गोष्ट गरम.. गोष्ट गरम.. गोष्ट गरssssम!!

टुंड्रा's picture
टुंड्रा in लेखमाला
17 Jan 2017 - 8:19 am

*/

‘गोष्ट तशी छोटी’साठी गोष्टी लिहिणार्‍या माणसाशी बोलायला हवं असं फार फार वाटत होतं. त्यातही खासकरून आपल्याला रोज भेटणार्‍या मालिकांच्या किंवा सिनेमांच्या लेखकाशी बोलता आलं तर काय बहार येईल, असेही खयाली पुलाव पकवणं चालू होतं. गंमत म्हणून ‘मधुगंधा कुलकर्णीं’ना हळूच फेसबुकवर मेसेज टाकला. त्यांना रोज शेकड्याने मेसेज येत असतील, आपल्याला कोण विचारणार म्हणून त्याबद्दल विसरूनही गेले. एक दिवस फेसबुक उघडलं आणि त्यांचा मेसेज दत्त म्हणून उभा ठाकलेला!! आधी तर मी शिस्तीत घाबरले होते, की आगाऊपणा करून मेसेज तर केला, आता बोलणार काय?? पण बिचकत बिचकत फोन तर लावला.

profile pic

"अगं, तू मला अहो जाहो नको करू गं!" सुरुवातच अशी दिलखुलास!

मी अगदी नीट प्रश्न वगैरे काढून मुलाखतीला सुरुवात केली खरी. पण मुलाखत न होता मधुगंधाशी (एकेरी!) झक्कासपैकी गप्पाच झाल्या!

‘होणार सून मी..’ आणि ‘एलिझाबेथ..’नंतर मधुगंधा कुलकर्णी माहीत नाहीत असं मराठी घर शक्यतो सापडणार नाही. तुम्ही... आपलं ‘तू’.. केव्हापासून लिहायला लागलीस?

मला वाचनाची पहिल्यापासूनच खूप आवड होती. राजा-राणीच्या गोष्टी वगैरे मी चौथी-पाचवीपर्यंतच वाचल्या. मग मात्र मी सुरेश वैद्य, सुहास शिरवळकर, विजय तेंडुलकर अशा लेखकांची पुस्तकं वाचायला सुरुवात केली होती. शाळेतही तास चालू असताना चोरून पुस्तकं वाचत बसल्यामुळे मला अंगठे धरून उभं राहायची शिक्षाही झाली होती!

दहावीच्या सुट्टीमध्ये हातात पुष्कळ वेळ होता आणि पंढरपूरमध्ये तसं करायला फार काही नव्हतं. कंटाळा खूप यायचा. एकदा असंच बसल्या बसल्या मी स्वतःच एक गोष्ट लिहून काढली. मला अजिबातच कॉन्फिडन्स नव्हता त्या गोष्टीवर, म्हणून मी माझ्या मैत्रिणींना वाचून दाखवली. त्यांना ती खूप आवडली. त्यांनीच मला “ही तू पोस्ट कर मासिकामध्ये” असं सांगितलं. म्हणून एका दिवाळी अंकात स्पर्धेत ती गोष्ट पाठवून दिली. त्या गोष्टीला चक्क पहिलं पारितोषिक मिळालं! त्याचे पैसेही मिळाले. मी कमावलेले पहिले पैसे! मला त्याचा भयानक आनंद झाला होता. त्यातून मग मला तो छंदच लागला की वेगवेगळ्या अंकांमध्ये गोष्टी लिहून पाठवायच्या, त्यांना अनेकदा पहिला-दुसरा नंबर मिळायचा, त्या छापून यायच्या. आणि गंमत म्हणजे मला ह्या कथांसाठी जवळपास ३०० पत्रं आली होती तीसुद्धा ‘श्रीमती मधुगंधा कुलकर्णी’ ह्या नावावर! अगदी ३५-३६ वर्षांच्या माणसाने "तुमची कथा मला फार आवडली. माझीही कथा तुमच्या नायकासारखीच आहे. मला तुम्ही काही सल्ला द्याल का?" असं पत्र पाठवलं होतं. मला आधी काय उत्तर द्यावं कळायचं नाही. पण तेंडुलकरांचं एक वाक्य मी वाचलं होतं की कुणीतरी माणूस तुम्हाला पत्र पाठवतो, तर तुम्ही उत्तर द्यायला हवं. म्हणून मी काहीतरी उत्तर द्यायचेच. आणि मलाही हे आवडायला लागलं. अनोळखी लोकांना भेटल्याशिवायही त्यांच्याशी बोलता येतंय. तुम्ही तिथे नसूनसुद्धा तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता आणि आपल्या लिखाणातून त्यांना प्रभावित करू शकता.

