Mise en scene - सिनेमाची भाषा!

अकिरा's picture
अकिरा in लेखमाला
12 Jan 2017 - 8:24 am

*/

मास कम्युनिकेशनची दोन वर्षे माझ्यासाठी मंतरलेली वर्षे होती. इथल्या प्रत्येक लेक्चरमुळे सिनेमा हा ऐकू येणाऱ्या आणि दिसणाऱ्या चित्रपेक्षा कितीतरी अधिक संवाद साधत असतो याची जाणीव व्हायला लागली होती. वर्गात असणारे tv म्हणजे आमची प्रयोगशाळा होती, ज्यात आधी झालेल्या प्रयोगांचा अभ्यास करणे आणि आपण स्वतः नवीन प्रयोग करणे दोन्ही गोष्टी व्हायच्या.

आम्हाला शिकवणार्‍या समर नखातेंचे लेक्चर म्हणजे मेजवानीच असायची. सरांचे प्रत्येक लेक्चर नवे काहीतरी देऊन जायचे. प्रत्येक लेक्चर मध्ये नवी फिल्म आम्ही पहायचो. आणि पॉझ करून त्यातल्या प्रत्येक फ्रेमचा अभ्यास करायचो. सर त्यातली चित्रे मार्केरने प्रोजेक्टर स्क्रीनवर गिरवायचे आणि फिल्म बंद करून कथेतील चित्रांची मांडणी आणि त्याचे स्क्रीनवरील प्रपोर्शन, कथानकातील महत्व कॅमेराचा अ‍ॅंगल, मॅग्निफिकेशन पटवून द्यायचे.

बरेचदा आज बाहेर वातावरण छान आहे, हलकासा पाऊस भुरभुरतोय आणि अश्यावेळी चार भिंतीत बोअर होतं म्हणून सर बाहेर जाऊ म्हणायचे. आणि मग युनिव्हर्सिटीच्या रम्य वातावरणात एखाद्या झाडाच्या पारावर बसून लेक्चर व्हायचं. सरांचा शब्दनशब्द कानात जायचा, मनात जायचा. दोन तीन तासांनंतर लक्षात यायचं की त्या भुरभुर पावसाने आपण पूर्ण भिजून गेलोय.

Occurrence at Owl Creek Bridge ही फिल्म पाहिल्यानंतर तर सुन्न व्हायला झालं होतं. आता इतकी भारी फिल्म पाहिल्यानंतर काही बोलूच नये म्हणून सरांनी लेक्चर थांबवले आणि बॅग घेऊन वर्गातून थेट बाहेर निघून गेले. मला आठवते त्या वेळी सगळेच इतके भारावले होते की अख्या वर्गात जागेवरून कोणीही हललं नव्हतं, एकमेकांशी काहीही बोलत नव्हतं..

आमचे प्रत्येक लेक्चर दोन तासांचे असायचं, पण बऱ्याचदा एखादे लेक्चर सुरु झाले की शिकावणाऱ्याचे आणि शिकणाऱ्याचे भान इतके हरवायचे की 3 तास 4 तास, कधी कधी तर पाच तासही लेक्चर चालायचे, चर्चा व्हायच्या.. खूप स्वातंत्र्य असायचं आम्हा विद्यार्थाना. आम्ही वरर्गात लेक्चर चालू असताना झोपू शकायचो, पुस्तक वाचू शकायचो, काहीवेळा तर शिक्षक समोर असतानाही त्यांचे लेक्चर बंक करायचो. आणि यासाठी आम्हाला कोणतीही कारण द्यायची गरज नव्हती. पण या स्वातंत्र्याचा गैरवापर केलेला मी कधीही पहिला नाही.

ह्याच मंतरलेल्या प्रवासात समजलेली एक अत्यंत सुंदर संकल्पना म्हणजे Mise-en-sce’ne (मिझो सीन्स)! लेख खरं तर ह्यावर लिहायचा आहे, पण मास कम्युनिकेशनचे दिवस आठवले आणि लिहल्याशिवाय रहावलं नाही!

