अभियांत्रिकीचे दिवस-४.. ओरल्स..!

पाटिल's picture
पाटिल in जनातलं, मनातलं
23 Aug 2021 - 9:46 pm

ओरल्सचं टाईमटेबल लागलं की नैराश्याचा भलामोठ्ठा काळाकुट्ट ढग सगळा कॅंपस व्यापून टाकायचा.
ओरल्सच्या तयारीमध्ये मुख्य म्हणजे चेहऱ्यावर, डोक्यावर स्टाईल म्हणून मोठ्या प्रेमानं लागवड केलेल्या, विषुववृत्तीय जंगलाची सफाई करून, शक्य तितकं गोंडस बाळ दिसण्याचा प्रयत्न करणं आणि सकाळी-सकाळी दारोदार युनिफॉर्म उसना मागत फिरणं, या दोन गोष्टी महत्त्वाच्या....
बाकी देवाक काळजी..!

काळ : आणीबाणीचा
वेळ : ओढवलेली
प्रसंग : ठासलेला
पात्रे : फेस आलेली

डिपार्टमेंटच्या पॅसेजमध्ये तीस-चाळीस पोरं/पोरी फायलींमध्ये माना घालून वेगवेगळ्या पोजमध्ये बसलेली.
वाचता वाचता भीतीनं पोटात होणारी गुडगुड आणि सशासारखं पिटपिटणारं आपलं काळीज एकमेकांना कळू न देण्याचा प्रयत्न.

डिपार्टमेंच्या पुढच्या मोकळ्या जागेत प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्सचे सेट-अप लावून ठेवलेले.
आधी प्रॅक्टिकल करायचे आणि मग ओरल द्यायची अशी पद्धत.

निअँडरथल मानव ज्या मेंदुहीन आणि दगडी चेहऱ्यानं iPhone कडे बघेल, डिट्टो तसाच बथ्थड भाव रीडिंग घेणाऱ्यांच्या चेहऱ्यांवर.
कशाचा कशाला संबंध नाय.. !

मग उगाच आपलं ट्रायपॉड हलवून बघा.
इंस्ट्रुमेन्टचा एखादा स्क्रू फिरवून बघा.
टेलीस्कोपशी खुटपूट करत, काय दिसतंय का ते बघा.
असले येडे चाळे करत टाईम किल करणारी जनता.

एखादा खाटीक कोंबड्यांच्या खुराड्याजवळ आला की कोंबड्यांमध्ये कसा प्राणभयानं हलकल्लोळ माजतो..!
एक्सटर्नल एक्झॅमिनरची डिपार्टमेंटला एन्ट्री झाली की पॅसेजमधल्या पोरांमध्ये डिट्टो तशीच भयग्रस्त चुळबुळीची तणावग्रस्त लाट पसरत जायची...

तिकडे इंटर्नलच्या केबिनमध्ये सामुदायिक नरसंहाराची पूर्वतयारी पूर्णत्वास.
चहा ब्रेकफास्ट आटपून दोन्ही एक्झॅमिनर्स जीभेला धार लावून भूमिकेत ऐसपैस शिरलेले...!

"चला sss पयले चार नंबर आत चलाsss" प्यूनची उद्ग्घोषणा.

त्या पहिल्या चार कोंबडा/कोंबडींच्या डोळ्यांत साक्षात काळाशार आणि थंडगार मृत्यू गोठलेला !!
आणि त्यांना बाहेर यायला जसजसा उशीर होईल तसतशी बाहेरच्या कोंबड्यांची वाढती फडफड.
आणि तुटेपर्यंत ताणलेल्या भीतीच्या नाजूक धाग्यावर भावनांचे वर-खाली हेलकावे...

आतले स्टुडंट्स बाहेर आले की त्यांच्याभोवती गराडा घालून प्रश्न जाणून घ्यायचा प्रयत्न.
पण त्यांचे रंग उडालेले चेहरे आणि नुकत्याच बसलेल्या मानसिक धक्क्यातून सावरत सावरत तोंडातून कसेनुसे ओघळणारे शब्द, मॅच व्हायचे नाहीत बऱ्याचदा..
मग ते नुसतेच आक्षेपार्ह हातवारे करत भावना पोचवायचे.

