`मिपा'वर गोंधळ.. (शिर्षक संपादीत)

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
8 Dec 2008 - 11:24 pm

`मिपा'चे वेगळेपण आणि वैशिष्ट्य पाहून मी या संकेतस्थळावर आलो. इथे प्रत्येकाला आपली मते, विचार मोकळेपणाने मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, असेही जाणवत होते. पण या स्वातंत्र्याचा काही जण दुरुपयोग करीत आहेत, असे दिसते.

कुणा महाभागाने आजच ५ कविता आणि विषय वेगवेगळ्या शीर्षकाखाली दिले आहेत.

मध्यंतरी मुंबई हल्ल्याच्या वेळी तर नवनवे विषय टाकण्याची अहमहमिकाच लागली होती. एका दिवशी शिवराज पाटलांच्या राजीनाम्याचे तीन-तीन विषय होते!

एखाद्या विषयावर सांगोपांग चर्चा घडवण्यापेक्षा विषय टाकण्यात आघाडी घेण्याची स्पर्धाच त्यात दिसते. `मिपा'कारांनाही हे अपेक्षित नसावे, असे वाटते.

हा विषय तात्यांशीही आधी बोललो आहे.

वानगीदाखल काही उदाहरणे :

१. http://www.misalpav.com/node/4997
हा विषय हल्ला विषयांच्या चर्चेतच घेता आला नसता?
२. http://www.misalpav.com/node/5018
हा विषय थेट प्रशासकांना विचारता आला नसता?

नवे खाद्यपदार्थ, नव्या कविता-विडंबने यासाठीही वेगळा विभाग करावा, असे सुचवावेसे वाटते. ज्यांना या विषयात रस नाही, ते थेट तो वगळू शकतील. (विभाग वेगळे आहेत, याची कल्पना आहे. पण'`नवे विषय' या सदराखाली ते एकत्र दिसतात!)
असो.

पाहा, विचार करून.

(या विषयासाठी तरी नवा टॉपिक सुरू करण्याची काय गरज होती, असा `विनोद' काही जण करू पाहतील. त्यांना शुभेच्छा!)

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

आपला अभिजित's picture

8 Dec 2008 - 11:26 pm | आपला अभिजित

`बजबजपुरी' हा शब्द जरा अघोरीच झाला. तो अनवधानाने वापरला. राग मानू नये.

रामदास's picture

8 Dec 2008 - 11:34 pm | रामदास

एक हरवून गेल्याचं फिलींग या काळात सगळ्यांना आलं होतं.त्यामुळे एकाच विषयावर अनेक धागे एकाच वेळी सुरु झाले असण्याची शक्यता आहे .
वेगळेपण आणि वैशिष्ट्य इतक्या सहजासहजी हरवणार नाही.आपण सगळे आहोतच की एकत्र.
(बाकी बजबजपुरी या शब्दाबद्दल तुम्ही काय ती दुरुस्ती केली आहेच.)

टारझन's picture

9 Dec 2008 - 12:16 am | टारझन

या विषयासाठी तरी नवा टॉपिक सुरू करण्याची काय गरज होती, असा `विनोद' काही जण करू पाहतील. त्यांना शुभेच्छा!

आगाऊ शुभेच्छांबद्दल धण्यवाद आणि आपल्यालाही वाढदिवसाच्या हार्डिक शुभेच्छा !!

बाकी नावं न घेता लिहिलं असतं तरी ज्याला त्याला आपापलं समजलं असतं असं वाटून गेलं, असो पु.ले.शु

- टारझन

आपला अभिजित's picture

9 Dec 2008 - 3:52 pm | आपला अभिजित

या महिन्यात असल्याचे मला तरी माहित नाही.

आगाऊ शुभेच्छांबद्दल धन्यवाद!

आपला अभिजित's picture

9 Dec 2008 - 12:44 am | आपला अभिजित

देण्यामागे कुणाची खोडी काढण्याचा किंवा कमी लेखण्याचा हेतू नव्हता.

तसे वाटते आहे काय?

देण्यामागे कुणाची खोडी काढण्याचा किंवा कमी लेखण्याचा हेतू नव्हता.

तसे वाटते आहे काय?

हेतू काय आहे काय नाही, हे बर्‍याचदा महत्वाचं नसतं ... हे खालच्या प्रतिक्रियांवरून कळले असेलंच ... बाकी चालू द्या.

