एडवर्ड मर्फी या अवकाश अभियंत्याचे एक वचन (मर्फीचा दुसरा नियम) प्रसिद्ध आहे :
Nothing is as easy as it looks.
खरेय, एखादी गोष्ट वरवर दिसायला जेवढी सोपी वाटते, तेवढी ती प्रत्यक्षात नसते. दुसऱ्याच्या एखाद्या कृतीकडे बघून बऱ्याचदा आपण सहज म्हणून जातो, “हे काय मीसुद्धा केले असते, त्यात काय एवढे?” पण जेव्हा खरेच ती कृती आपण करू पाहतो, तेव्हाच आपल्याला त्या उद्गारांमागचा फोलपणा कळतो. कोणत्याही कृतीतील सहजता ही परिश्रमाशिवाय प्राप्त होत नसते. त्यासाठी निव्वळ ‘बघणे’ पुरेसे नसून स्वतः करणेच आवश्यक असते.
या लेखमालेची मध्यवर्ती कल्पना 'तुम्ही काय करून पाहिलेत?' हीच आहे. तर आता लेखनाचा काटा माझ्याकडे वळवतो. समाजात आपण अनेक लोकांमध्ये वावरतो. त्यापैकी मनोनिग्रह करणारे काही जण माझ्या पाहण्यात येतात. हे मनोनिग्रह विविध प्रकारचे असतात. कोणी कडकडीत उपास करतो, कोणी जाणीवपूर्वक स्वतःसाठी स्वयंचलित वाहन घेत नाही, कोणी सर्वार्थाने निर्व्यसनी असतो, तर कोणी स्वतःची स्वच्छताविषयक कामे नेटाने स्वतःच करतो. मुख्य म्हणजे अशा काही व्यक्ती आर्थिक सुस्थितीतील असूनही असे निग्रह करतात. अशा व्यक्तींबद्दल मला कायमच आदर वाटतो. त्यांचा निग्रह अमलात आणताना त्यांनी 'लोक काय म्हणतील?' या काल्पनिक भीतीवर ठरवून मात केलेली असते. त्यांचा निग्रह त्यांना आनंद व समाधान देतो, हे महत्त्वाचे. काही निग्रहांतून स्वावलंबनाचे, तर काहींतून आरोग्याचे फायदे मिळतात हे मात्र खरे.
तर या दृष्टीने आपण स्वतः काही गोष्टींचा निग्रह करू शकू का, असे मला नेहमी वाटे. झाले, विचार करू लागल्यावर प्रथम आपल्याला आपलेच ‘दुसरे मन’ खाऊ लागते.
“छान सुखी आयुष्य चाललेय ना, मग करायचेय काय असले खूळ?” किंवा
“आपण जर आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत असलो, तर मग करायचेत काय असले निग्रह-बिग्रह?”
पण मग असेही वाटले की कठीण वाटणारी एखादी गोष्ट नित्यनेमाने करणारा अन्य जर ‘माणूस’च आहे, तर मग आपल्याला जमायला काय अडचण आहे? निग्रहाची गरज असो व नसो, तो केल्याने आपले आत्मबळ तर नक्कीच वाढेल ना! मग झाले तर. एक प्रयोग म्हणून तर काही करून बघू.
मग त्या मंथनातून एक कल्पना स्फुरली, ती म्हणजे आपण आठवड्यातून एक दिवस ‘मनोनिग्रह दिन’ पाळावा. त्या दिवशी खालील निग्रह करण्याचे ठरवले :
१. चहा, कॉफी बंद. ही उत्तेजक पेये म्हणजे सौम्य व्यसनेच होत.
२. दिवसातले रात्रीचे जेवण नाही.
३. गार पाण्याने अंघोळ.
४. स्वतःचे जेवणाचे ताट स्वतः घासणे आणि अंतर्वस्त्रे धुणे.
५. स्वतःचे स्वयंचलित वाहन रस्त्यावर आणायचे नाही. त्या दिवशीची कामे चालत, सायकलने अथवा सार्वजनिक वाहनातून जाऊन करायची.
