क्रेडीट कार्ड

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
31 Jul 2021 - 11:55 pm

मी विजुभाउंची समस्या आणि प्रतिसाद वाचत असताना लक्षात आलं की अनेकांना क्रेडीट कार्ड वापरणं सोयीचं वाटत नाही वा जोखमीचं वाटतं. अर्थात तो मूळ विषय नसल्याने मी जरा सविस्तर लिहिण्यासाठी हा लेख लिहायचं ठरवलं.

मी गेली ३०-३५ वर्षे क्रेडीट कार्ड वापरत आहे, अगदी एकेकाळी फी भरुन घ्यावी लागत होती तेव्हापासून. गेली अनेक वर्षे अनेक क्रेडीट कार्डं मजेत आणि अर्थातच फुकट वापरत आहे. या व्यवहारात स्मार्ट फोन युगात फार मोठा फरक पडला आहे आणि वापर आणखी सुलभ झाला आहे. बदलत्या काळाच्या गरजेनुसार एकेकाळी काही दुकानदार, विशेषतः सराफ २% आकार लावायचे ते आता खळखळ न करता कसलीही अट न घालता कितीही रकमेसाठी कार्ड स्विकारु लागले आहेत.

जोखीम म्हटली तर ती सर्व ई व्यवहारात असतेच, अगदी कागदी व्यवहार होते तेव्हाही चेक फोर्जर्‍या होत होत्याच. जर आपण भान बाळगून कार्ड वापरलं तर सुरक्षित व लाभदायक ठरतं. क्रेडिट कार्ड्चे अनेक फायदे आहेत. अधिकतम फायदे मिळवण्यासाठी किमान दोन कार्ड घ्यावीत, एक व्हिसा एक मास्टर, शक्यतो वरच्या श्रेणीतली घ्यावीत. बर्‍या ठिकाणी बरी नोकरी असली तर अनेक बँका तुमच्या मागे लागुन कार्ड फुकट देतात वर कुटुंबियांसाठी अ‍ॅड ऑन कार्डही देतात. एक मास्टर एक व्हिसा अशासाठी की काही लाउंजमध्ये व्हिसा चा पाहुणचार असतो तर काही ठिकाणी मास्टर चा. विमानतळावर आरामात वेळ घालवता येतो, खाणंपीणं मस्त आणि मोफत (पीणं म्हणजे चहा कॉफी मिनरल वॉटर....बिअरचे पैसे द्यावे लागतात).

दोन कार्डं घेण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जास्तितजास्त क्रेडिट पिरियड उपभोगता येतो. प्रत्येक कार्ड्चं बिलिंग सायकल वेगळं असतं. म्हणजे एक तारीख ते तीस तारीख किंवा चौदा तारीख ते पुढच्या महिन्याची तेरा तारीख किंवा दहा तारीख ते पुढच्या महिन्याची नऊ तारीख असं. जर बिल १३ तारखेला तयार केलं जात असेल तर साधारण पैसे चुकवायची वेळ तीन आठवड्यांनंतर म्हणजे पुढच्या महिन्याच्या ३ तारखेच्या आसपास असते. याचाच अर्थ जर या कार्डवर आपण १४ ते ३०/३१ पर्यंत खरेदी केली तर त्या खरेदीचे पैसे आपण पुढच्याच्या पुढच्या महिन्याच्या ३ तारखेला चुकते करणार. सरासरी ३५ -३८ दिवस मिळतात. जर ३० तारखेला बिल तयार केलं जाणारं दुसरं कार्ड आपल्याकडे असेल तर १ ते १५ तारखे दरम्यान जी खरेदी करु तिचे पैसे आपण पुढच्याच्या पुढच्या महिन्याच्या १५ तारखेच्या आसपास चुकते करणार. म्हणजेच १५ दिवस एक कार्ड आणि १५ दिवस दुसरं कार्ड वापरलं तर आपल्याला किमान एक महिन्याची उधारी मिळते. याचा अर्थ समजा एखादं उपकरण ज्याची किंमत २५००० रुपये आहे ते जर रोख देण्याची ऐपत असतानाही कार्डावर घेतलं तर ते २५००० महिनाभर वापरायला मिळतात. इथे अनेक अर्थ तज्ज्ञ शेअर गुंतवणुकीचे धडे देत असतात. त्याचा अभ्यास करुन जर हे पैसे महिनाभर खेळवले तर काही नाही तरी ५००-१००० सुटू शकतात.

