वी आर नॉट मेड फॉर ईच आदर - ३

Primary tabs

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
11 Dec 2018 - 7:45 am

मी राज्यकारभार शिकायला दिवसभर मग्न रहाणार तू जे दिसशील ते आत्ताचे क्षणच असे म्हणत मी उठायचोआणि तू कौसल्या आईनी नाहीतर सुमित्रा आईनी बोलावलं म्हणून दालनातून बाहेर पडायचीस...... तुला तसे जाताना मी मनात हसुन म्हणायचो...." यां चिंतयामी मयी सततं..... सा विरक्ता"
हा दिवसही कालचा दिवस गेला तसा भुर्रकन उडून जायचा. भेटणं तर सोड साधे बोलणं ही व्हायचं नाही

मागील दुवा https://www.misalpav.com/node/43729
मी फार बोलका नाही. त देखील कधी बोलून दाखवले नसेल. पण तात दशरथ महाराजानी तुझी तगमग ओळखली असावी . थोड्या फार फरकाने तू , मी काय पण लक्ष्मण , उर्मीला , भरत सुदेष्णा , शत्रुघ्न , मांडवी सर्वंचीच अवस्था एकसारखीच होती . आपण सगळे मृगयेसाठी राजवनात गेलो. ते चारपाच दिवस खरंच भारून जावे असे अद्भूत होते. तुम्ही चौघीही बहिणी राजमहालातील पोक्तपणा टाकून सख्या झाल्या होतात.ती इतकी बोलकी असशील हे मला पहिल्यांदाच जाणवले. त्या चार दिवसात तुझी ओळख प्रत्येक क्षणी नव्याने होत गेली. तुला जंगली वनस्पतींची उत्तम माहिती आहे. पशु पक्षी तुला सहज वश होतात, फुलांच्या गंधावरुन तूला त्याचे औषधी गुण साम्गता येतात. शततंत्री वीणा वादनाने तू मानवच काय पण हंस मोर आदी पक्ष्यांनाही मोहीत करू शकतेस, , पहाटेचे ते विभास रागाचे सूर दिवसभर मनात रेंगाळत राहीले होते. एक बुद्धीमान मेधावी सहचरी म्हणून तुझ्याबद्दलचा आदर वाढतच गेला.काव्यशास्त्र राज्य शास्त्राचं तुझं ज्ञान उपजतच असावे.

