"लीके"(एक माध्यम धार्मिक शिकवणीचं)

Primary tabs

बाजीप्रभू's picture
बाजीप्रभू in लेखमाला
18 Jan 2017 - 7:49 am

आपल्या पैकी बरेचजण एखाद आठवड्यासाठी का होईना थायलंड देशात नक्कीच येऊन गेला असाल. एक बजेट फॉरेन टूर म्हणून पूर्वेकडील या निसर्गरम्य छोट्याश्या देशाला थोडे थोडके नव्हे तब्बल ६० लाख पर्यटक दरवर्षी भेट देतात. पटायातला एक बीच आयलँड, एक कॅबरे शो, रेड लाइट एरियाची व्हिजिट, झालंच तर एक जंगल सफारी आणि बँकॉकच्या मॉल्समधे शॉपिंग, हि मुख्यत्वे भारतीय पर्यटन कंपन्यांची स्टॅंडर्ड आयटीनरी. दुर्दैवाने यामुळे बरेच भारतीय पर्यटक थायलंड हा एक मॉडर्न, जास्तच पुढारलेला आणि "सबकुछ चलता है" टाईपचा देश आहे अशी प्रतिमा घेऊन मायदेशी जातात.

पण तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर आश्चर्य वाटेल. ती म्हणजे थायलंड हा जगातील नंबर एकचा "धार्मिक" असलेला देश आहे. इथली जनता दिसायला मॉडर्न असली तरी इथला प्रत्येक व्यक्ती हा "पूजा-अर्चा, दानधर्म, वडील माणसांचा आदर" करणारा व प्रचंड देशाभिमानी असतो. इतर विकसित देशांप्रमाणेच दिसायला खूप मॉडर्न वाटणाऱ्या आणि बऱ्यापैकी व्यक्ती स्वातंत्र्य असणाऱ्या थाई देशात "धार्मिक चौकट" इतकी मजबूत कशी याचं माझ्यासारख्या या देशात कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या भारतीयास नेहमीच कुतूहल वाटत असे.

थाई संस्कृती, थाई मंडळींचा स्वभाव, आस्था, दैवी संकल्पना, त्यांच्या धार्मिक श्रद्धा/अंध श्रद्धा यांचा अभ्यास जस जसा वाढत गेला तस तसा काही गोष्टींचा उलगडा होत गेला. थाई जनमानसात धार्मिक भावना रुजवण्यासाठी बरेच कार्यक्रम धार्मिक संस्थांतर्फे आणि सरकार तर्फेही राबवले जातात. हि धार्मिक शिकवणूक तुम्हाला इथल्या पाठ्यपुस्तकांत सापडेल. आईवडीलांच्या संस्कारात सापडेल, स्वेच्छेने असलेलल्या तीन महिन्यांच्या बौद्ध धर्माचे दीक्षेत सापडेल कथा-कादंबऱ्यांत आणि इथल्या परंपरागत लोक नृत्यातही सापडेल. "लीके" हा त्यापैकीच एक.

गोष्ट तशी छोटीच्या निमित्ताने आज आपण थायलंडच्या "लीके" या नाट्य संगीत प्रकाराची माहिती घेणार आहोत.

लिके!

आपल्या भारत देशाला जसा संगीत, नाट्य, नृत्य आणि लोककलेचा वारसा लाभलेला आहे तसाच किंबहुना त्याच तोलामोलाचा वारसा आपल्या शेजारील “थायलंड” या देशाचा देखील आहे. या कलेचा उगम शोधायचा झाला तर आपल्याला पार पर्शिया (आताचा इराण) पासून सुरवात करावी लागेल. फारसी भाषेतील "सिकिर" किंवा अरेबिक भाषेत "सिकरु" अर्थात "मुस्लिम देवतेचे स्तवन" हे मूळ स्वरूप असलेला हा प्रकार व्हाया इंडोनिशिया आणि मलेशियामधून थायलंड देशात दाखल झाला. गाणी म्हणत, कथा सांगत, हावभावातून मनोरंजन करत धार्मिक संदेश देणे हा या कलेचा मूळ ढाचा आणि उद्देश.

