अपत्य दत्तक योजना : (अति)कच्चा आरंभिक आराखडा

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in काथ्याकूट
14 Jul 2008 - 9:06 am
गाभा: 

ऋणनिर्देशः तात्या अभ्यंकर,विकास यांच्यातील संकेतस्थळाचे उपयोग याविषयीच्या चर्चेनंतर आणि तेथे दिलेल्या माझ्या प्रतिसादातील प्रस्तावित दोन योजनांपैकी अपत्य दत्तक योजनेचा (अति)कच्चा आरंभिक आराखडा येथे टंकित करत आहे. अशा विधायक कार्यासंबंधीची मूळ कल्पना पुढे आणल्याबदल तात्या आणि विकासरावांचे मनःपूर्वक आभार व हार्दिक अभिनंदन. तसेच या योजनेत सहभागी होण्याबद्दल स्वारस्य दाखवल्याबद्दल आणि सतत पाठपुरावा करून हा मुद्दा आज येथे टंकित स्वरूपात आणल्याबद्दल इनोबा व ऋषिकेश यांचे अनेक आभार.
अपत्य दत्तक योजना
योजनेचे उद्दिष्ट -

  1. सध्या अनाथालयांमध्ये वाढत असलेल्या अधिकधिक मुलांना पालक मिळवून देणे,त्यायोगे त्यांची सामाजिक व शैक्षणिक वाढ,भावनिक स्थिरता आणि कौटुंबिक अनुभव,त्यांचे न्यूनगंडनिवारण
  2. येनकेनप्रकारेण स्वापत्यसुखापासून वंचित राहिलेल्या,कुटुंब नियोजनासाठी तयारी करीत असलेल्या किंवा उत्सुक असलेल्या दांपत्यांस अपत्यसुखाचा आजीवन अनुभव मिळवून देणे

मिपाकरांचे जे कट्टे वेळोवेळी भरतात,तेथे होणार्‍या मौजमजेबरोबरच त्या वेळेचा आणि सदस्यांच्या उपस्थितीचा विधायक,समाजोपयोगी कार्यासाठी उपयोग झाल्यास उत्तम या मूळ कल्पनेतून मी ही योजना जन्माला घातली.असे कार्य करण्यासाठीची ही एकमेव योजना नसून एक पर्याय व एक सुरुवात आहे,असे समजूया.

योजना कशी राबवावी,याबाबतच्या काही कल्पना पुढीलप्रमाणे -

  1. यापुढील मिपा कट्ट्याच्या वेळी अपत्य दत्तक देणार्‍या सामाजिक संस्था,स्थानिक अनाथालये यांचे संचालक,संबंधित पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांचे आटोपशीर माहितीपर व्याख्यान कट्ट्याचा अधिकृत कार्यक्रम म्हणून समाविष्ट केले जावे.
  2. अशा व्याख्यानात दत्तक दिलेघेतले जाण्यामागची सामाजिक गरज,दत्तक प्रक्रिया,आर्थिक बाजू,कायदेशीर बाबी यांबाबत समुपदेशन व्हावे.
  3. ही माहिती संग्रहित स्वरूपात रचून मिपावर संदर्भासाठी प्रसिद्ध केली जावी. मिपाच्या सदस्यांनी या माहितीचा मौखिक प्रसार करावा.
  4. विवाहोत्सुक उपवर तरुण-तरुणी तसेच नवविवाहित जोडपी आणि मूल दत्तक घेण्यास उत्सुक असणार्‍या जोडप्यांस या योजनेबद्दल माहिती द्यावी.संग्रहित माहिती त्यांच्यापर्यंत पोचेल,हे पहावे.
  5. स्वतः मूल दत्तक घेतलेल्या दांपत्यास भेटून त्यांचे मूल दत्तक घेतानाचे अनुभव,मुलाचे पालनपोषण - खाणेपिणे,दैनंदिन व्यवहार,शिक्षण,मौजमजा इ. - करतानाचे अनुभव म्हणजे आलेल्या अडचणी,त्यांच्या निवारणासाठी त्यांनी अनुसरलेले मार्ग इ. बाबत मुलाखतवजा कार्यक्रम कट्ट्याच्या वेळी करता येईल.त्यातून मिळालेल्या माहितीचा प्रसार वर सांगितल्याप्रमाणे करता येईल.

