अभियांत्रिकीचे दिवस-४.. ओरल्स..!
ओरल्सचं टाईमटेबल लागलं की नैराश्याचा भलामोठ्ठा काळाकुट्ट ढग सगळा कॅंपस व्यापून टाकायचा.
ओरल्सच्या तयारीमध्ये मुख्य म्हणजे चेहऱ्यावर, डोक्यावर स्टाईल म्हणून मोठ्या प्रेमानं लागवड केलेल्या, विषुववृत्तीय जंगलाची सफाई करून, शक्य तितकं गोंडस बाळ दिसण्याचा प्रयत्न करणं आणि सकाळी-सकाळी दारोदार युनिफॉर्म उसना मागत फिरणं, या दोन गोष्टी महत्त्वाच्या....
बाकी देवाक काळजी..!
काळ : आणीबाणीचा
वेळ : ओढवलेली
प्रसंग : ठासलेला
पात्रे : फेस आलेली
डिपार्टमेंटच्या पॅसेजमध्ये तीस-चाळीस पोरं/पोरी फायलींमध्ये माना घालून वेगवेगळ्या पोजमध्ये बसलेली.
वाचता वाचता भीतीनं पोटात होणारी गुडगुड आणि सशासारखं पिटपिटणारं आपलं काळीज एकमेकांना कळू न देण्याचा प्रयत्न.
डिपार्टमेंच्या पुढच्या मोकळ्या जागेत प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्सचे सेट-अप लावून ठेवलेले.
आधी प्रॅक्टिकल करायचे आणि मग ओरल द्यायची अशी पद्धत.
निअँडरथल मानव ज्या मेंदुहीन आणि दगडी चेहऱ्यानं iPhone कडे बघेल, डिट्टो तसाच बथ्थड भाव रीडिंग घेणाऱ्यांच्या चेहऱ्यांवर.
कशाचा कशाला संबंध नाय.. !
मग उगाच आपलं ट्रायपॉड हलवून बघा.
इंस्ट्रुमेन्टचा एखादा स्क्रू फिरवून बघा.
टेलीस्कोपशी खुटपूट करत, काय दिसतंय का ते बघा.
असले येडे चाळे करत टाईम किल करणारी जनता.
एखादा खाटीक कोंबड्यांच्या खुराड्याजवळ आला की कोंबड्यांमध्ये कसा प्राणभयानं हलकल्लोळ माजतो..!
एक्सटर्नल एक्झॅमिनरची डिपार्टमेंटला एन्ट्री झाली की पॅसेजमधल्या पोरांमध्ये डिट्टो तशीच भयग्रस्त चुळबुळीची तणावग्रस्त लाट पसरत जायची...
तिकडे इंटर्नलच्या केबिनमध्ये सामुदायिक नरसंहाराची पूर्वतयारी पूर्णत्वास.
चहा ब्रेकफास्ट आटपून दोन्ही एक्झॅमिनर्स जीभेला धार लावून भूमिकेत ऐसपैस शिरलेले...!
"चला sss पयले चार नंबर आत चलाsss" प्यूनची उद्ग्घोषणा.
त्या पहिल्या चार कोंबडा/कोंबडींच्या डोळ्यांत साक्षात काळाशार आणि थंडगार मृत्यू गोठलेला !!
आणि त्यांना बाहेर यायला जसजसा उशीर होईल तसतशी बाहेरच्या कोंबड्यांची वाढती फडफड.
आणि तुटेपर्यंत ताणलेल्या भीतीच्या नाजूक धाग्यावर भावनांचे वर-खाली हेलकावे...
आतले स्टुडंट्स बाहेर आले की त्यांच्याभोवती गराडा घालून प्रश्न जाणून घ्यायचा प्रयत्न.
पण त्यांचे रंग उडालेले चेहरे आणि नुकत्याच बसलेल्या मानसिक धक्क्यातून सावरत सावरत तोंडातून कसेनुसे ओघळणारे शब्द, मॅच व्हायचे नाहीत बऱ्याचदा..