वाढदिवसाच्या शुभेच्छांचा फंडा तुम्हाला माहित नाही ? असे कसे मिपाकर हो तुम्ही ?

- टारझन

विकेड बनी's picture

9 Dec 2008 - 12:47 am | विकेड बनी

अहो गोंधळ आणि बजबजपुरी कसली? आपल्या सर्वांना ओलीस धरले आहे इथल्या काही लेखकांनी.

दिसली बातमी टाकला लेख.
दिसला विडिओ टाकली चर्चा.
घडली घटना केली कविता.

त्या कसाबला वाचायला लावा सर्व लेख आणि प्रतिसाद, पोपटासारखा बोलू लागेल टरकून.

-------------
दोन वेगळी मतं असतील तर करा चर्चा. तीन वेगळी मतं असतील तर टाका कौल.

धम्मकलाडू's picture

9 Dec 2008 - 2:25 pm | धम्मकलाडू

आपल्या सर्वांना ओलीस धरले आहे इथल्या काही लेखकांनी.
आणि काही सदस्यांनीही बरं का. मिपा हे सार्वजनिक संकेतस्थळ म्हणजे केवळ काही सदस्यांचा खासगी कट्टा होतोय की काय? फलाणा सदस्य अनेक दिवसांनी आला तर पुन्हा एकदा भव्य स्वागत. एखाद्या सदस्याला अपत्यप्राप्ती झाली तर अभिनंदन. नव्या सदस्यांना कोण अ‍ॅड्या, कोण धम्मू डॉन्या, कोण टार्‍या, कोण भडकममास्तर हे कसं कळणार? कळलं तरी काय? पण लक्षात कोण घेतंय?


दिसली बातमी टाकला लेख.
दिसला विडिओ टाकली चर्चा.
घडली घटना केली कविता.

सहमत आहे गं बने!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अभिजीत's picture

9 Dec 2008 - 12:53 am | अभिजीत

रामदास यांच्याशी सहमत -

>> एका दिवशी शिवराज पाटलांच्या राजीनाम्याचे तीन-तीन विषय होते! ..
मला वाटतं त्यात व इतर काही धाग्यांवर 'बातम्या' या सदरात मोडतील असे विषय होते.
बर्‍याच विकसीत सोशल नेटवर्कींग साइट्स वर असं होताना दिसतं. त्यामुळे, याबाबतीत मिपा अजून प्रगल्भ होत असल्याचं लक्षण आहे असे मला वाटते.

मिपा चं दर्शनी पान नवे लेख आणि ताजे प्रतिसाद दाखवायला अपुरं पडतंय हेही कारण असु शकेल?
हा थोडा सेंसिटिव मुद्दा आहे याची मला जाणिव आहे.

- अभिजीत

मुक्तसुनीत's picture

9 Dec 2008 - 1:27 am | मुक्तसुनीत

मिसळपाववर माणसे का येतात ? त्यांना इथे लिहावेसे का वाटते ? या प्रश्नांमधे तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे सामील आहेत.

ज्याला आजवर कधी लिहिता आले नव्हते त्या सर्वाना लिहायचे आहे. याआधी लिहिले तरी मराठीमधे लिहिता येत नव्हते. लिहिले तरी वाचणारे कुणी नव्हते. लिहिण्यावर विषयाचे , शब्दांच्या संख्येचे निर्बंध नको आहेत. कुणाची परवानगी नको आहे. लिहिण्याची पद्धत साधी सोपी हवी , फॉंट डाऊनलोड ची भानगड नको.

हे सर्व मिसळपाव वर आहे. तर मग इतक्या संख्येने मिसळपाववर लेखन होते याचे आश्चर्य वाटायला नको. मराठी साईट्स च्या तुलनेत इथला टर्न्-आउट प्रचंड आहे. पाचेक मिनिटाला एक नवी प्रतिक्रिया येतेच. दिवसात तासाला एक या ऍव्हरेजने सुमारे वीसेक नवे विषय येतात. या सार्‍याचा एक परिणाम म्हणजे - असंख्य नवे विषय, प्रतिक्रिया. ज्याना काहीतरी सांगावेसे वाटते अशा सगळ्यांना मोकळे असे हे व्यासपीठ आहे. एक गोष्ट सरळ आहे : जे लिखाण लोकांना हलके वाटते, कंटाळवाणे वाटते ते आपोआपच मागे पडते. ज्या विषयाबद्दल जास्त-जास्त लोकांना इंटरेस्ट आहे , तीव्रपणे वाटते , ते धागे जिवंत रहातात. बाकीचे मागे पडत रहातात. एकाच वाक्यातल्या नवीन धाग्यांना मी पाठिंबा देत नाही आहे ; पण अशा प्रकारच्या घटना का घडतात ते समजावून घेतो आहे.