मी स्वतः सद्यस्थितीत या योजनेसाठी काय करू शकतो -

  1. जमेल तितक्या माहितीचा संग्रह आणि पुरवठा
  2. संबंधित संस्था व पदाधिकारी,कार्यकर्ते यांचे संपर्क पत्ते पुरविणे;गरज पडल्यास त्यांच्याशी स्वतः थेट संपर्क साधणे
  3. जी दांपत्ये दत्तकप्रक्रियेतून गेली आहेत,त्यांना त्यांचे अनुभव सांगण्यासाठी व माहिती देण्यासाठी आमंत्रित करणे - त्यांचे संपर्क पत्ते पुरविणे
  4. शक्य ती/शक्य तेवढी आर्थिक मदत
  5. या (अति)कच्च्या मसुद्यात वेळोवेळी,गरज पडेल तशी सुधारणा आणि तो राबवण्याबद्दलच्या अधिकाधिक उपयुक्त कल्पना व त्यांची अंमलबजावणी

या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून मुंबईतील एका संस्थेचा व तिच्या संबंधित कार्यकर्त्याचा/पदाधिकार्‍याचा पत्ता येथे देत आहे -
वात्सल्य ट्रस्ट,मुंबई
प्लॉट क्र. १२८५,कांजुरमार्ग पोलीस स्थानकाजवळ
कांजुरमार्ग(पूर्व),मुंबई ४०००४२
फोन.: +९१ २२ २५७८ २९५८
+९१ २२ २५७९ ४७९८
संपर्कः श्री. ए. जी. दामले

श्री.दामलेंचा खाजगी संपर्क पत्ता - जसे त्यांचा भ्रमणध्वनी क्र.,विरोप पत्ता मिळवून येथे द्यायचा प्रयत्न यथावकाश करेनच.

या संस्थेतून दत्तक घेतले गेलेल्या एका मुलीला मी स्वतःच्या अंगाखांद्यावर खेळवले आहे.त्यामुळे दत्तक घेतले गेल्यानंतर अशी मुले,पालक,त्यांच्यातले रुजू लागलेले नाते,येणार्‍या समस्या इ. बद्दल स्वानुभव आहे.त्यावरून हा प्रकल्प अधिक यशस्वी करण्यासाठी काय काय करावे लागेल,याचा अंदाज येतो आहे आणि त्यासंबंधी प्रकल्पाच्या माध्यमातून काय करता येईल,याचाही विचार चालू आहे. माझी स्वतःची मावसमावसबहीण या क्षेत्रात स्वयंसेवा करते व ती या संस्थेशी संबंधित आहे.तिचा संपर्क पत्ता दुर्दैवाने सध्या माझ्याकडे नसला तरी यथावकाश तोही मिळवायचा प्रयत्न करीन,जेणेकरून जमेल तसे तिच्याशी एखाद्या कट्ट्यादरम्यान किंवा इतरही वेळी शक्य असेल तेव्हा बोलता येईल.

ऋषिकेश यांनी पुण्यातील 'अपना घर' या अशाच एका संस्थेबद्दल माझ्याशी बोलणी केली होती.तसेच लहान मुलांची दत्तकप्रक्रिया तुलनेने सुलभ असते;पण कळू लागलेल्या वयातील मुले दत्तक दिलीघेतली जाण्यात प्रामुख्याने काठिण्य असते,असे सांगितले होते.ऋषिकेश,तुम्ही व इनोबांनी मिळून अपना घर बद्दल अधिक माहिती,संपर्क मिळवल्यास व तिच्याशी संबंधित पदधिकारी व कार्यकर्त्यांचे वर नमूद केल्याप्रमाणे आटोपशीर व्याख्यान एखाद्या कट्ट्यादरम्यान किंवा इतर वेळी अनौपचारीकपणे आयोजित केल्यास मदत होऊ शकेल.

हा मसुदा परिपूर्ण तसेच अंतिम नाही,याची नम्र जाणीव आहे.तेव्हा त्यात मोलाची भर घालण्यासाठी व सूचना आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कोणत्याही मदतीतून मिपाच्या सौजन्यातून हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी,प्रोत्साहन व मार्गदर्शनासाठी सर्व मिपाकरांचे स्वागतच आहे.

धन्यवाद.

(उपक्रमी)बेसनलाडू

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

14 Jul 2008 - 9:41 am | यशोधरा

>>शक्य ती/शक्य तेवढी आर्थिक मदत

ही कशी करता येईल ह्याबद्दल अधिक माहिती द्याल का?

