भ्रमणगाथा-३ गावचा उत्सव

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
16 Sep 2008 - 11:39 pm

याआधी: भ्रमणगाथा-२
परवाच्या शनिवारी विपिन फ्राफुला येणार असल्याने अर्थातच केसुना आवताण धाडले आणि मुख्य स्टेशनात भेटायचे ठरवले. आम्ही थोडे आधी पोहोचून तिथल्या एका तुर्की दुकानातून मिठाई वगैरे खरेदी करेपर्यंत केसुंचे फ्राफुत आगमन होऊन मुख्य स्टेशनाबाहेरच्या चौकात दादाकोंडकेंची गाणी ऐकत साहेब बसले होते.तिथून मग विमानतळ गाठला आणि कॉफी पित विपिनच्या गाडीची वाट पाहत बसलो होतो तेव्हाच रविवारी डार्मस्टाटमध्ये फिरायचे ठरवले.विपिनला घेऊन घरी जाताना आजची संध्याकाळ सत्कारणी कशी लावता येईल त्याचा विचार करू लागलो.सगळ्यांचं मत शिनूमाला गेलं.'मुंबई मेरी जान'चे परीक्षण वाचल्यापासून तो सिनेमा 'पहायचाच' ह्या यादीत गेला होता. त्याला 'बुधवार'ची जोड दिली. नसिर आणि अनुपम तोडीस तोड.. क्या बात है! दोन्ही सिनेमे लागोपाठ पाहिले.. जेवणाचा बेत होता पोळ्या, गाजराची कोशिंबिर,दहीभात,मिरचीचं लोणचं ',केसुंनी केलेली चटकदार मटकीची उसळ आणि 'थुलुंबा' ही तुर्की मिठाई(त्याला दिनेशने तुर्की गुलाबजाम असे नाव देऊन अपेक्षा वाढवल्या पण जऽरा अपेक्षाभंगच झाला..)आणि अर्थातच आईसक्रीम!
दोन दोन सिनेमे पहाताना दोन वाजून गेले.

फ्राफु ते डार्मस्टाट अवघ्या २५ -३० मिनिटांचा प्रवास.. रविवार सकाळ असल्याने सगळे फ्राफु आळसाच्या आणि सुट्टीच्या मूडात होते,अर्थातच गाडीला काडीची गर्दी नव्हती.जर्मनीमध्ये किवा एकंदरच युरोपातला ट्रामचा प्रवास मला नेहमीच आवडतो कारण जरी ट्राममधून फिरताना वेळ जास्त लागतो पण त्या गावात फेरफटका मारल्यासारखे वाटते.इथेही ट्रामममधून डार्मस्टाट दर्शन करत गावात एक चक्कर मारली.केसु 'राजुगाईड' झाले होते. ह्या गावातली चार चर्च प्रसिध्द आहेत त्यातील संत मार्टीन चर्च आणि रशियन चर्च ही दोन महत्त्वाची! रशियन चर्च केसुंच्या घराजवळच आहे, चालत जाण्यासारखे.मात्र डार्मस्टाट सगळा डोंगराळ भाग असल्याने रस्ते उंचसखल!एक चढण चढून वळण घेऊन चर्चच्या आवारात पोहोचलो. बाजूलाच मोठा बागिचा,लग्नाचा हॉल आणि डार्मस्टाटचे चिह्न म्हणून जो मनोरा कायम चित्रात दाखवतात तो मनोरा आहे. केगेल्न म्हणजे बॉलिंग खेळण्यासाठीची जागाही तिथेच पलिकडे आहे. मेपल्सच्या बागेत चारही बाजूला असलेले पुतळे लक्ष वेधून घेत असतानाच काहीतरी करुण कथा सांगत आहेत असे वाटते.(ती कथा काय ते कळले नाही.)चर्चच्या आवारात आयताकृती दगडी बांधीव फार खोल नसलेले तळे आहे. चर्चची इमारत बाहेरून फारच देखणी आणि टुमदार आहे. रशियन चर्चचा घुमट गोल असतो.इतर कॅथलिक आणि प्रोटेस्टंट चर्चांना घुमट नसतात तर उंच उंच कळस आकाशाच्या पोटात शिरायला पाहत असतात. अपवाद-फक्त म्युनशनमधल्या फ्राऊअनकिर्शला मात्र गोल घुमट आहे.


