काळ असा.......

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
1 Apr 2016 - 5:26 pm

[अरबी साहित्यातील निजार कब्बानी या नामवंत सिरीयन कवीच्या काही कवितांचा स्वैर अनुवाद!
त्यातील ‘ A Lesson in Drawing!’ या कवितेचा अनुवाद मिपाकरांसाठी! बाकी माहिती Google वर आहेच!]

माझ्या मुलाने माझ्यासमोर रंगांचा बॉक्स ठेवला, म्हणाला,
‘बाबा, पक्ष्याचे चित्र काढा ना!’
मी करड्या रंगात ब्रश बुडवला,
गज आणि कुलूपांनी बंदिस्त असा एक चौकोन काढला.
त्याने आश्चर्याने डोळे विस्फारले,
‘............. पण बाबा, हा तर तुरुंग आहे!
पक्षी कसा काढायचा हे पण माहिती नाही तुम्हाला?’
मी म्हणालो, ‘माफ कर मुला,
मी पक्ष्यांचे रंग-आकार विसरून गेलोय आता!’

मुलाने माझ्या समोर चित्रकलेची वही ठेवली, म्हणाला,
‘बाबा, गव्हाच्या लोम्ब्यांचे चित्र काढा ना!’
मी हातात पेन्सिल घेतली आणि बंदुकीचे चित्र काढले!
माझ्या अज्ञानावर मुलगा उपहासाने हसला,
तीव्र नाराजीने म्हणाला,
‘बाबा, तुम्हाला गव्हाच्या लोंब्या आणि बंदूक यातला फरक नाही माहित?’
मी म्हणालो, मुला, एकेकाळी, या लोंब्या, भाकरी, आणि गुलाब यांचे
जीवनदायी रंगरूपआकार मला नक्कीच माहित होते!
पण काळ असा कठीण आलाय, कि
जंगलातील झाडीही मारेकऱ्यांना फितूर झालीयत.
गुलाबांची रया पार निघून गेलीय!

मुला, काळ असा कठीण आलाय, कि
अन्न शस्त्रांकित, धर्म शस्त्रसंपन्न
संस्कृती शस्त्रकुलोत्पन्न, आणि पक्षी सशस्त्र झालेयत.
तू भाकरी विकत घ्यायला जाशील, तर त्यात शस्त्र सापडतील,
रानाबागेतील गुलाब घेऊ जाशील तर, त्यांचे काटे तुला बोच्कारून काढतील,
आणि हो, कुठले पुस्तक हातात घेशील तर,
तुझ्या बोटांमध्ये विस्फोटांचे रण माजेल!'

माझ्या अंथरुणाच्या टोकाशी बसून मुलगा परत म्हणाला,
‘बाबा, एखादी कविता म्हणा ना!’
माझ्या डोळ्यातून अगतिकतेचा एक अश्रू उशीवर ठिबकला.
ओठांनी अश्रू टिपत, मुलगा म्हणाला,
‘बाबा, हा अश्रू आहे, कविता नाही!’
मी त्याला म्हणालो,
‘तू मोठा होशील आणि अरबी कविता वाचशील,
तेव्हा तुला उमजेल,
आपल्या कवितेत,
शब्द आणि अश्रू ही जुळी भावंडं आहेत!
लिहित्या बोटांचे अश्रू, परागंदा मनाचे शब्द!’

मग मुलाने माझ्यासमोर, पेन, पेन्सिल, कागद, रंगांचा बॉक्स
माझ्या समोर ठेवले आणि म्हणाला,
‘बाबा, माझ्यासाठी आपल्या देशाचे चित्र काढा ना!’
माझ्या हातातला ब्रश अजूनही थरथरतो
आणि अश्रूंच्या सागरात मी पार बडून जातो.......

अनुवाद - शिवकन्या

अनुवादसांत्वनाकरुणवाङ्मयकवितासाहित्यिकसमाजजीवनमानराहणीप्रवासभूगोलदेशांतरराहती जागा

प्रतिक्रिया

तर्राट जोकर's picture

1 Apr 2016 - 5:32 pm | तर्राट जोकर

सुंदर.

