वी आर नॉट मेड फॉर ईच आदर - २

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
6 Dec 2018 - 6:59 am

उत्तर रात्र. टीप्पूर चांदणं पडलंय. समोर शरयू नदी वाहातेय. तीचं ते संथ वाहणारं पाणी चांदणं परावर्तीत करतं. वर पाहिलं की चांदणं आणि खाली पाहिलं तरी चांदणं.
आपण त्या दोन आकाशगंगांच्या मधोमध उभे असतो. जणू अंतरीक्षात उभे असल्यासारखे या विश्वाचे स्वामी असल्यासारखे.
हे दृष्य मी कित्येक वर्षांपासून पहात आलोय. अगदी लहान असल्या पासून.. पहिल्या वेळेस कधी पाहिले ते आठवतही नाही. कदाचित तात दशरथ महाराजानी मला इथे फिरायला आणलं असेल. कौशल्या आईने मला चिऊकाऊच्या गोष्टी सांगत दूधभात भरवला असेल.
मनात काहुर माजलं की इथे बसायचं. नदीचं हे संथ पात्र मनातला कोणताही वडवानल अग्नी शांत करतं.
मी आलोय खरा आशेनं पण हे आजचं काहुर शांत होईल का ते माहीत नाही. गेली कित्येक वर्षे जळत आलोय मी त्यात. इथे आल्यावर तर ते जास्तच जाणवतंय.
इथे . हो या इथेच या वाळूत आपण बसलो होतो असेच उत्तर रात्री चांदण्यात. त्या वेळी तू अल्लड शोडषा होतीस. नुकतंच लग्न झालं असेल त्या वेळेस आपलं . इथे आलो होतो त्यावेळेस दोघानाही खूप काही बोलायचं होतं. ऐकायचं होतं. पण इथे आलो हे चांदणं पाहिलं का कोण जाणे दोघेही एकदम शांत झालो. या नदीच्या आवाजाशिवाय इतर कोनतेच आवाज येत नव्हते. रातकिडे झोपी गेलेले असावेत. पाखरं अजून जागी व्हायची होती. त्या शांत पाण्याचा कलरव जणू चांदण्याचा आवाज वाटत होता.
आसूसल्या नेत्रानी तू तो आकाशातला आणि पाण्यातला चांदण्यांचा सोहळा पहात होतीस. तुझ्या डोळ्यात त्याचे प्रतिबींब उमटले होते. आणि मी त्या कडे पहात होतो. अनिमीष. एकटक . तुझा तो मुग्ध चेहेरा जणू चांदणं झाला होता . त्यावर निर्व्याज आनंद होता..... काय नव्हतं त्यात. शांत्पणा, अवखळपणा, कसलीतरी अनामीक ओढ, असीम समाधान , खट्याळपणा, लटका पोक्तपणा , अधीरता आणि गाढ विश्वास. आईच्या खांद्यावर मान टाकुन झोपलेल्या लहान बाळाच्या चेहेर्‍यावर असतो ना तसा.
आकाशात अगस्ती चा तारा क्षणोक्षणी रंग बदलत होता. तुझ्या चेहेर्‍यावरचे भावही तसेच करारी हट्टी भाबडे, अल्लड , आश्वासक होत होते . मी पहातच राहिलो. आदल्या दिवशीच्या घटनेबद्दल बोलणार होतो . राजवाड्यात माता कैकयीनी तातांना मागीतलेल्या वचनाबद्दल. त्यानी मला चौदा वर्षे राजप्रासाद सोडून वनवासात धाडावे अशी मागणी केली होती. त्याबद्दल बोलायचे होते. पण त्या क्षणी तुझ्या चेहेर्‍यावरचे ते अनाघ्रात भाव पाहिले. हे असले काही सांगून तुझे सूख मोडायचे म्हणजे पाप वाटले.
द्विधा अवस्थेत मी वाळूतून एक दगड उचलला आणि नदी पात्रात भिरकावला. त्या छोट्याशा दगडाने बरंच काही केलं. पाण्यात पडताना झालेल्या डुबूक आवाजाने नीरव शांतता भंगली. पाणी डहुळलं. आणि इतकावेळ जमिनीवर नदीच्या पाण्यात रमलेलं ते चाम्दण्याचं प्रतिबीम्ब विस्कटलं.
माझं लक्ष्य तुझ्या चेहेर्‍याकडे होतं . आपण खूप मन लावून काढत असलेली सुंदर राम्गोळी कुण्या व्रात्य पोराने मधून पाय ओढत फिसकटून टाकल्यावर होतील तसे भाव होते त्यावर. क्रोध, दु:ख हतबलता . तू कदाचित मनात चांदण्यांचे ठिपके जोडत रांगोळी काढत असावीस. ती फिस्कटली होती. मी खजील झालो.
