डिप्रेशन

nishapari's picture
nishapari in जनातलं, मनातलं
10 Aug 2019 - 7:43 pm

डिप्रेशनची कारणं असंख्य आहेत . आयुष्याच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात म्हणजे - शिक्षण , नोकरी , अर्थार्जन , विवाह / संसार यात आलेलं अपयश हे कारण तर सर्वज्ञात आहे .

पण डिप्रेशनचं दुसरंही एक तितकंच प्रभावी कारण म्हणजे अपराधीपणाची भावना , गिल्ट हेही असतं हे कदाचित कमी लोकांना माहीत असेल .. म्हणजे जे त्या अनुभवातून गेलेले नाहीयेत असे इतर डिप्रेशन फ्री हेल्दी लोक ...

काहीवेळा वरच्या कारणाशी ते निगडीत असतं तर काहीवेळा स्वतंत्र ... म्हणजे आर्थिक फटका बसला किंवा शिक्षण / अर्थार्जनाचा मार्ग सापडण्यात अपयश आलं तर त्या अपयशापेक्षा आपण आपल्या घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही / त्यांचा अपेक्षाभंग केला याचा भार अधिक असह्य वाटतो ... आपल्यामुळे त्यांना आता समाजात , कुटुंबात मान खाली घालावी लागेल / लागत आहे या आणि अशा विचारांचं दडपण येतं ...

दुसरं गिल्ट म्हणजे आपल्याहातून फार मोठी चूक घडली , या चुकीला क्षमा नाहीच , हे आपलं आपणच ठरवून टाकतात आणि तो भार घेऊनच प्रत्येक दिवस काढायचा ... दुसऱ्याला माफ करणं ही मोठी गोष्ट आहे म्हणतात ... ती आहेच .. पण स्वतःलाही माफ करायला जमलं पाहिजे ... स्वतःला माफ करणं म्हणजे अपराध नव्हे किंवा निगरगट्टपणाही नव्हे . मानसिक आरोग्यासाठी ती अत्यावश्यक गोष्ट आहे .

2 - 3 वर्षांपूर्वी एका सुसाईड हेल्प वेबसाईटवर एका चोवीस - पंचविशीच्या मुलीने आपली समस्या लिहिली होती . त्यात तिने माझ्या हातून भयंकर गोष्ट झाली आहे , ज्याची कुणी कल्पनाही करणार नाही अशी, क्षणाक्षणाला माझी चूक माझा जीव जाळत आहे .. तुम्ही ऐकलंत तर तुम्हीही म्हणाल किती विकृत वागणं आहे हे , लज्जास्पद कृत्य घडलं आहे .. मला स्वतःचाच तिरस्कार वाटत आहे .. माझी जगायची लायकीच नाही , जीव द्यावासा वाटत आहे ... अशी बरीचशी प्रस्तावना केली होती ...

ते सगळं वाचून - मानवतेला काळीमा फासणारा काहीतरी भयंकर अपराध तिच्या हातून घडला असावा अशी माझी जवळजवळ खात्री झाली आणि मी पुढे वाचायला घेतलं .

लहान असताना म्हणजे 10 - 12 वर्षं वगैरे .. तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला ... वडलांनी बहुधा आर्थिक जबाबदारी नाकारली किंवा ती पेलायला ते सक्षम नव्हते .. ही मुलगी स्वतः , लहान बहीण आणि आई यांना स्वतःचं राहतं घर सोडून आईच्या बहिणीच्या आधाराला जावं लागलं ... पुढे आईने कशीतरी उदरनिर्वाहाची , अर्थार्जनाची सोय केली ... पण एकूण परिस्थिती ओढगस्तीचीच होती ... त्यामुळे तारुण्य विनाटेन्शन - मुक्त असं गेलं नाही ... थोडंस खडतरच होतं ... आईवर दोन मुलींची जबाबदारी होती ... शिक्षण संपवून ही मुलगी आता नोकरीला लागली .. म्हणजे लागावंच लागलं ... घराला आधार देण्यासाठी .. बहिणीची जबाबदारी होती ... आर्थिक परिस्थिती आता बऱ्यापैकी स्थिरावली आहे .. तो प्रॉब्लेम नाही . ऑफिसमध्ये साधारण आईच्या किंवा जरा अधिक वयाच्या एका महिला कलीगशी हिची मैत्री झाली . त्या बाई हिला आपल्या मुलीसारखं वागवत होत्या .. कदाचित हिचं काहीसं कष्टाचं बालपण समजल्यामुळे जरा अधिकच सहानुभूतीने ..

मध्यंतरी हिची आई आजारी पडली .. बहुधा कॅन्सर .. हिला सुट्टी घेऊन जावं लागलं .. ट्रीटमेंट सुरू झाली .. परत नोकरीच्या ठिकाणी जॉईन झाली .. ट्रीटमेंट दीर्घकाळ चालणार होती ... या काळात तर त्या बाईंनी तिला पंखाखालीच घेतलं , खूप आधार दिला . आईचा आजार सुदैवाने लवकर डिटेक्ट झाला असावा , ती बरी होऊ लागली .. पण इकडे मात्र हिने आईची तब्येत बिघडत चालली आहे असंच सांगणं चालू ठेवलं .. आई पूर्ण बरी झाली .. हे सांगितल्यावर ह्या बाईंचं मायेने वागणं कमी होईल ह्या धास्तीने हिने चक्क आई वारली असं सांगितलं ... सगळं सांत्वन करून घेतलं , रडली त्या बाईंपुढे ... आताही त्या खूप प्रेमाने , मायेने वागतात तिच्याशी ... हिला आपलं वागणं चूक आहे हे समजत होतं , आर्थिक वगैरे काहीही फायदा नव्हता , किंवा ऑफिसचं काम टाळणं असाही काही हेतू अजिबात नव्हता .... पण ते सांत्वन , आधार तिला आवडत होतं ... ते चूक आहे हे समजूनही .. आणि ते थांबू नये म्हणून एवढं मोठं खोटं बोलायचं धाडस तिने केलं .

आता आपण केवढं मोठं खोटं बोललो आहोत , आपल्याशी चांगुलपणाने वागणाऱ्या बाईची फसवणूक केली आहे आणि आई जिवंत असताना ती वारली असं अत्यंत हीन दर्जाचं खोटं बोलणाऱ्या आपण किती स्वार्थी आणि जगायलाच नालायक व्यक्ती आहोत ह्या विचाराच्या गिल्टने तिचं मन आतल्याआत जळत आहे .. एवढं की जीव द्यावा कारण आपण जगण्यास लायकच नाही हा विचार तिच्या मनात प्रबळ झाला . आता खरं सांगितलं तर त्या बाईंच्या नजरेत आपण पडू , त्या संबंध तोडतील , परत आपल्याशी बोलणारही नाहीत अशा भीतीमुळे तिच्यात सत्य सांगायचं धैर्यही नाही .

ह्या मुलीचं हे खोटं बोलणं ही ओके गोष्ट नक्कीच नाही आहे पण कुठलाही सायकीऍट्रीस्ट - मनोव्यापारतज्ज्ञ किंवा कुठलाही बऱ्यापैकी संवेदनशील माणूससुद्धा तिची बॅकग्राऊंड ऐकल्यावर सहज समजून घेईल की जबाबदारीच्या ओझ्याखाली आईच्या वागण्यातलं मार्दव , प्रेम काहीसं हरवलं असावं , प्रॅक्टीकल वागावं लागलं असेल आईला जास्त , जेवढा आधार लेकीला हवा होता मोठं होताना तो द्यायला आईला जमलं नाही किंवा इतर कुणाकडूनही तो मिळाला नाही तेव्हा जिथे कुठे निरपेक्ष माया , प्रेम मिळालं तिथे तिने ते घट्ट धरून ठेवलं ... तो तिला सांगेल - " की बाई गं तुझ्या मनाला आधाराची गरज होती आणि तो जिथे मिळाला त्यावेळी तो त्याला सोडवेना ... त्यासाठी स्वतःला इतका दोष देऊन जीव जाळून घ्यायची काही गरज नाही , फरगिव्ह युवरसेल्फ , माफ कर स्वतःला .."

जीव देण्याएवढा किंवा स्वतःला भयंकर असह्य मनस्ताप करून घेण्याएवढा हा अपराध नाही हे आपल्याला समजतं ... पण स्वतःच्या हातून घडलेल्या चुकांना अजिबात सहानुभूतीने न बघता हरघडी स्वतःला त्याची शिक्षा करून घेणारे लोकही असतात .. मनस्ताप करून घ्यायचा ... जणू काही तो मनस्ताप म्हणजेच यांच्याहातून घडलेल्या चुकीची स्वतःच स्वतःला दिलेली शिक्षा आहे .. आणि तो असह्य झाला की आत्महत्या ही अंतिम शिक्षा किंवा मनस्तापाच्या शिक्षेतून सुटका व्हावी यासाठी आत्महत्या हा मोकळे होण्याचा , मुक्त होण्याचा मार्ग ...

