सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. तसेच समाजात धार्मिक वा जातीय तेढ निर्माण करणारं लिखाण आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

कृतघ्न -2

Primary tabs

बाप्पू's picture
बाप्पू in जनातलं, मनातलं
28 Feb 2020 - 8:35 pm

पहिला भाग - https://www.misalpav.com/node/46154

आता पुढे. -

रामदास ने मागे वळून पहिले. साडेपाच फूट उंच, अंगात खाकी वर्दी, खांद्यावर 2 स्टार आणि शिट्टी, हातात एक फाईल घेऊन कोणातरी अधिकारी उभा होता.
प्रत्येक खाकी वर्दीतला माणूस म्हणजे पोलीसच अशी त्याची समजूत होती. घाबरलेल्या नजरेने त्याने त्याच्या हाकेला ओ दिली. जनाबाई आणि दोन्ही पोरे देखील घाबरली. एकतर दोन तीन दिवस सर्वजण अर्धपोटी, खिशात पुरेसे पैसे नाहीत आणि आता हे पोलिसांचे लफडे मागे लागले म्हणून त्याला घाम फुटला.
कारण याआधी दोन तीन वेळा लोकांनी त्याच्याकडून काम करवून घेतले आणि पैसे द्यायची वेळ आली कि चोरीमारीचा खोटा आरोप करून पोलिसांना बोलावले होते. निष्पाप असून देखील पोलिसांचा मार त्याने खाल्लेला होता.
पण त्याला हा माणूस काही वेगळा वाटला. चेहऱ्यावर एक स्मितहास्य आणि आपुलकीचे भाव होते जे आजवर कोणत्याही पोलिसाच्या चेहऱ्यावर त्याने पहिले नव्हते. तो थोडासा सावरला आणि विचारले - काय झालं साहेब.?

त्याची उडालेली घाबरगुंडी अधिकाऱ्याच्या लक्षात आली. " राम राम मामा. माझे नाव माऊली पाटील. या ST स्टॅन्ड चा इनचार्ज. सकाळपासून तुमच्याकडे बघतोय. नेमकी काय अडचण आहे तुमची? कोणते गाव?? आणि कुठं जायचंय?? "
रामदासला खाकी वर्दीतल्या माणसाकडून इतक्या गोड भाषेची सवय नव्हती. त्याचे डोळे पाणावले आणि त्याने आपली अडचण सांगितली.
गरिबी आणि मजबुरी दोन्ही गोष्टी जवळून पाहिलेल्या माउलींनी रामदासला काही पैसे दिले आणि रविवारी तुमच्या कामाची काही सोय करण्याचे आश्वासन देऊन ते तेथून निघाले.

ठरल्याप्रमाणे रविवारी रामदास आणि त्याची बायका पोर सर्वजण स्टॅन्ड वर आले.
आज माऊलींचा सुट्टीचा दिवस. बऱ्याच दिवसांनी ते गावी पुण्याला निघाले होते.
" मामा, तुम्हांला पुण्यात यायला जमेल? तुमची राहण्याची, खाण्या पिण्याची आणि मुलांच्या शाळेची सर्व सोय मी करेल. तुम्हाला महिन्याकाठी पगार देखील देईल. काम फक्त एकच. माझ्या भावाला शेतीकामात मदत करणे. जमेल का?? "
रामदास गोंधळला, एखाद्या खाकी वर्दीवाल्या माणसाकडून त्याने अश्या वागणुकीची अपेक्षा त्याने केली नव्हती. जनाबाई देखील आता आपला नवरा काय बोलेल याकडे लक्ष देऊन होती.. नवरा म्हणेल तीच तिची पूर्व दिशा होती.
रामदासच्या समोर फक्त पोटापाण्याचा प्रश्न होता. रोज रोज कामासाठी वणवण भटकण्यापेक्षा त्याला एका जागी स्थिरस्थावर होण्याची संधी मिळत होती. पण भीती देखील वाटत होती कि तिकडे पुण्याला जाऊन काही वेगळेच झाले तर? कश्यावरुन ह्या माणसावर विश्वास ठेवावा?
पण सरतेशेवटी त्याने होकारार्थी मान डोलावली. या सगळ्या गडबडीत त्याने पगार किती देणार हे देखील विचारले नाही. त्याने नशिबावर विश्वास ठेवून निर्णय घेतला. रामदास, जनाबाई आणि दोन्ही पोरं त्या अधिकाऱ्याच्या मागे निघाली.
सर्वजण गाडीत बसले. राणी आणि सुरेश पहिल्यांदाच इतक्या लांबचा प्रवास करणार होते. त्यांनी पटापट खिडकी शेजारच्या जागा पकडल्या. रामदास देखील थोडासा अवघडून बसला. त्यांच्या शेजारी बसलेल्या माऊलींची थोडी भीती देखील वाटत होती पण हा माणूस आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करेल असा विश्वास वाटू लागला. कुडाळ ते पुणे असा दहा बारा तासाचा प्रवास होता. गाडी निघाली, खिडकीतून सूर्याची सोनेरी किरणे आत येऊ लागली. उगवणाऱ्या सूर्याकडे पाहून आपल्या आयुष्यात आता तरी एक नवीन सुरवात व्हावी अशी प्रार्थना तो करत होता.
रात्री 8:30 वाजता सर्व जण माउलींच्या गावी पोहचले.
सुरेश आणि राणी झोपून गेले होते. जनाबाई आणि रामदास यांना माउलींनी त्यांची खोली दाखवली. दोघानाही नवीन ठिकाणी अवघडल्यासारखे वाटत होते. नवीन गाव, नवे वातावरण, नवी माणसे हे सर्व पाहून आपण इथे राहू शकतो कि नाही याबाबत त्यांच्या मनाची घालमेल होत होती..

