माय फेअर लेडी

पिशी अबोली's picture
पिशी अबोली in लेखमाला
21 Jan 2017 - 10:35 am

*/

तसं पाहायला गेलं, तर दोघांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक. तो राजा, खराखुरा. त्याला खऱ्याखुऱ्या राजाचीच भूमिका पार पाडायची आहे. ती तशी काल्पनिकच. पण तिला काल्पनिक जगात आणखी एक काल्पनिक भूमिका जगायची आहे. पण दोघांचा उल्लेख एकत्र करायचं कारण? त्याला द्यायचा होता एक परफॉर्मन्स. तिलाही द्यायचा होता एक परफॉर्मन्स. हे परफॉर्मन्स दोघांच्या आयुष्यातले अतिशय महत्त्वाचे आहेत हे दिसतंय. काय घडणार, कसं घडणार याची सगळ्या संबंधितांना काळजी लागून राहिलेली स्पष्टच दिसतेय. पण सगळ्यात महत्त्वाचं साम्य म्हणजे, त्या दोघांनाही त्यांच्या सगळ्यात मोठ्या अडचणीवर मात करून हा परफॉर्मन्स द्यायचाय. आणि ही अडचण म्हणजे त्यांची भाषा.

तसं तर शेक्सपियर म्हणतो त्याप्रमाणे, सगळं जग हीच एक रंगभूमी आहे. मग जिथे एक भूमिकाच पार पाडायची आहे, तिथे सत्य-काल्पनिक, राजा-रंक या कशालाही अर्थ काय राहतो? पडदा दयामाया दाखवत नाही. आणि आपण या भूमिका वठवण्याच्या खेळात इतके समरसून गेलेले असतो, की आपल्यालाही याचा फारसा फरक पडत नाही. चिंता याचीच असते, की आता काय होणार? मग समोर ‘माय फेअर लेडी’ एलायझा डूलिटल असो, की ‘किंग्ज स्पीच’ देणारा सहावा जॉर्ज.

हे दोन्ही माझे अत्यंत आवडते चित्रपट. एलायझा डूलिटल म्हणजे फुलं विकणारी एक स्वप्नाळू मुलगी. तिचा ‘कॉकनी’ अ‍ॅक्सेंट सुधारून तिला सहा महिन्यांत एखाद्या खानदानी स्त्रीप्रमाणे बनवून दाखवतो अशी पैज लावणाऱ्या हेन्री हिगिन्स नामक ध्वनिशास्त्रज्ञाने तिला दिलेलं प्रशिक्षण यांची ही कथा. तर ‘द किंग्ज स्पीच’मध्ये अडखळत बोलणाऱ्या इंग्लंडच्या राजकुमाराला लायनल लोग या माणसाने त्याच्या अनोख्या पद्धतींनी अडखळण्यावर मात करायला शिकवण्याची कथा. यात माध्यम तर आहे भाषेचं, पण त्यातून येणारा न्यूनगंड आणि त्यावर मात करून येणारा आत्मविश्वास हा खरा या दोन्ही चित्रपटांचा आत्मा. पण ती भाषा, ती पडद्यावरचा अदृश्य, पण अतिशय व्यक्त स्वरूपातला कलाकार म्हणून वावरत राहते. ती नक्की कधी त्यांच्यावर कृपा करणार ही उत्सुकता आपल्याला अस्वस्थ करते. आणि गंमत म्हणजे नव्याने गवसलेल्या आत्मविश्वासातून आणि एक व्यक्ती म्हणून मिळालेल्या आदरातून आणि मायेतून त्यांचा आवाज त्यांना सापडतो आणि त्या आवाजातून त्यांचा आत्मविश्वास.

सहाव्या जॉर्जच्या अडखळत बोलण्याबाबतचा चित्रपट म्हणजे ‘द किंग्ज स्पीच’ आणि शॉच्या ‘पिग्मॅलियन’वर आधारित ‘माय फेअर लेडी’ हे दोन चित्रपट इतके प्रसिद्ध आहेत की त्यांच्याबद्दल फार सांगण्याची गरज नाही. तरी त्यांची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करते.