मग ते नुसतेच आक्षेपार्ह हातवारे करत भावना पोचवायचे.
बकरे की अम्मा खैर मनाएगी कबतक..?
उरलेले कोंबडेही खाटकांच्या तावडीत सापडतातच...
चार-चार जण आत जात राहतात...
आणि बरबाद झाल्यासारखे बाहेर येत राहतात.
अशीच एक ओरल.
असाच आमचा नंबर.
नुकताच वॉशरूममधून एकाशी युनिफॉर्म एक्सचेंज करून आलेला मी, चेहऱ्यावर लाचार हासू ठेवत केबीनच्या दाराशी केविलवाणा उभा.
"काय वाट लागायची ती लागून जाऊ दे एकदाची बेंचो!"
अशा निराश खच्ची अवस्थेत माझं शरीर आपोआप आत ढकललं जातं.
पण मन मात्र कसल्यातरी चमत्काराच्या आशेत...
आत चार स्टूल्स... बसलो.
डाव्या बाजूला मुलगी...क्लास टॉपर वगैरे कॅटेगरी..!!
तिचा काही प्रश्नच नाही..!
प्रश्न आमचाच होता..!
कारण उजव्या बाजूचे दोघेजण माझ्याहून दळींदर आणि गावावरून ओवाळून टाकलेले..!
इंटर्नलशी दीदार-ए-यार !!
"तुझं सरलं गड्या !!" असा खुनशी भाव त्यांच्या डोळ्यांत.
थरथरत्या मांड्यांवर फाईल घट्ट धरून बसलेला मी.
"ट्रसची bending moment किती असते?? तू सांग रेsss"
पहिला बाण सणसणत माझ्या दिशेनं.
माझं अंग गरमागरम होताना मला जाणवतंय..
त्याचवेळी गळ्याखाली घाम, घशाला कोरड आणि मणक्यातून थंडगार शिरशिरी..
"क्.. क्.. कमी असते सर" माझा बचावात्मक पवित्रा..!
ऊजवीकडच्या दोन्ही दळींदरांच्या खरखरत्या घशांमधूनही माझ्याच गंडलेल्या उत्तराचा हुबेहूब प्रतिध्वनी..
मग एकतर्फी प्रश्न येत राहिले आणि आम्हा तिघांच्या ठार मठ्ठ चेहऱ्यांवर आदळून बाउन्स होत राहिले.
"एवढं साधं साधं आणि बेसिक विचारतोय...ते पण तुम्हाला सांगता येत नाय..काय उपयोग आहे तुमचा ?"
असं म्हणत म्हणत इंटर्नलकडून मध्येच आमच्या फायली बघायला सुरुवात..
"बाप रे..! हे काय लिहिलंय !! कठीण आहे !!
अरे राजाsss...हा रिडींग्जचा टेबल आहे ...
इथं रिडींग '0.1' हवं होतं... त्याठिकाणी तू 'oil' लिहून ठेवलंयस... एखादं रिडींग 'oil' कसं काय असू शकतं?? एवढंही डोकं चालत नाही का कॉपी करताना?? शरम नाही का वाटत??"
चेहऱ्यावर धक्का बसल्याचं एक्सप्रेशन आणायचा माझा प्रयत्न होता, पण तो साफ अयशस्वी झाला..
चेहऱ्यानं ऐनवेळी दगा दिला.
तो कंट्रोलच्या बाहेर जाऊन आपोआपच छिन्नविछिन्न, खिन्नमनस्क होत गेला..
आमची घेता घेताच, दोन्ही एक्झामिनर्सची एकमेकांच्या कानांत अधूनमधून फुसफुस आणि नंतर फिदीफिदी... नंतर गडगडाट...!
आता आमची शेजारीणसुध्दा रिलॅक्स होऊन त्या कुजकट हसण्यात सामील व्हायला लागली.
तेव्हा उरली सुरली आब्रू वाचवणं आवश्यक होतं.
