श्रीगणेश लेखमाला - सांगायलाच हव्या अशा गोष्टी

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in लेखमाला
15 Sep 2018 - 8:00 am

.

प्रस्तावना

लिखाणाचे एखादे आवाहन पाहून आपण त्याबद्दल काही लिहिता येईल का? असा विचार आपण करू लागतो. बराच विचार करून त्या आवाहनातील मुख्य मुद्द्याबद्दल फार काही हाती लागत नाही. मग तो विचार आपण सोडून देतो. पण, त्यानंतर, लिहिण्याचा विचार सोडून काही दिवस गेल्यानंतर, आवाहनाच्या मुद्द्याबद्दल नाही तर त्याला समांतर काही सुचते. "श्रीगणेश लेखमाला - २०१८ !" या धाग्यातील 'DIY. डू इट युअरसेल्फ!' या विषयावर लिखाण करण्याचे आवाहन पाहून तसेच काहीसे झाले.

'माझा कोणता अनुभव लिहिता येईल' असा विचार चालू असताना सांगावे असे खास काही मनापासून पुढे येईना, म्हणून तो विचार सोडून दिला. नंतर अचानक काही दिवसांनी, गेल्या दोन-तीन वर्षांपासून चालवलेल्या माझ्या एका छंदाची आठवण झाली, तो म्हणजे 'सांगायलाच हव्या अश्या गोष्टी' जमवण्याचा छंद. त्या छंदाचा विषय आहे - माझ्या मनातही न येऊ शकलेल्या, करायला न जमलेल्या, करणे शक्य नसलेल्या, मनाला चकित करून सोडणार्‍या आणि त्याचबरोबर मनात कुठेतरी खोलवर कायमच्या रुतून बसलेल्या गोष्टी कृतीत आणणार्‍या व्यक्तींच्या गोष्टी... अर्थातच, अचाट चिकाटीने आणि कर्तृत्वाने अडथळ्यांवर मात करून काहीतरी जगावेगळे करून दाखविलेल्या व्यक्तींच्या या गोष्टी आहेत. त्यातले कर्तृत्व विविध प्रकारचे आहे. काहींनी शारीरिक कमतरतेवर मात करून धडधाकट माणसांना धडकी भरेल असे काही करून दाखविले आहे, तर काहींनी असे काही निर्माण केले आहे की भल्या भल्या कर्तृत्ववान लोकांनी तोंडात बोटे घातली आहेत, तर काहींनी आपल्या कृतीने माणसाला माणुसकीचे धडे दिले आहेत... माणसाने मनावर घेतले, तर नराचा नारायण कसा बनू शकतो, याची ही यादी मारुतीच्या शेपटीला लाजवेल इतकी लांब आहे! तेव्हा नमनाला इतकेच तेल खर्च करून मूळ मुद्द्यावर येऊ या.

***************

महत्त्वाचे काही :

१. या लेखमालेतील गोष्टी त्यांच्यातल्या व्यक्तींच्या कर्तबगारीच्या प्रमाणाच्या क्रमात नाहीत. तसा क्रम लावणे माझ्या कुवतीबाहेरची गोष्ट आहे, तेव्हा तसा प्रयत्नसुद्धा मी केलेला नाही.

२. 'मोजक्या शब्दांतला लिखित मजकूर, एक फोटो आणि एक छोटी चलत्चित्रफीत' असे या गोष्टींचे स्वरूप आहे.

३. वर लिहिल्याप्रमाणेच, गोष्टींतला मजकूर, चित्रे आणि चलत्चित्रफीती, या सगळ्यांचा स्रोत आंतरजाल आणि सामाजिक माध्यमे आहे... या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचविणारा मी, केवळ भारवाही हमाल आहे.

***************

०१ : अरुणिमा सिन्हा - अपंगत्वावर मात करत एव्हरेस्ट काबीज करणारी तरुणी

नेहमीच्या जीवनात सोसाव्या लागणार्‍या कष्टांचा बाऊ आपल्यापैकी धडधाकट असलेला प्रत्येक जण केव्हा ना केव्हा करत असतोच (आणि काही जण सतत करत असतात). धडधाकटच नव्हे, तर शारीरिक खेळांत प्रावीण्य असलेल्या व्यक्तीवर शारीरिक अपंगत्व आले तर तो आघात सहन करणे अशक्य होते, हे आपण नेहमीच पाहतो. या पार्श्वभूमीवर, अरुणिमाची गोष्ट मानवाच्या विजिगीषू वृत्तीचे उत्तुंग उदाहरण आहे.