तेव्हाच तू लेखक व्हायचं ठरवलंस का मग?

खरं तर तेव्हा मला लेखक व्हायचं नव्हतं. तेव्हा मला डॉक्टर व्हायचं होतं. तशी माझ्या आईचीसुद्धा खूप इच्छा होती. त्यासाठी मी खूप अभ्यासही केला. पण अगदी थोडक्या मार्कांनी माझा प्रवेश हुकला. मला फार नैराश्य आलं. त्या वयात ना, फार हळवं असतं आपलं मन. मला शिक्षणाचाच कंटाळा आला. आणि तेव्हा तर मेडिकल - इंजीनिअरिंग न करता बी.एससी. केलं म्हणजे अगदी फालतू असाच समज होता. पण आईने मला खूप सावरलं. "नाही मिळालं मेडिकल तरी हरकत नाही, तू बी.एससी. कर" म्हणून अ‍ॅडमिशन घ्यायला लावलं. ग्रॅज्युएशनपर्यंत मात्र मी खूप लिहिलं. त्या तीन वर्षांत मी चार कादंबर्‍या लिहिल्या. २१व्या वर्षी माझ्या चार कादंबर्‍या बाजारात आल्या होत्या. माझं मासिकातलं लिखाण वाचून मला प्रकाशकांनी विचारणा केली. त्यांनाही असंच वाटायचं की मी कुणी प्रौढ बाई आहे! पण ह्या सगळ्यात झालं काय की माझ्या लक्षात आलं की मला हेच करायचं आहे. मला संशोधन वगैरे करायचं नाहीये, मला लेखनाशीच जोडलेलं काहीतरी करायचंय.

माझी आई पारंपरिक आणि मला वडील नाहीत, त्यामुळे आई घाबरलेली होती. आपली मुलगी नाटकांमध्ये वगैरे जायचं म्हणतेय हे तिला आवडलं नाही. आजही ह्या क्षेत्राबद्दल माहिती कमी असल्याने खूप गैरसमज आहेत. आपल्या मुलीचा कुणी गैरफायदा घेतला तर.. तिच्याशी लग्न कोण करणार.. अशा अनेक चिंता तिला होत्या. प्रत्यक्षात जोवर तुमचा खरंच ह्या क्षेत्राशी संबंध येत नाही, तोवर तुम्हाला खरं काय ते कळत नाही. पण त्यामुळे माझ्या ह्या निर्णयाला आईचा एकंदरीत विरोध होता. तिला वाटत होतं की मी एम.एससी. करावं, पण मी एम.ए. (नाट्यशास्त्र)ला प्रवेश घेतला. मी नाटकात काम केलेलं आईला आवडत नव्हतं, म्हणून मी चोरून नाटकांमधून कामं करायचे! आणि घरी सांगितलं होतं की कॉलेजला जातेय. एक दिवस नेमकं त्या नाटकात मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस मिळालं, ही बातमी पेपरात छापून आली! आई माझ्याशी बोलली नाही खूप दिवस. मी खोटं बोलले ह्याचा तर तो राग होताच, पण मी ‘नटी’ झाले ह्याचं तिला जास्त वाईट वाटलं. ती म्हणाली की ठीके, तू लेखिका हो, पण नटी होऊ नकोस. पण माझ्या नशिबातच ते होतं.

मी एकदा मैत्रिणीसोबत सहज मुंबईला गेले होते, तर तिथे मला प्रशांत दामले भेटले. त्यांनी एका एकांकिकेमध्ये माझं काम पाहिलं होतं. त्यांनी मला विचारलं की तू नाटकात काम करशील का? मला धक्काच बसला. मी अर्थातच ते नाटक करायला घेतलं. मग एकातून दुसरं, दुसर्‍यातून तिसरं.. असं करत करत मी बर्‍याच नाटकांमधून कामं केली, ‘चार दिवस सासूचे’, ‘अवघाची संसार’ अशा सीरियल्सही केल्या, चित्रपट-डॉक्युमेंटरीज-शॉर्ट फिल्म्स केल्या. खूप चांगल्या कलाकारांसोबत पुष्कळ काम केलं.