लक्षात घ्या की मी इथे सर्व्हरवर पडलेला ताण , त्याची क्षमता वगैरे गोष्टी बोलत नाही. तो विषय वेगळा आहे . मला (आणि तात्या सोडून कुणालाही ) त्याबाबत काही करता येईल अशी आज परिस्थिती नाही.

ही झाली मला समजलेली कारणीमीमांसा. मिपाची लोकप्रियता अबाधित ठेवून काय करता येईल याबाबतची माझी मते :

१. विषयांची वर्गवारी. ही गोष्ट आजही होतेच. पण मिपाच्या मुख्यपृष्ठावरच एका खाली एक अशी वर्गवारी केली आणि नवनवे धागे/प्रतिक्रिया तिथेच येत राहिल्यास , लोकांना आपल्याला हव्या त्याच सेक्शन मधे जाता येईल , पण "सर्वात नवीन" पोस्ट्/प्रतिक्रिया असणारेच नेहमी टॉपला राहिल्याने कुणाचा हिरमोड होणार नाही. प्रत्येक वर्गाच्या शीर्षकावर क्लिक केले असता , त्या त्या वर्गातील धाग्यांचे पान उघडेल.

उदाहरणादाखल इंग्रजीतील एका फोरमचा ले-आउट पहा. नवे लिखाण केलेले धागे नेहमीच टॉपवर असतात.

वर्गवारीच्या शीर्षकावर क्लिक केले असता , मिपाच्या मुखपृष्ठासारखे पान येते - पण लेख फक्त त्या वर्गातलेच.

२. संपादकांनी विविध धाग्यांना एकत्र करणे. एक संपादक म्हणून मी हे शिकायला हवे. आणि मला न समजल्यास इतर कुणाला हे विचारायला हवे. पण अजून मिपावर हे होत नाही. एकाच विषयावरील अनेक छोटे छोटे धागे एकत्र आणल्यास गोंधळ कमी होण्यास मदत होऊ शकेल.

कलंत्री's picture

13 Dec 2008 - 12:49 pm | कलंत्री

आपण विस्तृत पणे उहापोह केला आहेच पण अधे मधे येणारे इंग्रजी शब्द रसभंग करत असतात याची नोंद घ्यावी.

उदा सरासरी, संकेतस्थळे, टिचकी, अग्रस्थानी, विभाग, रस इत्यादी शब्द असताना इतर आंग्ल शब्द कशाला हवेत?

( लेकी बोले सुना लागे यावर विश्वास असणारा खाष्ट) कलंत्री

अभिज्ञ's picture

9 Dec 2008 - 1:35 am | अभिज्ञ

अभिजीत,
हे जरा जास्तच होतेय.
आपण माझ्या धाग्याचा आपल्या लेखात उल्लेख केलेला पाहून आश्चर्य वाटले.
माझा धागा नीट वाचावात हि विनंती.
कलंत्री ह्यांच्या "गांधीवाद" या तीनहि भागात ह्याविषयावर नीटसि चर्चा झालेली नाही असे वाटते.
माझा धागा ह्या धाग्याचा उपधागा समजता येइल, परंतु हा अतिरेक्यांचे निर्मुलन येवढ्या पुरता मर्यादित नाहि.
त्याहून हि संपादक मंडळाला हे लिखाण मिपावर बजबजपुरी माजवते आहे असे वाटत असेल तर ते जरुर उडवावे.

अभिज्ञ.

विनायक पाचलग's picture

9 Dec 2008 - 8:25 am | विनायक पाचलग

मग राव आम्च्याबद्दल काय.
अहो पहिल्या दिवशी मी अवघ्या १ तासात ७ लेख टाकले.फक्त काय तर लिहिलेले वाचले जावे म्हणुन पण आम्हि आत सुधरलो आहोत जावु दे.