चलतचित्रांचा शोध लागल्यापासून माणसाने आजतागायत नवनवे प्रयोग केले आहेत. पात्रांबरोबर कॅमेराही जागा बदलायला लागला. एडिटिंग करून ह्या चित्रांचा अर्थही हवा तसा बदलता येऊ लागला. आणि मग अगदी म्यूट सीन्ससुद्धा बोलायला लागले! हा संवाद होता पडदा आणि प्रेक्षक यांच्यामधला. हा संवाद अधिक सोप्पा, सुबोध व्हावा म्हणून प्रयत्न सुरू झाले आणि ह्यातूनच जन्म झाला Mise-en-sce’ne (मिझो सीन्स)चा. मूळ फ्रेंच भाषेतील हा शब्द वाचायला जरी अवघड वाटत असला, तरी समजायला खूप सोप्पा आहे.

साध्या भाषेत समजावून सांगायचे झाले, तर Mise-en-sce’ne म्हणजे पाहताक्षणी समजेल अशी दृश्यांची रचना. set designing, frameमध्ये येणारे घटक, पात्रांचा make-up, कॅमेर्‍याची movement, विशिष्ट प्रकाशयोजना, editला दिलेले cut, त्यातील transitions अशा अनेक घटकांचा Mise-en-sce’neसाठी वापर केला जातो. आणि मग ह्यातून दिसणार्‍या दृश्यांच्याही पलीकडचा अर्थ सांगणारी भाषा तयार होते. आपल्याही नकळत सिनेमा आपल्याशी संवाद साधायला लागतो. सामान्यांच्या भाषेत 'सिनेमा आपल्याला आवडतो'.

Mise-en-sce’ne अर्थात दृश्यांच्या रचना समजून घेण्यासाठी अापण काही दृश्यांची मदत घेऊ या. सुरुवात करताना अत्यंत गाजलेल्या आणि सर्वांनीच पाहिलेल्या 'सैराट'मधली काही दृश्ये पाहू.

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपटातील सुरुवातीच्याच दृश्यामध्ये, परशा त्याच्या वडलांसोबत बोटीवर मासे पकडत अाहे. शेजारी असलेले माशांचे जाळे, त्यांची कामातील सहजता यावरून तो कोळी समाजातील मुलगा असल्याचे अापल्याला समजते. अाता तुम्ही म्हणाल, किती सोप्पय हे. पण हे पाहणार्‍याला सोपे व्हावे म्हणून दिग्दर्शकाने ठरवले की या दृश्यात परशा बोटीवर मासे पकडेल, त्याच्या शेजारी जाळे असेल आणि तो अतिशय शिताफीने मासे पकडेल, म्हणजे अापल्या प्रेक्षकाला या एका दृश्यातच कळेल की हा कोळी समाजातील मुलगा अाहे. बघताना साधारण पण विचारपूर्वक मांडलेल्या सीन्समधून सैराट आपली पकड घ्यायला सुरुवात करतो.

पुढच्या एका दृश्यात अापल्या मनातील भाव कळावेत यासाठी परशा एका लहान मुलामार्फत अार्चीला चिठ्ठी पाठवतो. या दृश्यामध्ये कॅमेरा घड्याळाच्या काट्यांप्रमाणे गोल गोल फिरत अाहे. यातून अापल्याला सरणार्‍या वेळेची नकळत जाणीव होते. पण याबरोबरच पात्रांच्या मांडणीकडे अापले लक्ष गेले, तर अापल्या समाजव्यवस्थेचे प्रतिबिंब त्यामध्ये दिसते. परश्याकडून कॅमेरा मुलाकडे जातो, मग सलीमकडे आणि मग अपंग प्रदीपकडे. ह्यात समाजातील पिळवणूक करणारे लोक अाहेत, शोषित अाहेत, बघेसुद्धा अाहेत. आणि सगळ्यात शेवटी स्थान अाहे अपंगाचेे. जन्माने किंवा अपघाताने अालेल्या व्यंगाला या समाजात अगदी तळाचे स्थान अाहे, मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असो.