इंडोनिशियामधे सादर होणारा लीके हा साधारण असा दिसतो.

a

या नाट्यसंगीताच्या कलेने खरं बाळसं धरलं ते इसवीसन १७६७ साली "चक्री" साम्राज्याच्या राजा "रामा-द्वितीय" यांच्या राजाश्रयाने. १८९० पर्यंत फक्त राज प्रासादामधे बंदिस्त असलेला आणि नंतर जनतेसाठी खुला झालेला मनोरंजनाचा हा प्रकार त्या काळी सामान्य जनतेनेही उचलून धरला. डिके, यिके आणि सरतेशेवटी "लिके" अशी फक्त नावांचीच कात न टाकता नाट्यसंगीतासाठी लागणारे नेपथ्य, पोशाख, कथा, वाद्ये यातही काळानुरूप बदल होत गेले. "रामा-पाचवे" यांच्या कालखंडात मूळ मुस्लिम पद्धतीने साकारली जाणारी ही कला पूर्णपणे थाई संस्कृतीला साजेशी बदलण्यात आली. सत्याचा विजय, दुष्टांचे निर्दालन, दुष्कर्माचे भोग हे दाखवत, सद्य परिस्थितीवर कोपरखळ्या मारत धार्मिक, सामाजिक संदेश देण्याचा मुख्य उद्देश मात्र तसाच ठेवण्यात आला. ग्रामीण भागांत कधी कधी बॅकग्राऊंडला केवळ साधा पडदा एवढंच नेपथ्य असलं तरी भरजरी पोशाख, नजरेत भरणारे दाग-दागिने, भडक मेकअप, आकर्षक मुखवटे हे "लिके" चे मुख्य आकर्षण. हे असे :

a

a

a

ऑफिसमध्ये एखादा स्टाफ झगमगीत कपडे घालून आला तर त्याला "लिके" असं उपहासाने देखील बोललं जातं.
भरजरी पोशाखांच्या कोंदणात बसवलेल्या "कथा" याही लिकेचं मुख्य आकर्षण. विविध दंत कथा, परिकथा, ऐतिहासिक गोष्टी, प्रेमाचा त्रिकोण, अगदी आपल्या रामायणातल्या गोष्टी देखील यात नाट्य आणि संगीताच्या माध्यमातून सादर केल्या जातात. सर्वदूर लीकेचा एकूण फॉरमॅट सेम असला तरी विविध राज्यांत तो विविध कथा घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने सादर केला जातो. भरपूर भरणा असलेल्या कलाकारांमध्ये "फ्रा" म्हणजे नायक, नांग (नायिका), कोंग (खलनायक), इटचा (खलनायिका) आणि एक विदूषक हि मंडळी एकूण कथेतील मुख्य पात्रे. सादर करण्याच्या एकूण पद्धतीमुळे आपल्यासारख्या अनभिज्ञ मंडळींना हा एखादा "कॉमेडी शो" वाटू शकतो. (फक्त मिपाकर सोडून). आपल्या नाट्यसंगीताच्या कर्णमधुर संगीताची बरोबरी हा शो नक्कीच करू शकत नाही. शो बघताना बरेचदा कलाकारांमध्ये सिंकरोनाइज़ेशनचा अभाव यासारख्या गोष्टी या शोची मधुरता कमी करतात हेही तितकंच खरं.

a

a

a

a

a

a

a

आताच्या तरुण पिढीची बदलेली आवड, कमी होत चाललेला प्रेक्षक वर्ग, आटत चाललेली सरकारी मदत या सगळ्यांचा परिणाम या कलेवरही झालेला दिसतोय. मात्र शहरांतून हद्दपार होत चाललेली हि कला सेंट्रल थायलंडच्या २२ राज्यांत अजूनही तग धरून आहे. "लीके" कलाकारांना मिळणारं प्रसिद्धीचं वलय, ग्लॅमर आताशा कमी होत चाललेलं असलं तरी अजूनही काही लीके कलाकारांना सेलिब्रिटींचा दर्जा दिला जातो. शहरांमध्ये आता फक्त DVD च्या रूपात शिल्लक राहिलेली या कलेची भव्यता मात्र प्रत्यक्ष पाहण्यातच खरी मजा.

a

a

a

प्रतिक्रिया

ह्या वेगळ्याच कलाप्रकाराची ओळख आवडली. तुमच्यामुळे आम्हांला थायलंडच्या अनेक अज्ञात पैलूंचे दर्शन घडते आहे याबद्दल तमाम मिपाकरांतर्फे मनःपूर्वक आभार!

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jan 2017 - 12:43 pm | अत्रुप्त आत्मा

+१

कंजूस's picture

18 Jan 2017 - 8:48 am | कंजूस

चांगला लेख आणि मोजक्याच समर्पक फोटोंची जोड. छान!

