आपल्या लहानपणी आपल्यापैकी बहुतेकांनी चिकटवही बनवलेली असेल. वेगवेगळ्या डिझाइन्सचे पत्ते, पोस्टाची तिकिटे, वर्तमानपत्रातली कात्रणे, हिरो-हिरॉइनचे फोटो असे काहीबाही चिकटवून वही छानपैकी सजवली असेल आणि आपला हा खजिना मोठ्या अभिमानाने मित्रमैत्रिणींना, आल्या-गेल्याला दाखवून शाबासकीही मिळवली असेल.
स्मॅशबुक हे त्याचेच या काळातले देखणे रूप.
मी पहिल्याप्रथम ही कलाकृती यू-ट्यूब वर पहिली आणि आश्चर्याने पाहतच राहिले. चिकटवहीला नव्या काळात चढलेला हा साज निव्वळ अफलातून!!!
मी जसजशी इंटरनेटवरून जास्तीत जास्त माहिती मिळवायच्या कामाला लागले, तसतशी याचे विस्तृत जग पाहून खरे सांगायचे तर भांबावून गेले. गूगलच्या जोडीला यू-ट्यूब, पिंटरेस्ट हेदेखील स्मॅशबुकविषयक माहितीने भरून वाहून गेलेले आहेत. खूप सारे फोटो आणि व्हिडिओ लिंक्स उपलब्ध आहेत.
हे सगळे पाहून मलाही एक स्मॅशबुक बनवण्याची इच्छा झाली. वेगवेगळ्या विषयांवरचे स्मॅशबुक बनवता येत असले, तरी मी प्रवासाचे स्मॅशबुक बनवायचे ठरवले. प्रवासातल्या फोटोंचा अल्बम बनवण्यापेक्षा प्रवासाचे स्मॅशबुक बनवण्याची कल्पना मला जास्त आवडली, कारण आपण फक्त प्रवासातले फोटो इथे चिकटवत नाही, तर इतरही काही गोष्टी - उदा., प्रवासाची तिकिटे, ब्रोशर्स, नकाशे चिकटवू शकतो, काही आठवणी लिहून ठेवू शकतो, बघितलेल्या, अनुभवलेल्या काही मजेशीर गोष्टींची नोंद ठेवू शकतो. प्रवासासंदर्भातले एकदम सगळे अनुभव एकत्रितरित्या जपून ठेवू शकतो. एक परिपूर्ण अनुभव! सगळे कसे क्षणार्धात डोळ्यासमोर उभे राहते.
स्मॅशबुक सजवण्यासाठी बाजारात अनेकविध गोष्टी उपलब्ध असतात. खास प्रवासासंदर्भातले स्टिकर्स, कोट्स, इमेजेस तर मिळतातच. शिवाय अल्फाबेटचे स्टिकर्स, स्टॅम्प्स, कॅलीग्राफी पेन्स, रंगीत रिबिनी, ओरिगामीचे कागद या सगळ्यांचादेखील स्मॅशबुकमध्ये मोठ्या खुबीने वापर केला जातो.
कोणी कोरी वही घेऊन स्मॅशबुक बनवायला सुरुवात करतात, तर कोणी याचे तयार किट्स विकत आणतात, ज्यामध्ये कल्पनाशक्तीला थोडीफार चालना आधीच दिलेली असते, स्टिकर्स, रंगीत कागद, पेन्स यांच्या जोडीला काही काही पानांवर एखादी थीम/कल्पना पुरवलेली असते.
माझे पहिले स्मॅशबुक बनवण्याकरता मी असेच एक किट विकत आणले. आम्ही नुकतेच स्वित्झर्लंडला जाऊन आलो होतो. तिथला माझ्याकडचा खजिना - उदा. फोटो, सोवेनिअर्स, नकाशे, ब्रोशर्स, नकाशे असा हाताशी होताच.
माझ्या गूगलच्या शोधमोहिमेत मला समजले होते की स्मॅशबुक बनवण्यापूर्वी तीन गोष्टी ठरवायला लागतात -
१. कोणती माहिती आणि कोणत्या क्रमाने घालायची आहे.
२. कोणती माहिती कोणत्या सादरीकरणाच्या पद्धतीने घातली जाणार आहे.
३. त्याकरता लागणारे कोणते नावीन्यपूर्ण सामान तुम्ही वापरणार आहात.
सगळी मजा आहे ती सादरीकरणामध्ये. कल्पनाशक्तीला पूरेपर वाव असणारी ही कला आहे. प्रत्येक पान वेगवेगळ्या पद्धतीने सजवायचे.
त्याकरता एखादा मजकूर चौकोनात घालायचा किंवा गोलाकार लिहीत जायचा. एखाद्या माहितीचा तक्ता करायचा किंवा चक्क यादी करून मजकूर लिहायचा. हा मजकूर लिहिताना कोणी कॅलीग्राफीने लिहील, तर कोणी सुवाच्य अक्षर काढून लिहील, तर कोणी विकतचे अक्षरांचे स्टिकर्स लावेल.
इथे ओरिगामीला, किरीगामीलासुद्धा वाव आहे बरं! कोणी एखाद्या पानावर पॉपअपची करामत करून सादर करतो, तर कोणी छोटी छोटी पाकिटे पानावर चिकटवून आणि त्याच्या आत मजकुराच्या चिठ्ठ्या टाकून विविधता आणेल.
