श्रीगणेश लेखमाला २०२१ - शापित

तुषार काळभोर's picture
तुषार काळभोर in लेखमाला
18 Sep 2021 - 9:57 am

.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;}
.field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
#players {
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
border-collapse: collapse;
width: 100%;
margin:auto;
text-align: center;
}

#players td {
border: 1px solid #ddd;
padding: 8px;
}

#players tr:nth-child(odd){background-color: #F0F8FF;}

श्रीगणेश लेखमाला २०२१
पूर्वपीठिका - १
१९९० च्या दशकात खेळलेल्या काही कसोटीपटूंची फलंदाजीतील सरासरी :

सचिन तेंडुलकर५३.७८
राहुल द्रविड५२.३१

मो.अझरुद्दीन४५.०३
स्टीव्ह वॊ५१.०६

ब्रायन लारा५२.८८
ग्रॅहम गूच४९.६६

जॅक कॅलिस५५.३७
अरविंद डिसिल्वा४२.९७

रिकी पॉन्टिंग५१.८५
अँडी फ्लॉवर५१.५४

पूर्वपीठिका - २
प्रसंग : क्रिकेट वर्ल्डकप १९९६ - उपांत्य फेरी सामना
निमित्त : भारत विरुद्ध श्रीलंका, १३ मार्च १९९६
स्थळ : ईडन गार्डन, कोलकाता

आता, वरच्या यादीत एक खेळाडू असायला हवा, ज्याची सरासरी ५४.२० होती. म्हणजे समकालीन फलंदाजांमध्ये केवळ जॅक कॅलिस त्याच्या पुढे होता.
एकवीस वय असताना कसोटीत पदार्पण केलेल्या या खेळाडूने पहिल्या सात सामन्यात दोन द्विशतके व दोन शतके अशी जबरदस्त कामगिरी केली होती.
तरीसुद्धा कारकिर्दीच्या तीन वर्षात त्याला केवळ १७ सामने खेळायला मिळाले. ज्यात त्याने ५४.२० ची सरासरी नोंदवली. सर्वकालीन कसोटी फलंदाजी सरासरीमध्ये हा खेळाडू एकोणिसाव्या क्रमांकावर आहे.
दुर्दैवाने त्याची कसोटी कारकीर्द सतरा सामने खेळून केवळ पस्तीस महिन्यात संपली.
विनोद कांबळी

प्रेक्षणीय फटके, flamboyant व्यक्तिमत्व आणि सोन्याच्या दागिन्यांची आवड.... espncricinfo साईटवर त्याच्या प्रोफाइलमध्ये लिहिल्याप्रमाणे विनोद कांबळी हा 'वेस्ट इंडिया'चा कमी आणि 'वेस्ट इंडीज'चा खेळाडू जास्त वाटायचा.

विनोद कांबळीचा विषय निघाला की सचिन तेंडुलकरचा उल्लेख होतोच. विशषेतः त्या दोघांनी हॅरिस शिल्ड स्पर्धेत केलेल्या ६६४ धावांच्या भागीदारीचा. सोळाव्या वर्षी सचिन रणजी खेळू लागला आणि वर्षभरात विनोदसुद्धा. विनोदचं रणजी पदार्पण पहिल्या बॉलवर षटकार लगावून झालं, हा योगायोग नक्कीच नसावा. लवकरच सचिनला पाकिस्तान दौऱ्याची संधी मिळाली आणि तिथे पाकिस्तानी तोफखान्याला तोंड देणारा मुलगा म्हणून सर्वांच्या नजरेत सुद्धा आला. त्यावेळी विनोदची निवड एकोणीस वर्षाखालील संघात झाली होती. युवा आशिया कप स्पर्धेत त्याचे संघ सहकारी अजय जडेजा व सौरव गांगुली होते. आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मात्र विनोदला अजून काही काळ थांबावं लागलं.
१९९१ मध्ये शारजामध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने एकदिवशीय सामन्यात पदार्पण केलं, पण त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही.
१९९३ सुरु होताना विनोदने कसोटीत पदार्पण केलं. इंग्लंडच्या भारत दौऱ्यातील पहिली कसोटी. पहिल्या सामन्यात विनोदने काही उल्लेखनीय केलं नाही. मात्र दुसऱ्या सामन्यात त्यानं अर्धशतक केलं. तिसऱ्या सामन्यात त्याने थेट द्विशतक झळकावत २२४ धावा तडकावल्या!!! तर पुढच्याच म्हणजे कारकिर्दीच्या चौथ्या सामन्यात त्याने २२७ धावा केल्या. कसोटी कारकिर्दीतील तिसऱ्या व चौथ्या सामन्यात तो दहा वर्ष अबाधित असलेला सुनील गावस्कर यांचा एका डावातील सर्वाधिक धावांचा (२३६) भारतीय विक्रम मोडण्याच्या इतका जवळ आला होता.

लवकरच सहाव्या व सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध दोन शतके झळकावून त्याने आपल्यात सार्वकालीन महान फलंदाजाची गुणवत्ता असल्याचं सिद्ध केलं. हे सर्व घडलं त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या केवळ आठ महिन्यात! त्यानंतर श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आला असताना दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीत त्याने अजून दोन अर्धशतकं केली.
विनोदची कारकीर्द सुरु होऊन तेरा महिने झाले होते.
त्याची कसोटी कामगिरी अशी होती:

  • १० कसोटी सामने (खरं तर ९. एका सामन्यात पावसामुळे एकूण केवळ बारा षटकांचा खेळ होऊ शकला होता)
  • ११ डाव
  • ९३७ धावा
  • ९३.७० सरासरी

१९९३ साल संपताना केलेल्या श्रीलंका दौऱ्यात पहिला कसोटी सामना पावसात वाहून गेला, पण पुढील दोन सामन्यातील तीन डावात त्याने दोन शतके केली.