सर्वानी लक्षात घ्यावे की, हा दिन फक्त आठवड्यातून एकदाच ठरवलेला होता. त्यामुळे कुठल्याही सुखाचा कायमचा त्याग वगैरे इथे अपेक्षित नाही.
आता एकेक निग्रहाचे अनुभव सांगतो.
१. चहा, कॉफी बंद. >>>>>
हा निग्रह माझ्यासाठी सर्वात सोपा होता. कॉफी मी जवळजवळ पीतच नाही. चहा दिवसातून मोजून दोन कप, उन्हाळ्यात तर फक्त एक कप. सकाळी उठल्यावर मी फक्त गरम पाणी पितो. त्यामुळे चहावर अवलंबित्व असे नाही. त्यातून तब्येत आम्लपित्ताची. सुमारे १० वर्षांपूर्वी मी दूध-साखरयुक्त चहा बंद केला, कारण याने त्रास जास्त होतो. म्हणून कोरा चहा (शक्यतो टी-बॅगवाला) पिऊ लागलो. त्यामुळे निग्रहाच्या दिवशी चहा न पिणे हे सहज शक्य झाले. प्रवासात तर कित्येकदा हा निग्रह आपोआप होतो, कारण मला हवा तसा सौम्य कोरा चहा भारतात तरी घराबाहेर कुठेच (टपरीवर, सामान्य हॉटेल्समध्ये किंवा स्थानकांवर) मिळत नाही.
२. दिवसातले रात्रीचे जेवण नाही. >>>>>>
वयाच्या चाळिशीनंतर बुद्धिजीवी वर्गाला रात्रीच्या पूर्ण जेवणाची गरज नसते. बैठी कामे, सतत वाहनांचा वापर, पुरेसा व्यायाम न करणे अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. एव्हाना बऱ्याच जणांची वजनेही वाढलेली असतात. त्यामुळे पहिले नियंत्रण मी येथे आणले. रात्रीचा आहार हा जेवण नसून फक्त ‘किरकोळ खाणे’ आहे, असे स्वतःला बजावले. म्हणून ताट न घेता छोट्या ताटलीत मावेल असे काहीतरी न शिजवलेले घ्यायचे व जोडीस एखादे पाणीदार फळ. आहारशैलीतील हा आमूलाग्र बदल असल्याने तो फक्त एखाद्या दिवसाऐवजी रोज करायचे ठरवले. प्रथम हा प्रयोग एकाआड एक दिवस केला. पुढे रोज.
सुरुवातीस निग्रह करावा लागतो, पण हळूहळू ही चांगली सवय अंगवळणी पडते. असे एक दशकाहून अधिक काळ केल्यावर असे मनोमन वाटले की आपला रोज रात्रीचा एवढा मस्त मिताहार चालू असल्याने आपल्याला आता कुठल्याही वेगळ्या पारंपरिक उपवासाची गरज नाही.
याच्या जोडीस आणखी एक केले. आपली सणवारांची दुपारची जेवणे चांगलीच ‘जड’ असतात. त्यामुळे त्या रात्री पूर्ण लंघन. तसा सरासरी दरमहा एक सण असतोच. आपल्या निग्रहात ही आणखी एक भर.
इथे मला माझ्या उलट प्रकार करणाऱ्यांविषयी लिहावेसे वाटते. हे लोक त्यांच्या ‘उपासाच्या’ दिवशी दिवसभर काहीही न खाता (किंवा मिताहार करून) रात्री पोटभर (वसूल केल्यासारखे) जेवतात. हे बरोबर नाही, असे माझे वैद्यकीय मत आहे. रात्री शरीराची उष्मांक गरज खूप कमी असते. त्यामुळे असा उपवास करणाऱ्यांची पोटे बरेचदा सुटलेली असतात.