माझ्या मनातले भाव् तू ओळखले असावेस. किंचीत हसलीस.म्हणालीस होईल पाणी शांत थोड्या वेळाने. तेंव्हा पुन्हा दिसेल चांदणे. खरं चांदणं तर वर आकाशात आहे. ते कुठे विस्कटलंय . किरकोळ दगडानं पाण्यातलं आभासी चांदणं विस्कटेल. खरं चांदणं तर कायमच रहातं अभंग. ते कुणीच भंगवू शकत नाही.
त्या वेळेस जाणवलं नव्हतं पण आत्ता जाणवतंय ते. त्या दिवशी मी नदीतलं ते चांदणं भंगल्या नंतर तुझ्या चेहेर्‍यावरचं चांदणं ही भंगलं होतं. अंतरीक्षातल्या त्या शाष्वत चांदण्यापेक्षा इथे माझ्या समोर हाताच्या अंतरावरच चांदणं हरवलं होतं. विस्कटलेली रांगोळी पुन्ह कितीही जोडायच म्हंटलं तरी विस्कटली गेल्याच्या खुणा जमिनीवर रहातातच तसं काहीसं झालं. त्या उत्तर रात्री तुझ्या चेहेर्‍यावर पुन्हा ते चांदणं दिसलंच नाही.
तु नक्की कशी हे कोडंच आहे. प्रत्येक वेळेस वेगलीच जाणवतेस. तुला पहिल्यांदा पाहिलं ते विश्वामित्र ऋषींच्या समवेत मिथीला नगरीत आलो होत तेंव्हा . जनक महाराजंच्या राजप्रासादात. शिवधनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा लावण्याचा " पण " ठेवला होता स्वयंवरासाठी. रावणासारख्या बलाढ्य पुरुषालादेखील ते उचलून पेलण्यात अपयश आले होते. राजसभेत त्या नंतर कोणीच ते आव्हान पेलण्यास पुढे येत नव्हतं. आम्ही ब्राम्हणकुमारांच्या वेषात होतो. विश्वामित्र ऋषीनी आज्ञा केल्यांनंतर मी पुढे झालो. खरंतर ते अवजड धनुष्य थेट जमिनीवरून उचलणं तस जरा कठीणच होतं जरा नीट बारकाईनं निरीक्षण केलं. दधीची ऋषीनी लिहीलेली वज्र संहीता आठवली. त्यातलं अवजड खड्ग उचलण्यासाठी चे तरफसूत्र आठवले . त्या सुंदर शिवधनुष्याला नमस्कार केला. एका विशीष्ठ ठिकाणी पायाच्या अंगठ्याने दाब देवून ते अवजड धनुष्य सहज उभे केले .जमीनीवर एक टोक ठेवून पेललं. प्रत्यंचा दुसर्‍या बाजूने लावण्यासाठी म्हणून ओढली आणि अचानक ते शिवधनुष्काडडाडकन आवाज करत मधोमध मोडलं. बहुधा त्याचा वापर होत नसल्याने सांधणी कमकूवत झाली असावी. त्या कडकडाटाने सभेतली शांतता भंगली.
त्याचबरोबर दोनतीन हर्षभरीत चित्कार उमटले. जनक महाराजांच्या डावीकडील गवाक्षा चा पडदा क्षणभर बाजूला झाला आणि पहाटे चमकणार्‍या वृष्चीक राषीतील अनुराधा नक्षत्रासारखा तुझा चेहेरा दिसला. तुझ्या मागे उर्मीला आणि सुदेष्णा उत्तेजीत होऊन एकमेकीना टाळ्या देत होत्या .
एकक्षण नजरभेट झाली. इतक्या दुरूनही त्यातले तेज जाणवले. अंगावर रोमांच उभे राहिले. कितीतरी वेळ मी तसाच उभा होतो. भानावर आलो तेंव्हा लक्ष्मण आणि विश्वामित्र गुरुजी माझ्या माग एउभे हिते, जनक महाराजांचे अमात्य चंडीदास सभेला संबोधुन स्वयंवर संपन्न झाल्याचे सांगत होते. मी पुन्हा गवाक्षाकडे पाहिले , त्या रेशमी पटलामागे कोणीच दिसले नाही.
आम्ही आतिथी कक्षात आलो. हुरुजी आणि जनकमहाराज काहितरी चर्चा करत होते. लक्ष्मण मला काहि तरी सांगत होता. माझे तिकडे लक्ष्यच नव्हते. मला सारखा तिकडे गवाक्षाच्या पटला मागे दिसलेला तुझा चेहेराच डोळ्यासमोर येत होता.
दोनचार दिवसातच आपले लग्नं झालं. मंगलवाद्यांच्या साथीने आपण आयोध्देत आलो. आपल्या स्वागतासाठी नगरीत अयोद्धावासीयांनी कमानी उभारल्या होत्या. सडे रांगोळ्या घातल्या होत्या. नागरीकंच्या कौतुकाच्या नजरा तुझ्यावरून हलत नव्हत्या.
तात दशरथ महाराजांना वानप्रस्थाचे वेध लागले होते. वानप्रस्थास जाण्यापूर्वी राज्यषकट नीट सांभाळता या दृष्टीने आम्हा चौघा भावंडाना वेगवेगळ्या शास्त्रांचे ज्ञान दिले जाऊ लागले. आश्रमात जाऊन राज्यशास्त्र शिकणे आणि ते प्रत्यक्ष अमात्यांकडुन ऐकणे यातला फरक अनुभत होतो .