डार्मस्टाटच्या श्लॉस भागात गेलो.श्लॉस म्हणजे किल्ला. आता जरी हा भुईकोट किल्ला नसला तरी त्याच्या खुणा मात्र तिथले दगडी रस्ते आणि १५०० वर्षे जुनी मजबूत तटबंदीची भिंत दाखवते. तेथल्याच चौकात पहिल्या लुडविकचा भव्य पुतळा एका उंच मनोर्‍यावर आहे आणि तेथपर्यंत जिन्याने चढून जाऊन आपण डार्मस्टाटचे विहंगम दृश्य पाहू शकतो. सिटीसेंटर असल्याने येथे कायम चहेलपहेल असते.
सकाळी खाल्लेले केसुस्पेशल पोहे आता जिरले होते.त्यामुळे आता डार्मस्टाट मधील प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत 'हाटेले' दिसू लागली होती. अशोककुमारच्या पिज्झेरियात भारतीय पदार्थ खाऊन बाहेर आलो तो मिरवणूक सुरू होणार असल्याची लक्षणे दिसली.चौकात लोकं जमायला सुरूवात झाली होती.म्हातारेकोतारे,लहान मुलं हातात पिशव्या घेऊन उभी होती.खिडक्या खिडक्यातून लोकं दिसू लागले.आपल्याकडे कसे गणपतीची मिरवणूक किवा गोविंदा पहायला लोकं उभे असतात त्याची आठवण झाली आणि योगायोगाने आज अनंतचतुर्दशी असल्याची आठवणही झाली.दूरवरुन ड्रमचा आवाज येऊ लागला.ही कसली मिरवणूक?अशी चौकशी केली असता हा मार्टिनक्रेब म्हणजे संत मार्टिनच्या उत्सवाची मिरवणूक असल्याचे समजले.
संत मार्टिनचे चर्च हे डार्मस्टाटमधील एक प्राचीन चर्च.सप्टेंबरच्या पहिल्या रविवारी त्या चर्चची पारंपरिक जत्रा असते आणि पाठोपाठ येणार्‍या रविवारी 'आल्टस्टाटफेस्ट' म्हणजे गावचा उत्सव असतो.तीच उत्सवी मिरवणूक पहायला आता तिथल्या लोकांबरोबरच आम्हीही उत्सुक होतो.

सर्वात आधी बँडपथक बाअदबबामुलाहिजाहोशिय्यार करत आले.मागोमाग दोन उंच,पुष्ट,देखण्या आणि सजवलेल्या घोड्यांची बग्गी वाजतगाजत आली.घोडे चांगलेच दणकट होते.काळ्या रंगाचे आणि भुर्‍यापांढर्‍या आयाळीच्या घोड्यांना पायात फरचे जोडे घातले असावेत अशी मऊ झालर होती.बग्गीनंतर एकेक पथकं येऊ लागली.प्रत्येक पथकाचा गणवेष होता.त्यांचा बँड आणि त्यात वाजवणारे सगळे हौशी.. अगदी ८,१०,१२ वर्षांची मुलही फ्लूट,बिगुल,ड्रम वाजवत जात होती.कुठेही गडबड गोंधळ नाही की वाजवण्यात पुढेमागे नाही.सारे एका तालासुरात वाजवत चालले होते. प्रत्येक पथकामागोमाग त्यांचा सजवलेला रथ चालला होता आणि गोळ्या,चॉकलेटे,लहान खेळणी,किचेन्स इ. चा वर्षाव होत होता. सानथोर सारेच ते वेचत होते.मुलांच्या हातातल्या पिशव्यांचं कोडं आता उलगडललं.काही गाड्यातून गाजरे,सफरचंदे,वुर्ष्ट(सॉसेजेस्)इ. चे वाटप होत होते तर काही पथकांचे रथ डार्मस्टाटर बिअर आणि वाईनची पिंपे वाहून नेत होते आणि अंगूरबाला बँडच्या तालावर थिरकत साकीचे काम करत होत्या.भर दुपारी लोकं बिअर आणि वाइनचा अस्वाद घेत होते.दंगामस्ती होती पण बेधुंद कोणीही नव्हते.काही जण स्केटिंगची कौशल्यं दाखवत मिरवणूकीत चालले होते.तर काही नाचत गात चालले होते.गावचा उत्सव सारे गावकरी साजरा करत होते.