वेताळ's picture

9 Dec 2008 - 10:34 am | वेताळ

असहमत आहे तुमच्या शी. अहो मिपावर लिखाण स्वातंत्र्य आहे म्हणुन सगळे इथे लेखन करण्यास उत्सुक असतात.त्याना आपण कसे अडवणार? बाकी ज्याना लिखाण करावयाचे आहे त्यांनी काय लिहावे ह्याचे भान ठेवणे उत्तम.मुक्तसुनित ने जे मुद्दे लिहले आहेत त्याच्या सर्व मुद्द्यांशी सहमत.अभिज्ञ चा 'वाद' हा धागा उलट खुप चांगला आहे. माझे मत आहे कि त्यावर खुप चर्चा व्हायला हवी होती तेवढी अजुन झाली नाही आहे.
लिखाण स्वातंत्र आहे म्हणुन काहीही लिहु नये ह्या मताचा मी आहे.
वेताळ

आपला अभिजित's picture

9 Dec 2008 - 3:54 pm | आपला अभिजित

बाकी ज्याना लिखाण करावयाचे आहे त्यांनी काय लिहावे ह्याचे भान ठेवणे उत्तम.

माझेही हेच म्हणणे आहे!

ऍडीजोशी's picture

9 Dec 2008 - 1:55 pm | ऍडीजोशी (not verified)

"वाद" टॉपीक ला निष्कारण चर्चेत खेचल्या बद्दर त्रिवार निषेध.

मिसळपाव हा एक कट्टा आहे. शाळेचा वर्ग नाही. मी लिहिलेलं लोकं वाचतील, सुधारणा सुचवतील, मार्गदर्शन करतील ही भावना लोकांच्या मनात असते. लिखाण अपरिपक्व असले तरी थट्टा केली जाणार नाही हा आधारही असतो. तसंच, योग्य ते भान राखून लोकं मोकळेपणे इथे वावरात. मिपा एक भावना व्यक्त करायचेही साधन आहे. जगाला हादरवणारी घटना आपल्या देशात घडल्यावर त्याचे असे प्रतिसाद उमटणं स्वाभावीक आहे. त्याचा बाऊ करू नये. "अमिताभ को ठंड लगी" अशा आषयाचे टॉपीक निघाले नाहियेत. चिंता करू नये. मिपा वर कसलाही गोंधळ अथवा बजबजपूरी नाहिये. झालीच तर ती सांभाळून घ्यायला प्रशासक मंडळ आणि मिपाकर समर्थ आहेत.

हा विषय तात्यांशीही आधी बोललो आहे.

मग??? ह्यावर आम्ही काय बोलावं असं अपेक्षीत आहे???
तसंच ह्या विषयी जर तुम्ही तात्यांशी बोललात तर मग पुन्हा इथे टॉपीक टाकायची गरज काय? तसंच, नुसतंच त्यांच्याशी बोललो म्हणून सांगू नका. तात्यांचं काय मत पडलं हे ही सांगा. बाईंना नाव सांगीन चे टोचन आम्हाला देऊ नका.

धम्मकलाडू's picture

9 Dec 2008 - 2:27 pm | धम्मकलाडू

बाईंना नाव सांगीन चे टोचन आम्हाला देऊ नका.

कोणत्या बाई? :):)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आनंदयात्री's picture

9 Dec 2008 - 2:28 pm | आनंदयात्री

>>बाईंना नाव सांगीन चे टोचन आम्हाला देऊ नका.

=)) =)) =))
हा हा हा .. सहमत !!

अभिरत भिरभि-या's picture

9 Dec 2008 - 3:35 pm | अभिरत भिरभि-या

माझ्या भावना अडीने माझ्यापेक्षा चांगल्या व्यक्त केल्या आहेत.

वाचक म्हणून या तथाकथित 'अहमहमिके'चा 'त्रास' मला झाला तरी यावर बंदी/बंधन म्हणजे दुसर्‍यांच्या हद्दीतील घुसखोरी वाटते.
आणि ही अहमहिका 'त्रास' वाटली तर त्याकडे दुर्लक्ष करण्याचे स्वातंत्र्य आहेच की !
मिपावरचे वाचकप्रिय विषय आपोआप वरती राहतात आणि शिवाय कुणाचे काही चुकलेमाकले तर संपादक मंडळ आहेच की !