केवळ चौदाव्या डावात त्याने १००० धावांचा टप्पा ओलांडला. भारतीय क्रिकेट मध्ये अजूनही हा विक्रम विनोद कांबळीच्या नावे आहे. विनोद अवघ्या वर्षभरात यशाच्या शिखरावर होता. तेरा महिन्यांत दहा कसोटी सामने खेळून अशी आकडेवारी असलेला खेळाडू पुढे काय करू शकतो, याचे लोकांनी कल्पनेचे इमले बांधायला सुरुवात केली.
पण काहीतरी बिनसलं!!
साल १९९४.
वर्षाची सुरुवात श्रीलंकेच्या भारत दौऱ्याने झाली. या कसोटी मालिकेत तीन सामन्यातील तीन डावात विनोदने दोन अर्धशतके केली. त्यावेळी त्याला किंवा खरंतर कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल कि ही त्याची शेवटची चांगली खेळी आहे. नंतर भारताने मार्चमध्ये न्यूझीलंड दौरा केला तेव्हा त्याला एका कसोटीत संधी मिळाली ज्यात त्याची कामगिरी समाधानकारक झाली नाही.ही त्याच्या कारकिर्दीच्या शेवटची सुरुवात होती. त्याने दोन डावात नऊ आणि एकोणीस धावा केल्या. त्यानंतर वर्ष संपताना वेस्ट इंडिज संघ भारत दौऱ्यात आला. तीन कसोटीत विनोदच्या धावा होत्या ४०, ०, ०, ६, १८, ०
विनोदला संघातून वगळले गेले. दहा महिन्यानंतर ऑक्टोबर १९९५ मध्ये न्यूझीलंड संघ भारताच्या दौऱ्यावर आला असताना विनोदला पुनरागमनाची संधी मिळाली. पण त्याने निराशा केली. त्याला सहा डावात दोनदा फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने २७ आणि २८ धावा केल्या. त्याला पुन्हा वगळले गेले.
तसं विनोदचं एकदिवशीय सामने खेळणं सुरु होतं. पण त्यातसुद्धा विशेष सातत्य नव्हतं. तब्बल नऊ वेळा त्याला पुनरागमनाची संधी मिळाली. कारण प्रथम श्रेणीमध्ये तो चांगला खेळायचा. प्रथम श्रेणीत ५९.६७ च्या सरासरीने त्याने पस्तीस शतकं व ४४ अर्धशतकं केली. मात्र १९९६ वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील त्या अप्रिय घटनेनंतर एकदिवशीय सामान्यातूनही विनोद कमीच दिसू लागला.

जून १९९६ मध्ये भारत इंग्लंड दौऱ्यावर गेला. तेव्हा त्या दौऱ्यात विनोद नव्हता. दोन नवे खेळाडू होते. दुसऱ्या कसोटीत त्यातील एकाने शतक केले तर दुसऱ्याचे शतक केवळ पाच धावांनी हुकले.

त्यानंतर विनोदाचे पुनरागमन अशक्य झाले. आणि अभूतपूर्व म्हणावी अशी सुरुवात झालेली एक कारकीर्द अपयशाच्या पायरीवर संपली.
आकडे दाखवतात कि विनोद कांबळी हा एक महान खेळाडू होता. पण खरं तर तो महान होता होता राहून गेला. सांख्यिकीविषयी असं म्हटलं जातं की statistics reveal a lot but not everything. किंवा आकडे खूप काही दाखवतात पण सर्वकाही नाही. या विधानाचं 'विनोद कांबळीची क्रिकेट कारकीर्द ' इतकं चांगलं उदाहरण क्वचितच मिळेल.


संदर्भ :
https://www.espncricinfo.com/player/vinod-kambli-30009
https://en.wikipedia.org/wiki/Vinod_Kambli
https://wisden.com/stories/podcast/vinod-kambli-what-went-wrong-with-sac...
https://www.cricketcountry.com/articles/when-vinod-kambli-featured-along...

श्रीगणेश लेखमाला २०२१

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

18 Sep 2021 - 11:09 am | चांदणे संदीप

मागेच कधीतरी espncricinfo वर फलंदाजांची सरासरी वगैरे बघत असताना विनोद कांबळीच्या आकडेवारीवर नजर गेली आणि त्याच्या सुरूवातीच्या कसोटी सामन्यांमधल्या धावा बघून चाट पडलो होतो.
९६ ची ती मॅच तर लख्ख आठवतेय. शेवटपर्यंत आशा होती की कांबळी आहे तर काहीतरी होऊ शकेल, पण दुर्दैवाने मॅचच पूर्ण होऊ शकली नाही.

लेख आवडला. परत परत आठवून वाचून काढावा असा.

सं - दी - प

प्रचेतस's picture

18 Sep 2021 - 11:15 am | प्रचेतस

उत्तम लेख.
दुर्दैवाने स्वतः विनोद कांबळीच ह्या अधःपतनाला जबाबदार असावा. क्रिकेटपेक्षा क्रिकेटबाह्य मोहात हा वाहून गेला आणि संपला.