३. आठवड्यातून एकदा गार पाण्याने अंघोळ >>>>
याची थोडी पूर्वपीठिका अशी - कॉलेजच्या वसतिगृहात राहताना गरम पाण्याची आंघोळ हा एक कटकटीचा विषय असतो. गिझरसमोर आपापल्या बादल्या ठेवून नंबर लावणे, वरिष्ठांची दादागिरी, धुसफूस हे सगळे असतेच. मग एके दिवशी निर्णय घेऊन टाकला की गरम पाण्याची ऐसी की तैसी! त्यामुळे त्या वयात महिनोनमहिने गार पाण्याची सवय झाली होती.
तीच सवय पुढे एक दिवसाचा निग्रह ठरल्यावर कामी आली. मग असे चाळिशीपर्यंत व्यवस्थित जमले. पुढे हळूहळू शारीरिक मर्यादा आल्या. डिसेंबर ते फेब्रुवारी हा काळ माझ्यासाठी त्रासदायक. तेव्हा त्या काळात स्वतःला माफ केले. कोणताही निग्रह शरीराला त्रास देणारा असेल तर त्याचा अट्टहास नको.
सध्या परिस्थिती अशी आहे - हा निग्रह उन्हाळ्यात जमतो, पावसाळ्यात अनियमित आणि थंडीत नाही.
हा निग्रह करण्यामागे दोन हेतू. एक म्हणजे वेळप्रसंगी गरम पाण्याची सोय नसल्यास आपले अडू नये. दुसरे असे की शहरी जीवनात आपण पाणी तापवण्यासाठी इंधनाचा वा विजेचा भरपूर वापर करतो. या दोन्ही संसाधनांच्या बाबतीत आपल्या देशाची परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. तेव्हा याची मनाला बोच म्हणून त्यांची थोडी तरी बचत करण्याची सवय लावून घ्यावी.
४. स्वतःचे जेवणाचे ताट स्वतः घासणे आणि अंतर्वस्त्रे धुणे. >>>>
तशी ही सवय इ. अकरावी ते शिक्षण संपेपर्यंत रोजच होती. त्यामुळे आताच्या निग्रहासाठी काहीच अडचण नव्हती.
आपल्याकडे उच्च व मध्यमवर्गीयांकडे यासाठी सररास नोकर असतात. त्यामुळे बालपणापासून आपण ‘ही आपली कामे नसतात’ या बाळकडूसह वाढतो. जर घरी राहून सर्व शिक्षण झाले, तर मग आपण मोठेपणी ऐदी होतो. त्या कामांकडे व ती करणाऱ्यांकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन उपेक्षेचा होतो. फक्त नंतर जर आपण श्रीमंत परदेशात गेलो, तर मात्र तिथे आपण ती कामे ‘श्रमप्रतिष्ठा’ या गोंडस नावाखाली करू लागतो! असा हा विरोधाभास आहे.
तेव्हा ही कामे स्वतःच्याच स्वच्छतेची आहेत, त्याची लाज वाटू नये यासाठी हा निग्रह. निदान, त्यामुळे जेव्हा कामवाली व्यक्ती येत नाही, तेव्हा आपल्यावर ‘आकाश कोसळत नाही’.
सध्या तर मी हा निग्रह वर्षातले १२० दिवस करीत आहे आणि त्याच्या जोडीला त्या दिवसांत माझा स्वयंपाकही मीच करतो. ते करत असताना जर कधी जाम कंटाळा आला, तर तेव्हा स्वयंपाकघराच्या भिंतीवर लिहून ठेवलेल्या वाक्याकडे फक्त पाहतो आणि झटक्यात माझ्यात उत्साह संचारतो. ते वाक्य आहे - ’Work does not kill a man but, worries do.'
रोज गरम पाण्याची आंघोळ आणि धुण्याच्या यंत्राने कपडे धुणे यांसाठी आपण बऱ्यापैकी वीज वापरतो. वाढत्या लोकसंख्येबरोबर वीजनिर्मितीही वाढवावी लागते. कालांतराने वीज अपुरी पडू लागते. मग नव्या वीजप्रकल्पांची गरज भासते. मग त्यातून होणारे राजकारण, आंदोलने वगैरे आपल्या नित्य परिचयाची आहेत. एकेकाळी जेव्हा अमेरिकेत अणुवीजकेंद्रे वाढू लागली आणि त्यांचे समर्थन होऊ लागले, तेव्हा त्यांच्याच एका विचारवंताने असा विचार मांडला होता. तो म्हणाला, “उद्यापासून सर्व नागरिकांनी स्वतःचे कपडे हाताने धुवायला व पिळायला लागा आणि मग परवापासून आपली आधीचीच सर्व अणुवीजकेंद्रे बंद करता येतील!”