बेसनलाडू's picture

14 Jul 2008 - 12:50 pm | बेसनलाडू

अशा मदतीसाठीचे चटकन् सुचलेले काही पर्याय -

  • संबंधित संस्थेला आर्थिक मदत देणगी स्वरूपाने - आपल्या घरी वाढदिवस,सणवार अशा प्रसंगी किंवा मागेच कोणीतरी सुचविल्याप्रमाणे मिपाचा कट्टा भरेल तेव्हा इ.
  • संबंधित संस्थेत वाढणार्‍या मुलाचा शाळेच्या फीचा,वह्यापुस्तकांचा किंवा कपड्याचा सगळा किंवा काही खर्च वर्षभरासाठी उचलणे
  • शक्य असेल तेथे/तेव्हा अशा संस्थेस प्रत्यक्ष भेट देऊन,तेथील कार्याची पडताळणी करून संस्थेचे सभासदत्त्व घेणे,नियमित देणगीदार होणे
  • मूल दत्तक घेताना करावयाच्या सर्व संबंधित कायदेशीर सोपस्कारांचा खर्च दत्तक पालकांच्या बरोबरीने किंवा पूर्णपणे स्वतःहून उचलणे

(पर्यायी)बेसनलाडू

यांव्यतिरिक्त तुम्हांला स्वतःला काही सुचत असेल,तर तेही करू शकता व येथे सुचवू शकता.
(सूचक)बेसनलाडू

इनोबा म्हणे's picture

14 Jul 2008 - 11:14 am | इनोबा म्हणे

आरंभिक आराखडा दिल्याबद्दल धन्यवाद!
योजना कशाप्रकारे राबवावी याबाबतच्या आपल्या सगळ्याच कल्पना आवडल्या.

यापुढील मिपा कट्ट्याच्या वेळी अपत्य दत्तक देणार्‍या सामाजिक संस्था,स्थानिक अनाथालये यांचे संचालक,संबंधित पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांचे आटोपशीर माहितीपर व्याख्यान कट्ट्याचा अधिकृत कार्यक्रम म्हणून समाविष्ट केले जावे.
याबाबतीत इतर सदस्यांचे मत जाणून घेण्यास उत्सूक आहे.

आपण म्हटल्याप्रमाणे पुण्यातील संस्थांची माहीती शक्य तितक्या लवकर इथे देण्याचा प्रयत्न करतो.
पुण्यातून या प्रकल्पात काम करु इच्छिणार्‍या सदस्यांनी कृपया संपर्क करावा.

मुंबईतील काही संस्थांची माहीती इथे मिळेल.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

बेसनलाडू's picture

14 Jul 2008 - 11:32 am | बेसनलाडू

यादीतील पुढील संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातूनच माझे अभियांत्रिकी शिक्षण झाले असल्याने संस्था;संस्थेचा व्यवहार,शिस्त व पारदर्शकता यांबद्दल खात्री आहेच:
Fr. Agnel Ashram
P.O. Box 6656
Bandstand
Bandra
Mumbai 400050
Karmayogi: Fr. Superior
Tel.: 26423841 / 42/ 27661924
Fax: 26516831
Email: agnelt@bom2.vsnl.net.in
Profile: x
Website: agnel.org/organization.html, www.frcrce.ac.in
notes: orphanage for boys aged 10-18; about 76 kids;
branch in Navi Mumbai, Pune, Goa, and Delhi also

५ ते ९ किंवा १० ते १८ चा वयोगट दत्तकप्रक्रियेच्या दृष्टीने आपण आधी बोलल्याप्रमाणे 'ट्रिकी' असा आहे. तरी माझ्याच संस्थेकडून याबाबत अधिक माहिती मिळवण्यास अडचण येऊ नये,असे वाटते.संपर्कपत्ता तुम्ही दिलेल्या दुव्यावर आहेच;पण वैयक्तिक ओळखीतून अधिक माहिती मिळवायचा प्रयत्न नक्कीच करेन.
दुवा खूपच उपयोगी आहे. सहर्ष आभार.
(आभारी)बेसनलाडू

नंदन's picture

14 Jul 2008 - 1:09 pm | नंदन

कल्पना आहे. आराखडा मांडून ह्या कामाला प्रारंभ केल्याबद्दल चक्रपाणिचे अभिनंदन, पुढील कामाला शुभेच्छा. वर सुचवलेल्या पर्यायांप्रमाणे मी यथाशक्ती मदत करेन.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अन्या दातार's picture

14 Jul 2008 - 3:25 pm | अन्या दातार

सांगलीत माझी आत्या एका अनाथाश्रमाची संचालिका आहे. संस्थेचा व्यवहार अत्यंत पारदर्शी आहे. त्यामुळे तेथे मदत करण्यास काहीच हरकत नाही.