तुषार काळभोर's picture

18 Sep 2021 - 1:23 pm | तुषार काळभोर

दोन्ही वाक्याशी सहमत.
कारकिर्दीच्या अधःपतनासाठी विनोद स्वतःच जबाबदार होता.
आणि क्रिकेटपेक्षा क्रिकेटबाह्य मोहात हा वाहून गेला आणि संपला, हेही तितकंच खरं.

एकदा सप्तरंगमध्ये सुनंदन लेले किंवा द्वारकानाथ संझगिरी यांचा एक लेख होता. त्यात लिहिलं होतं की दोघांना इतक्या लवकर इतकं जास्त यश मिळालं तेव्हा सचिनला जमिनीवर ठेवायला त्याचं मध्यमवर्गीय कुटुंब, आणि मध्यमवर्गीय शिस्त कारणीभूत होत्या. विनोदला असं जमिनीवर ठेवणारं कोणी नव्हतं, हे त्याच्या 'क्रिकेट बाह्य गोष्टींच्या' मोहात वाहून जायचं कारण होतं.

प्राची अश्विनी's picture

19 Sep 2021 - 10:08 am | प्राची अश्विनी

हो. हा त्यांचा लेख वाचलेला आठवतोय.

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

18 Sep 2021 - 11:21 am | ॲबसेंट माइंडेड ...

वाया गेलेले टॅलेंट.
माझा आवडता खेळाडु होता.

वाया गेलेले म्हणण्यापेक्षा वाया घालवून घेतलेलं जास्त समर्पक होईल.

- (विनोदच्या 'लेफ्ट हॅन्डेड स्टान्स'चा चाहता) सोकाजी

फार कठिण परिस्थीतीला सामोरा गेला बिचारा…

आउट झाल्यावर परतत असता लिप रिंडिग करत त्याने कोणती मराठी शीवी कचकन दिली यावर आम्ही डिबेट करत असु…

रंगीला रतन's picture

18 Sep 2021 - 1:41 pm | रंगीला रतन

फार कठिण परिस्थीतीला सामोरा गेला बिचारा…
ती परिस्थिती त्यानी स्वतःच आणली होती.

लेख आवडला.

तिकडे ब्रायन लाराच्या पार्ट्या म्हणजे मद्य मदीराक्शीचा नुसता महापुर असतो, स्वतः शेन वॉर्न नागडा सापडला होता एका विडीओमधे स्त्रियांसोबत अन त्याचा काडीमोडही झाला पण कोणाचा खेळातील पर्फॉमन्स यातुन खालवला नाही मग भारतीय खेळाडु नेमके कमी पडतात कुठे ? जरा बेताल झाले की यांचे करीअर संपुन जाते

रंगीला रतन's picture

18 Sep 2021 - 5:38 pm | रंगीला रतन

कौटुंबिक आर्थिक पार्शवभूमी हे कारण असावे.
चाळीत राहणाऱ्या कांबळीला अल्पवाधित भरपूर मिळालेला पैसा प्रसिद्धी श्रीमंत घरातून आलेल्या गांगुली सारखी पचवता आली नाही. गांगुलीने काय कमी उतमाज केला? पण ते त्याला सवयीचे होते कांबळीच्या नव्हते.

गॉडजिला's picture

18 Sep 2021 - 6:40 pm | गॉडजिला

गरीबी भारतीय खेळाडूंचा प्रमुख शत्रु आहे तर हम्मम... खरंय

टर्मीनेटर's picture

18 Sep 2021 - 6:02 pm | टर्मीनेटर

मस्त लेख 👍
क्रिझ पेक्षा कॅमेर्‍याकडे दिलेले अधिकचे लक्ष आणि कमी वयात मिळालेले घवघवीत यश पचवता न येणे; माझ्या मते ही कारणे ह्या गुणी खेळाडुची कारकीर्द आकाली संपुष्टात आणण्यामागे आहेत.
आणि हो, एवढे छान लिहिता मग लेखणी म्यान का करुन ठेवली होती हो इतके दिवस? मी मिपावर तुमचा हा पहिलाच लेख वाचतोय बहुतेक.
पुढील लेखनास शुभेच्छा!

कुमार१'s picture

18 Sep 2021 - 6:09 pm | कुमार१

लेख आवडला.

श्रीगुरुजी's picture

18 Sep 2021 - 7:13 pm | श्रीगुरुजी

काही आकडेवारी चुकलीये.

१९९३ साल संपताना केलेल्या श्रीलंका दौऱ्यात पहिला कसोटी सामना पावसात वाहून गेला, पण पुढील दोन सामन्यातील चार डावात त्याने चार शतके केली.

दोन सामन्यातील चार डावात ४ शतके म्हणजे सलग ४ डावात शतके झाली. आकडेवारी अशी आहे की तो ४ नसून ३ डाव खेळला होता व १२५,४ व १२० अशा धावा केल्या होत्या.

साल १९९४. वर्षाची सुरुवात श्रीलंकेच्या भारत दौऱ्याने झाली. या कसोटी मालिकेत तीन सामन्यातील सहा डावात विनोदने चार अर्धशतके केली.

या मालिकेत कांबळी तीनही कसोटीत प्रत्येकी फक्त १ डाव खेळला व त्यात ५, ८२ व ५७ अशा धावा केल्या होत्या.

अर्थात कांबळीची कसोटी कारकीर्द खूप लहान असल्याने आकडेवारीतील या चुका किरकोळ आहेत.