खुनासारख्या गुन्ह्याच्या गुन्हेगारालाही आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते , निर्दोषत्व सिद्ध करण्याची संधी दिली जाते ... आणि सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मग शिक्षा ठरवली जाते ... गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे का , गुन्हा कोणत्या परिस्थितीत घडला , गुन्हेगाराचं वय काय , गुन्हेगार मानसिकदृष्ट्या नॉर्मल आहे का गुन्हा आत्मसंरक्षणासाठी घडला की अन्य कारणामुळे .. सगळ्या बाबी लक्षात घेऊन मग फाशी की जन्मठेप की 20 / अमुक वर्षं शिक्षा / बालसुधारगृहात पाठवायचं की मेंटल हॉस्पिटलमध्ये ... सगळ्या बारीकसारीक बाबी लक्षात घेऊन शिक्षा ठरवली जाते .. तिथेही वर अपीलची मुभा असते आणि चांगल्या वर्तणुकीसाठी शिक्षेत थोडीफार सूट एवढा सहानुभूतीने विचार केला जातो .

आणि गिल्टपोटी आत्महत्या करणारे लोक स्वतःच्या कुठल्याशा चुकीला अक्षम्य भयंकर गुन्हा ठरवून डायरेक्ट मृत्युदंडाची शिक्षा स्वतःची स्वतःला ठोठावून मोकळे होतात ...

दुसऱ्याच्या एखाद्या चुकीला गुन्हा ठरवणारे लोक काही कमी नाहीत ... वरच्या मुलीचं वागणं हे मानवतेला लाज आणणारं वगैरे नक्कीच नव्हतं . आता माणुसकीला खरोखरच लाज आणणारं एक उदाहरण घेऊया आणि त्यात तरी आत्महत्या हा बरोबर चॉईस होता का याचा विचार करू .

एक प्रसिद्ध फोटो आहे - सुदान इथे पडलेल्या भयंकर दुष्काळात एक अशक्त , हाडांचा सापळा झालेलं बाळ ग्लानीत पडलं आहे आणि ते कधी मरतं आणि आपलं भोजन बनतं याची वाट पाहत एक गिधाड जवळ बसलं आहे .... या फोटोबद्दल हा फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर केविन कार्टरला बरीच ऍवॉर्ड्स मिळाली... यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एकाने त्याला प्रश्न विचारला - त्या छोट्या मुलीचं काय झालं ? त्याने उत्तर दिलं - ते मला माहित नाही , मी फोटो काढला आणि निघून आलो .... प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीने उत्तर दिलं - त्या वेळी तिथे एक नाही तर दोन गिधाडं होती , एक ते आणि एक तू ..... कार्टरचं मन त्याला आतल्या आत खाऊ लागलं आणि आपण राक्षस आहोत , मॉन्स्टर आहोत हा विचार पक्का झाला , भयंकर डिप्रेशन आलं .. फोटो काढल्यानंतर तीन महिन्यांनी त्याने आत्महत्या केली .

हा माणूस गिधाड / मॉन्स्टर म्हणण्याच्या लायकीचा असता तर त्याला आपल्या चुकीची जाणीवच झाली नसती , ना अपराधीपणाची भावना निर्माण झाली असती . दुर्दैवाने जन्मापासून , मोठे होऊन त्या पत्रकारपरिषदेपर्यंत त्याच्यातली संवेदनशीलता मेलेली होती किंवा खरं म्हणजे जागृतच झालेली नव्हती असं धरून चालू ..... पण ज्यावेळी ती जागृत झाली ; ज्यावेळी तो खऱ्या अर्थाने माणूस बनला त्यावेळी तीच संवेदनशीलता त्याच्या मृत्यूस कारणीभूत व्हावी हा केवढा दैवदुर्विलास ..... जी चूक झाली तिचं परिमार्जन करणं त्याला शक्य नव्हतं का ? यापुढच्या आयुष्यात कमाईतला अर्धा हिस्सा किंवा काटकसरीने जगण्यापूरता पैसा स्वतःकडे ठेवून उरलेली पै न पै दुष्काळग्रस्त , युद्धग्रस्त मुलांच्या अन्नासाठी , औषधोपचारासाठी देईन हा निश्चय करून जगला असता तर परिमार्जनाचं समाधान मिळालं नसतं का ? मी जगायला लायकच नाही , हे ठरवून टाकायची एवढी घाई का केली ?

गिल्ट पलीकडे आत्महत्येची आणखी कारणं म्हणजे - "आता सुटका हवी आहे , आणखी सहन होत नाही ..."

काय सहन होत नाही एवढं ? खायला दाणा नसलेल्या शेतकऱ्याने किंवा जिला माहेरी परतायची सोय नाही , सासरी सगळे छळ मारहाण करत आहेत , कुणाचाही आधार नाही अशा बाईने - आता सहन होत नाही म्हणणं ठीक आहे ... ज्यांच्यावर भयंकर संकट आलं आहे ज्यातून सुटकेची काही आशाच नाही त्यांनी " आता सहन होत नाही " म्हणणं ठीक आहे ... ज्यांच्या डोक्यावर छप्पर आहे , दोन वेळच्या जेवणाची चिंता नाही , शरीर धडधाकट आहे , नोकरी धंदा नीट चालत नसला किंवा बेकार असले तरी उदरनिर्वाह कसातरी ठीकठाक चालतो आहे , अगदीच काही घर गहाण टाकायची किंवा कुणाकडे हात पसरण्याएवढी वेळ आलेली नाही अशी लोकं , कॉलेजातली मुलं , नुकतेच नोकरी धंद्याला लागणारे तरुण - " सहन होत नाही " म्हणत डिप्रेशनग्रस्त होत आहेत .

हे म्हणणं असंवेदनशील वाटेल पण तसं नाहीये .. आपल्याकडे दोन टोकं दिसून येतात . एक म्हणजे डिप्रेशनसाठी डॉक्टरकडे जाण्याची , समुपदेशन घेण्याची गरज आहे सांगितलं की - म्हणजे ' माझ्या / आमच्या अमुकच्या डोक्यावर परिणाम झालाय असं म्हणायचंय का तुम्हाला " असं म्हणून संतापणारे आणि दुसरीकडे डिप्रेशन हा आजार आहे हे स्वीकारलेले पण तो बरा होणारच नाही , आपण असेच राहणार असं स्वतःला पटवून देऊन वर्षानुवर्षे डिप्रेस राहणारे ...

डिप्रेशन हा आजारच आहे . बऱ्याचवेळा डिप्रेशनग्रस्त किंवा आत्महत्या करू इच्छिणारे - सुसाईडल लोक ... डिप्रेशन हा आजार आहे आणि ट्रीटमेंटने बरा होण्यासारखा आहे , हे मान्य करायला साफ असहमत असतात .... बराच काळ मनाची एक विशिष्ट अवस्था राहिल्यामुळे किंवा दिवसातला / महिन्यातला बराच काळ ती विशिष्ट अवस्था असल्यामुळे - तीच नॉर्मल आहे आणि तेच आपलं अगदी लॉजिकल , विचारपूर्वक आलेलं , अनुभवांती झालेलं मत आहे , त्याचा डिप्रेशनशी काही संबंध नाही असं पक्कं धरून चालतात .... विशिष्ट अवस्था म्हणजे -

1. मी का जगत आहे , अमुक गोष्टीचं दुःख मला असह्य होत आहे /

2. अमुक जबाबदाऱ्या / ओझी / अपेक्षा मला आता अगदी सहन होत नाहीत ,

3. मी मेलो तर सगळे सुटतील तरी , मी नसण्याने कोणाला काही फरक पडत नाही उलट त्यांची आयुष्य अधिक सुसह्य होतील ,

4 . अमुक गोष्टीचे जे काही परिणाम होणार आहेत त्यात माझ्यामुळे सगळ्यांचा अपेक्षाभंग होणार आहे तो माझ्याने बघवणार नाही , मला ते सहन होणार नाही , त्यापेक्षा मी इथे नसलेलंच बरं ,

5 .मला आयुष्यातून अजिबात सुख मिळत नाही आहे तर असं दुःखात जगण्यात काय अर्थ आहे , हे काय जगणं आहे का यापेक्षा मेलेलं काय वाईट ....

6 . मी अपयशी झालेलो आहे , मला असं अपयशी आयुष्य नको .

7 . माझ्याबरोबरच असं का झालं , मला हे सहन होत नाही ...

