श्रीगणेश लेखमाला - एक अपूर्ण, तरीही यशस्वी प्रयोग - सौर चूल

सुधांशुनूलकर's picture
सुधांशुनूलकर in लेखमाला
16 Sep 2018 - 11:35 am

.

|| श्री गुरवे नम: ||

एक अपूर्ण, तरीही यशस्वी प्रयोग
सौर चूल

   

सूर्य... आपल्या ग्रहमालेचा स्वामी. पृथ्वीवरच्या सर्व जीवसृष्टीचा प्रमुख ऊर्जास्रोत. सूर्याच्या प्रकाश-ऊर्जेपासून वनस्पती अन्न तयार करतात. प्राण्यांमध्ये ती क्षमता नाही. मनुष्यप्राण्याने मात्र विज्ञानात प्रगती साधत सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा उपयोग करून घ्यायचं तंत्र साध्य केलंय.
   
सूर्याकडून दोन प्रकारे ऊर्जा मिळते – प्रकाश आणि उष्णता. आपण या दोन्हींचा वापर करू शकतो. सौर घट (फोटोव्होल्टेइक सेल) वापरून प्रकाशऊर्जेचं विद्युतऊर्जेमध्ये रूपांतर करून ती वीज वापरता येते. सध्यातरी हा खर्चीक पर्याय आहे, आणि स्वस्त सौर घट निर्मितीसाठी जगभर संशोधन चालू आहे.
   
सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेचा मात्र आपण त्या मानाने सहज उपयोग करू शकतो. सौर चूल, सौर बंब असे अनेक पर्याय घरच्या घरीच स्वस्तात तयार करता येतात किंवा बाजारात उपलब्ध आहेत. मुंबईच्या मराठी विज्ञान परिषदेसारख्या अनेक संस्था यासाठी कार्यशाळाही आयोजित करत असतात. अशाच एका कार्यशाळेत मी सौर चूल बनवायचं प्रशिक्षण घेतलं आणि 'टाकाऊपासून टिकाऊ आणि उपयोगी', कमीत कमी सामान विकत आणावं लागेल अशी सौर चूल बनवायचा प्रयत्न केला, त्याचीच ही कहाणी.
   
घरात एकदा साफसफाई करताना एक जुनी ब्रीफकेस सापडली. अ‍ॅरिस्टोक्रॅट, व्हीआयपी वगैरे प्लास्टिकच्या आधुनिक बॅगांच्या जमान्यात ही कार्डबोर्डची बॅग टाकाऊ झाली होती. सौर चूल बनवायला ती वापरता येईल, असा विचार आला. ते दिवस उन्हाळ्याचे, आंब्यांचे होते. अनायासे आंब्याची लाकडी पेटी (सौर चुलीची चौकट म्हणून) आणि वाळलेलं गवत (उष्णतारोधक म्हणून) घरात आलीच होती, हे वापरायचं ठरवलं.   
IMG_7446

प्रथम बॅगेच्या आतल्या बाजूला लाकडी फळ्यांची उभी चौकट बसेल अशा आकारात पेटीच्या लाकडी फळ्या कापून घेतल्या. त्या एकमेकांना खिळ्यांनी जोडून उभी चौकट तयार केली. मग २२ गेजचा अ‍ॅल्युमिनियमचा पत्रा, काळा रंग (ब्लॅकबोर्ड रंग) आणि एमसील एवढ्याच गोष्टी विकत आणाव्या लागल्या. लाकडी चौकटीचं माप घेऊन, खालील रेखाचित्राप्रमाणे अ‍ॅल्युमिनियमचा पत्रा आरेखून घेतला. पत्र्याचे चारी कोपरे खालील रेखाचित्रात डाव्या बाजूच्या आरेखनात दाखवल्याप्रमाणे कापून घेतले आणि पत्रा वाकवून घेतला. 
solarcooker  
पत्र्याच्या कडा वाकवून, कापलेले कोपरे एकमेकांवर ठेवले. चौकोनाच्या प्रत्येक बाजूला असलेली एक वाढीव पट्टी लगतच्या बाजूच्या मागे नेऊन पुढच्या आणि मागच्या बाजू एकमेकांना एमसीलने चिकटवल्या. अशा प्रकारे तयार झालेलं अ‍ॅल्युमिनियमचं चौकोनी 'भांडं' लाकडी चौकटीवर खिळ्यांनी ठोकून घेतलं. पत्र्याच्या भांड्याला आतून काळा रंग लावला.