रात्री माऊली आणि त्यांचा मोठा भाऊ तुकाराम यांच्यात चर्चा झाली. तुकाराम या निर्णयाच्या विरोधात होते. मी शेतीत काम करत असताना अजुन एक माणूस कशाला? विनाकारण पैसे कश्याला द्यायचे दुसऱ्याला? त्या काळी घरी शेतीकाम करणारा घरगडी असणे म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. गावातील फक्त मोजक्या घरांमध्येच असा कोणी माणूस असायचा.
पण माउलींचा दृष्टिकोन वेगळा होता. पैसे गेले तरी चालतील पण माझ्या भावाला शेतीत जास्त त्रास होऊ नये हीच त्यांची इच्छा होती. तुकाराम अगदी पैलवान गडी, पण 3-4 वर्ष्यापुर्वी धनुर्वात झाला होता. सर्व डॉक्टरांनी हार मानली होती. 1975 साली दळणवळण आणि वैद्यकीय सेवा आजच्या इतक्या प्रगत नव्हत्या. तालुक्याच्या गावी जायचे म्हणले तरी 3-4 तास लागायचे.
अश्या काळी देखील माउलीने प्रयत्नांची शर्थ केली. 72 तास या माणसाची मी कोणतीही गॅरंटी देऊ शकत नाही असे शब्द डॉक्टर च्या तोंडून ऐकल्यावर देखील माऊली खंबीरपणे उभा होता. ते 72 तास त्याच्या आयुष्यातले सर्वात कठीण 72 तास होते. अन्नपाण्याविना तो दवाखान्यात तुकारामाशेजारी बसून होता. तब्बल 3 दिवस बेशुद्ध राहिल्यानंतर जेव्हा तुकारामाच्या तोंडातून "पा" एवढाच शब्द ऐकला आणि तेव्हा त्याने आनंदाने उडी मारली. तो दिवस त्यांच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस होता.
तुकारामाला पुन्हा जास्त शारीरिक कष्ट करावे लागू नयेत म्हणून माऊलीची धडपड होती. त्याला शेतीकामात मदत व्हावी म्हणून त्यांनी आज रामदास ला पुण्याला आणले होते.
बराच वेळ चर्चा केल्यानंतर शेवटी तुकारामने माऊलीचे म्हणने ऐकले. रामदास ला आपल्या शेतीत काम करायला ठेवण्यास तो तयार झाला. त्याच्या दृष्टीने हि एक प्रकारची चैन होती तर माऊलीच्या दृष्टीने हि आपल्या भावाची काळजी होती. त्याचबरोबर एका असहाय माणसाला आणि त्याच्या कुटुंबाला मदत करण्याची इच्छा देखील होती.

रामदास भल्या पहाटे उठला, जनाबाई आणि पोर अजुन झोपलेलीच होती. काल पहिल्यांदा त्यांनी एवढा प्रवास केला होता. आज कामाचा पहिला दिवस, माऊली आणि तुकाराम यांनी त्याला सर्व जबाबदारी समजावून सांगितली, शेती दाखवली, गुरे आणि आणि गोठा दाखवला.
मनासारखं काम आणि राहायला पक्क घर मिळाल्यामुळे रामदास आणि जनाबाई दोघेही खुश होते.