पण मला समाधान वाटत नव्हतं ह्या कशातही. अभिनेत्री म्हणून काम करताना, मी एक लेखक म्हणून दुसर्‍या लेखकाचा कायम आदर करते. त्यामुळे मला कथानक कितीही खटकलं तरी मी त्यात ढवळाढवळ करत नाही. पण तरीही मला वाटायचं की हे आमच्या पिढीचे प्रॉब्लेम्स नाहीत. एका नाटकात मी अत्यंत कजाग सुनेचं पात्र केलं होतं, ज्यात मी सासूला खूप छळते. एखादं पात्र नकारात्मक असण्याला माझी ना नव्हती, पण त्या नकारात्मकतेलाही काही कारण हवं. त्याला काही तरी बॅकग्राउंड हवं. विधवा सासूला छळणं वाईटच, पण तिची त्यामागची भूमिका काय? लॉजिक काय? हे नको का कळायला? बरं, तेव्हा इतरांना काही जगावेगळ्या स्क्रिप्ट्स मिळत होत्या अशातलाही काही भाग नव्हता. मग दुसर्‍यांना नावं ठेवण्यापेक्षा स्वतःच लिहायला हवं, असं मी ठरवलं. बघू आपण असे काय दिवे लावतो!

ह्यातून मी एक नाटक लिहिलं – ‘त्या एका वळणावर...’ एका आध्यात्मिक गुरूंच्या अनुभवातून उभं राहिलेलं, बरोबर काय, चूक काय अशा द्वंद्वाबद्दलचं ते नाटक होतं. त्यानंतर मी ‘लग्नबंबाळ’ हा कोर्टरूम ड्रामा लिहिला. इथेच माझी परेशशी भेट झाली. ह्याच नाटकादरम्यान आमचं प्रेमही ऐन रंगात आलं.

अच्छा!!! मग एलिझाबेथचा जन्म कसा झाला?!

परेशशी लग्नानंतर गप्पा मारताना एकदा मी त्याला असंच माझ्या लहानपणीचा एक किस्सा सांगत होते. लहानपणी आईला मदत करायला आम्ही बांगड्या वगैरे विकत असू. तेव्हा माझ्याकडून बांगड्या मोजताना १-२ बांगड्यांचा हिशोब चुकला. पण दुकानदाराने ‘हिने बांगड्या चोरल्या असतील’ असं म्हटलं. ही गोष्ट माझ्या मनाला फार लागली. कुणीतरी आपल्याला चोर म्हटलं ह्याचा लहानपणी माझ्या मनावर फार ओरखडा उमटला होता. आणि ही गोष्ट सतत माझ्या आठवणीत येत राहायची. मी आधी नुसता किस्सा म्हणून हे सांगायचे, पण मग मला जाणवलं की हे माझ्या मनाला खूप लागलंय. परेशला मात्र ह्यातून एक उत्तम फिल्म होऊ शकते असं वाटलं.. ती ही फिल्म एलिझाबेथ एकादशी!

elizabeth

मी कथा लिहिली, परेशने त्यावर पटकथेचे संस्कार केले. दोघांनी मिळून संवाद लिहिले. ह्या फिल्ममध्ये स्टार नव्हते, लहान मुलांची गोष्ट होती. त्यात काही व्यावसायिक फायदा नव्हता. म्हणून आम्हाला कुणी प्रोड्युसर मिळणार नाही हेही आम्हाला माहीत होतं. म्हणून मग आम्हीच ही फिल्म प्रोड्यूस करायची ठरवली. माझ्या सासर्‍यांनी आम्हाला खूप मदत केली. आम्ही सगळ्यांनीच ‘आपल्याला ही फिल्म करायची आहे, गेले तर गेले पैसे’ अशा विचारातून ही फिल्म केली. पण ‘झी’ने लगेच ती फिल्म घेतली!

चौदाव्या वर्षी गंमत म्हणून लिहिलेली कथा.. ते नाट्यशास्त्राचं शिक्षण घेऊन, इतकी वर्षं ह्या क्षेत्रात काम करून ‘एलिझाबेथ..’सारख्या इतक्या सुंदर चित्रपटाची लेखिका - निर्माती.. ह्या सगळ्यात तुझ्यात कसा बदल होत गेला.. किंवा त्याहूनही महत्त्वाचं.. काय बदललं नाही?

कसं असतं ना, की वय वाढलं की माणूस प्रगल्भ होत जातो. लेखक म्हणूनही प्रगल्भता वाढत जाते. पंधराव्या वर्षी जी गोष्ट मी लिहिली, ती आता मी नक्कीच तशी नाही लिहिणार. वयाबरोबर तुमचे अनुभव बदलत जातात, वाचन वाढत जातं, नाती बदलत जातात. त्या त्या वयाची एक इंटेन्सिटी असते. पंधराव्या वर्षी मला ज्या इंटेन्सिटीने गोष्टी वाटत होत्या, आजही तशाच वाटतात. त्या अर्थाने त्यात बदल झालेला नाही. पण अ‍ॅप्रोचमध्ये बदल झाला आहे. आता मी ‘त्या एका वळणावर..’ परत लिहिलं, तर मी दुसर्‍या बाजूनेही विचार करेन. तो माणूस तेव्हा तसं का वागला? त्याच्या पार्श्वभूमीचा विचार करेन. त्याच्या जागी जाऊन विचार करेन.