सामान्य वाचक's picture

18 Jan 2017 - 9:47 am | सामान्य वाचक

यापूर्वी कधी ऐकलं नव्हता.
जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे बऱ्याच कला मागे पडत चालल्या आहेत.

कोकणातले मेळे नाही का, ऐकू च येईनासे झाले,

पैसा's picture

18 Jan 2017 - 11:52 am | पैसा

या लेखासाठी धन्यवाद!

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jan 2017 - 12:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

एका थायी लोककलेची सुंदर ओळख !

सस्नेह's picture

18 Jan 2017 - 1:10 pm | सस्नेह

फोटो सुंदर आहेत. त्यातून 'लिके' च्या अप्रतिम रंरंगोटी, भरजरी पोशाख आणि सुरेख सजावट यांचे दर्शन घडले. पण या प्रकाराबद्दल पुरेशी माहिती मिळाली नाही. आणखी विस्ताराने लिहिणे आवश्यक होते.

"लीके"बद्दल जी माहिती इथल्या पुस्तकांत आहे ती थाई भाषेत आहे. मला थोडंबहुत थाई येतं पण अजूनही लिहिता/वाचता येत नाही, (अर्थात हि अडचण काही महिन्यांत दूर होईल) पण त्यामुळे मला इथल्या लोकल माणसांच्या माहितीवर अवलंबून रहावं लागतं. इथल्या सिटी हॉल मधे झालेल्या शोच्या वेळेस काही कलाकारांशी संवाद साधला होता त्यात बरीच माहिती मिळवायचा प्रयत्न केला पण भाषेची अडचण अजूनही भेडसावते.

मिपाकरांना जास्त माहिती व्हावी याकरिता माझ्याकडे असलेल्या DVD वरून काही व्हिडीओ क्लिप्स बनवले होते पण ते कॉपीराईटमुळे देता आले नाही. आंतरजालावरही यावर माहिती बळे-बळेच आहे. लोकल माहितगाराने दिलेल्या माहितीचा काही भागही मला अनियमितपणा व शाश्वती न वाटल्याने काढून टाकावा लागला. स्थानिक लोक कलेची माहिती मिळवतांना जे लिमिटेशन्स एखाद्या परदेशी व्यक्तीला येऊ शकतात त्या आल्यामुळे, तसेच "गोष्ट तशी छोटी" या नावातच लांबीची "तंबी" असल्याने आवश्यक तेव्हढीच कन्फर्म असलेली माहिती लिहिली आहे. पर्यटकांना जो थायलंड दिसतो तसा तो बिलकुल नाहीये हे सांगायचा प्रयत्न या पोस्टच्या निमित्ताने केलाय.

पण स्नेहाताई तुम्हाला नाराज करणार नाही. सध्या तुमची इच्छा पेंडिंग ठेवतो.. विस्तृत माहिती पुढे घेऊन येईनच.

सस्नेह's picture

19 Jan 2017 - 12:05 pm | सस्नेह

आश्वासनाची नोंद घेण्यात आली आहे.
btw, नेटवरचे व्हिडीओ धाग्यात शेअर करू शकला असता.

बाजीप्रभू's picture

19 Jan 2017 - 8:05 pm | बाजीप्रभू
बाजीप्रभू's picture

19 Jan 2017 - 8:06 pm | बाजीप्रभू
पिशी अबोली's picture

18 Jan 2017 - 3:13 pm | पिशी अबोली

छान ओळख!

प्रीत-मोहर's picture

18 Jan 2017 - 4:17 pm | प्रीत-मोहर

सुंदरच. किती देखणे फोटोज आहेत.

आमच्याकडे तियात्र नावाचा एक प्रकार आहेत्याची आठवण झाली. खर तर याच उपक्रमात लिहिणार होते त्याच्यावर. पण राहिलच ते.

विशाखा राऊत's picture

18 Jan 2017 - 4:17 pm | विशाखा राऊत

वेगळ्या कलाप्रकाराची मस्त ओळख

कैलासवासी सोन्याबापु's picture

18 Jan 2017 - 4:50 pm | कैलासवासी सोन्याबापु

अतिशय उत्तम ओळख करून दिलीत बाजीप्रभु तुम्ही. ह्या कलेचे एकंदरीत स्वरूप अन नरेटिव्ह वाचून एकदम स्ट्राईक झालेली आपली एक अस्सल स्थानिक कला म्हणजे नागविदर्भात (नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्हे) प्रसिद्ध असलेली, झाडीबोली नाट्य परंपरा. किंचित लाऊड असणारी लाईन, मुळातच गमते वाटावे असे वेष अन कथा जवळपास सारखेच आहे, धार्मिक शिक्षण थोडे कमी मात्र.