तेव्हा वरील दोन निग्रहांची थोडी सवय असायला हरकत नाही, असा मी माझ्यापुरता विचार केला आहे.
५ . स्वतःचे स्वयंचलित वाहन रस्त्यावर आणायचे नाही. >>>>>
हा तर माझ्या जिव्हाळ्याचा विषय. प्रदूषणग्रस्त शहरामध्ये राहून प्रदूषणत्रस्त झालेला मी! गेल्या २५ वर्षांत सर्वत्र वाहनजन्य प्रदूषण खूप वाढले. त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू लागला. असे दिसते की या विषयावर लेखन, चर्चा, परिसंवाद आणि परिषदा अगदी भरपूर होतात, पण सर्वात गरजेची असलेली कृती मात्र अत्यल्प असते. बहुतेक सगळा मामला ‘लोका सांगे...’ असा असतो. अधूनमधून कृतीच्या छोट्या लाटा येतात अन लगेच त्या विरूनही जातात. कधी आपण ‘बस डे’ अनुभवतो, कधी सायकलची प्रभातफेरी पाहतो, तर कधी पाच वर्षातून एखाद्याच दिवशी आपले काही अत्यल्प खासदार संसदेत सायकलवरून जाताना फोटोत पाहतो!
पण माझ्या पाहण्यात काही अपवादात्मक असे लोक आले. त्यापैकी काहींना स्वयंचलित वाहन परवडत असतानाही ते आजन्म सायकलनिष्ठ आहेत. मग मलाही काहीसे अपराधी वाटू लागले. पूर्णपणे स्ववाहनरहित आयुष्य जगणे कठीण होते, पण निर्धार केल्यास काही प्रमाणात स्ववाहन-संयम शक्य होता. मग पहिले पाऊल टाकले ते म्हणजे आठवड्यातून एक दिवस फक्त चालत अथवा सायकलचा वापर. सुरुवातीस हा शनिवार ठेवला होता, जेणेकरून दुखऱ्या पायांना रविवारी विश्रांती मिळावी. यातून आणखी एका गोष्टीची जाणीव झाली. शनिवारी कामाच्या ठिकाणीही सायकलवरच गेलो. इथे आपल्याला मात करावी लागते, ती म्हणजे कुठलीही लाज वाटणे याची. कारण आपले सर्व सहकारी स्वयंचलित वाहनातूनच येत असतात. त्यामुळे सुरुवातीस काही शेरे ऐकावे लागतात. त्यांची सवय करून घेणे हाही या निग्रहाचा एक भाग असतो.
पुढच्या टप्प्यात सुटीच्या दिवशी काही कामे ठरवून दुपारच्या वेळात बसने जाऊन करू लागलो. तेव्हा आपण बसमध्ये शिरू शकतो! अखेर, विचारपूर्वक माझे वाहन-धोरण असे ठरले :
१ कि.मी.पर्यंतची कामे चालत, ३ कि.मी.पर्यंतची सायकलने, त्यापुढच्या अंतराची बसने आणि फक्त तातडीची कामे स्वतःच्या वाहनाने करणे.
गेल्या ३ वर्षांत मात्र सायकल सोडावी लागली, कारण आसपासच्या २ कि.मी. परिसरातील हवा भरण्याची व तिच्या दुरुस्तीची दुकाने बंद पडली आहेत. तरी सांगायला आनंद वाटतो की आज मी वर्षातले निम्मे दिवस स्वतःचे वाहन रस्त्यावर आणत नाही.