उज्ज्वला परांजपे
भ्रमणध्वनी: ९८९००१४४६६

विकास's picture

14 Jul 2008 - 4:53 pm | विकास

चांगली चर्चा आणि माहीती आहे.

वर बेलाने बहुतेक मुद्दे आणले आहेतच त्यातील ,"स्वतः मूल दत्तक घेतलेल्या दांपत्यास भेटून त्यांचे मूल दत्तक घेतानाचे अनुभव...," हा मुद्दा महत्वाचा आहे.

दुसरा भाग असा आहे की प्रत्येकजण दत्तक मूल घेत असेलच अशातला भाग नाही पण जर कधी कोणी जवळच्या व्यक्तीने घेतले तर त्याला/तीला प्रोत्साहन देणे आणि त्या मुलाला जाणीवपूर्वक (कळत कोणी करणार नाही पण नकळतसुद्धा) तो / ती दत्तक असल्याची जाणीव करून देउ नये हे महत्वाचे वाटते.

दुसरा भाग हा परदेशस्थ भारतीयांसाठीचा - त्यांच्या साठी कधी कधी दोन देशातील कायद्यांना तोंड द्यावे लागते. अमेरिकन्स बर्‍याचदा एशियन्स (म्हणजे यांच्या संदर्भात - चायनीज, व्हिएटनामीज वगैरे) मुलांना तेथे जाऊन दत्तक घेतात आणि मनापासून आईवडील होतात. असे आदर्श आई-वडील - भारतीय आणि अभारतीय अमेरिकन्स - जवळून पाहीले आहेत आणि त्यांच्याबद्दल आदर वाटतो.

विसोबा खेचर's picture

14 Jul 2008 - 5:15 pm | विसोबा खेचर

योजना कशी राबवावी,याबाबतच्या काही कल्पना पुढीलप्रमाणे -

या मथळ्यांतर्गत दिलेल्या सर्व कल्पनां चांगल्याच आहेत..

बेलाचा प्रस्ताव उत्तम आहे व माझ्या त्याला मनापासून शुभेच्छा!

अवांतर - सामाजिक बांधिलकी ही अनेक प्रकारची असू शकते, इच्छुक व्यक्तिला अनेक प्रकारे काही चांगले सामाजिक कार्य करता येते. माझ्या स्वत:पुरतं बोलायचं झालं तर माझ्याकडे उपलब्ध असलेला सर्व वेळ,पैसा मी महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था, पुणे, ह्या एकाच संस्थेला देऊ इच्छितो...

तात्या.

ऋषिकेश's picture

14 Jul 2008 - 9:25 pm | ऋषिकेश

प्रारंभिक आराखडा दिल्याबद्दल अनेक आभार! आपल्या सगळ्याच कल्पना मस्त आहेत यात वादच नाही.

याशिवाय अश्या मुलांच्या मानसिक विश्वासंबंधी कोठे काहि महिती असल्यास जरूर शोधावी. एकदा एका सहप्रवाशाकडून मिळालेल्या ऐकीव माहिती नूसार पुण्यात एक मानसोपचार तज्ञ केवळ दत्तक मुलांच्या प्रोब्लेम्सवर कार्यरत आहेत. (या माहितीच्या सत्यतेची पडताळणी केलेली नाही) त्यांची माहिती मिळाल्यासही द्यावी.

बाकी सगळ्यांची मते वाचण्याबद्दल उत्सुक आहे.
बेलाचे अभिनंदन!