IMG_7464  IMG_7466  IMG_7465
   
अ‍ॅल्युमिनियमचा पत्रा उन्हात तापतो, काळा रंग उष्णता शोषून घेतो. म्हणून अ‍ॅल्युमिनियम पत्र्याच्या भांड्याला आतून काळा रंग लावायचा. या जुळणीचा उभा छेद रेखाचित्रातील उजव्या बाजूच्या आरेखनासारखा दिसेल.
   
रेखाचित्रातील उजव्या बाजूच्या आरेखनात दिसत आहे त्यानुसार, तसंच ही लाकडी चौकट उलटी केली, तर असं लक्षात येईल की चौकटीच्या उंचीपेक्षा अ‍ॅल्युमिनियम भांड्याची उंची कमी आहे (अ‍ॅल्युमिनियम भांड्याचा तळ थोडा वर उचलल्यासारखा वाटतो) आणि दुसरं म्हणजे लाकडी चौकट आणि अ‍ॅल्युमिनियम भांडं यांच्यामध्ये जागा शिल्लक राहते.
   
IMG_7453
   
उष्णतारोधक गोष्टींनी ही जागा भरायची. या जागेत वाळलेलं गवत भरलं आणि खोक्याचा एक पुठ्ठा लावून तळ बंद करून टाकला.
IMG_7457 IMG_7458
ही लाकडी चौकट बॅगेत फिट्ट बसली. सौर चूल आता आकार घ्यायला लागली.
   
IMG_7463
   
आता पुढची पायरी म्हणजे, भांड्यात आलेली उष्णता साठवून ठेवायची, बाहेर जाऊ द्यायची नाही – अर्थात सौर चुलीला पारदर्शक झाकण हवं. झाकणासाठी काच, अ‍ॅक्रायलिक शीट वापरता येतं. एका ओरिगामी प्रदर्शनात वापरण्यासाठी काही अ‍ॅक्रायलिक शीट्स आणली होती, प्रदर्शन संपल्यावर त्यातलंच एक शीट घेऊन आलो. ते लाकडी चौकटीवर बसवताना छोट्या फटी राहतात. त्या बुजवण्यासाठी पॉलीयुरेथेन फोम, कापूस वापरायचं. आमच्या घराजवळच फॅन्सी पादत्राणं उत्पादन आणि होलसेल विक्री करणारी दुकानं आहेत, त्यांच्याकडून पॉलीयुरेथेन फोमचे तुकडे मिळवले.
 
IMG_7454
 
आणि एवढं झाल्यावर, झाकण लावायचं हे पुढचं काम काही कारणांनी राहून गेलं….. हत्ती गेला, शेपूट राहिलं….. बॅग – म्हणजे सौर चूल माळ्यावर जाऊन पडली…….
   
दरम्यान पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. मग मिपा श्रीगणेश लेखमालेसाठी 'DIY - डू इट युअरसेल्फ' हा विषय जाहीर झाला आणि अर्धवट राहिलेल्या या सौर चुलीची एकदम आठवण झाली. माळ्यावरून सौर चूल खाली काढली, तिच्यावरची धूळ झटकली आणि त्यावर ऍक्रायलिक शीट नुसतं ठेवून, ती पाऊस नसलेल्या दिवशी उन्हात ठेवून एक ट्रायल घेतली. हुर्रे! यशस्वी!
 
IMG_7459
 
आता राहिलेलं काम म्हणजे चौकटीच्या मापाचे पॉलीयुरेथेन फोमचे तुकडे कापून चौकटीला चिकटवायचे आणि चौकटीच्या मापाचं अ‍ॅक्रायलिक शीट कापून बिजागऱ्यांनी ते चौकटीला जोडायचं, कुठे छोटीशी फट राहिली असेल, तर ती कापसाने बुजवायची की सौर चूल वापरायला तयार. पावसाळ्यानंतर ही सौर चूल वापरायला तयार होईल.
   
