वी आर नॉट मेड फॉर ईच आदर - ५

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
15 Dec 2018 - 6:39 am

लक्ष्मण तुला सोडून आल्या नंतर त्याने तुला कुठे सोडले याची विचारपुसही मी केली नाही. मुद्दाम होऊनच. न जानो तुला भेटायचा मोह व्हायचा आणि आदर्श न्यायप्रिय राजा निश्चय विरघळायचा. माझ्या लौकीकाला बाध येईल असे काहीच करायचे नव्हते .
"काल" हा सर्व दु:खांवर औषध ठरतो. मी अहोरात्र कामात बुडवून घेतले. गोशाळा , अश्वशाळा , गजशाळा, पणनव्यवस्था शस्त्रागार अद्ययावत करून घेतले.
सुरक्षा दलांना मार्गदर्शन करु लागलो. एकच गोष्ट कटाक्षाने टाळली .ती म्हणजे न्यायदान.......

मागील दुवा https://www.misalpav.com/node/43759

काळ गेला तसा मी अधीकच कामात बुडत गेलो.तुझ्याशिवाय जगण्याची सवय झाली. पण तुझ्या विचांराशिवाय जगणं अशक्य होतं. रोजची कामे संपवून निद्राधीन होण्यासाठी कक्षात गेलो की तुझ्या सगळ्या आठवणी धावत येतात. तुझं खळखळून हसणं , तुझं ते निरागास खट्याळ डोळ्यानी पहाणं , मी काही सांगत असताना समरस होउन ऐकणं, शततंत्री वीणा वाजवताना तल्लीन होऊन जाणं , बोलताना मानेला हलकासा झटका देत मुद्दा मांडणं , हे पुन्हा पुन्हा सामोरं येत रहातं.
चालताना होणारे तुझ्या पैंजणाचे आवाज , तुझ्या हातातल्या बांगड्यांची किणकीण नादात तुझं स्वतःशीच गुणगुणणं हे माझ्या जगण्यातलं संगीत पुन्हा पुन्हा ऐकू येत रहातं. मी मंचकावर या कुशीवरून त्या कुशीवर होत रहातो. रात्र उलटत जाते, गवाक्षातून दिसणारं चांदणं फिक्कट होत जाते. राजप्रासादाच्या महाद्वारावर पहाटेचे चौघडे वाजु लागतात.आणि माणसांचा दिवस सुरू होतो.
वर्षे गेली, दिवस जात होते. कधीतरी उर्मीलेच्या बोलण्यातून समजले की राजवैद्यानी तुला दिवस गेल्याचे संगितले. मी मनाने कोलमडूनच पडलो. वाटले की धावत जावे तुला उचलून आणावे. पण कुठल्या तोंडाने बोलणार हे तुला. तुला कसे विचारणार की तू कशी आहेस म्हणून.
आदर्श राजा , आदर्श पुत्र होण्याच्या नादात आदर्श जाऊदे ... साधी माणूसकी असलेला पती व्हायला ही नालायक ठरलो मी.
शरीरावरच्या जह्कमा भरत जातात. तशा मनावरच्या जखमा भरत नाहीत. त्याला खूप उशीर लागतो. त्या कधीच पूर्ण भरत नाहीत. एखादा लहान धक्काही पुरेसा असतो खपली निघायला. एखादा वीणेचा झंकार, वार्‍याची हलकी झुळूक, बांगड्यांची किणकीण , दूरवरून ऐकू आलेली हसण्याची लकेर , भिरभिर्‍या डोळ्यानी पहाणारं कुणाच्या तरी कडेवरचं लहान मूल गवाक्षाच्या काठावर नाचणारी छोटी चिमणी काहीही पुरतं धक्का म्हणून. आणि जखमा पुन्हा भळाळत्या होउन वाहू लागतात.
त्या घटनेला नऊ दहा वर्षे झाली तरी ते सगळं कालपरवा झाल्यासारखं वाटायचं.
मग भरताने राजसूय यज्ञाचं मनावर घेतलं. यज्ञाचा घोडा लव कुशानी अडवल्याचं निमीत्त झालं. आपण दोघे पुन्हा एकमेकांसमोर आलो.
खूप वाटलं की तुला पुन्हा अयोध्येला घेवून जावं. कबूल करावं की तुझ्याशिवाय मी किती अपूर्ण आहे ते. आदर्श, लोक काय म्हणतील वगैरे गोष्टी सगळे कस्पट आहे. ते सगळे मृगजळ आहे . मायावी कांचनमृगासारखं.
दंडकारण्यात मायावी कांचनमृगाच्या नादात तू लक्ष्मणरेषा एकदाच ओलांडली होतीस .आपण आदर्श असावं या कांचनमृगाच्या नादात आपल्यातील विश्वासाची
लक्ष्मणरेषा मी वरंवार ओलांडली होती. प्रत्येकवेळी दु:खाच्या लंकेत तूच ढकलली गेलीस.
तुझी माझी नजरानजर झाली. त्यातले प्रश्न पार र्‍हदयापर्यंत येवून आदळले. माझ्याकडे उत्तरे नव्हती. तुला मी कोणताच भरवसा देवू शकत नव्हतो. दुधाने पोळलेला ताकही फुंकून पितो . तू तर चांदण्याने होरपळली होतीस. पुन्हा एकदा विश्वासघात तुला नको होता.
लव कुशांना काहीतरी सांगून माझ्या कडे पाठवलेस. एकवार डोळे भरून तिघांना पाहिलेस आणि अग्निशिखा चमकून नाहीशी व्हावी तशी धरणीमाते मला पोटात घे म्हणत दरीत उडी मारलीस.
मला सावरायलाही वेळ मिळाला नाही. त्या घटने नंतर मी पूर्ण बदललो. लोक काय म्हणतील या मृगजळामागे आयुष्यभर धावत राहिलो आणि हाततलं सोन्या मोत्या सारखं सूख हरवून बसलो. असल्या पोकळ मोठेपणाचं फोलपण लक्षात आलं तेंव्हा आयूष्य फोल ठरलं होतं.
कुणीतरी आपल्याला मोठं म्हणावं म्हणून स्वतःवरच अन्याय करत राहीलो. मी तुझा अपराधी आहे हे कबूल करायला घाबरलो.
तू गेल्यानंतर माझा जगण्यातलाच नव्हे तर स्वतःवरचाच विश्वास सम्पला. प्रेतवत जगत राहीलो. आता जगण्याचाही कंटाळा आलाय. एकटं, अपराधी किती वर्ष जगायचं. नवरा बायको एकमेकांत सुखदु:खाचेच नाही तर शांततेचेही क्षण वाटून घेत असतात. ते क्षण सोबत जगत असतात. ती परीपूर्ती असते. मला परीपूर्ती नाही. तुझ्याशिवाय ती मिळणारही नाही. हे कळुन चुकलंय.
आयुष्यात मी स्वतः होऊन कोणतेच निर्णय घेतले नाहीत. कधी गुरूंनी सांगीतले, कधी आई वडीलांनी ,सांगीतले, कधी मंत्रीमंडळाने तर कधी परिस्थितीने लादले म्हणून सगळ्या गोष्टी करत गेलो.
आज मात्र आयुष्याच्या शेवटी निर्णय घेतोय ;आयुष्याचा शेवट करण्याचा. या वेळी मला " लोक काय म्हणतील" याची चिंता नाहिय्ये. कोणाचाही आदर्श अव्हायचं नाहिय्ये. फक्त हे एकाकी आयुष्य संपवायचं . तुझ्या कडे यायचंय अपराधांची क्षमा मागायला. करशील ना पुन्हा एकदा मोठे होउन.
मी पुढे होतो. शरयू नदीला वंदन करतो. घाटाची एक एक पायरी उतरत रहातो. पाणी पायाला लागते. कमरेला लागते, छातीशी येते . जड पावलानी मी पुढे चालत रहातो. पाणी मानेपर्यंत येते. नाकाशी येते. मी चालत रहातो. पाणी आता डोक्याच्या वर आहे.
पाण्याचा एक प्रवाह माझ्या नाका तोंडात घुसतो. मी गुदमरतो. श्वास संपत जातो. अंधार गडद होत जातो. पाय अधीकच जड होतात. मी कोसळतो. शुद्ध हरपत जाते.
शरयू नदीच्या पाण्यावरचं चांदणं स्वतःबरोबर मलाही विस्कटत अंताला नेतं.