(आषाढीचा मुहूर्त चांगला शोधलास रे बेला ;) )

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

दत्तक अपत्य हा आता पूर्वीइतका न बोलला जाणारा विषय राहिलेला नाही. अनेक जोडपी अपत्य दत्तक घेतात आणि आपले व त्या अपत्याचे आयुष्य सुखाने भरुन टाकतात! (कित्येक वेळा दांपत्यात कोणताही वैद्यकीय दोष नसताना मूल होत नसते आणि पहिले मूल दत्तक घेतल्यानंतर लगेचच दोनेक वर्षात त्यांना स्वतःचे मूलही झाल्याच्या बर्‍याच घटना आहेत. वात्सल्यभावाने मूल वाढवल्याचा परिणाम म्हणता येईल!)
पुण्यात ससून हॉस्पिटलच्या आवारात 'सोफोश' (Society of Friends of Sassoon Hospital))ही एक रजिस्टर्ड संस्था आहे जी ह्या क्षेत्रात ३५ वर्षे कार्यरत आहे.
'श्रीवत्स' हे ह्या संस्थेने चालवलेले मुलांचे देखभाल केंद्र मूल दत्तक देण्याची सर्व प्रक्रिया करते. अत्यंत सेवाभावी आणि कर्तव्यतत्पर लोक तिथे काम करत आहेत.

ह्या संस्थेला देणगी देणे हे एक काम असू शकते. पण त्याही पेक्षा त्या संस्थेला तुम्ही आठवड्या-पंधरवड्यातून एखादा तास देऊ शकलात तर ते जास्त मोलाचे ठरेल. तिथल्या मुलांशी एक तास खेळणे, थोडी मोठी मुले असतील त्यांचा अभ्यास घेणे, गोष्टी सांगणे , गाणी म्हणणे, एकूण त्यांना माया देणे. हे जर घडले तर त्या मुलांना आपलेपणाचा सहवास मिळून ती समाजात जास्त चांगल्याप्रकारे मिसळू शकण्यास हातभार लागतो. अनेक लोक तसे काम करीत आहेत. काही लोक तर रोज ऑफिसमधून घरी जाताना तिथे थोडा वेळ देऊन मग घरी जातात हे मी पाहिले आहे. अर्थात सर्वांना रोज हे शक्य नाही पण ८-१५ दिवसातून एक तास अवघड नसावा.

वरच्या एका प्रतिक्रियेत विकास ह्यांनी म्हटले आहे की -
दुसरा भाग असा आहे की प्रत्येकजण दत्तक मूल घेत असेलच अशातला भाग नाही पण जर कधी कोणी जवळच्या व्यक्तीने घेतले तर त्याला/तीला प्रोत्साहन देणे आणि त्या मुलाला जाणीवपूर्वक (कळत कोणी करणार नाही पण नकळतसुद्धा) तो / ती दत्तक असल्याची जाणीव करून देउ नये हे महत्वाचे वाटते.
वस्तुस्थिती ह्याच्या अगदी उलट असते. दत्तक मुलाला लहानपणीच गोष्टीरुपाने, समजू लागल्यावर ऍडॉप्टेड्/दत्तक हा शब्द कानावरुन जाऊ द्यावा. त्याचासारखीच इतर मुले/मुली जिथे आहेत ती 'दत्तक' आहेत हे आवर्जून सांगावे. म्हणजे त्या बालकाच्या मनात तो शब्द वावगा म्हणून रहात नाही. कारण कधी ना कधी त्या बालकाला हे समजणारच असते आणि आपल्या जीवनाबाबतचे रहस्य हे आपल्या दत्तक आई-वडीलांकडून न कळता बाहेरुन कोणाकडून तरी कळणे ह्याच्याइतके भावविश्व उद्ध्व्स्त करणारे काही असू शकत नाही! त्यानंतर त्यांना सावरणे महाकठिण असते. तेव्हा त्यांना वेळीच कल्पना मिळणे जास्त महत्त्वाचे.

चतुरंग

प्रियाली's picture

14 Jul 2008 - 10:23 pm | प्रियाली

दुसरा भाग असा आहे की प्रत्येकजण दत्तक मूल घेत असेलच अशातला भाग नाही पण जर कधी कोणी जवळच्या व्यक्तीने घेतले तर त्याला/तीला प्रोत्साहन देणे आणि त्या मुलाला जाणीवपूर्वक (कळत कोणी करणार नाही पण नकळतसुद्धा) तो / ती दत्तक असल्याची जाणीव करून देउ नये हे महत्वाचे वाटते.

हे मी आधी वाचले होते पण यावर प्रतिक्रिया द्यायचे राहिले. चतुरंगांच्या प्रतिक्रियेशी सहमत आहे.

आपल्या जीवनाचे रहस्य बाहेरून किंवा मोठे झाल्यावर काही कारणास्तव आईवडिलांकडून कळल्यावर फसवणूकीची भावना मनात निर्माण होणे अगदी शक्य आहे किंबहुना, मी ते तसे पाहिलेले आहे. अशा एका व्यक्तिला तरूणपणी ही गोष्ट माहित पडल्यावर या मुलाने आपल्या आईवडिलांशी संबंध तोडलेले अनुभवले आहेत.