त्याची चार शतके ही भालत व श्रीलंकेत (म्हणजे भारतीय उपखंडात) आहेत. भारतीय उपखंडाबाहेर तो फक्त न्यूझीलंडमध्ये १ कसोटी खेळलाय व तेथे तो फारसा यशस्वी नव्हता. इंग्लंड, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान या देशात तो खेळलेला नाही. त्याच्या २१ कसोटी डावांपैकी फक्त ५ भारताबाहेर आहेत. म्हणजे त्याच्या फलंदाजीतील बहुसंख्य धावा भारतीय खेळपट्ट्यांवर केल्या आहेत. वेगवान परदेशी खेळपट्ट्यांवर तो खेळला असता तर त्याचा कस लागला असता.

त्यामुळे मी त्याला महान फलंदाज, सचिनपेक्षा चांगला फलंदाज वगैरे मानत नाही.

कांबळी खूप गरीब किंवा सामान्य घरातून पुढे आला होता. जरी तो व सचिन एकाच शाळेत शिकले असले, एकाच प्रशिक्षकाकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले असले तरी दोघांच्या परिस्थितीत जमीन अस्मानाचा फरक आहे.

सचिन मध्यमवर्गीय सुशिक्षित ब्राह्मण कुटुंबातुन आला होता. त्याच्यावर सुशिक्षित मध्यमवर्गीय संस्कार झाले होते. प्राध्यापक असलेले वडील व मोठ्या भावाचे त्याला सातत्याने मार्गदर्शन मिळत होते व त्यामुळे सचिनचे पाय कायम जमिनीवर होते.

याउलट कांबळीला घरून असा कोणीही मार्गदर्शक नव्हता. त्यामुळे खूप गरीब परिस्थितीतून त्याला एकदम पैसा, प्रसिद्धी मिळायला लागल्यानंतर तो हवेत तरंगायला लागला. ज्या क्रिकेटमुळे त्याला पैसा व प्रसिद्धी मिळू लागली त्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत न करता तो सवंग गोष्टींच्या मागे लागला.

आफ्रिकेत तो एकदा बाहेर जाऊन जॉनी व्हर्साची ब्रॅन्डचा ६०० अमेरिकन डॉलर्स किंमतीचा (अंदाजे २४,००० रूपये) विजारीचा पट्टा घेऊन आल्यानंतर कर्णधार अझरूद्दीन सुद्धा थक्क झाला होता. त्याज दौऱ्यात एका सामन्यापूर्वी तो पहाटे ४ वाजेपर्यंत मोठ्या आवाजात गाणी ऐकत बसला होता. पैशांची उधळपट्टी, पहाटेपर्यंत जागरणे हे त्याच्या खेळासाठी मारक आहेत हे समजावून सांगणारा जवळचा मार्गदर्शक त्याला लाभला नाही हे दुर्दैव!

संघातून स्थान गमावल्यानंतर खेळावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी तो रिऍलिटी शो सारख्या सवंग गोष्टीत अडकला व तेथेच त्याची कारकीर्द कायमची संपली. एकाअर्थी त्याची क्रिकेट कारकीर्द संदीप पाटिल सारखी अल्पावधीतच संपली. संदीप पाटीलने सुद्धा जाहिराती, चित्रपट, साप्ताहिक यामध्ये गुंतून स्वतःची क्रिकेट कारकीर्द खड्ड्यात घातली होती.

गुणवत्ता असूनही योग्य मार्गदर्शकाअभावी व सवंग गोष्टीत गुंतल्यामुळे कांबळीची कारकीर्द संपुष्टात आली.

तुषार काळभोर's picture

18 Sep 2021 - 7:41 pm | तुषार काळभोर

हो...
१९९३ साल संपताना केलेल्या श्रीलंका दौऱ्यात पहिला कसोटी सामना पावसात वाहून गेला, पण पुढील दोन सामन्यातील चार डावात त्याने चार शतके केली.
हे असं हवं,
पुढील दोन सामन्यातील तीन डावात त्याने दोन शतके केली.

साल १९९४. वर्षाची सुरुवात श्रीलंकेच्या भारत दौऱ्याने झाली. या कसोटी मालिकेत तीन सामन्यातील सहा डावात विनोदने चार अर्धशतके केली.
हे असं हवं,
या कसोटी मालिकेत तीन सामन्यातील तीन डावात विनोदने दोन अर्धशतके केली.

धन्यवाद. तसा बदल करून घेतो लेखात.

गुल्लू दादा's picture

18 Sep 2021 - 10:12 pm | गुल्लू दादा

नवीन विषय आवडला.

गणेशा's picture

19 Sep 2021 - 12:44 am | गणेशा

लेख आणि शिर्षक आवडले..

त्या काळी मी वन डे पेक्षा test matches जास्त पाहायचो,
आणि त्याने केलेली दोन द्विशतके मी बॉल to बॉल पाहिलेत..

विशेष म्हणजे त्याने सुनील गावसकर चा record तोडावे असे तेंव्हा वाटत होते..
२२७ वर out झाल्यावर वाईट वाटले होते...

वरच्या कित्येक प्रतिसादात त्याला मार्गदर्शक नव्हता असा एक सूर आहे, त्याचे वर्तन बिघडत चालले होते ह्याला तोच जबाबदार होता नक्कीच..
पण सचिन सारखा मित्र असताना, ह्या मित्राने त्याला चांगलीच समज का दिली नाही याचे मला आश्चर्य वाटते.. आणि वेळोवेळी मार्गदर्शन का दाखवले नाही असे वाटते..