हा निग्रह ( वाहन उपवास) अमलात आणताना बऱ्याचदा असा विचार मनात येतो की मी एकट्याने किंवा अत्यल्प लोकांनी असे करून या वैश्विक प्रश्नाबाबत असा काय फरक पडतो? मग हा निराशाजनक विचार झटकून टाकायला एडमंड बर्क यांचे पुढील वाक्य खूप कामी येते :
‘आपण एकट्याने करून फार काय होणार आहे असे म्हणून जो काहीच करत नाही, तो ती सर्वात मोठी चूक करतो’.
तर वाचकहो, हा आहे माझ्या मर्यादित निग्रहांचा लेखाजोखा. मला वैयक्तिक पातळीवर त्यांचे नक्कीच फायदे झालेले आहेत. निदान काहींमुळे अंतर्बाह्य विचार करण्याची तरी सवय लागली. स्वतः एखादा निर्बंध अमलात आणताना होणारा त्रास अनुभवता आला. त्यावर आपण कशी मात करतो हेही शिकता आले. भविष्यात कधीतरी आणखी एक निग्रह करायची इच्छा आहे, तो म्हणजे आठवड्यातून एक दिवस मोबाइल फोनला अजिबात हात न लावणे! पण तूर्त हा संकल्प मनातच ठेवतो.
दुसऱ्या बाजूने पाहता, आपण जे काही केले ते फार ‘थोर’ वगैरे आहे अशी भावना बिलकुल नाही. असे काही केले पाहिजेच असेही सुचवायचे नाही. फक्त स्वतः काही वेगळे करून पाहिल्याने त्यातून लेखाच्या सुरुवातीस उद्धॄत केलेले मर्फीचे वचन मनोमन पटले, हे सांगणे नलगे.
***************************************************************
प्रतिक्रिया
22 Sep 2018 - 11:20 am | ज्योति अळवणी
अप्रतिम लेख. आयुष्यात काही तत्व ठरवणे खूप आवश्यक असते हे एकदम मान्य.
‘आपण एकट्याने करून फार काय होणार आहे असे म्हणून जो काहीच करत नाही, तो ती सर्वात मोठी चूक करतो’.
अगदी मान्य!
22 Sep 2018 - 11:36 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर लेख ! असा मनोनिग्रह करण्याचा प्रण करून मग तो १७६० कारणे सांगून मोडणार्या लोकांच्या भाऊगर्दीत तुमचे उदाहरण उठून दिसत आहे, हे सांगायला नकोच !
22 Sep 2018 - 12:05 pm | टर्मीनेटर
खूप छान. कधी कधी स्वतःचे मूल्यमापन करण्यासाठी अशा मनोनिग्रहाचा चांगला उपयोग होतो. नकळतपणे कितीतरी गोष्टींवरचे आपले अवलंबित्व वाढत जात असते, अशावेळी त्याची पातळी मोजण्यासाठी हा उत्तम उपाय. अर्थात वरच्या प्रतिसादात डॉ सुहास म्हात्रे साहेबांनी म्हंटल्या प्रमाणे "असा मनोनिग्रह करण्याचा प्रण करून मग तो १७६० कारणे सांगून मोडणार्या लोकांच्या भाऊगर्दीतलाच" मी देखील एक आहे :-) पण तरी अधूनमधून असे प्रयत्न करणे चालूच ठेवलय.
22 Sep 2018 - 2:01 pm | कुमार१
प्रतिसदकांचे आभार आणि सहमती
22 Sep 2018 - 2:57 pm | पद्मावति
सुंदर लेख.
22 Sep 2018 - 3:17 pm | ज्ञानोबाचे पैजार
मनःपूर्वक अभिनंदन...
सर्व निग्रहांची कारणमिमांसा पटण्याजोगी आहे.
पण ......
हे कारण काही पटले नाही बुवा, या करता मी सायकलमधे हवा भरायचा पंप व पंक्चर किट विकत घेतले आहे. पंपाने हवा भरणे देखील आता पुर्वीसारखे कष्टाचे राहिले नाही. आरामात उभे राहून पायाने दाब देत हवा भरता येते. इतर दुरुस्ती करता जरा लांबचे दुकानही चालून जाते. तशीही सायकल स्वयंचलीत वाहना एवढी वारंवार दुरुस्त करावी लागत नाही. बघा परत विचार करुन.