एकच कथा, इतक्या वेगवेगळ्या माध्यमांतून तू हाताळलेली आहेस.. कथासंग्रह, कादंबर्‍या, नाटक, सिनेमा, टीव्ही... कसा होता हा प्रवास? ?

मी नाटक-चित्रपट-टीव्ही सगळ्याच क्षेत्रात काम केलेलं आहे. वेगवेगळी माध्यमं हाताळली की त्यात कथा कशी मांडायची हे आपोआप उमजत जातं. मी स्वतः टीव्ही सीरियल्ससाठी खूप काम केलेलं असल्याने मला त्यासाठी लिहायला काहीच अवघड गेलं नाही. अभिनेत्री म्हणून माझा प्रवास झालेला असल्याने मला एखाद्या पात्राची एंट्री कशी व्हायला हवी, एखादं पात्र एका वेळेला किती वेळ बोललं पाहिजे, घटना किती असाव्यात, संवाद किती असावेत हेही आपोआप समजत जातं. अभिनेत्री असण्याचा मला त्यामुळेच खूप फायदा झाला. म्हणूनच ही माध्यमं मला लगेच आत्मसात करता आली. नाटकात एखाद्या पात्राला तयार होण्यासाठी वेळ दिला पाहिजे, त्यामुळे तशा विचारांनी सीन्स लिहिणं, किंवा सीरियल्समध्ये लोकेशन्सचा विचार करावा लागतो, फार पटापट नवी पात्रं आणता येत नाहीत, नाही तर प्रेक्षक गोंधळून जाऊ शकतात. एखाद्या पात्राला आणताना किती वेळ खर्च करायला हवा, हे सगळं मला नकळत लक्षात आलेलं होतंच. हा टेक्निकल भाग तुम्ही शिकत जाता.

पण मुळात गोष्ट बनते कशी? एवढी पात्रं, घटना, प्लॉट उभा कसा राहतो? इतकं सगळं सुचतं कसं??

मी खरं सांगू का?.... मलाही नाही माहीत!

त्याचं काही ठरलेलं गणित नाहीये. मला देवाकडूनच मिळालेली देणगी आहे ती. मी लिहायला बसले की मला सुचत जातं. समाधी लागल्यासारखी मी एका ट्रान्समध्ये जाते आणि लिहीत जाते. मलाही माहीतही नसतं की आता मी पुढचा एपिसोड किंवा सीन कसा लिहिणारे? माझ्याकडे दोन ओळी असतात, पण त्यावर मी लिहिणार काय? पण लिहायला बसलं की ते लिहिलं जातंच. ती गोष्ट आपोआप घडत जाते. त्यात माझं स्किल काय? तर मी ह्या पात्रांना बॅकग्राउंड देते. ते तसे का वागत आहेत ह्याची कारणं देते. उदा., ‘कला’ हे पात्र. तिच्या वागण्याची कारणं समजली पाहिजेतच. दुष्ट तर दुष्ट, पण दुष्ट माणसासाठी तो बरोबरच वागत असतो. तो तसा का वागतो हे प्रेक्षकांना कळायला हवं.

म्हणूनच बहुधा ‘होणार सून मी..’ सुरुवातीला मला फार आवडत होती.. अर्थात नंतर ती वेगळ्याच वळणावर गेली..

हो.. कारण ‘होणार सून मी..’ खरं तर वर्षभराचीच कथा असायला हवी होती. ती तिथेच संपली असती तर चांगलं झालं असतं. पण अर्थात चॅनलची काही व्यावसायिक गणितं असतात. त्यात ती कथा बसवायची म्हणजे.. पण गंमत अशीही होती की लोक इतक्या शिव्या घालायचे, पण मालिकेचा टीआरपी मात्र कमी होत नव्हता! लोकांना राग येत होता, पण बघत होते. खरं तर ते डिलिव्हरीचं गणितही आपल्या वेळेप्रमाणे नसतं. मालिकेत कधीकधी आख्खा आठवडा एकच दिवसातल्या घटना घडत असतात. त्यामुळे प्रत्यक्षात नऊ महिने झाले, म्हणून डिलिव्हरी कशी होईल? पण हे लोकांना समजावून सांगता येत नाही. आणि बंद कधी करायची हे माझ्या हातात नाही. किंवा माझा इंटरेस्ट संपला म्हणून मी सोडूही शकत नाही. शिवाय अनेकांची पोटं असतात ह्या मालिकांवर. त्यामुळे लेखक म्हणून त्यात मी फार काहीच करू शकत नाही. पण मी त्यावर येणारे जोक्स फार एन्जॉय केले. काय एकाहून एक मस्त जोक्स व्हॉट्स अ‍ॅपवर यायचे!