पैसे कधी चुकते करायचे ही नियोजन करणे सोपे जाते. जर रोखीत खर्च केला तर एखादा खर्चं लिहायचा राहून जाऊ शकतो मात्र कार्डवरील प्रत्येक खर्चाचा तात्काळ एस एम एस येत असल्याने हिशेब ठेवणे सोपे व अचूक होते. या व्यतिरिक्त अनेक किमती वस्तू करेदी करताना बिनव्याजी हप्त्याची सुविधा मिळते आणि एकरकमी खर्च न होता तो ३-६ महिने थोडा थोडा केला जातो आणि महिन्याच्या बजेटवर ताण पडत नाही किंवा एखादी वस्तू घेण्यासाठे खर्चाची आगाऊ तरतूद न करता झटक्यात खरेदी करता येते. आजकाल बरीच खरेदी अ‍ॅमेझॉन सारख्या स्थळी ऑन लाईन केली जाते. जर यांचं बँक संलग्न कार्ड (फुकट मिळतं) घेतलं तर डोक्याला ताप नाही, तिथल्या खरेदीचा खर्च आपोआप मोजता येतो, बिन्व्याजी हप्ते मिळतात शिवाय केलेल्या खर्चाच्या ५% रक्कम जमा केली जाते आणि पुढच्या खरेदीत ती वजा करुन उरलेली रक्कम आकारली जाते.

अडी अडचणीला किंवा अनपेक्षित गरज लागली तर कुणाकडेही पैसे मागायची वेळ जर कार्ड असेल तर येत नाही. आणखी एक फायदा म्हणजे रिवॉर्ड पॉइंट्स. दर खरेदी गणिक पॉइंट जमा होत राहतात. मी स्वतः हे पॉइंट्स रिडीम करुन कॉफी मेकर, टोस्टर, क्रॉस पेन्स, बॅग्ज, टपरवेअर ड्बे अशा अनेक भेटवस्तू मिळवल्या आहेत. झालच तर अनेकदा कसल्या ना कसल्या सेल मध्ये वा प्रमोशन मध्ये काही विशिष्ट कार्डाद्वारे खरेदी केल्यास आणखी सूट मिळते . हॉटेलमध्ये चेक इन करताना जर कार्ड असेल तर ते स्वाईप करतात व अंदाजे होऊ घातलेल्या खर्चाईतकी मर्यादा कार्डावर असल्याची खात्री करुन घेतात व विना अनामत दाखल करुन घेतात. जर कर्ड नसेल तर रोख रक्कम अनामत म्हणून जमा करावी लागते

कार्डाची सुरक्षा बर्‍यापैकी असते. जर प्रत्यक्ष खरेदी करत असाल तर पिन टाकावा लागतो आणि ऑन लाईन करत असाल तर सिव्हीव्ही टाकुन वर ओटीपी ही टाकावा लागतो. कार्ड घेताक्षणी मागच्या बाजुला लिहिलेला सिव्हीव्ही लक्षात ठेवून वा अन्यत्र नोंद करुन मग पक्क्या शाइने दिसेनासा करावा. यामुळे कार्ड हरवलं किंवा चोरीला गेलं तरी ते दुसर्‍या व्यक्तीला वापरता येणार नाही. कार्ड फक्त नामांकित व विश्वासार्ह ठिकाणीचा वापरावं, असुरक्षित ठिकाणी ते क्लोन करायचा प्रयत्न होऊ शकतो. अनेक बँका जर कार्डाचा वापर त्यांच्या दृष्टीने असुरक्षित जागी केलेला आढळला तर ते कार्ड रद्द करतात, आपल्याला सूचित करतात आणि ४-५ दिवसात त्याच क्रमांकाचं नवं कार्ड विनामुल्य देतात, मी हा अनुभव घेतलेला आहे. आणखी एक सांगण्यासारखा अनुभव आहे. एकदा दिवाळीच्या सुमारास सलग काही दिवस घरी परतायला उशीर होत असल्याकारणे (कधी कधी कामही करायला लागतं, किमान केल्यासारकहं दाखवावं लागतं) घाईघाईने दिवाळिच्या अगदी दोन दिवस आधी एकाच संध्याकाळी खरेदी आटोपली. अल्पावधीत सलग पाचवं स्वाईप होताच मला बँकेच्या कॉल सेंटरहून फोन आला आणि विचारण्यात आलं की माझ्या कार्डावर पाठोपाठ खरेदी केली जात आहे तेव्हा माझे कार्ड गहाळ झाले आहे किंवा चोरीला गेले आहे की मी स्वतःच वापरत आहे.