कार्येषु मन्त्री, करणेषु दासी,भोज्येषु माता शयनेषु रम्भा । धर्मानुकूला क्षमया धरित्री , असंच वर्णन करत आलं असतं तुझं . पतीला सहचरीबद्दल ईर्षा न वाटता तीच्याबद्दल आदर वाटावा अशी स्त्री लाभणे हे पुरूषाचे भाग्य असते. माझ्या वर कोणताही प्रसंग येवो तू खंबीरपणे माझ्या सोबत असशील , माझ्या प्रमादांना समजून घेशील वेळ पडल्यास परखड सल्ला देशील , अधिकारवाणीने ताडन करशील अशीच होतीस तू. आणखी काय हवंअसतं पुरुषाला त्याच्या सहचरी कडून. तुझ्या सोबत असताना मनंदनवावनात होतो.
मग तो दिवस आला. तुझ्याशी बोलायचं मी टाळलं होतं. माता कैकयी असं काही करतील हे कोणाच्या स्वप्नातही नव्हतं.
पुत्रवत प्रेम करणारी माता कैकयी, लहानपणी ज्यानी अंगाखांद्यावर खेळवळ त्यानी अचानक अंगावर चिकटलेलं गोचीड काढून फेकून द्यावं तसे भिरकावून फेकून दिलं. कोण्या कुब्जेच्या , यःकश्चित मंथरेच्या साम्गण्यावरून रामाला चौदा वर्षे वनवास आणि भरताला राज्याभिषेक ही मागणी केली. मला तात दशरथ महाराजांचे काही आश्चर्य वाटले नाही . कधी काळी एका अनाम क्षणी दिलेल्या वचनासाठी त्यानी ते केलं. रघुकुल रीत त्यानी पाळली. जिथे युवराज म्हणून आत्मसन्मानाने वावरलो त्या राजसभेत जाऊन एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे स्वतःच्या हद्दपरीचा राजाअदेश ऐकुन आलो. अर्ध्या क्षणासाठी बंडखोरीचा विचार मनात आला. पण तो तिथच झिडकारून टाकला . पित्याचा निर्णय मानणं हे पुत्राच्या प्रथम कर्तव्यांपैकी एक.असं गुरुजीनी शिकवलं होतं. अयोद्धेच्या नागरीकंसाठी मी आदर्श पुत्र होतो. राजसभेचा आदेश मी उधळून लावू शकलो असतो.पण तात दशरथ महाराजांचा नाही. त्या क्षणीतरी तो माझा निर्णय नव्हता. ईश्वरेच्छा बलीयसी म्हणत तुला विचारणे , सांगणे वगैरे काही झालंच नाही. मी वनवासाला तयार झालो. नेसत्या वस्त्रांनिशी केवळ हातातल्म धनुष्य आणि पाठीवर बाणांचा भाता घेवून मी बाहेर पडलो. माझ्या मागोमाग तू .
तू माझ्या सोबत येशील का हे तुला विचारायच माझे धाडसंच नव्हतं. बंडखोरी न करता वडीलांनी दिलेल्या वचनाचे पाल करायचं आणि स्वतःला एक आदर्श पुत्र सिद्ध होतं. त्या क्षणी ते योग्य वाटले तरी ते क्षात्र तेजा विरुद्ध होतं. पराभूत मनस्थ्तीत रहायची माझी मानसीकता नाही. तू ते ओळखलं असावंस. माझ्या मागोमाग तूही वनवासाला तयार झालीस. तोतुझा निर्णय होता. ज्या राजप्रासादात युवराज्ञी म्हणून वावरलीस तिथे कोणाच्या तरी दयेला पात्र होऊन लाजीरवाणं जगण तू नाकारलंस.
फुलं वेचली तिथे गोवर्‍या वेचणं तुला नको होतं.
पतीला त्याच्या संकटकाळात साथ देणारीआदर्श पत्नी होणं स्वीकारलंस. अगदी खरं सांगायचं तर एक मोठा आधार वाटला मला.
तुझ्या काळजीने लक्ष्मणही आपल्या सह आला.
निबीड अरण्यातून तू सहज वावरत होतीस. पाने फुले फुलपाखरे यांच्याशी गप्पा मारत होतीस. तो तो क्षण तू त्या त्या वेळेस जगत असायचीस. त्या वेळेस मी मात्र हे असं काघडलं असावं याच भूतकाळात अडकलेलो असायचो .
