ऐका जामातो देवा तुमची कहाणी,
आटपाट नगर होते, तेथे एक शिक्षक कुटुंब राहत होते. त्यांना एक मदनबाण नामक पुत्र होता. पुत्रासाठी खस्ता खाऊन त्यांनी त्याला शिक्षण दिले. वयात येताच पुत्राने काय करावे तर माता-पित्याची इच्छा डावलून आपल्या मनपसंत कन्येशी विवाह करावा. विवाहाच्या काही दिवसांतच गृहकलह उत्पन्न झाला. सासू-सुनेचे वाद-विवाद होऊ लागले, त्यात पती भरडला जाऊ लागला. एके दिवशी सून आपल्या पतीचा हात धरून आपल्या माहेरी निघून गेली. काही काळ बरा गेला, नंतर काय होऊ लागले, तर श्वशुरगृही जामाताचा मान कमी-कमी होऊ लागला, ‘जामातो दशम ग्रहम’ सारखी वाक्ये कानी पडू लागली. शेवटी शेवटी तर त्याला घरगड्यासारखे राबवले जाऊ लागले.
प्रात:काळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत रांधा-वाढा-उष्टी-काढा ह्यातच वेळ जाऊ लागला. हे कमी होते म्हणून की काय शेतावरची कामे करावी, शेण-गोठा करावा, लाकडे फोडावी, नदीवर जाऊन वस्त्रे धुवावीत. आणि ह्याच्या बदल्यात मिळावे काय तर शिळी-पाकी भाकरी, ती देखील मीठ-मिरची लावून खावी व वर तांब्याभर जल प्राशावे. मदनबाण जामात ह्या छळाला कंटाळून गेले होते, परंतु परतीचे दोर स्वहस्तेच कापून टाकल्यामुळे मान खाली घालून मुकाट काम करण्यावाचून गत्यंतर नव्हते.
एके दिवशी काय घडले तर नदीवरून परत येताना त्यांना त्यांचा शाळेतील स्नेही भेटला. तो खुशालचेंडू सारखा मजेत शीळ वाजवीत चालला होता. स्नेह्याने ह्याची ख्याली-खुशाली विचारली. जामाताने आपली संपूर्ण कर्मकहाणी ऐकवली. त्यावर तो स्नेही उत्तरला, “अरे मी देखील तुझ्यासारखाच घर जावई आहे, पण मी अगदी राजासारखा राहतो. “आणि ते कसे ?” मदनबाणाने पृच्छा केली. “मी दरसाली श्रावण महिन्याच्या चौथ्या रविवारी ‘जामात पुनःसन्मान’ व्रत करतो, ह्या व्रताने काय होते तर श्वशुरगृही राजासारखा मान मिळतो, इकडची काडी तिकडे करावी लागत नाही, आयते खायला-प्यायला, उत्तमोत्तम वस्त्रे ल्यायला मिळतात. कोणीही चढ्या आवाजात बोलत नाहीत, मेहुणा, मेहुण्या सुतासारख्या सरळ राहतात, आणि मुख्य म्हणजे पत्नी धाकात राहते”
“मित्रा, कृपा करून मला पण हे व्रत सांग, मी ते मनोभावे करीन, श्वशुरगृही श्रमांनी माझ्या शरीरातील अस्थी वर आल्या आहेत.” जामाताने आपल्या छातीच्या फासळ्या दर्शवित उतावीळपणे विचारले.
“नाही, नाही, तू उतशील, तू मातशील, घेतला वसा टाकून देशील”
‘नाही, नाही, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही”
“ठीक आहे, चल तर मग कलालाच्या दुकानी बसू, जेथे मी तुला हे व्रत कथन करतो.
कलालाच्या दुकानी स्नेह्याने नवटाक सोमरस घेतला, त्यातील घोटभर मदनबाणाच्या पंजात ओतला. दोघांनी 'स्वाहा' म्हणून तो सोमरस श्रद्धेने प्राशन केला व कर मस्तकावरून फिरवले. पुढे स्नेही कथन करता झाला.
तर ह्या व्रतात सर्व प्रथम काय करावे तर प्रात:काळी विडी-चिलीम शिलगावी व चेहऱ्यावर मग्रूर भाव धारण करून धूर सोडीत गृही सर्वत्र फिरावे, कोणी टोकल्यास दात ओठ खात त्यांच्या अंगावर धावून जात भ्रमिष्टासारखे वर्तन करावे. एव्हढ्यानेच श्वशुरगृही मंडळी मऊ पडतील.
तसे न झाल्यास दुसरे दिवशी सदऱ्याच्या वरच्या खिशात सर्वांच्या नजरेस पडतील असे जुगाराचे पत्ते, मटक्याची चिटोरी, घोड्यांच्या शर्यतीची पुस्तके वगैरे साहित्य ठेवावे. ह्याने मंडळी सुतासारखी सरळ होतात असा इतर जामातांचा अनुभव आहे.