ही सौर चूल तयार करताना मी टाकाऊ सामान वापरलं. त्याऐवजी सगळं सामान विकत आणलं, तरी फार खर्च येणार नाही. आपल्याला सोईस्कर मापाच्या प्लायवूडच्या फळ्या, त्या मापानुसार २२ गेजचा अ‍ॅल्युमिनियम पत्रा, काच / अ‍ॅक्रायलिक शीट, पॉलीयुरेथेन फोम तुकडे / कापूस, एमसील, काळा रंग (ब्लॅकबोर्ड रंग) असं सामान वापरून कमी खर्चात ही सौर चूल बनवता येईल.
   
या सौर चुलीमध्ये भात, डाळ, भाज्या छान शिजतात. (बटाटे शिजवून पाहिले नाहीत अजून.) शेंगदाणे, रवा इ. मस्त भाजले जातात. पापड-कुरड्या इ. वाळवण, साठवणीसाठी काही गोष्टी मस्त ड्राय होतात. (मासे ड्राय केले नाहीयेत अजून.) शिजवताना अन्नातली पोषक तत्त्वं नष्ट होत नाहीत, जळायची भीती नाही. पुरेसं ऊन येतं अशा खिडकीतही ही चूल ठेवता येईल. हिच्या वापराने जवळजवळ ३०-३५% इंधन बचत होऊ शकते.
   
आपल्या देशातल्या बहुतेक भागात पावसाळ्याचे दिवस वगळता वर्षाचे आठ महिने दिवसाचे सात-आठ तास मुबलक सूर्यप्रकाश मिळतो, तोही अगदी फुकट. आता हळूहळू पारंपरिक ऊर्जास्रोत संपत चालले असताना आपण या फुकट मिळणाऱ्या ऊर्जेचा शक्य तितका वापर करून घ्यायला हवा. अन्न शिजवायला सौर चूल वापरली, त्याचप्रमाणे पाणी तापवायलाही सौर ऊर्जा वापरता येईल आणि बहुमोल विद्युतऊर्जेची मोठी बचत होऊ शकेल.
   
|| मित्ररवीसूर्यभानूखगपूष्णहिरण्यगर्भमरीचादित्यसवितृअर्कभास्करेभ्यो नमो नम: ||

श्रीगणेश लेखमाला २०१८

प्रतिक्रिया

सविता००१'s picture

16 Sep 2018 - 2:48 pm | सविता००१

मस्तच प्रयोग हो काका

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Sep 2018 - 3:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट प्रयोग ! टाकावूतून टिकाऊ आणि फायदेशीर !!

प्रशांत's picture

24 Sep 2018 - 10:59 am | प्रशांत

+१

चित्रगुप्त's picture

16 Sep 2018 - 3:15 pm | चित्रगुप्त

छान प्रयोग. प्रत्येकाने करावा असा.
बाकी तुमच्या आमच्यासारख्यांनी बहुमोल विद्युतऊर्जेची बचत करण्यासाठी खटाटोप करावा आणि तिकडे सारेगम वा तत्सम टीव्ही कार्यक्रमांमधे गरज नसता - गाणारा एक, आणि त्याच्या मागे-पुढे-वरून-खालून हजारो रंगिबेरंगी दिव्यांची उधळण .... हे बघून फार क्लेश होतात.

.

पद्मावति's picture

16 Sep 2018 - 4:20 pm | पद्मावति

भन्नाट प्रयोग __/\__ मस्तं.

निशाचर's picture

16 Sep 2018 - 4:33 pm | निशाचर

मस्त प्रयोग!

कुमार१'s picture

16 Sep 2018 - 4:39 pm | कुमार१

आवडला !

तुषार काळभोर's picture

16 Sep 2018 - 4:42 pm | तुषार काळभोर

अतिशय प्रॅक्टिकल DIY !
१) वरती परावर्तक हवा ना? (म्हणजे सुटकेसचं झाकण)
२) वरण भात शिजायला अंदाजे किती वेळ लागतो? (एप्रिल-मे / डिसेंबर-जानेवारीत)

अवांतर - || मित्ररवीसूर्यभानूखगपूष्णहिरण्यगर्भमरीचादित्यसवितृअर्कभास्करेभ्यो नमो नम: ||
अशी कल्पकता व काव्यात्मकता_/\_

मस्त प्रयोग! आम्ही भावंडांनी बनवली होती सौर चूल लहानपणी. आमच्या एक शेजारी आम्हांला घेऊन गेल्या होत्या त्यांच्या एका स्नेह्यांच्या घरी - त्यांची सौर चूल पहायला. मग काय! तिथून परतल्यावर आम्हीही बनवली सौर चूल! भात आणि डाळ शिजवल्याचं सुद्धा आठवतंय! प्रथम वरच्या आरशाचा कोन चुकल्याने भात व डाळ अर्धवट शिजले, मग लक्षात आलं तसं चूक सुधारली आणि परफेक्ट शिजले दोन्ही जिन्नस!

