बबन ताम्बे's picture

17 Jan 2017 - 11:24 am | बबन ताम्बे

धर्मात्मा, कुर्बानी तुफान चालले . उत्तरार्धात वेलकम मधील आर्डीएक्स चा रोल देखील त्याने त्याच्या खास स्टाईलने केला होता.

+ १ म ला आर्डीएक्स आवडला होता :) आनी लेख छान झालाय :)

चौकटराजा's picture

17 Jan 2017 - 1:07 pm | चौकटराजा

आरजू व सफर या चित्रपटात त्याने ' लूजर साईड हिरो" चे काम केले. त्याच्या गुलबकावली या शुटींग च्या दरम्यान पाचगणी येथे मी त्याला भेटलो. मला बसायला खुर्ची नाही
हे पहाताच त्याने आपल्याच खुर्चीवर अर्धी जागा मला बसायला दिली ही आठवण या निमित्ताने आली. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक रवि नागाईच यानी तर सिने कॅमेरा हाता़ळू दिला व मायथोलोजिकल सिनेमात फ्रेममधे इलेक्ट्रीक खांब दिसतोय दे मी दाखविल्यावर ते इतके खुष झाले की थेट मद्रासला घरी येण्याचे निमंत्रण मिळाले.

मोलाची आठवण सांगितलीत, अर्थात वाचूनच इतकं विशेष वाटलं, की तुम्हाला काय वाटलं असेल याची कल्पना करू शकतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jan 2017 - 9:43 am | डॉ सुहास म्हात्रे

भारी आठवण !

त्यात खान आणि नागाईच यांचा मोठेपणा तर अधोरेखीत होत आहेच पण, मिपावर चौकटराजांसारखे छुपे रुस्तम आहेत हे वाचूनही अभिमान वाटला !

चौकटराजा's picture

19 Jan 2017 - 7:17 am | चौकटराजा

त्या चित्रपटाचे प्रॉडक्शन कन्ट्रोलर ओळखीचे झाले असल्याने मी इतका जवळ जाउ शकलो. या चित्रपटाचा सेट टेबल लॅन्डवर बेनहर हा सिनेमातील रेसच्या धर्तीवर केला होता. या वेळी त्यानी त्यांचा तो रथ दाखविला .ठराविक कळ दाबली की त्या रथाचे तीन तुकडे होत असत. निर्मात्यानी त्यासाठी जे स्टन्टमन आणले होते त्यानी इरविन अ‍ॅलनच्या " टॉवरिंग इनफर्नो "( फेन डनवे रिचर्ड॑ विडमार्क , स्टीव्ह मॅक्वीन, पॉल न्यूमन ) व चोप्रांच्या बर्निग ट्रेन साठी काम केले होते अशी माहिती त्यावेळी नागाईच यानी गप्पा मारताना दिली. चित्रपट मात्र कधी आला व गेला ते कळलेच नाही.

पद्मावति's picture

17 Jan 2017 - 8:59 pm | पद्मावति

मस्त जमलाय लेख. आवडला.

सामान्य वाचक's picture

17 Jan 2017 - 9:20 pm | सामान्य वाचक

मला कधी आवडले नाहीत
त्यामुळे ही जादू बिदू काही झाली नाही त्यांचे सिनेमे बघताना

वेस्टर्न पटाची भ्रष्ट नक्कल वाटायचे वरती उल्लेख केलेले चित्रपट

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jan 2017 - 11:42 pm | अत्रुप्त आत्मा

छान लेख.

चांगला लेख. फिरोज खान यांच्या कारकिर्दीची थोडक्यात ओळख झकास.

प्रीत-मोहर's picture

18 Jan 2017 - 12:55 pm | प्रीत-मोहर

मस्त लेख. मी तर वर लिहिलेले चित्रपट पाहिले नाही कधी. पण गाणी आवडतात आणि ऐकली जातात :)

तिरकीट's picture

18 Jan 2017 - 4:24 pm | तिरकीट

मस्त ओळख

निमिष ध.'s picture

18 Jan 2017 - 8:42 pm | निमिष ध.

अपराध मधले ए नौजवान गाणे तर ब्लॅक आईड पीज नी पण सँपल केले आहे. यावरूनच फिरोज खानच्या गाण्याची ओळख आणि आवड कळते. त्या काळात पण त्याने अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचे गाणे कल्याणजी आनंदजींकडून करून घेतले. यासाठी त्यांना बीएमाआय अ‍ॅवॉर्ड पण दिले गेले २००६ मध्ये.

फारएन्ड's picture

19 Jan 2017 - 6:57 am | फारएन्ड

मस्त लिहीले आहे. "फॅन" दिसला लेखातून :)

फिरोज खान ला ते रेसर कार्स, काउबॉय वगैरेचे बरेच फॅसिनेशन असावे. त्याच्या प्रत्येक पिक्चर मधे ते दिसते. मला कुर्बानी तेव्हा आवडला होता. आता पांचट वाटतो. जाँबाज मात्र तेव्हाही फालतू वाटला होता. धर्मात्मा फारसा लक्षात नाही. 'तेरे चेहरे मे वो जादू है' मात्र मस्त. कुर्बानी मधे त्याने अमजद च्या टॅलेण्ट ला चपखल असा रोल दिला होता त्याला.

त्याची एक खासियत म्हणजे त्याच्या पिक्चर मधे जो दुसरा हीरो असतो त्याला तो मारत असे, असे लक्षात आहे. :)

संदीप चित्रे's picture

22 Jan 2017 - 3:47 am | संदीप चित्रे

लेखासाठी आवर्जून प्रतिसाद देण्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद!

पिलीयन रायडर's picture

27 Jan 2017 - 2:10 am | पिलीयन रायडर

काय लेख लिहीलाय!! वाचला तेव्हा इतका आवडला की नवरा कामात होता तर त्याला जोरजोरात वाचुन दाखवला! ह्या उपक्रमात एखादा फिल्मी लेख असावा अशी इतकी इच्छा होती, ती ह्या लेखाने पुर्ण झाली!

एमी's picture

31 Jan 2017 - 7:44 am | एमी

भारी लिहलंय!

फिरोज़चा वेलकम-२ खेरीज एकही चित्रपट पाहिला नाही. पाहणारही नाही. पण लेखातली सगळी गाणीमात्र आठवतायत.

वाचताना मलादेखील फरदीन खानच आठवत होता. फिरोज़च्या चेहर्यात मुलगा कुठे सापडतोय का शोधत होते.

संदीप चित्रे's picture

4 Mar 2017 - 5:57 am | संदीप चित्रे

लेखासाठी प्रतिसाद दिलाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद!
@पिरा -- मला असा लेख लिहायचा होताच फक्त काही ना काही कारणानी राहुन जात होतं.
ह्या विशेषांकाच्या निमित्ताने ती संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!