बकरे की अम्मा खैर मनाएगी कबतक..?
उरलेले कोंबडेही खाटकांच्या तावडीत सापडतातच...
चार-चार जण आत जात राहतात...
आणि बरबाद झाल्यासारखे बाहेर येत राहतात.

अशीच एक ओरल.
असाच आमचा नंबर.
नुकताच वॉशरूममधून एकाशी युनिफॉर्म एक्सचेंज करून आलेला मी, चेहऱ्यावर लाचार हासू ठेवत केबीनच्या दाराशी केविलवाणा उभा.

"काय वाट लागायची ती लागून जाऊ दे एकदाची बेंचो!"
अशा निराश खच्ची अवस्थेत माझं शरीर आपोआप आत ढकललं जातं.
पण मन मात्र कसल्यातरी चमत्काराच्या आशेत...

आत चार स्टूल्स... बसलो.
डाव्या बाजूला मुलगी...क्लास टॉपर वगैरे कॅटेगरी..!!
तिचा काही प्रश्नच नाही..!
प्रश्न आमचाच होता..!
कारण उजव्या बाजूचे दोघेजण माझ्याहून दळींदर आणि गावावरून ओवाळून टाकलेले..!

इंटर्नलशी दीदार-ए-यार !!
"तुझं सरलं गड्या !!" असा खुनशी भाव त्यांच्या डोळ्यांत.

थरथरत्या मांड्यांवर फाईल घट्ट धरून बसलेला मी.

"ट्रसची bending moment किती असते?? तू सांग रेsss"
पहिला बाण सणसणत माझ्या दिशेनं.
माझं अंग गरमागरम होताना मला जाणवतंय..
त्याचवेळी गळ्याखाली घाम, घशाला कोरड आणि मणक्यातून थंडगार शिरशिरी..

"क्.. क्.. कमी असते सर" माझा बचावात्मक पवित्रा..!

ऊजवीकडच्या दोन्ही दळींदरांच्या खरखरत्या घशांमधूनही माझ्याच गंडलेल्या उत्तराचा हुबेहूब प्रतिध्वनी..
मग एकतर्फी प्रश्न येत राहिले आणि आम्हा तिघांच्या ठार मठ्ठ चेहऱ्यांवर आदळून बाउन्स होत राहिले.

"एवढं साधं साधं आणि बेसिक विचारतोय...ते पण तुम्हाला सांगता येत नाय..काय उपयोग आहे तुमचा ?"
असं म्हणत म्हणत इंटर्नलकडून मध्येच आमच्या फायली बघायला सुरुवात..

"बाप रे..! हे काय लिहिलंय !! कठीण आहे !!
अरे राजाsss...हा रिडींग्जचा टेबल आहे ...
इथं रिडींग '0.1' हवं होतं... त्याठिकाणी तू 'oil' लिहून ठेवलंयस... एखादं रिडींग 'oil' कसं काय असू शकतं?? एवढंही डोकं चालत नाही का कॉपी करताना?? शरम नाही का वाटत??"

चेहऱ्यावर धक्का बसल्याचं एक्सप्रेशन आणायचा माझा प्रयत्न होता, पण तो साफ अयशस्वी झाला..
चेहऱ्यानं ऐनवेळी दगा दिला.
तो कंट्रोलच्या बाहेर जाऊन आपोआपच छिन्नविछिन्न, खिन्नमनस्क होत गेला..

आमची घेता घेताच, दोन्ही एक्झामिनर्सची एकमेकांच्या कानांत अधूनमधून फुसफुस आणि नंतर फिदीफिदी... नंतर गडगडाट...!

आता आमची शेजारीणसुध्दा रिलॅक्स होऊन त्या कुजकट हसण्यात सामील व्हायला लागली.

तेव्हा उरली सुरली आब्रू वाचवणं आवश्यक होतं.
म्हणून मी समोरच्या रफ वर्कसाठीच्या चिठोरीवर, विचारलेल्या एका प्रश्नाचं calculation करण्यात गुंग झाल्याचं ढोंग चालू केलं.

शेजारच्या येड्याला वाटलं की त्याला जी चिठोरी दिलीय ती अटेंडन्स मार्क करण्यासाठीच..!