अर्थात आपणही योग्य काळजी घेतली पाहिजे.
- कार्डाच्या मागचा सिव्हीव्ही नंबर उडवणे
- कार्ड आपल्या डोळ्यादेखतच स्वाईप करण्याचा आग्रह धरणे, ते कुणाच्या हाती न देणे. हॉटेलमध्ये वेटरकडे कार्ड न देणे. आजकाल कॉर्डलेस स्वाईप मशिन आली आहेत तेव्हा अशी गरज पडत नाही
- आपले एस एम एस किमान तासातून एकदा पाहावेत, आपल्या प्रत्येक कार्ड वापरा बरोबर एस एम एस पाठवला जातो
- कार्ड गहाळ झाल्यास/ चोरीला गेल्यास ताबड्तो ब्लॉक करणे.
- फोनवर कुणालाही कार्ड विषयक कसलीही माहिती न देणॅ
- प्रत्येक स्वाइप नंतर स्लिप चेक करणे, एस एम एस चेक करणे. एकदा १५०० चं पेट्रोल भरल्यावर पंपवरच्या मुलानं १५००० साठी कार्ड स्वाईप केलं होतं.
- टॅप ऑप्शन रद्द करुन घेणे, हा पर्याय खुला ठेवलास आपले कार्ड नकळत स्वाईप केले जाऊ शकते.
- अ‍ॅपवर सुविधा असेल तर ऑन लाईन सुविधा बाद करावी, जेव्हा ऑन लाईन खरेदी करायची असेल तेवड्या पुरती चालु करुन व्यवहार होताच पुन्हा बाद करावी
- पैसे वेळेवर चुकते करणे, विलंब केल्यास बराच भुर्दंड पदतो. अ‍ॅपवर सुविधा असेल तर पैसे चुकते करण्याच्या मुदतीआधी एखाद दिवसची तारिख टाकुन बिल मिळताक्षणीच पेमेंट शेड्युल करणे
- कार्ड खिशात वा पकिटात ठेवताना मागच्या चुंबकिय पट्टीवर चरे, ओरखडे येऊ न देणे

जर सावधतेने व हुशारीने वापरले तर क्रेडित कार्ड अत्यंत सोयीचे व फायद्याचेआहे.

वावरजीवनमानतंत्रअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

क्रेडिट कार्ड आहे म्हणून जास्त खर्च होतो असा माझा अनुभव आहे. मनावर ताबा नसणाऱ्या लोकांनी ह्या पासून दूरच राहावे. बघू पुढच्या महिन्यात emi देऊ असं करत खूप खर्च होतो. अनावश्यक वस्तूंची पण खरेदी होते. कार्ड emergency साठी नक्कीच चांगले आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Aug 2021 - 11:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख माहितीपूर्ण आणि उत्तम आहे. ''क्रेडिट कार्ड आहे म्हणून जास्त खर्च होतो असा माझा अनुभव आहे. मनावर ताबा नसणाऱ्या लोकांनी ह्या पासून दूरच राहावे'' या वाक्याशी लै वेळा सहमत.

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

1 Aug 2021 - 5:22 pm | तुषार काळभोर

''क्रेडिट कार्ड आहे म्हणून जास्त खर्च होतो असा माझा अनुभव आहे. मनावर ताबा नसणाऱ्या लोकांनी ह्या पासून दूरच राहावे'' या वाक्याशी लै वेळा सहमत.
मी या प्रकारात मोडत असल्याने हात आणि तोंड (आणि सिबिल स्कोर) पोळून घेतलं आहे.
क्रेडिट कार्ड अजूनही वापरतो. पण लेखातील सर्व सूचना फर्स्ट हॅण्ड अनुभवातून शिकून वापरतो.

सर्वसाक्षी's picture

1 Aug 2021 - 6:02 pm | सर्वसाक्षी

डॉ साहेब,
नुकत्याच मिळवायला लागलेल्या तरूण तरूणींच्या बाबतीत असं घडू शकतं. पण फार थोड्या.
आपण सहसा खिशात कार्ड आहे म्हणून खरेदी न करता केलेल्या खरेदी साठी रोख देण्याऐवजी कार्ड वापरतो. आपल्याला जाणीव असते की आज उधार मिळालं तरी उद्या पैसे द्यावे लागतील.
आपल्या गाडीचा स्पिडोमिटर २४० किमी पर्यंत चा वेग घेण्याची क्षमता दाखवतो पण तरीही आपण १०० ओलांडत नाही

कंजूस's picture

1 Aug 2021 - 6:48 am | कंजूस

इकडे दुसऱ्या विजुभाऊंच्या लेखात मदनबाणनी प्रतिसादात विडिओ दिलाय तो पाहून 'पटलं नाही' म्हटलं. पण नंतर यूट्यूबवर जाऊन बरेच विडिओ पाहिले. आणि जरा विचार करायला पाहिजे या मताचा झालो. तिथे कार्ड का घ्यावे / घेऊ नये यावर प्रतिसाद आहेत.

तुमच्या या लेखात कार्ड वापरणे, योग्य तऱ्हेने वापरणे याबद्दल अधिक माहिती आहे. तीच मला हवी होती.

"कार्डाची सुरक्षा बर्‍यापैकी असते. जर प्रत्यक्ष खरेदी करत असाल तर पिन टाकावा लागतो आणि ऑन लाईन करत असाल तर सिव्हीव्ही टाकुन वर ओटीपी ही टाकावा लागतो."
तर हे पाहिजे. याचे विडिओ शोधत होतो. म्हणजे की कार्ड हरवले आणि लक्षात नाही आले तर ज्याला मिळाले ते वापरू शकतो का? पिन आणि ओटीपी असतो का? याबद्दल साशंक आहे.
आणखी म्हणजे ओनलाईन पेमेंट मी मोबाईलमधूनच नेट बँकिंग वापरून करतो. तिथे कार्ड डिटेल्स मोबाईलवर ठेवावेत का?