पुढे एका दृश्यामध्ये परशा अार्चीबरोबरच्या त्याच्या भावी अायुष्याची स्वप्ने पाहत अाहे. यातला हलता झोपाळा त्याच्या मनातील विचार अापल्यापर्यंत पोहोचवतोय. पण परशासारखेच अापलेही मागच्या काटेरी झाडाकडे लक्षच जातच नाही, हो ना? ते मागचे काटेरी झाड वास्तवात येणार्‍या अडचणींचे प्रतीक म्हणून डोकावत अाहे. पुढे याच दृश्यात अार्ची आणि परशा दोघेही झोपाळ्यावर ह्याच काटेरी झाडाखाली झोके घेताना दिसतात.

5

दिग्दर्शकाने वापरलेल्या एकाच Mise-en-sce’neचा प्रत्येक प्रेक्षक सारखाच अर्थ लावेल असे नाही. उदा., सैराटमध्ये परशा अार्चीकडे धाव घेत असताना मागे रेल्वेही धावत अाहे. एकीकडे अार्ची आणि परशा यांच्या प्रेमात रेल्वेच्या त्या इंजीनप्रमाणेच परशाही धावत अाहे, पण मागे असणार्‍या डब्यांची - अर्थात त्याच्या जबाबदार्‍या, त्याची नाती, त्याचे कुटुंब यांची होऊ घातलेली फरपट या दृश्यात दिसत अाहे, तर दुसरीकडे हीच रेल्वे कुणासाठी अार्ची आणि परशा यांच्या प्रेमातला आवेगही मांडत असू शकते.

चित्रपटाचे शेवटचे दृश्य तर संपूर्ण चित्रपटाचा कळसबिंदू आहे.. म्यूट केलेले पार्श्वसंगीत, अचानक समोर येणारे आर्ची-परशाचे रक्ताळलेले देह आणि आर्चीच्या अर्धवट राहिलेल्या रांगोळीतून उमटत गेलेले बाळाच्या पायाचे रक्ताचे ठसे.. दिग्दर्शक कॅमेर्‍यातून आपल्यासमोर काहीही न बोलता किती काही मांडून जातो..

काही वर्षांपूर्वी पिक्सार स्टुडिओची निर्मिती असणारा 'ब्रेव्ह' नावाचा चित्रपट येऊन गेला. या चित्रपटामध्ये रूढी-परंपरांचे कोणतेही बंधन न पाळणारी, स्वच्छंदी, सुंदर कुरळे केस मोकळे सोडून वावरणारी मिरांडा ही राजकन्या आपले मन जिंकून जाते. रूढी-परंपरांचा आदर करणार्‍या आईने मात्र आपल्या केसांची लांबलचक वेणी बांधलेली आहे. चित्रपटात जेव्हा राणीला आपल्या मुलीचे विचार पटतात, तेव्हा तीसुद्धा आपले सुंदर केस मोकळे सोडून इतर कशाचाही विचार न करता घोड्यावरून रपेट मारते.

Brave

अनूप सिंग दिगदर्शित 'किस्सा' ह्या चित्रपटात आयुष्यभर मुलगा म्हणून वाढवलेली नायिका आपल्याला भेटते. ही आपले खरे रूप समजापासून लपवते आहे. तिची मैत्रीण मात्र तिला तिच्या स्त्री असण्याची, सौंदर्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतेय. तेव्हा अंधारात उभी असलेली नायिका एक पाऊल पुढे टाकून प्रकाशात येतेय आणि परत मागे सरकतेय आणि स्वतःला काळोखात लपवतेय. ह्या ठिकाणी खिडकीतून येणारा प्रकाश हा तिच्या भावनांचे प्रतीक आहे. तिचं प्रकाशात येणं आणि परत क्षणभरासाठी मागे फिरते आणि अंधारात जाते. तिच्या मनातला संघर्ष ह्या प्रकाशाच्या खेळतुन मांडलाय.

'लाइफ अाॅफ पाय' या चित्रपटामध्ये नायक आणि त्याच बोटीत असणारा वाघ समुद्रात अापापले जीव वाचवण्यासाठी धडपडत अाहेत. दोघेही अतिशय घाबरलेले अाहेत. त्यांच्या मनातली भीती अापल्यापर्यंत पोहोचावी, त्यांच्या अस्थिरतेची जाणीव अापल्याला व्हावी याकरता दिग्दर्शकाने अनेक ठिकाणी कॅमेरा हलता ठेवलाय. त्यामुळे अापल्याला त्यांच्या मनातील घालमेल सहज जाणवू शकते.