'आला कोरा कागद की भरा त्याच्यावर अटेंडन्स', अशी त्याची जीवननिष्ठा..!

त्यानं लगेच त्या कागदावर इज्जतीत नाव, सीट नंबर आणि सही करून त्याच्या शेजाऱ्याला पास केली.
त्याच्या शेजारच्या मूर्खानं पण तेच केलं.
मग अजून बेअब्रू...बेअब्रू स्क्वेअर...बेअब्रू क्यूब.. बेअब्रू रेज टू एन..!

शेवटी शेवटी आमच्यासारख्या निगरगठ्ठयांकडून काहीही अपेक्षा करण्यात अर्थ नाही, हे समजल्यामुळे ते स्वतःच कुठलातरी कन्सेप्ट समजावून सांगायला लागले.

"बेडूक कशा झिगझॅग उड्या मारतो ते बघितलंय का तुम्ही कधी ? एक उडी मारतो.. मग थोडा वेळ थांबतो.. इकडं तिकडं बघतो.. मग पुन्हा उडी मारतो.. थोडा वेळ थांबतो.. मग पुन्हा उडी मारतो...अगदी तसंच ह्या प्रोसेसमधला इलेक्ट्रॉनपण करतो.. आता तरी कळलं का तुला ?"

"........"

"हं... मग सांग बघू आताss"

"........"

"बोल कीsss''

"गुडबुडबुडगुडफुसफडुस"

"मोठ्यानं बोल sss...काय तोंडातल्या तोंडात पुटपुटतोय ? क्लासमध्ये तर नुसता बाजार उठवत असता तुम्ही लोकं..!"

आमचा शेजारी म्हणजे आधीच फ्यूज्ड बल्ब !
पण प्रकरण अगदीच हातघाईवर आल्यावर त्याला 'शरम' या‌ भावनेचा स्पर्श झाला... आणि त्यानं लाजत मुरकत कबूल केलं...
"सर... ते बेडकाचं कळलं... पण हे इलेक्ट्रॉनचं काय नाय कळलं ओss !!"

आणि ह्या उत्तरासोबतच एक्सटर्नलचा पेशन्स संपला आणि तिथं एक मोठा स्फोट होऊन ताबडतोब आमची बाहेरच्या दिशेनं रवानगी करण्यात आली.

"सबमिशन जपून ठेवा sss... पुढच्या वेळी लागेलच !!"

असा एक्सटर्नलचा दाट खर्जातला आवाज लगेचच मागून आला आणि त्याचबरोबर निकालसुध्दा समजला..!

विडंबनविनोदशिक्षणप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

गुल्लू दादा's picture

23 Aug 2021 - 10:27 pm | गुल्लू दादा

मस्त चाललंय.

सुक्या's picture

23 Aug 2021 - 11:06 pm | सुक्या

बापरे .. तुमच्या शेजारी मीच होतो की काय ...
असली फे फे आमच्या बाबतीत नित्याचीच होती ....

प्रसाद गोडबोले's picture

23 Aug 2021 - 11:43 pm | प्रसाद गोडबोले

बेक्कार हसतोय =)))

ऑईल काय राव ऑईल ... हिलेरियस =))))

मला आमची बी.एस्सी लास्ट इयर ची ओरल आठवली . आता स्टॅटिस्टिक्स सारख्या विषयाला ओरल असण्याचे काय कारण ? पण बहुतेक त्यांना तपासायचे असावे की तुम्ही नुसतेच रट्टाबाजी करुन पास होताय की तुम्हाला खरेच त्यामागील गणित , लॉजिक इन्टर्प्रिटेशन कळले आहे ?

चार पेपर ला चार ओरल्स ! जवळपास २०० मार्क टोटल मार्क्स च्या २०% ! पण ते झपाटलेले दिवस होते , अभ्यासात मागेपुढे पाहीले नाही . पहिल्या तीन ओरल्स अफलातुन झाल्या . शेवटच्या ओरल ला मला प्रश्नच विचारले नाहीत एक्स्टर्नल ने . ते हसुन फक्त इतकेच म्हणाले की " तुला आता काय विचारयचं ? तु सगळीच तयारी करुन आलाय . एक सांगतो , पी.एच.डी कर नक्की !" ह्या एवढ्यावर माझी ओरल संपली !