मला वाटतं, लहानपणीच मुलाला हळूवारपणे कल्पना द्यावी. लहानपणापासून सतत त्याच्या बाजूला उभे राहून सत्य सांगत गेले तर त्याच्या मनाला त्यात काही वावगे वाटणार नाही. असे करताना मी पालकांना पाहिले आहे. इतकेच नव्हे तर आपले मूल दत्तक आहे हे अगदी सहजपणे सांगताना पाहिले आहे. अशा पालकांचे मला नेहमी कौतुक वाटते.

बेसनलाडू's picture

14 Jul 2008 - 10:35 pm | बेसनलाडू

अशा मुलांच्या वयाची ८ वर्षे पूर्ण व्हायच्या आत त्यांना ती 'दत्तक' असल्याचे सांगणे मानसशास्त्रीयदृष्ट्या त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे आहे,अशी माझी माहिती आहे.आणि तेही दत्तक पालकांकडून किंवा अगदी जवळच्या व्यक्तीकडून - जसे आजी-आजोबा (दत्तक). अन्यथा त्यांना ते बाहेरून थोड्या अडनिड्या वयात (पौगंडावस्थेत) कळले,तर मुले बिथरण्याची,मानसिकदृष्ट्या खच्ची होण्याची शक्यता असते.त्यामुळे त्यांना योग्य त्या वयात (८ वर्षे पूर्ण व्हायच्या आधी) ती दत्तक असल्याचे माहीत करून देणे (मायेने जवळ घेऊन समजावणे,गोष्टी/परीकथांच्या माध्यमातून,आसपासच्या इतर उदाहरणांमाधून समजावणे) आवश्यकच आहे.पदोपदी,वर्तनातून वगैरे त्याची 'जाणीव' करून द्यायची गरज नाही;मात्र 'माहिती' करून देणे महत्त्वाचे.
(माहीतगार)बेसनलाडू

विकास's picture

15 Jul 2008 - 12:22 am | विकास

कारण कधी ना कधी त्या बालकाला हे समजणारच असते आणि आपल्या जीवनाबाबतचे रहस्य हे आपल्या दत्तक आई-वडीलांकडून न कळता बाहेरुन कोणाकडून तरी कळणे ह्याच्याइतके भावविश्व उद्ध्व्स्त करणारे काही असू शकत नाही!

मी याच संदर्भात म्हणले होते. मुलापासून लपवावे असे कुठेच म्हणले नाही. हृषिकेशशी माझा जो खरडवहीत संवाद झाला तो खाली चिकटवतो (थोडे फॉर्मॅटींग बदलून!):

मी इतरांनी त्या मुलांशी वागताना कसे वागावे या संदर्भात लिहीले होते आई-वडीलांनी नाही. शिवाय त्यांच्यापासून कोणीच लपवावे असे मला वाटत नाही, पण तो/ती दत्तक आहेत अशी जाणीव (म्हणजे उगाच इतरांनी - त्या गोष्टीची आठवण करून देणे ) उगाच करणे हे योग्य वाटत नाही. मला अशी उदाहरणे माहीत आहेत जिथे मुलगा/मुलगी हे त्याच परीवारातील पूर्ण घटक वाटतात दत्तक (त्यांना माहीत असूनही) वाटत नाहीत, तसे वागत नाहीत. तर अशा वेळेस उगाच जाणीव कशाला करून देयची. जो काही या संदर्भातील संवाद असेल तो आई-वडील, जर कोणी भाऊ-बहीण असेल तर ते यांच्यात आणि त्या मुलातील खाजगी बाब राहू द्यावी इतरांनी त्यात बोलू नये असे वाटते.