पैजारबुवा,
22 Sep 2018 - 5:21 pm | कुमार१
ज्ञा पै, हा प्रतिसाद अगदी अपेक्षित आणि आनंददायी आहे ! पण आता नवी सायकल व पंप घ्यायची इच्छाशक्ती नाही राहीली !
तरी पण विचार करतो, धन्यवाद
22 Sep 2018 - 8:04 pm | कंजूस
क्र १,कधीकधी दहावर खाली येतो चुकून.
क्र. २ अशक्य.
क्र ३,४ नेहमीच.
क्र. ५ स्वत:चेच वाहन वापरतो. चालणे/बस.
22 Sep 2018 - 8:15 pm | कुमार१
क्र ३,४ नेहमीच.>>>>
अरे वा, कौतुक वाटले !
24 Sep 2018 - 7:09 pm | Nitin Palkar
अतिशय प्रेरणादायी लेख. मी चहाबाज आहे हे म्हणण्यात अनेकांना भूषण वाटते..... मी स्वतःही त्यातलाच एक(या इथे जीभ चावण्यात आलेली आहे). चहा कमी करण्याचा कटाक्षाने प्रयत्न सुरु करेन. रात्रीचे जेवण अनेकदा टाळतो.उन्हाळ्यात नेहमीच थंड पाण्याने अंघोळ करतो, इतर बाबीही कराव्याशा वाटतात. बघू काय काय जमते....
24 Sep 2018 - 7:19 pm | सुबोध खरे
दुसऱ्या बाजूने पाहता, आपण जे काही केले ते फार ‘थोर’ वगैरे आहे अशी भावना बिलकुल नाही. असे काही केले पाहिजेच असेही सुचवायचे नाही. फक्त स्वतः काही वेगळे करून पाहिल्याने त्यातून लेखाच्या सुरुवातीस उद्धॄत केलेले मर्फीचे वचन मनोमन पटले, हे सांगणे नलगे.
हे सर्वात महत्त्वाचे आहे
कारण आम्ही मंगळवारी गुरुवारी सामिष खात नाही म्हणून मोठ्या गर्वाने सांगणारी माणसे श्रावण कधी संपतो किंवा घरातील गणपतीचे कधी विसर्जन होते आणि मी दारू आणि सामिष कधी खातो याची वाट पाहताना दिसले कि कीव करावीशी वाटते.
बऱ्याच वेळेस असा निग्रह ही "लोकांना दाखवण्यासाठी" असतो असेच वाटते.
24 Sep 2018 - 7:30 pm | कुमार१
धन्यवाद !
नितीन, तुमच्या संकल्पा साठी शुभेच्छा.
सुबोध, पूर्ण सहमत .
25 Sep 2018 - 6:37 am | सुधीर कांदळकर
मला नील आर्मस्ट्राँगचे चंद्रावर पाऊल ठेवतांनाचे वाक्य आठवले. धिस स्मॉल स्टेप इज अ बिग लीप फॉर द मॅनकाईंड. खरेच, एका दिवसाचा यशस्वी निग्रह मोठी आवाहने पेलण्यासाठीचे केवढी मोठी उमेद देऊन जाईल!
अमूल्य लेखाबद्दल धन्यवाद.
25 Sep 2018 - 9:33 am | कुमार१
आहे ते. त्या आठवणी जागवल्याबद्दल धन्यवाद .
26 Sep 2018 - 10:13 am | चौकटराजा
मी जवळ जवळ ५०वर्षे चहा कॉफी काही ही घेत नव्हतो . मग हळुच कॉफी आली एक वेळा . आता दुपारी बायकोबरोबर चहा . आता सकाळची कॉफी आठवड्यातून एकदाच घेतो . बाकी ६ दिवस गरम दूध .