खरे तर अशी खूप उदाहरणे अाहेत, ज्यात Mise-en-sce’neचा वापर झालाय. सुरुवातीला अवघड वाटणार्‍या Mise-en-sce’neचे सूत्र एकदा आपल्याला उमगले की मग ती कलाकृती समजून घेण्यचा मार्ग नकळत सोपा होतो. मग तो सिनेमा असो, नाटक असो अथवा एखादे चित्र असो. त्या दृश्याची रचना, त्यामागचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्या कलाकाराच्या भावना प्रेक्षकापर्यंत नक्कीच पोहोचतील, हो ना?

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

23 Jan 2017 - 10:23 am | यशोधरा

Mise-en-sce’ne ची उदाहरणे आवडली. मस्त लिहिलं आहे!

बोका-ए-आझम's picture

23 Jan 2017 - 10:59 am | बोका-ए-आझम

ज्जे ब्बात ! पुणे विद्यापीठ मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट राॅक्स! मीही याच डिपार्टमेंटचा आणि समर नखात्यांचा विद्यार्थी. १९९८ बॅच (हो, तीच ती संप करणारी बॅच.) लेख छानच. नखात्यांकडून Mise-en-scene, extension of time वगैरे संकल्पना शिकणं हा ग्रेटच अनुभव होता. जवळपास एका पिढीनंतरही नखाते तेवढेच लोकप्रिय प्राध्यापक आहेत हे ऐकून छान वाटलं.

पैसा's picture

23 Jan 2017 - 1:09 pm | पैसा

छान लेख

पद्मावति's picture

23 Jan 2017 - 2:15 pm | पद्मावति

लेख आवडला. मस्तच.

प्रदीप's picture

23 Jan 2017 - 7:37 pm | प्रदीप

आवडला.

लेख आवडला. सूचक चित्रभाषेच्या उदाहरणासाठी 'किल्ला' हा चित्रपट पहावा. दुसरे उदाहरण 'अस्तु' चित्रपटाचे. त्यात डॉ. मोहन आगाशे यांनी स्मृतिभ्रंश झालेली व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यात ते असेच एका हत्ती पाळणाऱ्या भटक्या कुटुंबासोबत जातात. येथे हत्तीचे उदाहरण सूचक आहे, कारण हत्तीचे आयुर्मान जास्त असतेच, शिवाय त्यांची स्मरणशक्तीदेखील फार तीक्ष्ण असते. या चित्रपटात हत्ती हे स्मरणशक्तीचे आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आणि चित्रपटातली स्मृतिभ्रंश झालेली व्यक्तिरेखा असा फार कल्पक मिलाफ साधला आहे. हेही चित्रभाषेचं सूचक उदाहरण आहे.

चटकन आठवलेलं उदाहरण म्हणजे 'फँड्री'मध्ये शेवटी जब्या मेलेलं डुक्कर घेऊन जातो तेव्हा पार्श्वभूमीला फुले-आंबेडकरांची मोठी चित्रं. चर्र्कन भाजलं होतें हे दृश्य.

स्वच्छंदी_मनोज's picture

23 Jan 2017 - 9:09 pm | स्वच्छंदी_मनोज

+१

आणी ह्याचा शेवटपण..नागराज मंजुळेनी शेवट धक्कातंत्राने द्यायची ही एक झलक...अगदीच सगळं हरलेला जब्या जेव्हा संताप, निराशेने हाती लागलेला दगड जेव्हा सरळ भिरकावतो तेव्हा तो दगड पडदा फाडून समोरच्या प्रेक्षकाच्या अंगावर येतो.
ह्या एकाच दृश्यात त्याने सगळा चित्रपटाचे सार मांडून प्रेक्षकाला निरुत्तर करून विचार करायला भाग पाडतो..थिएटर मधून बाहेर पडल्यावर देखील तो दगड आपल्या मनावरची जखम विसरू देत नाही ह्यात ह्या चित्रपटाचे सार आहे... (प्रवाहाविरूद्ध बोलायचे झाले तर सैराट पेक्षा मला हा चित्रपट जास्त भावला)..

