साईट (SITE) आणि खेडा प्रकल्प

प्रदीप's picture
प्रदीप in लेखमाला
24 Jan 2017 - 6:16 am

*/

१ ऑगस्ट १९७५ ह्या दिवशी भारतात प्रथम उपग्रहाद्वारे दूरचित्रवाणीचा कार्यक्रम देशभर प्रसारित केला गेला. ह्या दिवशी आपल्या Satellite Instructional Television Experiment (SITE) ह्या एकवर्षीय कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. इस्रोच्या अहमदाबाद येथील 'स्पेस अ‍ॅप्लिकेशन्स सेंटर'ने ('सॅक'ने) ह्या प्रयोगाचे संकल्पन व संपूर्ण व्यवस्थापन केले. त्यात त्याला इतर अनेक सरकारी व निमसरकारी आस्थापनांप्रमाणे, ऑल इंडिया रेडियोचे सहकार्य लाभले. सदर प्रयोगात वर्षभर शिक्षण व माहितीविषक कार्यक्रम दिल्ली व अहमदाबाद येथील उपग्रहकेंद्रांतून उपग्रहाकडे पाठवले जात. तेथून प्रक्षेपित होणारे हे कार्यक्रम देशभरातील २,४०० खेड्यात उभारलेले DRS (Direct Receiving Sets) चित्रसंच वापरून तेथील जनतेस बघता येत. ह्याचसमवेत 'सॅक'तर्फे 'खेडा प्रकल्पा'चाही आरंभ करण्यात आला. ह्या प्रकल्पायोगे सॅकच्या अहमदाबादेतील स्टुडियोतून कार्यक्रम पाठवले जात व ते खेडा जिल्ह्याच्या मध्यभागी असलेल्या 'पिज' ह्या गावात बसवलेल्या कमी शक्तीच्या भूतलीय प्रक्षेपण केंद्रातून प्रसारित केले जात. कार्यक्रम बघता येण्यासाठी गुजरातेतील खेडा जिल्ह्यातील सुमारे ४०० गावांतून कम्युनिटी चित्रसंच बसवण्यात आले होते. 'साईट' वर्षभराचा प्रयोग होता व तो ३१ जुलै १९७६ रोजी संपुष्टात आला. खेडा प्रसारण १९८५ सालपर्यंत सुरू होते.

१९६३ साली डॉ. विक्रम साराभाईंना वाटले की दूरवर पसरलेल्या खेड्यापाड्यातील जनतेशी संपर्क साधण्यासाठी भारताने उपग्रहातर्फे संदेशवाहनाचा वापर करावा. त्यांनी सरकार-दरबारी ह्याचा पाठपुरावा केला व १९६७ साली UNDPतर्फे, सॅकच्या अहमदाबादेतील प्रांगणात, Experimental Satellite Communications Earth Station (ESCES) उभारण्यात त्याची परिणती झाली. उपग्रह दूरचित्रवाणीच्या तत्कालीन प्राथमिक तंत्रज्ञाना विकसित झाल्यावर आपणास खेड्यापाड्यातील जनतेशी संपर्क साधण्यासाठी त्याचा वापर कसा करता येईल, ज्यायोगे त्या जनतेची सामाजिक प्रगती साधता येईल, ह्याचा अतिशय दूरदर्शी असलेल्या डॉ. साराभाईंना जणू ध्यासच लागून राहिला. त्यांच्या ह्या प्रयत्नास भारत सरकारने साथ दिली व त्यातून 'साईट' प्रयोगाची उभारणी झाली. ह्या प्रयोगास आपणास UNDP व अमेरिकन स्पेस एजन्सी 'नासा' ह्यांचे बहुमोल सहकार्य लाभले. नासाने १९७५ साली एक वर्षासाठी त्यांचा भूस्थिर ATS-6 उपग्रह ह्यासाठी वापरण्यास दिला, तसेच 'सॅक'ने विकसित केलेल्या व ECILने बनवलेल्या DRS चित्रसंचाची तपासणी करण्याचेही कार्य केले.