राजसभेत काय घडले हे जाणून घेण्यात तुला खूप रस असायचा. वेशेषतः क्षेत्रपालांच्या आणि भूमापनाच्या समस्या ऐकण्यात. तू त्या सहज सोडवायचीस.
मला तू आश्रमातल्या गोष्टी विचारायचीस. मी बोलत असताना मला एकटक न्याहाळायचीस. माझा चेहेरा तुला जणू नजरेत साठवून ठेवायचा असावा. मला ते जाणवायचं. मी अस्वथ व्हायचो . बोलण्यातील लय तुटायची. तुझ्या ते लक्ष्यात यायचं आणि तू गालातल्या गालात हसायचीस. त्या मुळे मी आणखीनच अस्वस्थ व्ह्यायचो. बोलतानाचा विषयच विसरायचो. ती माझी धांदल पाहून तुला अजून हसु यायचं. पोटावर हात ठेवून तू खळखळून हसत सुटायचीस. हसून हसून तुझा चेहेरा आरक्त झालेला व्हायचा. रेखीव भुवयांखालचे टप्पोरे चमकणारे डोळे , आरक्त गाल आणि हसताना दिसणार्‍या त्या कुंदकळ्यांसारख्या शुभ्र दम्तपंक्ती . एखाद्या प्राजक्ताच्या फुलासारखी दिसायचीस तू .
राज्य कारभारामुळे मला प्रासादात यायला उशीर व्हायचा . तू माझी वाट पहात असायचीस. कधीकधी गवाक्षाच्या बाजूलाच आसनावर आम्गाचं मुटकुळं करून झोपी जायचीस. अगदी लहान बाळासारखी.. झोपेतसुद्धा इतकी वाट पाहुनही मी अजून का आलो नाही ही तक्रार दिसायची तुझ्या चेहेर्‍यावर. .
एखादे खेळणं न मिळालेल्या लहान मुलासारखे गाल फुगलेले असायचे . तुझा तो निरागस मुखडा मला इतका आवडायचा म्हणून सांगू. जितका पहावा तितका मी अधिकच त्याच्या प्रेमात पडत जायचो. शक्य असतं ना तर तो चेहेरा चित्रात बद्ध करुन ठेवला असता. तुला उठवणं जीवावर यायचं. थंडी वाजू नये म्हणून माझं उत्तरीय तुझ्या अंगावर पांघरायचो.
सकाळी प्रसादात मंगलवाद्यांच्या आवाजाने जाग यायची त्याहीपेक्षा जाग यायची ती त्या मंगलवाद्याच्या सुरांना ताल अर्पण करणार्‍या तुझ्या पैंजणांच्या नाजूक आवाजाने. तुझं आवरणं चालु असायचं. संपुर्ण प्रासादात तू अंगाला लावलेल्या उटीचा चंदनगंध पसरलेला असायचा. पूर्वेकडून येणारी कोवळी सुर्यकिरणेही कशी सुगंधी होऊन यायची त्यामुळे.
तुझी लगबग सुरू असायची चंदनाचा मंद गंध, पाखरंची किलबील ,कोवळी सोनेरी सूर्यकिरणे, मंगलवाद्यांचा आवाज आणि या सगळ्याला रुमझुमत तालमालेत बांधणार्‍या तुझ्या पैंजणांचा किनरा आवाज. कुबेराच्या नंदनवनाचे मालक आहोत असं वाटायचं तेंव्हा. जागेपणी अनुभवायला येनारे हे सुखस्वप्नं तसेच धरून ठेवावे असे वाटायचे. मी पांघरूण डोळ्यावर घेवून त्याच्या आडून तुझी लगबग पहात रहायचो. दासदासीना घर नीट नेटके ठेवायला सांगणं असो की मग भोजन घरात न्याहारीसाठी पान मांडणे असो गोशाळेत गाईना चारा पाठवणं सर्वांवर देखरेख करताना तू दालनात फुलपाखरासारखी बागडत असायचीस.
मी राज्यकारभार शिकायला दिवसभर मग्न रहाणार तू जे दिसशील ते आत्ताचे क्षणच असे म्हणत मी उठायचोआणि तू कौसल्या आईनी नाहीतर उमित्रा आईनी बोलावलं म्हणून दालनातून बाहेर पडायचीस...... तुला तसे जाताना मी मनात हसुन म्हणायचो...." यां चिंतयामी मयी सततं..... सा विरक्ता"
हा दिवसही कालचा दिवस गेला तसा भुर्रकन उडून जायचा. भेटणं तर सोड साधे बोलणं ही व्हायचं नाही

क्रमशः

प्रतिभाकथा

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

6 Dec 2018 - 9:46 am | श्वेता२४

किती सुंदर विशेषणे आणि चित्रदर्शी लिखाण! खूप खूप आवडलं. पु.भा.प्र.