त्याचा त्रास नाही झाला?

छे! उलट मला दाद द्यावी वाटायची. काहीतरी एक जोक होता बघ.. ‘कॅलेंडरचाही नववा महिना उलटला, पण जान्हवीचा नववा महिना काही संपत नाही!’ मला फारच आवडला होता हा जोक! लोकांच्या चिडचिडीमागेही त्यांची इन्व्हॉल्व्हमेंट होती. आपण सतत एखाद्यावर प्रेमच नाही करू शकत, तसंच आहे हे. एखाद्यावर प्रेम असलं की रागही येतोच. तसा काहीसा प्रकार होता तो. त्यामुळे चिडले.. टीका केली तरी बघत होते. आणि बिझनेस म्हणून ते चालत होतं. टीआरपी मिळतच होता. शिवाय लेखिका म्हणून माझंही म्हणणं प्रेक्षकांप्रमाणेच होतं, पण माझे हात बांधलेले होते. माझ्या हातात निर्णय नव्हताच. म्हणून मला लोकांना समजून घेता येत होतं. त्यामुळे मला त्याचा त्रासही झाला नाही किंवा काही नकरात्मक परिणाम झाला नाही. उलट मी तर ‘कसं काय सुचतं?!’ असाच विचार करत होते.

उलट मीच हा विचार करतेय की तुला कसं काय इतकं सुचतं? आईआजी काय म्हणाली, मग श्री काय म्हणाला? मग अनिल आणि कला यांनी काय केलं.. असे सतत परकाया प्रवेश करून दमून जायला होत नाही का?

अजिबात नाही! तेच तर गॉड गिफ्ट आहे! मुळात ह्या सगळ्या पात्रांमध्ये मी आहे.. माझ्यातूनच ती आलेली आहेत.. मला ती लॉजिकली पटलेली आहेत. त्यामुळे मला वेगळा विचार करावाच लागत नाही की आता ह्यावर आईआजी काय बोलेल बरं? असा प्रश्न मला पडतंच नाही. ते माझ्या डोक्यातून आपसूक येतंच. सुकन्याताईसुद्धा माझी नक्कल करताना म्हणायची की मी लिहिताना ठरवून विचार करून लिहीत नाही. श्री बोलत असताना आईआजी काय उत्तर देणार हे माझ्या डोक्यात तयार असतं. त्यांचा संघर्ष माझ्या मनात चालू असतो. त्यामुळे मी फक्त लिहीत जाते.. माझं स्किल इतकंच की मी प्रयेक पात्राला काय हवंय आयुष्यात ह्याचा विचार करून त्यांची कथा लिहीत जाते.

तुझ्या लिखाणावर मग कुणाचा प्रभाव आहे असं तुला वाटतं? आणि असा प्रभाव असणं चांगली की वाईट?

कोणताही लेखक हा आभाळातून पडल्यासारखा लिहू शकत नाही. कुणा ना कुणाचा प्रभाव असतोच. माझ्यावर तेंडुलकरांचा प्रभाव आहे... खानोलकरांचा आहे.. पण जेव्हा तुम्ही चौफेर वाचता, तेव्हा तुम्हाला आपोआपच वेगवेगळ्या भाषा कळायला लागतात, शैली कळते, अनुभव कळतात. आणि त्यातूनच तुम्हाला तुमची शैली सापडते. अर्थात प्रभाव असणं म्हणजे कॉपी करणं नाही. तेंडुलकरांचा माझ्या डायलॉग्जवर खूप प्रभाव आहे. मला त्यांची पद्धत खूप आवडायची. पण इतरही खूप काही वाचल्यामुळे लिखाण एकाच बाजूला झुकत नाही. शिवाय तुम्हाला तुमची शैली असतेच.. त्याशिवाय मला व्यावसायिक लेखक होताही येणार नाही. मी नुसतीच कॉपी केली तर मी निव्वळ नकलाकार असेन ना?

अगदी खरंय.. मग आता आमच्यासाठी नवीन काय घेऊन येत आहेस?