२०० पैकी १९९ मार्क्स मिळाले !

अर्थात एवढे करुनही मी शिवाजी विद्यापिठात दुसरा आलो =)))) , सोलापुरचा कोणीतरी एक जण पहिला होता . त्याने मुख्य पेपर मध्ये मला मागे टाकले ...दुत्त दुत्त.

नंतर कधीतरी सोलापुर ला शिवाजी विद्यापिठातुन काढुन स्वतंत्र विद्यापीठ दिले तेव्हा मला मनस्वी आनंद झालेला =))))

रावसाहेब चिंगभूतकर's picture

24 Aug 2021 - 8:06 am | रावसाहेब चिंगभूतकर

केली का मग PHD?

प्रसाद गोडबोले's picture

24 Aug 2021 - 9:56 am | प्रसाद गोडबोले

नाही ना !

एमेस्सी च्या ओरल्स आणि एक्जॅम्स मध्ये आमची अवस्था ह्या लेखकासारखीच दारुण झाली होती , शिवाय कॅपस मधुन नोकरीही लागली म्हणुन राहुन गेले पी.एच.डी चे !

( पण आता खंत वाटते , पी.एच.डी केली असती तर आत्ता कमावत आहे त्याच्या किमान दुप्पट ते तिप्पट जास्त कमावत असतो मी :(
नहि ज्ञानेन सदृषं रिवॉर्डींग इह विद्यते हेच खरे !)

Bhakti's picture

24 Aug 2021 - 6:44 am | Bhakti

जेब्बात !!भारी.

गॉडजिला's picture

24 Aug 2021 - 7:11 am | गॉडजिला

क्.. क्.. कमी असते सर" माझा बचावात्मक पवित्रा..

:)

पाटिल's picture

24 Aug 2021 - 7:48 am | पाटिल

ट्रसची बेंडींग मोमेंट झिरो असते..! त्यात कमी किंवा जास्त असा काही विषय नसतो.. :-))

अभिप्रायाबद्दल सर्वांचे आभार.. _/\_ :-)

शानबा५१२'s picture

24 Aug 2021 - 9:09 am | शानबा५१२

माझा "व्हायवा एक्झाम" चा अनुभव काहीसा मार्कस ह्यांनी लिहलल तसाच आहे. मी पी.एचडी मधुन सोडली. मधुन म्हणजे काही दीड वर्षांच्या आत, तो माझा निर्णय मला खुप आवडला, कारण रीसर्च टॉपीक जो नको होता तो दीला गेलेला व नंतर बदलेन बोलुन बदलला गेला नाही. मग बोललो अशा शिक्षकांकडे असलेली पी.एचडी डीग्री मला नको. ईतर मार्ग असेल आर्थिक स्थैर्य मिळवायचा.
आपला लेख एकदम प्रामाणिक आहे. मणक्यातून थंडगार शिरशिरी.. fight or flight :-)

बबन ताम्बे's picture

24 Aug 2021 - 9:20 am | बबन ताम्बे

हुबेहूब चित्रण केलंय. हहपूवा!!
भारी लेखन करता तुम्ही.

गणामास्तर's picture

24 Aug 2021 - 11:40 am | गणामास्तर

यांवरून एक किस्सा आठवला. .स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या पेपरला बाजूच्या लायनीत बसलेला मित्र खपाखप समोरच्या पोराचे छापत होता.
अर्थातच आम्हा बाकीच्यांची जळजळ होत होती. दिड दोन पानाचे कॅल्क्युलेशन छापून झाल्यावर मित्राने त्याचे अंडरलाईन बोल्ड वगैरे करून लिहिलेले उत्तर पाहिले अन डोक्याला हात मारून घेतला, माझ्याकडे पाहत ओरडून म्हणाला कि या *त्त्याने उत्तर " syntax error " लिहिलंय .
शून्य मिनिटांत आमची रवानगी बाहेर झाली.
ज्याने हा प्रताप केला तो मुलगा एकही लेक्चर प्रॅक्टिकल चुकवत नसे. अजूनपर्यंत हा बरेचदा आमच्या चर्चेचा विषय होतो.