a

a
गादीचा दुसऱ्या क्रमांकाचा वारस म्हणून प्रिन्स अल्बर्टकडून अपेक्षा पण मोठ्या, आणि त्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याची निराशाही मोठी. लोकांचं मनोधैर्य उंचावणारी, राजघराण्याच्या रुबाबाला साजेशी भाषणे देणं, तीही रेडियोच्या काळात, ही जबाबदारी झटकून चालण्यातलंच नाही. पण अडखळत बोलणाऱ्या प्रिन्स अल्बर्टने नीट बोलणं जमण्याची आशा सोडूनच दिलेल्या परिस्थितीत त्याची बायको मात्र प्रयत्न करणं सोडत नाही. उत्तमोत्तम डॉक्टर्सची प्रत्यक्ष राजपुत्राला काय कमी? पण तरीही सुधारणा मात्र काहीच होत नाही. अशा परिस्थितीत लायनल लोग या माणसाची माहिती यांना मिळते. लोगचं स्वतःच्या नियमांनी चालणं राजपुत्राच्या मानी स्वभावाला पटत नाही, आणि यांच्या नात्याची सुरुवातसुद्धा तशी अडखळतच होते. पण विचित्र वाटल्या, तरी त्याच्या पद्धतींनी फरक पडू शकतो हे लक्षात आल्यावर सुरू होतो एका वेगळ्याच नात्याचा प्रवास. वरवर बाह्य उपचार करून लोग ‘बर्टी’च्या मनातील खोल रुतून बसलेले काटे हळुवारपणे काढत असतानाच राजाचा मृत्यू होतो, आणि एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होते. आता राजा बनलेल्या अल्बर्टचा मोठा भाऊ डेव्हिडला एका अमेरिकन घटस्फोटित बाईशी लग्न करायचं असतं. राजा म्हणून हे करता येणार नाही, म्हणून तो गादीवरचा त्याचा हक्क सोडून देतो, आणि आता अनपेक्षितपणे राजा बनायची जबाबदारी अल्बर्टवर येऊन पडते. याच दरम्यान लायनल लोगबद्दल काही गोष्टी समजल्याने त्यांच्या मैत्रीतही तणाव निर्माण होतो. या तणावांवर मात करेपर्यंत ब्रिटनवर युद्धाचे ढग गोळा होतात आणि राजा म्हणून असंख्य घाबरलेल्या लोकांना धीर देण्याची जबाबदारी सहाव्या जॉर्जवर (म्हणजेच प्रिन्स अल्बर्टवर) येऊन पडते. युद्धाच्या भीतीने घाबरलेल्या, कानांत जीव आणून त्यांच्या प्राणप्रिय राजाचं भाषण ऐकणाऱ्या असंख्य लोकांप्रमाणेच आपल्याही कानात जीव गोळा होतो, तो चित्रपटाचा क्लायमॅक्स असणाऱ्या या किंग्ज स्पीचसाठी.

a

आणि माय फेअर लेडीबद्दल तर काय बोलावं? मराठीतील ‘ती फुलराणी’ या रूपांतरणामुळे हा सगळ्यांना साधारण माहीतच आहे. खेडवळ बोली बोलणाऱ्या एलायझा डूलिटलला सहा महिन्यांत एखाद्या खानदानी स्त्रीसारखं बनवण्याची पैज लावणाऱ्या हिगिन्स मास्तरला माणुसकी म्हणतात ती नसतेच. जे इंग्लिश सुसंस्कृत समाजाचे रितीरिवाज तो एलायझामध्ये खिळा ठोकल्यासारखे ठोकण्याचा प्रयत्न करतो, त्याबद्दल त्याला स्वतःलाच काहीसा तिटकारा असतो. एलायझाच्या वडिलांच्या आयुष्याबद्दलच्या नीती-अनीतीच्या पलीकडच्या स्पष्ट संकल्पनांना दाद देणारा, श्वाससुद्धा मोजून-मापून घेतील अशा प्रतिष्ठित लोकांच्या गर्दीतील घोड्यांच्या शर्यतीत एलायझाच्या ‘कमॉन डोव्हर, मूव्ह येर ब्लूमिंग आर्स’ असल्या या लोकांना झीट आणणाऱ्या उत्स्फूर्त आरोळीवर मनापासून खो खो हसणारा हिगिन्स, तिच्या भाषेच्या बाबतीत मात्र तिचा अक्षरश: छळ करतो. रस्त्यावरच्या आयुष्याला सरावलेल्या, पण पूर्ण निरागस अशा एलायझाला थोड्याशा कौतुकाची आणि आदराची गरज आहे, हे ना तिला स्वतःला समजतं, ना हिगिन्सला. त्यांची हाऊसकीपर आणि ज्यांच्यासोबत पैज लावलेली आहे ते कर्नल पिकरिंग मात्र या सगळ्यात थोडी माणुसकी ठेवण्याचा प्रयत्न करतात. हा सगळा प्रवास संपवून सहा महिन्यांनी होणाऱ्या एका बॉलच्या वेळी एलायझाची परीक्षा होते. हिगिन्स, हिगिन्सची आई, कर्नल पिकरिंग आणि स्वतः एलायझा यांच्यासोबत आपणही तेवढेच ताणाखाली असतो, की एलायझा ही परीक्षा पार करणार का..?