सच्या माझा आवडत्या खेळाडूतील एक आहे, पण येथे त्याने मित्राला वाया जाण्यापासून वाचवायला हवे होते असे मला मनापासुन वाटते...

गॉडजिला's picture

19 Sep 2021 - 8:02 am | गॉडजिला

तसेही ज्या काळात आपण इतरांकडुन समजुतदारपणाची अपेक्षा करतो त्या काळात ते कसोटिला खरे उतरतातच असे अजिबात नाही. शेवटी तुमचे तुम्हालाच तयार असावे लागते.

सुधीर कांदळकर's picture

19 Sep 2021 - 7:17 am | सुधीर कांदळकर

कांबळी माझाही आवडता खेळाडू होता. त्यामुळे सहानुभूती आहेच.

१. १९९२ विश्वकप स्पर्धेत कांबळीला उतारवयातल्या बोथमने सहज जाळ्यात पकडले होते.

२.शारजामधला रस्त्यावरचे दिवे लागल्यावरचा अपुर्‍या प्रकाशातला नाबाद कांबळी आणि १९९६ मधला भयानक वळणार्या खेळपट्टीवरचा हताशपणे रडणारा कांबळी डोळ्यासमोर आला.

३. तरीही कांबळीला मानसोपचारांची गरज होती. राहुल द्रविड आणि कांबळी हे एकाच वेळी अपयशी ठरत असतांना द्रविड भीष्मराज बाम यांच्याकडून समुपदेशन घेऊन सावरला. कांबळीच्या घोट्याला दुखापत होऊन वर्षभर साम्न्यांपासून दूर राहावे लागले आणि कधीही पूर्ववत ठीक झाला नाही.

चित्रेही छान. छान आठवणी जाग्या केल्यात. धन्यवाद.

Bhakti's picture

19 Sep 2021 - 8:59 am | Bhakti

असे शापित खेळाच्या जगात असणे खुपचं अचंबित करते...शरीराने आणि मनाने तंदुरूस्त असणे फार महत्वाचे.

प्राची अश्विनी's picture

19 Sep 2021 - 10:12 am | प्राची अश्विनी

क्रिकेट फारसा कळत नाही, आवडतही नाही. पण शीर्षक पाहून लेख वाचला. शीर्षक आणि लेख आवडला.

गामा पैलवान's picture

19 Sep 2021 - 8:50 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

तुमचं मार्गदर्शकाच्या अभावाचं विवेचन पूर्णपणे पटलं.

मला वाटतं की कांबळीच्या अपयशात आजून एक घटक आहे. तो बोर्डाचा नावडता खेळाडू होता. सचिन मंडळासंगे ज्याप्रमाणे मुत्सद्दीपणे ( = डिप्लोमॅटिक ) वागला तसं विनोद कांबळीस कुणी शिकवलं नाही. त्यामुळे एका मालिकेत अपयश आल्याने लगेच उचलबांगडी झाली.

गावसकरने पैशांवरून बोर्डाला शिंगावर घेतलं होतं. पण त्याच्यामागे त्याचे मामा माधव मंत्री भक्कमपणे उभे होते. खुद्द सचिनच्या मागे गावसकर उभा होता. तसाच आता अजित आगरकरच्या मागे सचिन उभा आहे. अशा प्रकारचं प्रभावक्षेत्र विनोद कांबळीस उत्पन्न करता आलं नाही. स्वतंत्र वृत्तीचा असल्याने इतर कुणाच्या प्रभावक्षेत्रात दाखल होणं त्यास शक्य नव्हतं.

शिवाय भरीस भर म्हणून बायकोचा अनाठायी हस्तक्षेप होताच. ती ख्रिस्ती असल्याने वेगळ्या संस्कृतीत वाढलेली होती. त्यातनं संघर्ष उत्पन्न झाला व तोही त्यास महागात पडला.

असो.

विनोद कांबळीसारखे गुणवत्तेचे हाल कुणाचे होऊ नयेत.

आ.न.,
-गा.पै.

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Sep 2021 - 7:44 pm | ज्ञानोबाचे पैजार

खेळायला येताना त्याचा तो बदललेला अवतार पाहूनच जाणवायचे की ह्याचे काही खरे नाही.
मग हळुहळु त्याच्या बद्दल काहीबाही वाचनात येउ लागले आणि तो मनातुन उतरत गेला.
खरच एका गुणी खेळाडुने स्वतःची अशी परवड करुन घेतलेली अजिबात आवडली नाही
पैजारबुवा,

सिरुसेरि's picture

20 Sep 2021 - 10:29 pm | सिरुसेरि

विनोद कांबळीच्या क्रिकेट करीअरचे सुरेख विश्लेषण . यावरुन एक आठवले की , १९९३ च्या आसपास अनेकदा "मस्तुर कांबळी" ( मस्त रे कांबळी ) असा शब्दप्रयोग ऐकु येत असे . बहुदा , विनोद कांबळीच्या फटकेबाजीवर खुश होउन क्रिकेट चाहत्यांनी असा शब्दप्रयोग प्रचलीत केला असावा .