म्हणून मी समोरच्या रफ वर्कसाठीच्या चिठोरीवर, विचारलेल्या एका प्रश्नाचं calculation करण्यात गुंग झाल्याचं ढोंग चालू केलं.
शेजारच्या येड्याला वाटलं की त्याला जी चिठोरी दिलीय ती अटेंडन्स मार्क करण्यासाठीच..!
'आला कोरा कागद की भरा त्याच्यावर अटेंडन्स', अशी त्याची जीवननिष्ठा..!
त्यानं लगेच त्या कागदावर इज्जतीत नाव, सीट नंबर आणि सही करून त्याच्या शेजाऱ्याला पास केली.
त्याच्या शेजारच्या मूर्खानं पण तेच केलं.
मग अजून बेअब्रू...बेअब्रू स्क्वेअर...बेअब्रू क्यूब.. बेअब्रू रेज टू एन..!
शेवटी शेवटी आमच्यासारख्या निगरगठ्ठयांकडून काहीही अपेक्षा करण्यात अर्थ नाही, हे समजल्यामुळे ते स्वतःच कुठलातरी कन्सेप्ट समजावून सांगायला लागले.
"बेडूक कशा झिगझॅग उड्या मारतो ते बघितलंय का तुम्ही कधी ? एक उडी मारतो.. मग थोडा वेळ थांबतो.. इकडं तिकडं बघतो.. मग पुन्हा उडी मारतो.. थोडा वेळ थांबतो.. मग पुन्हा उडी मारतो...अगदी तसंच ह्या प्रोसेसमधला इलेक्ट्रॉनपण करतो.. आता तरी कळलं का तुला ?"
"........"
"हं... मग सांग बघू आताss"
"........"
"बोल कीsss''
"गुडबुडबुडगुडफुसफडुस"
"मोठ्यानं बोल sss...काय तोंडातल्या तोंडात पुटपुटतोय ? क्लासमध्ये तर नुसता बाजार उठवत असता तुम्ही लोकं..!"
आमचा शेजारी म्हणजे आधीच फ्यूज्ड बल्ब !
पण प्रकरण अगदीच हातघाईवर आल्यावर त्याला 'शरम' या भावनेचा स्पर्श झाला... आणि त्यानं लाजत मुरकत कबूल केलं...
"सर... ते बेडकाचं कळलं... पण हे इलेक्ट्रॉनचं काय नाय कळलं ओss !!"
आणि ह्या उत्तरासोबतच एक्सटर्नलचा पेशन्स संपला आणि तिथं एक मोठा स्फोट होऊन ताबडतोब आमची बाहेरच्या दिशेनं रवानगी करण्यात आली.
"सबमिशन जपून ठेवा sss... पुढच्या वेळी लागेलच !!"
असा एक्सटर्नलचा दाट खर्जातला आवाज लगेचच मागून आला आणि त्याचबरोबर निकालसुध्दा समजला..!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भारी
बापरे .. तुमच्या शेजारी मीच
बेक्कार हसतोय =)))
केली का मग PHD?
नाही ना !
जेब्बात !!भारी.
क्.. क्.. कमी असते सर" माझा
हा हा..
माझा "व्हायवा एक्झाम" चा
तुफान लिहिलंय
यांवरून एक किस्सा आठवला.
हे हे..
हे हे..
हाहाहा
एकीकडे मेक ची पोरे/पोरी
हायला
तुमचेही
मध्यंतरात आमच्या इंटर्नल नि
मस्त, सगळ्या आठवणी जाग्या
प्रत्ययी लिहिलंय
अभिप्रायाबद्दल धन्यवाद, गामा
एक बहाद्दर गांजा मारून तोंडी
छान लिहिलय!! खूप हसवणारं !!
तुफान
मी प्रत्येक ओरल मध्ये अगदी
सुवर्ण अक्षरात कोरून ठेवण्याजोगा
आमचे एक मेजर सिद्दीकी म्हणून
आमच्या वेळचा एक किस्सा
अक्षरशः फुटलो :D
पाटील साहेब, मस्त लेख. एकदम
सबमिशनवरील आठवणींप्रमाणे या