अयोद्धेत असताना कामातून सवड मिळायची नाही त्याची उणीव तू इथे भरून काढत होतीस. राज्यशास्त्र , न्यायशास्त्र शकट शास्त्र , या बद्दल तू विचारायचीस, मी आश्रमात शिकायला होतो त्यावेळेस त्यावेळच्या घटनांबद्दल विचारायचीस. मी ही भरभरून बोलायचो. कधी थट्टा मस्करी करत, कधी खट्याळपणे कधी गंभीर होत.
तू मला त्प्र्पराभूत मनस्थितीतून बाहेर काढलंस किती सहजपणे.
चित्रकूट पर्वतावर त्या ऋषीमातांनी तुझी वेणीफणी केली होती. पाना फुलांच्या दागिन्यांनी तुला नटवले होते. वनराणी वाटत होतीस तू. तुझं हे रूप मला नवीनच होतं.
राजप्रासादातील ते सगळे क्रुत्रीम सोपस्कार बाजूला ठेवून तू वावरत होतीस. त्या वातावरणात जणू तू तिथलीस असावीस इतक्या सहजपणे.
कोण म्हणतं अरण्यात जगणं अवघड असतं उलट या इतकं मोकळं आनंदी जगणं कुठंच नसतं . राजप्रासादात सतत कसल्या ना कसल्या दडपणाखाली रहाणं कुठं आणि हे इतकं भयमुक्त रहाणं कुठं. . राजप्रासादात कोण हेर असेल , शत्रुराष्ट्र काय करतंय , राज्यात कुठे बंडाळी नाही ना होत, या चिंतेत सुवर्णमंचकावरच्या मृदू मखमली शय्येवरही रात्रभर जागत रहाणं कुठे आणि दिवसासभराच्या थकव्यानं टणक जमिनीवराही पडल्यापडल्या गाढ झोपणं कुठे. तूलनाच नाही.
हे तुझ्या इतकाच सहजपणे मी ही अनुभवू लागलो. एखादी गोष्ट जशी आहे तशी स्वीकारली की तीचा त्रास होत नाही. कुठल्याच गुरू कुलात न शिकवली जाणारी गोष्ट
तू मला नकळत शिकवलीस. माझी गुरू झालीस. एका गंभीर राजपुत्राचा आनंदी वनवासी मधे कायापालट केलास.
तो सुखाचा काळ इतक्या वर्षांनंतरही मनात तस्साच कायम आहे. चित्रकाराने चित्रत बद्ध केलेल्या चित्रासारखा.
मग तो दिवस आला. मानवाला सुखाची सवय लागली तर तो कर्तृत्वशून्य होतो असं नियतीला वाटंत असावं.एका मोहाच्या क्षणी तुला कांचनमृग दिसावा, तू त्याची हाव धरावीस , मी त्या मागे धावावं. तुझ्या रक्षनार्थ आखलेली लक्ष्मणरेशा ओलांडावीस आणि ....... सगळं कसं कुणीतरी आखून ठेवल्यासारखं .
कुटीत परतलो तेंव्हा तू दिसली नाहीस. आसपास कुठे गेली असावीस . बरीच संध्याकाळ झाली तेंव्हा मी कावराबावरा झालो. आसपास कुठे गेली असतीस तर एव्हाना यायला हवी होतीस. पशुपक्ष्यांची तुला भिती कधीच नव्हती. तुझ्या रक्षणार्थ आखलेल्या लक्ष्मणरेशेला आता काहीच अर्थ उरला नव्हता .
अगोदर स्वतःवर चिडलो. मग तो राग लक्ष्मणावर काढला.
तू कुठेच नव्हतीस. पूर्व उत्तर , पश्चिम , दक्षीण तुला कुठे शोधायच्म तेच कळत नव्हतं. सगळ्या दिशा जणु एका बिंदूत एकवटल्या होत्या.मला इतकं दिशाहीन कधीच वाटलं नव्हतं. तुझा शोध घेताना वेडापिसा झालो . सैरभैर. सगळा परीसर पालथा घातला. आपण ज्या ज्या ठिकाणी फिरलो त्या त्या वाटेवरून गेलो कुठेतरी तू दिसशील म्हणून पुन्हा पुन्हा शोधत राहिलो. जिथे कधी टेकलो होतो त्या दगडांना विचारत राहिलो. झाडांना विचारत राहीलो, तू स्पर्ष केलेल्या पानाफुलाम्ना कवटांळं राहीलो. जणू त्याना निरोप देवून गेली होतीस आणि ते तो निरोप मला सांगणार होते. त्याच त्याच ठिकाणी पुन्हा पुन्हा शोधून काही वेगळं मिळत नाही हे मला समजत नव्हतं. मी वेडा झालो होतो. हताश झालो होतो. एखादा ओळखीचा नाद आला , एखादं ओळखीचे झाड दिसले की मी तिकडे आशेने धावायचो. तू दिसली नाही की पुन्हा निराश व्हायचो. आशा निराशेचे इतके हिंदोळे जगात कोणीच अनुभवू नयेत.