---------------
लेख तुमच्या दीर्घ अनुभवातून लिहिला आहे. धन्यवाद.
एक सुचना करू इच्छितो. - लेखातल्या मुद्यांना क्रमांक टाका म्हणजे त्याचा निर्देश करून शंका विचारता येतील.

सर्वसाक्षी's picture

1 Aug 2021 - 11:03 am | सर्वसाक्षी

म्हणजे की कार्ड हरवले आणि लक्षात नाही आले तर ज्याला मिळाले ते वापरू शकतो का? पिन आणि ओटीपी असतो का? याबद्दल साशंक आहे.

१) प्रत्यक्ष खरेदी करताना पिन टाकावच लाग्तो, जर टॅप पर्याय बाद केला असेल तर. बहुतेक करुन लहान रकमेच्या खरेदीसाठी टॅप सुविधा आहे. म्हणजे ४००-५०० च्या खरेदीकरता कार्ड यंत्रात घाला, मग पिन टाका हे सर्व टाळून झटपट काम होण्यासाठी टॅप म्हणजे कार्ड यंत्रावर टपली मारल्यागत टेकवायचं. यात कसलीही पडताळणी नाही. ज्याला कार्ड मिळेल तो त्याचा वापर करु शकतो पण किरकोळ खरेदीसाठी. उत्तम उपाय टॅप पर्याय काढून टाकणे
२) जरी कार्ड हरवलं किंवा चोरीला गेलं तरी ते ज्याच्या हाती पडेल त्या व्यक्तिला प्रत्यक्ष खरेदीसाठी पिन टाकल्याशिवाय कार्ड वापरता येणार नाही
३) जरी कार्ड हरवलं किंवा चोरीला गेलं तरी ते ज्याच्या हाती पडेल त्या व्यक्तिला जाल खरेदी करताना प्रथम सिव्हीव्ही टाकावा लागेल. बरोबर सिव्हीव्ही टाकला तरच ओटीपी यंत्रणा कार्यान्वित होते, मात्र ओटीपी कार्डमालकाच्या मोबाइलवर येणार तेव्हा त्या व्यक्तिला व्यवहार पूर्ण करता येणार नाही.
४) समजा कार्ड व मोबाईल दोन्ही गोष्टी कुणाच्या हाती पडल्या तरी देखिल जो पर्यंत सिव्हीव्ही टाकत नाही तोपर्यंत व्यवहार होणार नाही. यासाठीच मी सुचवलं आहे की कार्डाच्या मागील बाजूला छापलेला सिव्हीव्ही नाहीसा करावा.

कंजूस's picture

1 Aug 2021 - 12:50 pm | कंजूस

उपयुक्त माहिती. म्हणजे कार्डाचा सिव्हीव्ही काढणे आणि tap बंद करणे सुरक्षिततेसाठी.

मदनबाण's picture

1 Aug 2021 - 9:52 am | मदनबाण

दोन कार्डं घेण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जास्तितजास्त क्रेडिट पिरियड उपभोगता येतो. प्रत्येक कार्ड्चं बिलिंग सायकल वेगळं असतं. म्हणजे एक तारीख ते तीस तारीख किंवा चौदा तारीख ते पुढच्या महिन्याची तेरा तारीख किंवा दहा तारीख ते पुढच्या महिन्याची नऊ तारीख असं. जर बिल १३ तारखेला तयार केलं जात असेल तर साधारण पैसे चुकवायची वेळ तीन आठवड्यांनंतर म्हणजे पुढच्या महिन्याच्या ३ तारखेच्या आसपास असते.
याच बरोबर...
ज्यांना वेगवेगळ्या तारखा लक्षात ठेवण्यास ताप वाटत असेल त्यांनी एकच बिलिंग डेट करुन घ्यावी, बँकेला सांगितल्यास त्या प्रमाणे ते बिलिंग सायकल करुन देउ शकतात. मी ३ कार्ड वापरतो [ जास्त वापर फक्त २ कार्डांचाच करतो. ] त्यांना एकच बिलिंग सायकल ठेवली आहे.
बँकिंग अ‍ॅप मध्ये कार्ड तात्पुरते ब्लॉक करण्याची सुविधा देखील असते, जेव्हा वापरायचे तेव्हा अनब्लॉक करायचे आणि ट्रान्झॅक्शन पूर्ण झाल्यावर परत तात्पुरते ब्लॉक करुन टाकायचे. तुमचे पेमेंट [ ट्रॅन्झॅक्शन ] तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी पोर्टल पेजवर भरल्या शिवाय ते पूर्ण होत नाही [ ऑनलाइन व्यवहारात. ]

तुमची खर्च करण्याची ताकद तुम्हाला नियंत्रित ठेवता आली पाहिजे, हे कायम लक्षात ठेवावे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Kathalikkum Pennin Kaigal | RajheshVaidhya | Ramya Nambessan

कंजूस's picture

1 Aug 2021 - 3:57 pm | कंजूस

माझा ओटीपी येण्याचा नंबर दुसऱ्या android नसलेल्या फोनात आहे तो वाचून भरावा लागतो.