सर्वात शेवटचे पथक होते सफाईपथक! मिरवणूकीदरम्यान रस्त्यात पडलेल्या गोळ्याचाकलेटांच्या चांद्या,बिअर,वाइनचे प्लास्टीकचे गल्लास,गाजराचा पाला इ. कचरा यंत्राने साफ करत येणारी गाङी आणि ते सफाईकामगार ह्यांना मनोमन सलाम करत आम्हीही दोन चार चौक त्या मिरवणूकीत शामिल झालो.

कार्निवालच्या मिरवणूकीची आठवण करून देणारा हा गावचा उत्सव मनात जपत आम्ही फ्रांकफुर्टला परतलो.

प्रवासलेख

प्रतिक्रिया

रेवती's picture

16 Sep 2008 - 11:56 pm | रेवती

हा भागही छान जमलाय!
जेवणापासून ते शेवटचे सफाईचे फोटूपर्यंत आमचीही यात्रा झाली.

रेवती

यशोधरा's picture

16 Sep 2008 - 11:58 pm | यशोधरा

हा भागही छान जमलाय!
जेवणापासून ते शेवटचे सफाईचे फोटूपर्यंत आमचीही यात्रा झाली.

हेच म्हणते! मस्त लिहिलेस स्वातीताई!

प्राजु's picture

17 Sep 2008 - 12:03 am | प्राजु

स्वातीताई,
मिरवणूकीचे छान वर्णन केले आहेस. फोटो ही नेहमीप्रमाणेच खास. आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नंदन's picture

17 Sep 2008 - 7:08 am | नंदन

आहे. मिरवणुकीचे वर्णन आणि फोटोज आवडले.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

ऋषिकेश's picture

17 Sep 2008 - 12:08 am | ऋषिकेश

मस्त! वर्णन आवडले.. बाकी थुलुंबा म्हणजे ते चिकटलेल्या गर्‍यांसारखं / नानकटाईसारखं दिसतंय ते का?
मंडळाअची भटकंती जोरात चालू असू दे हीच सदिच्छा!

-(घाईत म्हणून संक्षिप्त) ऋषिकेश

भडकमकर मास्तर's picture

17 Sep 2008 - 12:41 am | भडकमकर मास्तर

मस्त वर्णन ..नेहमीप्रमाणेच....

आमचा आल्टस्टाटफेस्ट परवाच संपन्न झाला...मज्जा आली...
फ़ार मस्त शब्द आहे... पुन्हा पुन्हा म्हणून पहायला...
आल्टस्टाटफेस्ट आल्टस्टाटफेस्ट आल्टस्टाटफेस्ट आल्टस्टाटफेस्ट आल्टस्टाटफेस्ट आल्टस्टाटफेस्ट आल्टस्टाटफेस्ट

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

टारझन's picture

17 Sep 2008 - 3:20 am | टारझन

आग्गायायाया ... जहबहर्‍या... आयला ग्रेटच ... तोंडाला पाणी सुटलं .. वर्णन ऍज युज्वल अप्रतिम ...
आणि आपल्याला घोड्याची बग्गी जाम आवडली... (घोड्यांमुळे)
-
( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

स्वाती दिनेश's picture

18 Sep 2008 - 1:00 am | स्वाती दिनेश

हे अजून २ फोटो-

टारझन's picture

18 Sep 2008 - 2:11 am | टारझन

धन्यवाद स्वाती तै ... घोड्यांचे खुर अंमळ मस्त आहेत ... तगडे घोडे ... झकास ...

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

प्राजु's picture

17 Sep 2008 - 7:01 am | प्राजु

:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

गणा मास्तर's picture

17 Sep 2008 - 7:08 am | गणा मास्तर

आमचीपण सहल झाल्यासारखे वाटले
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

सहज's picture

17 Sep 2008 - 7:42 am | सहज

डार्मस्टाट उरुस, रथयात्रा वर्णन नेहमीसारखेच प्रभावी चित्रण.

फोटो, चर्च कळस माहीती मस्त.