साईटसाठी दोन प्रकारचे कार्यक्रम निश्चित करण्यात आले होते. ५ ते १२ वयाच्या मुलांसाठी शैक्षणिक कार्यक्रम व प्रौढांसाठी माहिती देणारे कार्यक्रम. ह्यांपैकी शैक्षणिक कार्यक्रम सॅकच्या मुंबई येथे उभारलेल्या छोटेखानी स्टुडियोत बनविण्यात आले, तर माहिती देणारे कार्यक्रम ऑल इंडिया रेडियो (ज्याचा 'दूरदर्शन' तेव्हा एक विभाग होता) ह्यांच्या दिल्ली, कटक व हैदराबाद येथील 'बेस प्रॉडक्शन सेंटर्स'मध्ये (BPCमध्ये). शैक्षणिक कार्यक्रम दररोज दुपारी, तर प्रौढांचे कार्यक्रम संध्याकाळी प्रसारित केले जात.

ही २,४०० खेडी ६ समूहांत विभागलेली होती. हे समूह ठरविताना आर्थिक मागासलेपण हा एक महत्त्वाचा निकष मानण्यात आला, ज्यायोगे सदर प्रयोगाच्या उपयुक्ततेची पडताळणी करता यावी. तसेच विशेष दूरचित्रवाणी संच (डी.आर.एस.) बसविण्यासाठी व ते कार्यरत ठेवण्यासाठी आवश्यक दळणवळणाची उपलब्धताही लक्षात घ्यावी लागली. हे निकष लावून राजस्थान, बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश व कर्नाटक ह्या राज्यांत सदर समूह निश्चित करण्यात आले. प्रत्येक समूहात डी.आर.एस.एस. संचांच्या देखभालीसाठी एक मध्यवर्ती केंद्र उभारण्यात आले. डी.आर.एस. संचात ३ मीटर एक व्यासाचा अँटेना, फ्रंट-एंड कन्व्हर्टर व त्यांना जोडलेला विशेष डिझाइनचा दूरचित्रवाणी संच असे. समूहातील गावे निवडताना काही तांत्रिक बाबींचा विचार करावा लागला - मध्यवर्ती देखभाल केंद्रापासून वर्षाचे निदान १० महिनेतरी गावात पोहोचता यावे, गावात घरगुती वापराची वीज उपलब्ध असावी व संच उभारण्यास सुयोग्य अशी इमारत असावी.

राष्ट्रीय एकात्मता, स्वास्थ्य व पोषण, शेतीचा विकास, लोकसंख्या नियंत्रण, शास्त्रीय दृष्टी विकसित करणे ह्यांवर कार्यक्रमांचा भर होता. शैक्षणिक कार्यक्रम बनविण्यामागील मूळ प्रेरणा 'सॅक'चे तेव्हाचे संचालक प्रा. यश पाल ह्यांनी अतिशय नेमक्या शब्दांत सांगितली होती - "ग्रामीण परिसर हीच प्रयोगशाळा असलेल्या अशा कार्यक्रमांचं उद्दिष्ट मग चार भिंतीतल्या फळा, बाक आणि उपकरणं यापुरतं मर्यादित राहत नाही. अशा वेळी, विज्ञान हे लहान मुलांच्या अभ्यासक्रमातील एक दिखाऊ उपचार न राहता, त्यांच्या बौद्धिक आणि सामाजिक जाणिवांचाच एक भाग बनावं यासाठी खास प्रयत्न केले जातात". मुलांच्या आवतीभोवती असलेल्या लहानसहान गोष्टींकडे, तसेच आजूबाजूस घडणार्‍या छोट्यामोठ्या घटनांकडे मुलांना शास्त्रीय दृष्टीकोनातून पाहता यावे, असा प्रयत्न ह्या कार्यक्रमांतून केला गेला. दूरचित्रवाणीमधून दर्शविण्यात येणार्‍या चित्रांतून, आवाजांतून खेडेगावांतील जनतेला काय अर्थबोध होतो, त्यांतील जे काही सांगायचे आहे, ते त्यांच्यापर्यंत पोहोचते का, ह्यासंबंधी १९७३ सालापासून 'साईट'च्या निमित्ताने संशोधन करण्यात आले. त्यातून काही महत्त्वाच्या बाबी समजल्या – उदाहरणार्थ, 'अ‍ॅनिमेशन' माहिती प्रसारणासाठी अजिबात उपयुक्त नाही, फ्लॅशबॅक व फ्लॅशफॉरवर्ड ही तंत्रे गोंधळ निर्माण करतात, वगैरे. तसेच, प्रत्येक शैक्षणिक कार्यक्रम तयार करण्याअगोदर त्याविषयी 'होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन' ह्या टी.आय.एफ.आर.शी संलग्न संस्थेच्या शास्त्रज्ञांशी सविस्तर सल्लामसलत होत असे. प्रौढांसाठीच्या कार्यक्रमांच्या रूपरेषा आखायच्या अगोदर, 'सॅक'च्या सामाजिक शास्त्रज्ञांतर्फे गावांतून जाऊन त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या अडचणी निवारण्यात प्राधान्य, त्यांच्या मते कशाला असावे, ह्यांविषयीची माहिती घेऊन ती संकलित करण्यात आली होती.