यापैकी एक किंवा अधिक आणि आणखी याच प्रकारचे विचार डिप्रेस माणसाच्या मनात जागेपणीच्या , कॉन्शस विचाराच्या बहुतेक वेळात घोळत असतात . त्यामुळे तेच त्याला नॉर्मल / आपले स्वतःचे नैसर्गिक विचार वाटतात .... औषध घेऊनही डोकं किंवा पोट दुखत असेल तर डॉक्टरकडे जाऊन स्कॅन करून घेता येतं , रक्ताच्या तपासण्या करून घेता येतात .. अमुक ठिकाणी बिघाड झाला आहे , रक्तात अमुक कमी झालं आहे ... पण मेंदूत , शरीरात हार्मोन्सचा एक बॅलन्स असतो , त्यातली विशिष्ट रसायनं निर्माण झालीच नाहीत किंवा जी कमी प्रमाणात निर्माण व्हायला हवीत ती जास्त प्रमाणात झाली , जी जास्त व्हायला हवी ती कमी प्रमाणात झाली की मेंदूचा बॅलन्स बिघडतो ... हे सामान्य लोकांना माहीत नसतं .. त्यामुळे मनाशी निगडित कोणताही इम्बॅलन्स कडे - डोक्यावर परिणाम या दृष्टीने पाहिलं जातं .... खुद्द ती व्यक्ती स्वतः जेव्हा - मला काहीही झालेलं नाहीये असं इतरांना आणि स्वतःला ठासून सांगत असते तेव्हा - माझ्या डोक्यात काहीही बिघाड झालेला नाही असंच तिला म्हणायचं असतं .... कारण मानसिक आजार म्हणजे काहीतरी फार भयंकर अशीच समजूत बहुतेक जनतेत आढळते शिवाय आपले विचार हे केवळ काही हार्मोन्स किंवा रसायनांचा परिणाम आहेत याबद्दल अज्ञान असतं .

या रसायनांचा माणसाच्या वर्तनावर होणारा परिणाम सखोल सांगणारी अनेक पुस्तकं आहेत .. मी वाचलेल्या एका पुस्तकातलं उदाहरण - उंदरांवरच्या प्रयोगात - कुमारी उंदरी या पिलांप्रती आक्रमक असतात ... पण जर त्यांना ऑक्सीटोसीन हे रसायन टोचलं तर त्यांच्यात मातृत्वाची भावना जागृत होते आणि पिलांना जवळ घेऊन त्या आईसारखी त्याची काळजी घेतात , बसायला घरटं वगैरे करून ... माणसाच्या किंवा एकूण एक प्राण्यांचं हरेक वर्तन हे कुठल्या ना कुठल्या हार्मोनचा परिणाम असतं ... प्रेमात पडल्यावर शरीराच्या होणाऱ्या रिऍक्शन्स - कानशिलं तापणं , धडधड होणं , श्वास जोरात येणं या सगळ्या गोष्टी फेनिलेथिलेमाइन PEA हे हार्मोन निर्माण होतं त्याच्या रिऍक्शन्स असतात .... मूल जन्माला येताना आणि नंतर दूध पाजताना आईच्या शरीरात ऑक्सीटोसीन हे हार्मोन निर्माण होतं - त्यामुळे त्या प्रसववेदना झाल्या तरी तिच्या मनात मुलाविषयी वात्सल्य निर्माण होतं आणि त्याची काळजी घेण्याची , रक्षण करण्याची इच्छा उपजते जी आयुष्यभर टिकते ... जर काही कारणामुळे हे हार्मोन निर्माणच झालं नाही तर आईला त्या बाळाविषयी कितपत वात्सल्य उपजेल शंकाच आहे , कदाचित ते मूल तिला गळ्यात घेतलेली जबाबदारी ,पायावर पाडून घेतलेला धोंडा किंवा ओढवून घेतलेला त्रासही वाटू शकतो ..... यात तिचा दोष नाही पण तरी तिला गिल्टी वाटू शकतं असं वाटल्याबद्दल.... किंवा जवळचे लोक - "अशी कशी गं आई तू" टाईप निर्भर्त्सना करून तिच्या मनात गिल्ट निर्माण करू शकतात ... पण खरं म्हणजे यात तिचा दोष असत नाही .... म्हणजे सर्वात श्रेष्ठ , पवित्र वगैरे असं मानलं जाणारं आईचं प्रेमसुद्धा हार्मोनचा खेळ आहे . तेव्हा व्यवस्थित जगण्यासाठी हा हार्मोन्सचा बॅलन्स असणं , ते योग्य वेळी , योग्य त्या प्रमाणात निर्माण होणं खूप गरजेचं आहे .

हिमोग्लोबिन कमी झालं म्हणून अशक्तपणा आला याची जर आपल्याला लाज वाटत नाही तर इतर हार्मोन - रसायनं कमी जास्त झाल्यामुळे मनाचा तोल बिघडला यात लाज / कमीपणा / भयंकर काहीतरी झालं आहे असं वाटून घेणं हा वेडेपणा आहे .... मलाच का / मीच का हा प्रश्न निरर्थक आहे ... अख्ख्या फॅमिलीत किंवा ओळखत असलेल्या सगळ्या लोकांमध्ये माझंच का अपेंडीक्स वाढलं असा प्रश्न कोणी विचारत नाही तर माझ्याच मेंदूत थोडासा इम्बॅलन्स झाला तर तो एवढा मानाचा नि प्रतिष्ठेचा प्रश्न का बनवायचा ....

खरं तर सर्दीपासून कँसर पर्यंत कुठल्याही शारीरिक आजाराला कुटुंब , नातेवाईक , ओळखीपाळखीचे लोक सगळ्यांची मदत , सहानुभूती मिळते पण जरा मानसिक आजाराची चाहूल लागली की एकतर थेट - डोक्यावर परिणाम झालाय किंवा काही नाही हो नाटकं करत असेल ह्या प्रतिक्रिया उमटतात .... अशा कंडिशन मध्ये त्या त्रास होणाऱ्या व्यक्तीची काय बिशाद की मदत मागेल कोणाकडून .... मग एकट्यानेच सहन करत राहायचं आतल्या आत ....

पण " हे तुझे खरे विचार नाहीत , मेंदूतल्या थोड्याशा केमिकल लोचामुळे आलेले विचार आहेत " हे त्याला समजावून देणारी व्यक्ती हजर असेलच असं नाही .. आणि हजर असली तरीही ती डिप्रेशन झालेल्या व्यक्तीला ते पटवून देऊन शकेलच असंही नाही .. आपले विचार हे आपले नाहीतच हे स्वीकारणं सगळ्यांना जमेलच असेल नाही . शरीरातल्या एखाद्या अवयवाला झालेला आजार सहज ओळखता येतो पण मन हा शरीराचा फक्त एक भाग आहे , मी म्हणजे फक्त मन नाही ... माझे हात , माझे पाय तसंच माझं मन , मी म्हणजे मन नाही ... हेच मुळात मान्य करायला जड असल्याने स्वतःची आयडेंटिटी आणि मनाचे विचार यात फरक करणं कठीण जातं ..

वर लिहिलेले 7 प्रकारचे विचार दीर्घकाळ मनात घोळत असतील तर कुठलंतरी हार्मोन बिघडलं आहे हे समजून जा ... " हार्मोन बिर्मोनचा काही संबंध नाही , हे 100 % माझेच्च विचार आहेत " असं म्हणणं म्हणजे डॉक्टर - " तुमच्या रक्तातलं आयर्न कमी झाल्याने अशक्तपणा जाणवत आहे , अमुक गोळी घ्या" असं सांगत असताना - आयर्न वगैरे काही नाही हो , आता वय झालं ना माझं त्यामुळे अशक्त वाटत आहे , गोळीने काय होणार .. असा अडाणी विचार करणं आहे .