एव्हरेस्टवर झेंडा रोवणारी, 'जगातली पहिली अ‍ॅम्प्युटी (amputee) स्त्री' आणि 'पहिली भारतीय अ‍ॅम्प्युटी (amputee) व्यक्ती (पुरुष अथवा स्त्री)' म्हणून अरुणिमा सिन्हाने आपले नाव कायमचे नोंदविले आहे.

लहानपणापासून मैदानी खेळात आवड आणि प्रावीण्य असलेली अरुणिमा व्हॉलिबॉलची राष्ट्रीय स्तरावरची खेळाडू होती. एक दिवस रेल्वेतून प्रवास करत असताना चोरांनी तिच्यावर हल्ला करून गळ्यातला सोन्याचा हार आणि पर्स चोरण्याचा प्रयत्न केला. तिने केलेल्या प्रतिकाराने चिडून त्यांनी तिला चालत्या रेल्वेच्या डब्यातून खाली ढकलले. बाजूच्या रेल्वे रुळांवरून जाणार्‍या गाडीखाली तिचे दोन्ही पाय चिरडले गेले. ही शारीरिक अवस्था कमी होती की काय, म्हणून रुग्णालयात उपचार घेत असतानाच "ती मनोरुग्ण आहे आणि वेडाच्या झटक्यामध्ये आत्महत्या करण्यासाठी तिने गाडीतून उडी मारली" अशा अफवा पसरविल्या गेल्या.

अशा परिस्थितीत कोणतीही सर्वसाधारण व्यक्ती खचून गेली असती आणि खरोखरच आत्महत्येला प्रवृत्त झाली असती. पण ही मुलगी वेगळ्या मातीने बनलेली होती. तिने सगळ्या विरोधकांना उत्तर देण्यासाठी जगावेगळ्या मार्गाचा अवलंब केला... अशक्याला शक्य करण्याचे ठरवले... सर्वसामान्य धडधाकट माणसाला केवळ कल्पनेनेच धडकी भरवणार्‍या एव्हरेस्टवर झेंडा फडकवण्याचा पण केला! वाटेत आलेले अनंत संशयी शुक्राचार्य, असंख्य भौतिक अडचणी आणि जिवावरचे प्रसंग या सर्वांना तोंड देत तिने आपला पण पुरा करून दाखविला!

या वीरांगनेने काय करून दाखवले, हे समजून घ्यायला वरचे सर्व शब्द अत्यंत थोटके आहेत.

***************

०२ : छवी राजावत - भारतीय तरुणीची नवीन छबी

कुर्ती आणि जीन्स घालून खेडेगावात फिरणारी तरुणी दिसली तर, 'एखाद्या समस्येचा मागोवा घेत ब्रेकिंग न्यूजच्या शोधात असलेली वार्ताहर' असाच विचार आपल्या मनात येईल आणि तो बहुतेक खराच निघेल... पण, राजस्थानमधील जयपूरपासून ६० कि.मी. दूर व अविकसित असलेल्या 'सोडा' नावाच्या गावात तुम्ही असलात, तर तुम्ही सुखद व आश्चर्यकारकरित्या चूक असाल !

बंगळुरूचे रिषी कॉलेज व दिल्लीचे लेडी श्रीराम महाविद्यालय यांतून सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केल्यावर छवी राजावत यांनी श्री बालाजी सोसायटी, पुणे येथून प्रथम क्रमांकाने एमबीएचा अभ्यासक्रम पूर्ण केला. एअरटेल, कार्लसन ग्रूप ऑफ हॉटेल्स, टाइम्स ऑफ इंडिया इत्यादी मान्यवर संस्थांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी आपल्या चांगल्या नोकरीचा आणि शहरी सुखसमृद्धीचा त्याग करून आपल्या मूळ खेडेगावात जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या निःस्पृह कामाने 'सोडा' गावातील लोकांची मने जिंकून घेतल्यानंतर, फेब्रुवारी २०१०मध्ये धर्म, जात आणि लिंगभेदांच्या भिंती भेदून सरपंचपदाची निवडणूक जिंकली.