सगळा दिवस तुला शोधण्यात जायचा. रात्री कुटीत परत येवूच नये असं व्हायचं. आल्यावर मग प्रेतवत पडून असायचो. अन्न पाणीही नको वाटायचं.
अयोद्धेतून बाहेर पडल्य अनंतर तू माझ्यात नवचेतना भरली होतीस. आनंदी जगणं म्हणजे काय असतं हे तुझ्या सोबत अनुभवत गेलो. आणि आता तू नाहिशी झाली होतीस.
डोळे मिटून रिमझीम पावसाची चव चेहेर्‍यावर पडताना अनुभवत असावं आनि त्याच वेळेस ओठांवर विंचवाने डंख मारावा तसं झालं होतं.
पशुपक्षी झाडे योग्य सहचर मिळाल की फुलतात. त्यांच्या अयुष्यात अर्थ येतो नाहीतर त्यांचं एक वठलेलं झाड होतं ...कणाकणानं विरत जाणारं .. कुठल्याच वार्‍या पावसानं मोहरुन न येणारं.... क्षणाक्षणानं विझत जाणारं... तुझ्या शिवाय मी किती अपूण आहे हे अनुभवत होतो.
रोज तुला शोधत होतो . पण सगळ्या दिशा अंधाराकडेच नेत होत्या.
मग एक दिवस लक्ष्मणाला दक्षीणेकडे कुठेतरी काही आभूषणे जोडवी सापडली. एकदम हुरूप आला. वठलेल्या ओंडक्याला पालवीचं स्वप्न दिसलं. तू कुठे असशील कशी असशील या विचारानं पुन्हा उसळी घेतली. ..... तू असाशील ना? एका अभद्र विचाराने मनाचा कब्जा घेतला. तुला कसल्या अवस्थेत पहावं लागेल . फाटकी तुटकी जीर्ण विदीर्ण .. एक क्षण काळजाचा थरकाप उडाला एका भयंकर पूर्णविरामाच्या विचारानं. मग दुसरे मन ठाम नाही म्हणाले. मनातून अभद्र पूर्ण झटकून टाकले. एका आशेने उभारी घेतली. आणि तुझ्या ओढीने दक्षीणे कडे निघालो. लक्ष्मणाला सापडलेली तुझ्या पायातली जोडवी ... पुन्हा पुन्हा त्याचा स्पर्ष घेत होतो. तू आहेस ही आश्वासक भावना मनात जोर धरू लागली.
मग जटायूच्या युद्धाची बातमी समजली. तुला कोणीतरी आकाशमार्गे घेवून गेलं हे समजलं.
माझं विझलेलं क्षात्रतेज जागं झालं. बाहू फुरफुरू लागले. तो कोणीही असो समोर आल्यावर त्याच्या पुढच्या पिढ्या जन्माला येणार नाहीत त्याच्या सहीत त्याचा वंश संपवणार कायमचे शासन करायचे या विविराने पुढे चालत राहीलो.
वाटेत ऋष्यमुख पर्वताजवळ किष्कींधा नगरीत सुग्रीवाची भेट झाली. सारासार विवेक बाजूला ठेवून वालीचा वध केला. आता माझ्याकडे सुग्रीवाच्या सेनेचे बळ होते.
त्या सेनेला संपाती गिधाडाकडून अवकाशमार्गे तू लंकेच्या दिशेने गेलीस हे समजले. हनुमानाने लंकेत जावून त्याची खात्री करून घेतली.
एका दुर्दम्य निश्चयाने लंकेवर स्वारी केली. युद्धाच्या अंती तुला पाहिले.तू अधीकच कृष झाली होतीस. पण तुझा चेहेरा दीप्तिमान हिर्‍या सारखा चमकत होता. धावत तुझ्याकडे यावं आणि तुला घट्ट मिठी मारावी असं झालं होतं. कुलमर्यादा आणि राजसंस्कार आड आले नसते तर तेच केलं असतं.
मी अधीर झालो होतो. तू ही झाली असावीस. पग पुढचे काही दिवस बिभीषणाकडे लंकेची व्यवस्था देणे वगैरे राजसोपस्कारात गेले.
मी आणि तू दोघेही एकाच भूमीवर काही पावलांच्या अंतरावर असूनही भेटता येत नव्हते . एखादा साधा सैनीक असतो तर बरे झाले असते. राजपुरुषाने मर्यादा राखायची असते. परभूमीवर पत्नीला भेटायचे नसते.