माझे दोन्ही वेळचे जेवण इतके कमी केले आहे की इतक्या कमी आहारात माणूस जगू शकतो हे मला पटले आहे. १०० लोकांची पंगत असली तरी ९९ टकके वेळी माझे सर्वात जेवण लवकर आटपते ते दोन कारणांनी एक कमी जेवणे दुसरी वाईट सवय भराभर जेवणे .
रोज सकाळी चालायला जाताना असा अनुभव येतो की पहिल्या पाच मिनिटात दमायला होते . परत फिरावे असे वाटते पण निग्रहाने पुढे गेले की शरीर साथ देऊ लागते मग कितीही चालते तरी दमणूक नाही .
आठवड्यातून एकदा वाहन बंद ठेवणे मला सहज शक्य आहे . बर्याच वेळा ते तसे असतेही .
मी होस्टेल ला असताना गार पाणी टाळण्यासाठी दुपारी स्नान करत असे . त्यावेळी थोडेफार गरम पाणी शॉवर मध्ये असे . आज ही मला गार पाणी अंघोळ करणे अशक्य नाही पण फक्त एक मिनिटात स्नान समाप्त होईल .
शरीर हे सवयीचे गुलाम आहे व मन ही !! जगातील बहुतांश माणसे गुलाम आहेत म्हणून सर्व देशांच्या अर्थव्यवस्था जिवंत आहेत . प्रमाद हे जग चालण्याचे प्रमुख साधन आहे !
26 Sep 2018 - 12:36 pm | कुमार१
शरीर हे सवयीचे गुलाम आहे व मन ही !! >>>> आवडले धन्यवाद
26 Sep 2018 - 8:28 pm | palambar
अरे वा चांगला विषय! मनाचा निग्रह असेल
तर काही अवघड नाही. मी सुध्दा वाहन
कमीत कमी वापरायचा निग्रह करेन.
26 Sep 2018 - 9:08 pm | अभ्या..
मस्तच हो डॉक्टरसाहेब,
नो चहाचा दिवसापेक्षा मी चहाचे प्रमाण कमी केले. आधी दिवसातून 4 वेळी तरी व्हायचा. आता दोन वेळा दोन दोन घोटच पितो.
रात्रीचे जेवण मात्र शनिवारी उपासाला बंद असते. दिवसा जेवले नाही तरी रात्री थोड्याच जेवणात पोट भरते.
सोलापुरात गार पाण्यानेच आंघोळ होते पण पुण्यात गिझर वगैरे असल्याने उगाच गरम पाण्याची सवय लागली असे वाटत आहे. ते लवकरच रेग्युलरली गार पाणी चालू करणार.
जेवणाचे ताट घासायची सवय आहेच पण कपडे धुणे आवडीने करतो. बरीच वर्षे स्वतःचे सगळेच कपडे स्वतः धुतो ते ही शिस्तीत आणि आनंदाने.
वाहनांचे जमणे जरा अवघड होते पण पुण्यात बसने फिरणे ह्यासारखे सुख नाही.
26 Sep 2018 - 9:42 pm | कुमार१
palambar व अभ्या,
तुमचे निग्रह देखील कौतुकास्पद आहेत. चालू ठेवा.
त्याने आपल्याला समाधान वाटते हे महत्त्वाचे.
27 Sep 2018 - 9:27 am | नमकिन
१. चहा, कॉफी बंद. ही उत्तेजक पेये म्हणजे सौम्य व्यसनेच होत.- कुणी ही किती ही आग्रहाची विनंती, प्रेमाची दटावणी, मानाची टोचणी लावली तरी रोज मार्केटिंग लागले नवनवीन लोकांत ऊठबस करून हा निग्रह जपतो.
२. दिवसातले रात्रीचे जेवण नाही.- वयोमानानुसार व भरल्या पहाटे काही भरपेट खाण्याची सोय असल्यासंच कष्टकरी ने करून बघावं
३. गार पाण्याने अंघोळ.- रोज आंघोळ केली च पाहिजे का?
४. स्वतःचे जेवणाचे ताट स्वतः घासणे आणि अंतर्वस्त्रे धुणे.- उत्तम, पण बघुया.