लगेचच, स्थानिक समस्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने पिण्याचे पाणी (त्या वेळी गावातले पाणी 'शेतीकरिताही अयोग्य आहे' असा अहवाल होता), स्वच्छता, वनीकरण, शिक्षण, घरोघरी वीजपुरवठा, रस्ते, तरुण-तरुणींसाठी स्वयंरोजगाराकडे नेणारे व्यावसायिक शिक्षण, प्रौढ शिक्षण इत्यादी प्रकल्प हाती घेतले आणि ते प्रत्यक्षात उतरविले. या कामात अपुरे अर्थसाहाय्य हा मोठा अडथळा होता. त्याच्यावर मात करण्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबाच्या जयपूरमधील खाजगी हॉटेल व्यवसायातील पैसे वापरण्यास कमी केले नाही. अर्थसाहाय्यासाठी इतर अनेक पारंपरिक व नावीन्यपूर्ण उपाय त्या शोधत असतात. भारतातील कोणत्याही ग्रामीण भागाच्या पाचवीला पुजलेल्या वैयक्तिक व सामाजिक समस्यांना तोड देत त्यांचे काम चालू आहे.

या भारताच्या नवीन छबीचा अनेक वेळेस सुयोग्य सन्मान केला गेला आहे :

१. United Nationsने आयोजित केलेल्या 11th Infopoverty World Conferenceमध्ये भाषणासाठी आमंत्रण.

२. Technology Day कार्यक्रमात तत्कालीन भारतीय राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते सत्कार.

३. IBNLiveतर्फे 'Young Indian Leader' सन्मान.

इत्यादी.

***************

०३ : डॉ नरिंदर सिंग कपानी - एक दुर्लक्षित शास्त्रज्ञ पण यशस्वी उद्योजक

सर्वसामान्य मानवी जीवनात अन्याय होणे ही काही नवीन गोष्ट नाही. शास्त्रीय जगतातही, एकाच्या मूलभूत संशोधनाचे श्रेय दुसर्‍याच्या नावे नोंदले जाण्याच्या अनेक कथा आहेत. आपले रोजचे जीवन अत्याधुनिक बनविण्यात कळीचा वाटा असलेले मूलभूत संशोधन एका भारतीयाने केले आहे, हे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. त्या संशोधकाने त्याबद्दल पेटंट न घेता, संशोधनाची वाट सोडून उद्योगजगताची वाट पकडल्यामुळे हे सत्य दुर्दैवाने शास्त्रीय जगतातही फार कमी जणांना माहीत आहे. त्यामुळे, जेव्हा २००९ साली फायबर ऑप्टिक्समधील संशोधनाबद्दलचा नोबेल पुरस्कार देण्याची वेळ आली, तेव्हा कपानींचे नाव (प्रबंधाचा सन १९५२) नजरेआड होऊन, ते पारितोषिक चार्ल्स काओ (प्रबंधाचा सन १९९६) या चिनी संशोधकाला दिले गेले.

Fortune या नामवंत नियतकालिकाने २२ नोव्हेंबर १९९९ रोजी प्रसिद्ध केलेल्या 'Businessmen of the Century' नावाच्या अंकात डॉ. कपानींचे नाव सात 'Unsung Heroes'मध्ये सामील केले होते.

पंजाबमधील मोगा गावातील शीख घरात जन्मलेल्या या तरुणाने आग्रा विश्वविद्यालयातील अभ्यासानंतर भारतीय आयुधनिर्मानियाँमध्ये (Indian Ordnance Factories Serviceमध्ये) नोकरी सुरू केली. लंडन येथील इंपीरियल कॉलेजमध्ये ऑप्टिक्स या विषयामध्ये संशोधन करण्याची संधी मिळल्यावर त्यांनी सन १९५५मध्ये तेथून पीएच.डी. मिळविली. ऑप्टिकल फायबर्सच्या मोठ्या जुडीतून (large bundle of optical fibers) प्रकाश पाठवून त्याद्वारे प्रतिमेचे वहन करणे, हा त्यांच्या संशोधनाचा मूळ विषय होता. या विषयावरचे संशोधन आधीपासून चालू होते, पण कपानी व हॉप्किन्स (कपानींचे पीएचडीसाठीचे प्रशिक्षक) यांच्या तंत्राने प्रतिमावहनामध्ये उच्च स्पष्टपणा (high resolution) मिळविण्यात यश मिळविले होते.