>>अमिताभ को ठंड लगी" अशा आषयाचे टॉपीक निघाले नाहियेत. चिंता करू नये.
१०१% सहमत

आपला अभिजित's picture

9 Dec 2008 - 3:57 pm | आपला अभिजित

बोललो होतो, ते मोघम स्वरूपात.

तोच विषय सर्वांशी बोललो, यात काही गैर नाही ना?

`तात्यांचं काय मत पडलं हे ही सांगा.'
- तात्या `बघतो' म्हणाले होते. माझ्या मतांशी काही प्रमाणात सहमतही होते.

विसोबा खेचर's picture

9 Dec 2008 - 5:03 pm | विसोबा खेचर

जगाला हादरवणारी घटना आपल्या देशात घडल्यावर त्याचे असे प्रतिसाद उमटणं स्वाभावीक आहे. त्याचा बाऊ करू नये. "अमिताभ को ठंड लगी" अशा आषयाचे टॉपीक निघाले नाहियेत. चिंता करू नये. मिपा वर कसलाही गोंधळ अथवा बजबजपूरी नाहिये. झालीच तर ती सांभाळून घ्यायला प्रशासक मंडळ आणि मिपाकर समर्थ आहेत.

लाख मोलाची बात! ऍडीसाहेबांशी सहमत आहे..

तात्या.

अभिजीत, ( इथे महागुरु फेम हास्य )

आपल्या धाग्याच्या पहिल्याच वाक्यात मिपा चे वेगळेपण अधोरेखित होत नाही का?

(च्यायला जमलं की शास्त्रीय लिहायला!!!!)

(नवज्योत सिद्धू फेम हास्य)

आपला अभिजित's picture

9 Dec 2008 - 3:50 pm | आपला अभिजित

विषयांच्या गर्दीला होता.
आपल्याला ज्या विषयावर मत व्यक्त करावेसे वाटते, तोच विषय आधी चालू असताना नवा धागा काढण्याच्या प्रकाराला `अभिव्यक्ती स्वातंत्र्य' कसे मानावे?

वाचक म्हणून या तथाकथित 'अहमहमिके'चा 'त्रास' मला झाला तरी यावर बंदी/बंधन म्हणजे दुसर्‍यांच्या हद्दीतील घुसखोरी वाटते.

बंदी घालावी, असे मी म्हटलेलेच नाही. तुम्ही तसा ग्रह का करून घेत आहात?
प्रत्येकानेच याची काळजी घ्यावी, असे वाटते. इथे विषय टाकण्यालाही बंधन असू नये. पण प्रत्येकाने स्वतःवर काही मर्यादा घालून घेतल्या पाहिजेत, असे वाटत नाही का? `मिपा' खरंच प्रगल्भ असेल, तर निदान नवे धागे टाकण्याबाबत तरी प्रशासकांना हस्तक्षेप करावा लागू नये!

आणि ही अहमहिका 'त्रास' वाटली तर त्याकडे दुर्लक्ष करण्याचे स्वातंत्र्य आहेच की !

हे म्हणणे वैचारिकद्रुष्ट्या योग्य असले, तरी व्यवहार्य नाही. उद्या एखादा एकदम नवे ५० धागे सुरू करेल. प्रत्येकी ५००० शब्दांचे. तो म्हणेल, `तुम्हाला त्रास होत असेल, तर दुर्लक्ष करा!' पण ते लिखाण योग्य आहे की नाही, हे वाचून ठरवण्याच्या सदस्यांच्या मूलभूत हक्कांवरच त्यामुळे गदा येत नाही का?

ऍडीजोशी's picture

9 Dec 2008 - 4:10 pm | ऍडीजोशी (not verified)

पण ते लिखाण योग्य आहे की नाही, हे वाचून ठरवण्याच्या सदस्यांच्या मूलभूत हक्कांवरच त्यामुळे गदा येत नाही का?

तो हक्क संचालक मंडळाचा आहे. तसंच, जे विषय संचालक मंडळाच्या अखत्यारीत येतात त्यांची चर्चा त्यांच्याशीच करावी हे तुमचे म्हणणे पटले.

अवांतर - संचालक मंडळ कोण हे नव्याने आलेल्या सदस्याला समजायची काही सोय मला तरी कुठे दिसली नाही. असल्यास माझ्या ज्ञानात क्रुपया भर घालावी.