पाटिल's picture

24 Aug 2021 - 2:41 pm | पाटिल
पाटिल's picture

24 Aug 2021 - 2:41 pm | पाटिल

Syntax error :-) )

राजेंद्र मेहेंदळे's picture

24 Aug 2021 - 12:11 pm | राजेंद्र मेहेंदळे

हहपुवा!!
मस्त चाललिये सिरीज!! एकदम काळजाला भिडणारे प्रसंग आणि वाक्ये. आत जाणारे बकरे काय, कलकलाट करणार्‍या कोंबड्या काय , लईच भारी.

आमच्या कॉलेजमध्ये सगळ्या लॅब एकाच मजल्यावर होत्या. म्हणजे ओरलसाठी एकीकडे मेक ची पोरे/पोरी थांबली, तर दुसर्‍या दारासमोर ईंस्ट्रुची, तिसरीकडे कॉम्प ची तर चौथीकडे क्ट्रिकल किवा ट्रॉनिक्स ची. आणि झाडुन सगळ्यांची अवस्था अशीच, कोणी जिन्यात लोळतोय, कोणी व्हरांड्यात फेर्‍या मारतोय तर कोणी एखादा कोपरा धरुन (आणि डोके धरुन) बसलाय. भयंकर स्ट्रेसफुल वातावरण. काही महिन्यांपुर्वीचे वार्षिक समारंभाच्या वेळचे हेच का ते कॉलेज अशी शंका यावी अशी एकुण परिस्थिती.
लेख मनाला भिडला हेवेसांनल!!

टवाळ कार्टा's picture

24 Aug 2021 - 1:08 pm | टवाळ कार्टा

एकीकडे मेक ची पोरे/पोरी थांबली

मुदलात घोळ आहे इथे...मेकमध्ये "male" आणि "non-male" असतात =))

सुबोध खरे's picture

24 Aug 2021 - 12:42 pm | सुबोध खरे

हायला

आमची एम डी ची तोंडी परीक्षा सकाळी ८ पासून संध्याकाळी ७ पर्यंत चालत असे आणि उमेदवार फक्त ५.

पिळून निघणे म्हणजे काय असते ते तेंव्हा समजले. मेलं कोंबडं आगीला भीत नाही म्हणतात तसं दुपारपासून व्हायला सुरुवात होते.

आमचे बाह्य परीक्षक तर "अंग्रेजोंके जमाने के परीक्षक" होते. (गुलबर्ग्याहून आलेले)

त्यांना recent advances काय असतात तेच माहिती नव्हते.

त्यामुळे त्यांनी मला नापासच केले असते.

मध्यंतरात आमच्या इंटर्नल नि त्यांना "तुमचं" बरोबर नसून उमेदवार म्हणतो ते बरोबर आहे हे सुग्रास जेवणाबरोबर पटवून दिले.

नाही तर एक पंढरीची वारी नशिबात आली असती

गुल्लू दादा's picture

24 Aug 2021 - 1:03 pm | गुल्लू दादा

तुमचेही किस्से लेख मालिकेद्वारे येऊ द्यावेत ही आग्रहाची विनंती करतो.

मध्यंतरात आमच्या इंटर्नल नि त्यांना "तुमचं" बरोबर नसून उमेदवार म्हणतो ते बरोबर आहे हे सुग्रास जेवणाबरोबर पटवून दिले

अगदी इंटर्नल ती सुद्धा धावपळ असते तेव्हा. काही exaternal चा रूबाबच मोठा :)

सोत्रि's picture

24 Aug 2021 - 3:22 pm | सोत्रि

मस्त, सगळ्या आठवणी जाग्या झाल्या!

:=))

- (अभियांत्रिक) सोकाजी

गामा पैलवान's picture

25 Aug 2021 - 2:27 am | गामा पैलवान

पाटिलबुवा,

प्रत्ययी लेखन आहे. प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहताहेत.

तुमची उपमेची प्रतिमासृष्टी फारंच बहारदार आहे. विषुववृत्तीय जंगल, कसाई व कोंबडे, बेडकाचा इलेक्ट्रॉन, वगैरे, वगैरे ! :-)

आ.न.
आ.पै.