पंधरा वर्षांनंतर प्रभावळकर टीव्हीवर येत आहेत! ‘चूकभूल द्यावी घ्यावी’ हे दिलीप प्रभावळकरांचंच एक नाटक होतं. तेच आता टीव्हीवर घेऊन येत आहोत. जानेवारीत ही मालिका येणारे. आणि भट्टी अत्यंत उत्तम जमलेली आहे. ह्याशिवाय आणखी एका फिल्मचंही काम चालू आहे. पण त्याबद्दल तुम्हाला मार्चनंतर कळेलच!

प्रभावळकर परत एकदा टीव्हीवर?? नक्कीच काहीतरी धमाल पाहायला मिळणार!

थोडंसच बोलयचंय म्हणत म्हणत तुझा फार वेळ घेतला.. आता एकच शेवटचा प्रश्न! तू एक सिद्धहस्त लेखिका तर आहेसच.. पण त्याहून महत्त्वाचं अ‍ॅनिमल अ‍ॅक्टिव्हिस्ट आहेस! ह्याबद्दल सांगशील का?

आपल्याकडे माणसावर अन्याय झाली की त्यांना कैफियत मांडायला अनेक जागा आहेत. मदतीलासुद्धा अनेक संस्था आहेत. पण प्राण्यांना मात्र तसं काहीही नाही. आणि सगळ्यात जास्त अन्याय त्यांच्यावर होतोय. जीव असलेली एक एन्टिटी म्हणून आपण प्राण्यांकडे पाहतच नाही. आपण त्याच्याकडून मिळणारा आर्थिक फायदाच तेवढा बघतो. त्याचा मला खूप त्रास होतो. आपल्याकडे दुर्दैव किती आहे बघ, मुली झाल्या की मुलींना मारतात आणि गाईला खोंड झालं की त्यालाही मारतात. त्या खोंडाला उभंही राहता येत नसतं, पण लगेच त्याला कत्तलखान्यात पाठवलं जातं. कारण ‘माणसाला’ त्यांचा काही उपयोग नाही. म्हणजे प्राणी हे निसर्गाने माणसांच्या उपयुक्ततेसाठी निर्माण केले आहेत का? आपण सुपीरिअर स्पेसीज म्हणून त्यांचा आपण सांभाळ करायचा की त्यांचा वापर करायचा? आपण खरं तर सर्वात गलिच्छ आणि घाण प्राणी आहोत. घोड्यांचंच बघं ना.. त्यांनाही आजारपण येतात, त्यांनाही काही डेफिशियन्सीज असतात.. पण तरीही माणूस त्यांना ताबडवत राहतो. आणि ज्या दिवशी तो घोडा कोसळतो, त्याला कत्तलखान्यात विकलं जातं. डुकरं तर काय.. कुणाचीही मालमत्ता आहेत. कुठुनही उचला, अमानुषपणे मारून टाका. रस्त्यावरच्या कोणत्याही कुत्र्याला तुम्ही विष घालून मारून टाकलंत तर काहीच फरक पडत नाही.. कुणालाच. मला लाज वाटते आपण माणूस आहोत ह्याची.

आधी आधी मी भयानक रडायचे. पण मग वाटलं की मी रडून काय होणारे? काय फरक पडणारे? म्हणून मग मी ह्या कामात पडले. मला शक्य असेल तेव्हा मी कत्तलखान्यांमधून प्राणी विकत घेते आणि ते दत्तक जातील असं बघते. एक घोडा विकत घेऊन तो पेटा, सांगलीला दिला. गाईची ३ खोंडं विकत घेतली आणि एका फार्महाउसवर ते दत्तक गेले. आत्तापर्यंत असे १० प्राणी मी वाचवले आहेत. खरं तर हे काम सोप्पं नाहीये. प्राणी मिळवणं, त्यांची व्यवस्था लावणं.. पण तरीही १०० तरी प्राणी मी वाचवले पाहिजेत असं माझं ध्येय आहे. ह्याशिवाय मी ‘अ‍ॅनिमल्स मॅटर टु मी’ नावाचं एक मराठी पेजसुद्धा फेसबुकवर चालवते.

with pets

मी सगळंच बदलू शकत नाही हे मला माहीत आहे. पण माझ्या आवाक्यात जे आहे, ते तरी मी करू शकते. लोकांनी शाकाहारी व्हावं, अगदी तेही न जमल्यास लेदर-लोकर अशा वस्तू वापरणं कमी करावं, असा मी आग्रह करते. अर्थात हा शेवटी प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आज बाजारात प्राण्यांना न मारताही ‘क्रुएल्टी फ्री लेदर’ मिळतं. तुम्हाला पर्याय आहेत तर ते वापरा. फार लहान प्रयत्न आहेत हे, पण मी माझ्या आवाक्यात जे शक्य आहे ते आयुष्यभर करत राहणार.. कारण मला अगदी नॅशनल अ‍ॅवॉर्ड जरी मिळालं, तरी एक प्राणी वाचवण्याचा आनंद जास्त मोठा आहे माझ्यासाठी. एका प्राण्याचा जीव वाचवणं मला लाइफ टाइम अ‍ॅचिव्हमेंट वाटते!