कार्यक्रमांच्या प्रसारणांच्या दरम्यान 'सॅक'चे सामाजिक शास्त्रज्ञ गावांतून हजर राहून गांवकर्‍यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांना कितपत अर्थबोध होत आहे, ह्याची माहिती गोळा करीत राहिले. ह्या संकलित माहितीचा पुढे उपयोग व्हावा, असा त्यामागील उद्देश होता.

'साईट'मधून दूरचित्रवाणीचे कार्यक्रम अगदी दूरस्थ गावांत पोहोचविता येत आहेत व त्यांतून देशाच्या प्रगतीची नवी दालने उघडत आहेत, हे जरी खरे असले, तरी त्यांत एक प्रकारचे केंद्रीकरण आहे, हे संबंधितांच्या लक्षात होते व म्हणून त्याला पूरक अशी खेडा प्रकल्पाची योजना करण्यात आली. ह्या योजनेत अंतर्भूत कार्यक्रम स्थानिक निर्मितीचे असावेत, खेडा जिल्ह्याच्या ग्रामस्थांच्या आशा-आकांक्षा, त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडीअडचणी त्यांत प्रतिबिंबित व्हाव्यात, अशी ही योजना होती. आणि मुख्य म्हणजे ह्या कार्यक्रमांत त्या ग्रामस्थांचा प्रत्यक्ष सहभाग असणार होता.

हे कार्यक्रम निर्मिणारे 'सॅक'चे निर्माते कुणी 'वरून पडलेली' शहाणी माणसे नव्हती, ती कसलेही प्रश्न सोडवण्याचे उपाय घेऊन खेड्यात गेली नव्हती. ह्या कार्यक्रमांच्या माध्यमांतून ग्रामस्थांना आपापसांत विचारांची, माहितीची देवाणघेवाण करता यावी, तसेच त्यांना त्यांच्या जीवनास स्पर्श करणार्‍या अनेक सत्ताकेंद्रांशी सुसंवाद साधता यावा, मुख्य म्हणजे त्यांना त्यांचे स्वतःचे भान यावे, असा ह्या कार्यक्रमांचा माफक उद्देश होता. 'साईट'प्रमाणेच इथेही कार्यक्रमांची रूपरेषा आखताना सामाजिक शास्त्रज्ञांनी जमविलेल्या माहितीचा उपयोग केला जाई. त्याचबरोबर अनेकदा स्थानिक बँका, निरनिराळ्या सहकारी संस्था, सरकारी व ऐच्छिक कार्य करणार्‍या संस्था ह्यांच्याबरोबरही चर्चा केली जाई. बहुधा विषय-तज्ज्ञ ह्या संस्थांतून आलेली व्यक्ती असे. अशा व्यक्तींना स्वतःच हे कार्यक्रम बनविण्यास प्रोत्साहन दिले जाई. ह्यासाठी 'सॅक'च्या स्टुडियोशी संबंधित व्यक्ती त्यांना कार्यक्रम बनविण्यातले प्राथमिक प्रशिक्षण देत.