अभिप्रायाबद्दल धन्यवाद, गामा पैलवान.. :-)

एक बहाद्दर गांजा मारून तोंडी परीक्षेला गेले होते,, उत्तर बरोबर दिले पण तेच उत्तर परत परत देत राहिला इंटर्नल त्याच कॉलेजात एम ई झालेला तरुण लेक्चरर होता,, त्यामुळे हे प्रकरण त्याच्या लक्षात आल ,, एक्सटेर्नल पासून हे लपवन्या साठी त्यांनी जी काय केविलवाणी धडपड केलीय अरे बापरे

छान लिहिलय!! खूप हसवणारं !! उपमा, उत्प्रेक्षा सुंदर.

मित्रहो's picture

25 Aug 2021 - 10:17 am | मित्रहो

मस्त मजा आली. एकदा आमच्या होस्टलचे रेक्टरच्या विषयाची ओरल होती आणि आम्ही ठरवून प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात होस्टलच्या समस्या सांगितल्या. आता पूर्ण आठवत नाही पण क्वॉलिटी म्हणजे काय तर मेसचे जेवणाची उत्तम क्वॉलिटी कशी असे काही तरी सांगितले होते. सर होस्टेलच्या मुलांना ओरलमधे कधीच खूप कमी मार्क देत नाही याची पूर्ण खात्री होती.

चावटमेला's picture

25 Aug 2021 - 12:46 pm | चावटमेला

मी प्रत्येक ओरल मध्ये अगदी केविलवाणा, बापुडवाणा चेहरा करून बसत असे. म्हणून च कदाचित कितीही शिव्या दिल्या तरी परीक्षक कधी मला नापास करायचे नाहीत बहुतेक :)

प्रतिसाद

सुबोध खरे's picture

25 Aug 2021 - 7:41 pm | सुबोध खरे

आमचे एक मेजर सिद्दीकी म्हणून शरीररचनाशास्त्राचे परीक्षक होते. त्याना असे केविलवाणा चेहरा वगैरे अजिबात चालत नसे.

त्यांचे प्रश्न येत नव्हते म्हणून एक मुलगी रडू लागली. त्यावर मेजर सिद्दीकी तिला कोरड्या शब्दात म्हणाले.

Look here,miss, all this crying will not help. you go out wash your face and come back after १० minutes. If I see you crying then, I shall fail you.

ती मुलगी गपचूप उठून बाहेर गेली. तोंड बिंड धुवून परत आली आणि तोंडी परीक्षा दिली.

यानंतर मेजर सिद्दिकींचा मुलांमध्ये भाव काय वधारला होता.

शब्दानुज's picture

25 Aug 2021 - 7:49 pm | शब्दानुज

आमच्या वेळचा एक किस्सा

"नाव काय रे तुझं ?"

"आठवतोय सर ! "

सुखी's picture

25 Aug 2021 - 10:33 pm | सुखी

अक्षरशः फुटलो :D

बोलघेवडा's picture

25 Aug 2021 - 8:51 pm | बोलघेवडा

पाटील साहेब, मस्त लेख. एकदम जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
एका मित्राच्या कॉलेज मधला किस्सा आठवला. मशीन ड्रॉविंग च्या ओरल ला स्क्रू जॅक म्हणजे टायर पंचर झाल्यावर खाली आधाराला जे डिव्हाईस वापरतात त्याच्या डिझाईन बाबत काही प्रश्न एक्सटर्नल ने विचारले.

बाकी सर्व ठीक होत पण त्याच्या हँडल ची लेंथ आमच्या मित्राने 5 मीटर अशी काढली होती. त्यावर तो एक्सटर्नल म्हणाला की ते हँडल फिरवायला बैल आणावा लागेल :)

सिरुसेरि's picture

25 Aug 2021 - 11:22 pm | सिरुसेरि

सबमिशनवरील आठवणींप्रमाणे या आठवणीही मस्त . ओरलला जर कुणी व्यवस्थित अभ्यास करुन आला असेल तर बाकीचे त्याला "साला , रट्टा मारके आया है " असे डिवचत असत . बाकी या आठवणी वाचुन पुर्वी लिहिलेला लेख आठवला - https://www.misalpav.com/node/32511