तसे ही न झाल्यास तिसरे दिवशी गुत्त्यावर जाऊन दोन नवटाक हाणून, झोकांड्या खात, बडबड करीत प्रथम गावातून फिरावे व शेवटी निजगृही परतावे. गावभर जामातापेक्षा ‘अमक्याचा जावई’ म्हणून श्वशुरांचीच जास्त नाचक्की होईल. नवटाक प्राशन करता आली नाही तर किमान एखाद प्याला अंगावर उपडा करावा व अर्वाच्य शब्द उच्चारीत स्वगृही परतावे. एव्हढ्याने मंडळी नरमल्याचे असंख्य दाखले आहेत.
पण श्वशुरगृही मंडळी बेरकी असल्यास व वरील सर्व उपायांनी न बधल्यास शेवटचे ब्रह्मास्त्र उपसावे. गावातल्या जत्रेत जावे, हाताला मोगऱ्याचा गजरा बांधावा, तांबूलविडा ग्रहण करावा. जमलेल्या लोकांच्या नजरेस पडाल अशा रीतीने तेथे तमाशाच्या फडा भोवती घुटमळावे. तंबूची कनात वर उचलून हळूच आत डोकावावे, जमल्यास चंद्रा सातारकर किंवा शेवंता कोल्हापूरकरशी लगट करावी. लगेच त्यांची माणसे तुम्हाला तेथून हुसकून लावतील, तरी परत परत माघारी जावे. शेवटी ते तुमची कणिक तिंबून तुम्हाला उचलून दुरवर नेऊन उकिरड्यावर फेकतील. गावभर बेअब्रू होईल, तुमच्यापेक्षा श्वशुरांचीच जास्त होईल. ते नाक धरून तुमच्या शरण येतील. पत्नीच्या नाकाचा शेंडा रडून लाल झालेला दिसेल, श्वश्रूचे नाक परस्पर ठेचले जाईल, मेहुणा-मेहुणी तुमच्याशी आदराने बोलू लागतील. हीच संधी साधून आपल्या अपमानाचा बदला घ्यावा, आपल्या सर्व इच्छा पुरवून घ्याव्यात, व “आजपासून गृहातील कोणतीही कर्मे करणार नाही” असे ठणकावून सांगावे.
व्रताची सांगता करताना, हे व्रत ज्यांनी कथन केले त्यास व इतर जामातांस स्वगृही पाचारण करावे, त्यांचे आपल्या श्वशुर-श्वश्रूच्या हस्ते, हस्तपाद्य पूजन करावे, शेर पावशेर सोमरस अर्पावा, तपश्चात आदराने भोजनास बसवावे, भोजन संमिश्र असावे तसेच त्यात पंचपक्वांन्ने असावीत, जी आग्रहपूर्वक वाढण्यात यावी. भोजनोत्तर तांबूलविडा द्यावा, तदनंतर नवीन वस्त्रे व वाटखर्चाला काही सहस्त्र मुद्रा अर्पाव्यात. व्रताचा खर्च श्वशुरांकडून घ्यावा. निरोप घेताना ‘पुन्हा या’ असे आवर्जून म्हणावे.
स्नेहयांनी कथन केलेले, ‘जामात पुनःसन्मान’ व्रत मदनबाण जामातानी निष्ठापूर्वक केले, ज्याचे त्यांना अपेक्षित फळ मिळाले. मग एके दिवशी त्यांनी विधिपूर्वक व्रताची सांगता केली व आजन्म राजासारखे श्वशुरगृही राहू लागले.
जसे ‘जामात पुनःसन्मान व्रताने’ मदनबाण सुखात लोळू लागले तसे सर्व जामात श्वशुरगृही आनंदाने लोळोत.
ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
प्रतिक्रिया
8 Sep 2021 - 1:31 am | कंजूस
श्वशुरही कलालाकडे आले तर?
9 Sep 2021 - 6:23 pm | सौन्दर्य
मग तेथेच मांडवली करावी. चिअर्स म्हणून.
8 Sep 2021 - 6:31 am | गॉडजिला
.
9 Sep 2021 - 6:25 pm | सौन्दर्य
जगात रडवायला अनेक आहेत, त्यातल्या त्यात एक स्मित चेहऱ्यावर उमटावे म्हणून हा सर्व खटाटोप.
9 Sep 2021 - 5:29 pm | रावसाहेब चिंगभूतकर
या ग्रुप वरच्या मदनबाणाशी या गोष्टीतील नायकाचा काही संबंध?
9 Sep 2021 - 6:21 pm | सौन्दर्य
कर्मधर्म संयोगाने काही साम्य आढळून आल्यास त्यास निव्वळ योगायोग समजावा.
10 Sep 2021 - 1:51 pm | टर्मीनेटर
हा हा हा... भारी आहे व्रत 😀
10 Sep 2021 - 6:21 pm | धर्मराजमुटके
अरेच्चा ! शीर्षक वाचून समुच्च भारतवर्षाच्या लोकप्रिय जावयावरील लेख असावा अशी शंका आली होती पण लेख वाचल्यावर ती दूर झाली. कहाणी मस्त !