अवांतर - राहिलेले लेख येऊ द्यात लवकर लवकर!

डॉ श्रीहास's picture

16 Sep 2018 - 7:01 pm | डॉ श्रीहास

ह्या सौर चुलीनी लहानपणीच्या उन्हाळ्याची आठवण करून दिली हो /\
तापलेली गच्ची, सोलार चुलीतले गरम गरम काळ्या रंगातले भांडे त्यात पर्फेक्टली शिजलेला वरण भात... अहाहा...

थॅंक्यू :))

प्रत्येकाकडे असायलाच हवी.

भ ट क्या खे ड वा ला's picture

16 Sep 2018 - 8:48 pm | भ ट क्या खे ड वा ला

मस्तच बनवल्ये सौरचूलसलाम तुमच्या कार्यशक्तीला.
पुर्वी सौरचूल वापरत असे खेड ला .
आता हा लेख वाचून पुन्हा वापरावी असे वाटतय.
अर्थात मला वाटून फारसा उपयोग नाही.
बघू लेख योग्य ठिकाणी पोहोचवतोय.
कदाचित यश मिळेल.

प्रचेतस's picture

17 Sep 2018 - 8:32 am | प्रचेतस

पर्यावरणाविषयी आपले प्रेम माहीत आहेच. त्याच विषयाबाबतची जागरुकता दर्शवणारा आपला प्रयोग फार आवडला.

रागो's picture

17 Sep 2018 - 8:34 am | रागो

कल्पक प्रयोग!

अथांग आकाश's picture

17 Sep 2018 - 10:25 am | अथांग आकाश

प्रयोग आवडला! करून बघणार!

sun

सस्नेह's picture

17 Sep 2018 - 12:55 pm | सस्नेह

अनवट प्रयोग !
यात भात व्हायला किती वेळ लागतो ?

सुधांशुनूलकर's picture

17 Sep 2018 - 8:25 pm | सुधांशुनूलकर

सर्व प्रतिसादकांचे आभार.

@ पैलवान - १) वरती परावर्तक हवा ना? (म्हणजे सुटकेसचं झाकण) - आम्ही मविपमध्ये प्रयोग केले, तेव्हा या परावर्तकाचा काही उपयोग नसल्याचं आमचं मत झालं. त्याशिवायही पदार्थ उत्तम शिजतात.

@ पैलवान, स्नेहांकिता - २) वरण भात शिजायला अंदाजे किती वेळ लागतो? (एप्रिल-मे / डिसेंबर-जानेवारीत) - एक अंदाज - एप्रिल-मे मध्ये दोन ते अडीच तास, डिसेंबर-जानेवारीत तीन ते साडेतीन तास, या काळात सूर्यकिरण लंबरेषेत न पडता थोडे तिरपे पडतात.

आता ही चूल पूर्ण करायला उत्साह आलाय. पावसाळ्यानंतर पूर्ण करून प्रयोग आणि नियमित वापर सुरू करू.

माझा उत्साह वाढवणार्‍या सर्वांना धन्यवाद.

sagarpdy's picture

20 Sep 2018 - 12:12 pm | sagarpdy

भारीच __/\__

मुक्त विहारि's picture

20 Sep 2018 - 12:13 pm | मुक्त विहारि

धन्यवाद...

नाखु's picture

23 Sep 2018 - 8:43 pm | नाखु

खरं टाकाऊतून टिकाऊ!!
गेली पंधरा वर्षे सौरचूल वापर करणारा नाखु पांढरपेशा
पूर्वी वरण भात शिजवत असे,
सध्या झाडाच्या सावलीत पुरेसा सूर्यप्रकाश नसल्याने थेट गच्चीवर जाऊन ठेवावे लागते.साहजिकच शेंगदाणे,रवा खरपूस भाजून घेतोय.
दिवाळीच्या चिवड्याचे पोहे, मुरमुरे छान भाजले जातात.