गॉडजिला's picture

21 Sep 2021 - 10:00 am | गॉडजिला

मस्त रे कांबळे चा हा उगम आहे होय... नव्या सहस्त्रकाच्या आसपास हा खूपदा कानावर पडत असे पण काहीचं उमगायच नाही त्यावेळी

श्रीरंग_जोशी's picture

21 Sep 2021 - 9:30 am | श्रीरंग_जोशी

१९९२ च्या विश्वचषकानंतर उन्हाळ्यात दर रविवारी दूरदर्शनवर क्रिकेट विथ मोहिंदर अमरनाथ हा क्रिकेट कोचिंगवरचा कार्यक्रम लागायचा. तो कार्यक्रम पाहून क्रिकेटमधले बारकावे कळू लागले. १९९२-९३ च्या मोसमात इंग्लंडचा भारत दौरा झाला. ग्रॅहम गूच कर्णधार होता. ती मी टिव्हीवर पाहिलेली पहिली कसोटी मालिका होती. त्यातला तिसरा सामना अन लगेच झिंबाब्वेविरुद्धचा एक कसोटी सामना यात विनोद कांबळीने पाठोपाठ द्विशतके ठोकली. पुढचं वर्षभर सचिनपेक्षाही विनोदच माझा क्रिकेटमधला हिरो होता.

नंतर त्याची सातत्यपूर्ण कामगिरी न होताना पाहून वाईट वाटायचे. १९९८ च्या उन्हाळ्यातले त्याचे पुनरागमन यशस्वी होत आहे असे दिसत असतानाच क्षेत्ररक्षण करताना त्याच्या मांडीवर चेंडू लागला अन तो जायबंदी झाला. बहुधा त्यानंतर त्याचे पुनरागमन यशस्वी होऊ शकले नाही.

१९९६ विश्वचषकातल्या उपांत्य सामन्यात प्रेक्षकांच्या गोंधळामुळे सामना श्रीलंकेला बहाल झाला आहे हे कळल्यावर विनोदचे अश्रू पाहून माझ्या मनाला जी जखम झाली ती २००३ च्या विश्वचषकात भरेल असे वाटत होते. अखेर २०११ च्या अंतिम सामन्यात धोनीने मारलेल्या षटकारानंतरच ती भरली.

१९९४ साली झी टिव्हीवर भारतीय क्रिकेट संघावर एक गाणे दाखवत असत. त्यात विविध खेळाडू त्यांच्या प्रादेशिक पोशाखात दाखवले होते. प्रविण आमरे, सचिन व विनोद हे तीघे वर पाढंरा शर्ट व ब्लेझर अन खाली पांढरे धोतर अशा पोशाखात होते. युट्यूबवर ते गाणे आता मिळत नाहीये :-(. कुणी जालावर शोधले तर उत्तम.

विनोद अन सचिनची पिढी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर माझी क्रिकेटमधली भावनिक गुंतवणूकही संपली.
९० च्या दशकात परत नेल्याबद्दल लेखकाचे आभार.

अभिजीत अवलिया's picture

21 Sep 2021 - 1:47 pm | अभिजीत अवलिया

लेख आवडला. विनोद कांबळी खूप आवडायचा. १९९६ च्या ‘त्या’ उपांत्य सामन्यात ‘विनोद कांबळी अजून आहे. आपण अजूनही जिंकू शकतो’ असा आशावाद माझ्यात होता. रडत रडत पॅव्हेलियनकडे जाणारा विनोद पाहून त्याच्या दसपटीने मी रडलो असेन.
असो. त्याची जी करीअरमधली वाताहत झाली ती त्याच्याच बेताल वागण्याने झाली.

असं त्यावेळी खूप जणांना वाटलं होतं.
मलापण.
इथल्या प्रेक्षकांचा राग सुद्धा आलेला. अरे हे काय करतायेत? अजून विनोद कांबळी आहे की!

चावटमेला's picture

21 Sep 2021 - 4:31 pm | चावटमेला

१. १९९६ च्या विश्वचषकातला श्रीलंकेविरुध्दचा उपांत्य सामना
२. १९९७ च्या वेस्ट इंडिज दौर्‍यातील बार्बाडोस कसोटी सामना (वेस्ट इंडिज मध्ये २६ वर्षांनंतर कसोटी जिंकण्याची संधी आपण दवडली. जिंकण्यासाठी फक्त १२० धावांचं आव्हान असताना आपण ८१ मध्येच कोलमडालो होतो)
३. १९९९ मधील पाकिस्तान विरूध्द ची चेन्नई कसोटी
४. २००३ द. अफ्रिका विश्वचषकातील अंतिम सामना

वरील सामने हे ९० च्या दशकात क्रिकेट पाहत मोठ्या झालेल्या पिढीचे epic heartbreaks आहेत. तुमचा लेख आवडला आहे.

तुषार काळभोर's picture

21 Sep 2021 - 5:47 pm | तुषार काळभोर

दुसरा आणि तिसरा सामना तर अगदी हाता तोंडाशी आलेला घास काढून नेल्यासारखे ....

अभिजीत अवलिया's picture

21 Sep 2021 - 7:26 pm | अभिजीत अवलिया

१९९६ च्या विश्वचषकातला श्रीलंकेविरुध्दचा उपांत्य सामना

त्या विश्वचषकातील अंतिम सामना होईपर्यंत, भारत-श्रीलंका मूळ उपांत्य सामना रद्द समजून पुन्हा खेळवला जाणार ह्या आशेवर आम्ही सर्व मित्र होतो :)
कारण काय तर प्रेक्शकांचा गोंधळ हे सामना समोरच्या संघाला बहाल करण्याचे व्हॅलिड कारण होऊ शकत नाही असे बाल सुलभ मत.