चौकस२१२'s picture

1 Aug 2021 - 3:17 pm | चौकस२१२

कार्डाच्या मागचा सिव्हीव्ही नंबर उडवणे
१) हि कल्पना पहिल्यांदाच ऐकली पण जर अशी खाडाखोड केली आणि कधी हे कार्ड प्रत्यक्ष दुकानात वापराने आले तर काही परिणाम होऊ शकतो का?
तसेच
२) स्वीप ची जी स्मार्ट चिप ची सोय असते ती काढून कशी टाकायची? मी तरी छोट्या आणि मोठ्या दोन्ही खरेदीसाठी स्वाईप करणे वापरतो म्हणजे जर कार्ड कोणाचं हातात पडले तर एकूण कार्डचं बंधांपर्यंत कोणीही खरेदी करू शकतो ? बरोबर?
( बहुतेक जगातील मास्टर आणि वीष चे नियम सारखेचक असावेत हे गृहीत धरले आहे )

सर्वसाक्षी's picture

1 Aug 2021 - 5:40 pm | सर्वसाक्षी

१ सिव्हीव्ही कार्डाला हानी न पोचवतात पक्क्या शाईने झाकला तरी कार्ड अबाधित राहतं. कुणी विचारत नाही पण विचारलंच तर सुरक्षिततेसाठी असं केलं आहे हे सांगा
२ चीपला काहीही करायचं नाही, कार्डं बाद होऊ शकतं. जोपर्यंत स्वाईप आवश्यक आहे तोपर्यंत पिन सुद्धा आवश्यक आहे. मशिनवर पिन टाकताना वर दुसरा हात ठेवा त्यायोगे तुम्ही टाकत असलेला पिन कुणी वाचू शकत नाही वा रेकॉर्ड करू शकत नाही

चौकस२१२'s picture

1 Aug 2021 - 3:19 pm | चौकस२१२

२) जरी कार्ड हरवलं किंवा चोरीला गेलं तरी ते ज्याच्या हाती पडेल त्या व्यक्तिला प्रत्यक्ष खरेदीसाठी पिन टाकल्याशिवाय कार्ड वापरता येणार नाही
३) जरी कार्ड हरवलं किंवा चोरीला गेलं तरी ते ज्याच्या हाती पडेल त्या व्यक्तिला जाल खरेदी करताना प्रथम सिव्हीव्ही टाकावा लागेल.
हो आणि पिन ना टाकता खरेदी ला बंधन असते जसे कि १०० डॉलर

मराठी_माणूस's picture

1 Aug 2021 - 4:00 pm | मराठी_माणूस

टॅप चा पर्याय कसा बंद करायचा ?

सर्वसाक्षी's picture

1 Aug 2021 - 5:45 pm | सर्वसाक्षी

ॲप वर जाऊन मॅनेज कार्ड हा पर्याय निवडा. यात तुम्ही टॅप, एटीएम, ऑन लाईन खरेदी, प्रत्यक्ष खरेदी या सुविधा देशातील वापरासाठी तसेच परदेशातील वापरासाठी चालू वा बंद करू शकता

मराठी_माणूस's picture

1 Aug 2021 - 4:01 pm | मराठी_माणूस

जर क्रेडीट कार्ड कधीच वापरले नाही तर , क्रेडीट स्कोअर तयार होणार नाही, मग लोन घेताना क्रेडीट हिस्टरी कशी तपासली जाते

वामन देशमुख's picture

1 Aug 2021 - 4:15 pm | वामन देशमुख

क्रेडिट कार्डाचे फायदे-तोटे आहेत आणि जबाबदारीने कार्ड वापरल्यास माझ्या मते तोट्यांच्या तुलनेत फायदे जास्त आहेत.

मी अनेक वर्षांपूर्वी नोकरी करत असताना, तेव्हाच्या पगार खाते असलेल्या बँकेचं लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड घेतलं होतं. त्या कार्डाची वापर मर्यादा वेळोवेळी वाढवत नेली आहे.

माझा शक्य तेवढा सर्व खर्च मी क्रेडिट कार्डावरूनच करतो.

नोकॉस्ट् ईएमआइची सुविधा (याला थोडासा चार्ज लागतो), वेगवेगळ्या ऑफर्स्, कॅशबॅक्स्, रिवॉर्ड पॉइंट्स् यांचा लाभ मिळाला आहे.
भारतातली विमानतळांवर लाऊंज एक्सेस मिळाला आहे.
पेट्रोल, डिझेल भरल्यावर पाऊण टक्का रक्कम परत मिळाली आहे.
४९ दिवसांची क्रेडिट मर्यादा मिळते, तिचा पुरेपूर लाभ घेतला आहे.