सन १९६० साली Scientific American या नियतकालिकात लिहिलेल्या लेखात कपानी यांनी सर्वप्रथम 'fibre optics' ही संज्ञा वापरली, त्यामुळे ते 'Father of Fiber Optics' या नावाने ओळखले जातात. त्यांनी या विषयावर जगातले पहिले पुस्तक लिहिले. कपानी त्या काळातले या विषयामधले मुख्य संशोधक, लेखक व वक्ते होते. संप्रेषण (communications), लेझरवहन, आरोग्यशास्त्र, सौर ऊर्जा, प्रदूषणनियंत्रण, अशा विविध विषयांतील अत्याधुनिक तंत्रज्ञानामधील (cutting-edge-of-technology) फायबर ऑप्टिक्सचा उपयोग सिद्ध करण्यामध्ये डॉ. कपानींचा हात आहे. त्यांच्या नावे शंभरापेक्षा जास्त पेटंट्स, १००पेक्षा जास्त संशोधन प्रबंध व अनेक पुस्तके आहेत.

पूर्णकाळ संशोधन करण्याऐवजी उद्योजक बनण्यात त्यांना जास्त रस होता. त्यामुळे त्यांनी तंत्रज्ञानाचे व्यवस्थापन, नावीन्यपूर्ण उपयोग (innovation) व हस्तांतरण (technology transfer) करण्यासाठी सन १९६०मध्ये स्वतःची Optics Technology Inc ही अमेरिकन कंपनी स्थापन केली. अनेक अमेरिकन आणि इतर देशांतील कंपन्यांबरोबर संयुक्त उपक्रम (joint-ventures) व अधिग्रहण (acquisitions) केल्यानंतर १९६७मध्ये ही कंपनी जनतेच्या निवेशासाठी खुली (Initial Public Offer) केली गेली. सन १९७३मध्ये त्यांनी Kaptron Inc ही आणखी एक कंपनी स्थापन केली व ती १९९०मध्ये AMP Incorporatedला विकली. याशिवाय त्यांनी इतर अनेक कंपन्यांमध्ये महत्त्वाची अधिकारपदे भूषविली आहेत.

त्यांना मिळालेल्या सन्मानांपैकी काही खालीलप्रमाणे आहेत :

१. National Inventors Council (USA)चे सभासदत्व.

२. USA Pan-Asian American Chamber of Commerceचे Excellence 2000 Award, १९९८.

३. अनेक मान्यवर संस्थांचे International Fellow पद : British Royal Academy of Engineering, Optical Society of America, American Association for the Advancement of Science, इत्यादी.

४. AMP Fellow, heading the Entrepreneur & Technical Expert Program व Chief Technologist for Global Communications Business

५. सभासदत्व : Young Presidents Organization; ही सध्या World Presidents Organization या नावाने ओळखली जाते.

६. Regents Professor at the University of California, Berkeley (UCB) व University of California, Santa Cruz (UCSC).

७. Director of the Center for Innovation and Entrepreneurial Development (CIED) at UCSC.

इत्यादी.

***************

०४ : आशा खेमका - भारतीय अर्धशिक्षित ग्रामीण गृहिणी ते ब्रिटिश शैक्षणिक प्रशासनातील धुरीण

सन १९५१मध्ये बिहारमधील सीतामढी जिल्ह्यामध्ये जन्मलेल्या मुलीला, तारुण्यात आली म्हणून (किंबहुना कोणतेच कारण न देता) जबरदस्तीने शाळेला रामराम ठोकावा लागणे ही एक सामान्य गोष्ट आहे. तसेच २५ वर्षांची होईपर्यंत, लग्न होऊन तिला तीन मुले होणे ही गोष्टही सामान्यच गोष्ट आहे. खरी असामान्य कथा तिथून पुढे सुरू होते!

अस्थिविशारद (trauma and orthopaedic surgeon) असलेल्या आपल्या पतीबरोबर आपल्या तीन मुलांसमवेत अशी एक स्त्री ४० वर्षांपूर्वी (सन १९७८मध्ये) ब्रिटनला गेली. अर्धशिक्षित व साधेसोपे इंग्लिशसुद्धा न येणार्‍या त्या स्त्रीला ते पाश्चिमात्य जग परग्रहाइतके परके वाटल्यास नवल नव्हते! पण, ती वेगळ्या मातीने बनलेली होती. नवीन गोष्टी शिकणे तिला अडथळा न वाटता, ललकारणारी आव्हाने वाटली. टीव्हीवरचे कार्यक्रम आणि घराच्या आजूबाजूला राहणार्‍या गृहिणींबरोबर गप्पा मारणे यांचा उपयोग करत तिने इंग्लिश भाषा शिक्षणाचा प्रवास सुरू केला.