खेडा प्रकल्पाच्या दरम्यान कार्यक्रम निर्मीतीची काही नवनवी स्वरूपे चोखाळली गेली. उदाहरणार्थ, शेतीविषयक कार्यक्रमांत शेतीतज्ज्ञ प्रत्यक्ष शेतांवर जाऊन शेतकर्‍यांशी सल्लामसलत करीत, तेव्हा शेतकरी त्यांना शेतीविषयक प्रश्न विचारीत; इतकेच नव्हे, तर तज्ज्ञांशी ते कधीकधी वादही घालीत. हे सर्व रेकॉर्ड केले जाई व त्या त्या कार्यक्रमात अंतर्भूत केले जाई. असा कार्यक्रम प्रक्षेपिल्यानंतर काही आठवड्यांत तोच तज्ज्ञ त्याच शेतावर जाऊन शेतकर्‍याशी पुन्हा चर्चा करी, त्याच्या शंकेचे निराकरण पूर्ण झाले आहे का, तसेच त्याने सुचविलेल्या योजनेचा फायदा झाला अथवा कसे, ह्याविषयी तो माहिती घेई. पुन्हा हे सर्व रेकॉर्ड केले जाई व त्या पाठपुराव्याच्या कार्यक्रमात दाखविले जाई. काही कार्यक्रम ग्रामस्थांना वेळोवेळी येणार्‍या अडचणींवर असत - उदाहरणार्थ, खते, बी-बियाणे, वीज, पंपासाठी लागणारे डिझेल इत्यादींचा तुटवडा, बँकांकडून मिळणार्‍या कर्जांविषयींच्या अडचणी इत्यादी. ह्या अडचणी शेतकर्‍यांनी सांगताना ते रेकॉर्ड केले जाई व ते संबंधित अधिकार्‍यांना दाखविले जाई. त्यावर त्यांची उत्तरे रेकॉर्ड केली जात. हे सर्व कार्यक्रमांतून प्रसारित केले जाई. अशा तर्‍हेने आपल्या अडचणींचे निवारण होत आहे हे पाहिल्यावर मग बरेचदा शेतकरी स्वतः स्टुडियोत येऊन त्यांची गार्‍हाणी सांगू लागले, व 'हे आता प्रक्षेपित करा, म्हणजे अडचण सुटण्यास मदत होईल' अशी विनंती करू लागले.

*******************
'सॅक'चा स्टुडियोतील अभियंता (ब्रॉडकास्ट टेलीव्हिजन इंजीनियर) म्हणून मी संपूर्ण 'साईट' व खेडा प्रकल्पाच्या पहिल्या तीन वर्षांत, मी 'सॅक' सोडेपर्यंत भाग घेतला. ह्या दोन्ही प्रकल्पांसाठी तिथे असलेली साधनसामुग्री अतिशय अद्ययावत होती. ह्या स्टुडियोंची डिझाइन्स व त्यांत वापरावयाची सामग्री निवडणार्‍या माझ्या सीनियर इंजीनियर्सनी - प्रामुख्याने पद्मश्री श्री. प्रमोद काळे (ज्यांनी नंतर 'सॅक' तसेच 'विक्रम साराभाई स्पेस सेंटर' यांची संचालकपदे भूषविली) व श्री. जी.सी. जैन ह्या दोघांनी - अतिशय हुशारी व कल्पकता दाखविली होती. स्टुडियोत वापरायचे अगदी प्रथम दर्जाचे व्हिडिओ टेप रेकॉर्डर्स तेव्हा अतिशय खर्चीक असत. ह्या प्रकल्पांसाठी ते बर्‍याच संख्येने वापरायचे असल्याने ते परवडले नसते. तेव्हा त्यांपेक्षा बर्‍याच - अंदाजे २० टक्के किंमतीचे व्हिडिओ टेप रेकॉर्डर्स वापरण्यात आले. ह्याबरोबर 'डिजिटल टाईमबेस करेक्टर्स' वापरले गेले. हे नियोजन साधारणपणे १९७२-३ साली केले गेले असावे. हे आम्ही १९७४पासून वापरू लागलो, त्यांची देखभाल करू लागलो. अशा तर्‍हेने 'डिजिटल टेलेव्हिजन'ची पहाट भारतात, जगाबरोबरीनेच, म्हणजे सत्तरीच्या दशकातच झाली होती! आमच्या अभियांत्रिकी विभागाचा एक संशोधन व विकास (R & D) उपविभागही होता. त्यात मिळत असलेल्या अनुभवाचा वापर करून आम्ही त्या वेळी स्टुडियोसाठी लागणारी (कॅमेरा व व्हिडिओ टेप रेकॉर्डर सोडून) सर्वच उपकरणे स्वतः विकसित केली होती. मुख्य म्हणजे ह्या उप-विभागाने विकसित केलेला डिजिटल टाईमबेस करेक्टर आम्ही वापरत असलेल्या करेक्टरपेक्षाही चांगले कार्य करत होता. तसेच 'सॅक'ने बाहेरील चित्रीकरणासाठी फिल्म्सच्या जोडीस 'सोनी' कंपनीचे १/२" पोर्टेबल व्हिडिओ टेप रेकॉर्डर्स वापरण्याचा प्रयोग केला. तो इतका यशस्वी झाला की मग फिल्म्सचा वापर कमीकमी होऊन संपूर्ण थांबलाच. आणि हे सर्व १९७५-७६ साली झाले होते!