बाजीप्रभू's picture

18 Jan 2017 - 7:47 pm | बाजीप्रभू

आलेलया आणि येणाऱ्या प्रतिक्रियांसाठी धन्यवाद!!

तुम्हांस सांगितल्यास नवल वाटेल कदाचित पण या "लीके" कलेने माझं स्वतःच फक्त मनोरंजनच केलं नाही तर ऑफिसमधील "थाई" स्टाफना सॉफ्टवेअर कसं शिकवावं याचा गुरुमंत्र "लीके"मुळे मिळाला. गोष्टी सांगत SAP सारखं किष्ट सॉफवेअर शिकवता येऊ शकतं हा कॉन्फिडन्स मला "लीके" मुळे मिळाला हे इथे नमूद करावंसं वाटतं.

यशोधरा's picture

19 Jan 2017 - 11:03 am | यशोधरा

दुष्टांचे निर्दालन, दुष्कर्माचे भोग हे दाखवत, सद्य परिस्थितीवर कोपरखळ्या मारत धार्मिक, सामाजिक संदेश देण्याचा मुख्य उद्देश

कोकणात दशावतार सादर करणारी मंडळे असतात, त्या नाटकांची आठवण झाली हे वाचून - पाहून. सुरेख ओळख.

पद्मावति's picture

19 Jan 2017 - 12:32 pm | पद्मावति

खुप सुरेख ओळख. लेख आवडला.

झगमगित पोशाखाचे फोटो मस्त!छान ओळख कलाप्रकाराची.

झगमगित पोशाखाचे फोटो मस्त!छान ओळख कलाप्रकाराची.

छान ओळख...

प्रदीप's picture

29 Jan 2017 - 4:30 pm | प्रदीप

अनेकदा येऊन जाऊन असल्याने, मला थाई लोक व तो देश ह्या़बद्दद्ल ममत्व आहे. ते लोक अतिशय दिलदार (वॉर्म) आहेत असे आतापर्यंतच्या माझ्या त्यांच्याशी झालेल्या इंटरअ‍ॅक्शनवरून माझे मत बनले आहे.

तुम्ही इथे लीकेची थोडक्यात करून दिलेली ओळ्ख आवडली. अजून सविस्तर माहिती असली तर बरेच होईल, पण वर एका प्रतिसादात आपण त्याबद्दल आलेली अडचण सांगितली आहे, ती समजू शकतो. भाषेची अडचण दूर झाल्यावर नक्की मिपावर ह्या नृत्यप्रकाराविषयी सविस्तर लिहावे.

निशाचर's picture

29 Jan 2017 - 4:52 pm | निशाचर

'लीके' ची ओळख आवडली.

पिलीयन रायडर's picture

7 Feb 2017 - 10:00 pm | पिलीयन रायडर

बाजीप्रभुंनी फार मेहनत घेतली आहे ह्या लेखासाठी. भरपुर रिसर्च करुन, आवश्यक त्या परवानग्या काढुन, लोकांशी बोलुन हा लेख त्यांनी लिहीला. कथा कथनातला नृत्यनाटिका हा एक महत्वाचा प्रकार आहे. आणि त्यावर लेख हवा होताच. आपल्या गणपतीचा समावेश असलेल्या ह्या नृत्यप्रकाराची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद!

तुम्ही जो सॅप संबंधित भाग वगळला आहे तो नक्की टाका. फारच मस्त होतं ते प्रकरण!

स्रुजा's picture

28 Apr 2017 - 3:35 am | स्रुजा

थायलंड बद्दल अनेक स्टिरिओटाईप्स विशेष करुन भारतीयांच्या मनात आहेत. पण त्यांच्या संस्कृतीबद्दल खास करुन त्यातील मुल्यांबद्दल पहिल्यांदाच वाचायला मिळालं. पुढच्या वेळी गेल्यावर एखादा लिकेचा शो नक्की बघण्याचा मानस आहे.

मुख्य म्हणजे इतके व्हायब्रंट रंगाचे कपडे, नाट्य आपल्या खुप जवळचं आहे. ऑनसाईट म्हणुन थायलंड ला जाऊन तिथलं आयुष्य इतक्या बारकाईने माहिती असणं ही खास गोष्ट वाटली. त्याबद्दल तुमचे अभिनंदन.