आधी मनात बिघाड होणं यात काहीही लाज वाटण्यासारखं - कमीपणा - मानहानी मानण्यासारखं काही नाही , शरीरात जसे बिघाड होतात त्यातलाच तो प्रकार आहे .... मन म्हणजे खरंतर शरीराचा एक अवयवच आहे - मेंदू . नाहीतर मेंदू पर्यंत ठराविक रसायनं पोहोचतील याची व्यवस्था केल्यावर मनाच्या अवस्था पालटल्या नसत्या .... ( अगदी सोपं उदाहरण म्हणजे मेंदूपर्यंत उत्तेजक पेयाची किक बसली की सशाहून भित्रा माणूस गर्जना करायला लागतो , एकदम शूरवीर होतो ) मन हे मेंदूला दिलेलं दुसरं नाव आहे , बाकी काही नाही ... ते योगामधलं मन - चित्त वगैरे ते वेगळं .. ते योगी लोक ते अनुभवत असतील नसतील.... पण सामान्य आणि बहुसंख्य माणसांपुरतं बोलायचं झालं तर मेंदू म्हणजेच मन , मेंदू शरीराचा भाग आहे आणि जसं फुफ्फुस / किडनी / पचनसंस्थेत काही दोष निर्माण झाले तर त्यात लाज वाटण्यासारखं काही नाही तसेच मेंदूत काही दोष निर्माण झाले तर लगेच कमीपणा मानण्यासारखं काही नाही .... वेड लागणं हा खरोखर भयंकर प्रकार असतो , त्याची जनमानसात भीती असणं साहजिक आहे पण मनातल्या कुठल्याही बारीकसारीक बिघाडाला थेट वेड ठरवणं म्हणजे - खोकला झालेल्या माणसाला घशाचा कँसर झाला समजण्यासारखं आहे .
डिप्रेशन , जगण्यात अर्थ नाही , का जगायचं असे प्रश्न पडणं ही मनाची नैसर्गिक अवस्था नाही ....तो आजार आहे हे स्वीकारणं .. आणि सर्दी हा आजार जेवढा कमीपणा वाटून घेण्यासारखा नाही तेवढाच डिप्रेशन मध्येही काडीचा कमीपणा वाटून घेण्याचं कारण नाही हे स्वतःशी पूर्ण स्वीकारणं ही पहिली पायरी आहे .

तेव्हाच ट्रीटमेंट किंवा पथ्य या दुसऱ्या पायरीकडे जाता येईल.... शरीराच्या आजारालाही प्रत्येकवेळी औषधानेच फरक पडतो असं नाही , पथ्याची किंवा विशिष्ट जीवन पद्धतीची गरज असते ... अगदी साधं उदाहरण म्हणजे - काय त्रास होत आहे हे समजून घेतल्यावर डॉक्टर सांगतात - तुम्ही अमुक गोष्ट खायची बंद करा , ही तुमच्या शरीराला सोसत नाही आहे ... किंवा ही ऍक्टिव्हिटी आता बंद करा ... आजाराचं मूळ नष्ट करतात ...

बऱ्याच वेळा डिप्रेशनचं मूळ हे विचारात असतं . सतत निगेटिव्ह विचारांमुळे हार्मोन्सचा तोल बिघडणे आणि हार्मोन्सचा तोल बिघडल्यामुळे निगेटिव्ह विचार असं दुष्टचक्र असतं ... तेव्हा हार्मोन संतुलित होण्यासाठी योग्य ती औषधं आणि विचार संतुलित होण्यासाठी योग्य ते समुपदेशन घेणं आवश्यक आहे .

इथे एक प्रॉब्लेम येतो तो म्हणजे - शरीराच्या एका ठराविक प्रॉब्लेमसाठी एक विशिष्ट औषध / एक विशिष्ट शस्त्रक्रिया ही सगळ्या लोकांना चालते .. व्यक्ती परत्वे त्यात बदल करावा लागत नाही फारसा .. मात्र या औषधांमध्ये योग्य ते औषध कॉम्बिनेशन मिळेलच किंवा पहिल्या फटक्यात मिळेल याची शाश्वती नसते .... शिवाय त्याचे इतर दुष्परिणामही बऱ्याच वेळा असतात असं दिसून येतं .

जर चांगल्या डॉक्टरच्या औषधांनी फरक पडत असेल तर चांगलीच गोष्ट आहे पण असा डॉक्टर किंवा आपल्याला सूट होणारी औषधं मिळाली नाहीत तर शक्यतो समुपदेशन किंवा स्वतः प्रयत्न करून डिप्रेशनला हरवणं श्रेयस्कर आहे .... स्वतःला मन समजत असल्यामुळे मनच जेव्हा निगेटिव्ह विचार करायला लागतं तेव्हा ती स्वतःशीच लढाई होऊन बसते .. इथे मनच शत्रू झालेलं असतं . तेव्हा ते शत्रू बनलं आहे हे 24 तास ध्यानात ठेवून शत्रूशी जितक्या सावधगिरीने वागू तसंच त्याच्याशी वागलं पाहिजे ... एखादा माणूस खोटारडा आहे , आपल्या वाइटावर टिपलेला आहे हे आपल्याला माहीत असेल पण फक्त तोंडावर सांगून त्याचा अपमान आपण करत नाही , त्याला सगळं बोलू देतो पण त्याच्या चहाड्यांनी - आगीत तेल ओतण्याच्या प्रयत्नांनी अजिबात फरक पडू देत नाही .... त्याला जितकं परकेपणाने वागवतो तेवढया परकेपणाने ह्या " मला दुःख होत आहे , सहन होत नाही " सांगणाऱ्या मनाला वागवायचं , त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचं . एखादा माणूस वेडा आहे , हे आपल्याला माहीत आहे , त्याने येऊन सांगितलं - तिथे चौकात अमूकला उलटं टांगलं आहे , तर आपण दुर्लक्ष करू , तितकंच दुर्लक्ष मनाकडे तेव्हा करायचं जेव्हा ते - सहन होत नाही , जीव देऊ या असं सांगत असतं ...

आय नो - हा खूप अतिरेकी आणि आचरणात आणायला कठीण सल्ला आहे . पण मानवाचं वैशिष्ट्य आहे की तो इतर प्राण्यांसारखा नाही ... तो मी आणि माझं मन असा भेद करू शकतो ... किंवा वेगळ्या शब्दात मनाकडे त्रयस्थ दृष्टीने पाहणं , मनाचे 2 भाग पाडून एक भाग मी होऊन उर्वरित भागाकडे , त्यातल्या घडामोडींकडे - "माझं" मन म्हणून बघू शकतो .... मी तज्ज्ञ नाही त्यामुळे मला ते अचूक शब्दात मांडता येत नाही पण मला काय म्हणायचंय हे लक्षात येत असेल अशी आशा आहे .

मनाच्या रडण्याकडे दुर्लक्ष हा कायमस्वरूपी उपाय नाहीये , तात्पुरता उपाय आहे ... जेव्हा सगळं असह्य वाटू लागतं , जीव देण्याचे विचार लॉजिकल वाटू लागतात त्यावेळी वापरात आणायचा ....

कायमस्वरूपी उपाय म्हणजे आजार मुळापासून बरा होणं हाच आहे .... चांगला लागू पडणारा बाह्य उपचार मिळाला तर आपलं भाग्य पण नसेल मिळत तर आपले आपण उपाय शोधण्याशिवाय मार्ग नाही . सुदैवाने डिप्रेशन उपचारासाठी कुठल्या गोळ्या किंवा शस्त्रक्रियेचं ज्ञान असण्याची गरज नाही .... गोळ्या - औषधं हा मार्ग आहे पण तो एकमेव मार्ग नाही . योग्य त्या विचारांनी , जीवनशैलीने , मन मोकळं करून बोलण्याने , पेशन्स ठेवून समजुतीच्या प्रेमाने समजावणं अशा गोष्टींनीही गेलेला / बिघडलेला तोल हळूहळू परत आणता येऊ शकतो ..... आपण एकटे यासाठी सक्षम नाही असं वाटत असेल तर समुपदेशकाची मदत घेण्यात अजिबात कमीपणा नाही .

महत्वाची गोष्ट म्हणजे परवडत असेल आणि उपलब्ध असेल म्हणजे प्रवास - अंतर आदीच्या दृष्टीने विचार करता तर फक्त समुपदेशक आणखी काय वेगळं सांगणार आहे , मला सगळं कळतं किंवा समुपदेशक काय माझ्या आयुष्यातला " हा - हा" ( मग तो कोणताही असू शकतो ) प्रॉब्लेम सोडवणार आहे का .... असला अडाण्याच्या बाजारासारखा विचार करून समुपदेशकाची मदत घेणं कृपा करून टाळू नये .

बरं याबाबतीत प्रोफेशनल डॉक्टरची मदत घेणं तुम्हाला आवडत नसेल तर कुठेतरी मन मोकळं करण्यासाठी , शांतपणे - जजमेंट न देता फक्त ऐकून घेणारी किंवा हार्श जजमेंट अजिबात देणार नाही अशी खात्री असलेली व्यक्ती शोधा .... भले ती योग्य सल्ला द्यायला पात्र नसेल पण अयोग्य सल्लाही देणार नाही , फक्त सहानुभूतीपूर्वक ऐकून घेईल अशी व्यक्ती आउटलेट म्हणून शोधा ..... मनाला होणारा त्रास मनातच साठवून ठेवणं खूप वाईट आहे ... डिप्रेशन नसेल तरी असं साठवून ठेवण्याचे शरीरावर इतर दुष्परिणाम होतच असतात . कुठेही मन मोकळं न केल्यामुळे सतत हसतमुख , प्रसन्न , चिंतामुक्त असल्याचा देखावा करणाऱ्या भैय्यू महाराजांना ताण असह्य होऊन आत्महत्या करावी लागली .... प्रत्येकजण हे शेवटचं पाऊल उचलेलच असं नाही पण सतत ताणाखाली , मनस्तापाखाली आयुष्य जगत राहणं ह्यात काही शौर्य नाही आहे ..... " कुणालाही आपले त्रास कळू द्यायचे नाहीत , नाहीतर ते आपल्याला दयेच्या नजरेने पाहतील आणि माझ्याबद्दल कोणाला दया यावी हे मला पसंत नाही " या दिशेने चालणारे विचार म्हणजे शुद्ध गाढवपणा आहे ... आणि तसंच जर असेल तर ओळखीच्या नको अनोळखी मित्र शोधून त्यांच्यापाशी मन मोकळं करा .. पण कुठेतरी बोला बाबांनो ....