'सॅक'च्या स्टुडियोत निरनिराळ्या प्रकारची - अभियंते, दिग्दर्शक, कॅमेरामन, संकलक, ध्वनिअभियंता, पटकथा लेखक तसेच वेगवेगळ्या हुद्द्यांवरील व्यवस्थापक - कामे करणार्‍या बहुतांश सर्वांचा हा नोकरीचा पहिलावहिला अनुभव होता. आमच्या संघाचे सरासरी वय विशीतलेच होते. ह्यामुळे, तसेच कामाच्या उद्दिष्टांच्या कल्पनेने वातावरण अतिशय उत्साही, भारलेले असायचे. आमच्या येथे केल्या जाणार्‍या कार्यक्रमांत भाग घेण्यास तेव्हाचे चित्रपट व नाट्य क्षेत्रांतील अभिनेते व अभिनेत्री आनंदाने येत. त्यांच्यासाठीही हे नवे क्षेत्र होते, नवा अनुभव होता. चरित्र अभिनेता मनमोहन कृष्ण, तरला मेहता, लीला गांधी, हरीश भिमानी, महापात्रा, सुलभाताई देशपांडे ही आताही मला सहज आठवत आहेत अशी काही ठळक नावे. वर उल्लेखिलेल्याप्रमाणे आम्ही अगदी टॉप मॉडेलचा व्हिडिओ टेप रेकॉर्डर न वापरता, कमी किमतीचा वापरत होतो. त्याचा एक परिणाम असा की कार्यक्रमात शक्य तेवढे संकलन करणे टाळणे. म्ह़णजे आम्हाला सुमारे १३ मिनिटांचा प्रत्येक शैक्षणिक कार्यक्रम एकाच सलग टेकमध्ये शक्यतो करावा लागे. अगदी जरूरच पडली, तर मध्ये एखाद-दुसरे संकलन केले जाई. चित्रपट कलाकारांना ह्याचा थोडाफार त्रास होई, कारण त्यांना ह्याची सवय नसे. ह्यामुळे एकदा एक तत्कालीन चरित्र-अभिनेता (जो पुढेही अनेकदा प्रेमळ बापाच्या भूमिकेत दिसत राहिला) इतका त्रस्त झाला, की शेवटी तो सरळ सेट सोडून चालू लागला. पण असा वाईट अनुभव एखादाच आला.

आमच्या येथे कार्यरत असलेल्या दिग्दर्शक-निर्मात्यांत नंतर नावारूपास आलेली काही नावे म्हणजे कमल स्वरूप, केतन मेहता, जाहनू बारुआ, अरूण खोपकर. पण ह्या सर्वांपेक्षा माझ्या मनात घर करून राहिला तो के. विश्वनाथ. हा अतिशय उच्च दर्जाचे काम करीत असे. कार्यक्रमाची आखणी, प्रत्यक्ष लाईव्ह टेकिंग, कॅमेरा शॉट्स, वापरावयाचे 'एफेक्ट्स' ह्या सर्वांबद्दलची त्याची जाण अतिशय वरच्या दर्जाची होती. त्यामुळे त्याचे चित्रीकरण अतिशय सुबक व मोहक असेच पण ते खोलवर परिणाम करून जाई. त्याने स्टुडियोत चित्रीकरण केलेल्या मल्लिका साराभाईंच्या 'दर्पण' ह्या नृत्यसंस्थेच्या नृत्याचा कार्यक्रम अजूनही डोळ्यांसमोर आहे. त्याचप्रमाणे त्याच्याबरोबरीने खेडा प्रकल्पासाठी लाईव्ह चित्रित केलेली 'शोषण'वरील सीरियल. ही सीरियल त्याने आनंद तालुक्यातील खंभात ह्या गावी ओ.बी. व्हॅन नेऊन चित्रित केली. आर्थिक पिळवणूक, गुलामी, लैंगिक शोषण असे तिचे भाग होते. चित्रीकरणात भाग घेणारे सर्व कलाकार तेथील स्थानिकच होते. प्रत्येक भागासाठी त्यांना फक्त आराखडा देण्यात येई, त्यानुसार ते सर्व स्वतःच इंप्रोव्हायझेशन करत संवाद म्हणत, अभिनय करत. हे सर्व अगदी वेगाने पार पडत होते, आणि ते बेहद्द परिणामकारक होत होते, कारणे ती सर्व माणसे तळागाळातून आलेली होती. ती जो काही अभिनय करत होती, ते खरे तर त्यांचे रोजचे आयुष्यच कॅमेर्‍यांपुढे मांडत होती, इतकेच!