राजाभाउ's picture

24 Jan 2017 - 10:54 am | राजाभाउ

संपुर्ण प्रतीसादाला +१
>> सैराट पेक्षा मला हा चित्रपट जास्त भावला)..
+१११

प्रचेतस's picture

23 Jan 2017 - 10:13 pm | प्रचेतस

सुंदर लेख.

लाइफ अाॅफ पाय' या चित्रपटामध्ये नायक आणि त्याच बोटीत असणारा वाघ समुद्रात अापापले जीव वाचवण्यासाठी धडपडत अाहेत.

ह्यातलं सर्वाधिक आवडलेलं दृश्य पटकन समोर आलं.

https://youtu.be/OMTuBy7ju1o

रुपी's picture

24 Jan 2017 - 1:32 am | रुपी

लेख आणि उदाहरणे आवडली.

उगा काहितरीच's picture

24 Jan 2017 - 9:10 pm | उगा काहितरीच

वा ! आवडला लेख. तुमच्या कडून चित्रपटांबद्दल लिहीलेलं अजून वाचायला आवडेल. चित्रपट कसा "पहायचा" हे शिकायला आवडेल .

निल्या१'s picture

25 Jan 2017 - 11:40 am | निल्या१

छान वाचायला मिळत आहे. मि पा ने कात टाकली. बरच नव नवीन वाचायला मिळत आहे. सर्व लेखकांचे आभार.

नीलमोहर's picture

25 Jan 2017 - 12:21 pm | नीलमोहर

अगदी मनापासून, छान लिहिलेय,
या विषयातील बरेच अनुभव, माहिती असेल तुमच्याकडे, त्याबद्दल अजूनही लिहा.

संदीप डांगे's picture

25 Jan 2017 - 12:24 pm | संदीप डांगे

खूप सुंदर आणि ह्या लेखमालेतला सर्वात जास्त महत्त्वाचा विषय.

ह्याबद्दल मी जाहिरातीच्या लेखात लिहिणार होतो पण त्याचा विषय मर्यादित ठेवल्याने लिहिले नाही, ते एका अर्थी बरेच झाले. चित्रभाषा, चित्रपटभाषा, कॅमेर्‍याची भाषा खूप महत्त्वाची असते ह्या माध्यमात. दिग्दर्शक किती तयारीचा आहे, त्याचा अभ्यास आणि माध्यमावर पकड किती आहे ते जाणून घ्यायचे असेल तर त्याच्या सिनेमाची चित्रभाषा बघावी.

सुरुवातीला विज्युअल आर्टच्या विद्यार्थ्यांना चित्रभाषा शिकवली जाते ते एका लहानशा उदाहरणातून. एक दृश्य आहे. ज्यात एक पडलेल्या सायकलचे चाक दिसते आहे, डब्बा व एक दप्तर रस्त्यावर पडले आहे, दप्तराचे बंद सुटून काही पाठ्यपुस्तके, सामान बाहेर आलंय.. डब्बा उघडला जाऊन काही जेवण बाहेर सांडलंय.. एखादा शूज-चप्पल दिसत आहे... घसरल्याच्या खुणा दिसत आहेत... ह्या संपूर्ण चित्रात मनुष्य कुठेही दिसत नाही. आता एवढ्याशा ऐवजावरुन कितीतरी तपशील समजून एक गोष्ट आकार घेते व ती बघणार्‍याच्या मनात तयार होते, एकही शब्द न बोलता. शाळेत जाणारी मुलगी /मुलगा (चप्पल कोणती त्यावरुन) घसरुन पडली/पडला आहे, तो कोणत्या इयत्तेत असावा हे पुस्तकांवरुन दिसते त्यावरुन त्याचे वय कळते. डबा व त्याच्यातल्या व्यंजनावरुन त्याची सांपत्तिक, सामाजिक स्थिती कळते... हे सगळे तपशील बघून न बघितलेल्या त्या व्यक्तीबद्दल मनात एक प्रतिमा उभी राहतेच राहते आणि सर्व प्रसंग आपल्या मनात तयार होतो. त्यात रस्ता कसा दिसतोय यावरुन आजूबाजुचा परिसर कसा असेल हेही मनात तयार होते, ह्या सगळ्या सामानांवर उजेड कसा व कुठून आहे ह्यावरुन ती दिवसातली कोणती वेळ आहे हेही कळते.... अशी ही छोटीशी गोष्ट एक शब्द न बोलता उभी राहते.