म्हणजे १४ मेला केलेल्या खरेदीचं बिल १३ जूनला जनरेट होतं आणि मी ते बिल २ जुलैला भरतो.

बचत खात्यामध्ये क्रेडिट कार्डचे बिल शेवटच्या दिवशी भरण्याची सूचना दिलेली आहे म्हणून बिल भरणा विसरणं हा प्रकार होत नाही.

अगदीच आणीबाणीची परिस्थिती वगळता माझ्या बचत खात्यात जेवढे रुपये आहेत त्याच मर्यादेत मी क्रेडिट कार्ड वापरतो.

खर्च करण्याच्या प्रवृत्तीमुळे होणारा अवास्तव खर्च हा एक तोटा वगळता, क्रेडिट कार्डाच्या वापरातील धोके हे इतर सगळ्याच प्रकारच्या बँकिंग मध्ये आहेत.

कार्डावरचा सीवीवी मिटवून टाकणे आणि टॅपिंग् सुविधा (इथे "वायफाय कार्ड" म्हणतात) बंद करणे या सूचना उपयुक्त आहेत लगेच अंमलबजावणी करीन.

हाच प्रतिसाद आधीच्या धाग्यावर ही दिला आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

1 Aug 2021 - 6:44 pm | चंद्रसूर्यकुमार

मी क्रेडिट कार्ड जवळपास गेली १९ वर्षे वापरत आहे. जिथे कार्ड वापरताच येत नाही (उदाहरणार्थ वाण्याचे दुकान, केस कापायचे सलून, भाजीवाले वगैरे) अशा ठिकाणीच मी कॅश वापरतो. अन्यथा सगळी खरेदी कार्डावरच करतो. इतकी वर्षे कार्डाचा भरपूर वापर केल्याने आणि एकदाही बिलाची तारीख न चुकविल्याने बँकेने माझे कार्ड आणि क्रेडीट लिमिट या दोन्ही गोष्टी वाढवून दिल्या आहेत.

आताच्या कार्डावर पॉईंट्स भरपूर मिळतात. तेव्हा ते पॉईंट्स गोळा करायचे आणि विमानाची तिकिटे आणि हॉटेलची बिले यांना वापरायचे हा माझा अगदी आवडता छंद आहे. या दोन गोष्टींसाठी ७०% रक्कम पॉईंट्सवर भरता येते आणि उरलेली ३०% कार्डाने भरायची. एच.डी.एफ.सी बँकेचे स्मार्टबाय म्हणून पोर्टल आहे त्यावरून हे व्यवहार करायचे असतात. त्या साईटवरून कार्डाने भरलेल्या हॉटेलचे बुकिंग-विमानाची तिकिटे यासाठी भरलेल्या रकमेवर कार्डाने भरलेल्या रकमेच्या तब्बल एक-तृतियांश इतक्या रकमेचे पॉईंट्स मिळतात म्हणजे उरलेले ३०% कार्डाने भरले तरी १०% पॉईंट्स मिळतात ते नंतर कधी वापरता येतात. म्हणजे खरं तर एकूण रकमेच्या २०% इतकेच आपल्याला भरायला लागतात. एच.डी.एफ.सी च्या स्मार्टबायमधून अ‍ॅमॅझॉनवर जाऊन खरेदी केल्यास एक षष्ठांश (आणि काही ऑफर चालू असेल तर एक तृतियांश) इतक्या रकमेचे पॉईंट्स मिळतात. जेव्हा कोणतीही खरेदी अ‍ॅमॅझॉनवरून करायची असेल तेव्हा एच.डी.एफ.सी च्या स्मार्टबायमधून अ‍ॅमॅझॉनवर लॉगिन करायचे आणि तिथून भरपूर पॉईंट्स गोळा करायचे. तसेच त्या कार्डावर रेस्टॉरंटमध्ये भरलेल्या बिलावर आणि स्विगी-झोमॅटोवर भरलेल्या बिलावरही नेहमीपेक्षा दुप्पट म्हणजे १५० रूपयांवर १० पॉईंट्स मिळतात. विमा प्रिमिअमवरही मधूनमधून पॉईंट्सची ऑफर चालू असते. हे पॉईंट्स जास्तीतजास्त कसे मिळू शकतील याच्या क्लुप्त्या लढवता येतात. म्हणजे एच.डी.एफ.सी च्या स्मार्टबायमधून एक गिफ्ट कुपन विकत घ्यायचा ऑप्शन आहे. त्यावर अ‍ॅमॅझॉनच्या दरमहा ५००० पर्यंत गिफ्ट कुपनवर जवळपास एक तृतियांश म्हणजे तब्बल १६५० रूपयांचे पॉईंट्स मिळतात. तसे कुपन विकत घेऊन अ‍ॅमॅझॉन पे मध्ये अ‍ॅड करायचे आणि मग त्यावर अ‍ॅमॅझॉन वरील खरेदी होतेच पण त्याबरोबरच उबरचेही बिल भरता येते. असा अ‍ॅमॅझॉन पे वरील बॅलन्स जास्त साठला तर त्यातून विम्याचे प्रिमिअम भरता येतात. तो आकडा चांगल्यापैकीच मोठा असतो त्यामुळे अ‍ॅमॅझॉन पे वरील बॅलन्स वाढला आणि एका वर्षात तो लॅप्स झाला हा प्रकार माझ्याबाबतीत तरी कधी होत नाही. असे थेंबे थेंबे करून पॉईंट्सचे तळे साचवायचे आणि त्यातून विमानाची तिकिटे आणि हॉटेलचे बुकिंग करायचे. फक्त काळजी एक घ्यायची- पॉईंट्स मिळवणे हे 'बाय प्रॉडक्ट' आहे तो आपला मुख्य उद्देश नाही हे कधीही विसरायचे नाही. त्यामुळे पॉईंट्स मिळवायला म्हणून नको असलेल्या गोष्टी कधी विकत घ्यायच्या नाहीत पण त्यांची ऑफर कधी आहे वगैरे गोष्टींवर लक्ष ठेऊन जास्तीतजास्त पॉईंट्स मात्र मिळवायचे.