a

राजेपणाचं अनपेक्षित ओझं झेपवणाऱ्या राजाचं, आणि साध्या साध्या स्वप्नांना घेऊन ‘वुडन्ट इट बी लव्हरली’ असं म्हणणाऱ्या फूलवालीचं जग आपल्याला सारखंच दूरचं. त्यांची दोघांची तळमळ आणि गरजपण सारखी नव्हेच; पण ऐन वेळी भूमिका वठवण्याचा ताण मात्र सारखाच. आणि वर म्हटल्याप्रमाणे या ताणात अदृश्यपणे, पण तरीही अतिशय जाणवेल अशी वावरत राहते ती दोघांची भाषा.

या दोघांच्याही व्यक्तिमत्त्वातला बदल घडत जाणं हे त्यांच्या भाषेतूनच ठळक दिसत जातं. एलायझाला काहीच जमत नाही म्हणून सतत दामटवणारा हिगिन्समास्तर तिला जेव्हा खरोखर माणुसकीने समजावतो, तेव्हा पहिल्यांदा तिला त्याच्या अपेक्षेप्रमाणे बोलणं जमतं. सुरुवातीच्या कडक शिस्तीला आणि सततच्या अपमानांना कंटाळून ‘जस्ट यू वेट हेन्री हिगिन्स’ अशी चिडचिड करणाऱ्या एलायझासाठी हे पहिलंवहिलं कमावलेलं कौतुक किती महत्त्वाचं असतं, हे तिच्या ‘आय कुड हॅव डान्स्ड ऑल नाईट’ या गाण्यातून जाणवतंच. हा पहिला अडथळा पार केल्यावर पुढे जाणं तसं तुलनेने सोपं जातं. तसंच जॉर्जचं. त्याला न अडखळता बोलता येऊ शकतं, हा आत्मविश्वास त्याच्या ‘टू बी ऑर नॉट टू बी’ रेकॉर्डिंगमधून येतो, आणि तो आत्मविश्वास आणि लोगवरचा विश्वास त्याच्या शेवटच्या स्पीचपर्यंत त्याला घेऊन जातात.

आणि शेवटचा परफॉर्मन्स म्हणजे या दोघांची खरीखुरी कसोटीच. एलायझाची परीक्षा करणारा ध्वनिशास्त्रज्ञ आणि महायुद्धाच्या तोंडावर राजाचं भाषण ऐकणारे हजारो लोक यांची तुलना करता येत नाही, पण त्या दोघांवरचा ताण मात्र सारखाच दिसून येतो. आणि हा एक परफॉर्मन्स संपल्यावर दोघांमध्ये झालेला प्रचंड बदल अगदी दृश्य स्वरूपात जाणवतो. ‘एलायझावर उपकार म्हणूनच आपण हे सगळं केलेलं आहे’ या त्याच्या स्वभावाला साजेशा भ्रमात असणाऱ्या हेन्री हिगिन्सशी जोरात भांडून निघून गेलेली एलायझा ‘भाषेच्या जोरावर मी माझं स्थान निर्माण करेन’ हे त्याला ऐकवते, तेव्हा जाणवतं की तो तिला मिळालेला आत्मविश्वास नुसताच बोलण्याच्या बाबतीत नाही, तर तिच्या व्यक्तिमत्त्वातच आलेला आहे. आणि त्याच्या भाषणानंतर बाहेर पडणाऱ्या राजा जॉर्जच्या देहबोलीमधूनही हेच जाणवतं.

हे दोन्ही चित्रपट म्हटले तर अगदीच वेगळे आहेत. तसे तर भाषेबद्दल नाहीत. विश्वास, आत्मविश्वास, आणि एकूणच एका प्रकारचा ‘मेक ओव्हर’ या दोघांच्या थीम म्हणता येतील. पण तरीही, या दोन पात्रांच्या सोबती-सोबतीने सावलीसारखी वावरणारी त्यांची भाषा ज्या ताकदीने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या छटा पडद्यावर आणते, त्यावरून तिला या दोन्ही चित्रणांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आलेलं आहे, हे मात्र नक्कीच.