प्रोफेशनल समुपदेशक मिळणं शक्य नसेल / इच्छा नसेल तर ओळखीच्या समजूतदार , मदतीला तयार असणाऱ्या , योग्य सल्ला देण्याएवढी ज्यांची वैचारिक पातळी - पात्रता आहे अशा उथळ नसलेल्या - खरोखर मॅच्युअर लोकांची मदत घ्यावी आणि तसे लोक आपल्या प्रत्यक्ष ओळखीच्या सर्कलमध्ये नसतील तर सोशल मिडियाच्या जगात आधार देऊ इच्छिणारे जेन्यूईन लोक शोधणं फार कठीण नाही ...

आणखी एक गोष्ट - डिप्रेशन असलेला किंवा सुसाईडल माणूस अन्नपाण्यावरची वासना उडालेला , खंगलेला , फारसा न बोलणारा , न हसणारा असाच असेल असं काही नाही .... बऱ्याचजणांमध्ये ती लक्षणं दिसून येतात पण ती लक्षणं नसलेला माणूस डिप्रेस नाही असं ठरवून टाकण्याची घाई करू नये .... किंवा मी चांगला खातो - पितो आहे , हसतो खेळतो आहे , मला काही डिप्रेशन वगैरे नाही अशीही समजूत करून घेऊ नये , वर लिहिलेल्या 7 पैकी आणि त्या टाईपचे विचार दीर्घकाळ मनात घोळत असलेला माणूससुद्धा इतर वेळी मजेत राहू आणि दिसू शकतो . काही आत्महत्या केलेल्या लोकांचे आदल्या दिवशीचे किंवा त्या आठवड्यातले वगैरे फोटो एका साईटवर पोस्ट केले आहेत , हास्यविनोद - बीचवर , पार्टीत .. अगदी हसतखेळत ... ह्याच्या मनात आज आत्महत्येचे विचार घोळत आहेत याची शंका प्रत्यक्ष आईवडील किंवा नवरा - बायकोलाही आलेली नाही .... बोलून दाखवलं तर खिल्ली उडवली जाईल किंवा अटेन्शनसाठी करतो आहेस असं म्हटलं जाईल किंवा मोडता घातला जाईल अशा अनेक विचारांनी हे विचार लपवून ठेवण्याकडे काहींचा कल असतो तर काहीवेळा जीव द्यावासा वाटत आहे असं बोलून दाखवून अटेन्शन मिळवण्याचा प्रयत्न केला जातो - प्रेम - काळजी मिळवण्याचा प्रयत्न केला जातो , काहीवेळा फसेल असाच आत्महत्येचा प्रयत्न जाणूनबुजून किंवा सबकॉन्शसली केला जातो , जेणेकरून जीव तर जाणार नाही पण सगळे आपल्याशी अधिक काळजीने , समजूतदारपणे , मायेने वागू लागतील .....

यातल्या पहिल्या प्रकारात काही करणं आपल्या हातात असत नाही पण दुसऱ्या दोन प्रकारात त्या व्यक्तीला पद्धतशीरपणे डिप्रेशनमधून बाहेर काढणं ही खूप गरजेची गोष्ट असते .... पोकळ धमक्या अशी व्याख्या करून दुर्लक्ष करू नये , निदान जवळच्यांनी तरी ... त्या व्यक्तीच्या मनात तुमच्या प्रेमाबद्दल विश्वास निर्माण केला पाहिजे ....

दहावी - बारावी - पदवीचे विद्यार्थी , नोकरीसाठी धडपड करणारे तरुण , नवउद्योजक यांच्या मनात त्यांच्या घरच्यांनी विश्वास निर्माण केला पाहिजे की - ह्या बाबतीत काय होतं यावर आमचं तुझ्याबद्दलचं प्रेम अवलंबून नाही ... काहीही होवो आम्ही कायम तुझ्या पाठीशी आहोत .... यामुळे ती व्यक्ती निष्काळजी किंवा कतृत्वशून्य बनणार नाही .... केवळ घरचे पाठीशी आहेत म्हणून कोणीही जाणूनबुजून आपल्या शिक्षण किंवा करिअरकडे दुर्लक्ष करणार नाही ..

विद्यार्थ्यांच्या बाबतीत कदाचित तसं होऊ शकतं , जास्त लाईटली घेतलं तर ... तेपण एका वयापर्यंत , तोवर थोडा धाक असावा मूल फारच खुशालचेंडू असेल तर ... बाकी तीही गरज नसते .. एका वयानंतर आपोआपच मॅच्युरिटी येते .... मुलाला शिक्षणाचं महत्व जरूर पटवून द्यावं , अभ्यासासाठी प्रोत्साहित करावं पण अपेक्षांचा भार त्याच्या खांद्याना सोसवतो आहे ना , त्याखाली तो दबत तर नाही याची काळजी घ्यावी .. आपल्या महत्वकांक्षा त्यांच्यावर लादू नयेत .... त्या त्यांच्या महत्वकांक्षा बनवण्याचा प्रयत्न करावा ... आणि अपयश जरी आलं तरी " माझ्या तुझ्यावरच्या प्रेमात त्याने काही फरक पडत नाही " हा विश्वास जर पालक मुलाच्या मनात निर्माण करू शकत नसतील तर ते पालक म्हणवून घेण्यास योग्यच नाहीत .....

घरातल्या व्यक्ती सपोर्टिव्ह असणं डिप्रेशनग्रस्त लोकांसाठी खूप आवश्यक आहे ... पण प्रत्येकाच्या कुटुंबातील व्यक्ती तेवढ्या मॅच्युअर असतीलच असं नाही तेव्हा बाहेर , मित्र मैत्रिणींमध्ये किंवा अगदीच कोणी नसेल तर सोशल मीडियावर निरपेक्षपणे आधार देणारी व्यक्ती शोधणं उत्तम .... एकटे पडून घेऊ नका ..

आयुष्यातल्या एखाद्या घटनेला कसं रिऍक्ट व्हायचं हे ठरवणं आपल्या कंट्रोल मध्ये ठेवलं पाहिजे ... एखादा माणूस पाच हजारात संसार चालवून समाधानी राहू शकतो तर एखाद्याला आपल्या शिक्षणाच्या मानाने 25 हजार हा पगार फारच कमी आहे याचं वैषम्य वाटत राहू शकतं ... समाधानी होणं हे आपलं मुख्य ध्येय असलं पाहिजे ... लोकांची मतं कितपत मनावर घ्यायची हे तुमच्यावर आहे ... तुम्ही यशस्वी झाला आहात की अपयशी हे लोकांना का ठरवू देता ? यश हे मानण्यावर असतं .. तुम्ही जर मनातून समाधानी , संतुष्ट असाल तर लोकांच्या यशाच्या अपयशाच्या व्याख्यांनी तुम्हाला फरक पडण्याचं कारण नाही .... पैसे , लौकीकदृष्ट्या यशाच्या कल्पना - उच्चशिक्षण , नोकरी , पैसा , विवाह , मुलं ह्या गोष्टी आणि समाधान यांचं काही अतूट नातं वगैरे नाही .... ह्या गोष्टी समाधान आणतात... खरी गोष्ट आहे पण "आणतातच " असं नाही आणि ह्यातल्या काही गोष्टी नसलेली व्यक्ती समाधानी असणारच नाही अशीही काही काळ्या दगडावरची रेघ नाही .... आयुष्यात काय मिळणार आहे हे प्रयत्नांवर आणि काही प्रमाणात नशिबावर अवलंबून असतं ... भौतिक सुखं ही बाह्य गोष्टींवर अवलंबून असतात पण तुम्ही आतून सुखी होणं हे संपूर्ण तुमच्या हातात आहे ... ते बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून ठेवलं तर कुणीही माणूस कधीही पूर्ण सुखी होऊ शकत नाही .. डिप्रेशनचा त्रास असेल तर " अंतराचा " मनाचा धांडोळा घेऊन ते रिपेअर करणं आणि शक्य असल्यास कंट्रोलखाली आणणं हे ध्येय समोर ठेवलं पाहिजे .