_________________________________------_________________ चकोर ___________________________------_____________________________________________

चकोर शाह.

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

मालविका's picture

15 Dec 2018 - 8:40 am | मालविका

सगळे भाग वाचले . आणि खूपच आवडले आणि भावले पण .

विनिता००२'s picture

15 Dec 2018 - 10:31 am | विनिता००२

साधी माणूसकी असलेला पती व्हायला ही नालायक ठरलो मी. >> खरेच आहे :( ह्याच कारणाने मला राम आवडत नाही.

सीतेबरोबर तो पण राज्य भावाकडे सोपवून वनात गेला असता तर जास्त भावला असता.

विनिता००२'s picture

15 Dec 2018 - 10:31 am | विनिता००२

सुरेख लिहीलेय __/\__

श्वेता२४'s picture

15 Dec 2018 - 10:11 pm | श्वेता२४

तुमची हि लेखमाला खूप खूप आवडली

ज्योति अळवणी's picture

20 Dec 2018 - 11:42 am | ज्योति अळवणी

खूप आवडली तुमची लेखनमाला. रामाचे एक पती म्हणून मन वाचताना अस्वस्थ वाटले. अनेकदा मनात येऊन गेलंय की सीतेने तिच्या वयक्तिक आणि रामाबरोबरच्या सहाजीवनाकडे कसं बघितलं असेल? तिच्या मनातले विचार माझ्या दृष्टिकोनातून लिहावेत असं कायम वाटतं. तुमची लेखनमाला वाचून तर ही इच्छा अजून प्रबळ झाली आहे.

ज्योति अळवणी's picture

20 Dec 2018 - 11:43 am | ज्योति अळवणी

खूप आवडली तुमची लेखनमाला. रामाचे एक पती म्हणून मन वाचताना अस्वस्थ वाटले. अनेकदा मनात येऊन गेलंय की सीतेने तिच्या वयक्तिक आणि रामाबरोबरच्या सहाजीवनाकडे कसं बघितलं असेल? तिच्या मनातले विचार माझ्या दृष्टिकोनातून लिहावेत असं कायम वाटतं. तुमची लेखनमाला वाचून तर ही इच्छा अजून प्रबळ झाली आहे.

विजुभाऊ's picture

23 Dec 2018 - 6:31 am | विजुभाऊ

ते इथे या भागात लिहीलंय.
https://www.misalpav.com/node/41965

मस्त झाली "विजुभाऊ रामायण" मालिका.
पुढील लेखनास शुभेच्छा!

मालविका's picture

27 Dec 2018 - 8:34 pm | मालविका

अतिशय सुंदर अशी लेखमाला
सगळे भाग वाचले आणि आवडलेहि . एका वेगळ्या दृष्टीने लिहिलेले मनाला फार भावले