अभिरत भिरभि-या's picture

9 Dec 2008 - 5:00 pm | अभिरत भिरभि-या

>>प्रत्येकानेच याची काळजी घ्यावी, असे वाटते. इथे विषय टाकण्यालाही बंधन असू नये. पण प्रत्येकाने स्वतःवर काही मर्यादा घालून घेतल्या पाहिजेत, असे वाटत नाही का? `मिपा' खरंच प्रगल्भ असेल, तर निदान नवे धागे टाकण्याबाबत तरी प्रशासकांना हस्तक्षेप करावा लागू नये!

प्रसिद्धी/प्रतिक्रिया मिळवाव्या म्हणून उठसूट धागे काढणार्‍यांवर तुमचा आक्षेप आहे हे मी समजू शकतो.
उगाच भारंभार धागे काढू नयेत हेही खरे आणि एखादे आधिकौणे झाले तरी पोलिसीगिरी करु नये; असे वाटते.

यात 'मर्यादा' म्हणून जे काही आहे ते अतिशय सापेक्ष आहे.
तुमच्या उदा. मधला 'ism' चा धागा हा माझ्या मते स्वतंत्र विषय आहे.

कोणत्याही प्रकारे 'अभिव्यक्ती स्वांतत्र्या'वर घाला आला की तो 'रोगापेक्षा ही इलाज भयंकर' असे ठरेल.यात संपादक मंडळाची भूमिका महत्वाची आहे. सध्याचे मिपाचे संपादक मंडळ आपले काम चांगल्या प्रकारे करते आहे.

>>हे म्हणणे वैचारिकद्रुष्ट्या योग्य असले, तरी व्यवहार्य नाही. उद्या एखादा एकदम नवे ५० धागे सुरू करेल. प्रत्येकी ५००० शब्दांचे. तो म्हणेल, `तुम्हाला त्रास होत असेल, तर दुर्लक्ष करा!' पण ते लिखाण योग्य आहे की नाही, हे वाचून ठरवण्याच्या सदस्यांच्या मूलभूत हक्कांवरच त्यामुळे गदा येत नाही का?

तुमचे उदाहरण अतिशयोक्तिचीही अतिशयोक्ति आहे. असे कोणतेही उदा. मी तरी गेल्या वर्षभरात मी पाहिले नाही.

तुम्ही हा उपाय 'अव्यवहार्य' म्हणण्याआधी स्वतः आजमावला होता का ही शंका ही आहे.
लेखांची लाट आल्यावर हा उपाय माझ्यासाठी हमखास चालतो.

आणि नफानुकसान बघता पोलिसीगिरीच्या नुकसानीपेक्षा अतिलेखांचा मारा कधीही परवडतो.

विसोबा खेचर's picture

9 Dec 2008 - 5:03 pm | विसोबा खेचर

कोणत्याही प्रकारे 'अभिव्यक्ती स्वांतत्र्या'वर घाला आला की तो 'रोगापेक्षा ही इलाज भयंकर' असे ठरेल.

सहमत आहे..

यात संपादक मंडळाची भूमिका महत्वाची आहे. सध्याचे मिपाचे संपादक मंडळ आपले काम चांगल्या प्रकारे करते आहे.

नक्कीच करते आहे.. आणि मुळात आक्षेपार्ह धागे आणि आक्षेपार्ह प्रतिसाद अप्रकाशित करणे हेच संपादन मंडळाचे काम आहे आणि ते काम चोख केले जात आहे..मिपावर कुठल्या विषयाचे किती धागे यावेत यावर काहीही बंधन नाही..

आणि त्यातूनही कुणी मुद्दामून एकाच विषयांवर अनेकानेक अथवा वारंवार धागे टाकून गैरफायदा घेत आहे असे आढळल्यास आम्ही त्या बाबतीत 'आणिबाणीचा शासनकर्ता' या नात्याने योग्य तो हस्तक्षेप करूच! :)

तात्या.

मनस्वी's picture

9 Dec 2008 - 5:07 pm | मनस्वी

या प्रतिसादासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत!

विसोबा खेचर's picture

9 Dec 2008 - 3:59 pm | विसोबा खेचर

अभिजित,

कळकळीने लिहिल्याबद्दल कृतज्ञ आहे..