'सॅक'मध्ये ह्या दोन्ही प्रकल्पांना अतिशय उच्च दर्जाचे व दूरदर्शी व्यवस्थापन लाभले ते पद्मभूषण प्रा. यश पाल ह्यांचे. त्यांच्याबद्दल आम्हास आदरयुक्त दरारा वाटे. त्यांच्याबरोबर प्रा. एकनाथ चिटणीस व किरण कर्णिक ह्यांचाही उल्लेख केला पाहिजे. कर्णिकांकडे 'साईट' व खेडा प्रकल्प अशा दोघांच्याही ऑपरेशन व्यवस्थापनाची जबाबदारी होती, ती त्यांनी अतिशय निगुतीने निभावून नेली.

हे सर्व घडून गेल्याला आता चाळीसहून अधिक वर्षे लोटली आहेत. 'सॅक' सोडल्यानंतर ह्याच क्षेत्रात, पण व्यावसायिक आस्थापनांतून माझा सर्व प्रवास होत राहिला आहे. ह्या क्षेत्रात मी तंत्राची व म्हणून कार्यपद्धतीचीही अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत, अजूनही पाहतो आहे. आता चालू असलेल्या व्हिडिओ स्ट्रीमिंगमुळे, तसेच कॉंप्युटर क्षेत्रांतील घडत असलेल्या नवनवीन बदलांमुळे, ज्याला 'उलथापालथ' (disruptive) म्हणावीत अशी नवी क्षितिजे आमच्या व्यवसायाच्या दृष्टिपथात येत आहेत. हे सगळे अतिशय रोमांचक आहे, हे खरे. तरीही मागे वळून पाहिल्यावर तेव्हा भाग घेतलेल्या त्या दोन्ही कार्यांविषयी आजही अचंबा व कौतुक वाटते आहे. इतक्या वर्षांपूर्वी भारतात आपण - म्हणजे एका सरकारी आस्थापनाने - असे काही केले होते, ह्याविषयी आजच्या पिढीस थोडीफार माहिती व्हावी, म्हणून त्यात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या मी हे लिहायचे ठरविले.

प्रतिक्रिया

पैसा's picture

24 Jan 2017 - 12:53 pm | पैसा

उत्कृष्ट माहितीपूर्ण लेख. प्रदीपदा, फार कमी लिहिता ही तक्रार आहे! :)

नंदन's picture

3 Feb 2017 - 1:49 pm | नंदन

उत्कृष्ट माहितीपूर्ण लेख. प्रदीपदा, फार कमी लिहिता ही तक्रार आहे! :)

असेच म्हणतो. या विषयातल्या जाणकार व्यक्तीने लिहिलेले असे नेटके लेख आंजावर सोडाच, मराठी छापील साहित्यातही विरळाच.

यशोधरा's picture

24 Jan 2017 - 2:27 pm | यशोधरा

लेख अतिशय आवडला.

पद्मावति's picture

24 Jan 2017 - 2:43 pm | पद्मावति

उत्तम, माहितीपूर्ण लेख. खूप आवडला.

शलभ's picture

24 Jan 2017 - 3:18 pm | शलभ

खूप मस्त लेख..आवडला..