10 Sep 2021 - 6:28 pm | Rajesh188
लय भारी लिहलय.मज्जा आली.
14 Sep 2021 - 10:43 pm | सौन्दर्य
टर्मिनेटर, धर्मराजमुटके, राजेशजी,
कहाणी आवडल्याचे कळविल्याबद्दल आभार.
23 Sep 2021 - 9:15 am | कुमार१
कहाणी मस्त !
23 Sep 2021 - 4:20 pm | ज्ञानोबाचे पैजार
मदनबाण असा उन्मत्त पणे वागायला लागल्यावर सासु सासर्यांनी दोघा नवराबायकोंना घरातुन हकलवुन लावले. चार दिवस इकडे तिकडे राहिल्यावर मदनबाण पुन्हा बायकोला घेउन आपल्या आई वडिलांच्या घरी आला. थोडे दिवस चांगले गेले असतिल की परत सासु सुनेचे वादंग सुरु झाले. यावेळी मदनबाण सुध्दा आपल्या आई वडीलांना सामिल झाला व बायकोचा छळ करु लागला.
गांजलेल्या सुनबाईंना एका दयाळू बाईने "पुत्रवधु पुनःसन्मान" व्रताची माहिती दिली व आवष्यक ती सगळी मदत पुरवण्याचे आश्वासन दिले. सुनबाईंनी त्या व्रताचा वसा घेतला
रोज संध्याकाळी सुनबाई भक्तीभावाने अर्धा खंबा मद्या प्राशन करत व निद्राधिन असलेल्या नवर्याच्या माता भगिनीच्या काही विषिष्ठ अवयवांचा उध्द्दार करणार्या अर्वाच्य शिव्यांची लाखोली वाहून त्याच्या कमरेत एखादी जोरात लाथ मारुन मगच बेडवर पडत.
दुसर्या दिवशी दुपारी लवकर उठुन सुनबाई दोन सिगरेट ओढल्यावरच बेडरुमच्या बाहेर येत असत. बाहेर आल्यावर घाबरुन कुठेतरी लपुन बसलेल्या सासुच्या खोलीच्या दरवाज्याला लाथ मारुन, दरवाजा उघडून, तिला दोन थोबाडात हाणून, तिच्या झिंज्या पकडून फरपट बाहेर आणत असत व लिंबुपाणी बनवायला पिटाळत असत. लिंबुपाणी येइ पर्यंत घराच्या गॅलरी मधे उभे राहुन केस विंचरत येणार्या जाणार्या लोकांवर यथेच्छ तोंडसुख घेत एखादी सिगरेट होत असे. कंगव्यात आडकलेले केस व सिगरेटची थोटके खालच्या गॅलरी मधे टाकुन देउन त्या घरात येत असत.
सासुवर , नवर्यावर, शेजार्यांवर आरडा ओरडा करुन दमलेल्या सुनबाई मग लिंबु पाणी घेउन भरपेट नाष्टा करुन जेवणाची ऑर्डर देउन हॉलच्या सोफ्यावर टिव्ही पहात बसत असत. त्यावेळी मग एखाद दुसरी सिगरेट घ्यायची त्यांना हुक्की येई. कधी मधी लहर आली तर त्या अंघोळ पण करत असत. टिव्ही पाहुन होइ पर्यंत जेवण तयार झालेले असे. ते घेउन मग संध्याकाळ पर्यंत ताणुन द्यायचा त्यांचा कार्यक्रम असे.
संध्याकाळी मग मैत्रिणींबरोबर पत्ते खेळता खेळता तिनचार पेग मद्य घेइ पर्यंत जेवायची वेळ होत असे. जेवण झाले की उरलेला खंबा रिचवून मग त्या पाय मोकळे करायला बाहेर पडत. परत येता येता दुसर्या दिवशीचा स्टॉक त्या आणत असत.
कधी कधी पाय मोकळे करुन येताना त्यांना त्यांचा एखादा जुना मित्र भेटला तर त्याला त्या घरी घेउन येत असत. अशा वेळी नवर्याला रात्रभर बाहेर हॉल मधे झोपावे लागे. तसेच रात्री मधुन आधुन नवर्याला कधी पाणी तर कधी त्या मागतील त्या वस्तु देण्या करता उठावे लागे.
अशा रीतीने "पुत्रवधु पुनःसन्मान" व्रताचा अंगिकार करुन सुनबाई सुखाने जगु लागल्या.
पैजारबुवा,
23 Sep 2021 - 11:15 pm | सौन्दर्य
आवडला, आवडला, लेख आवडला. 'दुसर्या दिवशी दुपारी लवकर उठुन' अगदी खास.
23 Sep 2021 - 11:28 pm | श्रीगुरुजी
मस्त लिहिलंय.