कार्डाचे पैसे मी बिलाची तारीख यायच्या आधीच भरून टाकतो. म्हणजे दर दहा दिवसांनी त्यापूर्वी दहा दिवसांत केलेल्या खरेदीचे पैसे लगेच भरून टाकायचे. तसेही डेबिट कार्ड वापरून पैसे भरले असते तर लगेच पैसे बँकेच्या खात्यातून गेलेच असते. तोच प्रकार क्रेडीट कार्डाबाबतही करतो. त्यातून व्यवहाराला आपोआप शिस्त लागते आणि नको असलेली खरेदी होत नाही. मला त्यातून ५० दिवस बिनव्याजी पैसे वापरायला मिळत नाहीत. मिळू नको देत. तो माझा उद्देशही नाही. क्रेडीट कार्डाचे पैसे भरतानाही गेल्या दोन वर्षांपासून क्रेड या अ‍ॅपवरून भरत आहे. त्यांच्या अ‍ॅपवरून भरलेल्या क्रेडीट कार्ड बिलावरही ते 'कॉईन्स' (पॉईंट्स सारखी) देतात आणि त्यावरही आपल्याला कॅशबॅक मिळायला लागतो. क्रेड नवीन असताना ते भरपूर कॅशबॅक द्यायचे पण आता ते तितक्या प्रमाणावर कॅशबॅक देत नाहीत. तो प्रकार नवीन असतानाही भरपूर कॅशबॅक त्यांच्याकडून घेतला आहे. ते मला कॅशबॅक द्यायला तयार असतील तर मी का नाकारू?

माझ्या कार्डावर विमानतळावर लाऊंजचा वापर फुकटात करता येतो. त्यामुळे कुठेही विमान प्रवासापूर्वी लाऊंजमध्ये आरामात बसायचे, तिथल्या बफेत मस्त चापायचे आणि मगच विमानात बसायचे असे प्रकार करता येतात. लाऊंजमध्ये केवळ अपेयपान करायचे असेल तरच पैसे भरावे लागतात. बाकी बफेसाठी एक छदामही भरावा लागत नाही. मुंबई, बंगलोर, दिल्ली, कोचीन या विमानतळांवरील लाऊंज मी वापरली आहेत. तिथल्या बफेचा 'स्प्रेड' उत्तम असतो. बंगलोर आणि कोचीन विमानतळावर बफेचा 'स्प्रेड' एखाद्या हॉटेलातील बफेमध्ये असतो तसाच असतो. माझ्या काडावर गोल्फचे लेसनही आहेत. ते अजून वापरलेले नाहीत. अर्थातच मी कोणताही खेळ खेळत नाही त्यामुळे गोल्फ नाही आला तरी काहीही बिघडणार्‍यातले नाही. पण गोल्फ कोर्सवरील हिरवळ, तिथली झाडे हे वातावरण आवडते म्हणून त्या कारणासाठी तरी जायची इच्छा नक्कीच आहे. बघू कधी योग येतो ते.

क्रेडीट कार्डाचा वापर जबाबदारीने केल्यास असे बरेच फायदे मिळू शकतात. पण त्यासाठी कार्डाचा वापर बराच आणि बर्‍याच वर्षांपासून हवा, एकदाही बिल भरायला उशीर करायचा नाही आणि बँकेला आपल्याकडून इतरही बिझनेस मिळायला हवा (उदाहरणार्थ सॅलरी अकाऊंट, एन.पी.एस वगैरे).