अथांग आकाश's picture

21 Sep 2021 - 5:13 pm | अथांग आकाश

कांबळी = स्वयंचीत खेळाडु! त्याच्या कारकिर्दीचा आढावा आवड्ला!!
0

तुषार काळभोर's picture

21 Sep 2021 - 5:46 pm | तुषार काळभोर

परफेक्ट शब्द!
1

विनोद कांबळीने न्युझीलंडच्या सायमन डूल या गोलंदाजाच्या एका षटकात मारलेले सलग ४ चौकार अजुनही लक्षात आहेत .

चौथा कोनाडा's picture

22 Sep 2021 - 5:25 pm | चौथा कोनाडा


विनोद कांबळी हा एक महान खेळाडू होता, पण खरं तर तो महान होता होता राहून गेला


अगदी योग्य म्हटलंय ! माझा हा आवडता खेळाडू अल्पकालात दृष्टीआड गेला याचे तेंव्हा खुप वाईट वाटले होते.

+१
अतिशय छान लिहिले आहे !

सौंदाळा's picture

22 Sep 2021 - 5:41 pm | सौंदाळा

छान लेख,
'मस्त रे कांबळी' चा हा उगम माहिती नव्हता.
कांबळी म्हटले की ईडन गार्डनच्या सामन्यातुन रडत जातानाचा त्याचा चेहराच डोळ्यासमोर येतो.
मुंबईत अजुन एक जबरदस्त फलंदाज क्लब लेव्हलला होता पण घरची परिस्थिती त्या फलंदाजाचे पुढे न झालेले सिलेक्शन यामुळे तो शेवटी अंडरवर्ल्ड मधे गेला आणि नंतर 'चकमकीत' ठार झाला असे कुठेतरी वाचले / ऐकले होते. आता नाव विसरलो.

अनिल गुरव?
मुंबई क्रिकेटचा विवियन रिचर्ड्स, पुढचा गावस्कर असं म्हणायचे लोक त्याला. सचिनचे गुरू आचरेकर सर, यांचा अनिल गुरव हा सिनियर शिष्य.
घरची परिस्थिती, भावाचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध यामुळे अनिल गुरव आयुष्यातून उठला.
योगायोग म्हणजे अजित तेंडुलकर या भावामुळे सचिनची कारकीर्द घडली. तर अजित गुरव या भावामुळे अनिल गुरवची बिघडली.

विनोद कांबळीप्रमाणेच चांगल्या परिवाराचा सपोर्ट आणि योग्य मार्गदर्शनाभावी तो क्रिकेटर सुद्धा वाया गेला..

श्रीरंग_जोशी's picture

22 Sep 2021 - 10:24 pm | श्रीरंग_जोशी

अनिल गुरव यांच्याबाबत मला प्रथमच कळलं. फारच दुर्दैवी. खालील चित्रफीत जालावर मिळाली. निवेदकाने त्यांच्या आडनावाचा उच्चार गुराव असा केला आहे.

अभिजीत अवलिया's picture

23 Sep 2021 - 5:28 am | अभिजीत अवलिया

अनिल गुरव यांच्याबद्दल अधिक माहिती ह्या ठिकाणी आहे.

https://mr.quora.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4...

सौंदाळा's picture

23 Sep 2021 - 10:47 am | सौंदाळा

तुका, जोशीसाहेब, अभिजीत अवलिया - धन्यवाद
बरोबर, अनिल गुरवच. माझी माहिती अपुर्ण / अर्धवट होती. बरीच नविन माहिती मिळाली.
चांगला परिवार, संस्कार मिळणे म्हणजे खरच भाग्यच म्हणायला हवे.

गॉडजिला's picture

25 Sep 2021 - 9:27 am | गॉडजिला

पोलिसांची इतकी मारहाण झाली की क्रिकेटसाठी फिजिकली अनफिट बनले ?

:( यापेक्षा दुर्दैव ते काय ?

अजून एक गुणवान खेळाडू म्हणजे पद्माकर शिवलकर. प्रथमश्रेणी १२४ सामन्यात ५८९ बळी अशी दैदिप्यमान कामगिरी, पण केवळ त्याकाळी चंद्रा, बेदी, प्रसन्ना हे त्रिकूट अधिराज्य गाजवत होते म्हणून याला कधीच संधी मिळाली नाही. त्याशिवाय हा बेदीच्या राजकारणाचा देखील बळी ठरला.

श्रीगुरुजी's picture

25 Sep 2021 - 10:07 am | श्रीगुरुजी

असाच अजून एक प्रतिभावान खेळाडू म्हणजे राजिंदर गोयल. १९५८/५९ - १९८४/८५ या तब्बल २६ वर्षांच्या काळात हा डावखोरा फिरकी गोलंदाज १५७ प्रथम श्रेणीचे (रणजी, दुलिप व भारत दौऱ्यावर आलेल्या परदेशी संघाबरोबरील सामने) सामने खेळला. त्यात फक्त १८.५८ सरासरीने त्याने ७५० फलंदाज बाद केले. हा विक्रम कधी मोडला जाईल असे वाटत नाही. एका डावात ५+ फलंदाज बाद करण्याची कामगिरी ५९ वेळा तर एका सामन्यात १०+ फलंदाज बाद करण्याची कामगिरी १८ वेळा त्याने केली होती.

दुर्दैवाने त्याला कसोटी सामना खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही. गावसकर, विश्वनाथ, बेदी अशा अनेकांनी राजिंदर गोयलच्या गोलंदाजीचे तोंड भरून कौतुक केले आहे.