मंग फुडच्या वर्साला पन जानार न्हव आल्टस्टाटफेस्टाला. :-)

विसोबा खेचर's picture

17 Sep 2008 - 8:50 am | विसोबा खेचर

स्वाती,

सुंदर वर्णन, मस्त फोटू..! :)

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2008 - 10:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर वर्णन, मस्त फोटू..!

काही पथकांचे रथ डार्मस्टाटर बिअर आणि वाईनची पिंपे वाहून नेत होते आणि अंगूरबाला बँडच्या तालावर थिरकत साकीचे काम करत होत्या.भर दुपारी लोकं बिअर आणि वाइनचा अस्वाद घेत होते.

अहाहा !!! काय मस्त मिरवणूक आहे. :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2008 - 11:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वातीताई,

नेहेमीप्रमाणे मस्त वर्णन आणि फोटूपण! तुम्हाला सगळ्यांना प्रत्येक वेळी फिरायला जाताना चांगली, स्वच्छ हवा बरोब्बर मिळते! :-)

चर्चचे फोटो मस्तच आहेत.

स्वाती दिनेश's picture

17 Sep 2008 - 12:10 pm | स्वाती दिनेश

तुम्हाला सगळ्यांना प्रत्येक वेळी फिरायला जाताना चांगली, स्वच्छ हवा बरोब्बर मिळते!
थोडे दिवस आहेत ग, आता पानगळ सुरू झालीच आहे, हळूहळू हवाही चांगली राहणार नाही.सूर्यदेवाची काय एखाद दोन तास डिवटी असतेय त्यात आपण आपले फोटू काढून घ्यायचे .. बाकीचा वेळ असतेच मग ढगांची छत्री..
स्वाती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Sep 2008 - 12:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> थोडे दिवस आहेत ग, आता पानगळ सुरू झालीच आहे, हळूहळू हवाही चांगली राहणार नाही.सूर्यदेवाची काय एखाद दोन तास डिवटी असतेय त्यात

मला पानगळ खूप आवडायची ... त्याचे पण फोटो पाठवशील नंतर? ... मस्त वाटतात सगळे रंग! वेगवेगळ्या झाडांवर वेगवेगळ्या शेड्सपण सही वाटतात. :-)

>> आपण आपले फोटू काढून घ्यायचे .. बाकीचा वेळ असतेच मग ढगांची छत्री..

खरं आहे. आणि मला वाटलं, याच लोकांना बरी सगळे दिवस चांगली हवा मिळते आणि मी तिथे असताना कायम ढग! :-D

मनिष's picture

17 Sep 2008 - 11:59 am | मनिष

खाणे आणि वर्णन दोन्हीही झकास!!! आल्टस्टाटफेस्ट ला यायचे आहे एकदा!

सुनील's picture

17 Sep 2008 - 1:44 pm | सुनील

लेख आणि फोटो छान. लेख अजून विस्तारीत करता आले तर उत्तम.

भर दुपारी लोकं बिअर आणि वाइनचा अस्वाद घेत होते
अहो, बिअर आणि वाइन केव्हाही प्यावी!

असो, आता पुढच्याच महिन्यात म्युनिक येथे बिअर महोत्सव सुरू होईल. तुम्ही सगळे जरूर जा आणि माझ्या नावाने थोडे आचमन करा!!

(हघ्या हो)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

मनस्वी's picture

17 Sep 2008 - 1:54 pm | मनस्वी

स्वातीताई, छान वर्णन केलंएस. फोटोची मांडणी पण उत्तम केलीयेस. घोड्यांची बग्गी सॉल्लिड आहे!

मिरवणूकीदरम्यान रस्त्यात पडलेल्या गोळ्याचाकलेटांच्या चांद्या,बिअर,वाइनचे प्लास्टीकचे गल्लास,गाजराचा पाला इ. कचरा यंत्राने साफ करत येणारी गाङी

हे मस्तच!

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

मिंटी's picture

17 Sep 2008 - 2:01 pm | मिंटी

स्वाती ताई खुप मस्त लिहिलं आहेस गं.............

सहीच वर्णन...आवडलं एक्दम....

तुम्च्या या भ्रमणाचे आणखी काही फोटो असतील तर ते मला मेल करशील का?

झकासराव's picture

17 Sep 2008 - 2:35 pm | झकासराव

वॉव!
फोटॉ कसले जबरा आहेत. :)
त्या मनोर्‍यावर असलेल्या पुतळ्याच्या फोटुत मध्येच लटकलेल्या वायरी आल्या आहेत. फॉरेनात देखील असतात काय अशा लटकणार्‍या वायरी??