आता हेच चित्रपटात येईल तेव्हा कॅमेरा हळूहळू पॅन होत एक एका गोष्टीवरुन किंवा एका ठिकाणावरुन दुसर्‍या ठिकाणी पॅन होतांना सर्व गोष्टी दाखवत जाईल.. शेवटी कदाचित रडणार्‍या मुलीवर किंवा डोळे उघडे ठेवून मरण पावलेल्या मुलावर थांबेल. त्या व्यक्तिची तशी अवस्था होण्यास काय प्राथमिक कारण आहे हे आधीच्या पॅनिंग ने कळून येतं.... चाक फिरतंय की थांबलेलं आहे ह्यावरुनही घटना घडून किती वेळ झाला, अपघात किती तीव्र होता हे कळून येतं.. चाक थांबलेलं असेल, मुलगा मरण पावलेला असेल तर कितीवेळ तिकडून कोणीच फिरकलेलं नाहीये, अपघात करणारा पळून गेला इत्यादी कळून येते... एका छोट्याशा दृश्याची इतकी डिटेलींग होऊ शकते...

----------------------------
नागराज मंजुळे नव्या पिढीतला एक चित्रभाषेची दमदार समज असलेला दिग्दर्शक आहे हे त्याने तीन्ही चित्रपटात दाखवून दिले आहे. इतके की अनेक बारकावे समजायला कदाचित चित्रपट थांबवून थांबवून बघायला लागेल... आणि तितके बारकावे त्याने स्वत:हून निर्माण केलेले असतात...

----------------------------

फोटोग्राफीत एक म्हटलं जातं की फ्रेममधे नको असलेल्या गोष्टी हटवणे म्हणजे उत्कृष्ट फोटोग्राफी. तसे सिनेमात हव्या असलेल्या गोष्टी दाखवता येणे ही त्या माध्यमाची समज अधोरेखित करते. चित्रपट हे फक्त कथेचं सादरीकरण नसतात. त्याहूनही पुढे बरंच काही असतात.

सध्या एवढंच... अजून बरंच बोलण्यासारखं आहे.

छान लेख. चित्रपटविषयक नव्या दृष्टीकोनाची ओळख.

पिलीयन रायडर's picture

31 Jan 2017 - 7:39 am | पिलीयन रायडर

लेख आवडलाच! त्यानिमित्ताने Occurrence at Owl Creek Bridge पाहिला आणि खरंच सुन्न व्हायला झालं..

बर्‍याचदा चित्रपट फार आवडतो पण नक्की का ते सांगता येत नाही. नक्की चांगले दिग्दर्शक काय करतात चित्रपटात, त्यामागे विचार काय असतो हे समजायला बरीच मदत झाली.

अभिजीत अवलिया's picture

5 Feb 2017 - 5:01 pm | अभिजीत अवलिया

जबरदस्त लेख होता हा. आणी स्वच्छंदी मनोज ह्यांच्या प्रतिक्रियेशी सहमत. फॅन्ड्री मधला 'तो' भिरकावलेला दगड अजून विसरू शकत नाही.

विअर्ड विक्स's picture

8 Feb 2017 - 12:56 am | विअर्ड विक्स

लेख आवडला. वेगळा विषय नि भरपूर आशय ...

चाणक्य's picture

26 Feb 2017 - 10:34 pm | चाणक्य

असेच म्हणतो.

पिलीयन रायडर's picture

27 Feb 2017 - 9:53 am | पिलीयन रायडर

नुकतीच ब्रेकिंग बॅड ही सिरिज संपवली. सतत ह्या लेखाची आठवण होत होती. कॅमेराचा अ‍ॅंगल असाच का आहे पासून ते सबटायट्ल्स शिवायही स्पॅनिश डायलॉगचे अर्थ लागताएत का? कथा समजतेय का हे बघत होते. आणि त्या सगळ्या कसोट्यांवर ही सिरिज अगदी १०० मार्कांनी पास झाली!

साधी जाहिरात बघण्याचाही वेगळाच दृष्टीकोन ह्या लेखाने दिलाय. :)