मी तज्ज्ञ नाही .. काही चुका झाल्या असतील तर डॉक्टर - जाणकार लोकांनी माफ कराव्यात .

मांडणीसमाजप्रकटनविचारआरोग्य

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

10 Aug 2019 - 8:01 pm | जॉनविक्क

घडामोडींकडे - "माझं" मन म्हणून बघू शकतो .... मी तज्ज्ञ नाही त्यामुळे मला ते अचूक शब्दात मांडता येत नाही पण मला काय म्हणायचंय हे लक्षात येत असेल अशी आशा आहे .

हम्म.

मी तज्ज्ञ नाही .. काही चुका झाल्या असतील तर डॉक्टर - जाणकार लोकांनी माफ कराव्यात .
चुका झाल्या असतीलही पण तज्ञ नाही ही बाब लेख वाचल्यावर एक थाप वाटायला लागली आहे

तमराज किल्विष's picture

10 Aug 2019 - 9:45 pm | तमराज किल्विष

जॉन भाऊ असु शकतो एखाद्याचा व्यासंग.

जॉनविक्क's picture

11 Aug 2019 - 1:07 am | जॉनविक्क

दॅट्स वाय इट वाज अ गिवन कॉम्प्लिमेंट. अर्थात हे समजायलाही व्यासंग हवाच :)

तमराज किल्विष's picture

11 Aug 2019 - 4:59 am | तमराज किल्विष

एवढं वैज्ञानिक माहिती पुर्ण लिहुन सुध्दा लेखिका मी तज्ञ नाही हे म्हणत आहे म्हणून मी असे म्हणालो. ती कॉंप्लीमेंट आहे हे लहान मुलाला सुध्दा कळेल. :-))

माझ्या नावे कशाला खपवताय :D

तमराज किल्विष's picture

11 Aug 2019 - 5:00 am | तमराज किल्विष

उपरोध कळ्ळा.

जॉनविक्क's picture

11 Aug 2019 - 7:40 am | जॉनविक्क

तुम्हाला मी लेखिकेची केलेली स्तुती कळून आली नाही का ?

तमराज किल्विष's picture

11 Aug 2019 - 8:55 am | तमराज किल्विष

तुम्हाला मी लेखिकेची केलेली स्तुती कळून आली नाही का ?
>> नक्कीच कळुन आली होती. लेखिका जर इतकं
छान वैज्ञानिक माहिती पुर्ण लिहुनही मी तज्ञ नाही असे म्हणते हे मलाही विश्वास ठेवायला जड गेले म्हणून वरचा प्रतिसाद दिला होता.

जॉनविक्क's picture

11 Aug 2019 - 9:05 am | जॉनविक्क

डायरेक्ट लेखिकेला सांगा की :)

तमराज किल्विष's picture

11 Aug 2019 - 8:57 am | तमराज किल्विष

अर्थात हे समजायलाही व्यासंग हवाच :)
>> यातील मला उद्देशून असलेला उपरोध मला कळाला हे म्हटलं आहे.

जॉनविक्क's picture

11 Aug 2019 - 9:01 am | जॉनविक्क

उलट तुम्हाला लेखिकेची मी केलेली स्तुती आवडली म्हणून तुमचे कौतुक केलेय की ??? आस्काय कर्ता ?

तमराज किल्विष's picture

11 Aug 2019 - 9:10 am | तमराज किल्विष

ती स्तुती आहे होय. धन्यवाद!

जॉनविक्क's picture

11 Aug 2019 - 9:54 am | जॉनविक्क

मग तुमचा व्यासंग नक्कीच कमी आहे ;)

तमराज किल्विष's picture

11 Aug 2019 - 11:16 am | तमराज किल्विष

मान्य आहे. आपण फारेन मधुन आले आहे म्हटल्यावर माझी तुमच्या पुढे काय पाड लागणार?

नाखु's picture

10 Aug 2019 - 10:45 pm | नाखु

तीन चार भागात होईल असा ऐवज मजकूर,एकाच धाग्यात का गुंफलाय??

लेखनाचा विषय उत्तम आहे.

मृणालिनी's picture

10 Aug 2019 - 10:56 pm | मृणालिनी

मस्त लिहिले आहे.

उपयोजक's picture

10 Aug 2019 - 11:53 pm | उपयोजक

चांगला विषय!

जालिम लोशन's picture

11 Aug 2019 - 12:19 am | जालिम लोशन

काऊन्सिलर म्हणुन काम केले तर नाव कमवाल.

भौतिक सुखं ही बाह्य गोष्टींवर अवलंबून असतात पण तुम्ही आतून सुखी होणं हे संपूर्ण तुमच्या हातात आहे ... ते बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून ठेवलं तर कुणीही माणूस कधीही पूर्ण सुखी होऊ शकत नाही

लाख पते की बात!

एकविसाव्या शतकातील समाजव्यवस्था मनुष्यास १००% बहिर्मुखी होऊन जगण्यास भाग पाडते आहे कारण कोणीही ‘समाधानी’ असू नये ह्या उद्दीष्टावर नफेखोर भांडवलशही काम करतेय, भौतिक गोष्टींचं अवास्तव अवडंबर माजवून.

भौतिक सुख हेच आयुष्याचं उद्दीष्ट आहे बिंबवलं जातंय आणि त्याच्या विळख्यात अडकून आपण बहिर्मुखी झालो आहोत. जितकं जास्त अंतर्मुखी होण्याचा प्रयत्न केला जाईल तितकं ह्या विळख्यातून बाहेर पडणं सोपं होत जाईल.

लेख एकदम समतोल आणि विचारप्रवर्तक झाला आहे.

- (अंतर्मुखी होण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी

प्रकाश घाटपांडे's picture

11 Aug 2019 - 10:39 am | प्रकाश घाटपांडे

+१, सोकाजी क्या बात कही!

नंतर डिप्रेशन काढणं अवघड असतं. ज्या कारणामुळे आलं ते परत फिरवता येत नाही.
पैसा,धंधा,नोकरी, कायम राहीलच मानणे चुकीचं आहे हे
लहानपणापासूनच पालकांनी समजावलं पाहिजे. मनाची तयारी राहते. मुलं,शेजारी ,जोडीदार,आईवडील यांचे सुख हे मिळणे हा नशिबाचाच भाग असतो. हे सुद्धा बिंबवलं तर मन घट्ट राहतं.

बाकी लेख अभ्यासपूर्ण आहेच. पुस्तकी तज्ञ असो वा नसो.

फुटूवाला's picture

11 Aug 2019 - 6:41 am | फुटूवाला

एखादा माणूस पाच हजारात संसार चालवून समाधानी राहू शकतो तर एखाद्याला आपल्या शिक्षणाच्या मानाने 25 हजार हा पगार फारच कमी आहे याचं वैषम्य वाटत राहू शकतं ... समाधानी होणं हे आपलं मुख्य ध्येय असलं पाहिजे ..

+११११

सर्वांचे मनापासून आभार __/\__

तमराज किल्विष's picture

11 Aug 2019 - 9:08 am | तमराज किल्विष

सध्याच्या काळात ज्याच्याकडे भौतिक गोष्टी पैसाअडका, जमीन, गाडी, बंगला असणाऱ्या लोकांना समाज प्रतिष्ठा देत आहे. विद्वान पण लक्ष्मीकृपा नसलेले, श्रमिक, लहान शेतकरी व अगदी पोटापुरते कमावणारे लोक यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळत नाही. गैरमार्गाने संपत्ती कमावणारांना देखील मान मिळतो पण सन्मार्गाने पोटापुरते कमावणारांना लांब ठेवले जाते. हा यशस्वी होण्याचा मापदंड आपसूकच मानगुटीवर बसतो व अनेकांना नैराश्यात ढकलतो.

उपयोजक's picture

11 Aug 2019 - 11:44 am | उपयोजक

एकच प्रश्न विचारतो.

आज लग्नाळु मुलींच्या अपेक्षा अवास्तव वाढल्या आहेत.गरीबाघरच्या मुलांची लग्ने होत नाहीयेत.याचं जर टेन्शन एखाद्या लग्नाळू मुलाला येत असेल तर त्यानं काय करावं? दुसर्‍या जातीतली करुन घ्यावी म्हटले तरी मुळातच मुलींची संख्याच कमी आहे.कमी पडत असलेल्या लग्नाच्या वयाच्या मुली अचानक इलेवन्थ अवरला कुठून आणाव्यात?