आता अयोध्येला परतायचे होते. वनवासाची मुदतही सम्पली होती. मला तुला वाजतगाजत अयोध्येत न्यायचे होते राजसिंहासनावर विराजमान करायचे होते.
सोने जसे तावून सुलाखून निघाल्यावर त्याला झळाळी प्राप्त होते तसे राजाचे असते. त्याला एखादा किरकोळ लोकापवाद सुद्धा डाग ठरू शकतो. मला ते नको होते. शंभर नाही हजार टक्के खात्री होती की रावणाने तुला लंकेत हातही लावला नसेल त्याने तसे काही करायचा विचारजरी केला असता तरी तुझ्या धधगीत नजरेने त्याला उभा जाळला असता.
पण अयोध्येची राणी म्हणजे झळाळतं सुवर्ण.... मला कोणताही लोकापवाद , लोकनिंदेचा कोणताही डाग नको होता त्यावर. तुझे शुद्धत्व सिद्ध करण्यासाठी मी तुला अग्निदिव्य करायला साम्गितलं. तू काहीच बोलली नाहीस. क्षणभरासाठी तुझ्या चेहेर्‍यावर बदल जाणवला. क्षणभरासाठीच. तू माझ्या कडे अविश्वासाने पाहिलेस. क्षणभरासाठीच. त्या नजरेनं विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर मी देवू शकत नव्हतो.
काय नव्हते त्या नजरेत? खाऊ मिळेल या प्रेमाच्या आशेनं विश्वासाने जवळ आलेल्या निरागस बालकाला चाबकाचा फटका मारल्यावर यावी तशी विश्वासघात झाल्याची भावना होती, हे असं का केलंस हा प्रश्न विचारणारी. .... माझ्यात हिम्मत नव्हती त्या नजरेला थेट नजर भिडवण्याची.
आपल्या पतीपत्नी या नात्यातली लक्ष्मणरेशा मी ओलांडली हे साम्गणारी ती नजर ....
एक क्षणच हे तुझ्या चेहेर्‍यावर होते. पुढच्याच क्षणी एका प्रखर तेजाने आत्मविश्वासाने त्याची जागा घेतली. माझ्या प्रेमासाठी तुला अग्निदिव्याचीही फिकीर नव्हती.
लंकेत , परमुलूखात इतका काळ एकटे रहाण्याचे अग्निदिव्य तू पार पाडले होतेस. तू पुन्हा नव्याने अग्निदिव्य करायला तयार झाली होतीस. मी मात्र लोक काय म्हणतील
या लोकभयाने तुला त्यात ढकलत होतो. तुझा काहीच दोष नसताना.. आभासी कर्तव्य आणि खर्‍याखुर्‍या भावना यात मी आभासी जगाला महत्व देत गेलो
लोक काय म्हणतील या इतकं आभासी जगात काहीच नसतं. त्या भयामुळे आपल्याच लोकाना आपण जाळत असतो. मी तुला थेट आगीत ढकललं होतं आणि स्वतःही आत जळत गेलो.

क्रमशः

प्रतिभाकथा

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

11 Dec 2018 - 12:13 pm | श्वेता२४

मनोगत लिहायलाही एक हातोटी लागते. ऐतिहासिक/ पौराणिक पात्रांच्या बाबतीत तर लागतेच लागते. एखाद्या प्रसंगी त्या व्यक्तीची काय मनस्थिती असेल आणि त्याने काय विचार केला असेल हे वाचणाऱ्यालाही पटावे लागते. तुमचे लेखन असेच आहे. रामाने आणि सीतेने असेच विचार केले असतील असे वाटते. तुमची लेखनशैली मला शिवाजीराव सावनतांची आठवण करून देते. स्त्री आणि पुरुष दोघांच्याही मनाचा ठाव अचूक घेणाऱ्या तुमच्या लेखणीला सलाम. खूप खूप आवडलं

विजुभाऊ, लिहिताय चांगलं पण थोडे शुद्धलेखन सांभाळा की.

ज्योति अळवणी's picture

12 Dec 2018 - 2:00 pm | ज्योति अळवणी

खूप छान लिहिले आहे. माझ्याही मनात कायम हाच विचार येऊन जातो. खूप आवडलं