दिवसामागून दिवस गेले, रामदास जनाबाई आणि मुले आता गावात रमली. मोठी होता होता दोन्ही मुलांनी शहराकडे धाव घेतली. सुरेश पुण्यात काहीतरी काम धंदा करत होता, आणि राणी चे लग्न झाले होते. दोघेही आता गावात क्वचितच येत. पण रामदास आणि जनाबाई दोघांनी मात्र गाव सोडले नाही. पुढे कालांतराने जनाबाई अल्पश्या आजाराने दगावली. तिच्या शेवटच्या क्रियाकर्माला देखील दोन्ही पोर आली नाहीत. खूप वाईट वाटले त्याला. पण करणार काय.? जड अंतःकरणाने त्याने जनाबाई चे क्रियाकर्म केले. अश्या वेळी त्याच्यासोबत फक्त माऊली आणि तुकारामच होते.
माऊली आणि तुकाराम यांची कुटुंबे आता वाढली होती घरी सुना आल्या होत्या. घरातील मुलींची लग्ने झाली होती..
सर्व लग्नांमध्ये रामदासला देखील सख्या मामासारखं वागवलं होत. मान सन्मान होता. अगदी पत्रिकेत सुद्धा त्यांचं नाव मामा म्हणूनच
टाकले जायचे. रामदास ने देखील अगदी आपल स्वतः च घर असल्यासारखे त्या घरात काम केले. तुकारामना शेतीत सर्वतोपरी मदत केली. माऊली जेव्हा कधी गावी यायचे तेव्हा त्याचा पगार आणि इतर खर्चासाठी पैसा मिळायचा. क्वचित प्रसंगी ब्रँडेड दारू देखील मिळायची. साठवलेल्या पैश्यातून त्याने गावात 2 गुंठे जागा देखील घेतली होती. माऊली, तुकाराम यांच्या घरासोबत त्याची देखील प्रगती होत होती. आता पाटलांच्या घरासोबतच रामदास ला देखील लोक सन्मानाने ओळखू लागले होते. सर्व काही मजेत चालेलं होते. यामध्ये थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 35 वर्षे उलटली.
पण प्रत्येक गोष्टीला अंत असतो असे म्हणतात तेच खरं..
लवकरच दिवस बदलणार होते..

क्रमश:

कथाप्रकटनविचारलेखअनुभव

प्रतिक्रिया

विनिता००२'s picture

29 Feb 2020 - 11:32 am | विनिता००२

वाचतेय.

तिच्या शेवटच्या क्रियाकर्माला देखील दोन्ही पोर आली नाहीत. >> का? कारण नीट्स कळलं नाही.

बाप्पू's picture

4 Mar 2020 - 8:44 am | बाप्पू

पुढील भागात मध्ये याची उत्तरे मिळतीलच.
पण आई वडील आणि मुले यांच्यात जे काही प्रेमाचे नाते असते ते त्यांच्यात कधी निर्माण झालेच नव्हते. रोजची भूक आणि पोट भरण्यासाठी होणारी धावपळ याव्यतिरिक्त त्यांनी काही पहिलेच नव्हते.

जेव्हा ती कळत्या वयात आली तेव्हा त्यांनी शहराचा मार्ग धरला आणि तिकडचेच होऊन गेले. ज्याप्रमाणे चिमण्यांची पिले मोठी झाल्यावर मागे वळून घरट्याकडे पाहत पण नाहीत त्या प्रमाणे ती दोघे देखील शहरात निघून गेल्यावर परत आईबापाकडे आलीच नाहीत.

सुबोध खरे's picture

4 Mar 2020 - 7:19 pm | सुबोध खरे

सुंदर लेखन

कुमार१'s picture

4 Mar 2020 - 7:43 pm | कुमार१

वाचतोय.

बाप्पू's picture

5 Mar 2020 - 12:29 am | बाप्पू

विनिता, डॉ. खरे सर आणि डॉ कुमार 1,
सर्वांचे धन्यवाद.

इतकी वाचने होऊन सुद्धा प्रतिसाद हवे तेवढे मिळत नसल्याने थोडा विचारात पडलो होतो कि जे काही लिहितोय ते इतरांनी वाचण्यालायकीचे आहे कि नाही. लोकांपर्यंत माझे शब्द पोचतायेत कि नाही, पण तुमचे प्रतिसाद पाहून हायसे वाटले.
सुबोध खरे आणि कुमार 1 दोघांचाही लिखाणाचा मी पंखा आहे. तुम्हा दोघांचे प्रतिसाद पाहून थोडा हुरूप आला. आणि मग आज तिसरा भाग लिहायला घेतला.
या पुढचे काही भाग हे तुमच्या क्षेत्रातील असल्याने तुम्हाला जास्त रिलेट होतील..

शा वि कु's picture

5 Mar 2020 - 9:40 am | शा वि कु

पुभाप्र

बाप्पू's picture

5 Mar 2020 - 12:18 pm | बाप्पू

शा वी कु,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तिसरा भाग इथे वाचू शकता -
https://www.misalpav.com/node/46183#comment-1058738