तसं तर काय नोकऱ्या मिळत नाहीत , बेकारी वाढली आहे , धंदा - व्यवसाय मंदीत आहे , खर्च वाढला आहे , बायको / नवरा धड नाही , मुलं अपेक्षा पूर्ण करत नाहीत , घरातलं कोणीतरी आजारी आहे , शिक्षणात मनासारखं यश मिळालं नाही .. अशी टेन्शनची अक्षरशः असंख्य कारणं आहेत ..

प्रत्येकाला आपापल्या समस्या स्वतःच सोडवायच्या आहेत , कोणी रेडीमेड सोल्युशन देऊ शकत नाही ...

कुणाला लग्न होत नाही म्हणून टेन्शन , कुणाला संसाराचा खर्च झेपत नाही म्हणून टेन्शन , कुणाला जोडीदार मनासारखा नाही याचा खेद , कुणाला मूल होत नाही याचं दुःख , कुणाची मुलं हवी तेवढी निरोगी किंवा बुद्धिमान किंवा आज्ञाधारक निघाली नाहीत याचं दुःख ..... सतत कुणाशी तरी तुलना , दुसऱ्यांच्या फूटपट्ट्यांनी आपण समाधानी आहोत की नाही हे ठरवायचं .... लोक आपली दया / कीव / उपहास करतील म्हणून आणखी टेन्शन घ्यायचं .... कुणाचं सगळं व्यवस्थित झालं आहे तर कामाचा स्ट्रेस ... जरा परिस्थिती नेहमीच्या रूटवरून घसरली , नवीन काहीतरी प्रॉब्लेमला तोंड द्यावं लागलं की लगेच चिडचिड ...

बाहेरची परिस्थिती आपण एका मर्यादेपलीकडे कंट्रोल करू शकत नाही ... आपल्या मनाची शांती - आनंद बाह्य घटनांवर - परिस्थितीवर अवलंबून ठेवला की टेन्शन , स्ट्रेस , ताण यांना सामोरं जावं लागतं ... मनावर कंट्रोल मिळवता आला तर कोणत्याही परिस्थितीत मनाची शांती हरपणार नाही .

मुली मिळत नाहीयेत ही खरी समस्या नाही आहे .. आमच्या अपेक्षांना उतरणाऱ्या मुली मिळत नाहीत ही खरी समस्या आहे .... मुलगी ही अमुक वयाची , दिसायला नीटनेटकी , धडधाकट - निरोगी , स्वभावाने चांगली .. एवढ्या मोजक्या अपेक्षा ठेवल्या तर मुलींचा दुष्काळ पडलेला नाही ..

ज्या गरीब मुलांची लग्नं जमत नाहीयेत असं तुम्ही म्हटलं त्यांची एखाद्या अतिगरीब , दरिद्री कुटुंबातील मुलगी बायको म्हणून स्वीकारायची तयारी असते का ? अगदीच टोकाचं उदाहरण म्हणून गावाकडचा एखादा थोडी शेती असलेला , स्वतःचं घर वगैरे असलेला मुलगा - ज्याची पस्तिशी उलटत चालली आहे कारण कोणी मुलगी द्यायला तयार नाही ... तो मुंबईसारख्या शहरातल्या झोपडपट्टीत भाड्याच्या झोपडीत राहणाऱ्या , जिची आई धुणीभांडी करते , बाप बांधकाम कामगार आहे , भाषा अशुद्ध आहे आणि अठराविश्वे दारिद्र्य आहे अशा घरातली मुलगी बायको म्हणून करायला तयार होईल का ? जात धर्म , आर्थिक परिस्थिती , सामाजिक स्थान, काहीही न बघता ..... देणंघेणं , मानपान , लग्नाचा खर्च कसलीही अपेक्षा न करता ... सगळा खर्च मी करतो , साध्या पद्धतीने लग्न करू , तुम्ही फक्त मुलगी आणि नारळ द्या .... तुझी भाषा वेगळी आहे , आमच्या रितिभाती माहीत नाहीत , काही हरकत नाही , आमच्या घरी आलीस की शिकशील हळूहळू ... वाटल्यास स्वतःला बदलण्याची , ऍडजस्टमेंट करण्याची तयारी आहे की नाही याची मुलीला विचारून खात्री करून घ्यावी .....

जमेल का ? की तिथे सामाजिक प्रतिष्ठा , जात - गोत्र - पोटजात आदी हजार बाबी आडव्या येतील ?

एवढं टोकाचं उदाहरण नको असेल तर गावातल्या गावातच पण आपल्यापेक्षाही गरीब , त्याच किंवा वेगळ्या जातीची मुलगी मिळणं शक्य नाही असं मला वाटत नाही .... लग्नाचा खर्च आम्ही करू , तुमच्याकडून कोणत्याही अपेक्षा नाहीत ... या आणि इतर काही अपेक्षा कमी केल्या की मुलगी मिळणं कठीण नाही ....

माझ्या परिचयातल्या एका मुलाचा लग्नानंतर एक वर्षात घटस्फोट झाला , एक मुलगी झाली ती बायको घेऊन गेली .... घटस्फोटाची प्रोसिजर पूर्ण होण्यात 2 वर्षं तरी गेली ... मुलाचं वय 35 च्या आसपास ... 25 - 30 हजार पगार .... दुसऱ्या लग्नासाठी मुलगी पाहताना ( जातीतल्याच बरं का , बाहेरच्या पाहिल्याच नाहीत ) एका मुलीचं शिक्षण बारावी होतं म्हणून तर स्थळ नापास केलं , छे ! पदवी तरी हवी , बारावी काय ... यांना सुनेला नोकरी करायला लावायची नव्हती पण डिग्री असलेलीच सून हवी होती .... घटस्फोटीत , एक मुल झालेल्या मुलासाठी नवरी शोधताना या अपेक्षा ...

अगदी पदवीच हवी ही अपेक्षा नसली तरी इतर पाच पन्नास निरर्थक अपेक्षा मुलाच्या कुटुंबाच्याही असतात .. जातीतली नसली , गरीब घरची असली , फार शिकलेली नसली तरी काय बिघडतं , संसार करण्याची तिची योग्यता असणं एवढं पुरे नाही का ... तिच्या घरचे कसे आहेत वगैरेशी काय संबंध ? वाटल्यास सासरशी संबंध अगदी कमी ठेवता येतील ..

गरीब घरात पिचत असलेल्या मुलीला - तुझ्या घरचे आपलं लग्न करून देणार नाहीत , तू चल माझ्यासोबत , लग्न करूनच माझ्या घरी जाऊ म्हणण्याची हिम्मत किती मुलांमध्ये आहे ?

अजूनही काही समाजांमध्ये विधवांना पुनर्विवाहाची परवानगी नाही ... तरण्याताठ्या मुलींना तश्शा कुजवत ठेवतात ... अशा ठिकाणी जाऊन मुलीच्या मनात विश्वास निर्माण करून तिला घेऊन जाऊन लग्न करून घरी नेऊन - ही माझी बायको .. हिचं घर , कुळ , कुटुंब , इतिहास ह्याच्याशी आपला काही संबंध नाही , माझ्या बायकोचा दर्जा आजपासून या घरात हिला मिळाला पाहिजे ... असं घरच्यांना सांगण्याची हिंमत किती मुलांमध्ये आहे ?

आपल्या गावातल्या घटस्फोटीत / परित्यक्ता / विधवा तरुणीशी , जिच्या पुनर्विवाहास तिच्या घरचे राजी आहेत अशा तरुणीला पत्नी म्हणून स्वीकारायची किती तरुणांची तयारी आहे ? अशा विवाहास आपल्या घरच्यांना तयार करण्याचं धैर्य किती जणांमध्ये आहे ?

किंवा अति गरीब कुटुंबाशी वैवाहिक संबंध जोडण्यास घरचे तयार नसतील तर तसंच लग्न करून , घरचे निवळेपर्यंत वेगळं छप्पर उभारून संसार करण्याची किती जणांची तयारी आहे ?

नुसतं लग्न होत नाही म्हणून फुकटचं टेन्शन घेण्यात काय अर्थ आहे ....

तमराज किल्विष's picture

11 Aug 2019 - 2:55 pm | तमराज किल्विष

मी तर स्वत: स्वाभिमानाने शिकून उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पगाराची सरकारी नोकरी मिळवली होती, तेव्हा माझ्या मागे अनेक लोक आमच्या मुलीशी लग्न करा म्हणून मागे लागले होते.

लाल रंगाचा लई म्होट्टा डब्बा ? =)) ;)

वय साधारण चाळिशीकडे झुकलेले. पहिली मुंबईतील मुलगी घर लहान आहे या कारणाने निघून गेली. अगदी एक महिन्याच्या आत यावरून कुरबुरी सुरु झाल्या, ती भावाला फोन करायची व असे भासवायची कोणीतरी मित्र आहे, नंतर घटस्फोट मिळवता अशीच दोन वर्षे गेली.