पेटाचे व्हिडिओज फेसबुकवर पाहून त्रास होणारे अनेक जण आहेत, पण त्यावर अ‍ॅक्शन घेणारे कमीच.. तू काहीतरी करते आहेस हे फार महत्त्वाचं..

कसं असतं ना, की एकदा तुम्ही माणूस म्हणून संवेदनाशील असलात की तुमचं बरंचसं काम झालेलं असतं. तुम्ही इतरांचा आदर करता का.. किंवा तुम्ही तुमच्या मुलांना कसं वाढवता जेणेकरून ते दुसर्‍यांना किंमत द्यायला शिकतील.. बास, हेच महत्त्वाचं असतं.

अगदी अगदी! तू मिसळपावसाठी एवढा वेळ काढलास. इतकं भरभरून बोललीस.. खरंच मनापासून धन्यवाद! समजा, मिपावर सदस्य झालीस, तर कोणत्या नावाने येशील?

बहुदा 'निसर्गकन्या' असं काहीतरी नाव घेईन!

नक्कीच तू मिसळपाववर ये! तुझ्या पुढच्या मालिकेची आणि चित्रपटाची आम्ही वाट पाहत आहोतच. पुन्हा एकदा अगदी मनापासून धन्यवाद!!

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Jan 2017 - 11:01 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर दिलखुलास मुलाखत !

या लेखमालेच्या निमित्ताने अनेक प्रसिद्ध गुणी कलावंतांची जवळून ओळख होत आहे.

रातराणी's picture

17 Jan 2017 - 11:19 am | रातराणी

मस्त मुलाखत!

एकनाथ जाधव's picture

17 Jan 2017 - 11:42 am | एकनाथ जाधव

छान मुलखात

आदूबाळ's picture

17 Jan 2017 - 12:32 pm | आदूबाळ

झकास मुलाखत आहे. मधुगंधा कुलकर्णी मिपावर रेडिट-स्टाईल AMA (Ask me anything) करतील का?

कंजूस's picture

17 Jan 2017 - 12:40 pm | कंजूस

छान मुलखात!

एस's picture

17 Jan 2017 - 12:45 pm | एस

उत्तम मुलाखत रंगली.

मोदक's picture

17 Jan 2017 - 8:37 pm | मोदक

+१११

संजय क्षीरसागर's picture

17 Jan 2017 - 2:07 pm | संजय क्षीरसागर

छान उपक्रमे हा.

नीलमोहर's picture

17 Jan 2017 - 2:08 pm | नीलमोहर

छान झालीय मुलाखत.

बोका-ए-आझम's picture

17 Jan 2017 - 2:55 pm | बोका-ए-आझम

.

छान झालीये मुलाखत. खूप आवडली.

किसन शिंदे's picture

17 Jan 2017 - 5:43 pm | किसन शिंदे

मस्त आहे मुलाखत. मधुगंधा कुलकर्णी माझी आवडती लेखिका आहे.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

17 Jan 2017 - 8:16 pm | भाग्यश्री कुलकर्णी

वा खूपच छान .खास मिपासाठी घेतलेली मुलाखत खूपच आवडली.मस्त .

मुलाखत आवडली. मुख्य म्हणजे मुक्या प्राण्यांसाठी मदुगंधा जे काम करत आहे ते वाचून खूप कौतुक वाटले.
आता ह्यांनी लिहीलेल्या शिरेलचा एखादा एपिसोड पाहीन नक्की! ;)

सामान्य वाचक's picture

17 Jan 2017 - 8:58 pm | सामान्य वाचक

लेखकांचा हि नाईलाज होतो सिरीयल च्या बुंदी पडताना
यापूढे त्यांच्या नावाने खडे फोडणार नाही

राघवेंद्र's picture

17 Jan 2017 - 10:39 pm | राघवेंद्र

मुलाखत मस्त झाली आहे. खुप आवडली.