कोण चित्रे काढते, तर कोणी फक्त फोटो चिकटवते. कोणी पानावर काहीही करण्याआधी ते पान वॉटरकलरने रंगवून घेतात. आणि अर्थातच हा सगळा जास्तीत जास्त रंगीबेरंगी मामला असायला हवा. म्हटले ना - अक्षरशः sky is the limit.
एक अविस्मरणीय अनुभव एका अनोख्या रूपात साठवला गेला .... आज मागे वळून पाहताना मला ही कला समजली, त्या निमित्ताने विविध स्मॅशबुक्स बघता आली, स्वतः स्मॅशबुक करतानाचा प्रवास अनुभवायला मिळाला, या सगळ्याचा आनंद खूप मोठा आहे.
माझ्या स्मॅशबुकमधील काही पाने .......
प्रतिक्रिया
13 Sep 2018 - 9:40 am | तुषार काळभोर
लै भारी आयडिया!!
अन त्याचं एक नंबर implementation.
13 Sep 2018 - 10:01 am | यशोधरा
भारीच की!
13 Sep 2018 - 10:49 am | कंजूस
आकर्षक आणि कल्पनेला भरपूर वाव आहे.
13 Sep 2018 - 11:41 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर कल्पना आणि तुमचे स्मॅशबूकही छान सजवलेले आहे
13 Sep 2018 - 2:29 pm | पद्मावति
छानच आहे.
13 Sep 2018 - 4:02 pm | पिलीयन रायडर
खूपच छान आयडिया आहे! आवडलं!
13 Sep 2018 - 8:33 pm | ज्योति अळवणी
खूपच आवडलं. निवड पण छान प्रवासाबद्दल लिहिण्याची. पुढच्यावेळी करायचा प्रयत्न करेन
13 Sep 2018 - 10:14 pm | मदनबाण
भारी !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदक वळु लागला , माझा बाप्पा हा नाचु लागला ! :)
13 Sep 2018 - 10:21 pm | निशाचर
छान कल्पना!
स्मॅशबुक आवडलं.
13 Sep 2018 - 11:19 pm | मुक्त विहारि
भारी आयडिया!!
14 Sep 2018 - 12:57 am | सही रे सई
तुमचं smash बुक बघून भारी वाटलं. सुंदर कल्पना आणि उत्तम अंमलबजावणी.
या वरुन मला पण एक छान कल्पना सुचली. माझी आई सध्या इकडे माझ्या कडे फिरायला आलेली आहे. तिच्या मागे लागले होते कि प्रवास वर्णन लिही. आता तिला सांगते कि smash बुक कर म्हणून
14 Sep 2018 - 11:02 am | समर्पक
आयडिया आवडली. कलात्मक काम भन्नाट आहे. माझ्याकडेही अशी प्रवासी तिकिटे, हॉटेलच्या स्मार्ट कीज, प्रवासपत्रके, नकाशे, यांचा साठा आहे, त्याचे असे काहीतरी टिकाऊ आणि दिखाऊ केले पाहिजे :-)
14 Sep 2018 - 12:19 pm | डॉ श्रीहास
ह्याचा वापर करून आवडीचे क्षण/ ट्रिप जगता येऊ शकेल आणि ही आयडीया तुमच्या स्मॅशबुकवरूनच आली आहे... थॅंक्यू हो :))
14 Sep 2018 - 12:28 pm | मंजूताई
ह्याचा वापर करून आवडीचे क्षण/ ट्रिप जगता येऊ शकेल आणि ही आयडीया तुमच्या स्मॅशबुकवरूनच आली आहे... थॅंक्यू हो :)) >>>>>& + १
15 Sep 2018 - 12:09 am | palambar
चांगली कल्पना, मुलाला सांगितली आहे करायला.
15 Sep 2018 - 12:27 am | चित्रगुप्त
वा. झकास. हल्ली कुठे फिरायला गेलो की मोबाईलात शेकडो फोटो जमा होतात, आणि ते पडून रहातात- पुढे कधी फारसे बघणेही होत नाही. इतर गोष्टी- तिकिटे नकाशे खर्चाच्या नोंदी वगैरे फेकले जाते. या कल्पक-कलात्मक-रोजनिशीच्या स्वरूपात त्याची साठवण करण्याच्या या उत्तम पर्यायाची माहिती दिल्याबद्दल आभार.
15 Sep 2018 - 8:43 pm | सविता००१
किती सुरेख, रंगीबेरंगी मामला आहे हा... खूप आवडलं
18 Sep 2018 - 12:23 pm | अनिंद्य
छान कल्पना पारुबाई.
प्रवासाची डिजिटल फुटप्रिंट हल्ली फार व्यापक असते, त्यामुळे तुम्ही काहीतरी वेगळे केले ते खासच आवडले !
अनिंद्य
18 Sep 2018 - 5:51 pm | चौथा कोनाडा
सुंदर कल्पना !
स्वःत करायच्या स्मॅशबू़कची आयडीया आवडली !
पारूबाई, आपल्यातल्या कलेला अनलिमिटेड वाव देणारी ही स्मॅशबुक भारीय !
19 Sep 2018 - 12:01 am | पारुबाई
सर्वांना मनापासून धन्यवाद.
तुम्ही गुगलवर जर Smashbook images पाहिल्यात तर अगदी लगेचच Smashbook बनवायला सुरूवात कराल.