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

वारकरि रशियात's picture

17 Sep 2008 - 4:42 pm | वारकरि रशियात

मुक्तसंगः अनहंवादि

अतिशय छान वर्णनशैली !
आभार आणखी एका कारणास्तवः
डार्मस्टाट येथे मुख्यालय असणार्या एका औषधाच्य कंपनीत मी एकेकाळी चाकरी करीत असे.
आणि पुढील वीकांती फ्रांकफुर्ट येथे असेन.

पद्मश्री चित्रे's picture

17 Sep 2008 - 4:45 pm | पद्मश्री चित्रे

छान लिहिल आहेस ग एक्दम..
फोटो पण क्लास....

प्रभाकर पेठकर's picture

17 Sep 2008 - 7:05 pm | प्रभाकर पेठकर

वा मस्त वर्णन आणि फोटोज्.
पुडील भागांच्या प्रतिक्षेत.

रामदास's picture

17 Sep 2008 - 7:39 pm | रामदास

आल्टस्टाटफेस्ट .सुंदर लेख.

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

सर्वसाक्षी's picture

17 Sep 2008 - 11:03 pm | सर्वसाक्षी

सफर वाचायला आवडली, मजा आली. चित्रेही झकास!

विकी शिरपूरकर's picture

17 Sep 2008 - 11:07 pm | विकी शिरपूरकर

छान आवडली बुवा तुमची लिखाणाची स्‍टाईल.

आमची शाखा इथेही आहे. http://vikasshirpukar.mywebdunia.com/

स्वातीजी,

तोंडाला पाणी सुटले!

प्रोस्त!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

चतुरंग's picture

18 Sep 2008 - 2:30 am | चतुरंग

भ्रमणमंडळ जोरात भ्रमंती करते आहे की!
स्वातीताई, वर्णन नेहेमीप्रमाणेच चटकदार भेळेसारखे आणि प्रकाशचित्रे लेखाची शोभा वाढवणारी आहेत.
घोडे खरंच उमदे आहेत आणि त्यांचे केसाळ पांढरे खूर त्यांना एकप्रकारचा लाडिकपणा बहाल करतात.

जेवणाचा बेत होता पोळ्या, गाजराची कोशिंबिर,दहीभात,मिरचीचं लोणचं ',केसुंनी केलेली चटकदार मटकीची उसळ आणि 'थुलुंबा' ही तुर्की मिठाई
... हम्म्म्म्...छान छान चालूद्या! =P~ ('थुलुंबा' हा थोडासा आपल्या बालूशाही सारखा किंवा मेडिटरेनियन 'बकलावा' सारखा असावा असे फोटू बघून वाटले)
भर मिरवणुकीत बियर आणि वाईनची पिंपे? वा वा वा! मग काय मजा आहे बुवा! :B
शेवटी सफाईचे भान ठेवलेले पाहून सामाजिक जबाबदारीचे कौतुक वाटले. =D>

चतुरंग

मदनबाण's picture

18 Sep 2008 - 10:07 am | मदनबाण

ताई एकदम मस्त लिहले आहेस ... :)

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

स्वाती दिनेश's picture

23 Sep 2008 - 2:14 am | स्वाती दिनेश

ऋषिकेश,चतुरंग,
थुलुंबा- ही तुर्की मिठाई (नावावरून आफ्रिकन वाटते ना? ) बाहेरून थोडी कडक असते आणि आतमध्ये गुलाबजामला बरीचशी सिमिलर लागते.बाकलावा किवा बालूशाहीपेक्षा थुलुंबाची चव वेगळी असते.
सुनील,
पुढच्या महिन्यात नव्हे तर २० सप्टेंबरपासून ह्या वर्षीचा ऑक्टोबर फेस्ट सुरू झाला सुध्दा.. ह्या कुंभमेळ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर हे वाचा आणि जत्रा अनुभवा.
सहजराव,
फुडल्या वर्साला पण जानार की आल्टस्टाटफेस्टाला,येता काय आमच्याबरुबर?
भ्रमणमंडळाच्या वतीने सर्व मिपाकरांना मनापासून धन्यवाद,
स्वाती