जव्हेरगंज's picture

1 Apr 2016 - 6:13 pm | जव्हेरगंज

जबरी !

माहितगार's picture

1 Apr 2016 - 6:52 pm | माहितगार

सुंदर

अशी सत्ये जात्यातून पूर्ण भरडले गेल्यावरच समजली पाहीजेत असे काही असते का ?

बाबा, पक्ष्याचे चित्र काढा ना!’
मी करड्या रंगात ब्रश बुडवला,
गज आणि कुलूपांनी बंदिस्त असा एक चौकोन काढला.

पक्ष्यांप्रमाणे स्वातंत्र्याची इच्छा विरुद्ध बंदीस्त करणारी संस्कृती

मग मुलाने माझ्यासमोर, पेन, पेन्सिल, कागद, रंगांचा बॉक्स
माझ्या समोर ठेवले आणि म्हणाला,
‘बाबा, माझ्यासाठी आपल्या देशाचे चित्र काढा ना!’
माझ्या हातातला ब्रश अजूनही थरथरतो
आणि अश्रूंच्या सागरात मी पार बडून जातो.......

हे रिअलायझेशन सगळ्यांना येते तर ! इथे देश शब्द काढला की तुकड्यांची स्वप्ने पाहणारे जन्मतात त्याचा शेवट खालील प्रमाणे होतो हे बर्‍याच जणांना समजणे का कठीण असावे ?

मुला, काळ असा कठीण आलाय, कि
अन्न शस्त्रांकित, धर्म शस्त्रसंपन्न
संस्कृती शस्त्रकुलोत्पन्न, आणि पक्षी सशस्त्र झालेयत.
तू भाकरी विकत घ्यायला जाशील, तर त्यात शस्त्र सापडतील,
रानाबागेतील गुलाब घेऊ जाशील तर, त्यांचे काटे तुला बोच्कारून काढतील,
आणि हो, कुठले पुस्तक हातात घेशील तर,
तुझ्या बोटांमध्ये विस्फोटांचे रण माजेल!'

केवळ नियती म्हणावे ? :(

बोका-ए-आझम's picture

2 Apr 2016 - 12:20 am | बोका-ए-आझम

युद्धाच्या रखरखाटातही प्रतिभा जिवंत असतेच!

चाणक्य's picture

2 Apr 2016 - 6:53 am | चाणक्य

नविन रचनेची ओळख करून दिल्याबद्दल. अश्या अजून काही असतील तर वाचायला आवडतील.

शिव कन्या's picture

2 Apr 2016 - 5:07 pm | शिव कन्या

होय, नक्कीच.

तुमचे नाव वाचूनच धागा उघडला. निराशा झाली नाही. सशक्त भावानुवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Apr 2016 - 10:00 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडला,

भावानुवाद अतिशय आवडला

पैजारबुवा,

नाखु's picture

2 Apr 2016 - 10:06 am | नाखु

शब्दात कमाल आशय...

अत्यंत सुंदर-तरल अनुवादाबद्दल धन्यवाद.

शिव कन्या's picture

2 Apr 2016 - 5:02 pm | शिव कन्या

तर्राट जोकर ,जव्हेरगंज, माहितगार, बोका-ए-आझम,ज्ञानोबाचे पैजार, रेवती,नाद खुळा .....
अनुवाद आवडल्याचे सांगितलेत, आभार.

चांदणे संदीप's picture

2 Apr 2016 - 6:41 pm | चांदणे संदीप

अनुवाद आवडला!

Sandy

एक एकटा एकटाच's picture

2 Apr 2016 - 7:04 pm | एक एकटा एकटाच

सुरेख

रातराणी's picture

4 Apr 2016 - 10:17 am | रातराणी

नेहमीप्रमाणेच उत्तम!

अजया's picture

4 Apr 2016 - 12:37 pm | अजया

सुरेख अनुवाद.

सस्नेह's picture

4 Apr 2016 - 2:01 pm | सस्नेह

आशय पोचला..नव्हे, झोंबला.