५. स्वतःचे स्वयंचलित वाहन रस्त्यावर आणायचे - ठरवूनच आणावं लागतं नाहीतर भंगारात जाईल.
28 Sep 2018 - 12:28 pm | अनिंद्य
@ कुमार१,
प्रेरणादायी DIY संकल्पनेबद्दल आभार !
निग्रह उत्तम आहेत तुमचे. पैकी काही मीही अमलात आणले आहेत पण थोड्या थोड्या कालावधींसाठी. आठवड्यात एक दिवस रसाहार / फलाहार / एकभुक्त राहणे हे बरीच वर्षे केले आहे.
..........आठवड्यातून एक दिवस मोबाइल फोनला अजिबात हात न लावणे! ........
मला ह्यात थोडी भर म्हणून आठवड्यातून एक दिवस ZERO स्क्रीन टाईम उर्फ 'डिजिटल उपास' हे कलम जोडायला हवे आहे. बघूया कसे जमते ते. आफ्टरऑल, Nothing is as easy as it looks.
अनिंद्य
28 Sep 2018 - 3:38 pm | कुमार१
आभार व सहमती.
रोज आंघोळ केली च पाहिजे का?>>>
नाही ! खरे तर रोज एका तांब्याभर पाण्यात फडके बुडवून अंग पुसले तरी चालेल. मग आठवड्यातून फक्त एकदा पूर्ण अंघोळ करता येईल. इच्छुकांनी असा निग्रह जरूर करावा !
ZERO स्क्रीन टाईम उर्फ 'डिजिटल उपास' हे कलम जोडायला हवे आहे. बघूया≥>>>>
यासाठी मनापासून शुभेच्छा !
28 Sep 2018 - 7:41 pm | चौकटराजा
झीरो स्क्रिन टैम ... काहीही हं कुमारजी ..!! मग ... करायचं तरी काय ,,, ? {-))))
28 Sep 2018 - 8:15 pm | कुमार१
अहो, त्या दिवशी छापील पुस्तके वाचायची, एखादी टेकडी चढून यायची, घरकामे मन लावून करायची.... ☺️
17 Oct 2018 - 9:48 am | II श्रीमंत पेशवे II
अप्रतिम लेख
प्रभावित झालो ....
धन्यवाद
17 Oct 2018 - 9:55 am | कुमार१
धन्यवाद, माझा नमस्कार स्वीकारावा !
5 Nov 2018 - 7:23 pm | वन
आवडला. आठवड्यातून एकदा वाहन व डिजिटल उपास करण्याचा संकल्प या दिवाळीपासून करीत आहे.
विचारांना चालना दिल्याबद्दल धन्यवाद.
5 Nov 2018 - 9:38 pm | कुमार१
तुमच्या संकल्पास हार्दिक शुभेच्छा !
अनुभव जरूर लिहा.
6 Jan 2019 - 7:46 pm | वन
आठवड्यातून एकदा वाहन व डिजिटल उपास करण्याचा संकल्प ६ नोव्हेंबर २०१८ पासून केला होता. स्वतःचे वाहन रविवारी व मोबाईलसह सर्व संगणक उपकरणे अन्य एका वारी बंद असे ठरवले.
आज या संकल्पास बरोबर २ महिने झाले. एखाद्या वाराचा अपवाद वगळता तो यशस्वी झाला आहे.
दर रविवारी बस, शेअर रिक्षा व कधी लिफ्ट मागणे अशा प्रकारे प्रवास केला. थोडी गैरसोय झाली पण हे जमल्याचा आनंद वाटतो.
तुलनेने डिजिटल उपास सोपा गेला. यासाठी एक पक्का वार न ठेवता कामाच्या सोईनुसार बदलता ठेवला. तेव्हा फक्त आलेला फोन उचलण्यापुरताच मोबाईल चा वापर केला.
बघूया पुढे कसे टिकतंय ते.
7 Jan 2019 - 8:09 am | कुमार१
वन.
केल्याने होत आहे रे .....
31 Jan 2020 - 10:04 am | कुमार१
या शीर्षकाचा एक चांगला लेख इथे आहे:
https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/alternative-lif...