सध्या गडबडीत आहे. आपल्या सर्वांच्या सूचना विचाराधीन आहेत..

आपला,
(कृतज्ञ) तात्या.

विसोबा खेचर's picture

9 Dec 2008 - 5:06 pm | विसोबा खेचर

नवे खाद्यपदार्थ, नव्या कविता-विडंबने यासाठीही वेगळा विभाग करावा, असे सुचवावेसे वाटते.

कविता आणि पाकक्रुती याकरता वेगळे विभाग ऑलरेडी आहेतच..

ज्यांना या विषयात रस नाही, ते थेट तो वगळू शकतील.

थेट वगळणे म्हणजे काय? ज्यांना हे विषय बघायचे नाहीत त्यांनी या विषयांवर क्लिक करू नये..शिंपल.!

(विभाग वेगळे आहेत, याची कल्पना आहे. पण'`नवे विषय' या सदराखाली ते एकत्र दिसतात!)

ते तर दिसणारच. प्रत्येक नवा विषय, नवा धागा हा मिपाच्या मुख्य प्रवाहात सुरवातीला आला पाहिजे आणि ज्याला प्रतिसाद मिळेल तो विषय ताजा समजून नव्याने वर आला पाहिजे अशी सोय प्रथमपासूनच ठेवली आहे..

असो..

तसं चाल्लंय ते एकंदरीत बरंच चाल्लंय म्हणायचं! तरीही अभिजितराव, आपण दाखवलेल्या कन्सर्नबद्दल मनोमन आहे..

आपलाच,
तात्या.

ऍडीजोशी's picture

9 Dec 2008 - 5:09 pm | ऍडीजोशी (not verified)

मनोमन (काय) आहे ???????? :)

कवटी's picture

9 Dec 2008 - 5:53 pm | कवटी

नवे खाद्यपदार्थ, नव्या कविता-विडंबने यासाठीही वेगळा विभाग करावा, असे सुचवावेसे वाटते.
कविता आणि पाकक्रुती याकरता वेगळे विभाग ऑलरेडी आहेतच..

याच बरोबर "सामंतकाका" असा एक वेगळा विभाग सुरु करावा. या विभागाच्या वरती त्यांचा रोजचा स्कोर दिसावा. अशी मी पंचायतीस णम्र विनंती करतो.

कवटी

रामपुरी's picture

9 Dec 2008 - 11:54 pm | रामपुरी

या प्रस्तावाला आमचे अनुमोदन आणि सहर्ष पाठिंबा

पाषाणभेद's picture

13 Dec 2008 - 1:57 am | पाषाणभेद

कुणीही जो reply देतो तो धागा वरती यायला हवा. जसे ईतर forum मध्ये होते.
त्या मुळे जिवंत धागा वर दिसावा.
-( सणकी )पाषाणभेद
-( सणकी )पाषाणभेद

गुळांबा's picture

29 Jan 2009 - 9:32 pm | गुळांबा

जगाला हादरवणारी घटना आपल्या देशात घडल्यावर त्याचे असे प्रतिसाद उमटणं स्वाभावीक आहे. त्याचा बाऊ करू नये. "अमिताभ को ठंड लगी" अशा आषयाचे टॉपीक निघाले नाहियेत. चिंता करू नये.

मिपावर अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन या विषयावर फार कमी लेख लिहिले गेलेले आहेत.

आपण मिपावर फक्त "शेवटची प्रतिक्रिया कधी आली" ह्या निकषावर त्या त्या धाग्याची लोकप्रियता ठरवतो (म्हणजेच तो धागा मुखपृष्ठावर किती वेळ राहिल हे)
ह्याच्या जोडीला आपण अजुन एक निकष वापरला तर? उ.दा. - "आपल्याला हा विषय किती आवडला/उपयोगी वाटला मत द्या (Radio button vote) - १:अतिशय कंटाळवाणा १०:जीव ओवळुन टाकावा असा"
अर्थात हा निकष परिपुर्ण आहे असे नाही पण निव्वळ "शेवटच्या मताची वेळ" ह्या पेक्षा निश्चितच बरा आहे.
कदाचित "किती वाचने झाली" हा ही निकष ह्याजोडीला लावता येईल

अर्थात, हे सर्व ड्रुपल मध्ये कसे बसवायचे हा निराळा विषय आहे म्हणा.