सखी's picture

15 Jul 2008 - 6:43 am | सखी

चांगला उपक्रम, चांगला लेख व चांगले प्रतिसाद! - (हे वाक्य मिपावर खूप वेळा वापरावेसे वाटते :) )
ह्या संस्थेला देणगी देणे हे एक काम असू शकते. पण त्याही पेक्षा त्या संस्थेला तुम्ही आठवड्या-पंधरवड्यातून एखादा तास देऊ शकलात तर ते जास्त मोलाचे ठरेल. तिथल्या मुलांशी एक तास खेळणे, थोडी मोठी मुले असतील त्यांचा अभ्यास घेणे, गोष्टी सांगणे , गाणी म्हणणे, एकूण त्यांना माया देणे.
हे ही तितकेच महत्वाचे. माझ्या ओळखीच्या एकजण स्वतःच्या मुलाला घेऊन नियमितपणे अशा एका संस्थेत जातात, १-२ तास घालवतात, मुलांना साध्या साध्या भेटवस्तू देतात, जसे की बॅट बॉल , दोरीच्या उड्या वगैरे. उद्देश संस्थेतल्या मुलांना मदत करणे तर आहेच शिवाय स्वत:च्या मुलालाही सामाजिक गोष्टींची जाणीव लहानपणापासुन करुन देणे हा ही आहे.
एक वर्षापूर्वी मी माझ्या अमेरीकेतल्या अजुन २ मैत्रीणींनी मिळून घरात वापरत नसलेली पण चांगल्या स्थितीत असलेली मुलांची पुस्तके, puzzle boards इ. पुण्यातला एका शाळेला दिले - जवळजवळ १०० एक पुस्तके जमली होती की मला एक मोठी बॅग त्याच्यासाठी ठेवावी लागली. इकडच्या पुस्तकांची क्वालिटी चांगली असल्याने ती वर्षानुवर्षे फाटत नाहीत. त्यांना अभ्यासासाठी म्हणून नक्कीच उपयोग होणार नाही, पण ते त्यांच्या लायब्रररीत ही पुस्तके ठेवतात, आणि मुलांना ती आवडतात असा अनुभव आला. आपणही अशा एकदोन संस्थाना विचारु शकतो, व मिपाचे परदेशातील सदस्य त्यांच्या भारतभेटीत ही गोष्ट अमलात आणू शकतात.

सर्किट's picture

14 Jul 2008 - 10:54 pm | सर्किट (not verified)

ह्या प्रकल्पासाठी माझ्याकडून व्यक्तिशः जो काही हातभार शक्य आहे, तो देण्यास उत्सुक आहे.

(आमट्यांच्या आनंदवनातील अनाथ मुलांसाठी गोकुळ हा प्रकल्प आणि अनाथ वृद्धांसाठीचा उत्तरायण हा प्रकल्प परस्पर पूरक आहेत. नातीला/नातवाला अंगाखांद्यावर खेळवण्याच्या सुखापासून वंचित राहिलेल्या आजी-आजोबांच्या चेहर्‍यावरचे सुरकुतलेले हसू काळजाचे पाणी-पाणी करते.)

- सर्किट

मुक्तसुनीत's picture

15 Jul 2008 - 12:31 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो. हा प्रकल्प जसजसा स्पष्ट होईल तसे लवकरच या संदर्भातले प्लेजिंग मी येथेच करेन. या व्यतिरिक्त माझ्या गावात/नातेवाईकांत/अमेरिकेत/भारतात जे काही प्रत्यक्ष भेटून/फोन/इमेलवर करता येणे शक्य आहे ते करण्याची माझी तयारी आहे.

प्राजु's picture

15 Jul 2008 - 1:01 am | प्राजु

हेच म्हणतो. हा प्रकल्प जसजसा स्पष्ट होईल तसे लवकरच या संदर्भातले प्लेजिंग मी येथेच करेन. या व्यतिरिक्त माझ्या गावात/नातेवाईकांत/अमेरिकेत/भारतात जे काही प्रत्यक्ष भेटून/फोन/इमेलवर करता येणे शक्य आहे ते करण्याची माझी तयारी आहे.

माझीही तयारी आहे...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

15 Jul 2008 - 3:58 am | धनंजय

स्तुत्य उपक्रम. मीही येथे प्लेजिंग करेन.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jul 2008 - 4:28 pm | बिपिन कार्यकर्ते

आपलं घर,
प्लॉट् नं. २९,गोकूळनगर,वाराणशी सोसायटीजवळ,मुम्बई - बंगळूरू महामार्ग,वारजे- माळवाडी, पुणे.
दूरध्वनी - ०२०- २१७१२२७१ /, 020-21712271
भ्रमणध्वनी-९८५०२२७०७७ / 9850227077
दुवा : http://apalaghar.org/start.html

माझ्याकडे हा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक आहे. कधी संपर्क नाही झाला पण खूप चांगले ऐकले आहे त्यांच्याबद्दल.

बिपिन.