माझ्या काडावर गोल्फचे लेसनही आहेत. ते अजून वापरलेले नाहीत. अर्थातच मी कोणताही खेळ खेळत नाही त्यामुळे गोल्फ नाही आला तरी काहीही बिघडणार्‍यातले नाही. पण गोल्फ कोर्सवरील हिरवळ, तिथली झाडे हे वातावरण आवडते म्हणून त्या कारणासाठी तरी जायची इच्छा नक्कीच आहे. बघू कधी योग येतो ते.

+1

आपल्या दोघांकडे सेम कार्ड आहे वाटतं. :)

कंजूस's picture

1 Aug 2021 - 9:11 pm | कंजूस

हे सर्व शिकून घ्यायला पाहिजे. लेट झाला आहे पण कामाच्या गोष्टी. असं काही असतं एवढं कळलं तेही खूप झालं.

जागु's picture

1 Aug 2021 - 10:51 pm | जागु

चांगली माहिती मिळाली.

श्रीरंग_जोशी's picture

2 Aug 2021 - 9:29 am | श्रीरंग_जोशी

या तपशीलवार माहितीसाठी धन्यवाद. या धाग्यामुळे क्रेडीट कार्ड्सबाबत काही लोकांचा तरी दृष्टीकोन बदलेल अशी आशा बाळगूया.
मी कमावता झाल्यावर क्रेडीट कार्डचा पुरेपूर वापर करतो हे कळल्यावर काही आप्तांच्या (बँकेतून निवृत्त झालेले सुद्धा) प्रतिक्रिया अशा होत्या की मी जणू ड्रग्जच्या आहारी गेलो आहे ;-).

चौदा वर्षांपूर्वी मी खालील लेख रेडीफ.कॉमला पाठवला होता अन त्यांनी तो प्रकाशित केला होता.
Credit cards: 'Remember these important dos'.

बादवे क्रेडीट कार्ड बाळगल्याने मोठाले अनावश्यक खर्च होतील ही चिंता मला कधीच वाटली नाही. निम्न-मध्यमवर्गीय कुटूंबात लहानाचा मोठा झाल्याने पैसे जपून खर्च करण्याची शिकवण प्रॅक्टिकलसकट मिळालेली आहे.

क्रेडीट कार्ड्समुळे मिळवत असलेल्या लाभांचा सारांश मी या प्रतिसादात लिहिला आहे.

अमरेंद्र बाहुबली's picture

2 Aug 2021 - 11:18 pm | अमरेंद्र बाहुबली

मी क्रेडिट कार्ड आधी वापरायचो नाही. पण २०१६ साली एक्सिस बँकेचे माय झोन क्रेडिट कार्ड मिळाले. ज्याला कुठलीही वार्षिक फी नाही, फुकट मिळाल्यामुळे मी ते वापरू लागलो.
क्रेडिट कार्डचा फायदा म्हणजे केलेल्या खरेदीवर रेव्हरंड पॉईंट्स मिळतात ज्याचा वापर करून मध्ये मला दोन हजार रुपयांचा reyban गॉगल फुकट मिळाला.
क्रेडिट कार्ड चा फायदा जो कुणीच सांगत नाही पण मला खूप होतो, तो म्हणजे हा "नेहमी आपण काही न काही खरेदी करतच असतो ज्याचे पैसे आपण कॅश ने देतो त्या ऐवजी आपण क्रेडिट कार्ड वापरले तर ते पैसे आपाल्याला पन्नास दिवस वापरायला मिळतात, पण मी सांगतोय तो फायदा हा नाही. क्रेडिट कार्ड वर केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती statement मध्ये असते. उदा. मागच्य महिन्यात मी c टाईप चार्जिंग केबल खरेदी केली ती किती वाजता कुठून किती रुपयात हा सर्व डेटा क्रेडिट कार्ड स्टेटमेंट मध्ये असतो.

ऑनलाईन खरेदी करताना कधीही क्रेडिट कार्ड वापरावे, समज उद्या फ्रॉड झाला तर गेलेले पैसे बँकेचे असतात आपण पोलीस तक्रार देऊन हात वर करू शकतो, बँकेने विचारले तर पोलिसांना विचार हे सांगू शकतो, ह्याउलट डेबिट कार्ड मधून पैसे गेले तर बँकेला काही घेणे देने नसते कारण पैसे आपले गेलेले असतात.
Lounge वगैरे, सिनेमा तिकीट ह्या काही नेहमीच उपयोगात येणाऱ्या गोष्टी नाहीत.

माझ्या मते फुकट मिळणार असेल तर क्रेडिट कार्ड घ्यावे,

मागच्या महिन्यात काही घेणं देणं नसताना एक्सिस बँकेने 1000 रुपये लेट फी म्हणून घेतले, त्यांच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्ररावर फोन केला आणी तक्रार दिली, refund मिळाला.

कंजूस's picture

3 Aug 2021 - 11:50 am | कंजूस

महत्त्वाचे. हे कळलं.