गुंडाप्पा विश्वनाथच्या शब्दात -

'He kills you as a batsman'

He was a very difficult bowler [to face]. I can tell you that - I have played a lot of left-arm spinners, but he was one of the top. It was never easy to get away from him especially when the pitch was a little helpful when he was more dangerous.

I have faced both Bishan and Rajinder. The difference between them was Rajinder was so tight in his bowling, his line and length were so accurate. With Bishan, at least he flighted the ball, so you had a chance to use your feet. Rajinder was fastish, and with a little bit of help from the pitch, he would turn the ball which did not make it easy to step out and drive in front.

The thing that was difficult batting against him was that nagging length he hit. He kept you always there and thereabout by hitting the right spot. That was the hallmark of his bowling. He kills you as a batsman. You had to wait for loose balls, which were very rare. You had to think about ones and twos facing him. Yes, he tested your patience. You had to be [mentally] present all the time. You couldn't relax.

तुषार काळभोर's picture

25 Sep 2021 - 10:48 am | तुषार काळभोर

प्रथम श्रेणी इतकं भारी खेळून सुद्धा यांना कसोटी संधी मिळाली नाही, हे दुर्दैवच. राजिंदर गोयल यांना संधी न मिळण्याची कारणं पद्माकर शिवलकर यांच्यासारखी असावीत.
नव्वदीच्या दशकात महाराष्ट्र संघाकडून खेळणाऱ्या काही उत्तम फलंदाजांना कधीच कसोटी संधी मिळाली नाही, याचं शाळेत असताना आश्चर्य आणि वाईट वाटायचं. उदा शंतनु सुगवेकर (प्रथम श्रेणी सरासरी ६३, सर्वोच्च २९९), सुरेंद्र भावे (प्रथम श्रेणी सरासरी ५८, सर्वोच्च २९२). त्याशिवाय
पाच विभागांची कोटा पद्धत याला कारणीभूत असेल. कारण पश्चिम विभागातून ठराविक संख्येत खेळाडू घेताना महाराष्ट्राच्या खेळाडूंना मुंबई संघाशी स्पर्धा करावी लागायची.

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Sep 2021 - 8:39 am | ज्ञानोबाचे पैजार

या कोटा पध्दतिने महाराष्टाचे अनेक गुणी खेळाडू वाया गेले आहेत. वरच्या यादित अजुन एक नाव मिलिंद गुंजाळचे घ्यावे लागेल. रणजी करंडकाचे सामने नेहरु स्टेडियम वर व्हायचे तेव्हा मिलिंद ची बॅटिंग बघताना मजा यायची.

झहिर खान सुध्दा जर महाराष्टाकडून खेळत राहिला असता तर अंतरराष्ट्रिय सामन्यात कधिच चमकला नसता.

पैजारबुवा,

श्रीरंग_जोशी's picture

30 Sep 2021 - 9:15 am | श्रीरंग_जोशी

कोटा पद्धत नेमकी कधी बंद झाली? बहुधा झहिरच्या आंतरराष्ट्रिय पदार्पणाच्या वेळपर्यंत बंद झाली होती (साल २०००).
कोटा पद्धतीमुळे अनेक गुणी खेळाडूंची संधी हिरावली गेली किंवा अक्षरशः निवृत्ती जवळ आल्यावर संधी मिळाली उदा. प्रशांत वैद्य.

गणेशा's picture

23 Sep 2021 - 3:22 pm | गणेशा

सर्व प्रतिसाद पण वाचले..
लेख आणि प्रतिसाद छान आहेत..

विनोद कांबळी सारखी गुणवत्ता कोणाची वाया जाऊ नये असे सगळ्यांना वाटते..

मला तर सध्या त्याच्यासारखा कोण वाटत असेल तर तो आहे मुंबई संघातील पृथ्वी शॉ...
Batting, shots पाहण्यासारखे आहे याची.. काही फटके तर मोठ्या मोठ्या फलंदाजांची आठवण करून देतात..
पण लवकरच नीट परिश्रम पुर्ण वागावे असे वाटते..

नाहीतर आणखीन एक प्रतिभाशाली खेळाडूचा अस्त आपण पाहू...

सुरिया's picture

23 Sep 2021 - 4:32 pm | सुरिया

हो,
आणि शॉ ला सांगायला पाहिजे, आईबाप भावाचे वागणे आणि असणे आपल्या हातात नसले तरी बायको बघून कर आपापल्या संस्कृतीतील च. ते उगी कथोलिक बिथोलिक काय नको म्हणाव. करियर बरबाद करतात अशा वेगळ्या संस्कृती मधल्या पोरी.
;)

सुधीर कांदळकर's picture

30 Sep 2021 - 7:10 am | सुधीर कांदळकर

सचीनला एकदा एका मुलाखतकाराने विचारले होते की तू वॉल्श, अ‍ॅमब्रोज, अक्रम, वकार, मॅकग्रा, ब्रेट ली, कॅडीक, गॉफ अशा दिग्गज गोलंदाजांविरुद्ध खेळला आहेस. यातला खेळायला सर्वात कठीण कोण वाटला. यवर सचीनने उत्तर दिले होते की नेटमध्ये हाफपीचवरून गोलंदाजी करणारा कांबळी हा जगातला सर्वात धोकादायक गोलंदाज आहे आणि लबाड प्रश्नाला धोरणीपणाने उत्तर दिले होते.