नाखु पांढरपेशा

सुबोध खरे's picture

24 Sep 2018 - 7:12 pm | सुबोध खरे

उत्तम जुगाड
काही शंका आहेत. ऍक्रिलिक शीट पेक्षा काच जास्त चांगली काम देईल असे वाटते. ( काचेची पारदर्शकता जास्त असते शिवाय काच बराच काळ पूर्ण पारदर्शक राहील गरम थंड झाल्याने ऍक्रिलिक शीट तितका वेळ पारदर्शक राहील असे वाटत नाही अर्थात हा तर्क आहे)
शिवाय जर झाकणात अंतर्गोल परावर्तक लावला तर दुप्पट ऊर्जा भांड्यावर केंद्रित करून पदार्थ लवकर शिजतील असे वाटते. असा परावर्तक सध्या अल्युमिनियम शीट एखाद्या गोल भांड्यावरगुंडाळून तयार करणे सहज शक्य आहे.

सुधांशुनूलकर's picture

24 Sep 2018 - 8:22 pm | सुधांशुनूलकर

अ‍ॅक्रायलिक शीटपेक्षा काच नक्कीच चांगली. मी अ‍ॅक्रायलिक शीट वापरलं, कारण ते फुकट मिळालं.
झाकणात अंतर्गोल परावर्तक लावता येईल, त्याचा उपयोगही होईल कदाचित; पण तो वापरून अंतर्गोल कुकर बनवायचा विचार आहे. बघू या.

नाखु's picture

27 Sep 2018 - 10:58 pm | नाखु

सौर चूल दुरुस्ती वाल्यांकडून मिळाली तर बघा ती दोन स्वतंत्र काचा मध्ये थोडी जागा ठेवून बसविण्यात आलेल्या असतात.उष्णता गळतीमुळे व उर्जाक्षय होऊ नये म्हणून असावे
मधला भाग निर्वात असावा.

अतांतिर्क नाखु

अंतु बर्वा's picture

25 Sep 2018 - 2:11 am | अंतु बर्वा

अरे वा! छान प्रयोग. लहानपणी शाळेत कितीतरी वेळा मनाशी ठरवले होते की सौर चुल बनवुन पहायचीचं. पण कधी मुहुर्त लागला नाही. आता पोरगं थोडं मोठं झालं की त्याला घेउन राहिलेला प्रयोग नक्की पुर्ण करणार!

सुधीर कांदळकर's picture

26 Sep 2018 - 6:59 am | सुधीर कांदळकर

आणल्याबद्दल अभिनंदन. हे वाचूनच अनेकांना स्फूर्ती मिळेल.

आता मी पण बनवतो एक. साध्या मोठ्या टोपात अ‍ॅल्यू. शीट लावतो आणि त्याला काळा रंग फासतो. वर काच ठेवतो की झाला. गच्चीत ठेवला की तासाभरात गरम पाणी तयार. तेलाच्या रिकाम्या कॅनमध्ये गरम पाणी भरतो आणि कॅनसभोवार तीनचार जाड वर्तमानपत्रांचा थर गुंडाळतो. की पाणी जास्त वेळ गरम राहील.

वर्तमानपत्र हे उष्णतेपासून बर्‍यापैकी संरक्षण देते. फ्रीजमधली दीडदोन लि.ची बाटली वर्तमानपत्रात गुंडाळून झाडाखाली सावलीत ठेवली की भर उन्हाळ्यात देखील पाणी चांगले तीनचार तास थंड राहते.

असो. कृतीप्रवर्तक, स्फूर्तीदायक लेखाबद्दल धन्यवाद.

सुधीर कांदळकर's picture

26 Sep 2018 - 7:40 am | सुधीर कांदळकर

लिहायला विसरलो. माझी सौर चूल फक्त अंघोळीचे पाणी तापवण्याच्या मर्यादित उपयोगासाठी आहे. रंग फूड ग्रेड वा खाण्याचा नसल्यामुळे पाणी नक्कीच पिण्यायोग्य नसेल. शिवाय ज्यांना प्लॅस्टीकची अ‍ॅलर्जी आहे अशांना ते कोणत्याही वापरासाठी धोकादायक असू शकते.