मग पुन्हा जातीमधील दुसरी मुलगी बघायला सुरुवात झाली, पण वाढलेले वय लहान घर या कारणामुळे आता अपेक्षा सैल केल्यात, कोणीही अतीगरीब, व्यवस्थित लिहता वाचता येणारी मुलगी पहात आहे. अपेक्षा एकच मुलगी सुस्वभावी असावी. दोन वर्षे झाली वधुवर सूचकमधे अधून मधून सतत जाणं येणं चालू आहे पण अजुन...

सुधीर कांदळकर's picture

11 Aug 2019 - 12:28 pm | सुधीर कांदळकर

फक्त

मित्र मैत्रिणींमध्ये किंवा अगदीच कोणी नसेल तर सोशल मीडियावर निरपेक्षपणे आधार देणारी व्यक्ती शोधणं उत्तम .... एकटे पडून घेऊ नका ..

हे धोकादायक आहे. दहा सत्यनारायण घाला, सोळा सोमवार करा आणि हा संदेश किमान १०० जणांना पाठवा नाहीतर भयानक आपत्ती येईल असा संदेश येऊ शकतो. हे लोक अशा पीडितांच्या शोधातच असतात.

समुपदेशन घेणे हेच उपयुक्त आहे.

असंच काही नाही ... लेखात ज्या मुलीचं उदाहरण मी दिलं आहे .. त्या सुसाईड हेल्प वेबसाईटवर अनेकांनी तिला अतिशय सौम्य , समजूतदार , प्रेमळ शब्दात तुझी एवढी काही चूक झालेली नाही हे समजावून सांगितलं .... हळूहळू तीही शांत झाली .. केवळ काही कमेंट्स मध्ये ... फेसबुकवर एका मालिकेच्या फॅन्सचा ग्रुप आहे .. त्यात अनेकजण आज मी खूप डिप्रेस आहे , अगदी सहन होत नाही , मला चिअर अप करा अशा पोस्ट किंवा आपल्या आयुष्यातील एखादा प्रॉब्लेम अगदी मोकळेपणाने टाकतात .. आणि बरेच जण अगदी निःस्वार्थीपणे , निरपेक्षपणे धीराचे , प्रोत्साहनाचे शब्द सांगतात , बोलायचं असेल तर केव्हाही तयार आहे म्हणून सांगतात आणि कसल्याही अपेक्षा न करता प्रेमळ , नॉन - जजमेंटल सल्ले देतात ... प्रत्यक्ष आर्थिक / इतर काही मदतीची कोणी अपेक्षा ठेवत नाही आणि कोणी तसे प्रॉमिसेसही देत नाहीत .. शब्दांचाच निरपेक्ष आधार हवा असतो आणि तो भरभरून देतात ... योग्य तो प्लॅटफॉर्म / योग्य माणसं गवसायला हवीत फक्त ... कोणाकडे मन मोकळं करायचं हे समजलं पाहिजे ..

तमराज किल्विष's picture

11 Aug 2019 - 2:59 pm | तमराज किल्विष

सरकारची अशी एक कौन्सिलिंग करणारी यंत्रणा आहे असे वाटते, फोन करून समस्या सांगितली की समुपदेशन करतात असे वाचले आहे. आत्महत्या करू पहाणारे त्या समुपदेशनाचे आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त झाले आहेत.

Nitin Palkar's picture

11 Aug 2019 - 3:18 pm | Nitin Palkar

विचार करायला लावणारा लेख. आज समुपदेशक, समुपदेशन करणारी संकेतस्थळे अनेक आहेत, पण 'मला समुपदेशनाची गरज आहे' हे कसे कोणाला कळावे? प्रत्येकाला असे वाटते मी पूर्णपणे व्यवस्थित आहे, नीट विचार करू शकतो. सर्दी खोकला होणे जसे शक्य असते तसे मेंदूमध्ये काही केमिकल लोच्या होऊन मनस्थिती बिघडू शकते हे अनेकांच्या लक्षात येत नाही.
या लेखाने ही धूसरता नक्की कमी केली आहे.
छान लेखन, लिहीत रहा.

nishapari's picture

11 Aug 2019 - 3:31 pm | nishapari

धन्यवाद __/\__

तमराज किल्विष's picture

11 Aug 2019 - 9:59 pm | तमराज किल्विष

बरोबर बोललात.

समुपदेशनाने समाधान होत असेल तर बरंच.

डिप्रेशन वगैरे अंधश्रद्धा आहे हे माझे वैयक्तिक मत!

डिप्रेशन वगैरे अंधश्रद्धा आहे हे कसे? ते स्पष्ट केल्यास बरं होईल.

इन जनरल अमूक एक ‘अंधश्रद्धा‘ आहे असं उपहासाने म्हटलं जातं अलीकडे, तसं म्हणण्यासाठी डिप्रेशन योग्य नसावं.

- (सायकाॅलाॅजीकल) सोकाजी

जागतिक आरोग्य संघटना - वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वेबसाईट डिप्रेशन ह्या विषयावर स्वतंत्र पेज आहे .

https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/depression

लिंक देतच आहे पण लिंकवर जाऊन वाचण्याचे कष्ट तुम्ही घ्याल याची खात्री नाही म्हणून ह्या 2 ठळक बाबी इथेच देत आहे -

Depression is a common illness worldwide, with more than 300 million people affected.

Close to 800 000 people die due to suicide every year. Suicide is the second leading cause of death in 15-29-year-olds.

दुर्दैवाने डिप्रेशन हा खरा आजार नाहीच असा विचार करणारे तुम्ही एकटे नाही . क्वोरा या प्रश्नोत्तरांच्या वेबसाईटवर - why do people think depression isn't a real thing ? ह्या प्रश्नाला अप्रतिम उत्तर दिलं आहे ... कृपया तिथे जाऊन ते पूर्ण वाचण्याचे कष्ट घ्याच ..

https://www.quora.com/Why-do-people-think-depression-isnt-a-real-thing
.

Depression appears to be a sickness of the mind, which can’t be seen, touched, or its intensity could be measured with a thermometer in hand, but has multiple causes. Further, depression is not replicable through controlling situational factors accordingly, like virus or bacteria induced physical illnesses. Like that, depression is thought to be non-existing, because we are unable to recognize or pinpoint the full range of causal factors of depression. So, we give up, because we are unwilling to delve our minds into something that appears too complex for our understanding.

People can imagine what it’s like to have a fever, or a running stomach or a common cold. Men can even imagine what it must be like to give birth, for women, because they see it happening. Humans can relate to things when they see it happening, or when they go through similar experience.

But depression looks like something very controllable, and finite—periods of sadness or grief that could come about from life circumstances, and are situation-dependent.

Therefore, depression suffers from being perceived differently owing to our Framing bias, whereby we rely on a specific schema of information and interpretation —formed by anecdotes and stereotypes—to filter our reactions to depression.

People can conceptualize sadness or fever—they can have imagined conceptualizations, because they know what situations could bring about fever or sadness. But when they don’t see those situations as occurring in case of depression, which looks like sadness, they refuse to give it any extra, separate, status, because they can’t imagine it.

If we applied the same logic of how we look at depression, towards physical illnesses, this is how ridiculous it would look, as the following comic strip illustrates

http://i.huffpost.com/gen/2270912/images/o-HELPFUL-ADVICE-facebook.jpg

एखाद्या भळभळत्या जखमेएवढीच तीव्र यातना देणारा पण कुणाला न दिसणारा हा आजार आहे. दु:ख विसरावे, सहन करावे असा त्रासदायी गैरसमज आहे

https://www.loksatta.com/lokarogya-news/stress-and-depression-1250179/lite/

nishapari's picture

12 Aug 2019 - 11:50 am | nishapari

https://www.misalpav.com/node/27659

हा मिपावरचाच एक जुना धागा आहे ... तुमच्यामते अंधश्रद्धा असलेल्या गोष्टीला वैद्यकीय उपचार मिळाल्यावर लेखिकेच्या आयुष्यात कसा आमूलाग्र बदल झाला त्याची स्वतः त्यांच्या तोंडून कबुली आहे ...

उपेक्षित's picture

21 Aug 2019 - 1:05 pm | उपेक्षित

तुमचा प्रतिसाद पाहून धक्का बसलाय, थोड विस्कटून सांगितलात तर बर होईल.

बाकी लेख अतिशय उत्कृष्ट आणि माहितीपूर्ण आहे पण थोडा विस्कळीत झालाय. २/३ भागात विभागून टाकला असतात तर योग्य झाले असते.

माझा वरचा प्रतिसाद टर्मीनेटर यांना होता

तमराज किल्विष's picture

20 Aug 2019 - 3:40 pm | तमराज किल्विष