पैसा's picture

17 Jan 2017 - 10:56 pm | पैसा

मधुगंधाचा अभिनयसुद्धा कौतुक करण्यासारखा नैसर्गिक आहे. तिचं प्राण्यांसंबंधी कार्य आवडलं. फक्त ते जानुबाळाची १८ महिने प्रेग्नन्सीची कथा तिने अशी लांबत ठेवली ते इथे लिहूनही फार पटलं नाही. =))

मस्त मुलाखत झालिये. एलिझाबेथ एकादशी हा सिनेमा आम्हाला आवडला होता. अगदी आग्रह केला म्हणून पाच मिनिटंच बघतो म्हणत माझ्या मुलाने संपूर्ण सिनेमा पाहिला. मधुगंधा अ‍ॅनिमल अ‍ॅक्टिव्हेस्ट आहे म्हणून बरे वाटले.

मस्त मुलाखत झालिये. एलिझाबेथ एकादशी हा सिनेमा आम्हाला आवडला होता. अगदी आग्रह केला म्हणून पाच मिनिटंच बघतो म्हणत माझ्या मुलाने संपूर्ण सिनेमा पाहिला. मधुगंधा अ‍ॅनिमल अ‍ॅक्टिव्हिस्ट आहे म्हणून बरे वाटले.

सही रे सई's picture

18 Jan 2017 - 1:21 am | सही रे सई

मस्त मुलाखत.. खर तर दोन मैत्रिणींमधल्या गप्पाच जणू..
त्यानिमित्ताने या गुणी लेखिका कम अभिनेत्रीची ओळख झाली हे खूप छान झालं.

विशाखा राऊत's picture

18 Jan 2017 - 4:29 am | विशाखा राऊत

मस्त मुलाखत... आवडली

इशा१२३'s picture

18 Jan 2017 - 7:52 am | इशा१२३

मुलाखत मस्त झालिये.मधुगंधाच्या नविन सिरिअलबद्दल उत्सुकता आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jan 2017 - 12:38 pm | अत्रुप्त आत्मा

चांगली झाली आहे मुलाखत.

सुरेख शब्दात उतरवलेली मुलाखत ! मनाला भिडली.

मंजूताई's picture

18 Jan 2017 - 2:11 pm | मंजूताई

मुलाखत आवडली!

बरखा's picture

18 Jan 2017 - 2:28 pm | बरखा

मुलाखत वाचुन छान वाटले.

रागिणी९१२'s picture

18 Jan 2017 - 2:35 pm | रागिणी९१२

खुप मस्त झालिय मुलाखत

फार अप्रतीम झाली आहे मुलाखत, अगदी माजघरात बसून मारलेल्या गप्पाच शब्दबद्ध केल्यासारखं वाटलं. आणि शेरेलींबद्दलचं स्पष्टीकरण तोकडं वाटलं याच्याशी सहमत. लोकांना आवडलं आहे असा टीआरपीचा निकाल आला म्हणून मालीका लांबवली हे नाही पटलं. बाकी, लेखीका, अभिनेत्री म्हणून मधुगंधा ग्रेटच आहे.

प्रीत-मोहर's picture

18 Jan 2017 - 3:18 pm | प्रीत-मोहर

खूप छान झालेय मुलाखत!! मला मी तिच्याशी डायरेक्ट बोलल्यासारखं वाटलं

कवितानागेश's picture

20 Jan 2017 - 12:48 am | कवितानागेश

फारच छान.

वेल्लाभट's picture

19 Jan 2017 - 2:30 pm | वेल्लाभट

ओघवती मुलाखत ! प्रांजळ विचार !

एका उत्तम व्यक्तिमत्वाशी ओळख झाली.

ज्योति अळवणी's picture

19 Jan 2017 - 3:49 pm | ज्योति अळवणी

अप्रतिम मुलाखत

चैत्रबन's picture

19 Jan 2017 - 5:05 pm | चैत्रबन

मधुगंधा चे मुक्या प्राण्यांबद्दल चे विचार विशेष आवडले..

सुचेता's picture

19 Jan 2017 - 7:15 pm | सुचेता

सुरवात अगदि मी बोल्तेय अस वाटत होत, आवड्ली.

योगायोगान आत्ता मी जोडले गेलेय पंढरपुर शी

स्वीट टॉकर's picture

20 Jan 2017 - 12:59 pm | स्वीट टॉकर

सही मुलाखत!

हा मस्त उपक्रम चालवणार्या सगळ्यांचच मनापासून कौतुक वाटतं.

अभिजीत अवलिया's picture

29 Jan 2017 - 3:24 pm | अभिजीत अवलिया

मस्त मुलाखत. एलिझाबेथ एकादशी हा आतापर्यंत पाहिलेल्या चित्रपटातील एक अतिशय आवडता चित्रपट आहे.

स्मिता श्रीपाद's picture

30 Jan 2017 - 12:27 pm | स्मिता श्रीपाद

खुप मस्त मुलाखत...
एलिझाबेथ एकादशी अतिशय आवडतो...