वरुण मोहिते's picture

24 Jan 2017 - 4:03 pm | वरुण मोहिते

माहितीपूर्ण लेख

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jan 2017 - 11:24 pm | अत्रुप्त आत्मा

+१

राही's picture

24 Jan 2017 - 6:32 pm | राही

'साइट'मुळे शिक्षणक्षेत्रात खूप कुतूहल आणि एक्साइट्मेन्ट निर्माण झाल्याचे आठवते. तांत्रिक बारकावे कळण्याचे वय अजिबातच नव्हते. पण चार-पाच वर्तमानपत्रे घरी येत आणि त्यांत हा विषय ठळकपणे असे. त्यात काही कळत नसताही केवळ वाचनाच्या आवडीमुळे सर्व बातम्या वाचलेल्या आठवतात. आपल्या देशात काहीतरी नवे, अतिशय महत्त्वाचे घडत आहे यातला थरार जाणवलेला आणि अभिमान वाटलेलाही आठवतो. या कार्यात आपला वाटा होता हे कळून आपल्याप्रति आदर दुणावला आहे.
एका अल्प अश्या सुंदर कालखंडाचे या लेखामुळे दस्तावेजीकरण झाले आहे. लेखन आवडले हेवेसांन.

फेदरवेट साहेब's picture

24 Jan 2017 - 6:52 pm | फेदरवेट साहेब

मी तुम्हाला दंडवत करतोय तो कृपया स्वीकारावा ही विनंती करतो प्रदीपजी. काय काय माणिकमोती भरलेत भाऊ मिपा मध्ये. मजा आली वाचून.

पण खरे सांगू हेलावून गेलो हे प्रयास वाचून. आम्ही २१व्या शतकातली पोरे. असले काही वाचले की आपल्या बापजाद्यांनी काय कोटीच्या कमिटमेंटने काय मेहनत केली होती अन ते ही किती तुटपुंज्या रिसोर्सेस मध्ये हे वाचून उर भरून आला. आज अगदी नागालँडच्या टोकावरचे खेडे ते कच्छचे रण अन काश्मीर ते कन्याकुमारी कुठलंही गाव घ्या तिथे किमान बॅटरी पोचल्या आहेत. दूरदर्शनचे फ्री टू एयर डिटीएच पोचले आहेत. हे आम्हाला नॉर्मल आहे हो, पण हे सगळे पाहताना तुम्हाला काय भावना दाटून येत असतील ह्या विचारानेच खूप समृद्ध वाटायला लागते एकदम. डॉक्टर साराभाई ह्यांनी पोटच्या पोराप्रमाणे जपलेली इसरो आज गरुडाचे पंख घेऊन उडते आहे अन पूर्ण जगात 'मिशन स्टेटमेंट' मध्ये वेगळेपण म्हणजेच 'स्पेस प्रोग्रॅम फॉर बेटरमेन्ट ऑफ पीपल' सिद्ध करते आहे. त्याला लोकांपर्यत पोचवायला तुम्ही जे काम केले आहे त्याला मी एक सामान्य भारतीय म्हणुन नमन करतो. हे सगळे वाचताना आज भारताची इन्सॅट उपग्रह प्रणाली जागतिक स्टेज वर एक सर्वात मोठी प्रक्षेपण यंत्रणेचा भाग आहे त्याला तुम्ही माणसे कारणीभूत आहात. आभार.

संदीप डांगे's picture

25 Jan 2017 - 10:42 am | संदीप डांगे

+१०००००००००००००००

यशोधरा's picture

25 Jan 2017 - 10:43 am | यशोधरा

बाडीस!

पद्मावति's picture

25 Jan 2017 - 11:14 pm | पद्मावति

+१००० फेदरवेट साहेब, योग्य आणि सुंदर प्रातिसाद.

अनन्त अवधुत's picture

27 Jan 2017 - 8:10 am | अनन्त अवधुत

+१११११११११११.....
ह्या कार्यात भाग घेणाऱ्या सर्वांना दंडवत __/\__

दा विन्ची's picture

25 Jan 2017 - 10:55 pm | दा विन्ची

दंडवत सरजी. लेख खूपच आवडला.

दा विन्ची's picture

25 Jan 2017 - 10:55 pm | दा विन्ची

दंडवत सरजी. लेख खूपच आवडला.