प्रतिक्रिया

दोन्ही चित्रपटांबद्दल उत्तम लिहिलंस. माय फेअर लेडी पाहिलाय, पण ह्या दुसर्‍य चित्रपटाबद्दल माहित नव्हते. शोधून पाहीन नक्की.

अवांतरः तू नेहमीच उत्तम लिहितेस म्हणा, त्यात नवीन काहीच नाही :) ज्या काही मोजक्या मिपाकरांचं लेखन मी आवर्जून वाचते त्यात तुझा समावेश आहे.

दोन्ही अप्रतिम चित्रपट आहेत.

अवांतराला +१.

पैसा's picture

21 Jan 2017 - 12:57 pm | पैसा

छान ओळख

सिरुसेरि's picture

21 Jan 2017 - 1:07 pm | सिरुसेरि

छान माहिती . पिग्मॅलिअन , माय फेअर लेडी , ती फुलराणी , मनपसंद , हमाल दे धमाल या सर्व कलाकॄती एकाच कथेवर आधारीत आहेत .

इशा१२३'s picture

21 Jan 2017 - 1:22 pm | इशा१२३

सुंदर ओळख पिशे!

सामान्य वाचक's picture

21 Jan 2017 - 1:38 pm | सामान्य वाचक

लेख पण मस्त जमला आहे,
Colin firth ने अफाट काम केले आहे चित्रपटात

आणि my fair lady तर कधीही पहिला तरी तेव्हढाच आवडतो,

पद्मावति's picture

21 Jan 2017 - 2:10 pm | पद्मावति

सुरेख लेख.

चित्रपट बघितले नाहीत....आता बघण्यात येईल.

रेवती's picture

21 Jan 2017 - 7:12 pm | रेवती

लेखन आवडले.

प्रीत-मोहर's picture

21 Jan 2017 - 7:55 pm | प्रीत-मोहर

सुरेख.

कवितानागेश's picture

21 Jan 2017 - 10:19 pm | कवितानागेश

दोन्ही चित्रपटांचा गाभा उत्तम मांडलाय.

बोका-ए-आझम's picture

22 Jan 2017 - 10:31 am | बोका-ए-आझम

सुरेख लेख पिशीतै! रच्याकने उच्चारांवरुन उच्चभ्रू आणि सामान्य हे ठरवणं कसं आणि कधीपासून सुरु झालं हे कुतूहल आहे. त्याबद्दल काही सांगू शकाल का?

हे परिक्षण वाचून द किंग्ज स्पीच पाहीला. अप्रतिम चित्रपट आहे. तुम्ही भारी लिहिलंत खरेच.

संदीप डांगे's picture

22 Jan 2017 - 5:45 pm | संदीप डांगे

दोन्ही चित्रपटांची ओळख छान करुन दिलीत! एका उत्तम लेखाचा नमुना आहे हा लेख!

द किंग्ज् स्पीच बद्दल खूप कौतुक ऐकलं होतं... तुमचा लेख वाचून ट्रेलर आणि काही सीन बघितलेत... जबरदस्त आहे. बघायला पाहिजे पूर्ण.

हे दोन्ही चित्रपट म्हटले तर अगदीच वेगळे आहेत. तसे तर भाषेबद्दल नाहीत. विश्वास, आत्मविश्वास, आणि एकूणच एका प्रकारचा ‘मेक ओव्हर’ या दोघांच्या थीम म्हणता येतील.

हे असंच काहीसं मला क्विन आणि इंग्लिश विंग्लीश या दोन चित्रपटांबद्दल वाटतं.

मधुका's picture

23 Jan 2017 - 3:51 pm | मधुका

समीक्षात्मक तुलना आवडली. पण "हे दोन्ही चित्रपट म्हटले तर अगदीच वेगळे आहेत. तसे तर भाषेबद्दल नाहीत." हे पटले नाही. भाषा हाच तर गाभा आहे. आत्मविश्वासाच्या स्टेशनला पोचायला भाषेचेच तर वाहन वापरले आहे.

जव्हेरगंज's picture

23 Jan 2017 - 7:09 pm | जव्हेरगंज

छान ओळख!

दोन्ही सिनेमे डाऊनलोडायला लावलेत!!

पिशी अबोली's picture

24 Jan 2017 - 10:10 am | पिशी अबोली

धन्यवाद!