दा विन्ची's picture

25 Jan 2017 - 10:56 pm | दा विन्ची

दंडवत सरजी. लेख खूपच आवडला.

राही आणि फेदरवेट साहेब यांना +१.

लेखात जर फोटो देता आले असते तर अजून छान वाटले असते. किमान या प्रकल्पात सहभागी व्यक्तींचे काम करतानाचे फोटो, उदा. प्रा. यशपाल प्रोजेक्टची पाहणी करत आहेत, किंवा त्या यंत्रसामग्रीचे फोटो इत्यादी. असे फोटो आहेत का?

सुबोध खरे's picture

27 Jan 2017 - 10:36 am | सुबोध खरे

इसरो च्या असंख्य कार्यापैकी एक महत्त्वाचे कार्य १९८९ साली ओखा( गुजरात) येथे असताना पाहिले होते.
IRS १ म्हणजे INDIAN REMOTE SENSING SATTELITE याने गुजरातच्या किनार्याच्या आसपास असलेले पाण्याचे तापमान तपासले जात असे आणि या तापमानाच्या बदलाची रेषा ठरवली जात असे. म्हणजे पाण्याचा एक प्रवाह १८ 'सेल्सियस आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला १९ ' सेल्सियस असेल तर हि दोन प्रवाहातील रेषा तपासून ती रोज सकाळी दीव आणि जामनगर आकाशवाणीवरून प्रसारित होत असे. कारण या रेषेच्या आसपास सर्व मासे एकत्र होतात. यामुळे भारतीय मच्छीमार बरोबर त्या रेषेच्या जवळ मासे पकडत ज्यामुळे भरपूर मासेही मिळत आणि त्यांचा समुद्रात नुसते भटकण्याचा वेळ वाचत असे शिवाय डिझेलची बचत होत असे.
माझे हे थंड रक्ताचे प्राणी असल्याने त्यांना आपले शरीर आपण ठेवतो तसे गरम ठेवता येत नाही त्यामुळे ते जेथे पाणी अनुकूल तापमानाचे असेल तेथे जातात. जे मासे थंड पाण्यात जायचे ते रेषेच्या थंड बाजूस सापडतात आणि ज्यांना कोमट पाणी लागते ते मासे रेषेच्या गरम बाजूस सापडतात.
या रेषेच्या आसपास गस्त घातल्यामुळे नौदल आणि तटरक्षक दलाचं हि डिझेल वाचत असे आणि पाकिस्तानी मच्छीमाराना आपल्या हद्दीत घुसखोरीपासून प्रतिनबंधही करणे सोपे जात असे.
शास्त्रज्ञांच्या असा छोट्या छोट्या कार्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या जीवनात किती मोठा फरक होत असतो हे सांगूनही समजणार नाही.

सुमीत भातखंडे's picture

31 Jan 2017 - 4:03 pm | सुमीत भातखंडे

छान महितीपूर्ण लेख सर.

माहीतीपुर्न लेख अतिशय आवडला.

पिलीयन रायडर's picture

2 Feb 2017 - 9:21 am | पिलीयन रायडर

हा एक वेगळाच आणि अप्रतिम लेख मिळाला हे आमचं भाग्य! आपण पार वेबसिरिज पर्यंत पोहचुन त्यावर बोलत असताना, ह्या सगळ्याची भारतात झालेली सुरूवात, त्या प्रकल्पात काम केलेल्या कुणाकडुन वाचायला मिळावी, अजुन काय हवं!

आज लोकांपर्यंत पोहोचणं इतकं सहज आणि सोप्पं झालंय की कदाचित ह्यामागे कुणीतरी फार पुर्वी, फार मोठा आणि त्या काळाच्या मानाने फार पुढचा विचार केला होता हे कधी लक्षात येत नाही. वाचताना जेव्हा जे जाणवतं तेव्हा एक वेगळीच भावन दाटुन येते. किती लोकांचं आयुष्य ह्या एका विचाराने बदललं असेल, सुकर झालं असेल.. केवळ तंत्रज्ञानातच नव्हे तर सामाजिक क्रांतीमध्ये ही घटना अत्यंत महत्वाची आहे. ह्या घटनेचा साक्षीदार एक मिपाकर आहे ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट!

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Feb 2017 - 5:27 pm | बिपिन कार्यकर्ते

उत्कृष्ट!