अश्या तर्‍हेने गृहिणीपदाची २० वर्षे पुरी होईपर्यंत तिने कार्डिफ विश्वविद्यालयातून व्यावसायिक डिग्री (business degree) मिळविली... आणि ही केवळ सुरुवात होती! त्यानंतर, व्याखाता (लेक्चरर) पदापासून सुरुवात करून सन २००६पर्यंत आशाजींनी वेस्ट नॉटिंगहॅमशायर कॉलेजच्या 'प्रिन्सिपॉल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी' या पदापर्यंतची मजल गाठली होती! हे कॉलेज ब्रिटनमधील आकाराने आणि मानाने मोठ्या असलेल्या कॉलेजेसच्या यादीत बरेच वरच्या स्थानावर आहे. भारतातील अविकसित ग्रामीण भागातील अर्धशिक्षितही म्हणता येणार नाही अशा अवस्थेतल्या गृहिणीने पाश्चिमात्य देशात शिक्षणक्षेत्रातले धुरीण बनण्याचा हा पल्ला गाठणे आश्चर्यकारक आहे! पण, आशाजींचे कर्तृत्व तिथेच थांबले नाही... अजून खूप मोठे आकाश व्यापणे बाकी होते!

आपल्या ३० वर्षांपेक्षा जास्त कालखंडाच्या शैक्षणिक प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक मान्यवरांबरोबर काम केले आहे आणि अनेक तरुण आयुष्यांना कर्तृत्वाच्या विशाल आकाशाला गवसणी घालण्यासाठी आवश्यक असे मार्गदर्शन केले आहे. अनेक पुरस्कारांनी व सन्मानांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे. त्यापैकी काही महत्त्वाचे खालीलप्रमाणे आहेत :

१. OBE (Order of the British Empire) (२००८).
२. Dame Commander of the Order of the British Empire (२०१४) : हा स्त्रियांना दिला जाणारा Knighthood स्तराचा सन्मान, ब्रिटनमधील सर्वोच्च मुलकी पुरस्कार आहे. १९१७ साली अस्तित्वात आलेला हा सन्मान आतापर्यंत भारतीय वंशाच्या केवळ चार स्त्रियांना दिला गेला आहे.
३. Asian Businesswoman of the Year award (२०१७).
४. Deputy Lieutenant of Staffordshire.
५. National Jewel Award for Excellence in Healthcare and Education (२००७).
६. Asian Women of Achievement Award (२००८).
७. Midlands Businesswoman of the Year (२००९).
८. NRI Welfare Society of India Gold medal for her work in education as a non-resident Indian (२०१०).
९. Inspirational Woman of the Year, Derbyshire and Nottinghamshire Chamber of Commerce (२०११).
१०. Business Personality of the Year, Ashfield and Mansfield Chad (२०११).

ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारले असले, तरी त्यांची मायभूमीशी असलेली नाळ शाबूत आहे. आपले ब्रिटनमधले यशस्वी कार्यक्रम भारतात राबवून इथल्या शिक्षणपद्धतीचा विकास करण्याचा त्यांचा मानस आहे. शिक्षणाचा स्तर सुधारणे आणि व्यावसायिक कौशल्य विकास, ही या प्रकल्पांची उद्दिष्टे आहेत.

***************

०५ : आलोक सागर - आयआयटी प्रोफेसर ते आदिवासींच्या उन्नतीसाठी झगडणारा अर्धनग्न फकीर

ही कहाणी जगावेगळी आहे. आलोक सागर यांनी स्वीकारलेल्या मार्गाबद्दल मतभेद असू शकतील, पण त्यांनी जे केले, ते 'येरागबाळ्याचे काम नोहे' हे तर सगळ्यांनाच मानावे लागेल.

मध्य प्रदेशातील घोराडोंगरी विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदात्यांचे सर्वेक्षण करताना, एका व्यक्तीच्या भूतकालाबद्दल स्थानिकांपैकी कोणालाच काही माहिती नाही, हे ध्यानात आल्याने जिल्हा प्रशासन गोंधळात सापडले. अशा पार्श्वभूमीच्या व्यक्तींबद्दल सर्वसाधारणपणे केल्या जाणार्‍या (गुन्हेगारी, अतिरेकी, इ) अटकळींमुळे प्रशासनाने त्या व्यक्तीला ते स्थळ सोडून जायची आज्ञा केली, तेव्हा कोठे त्या व्यक्तीने आपली खरी ओळख आणि आपल्या पदव्यांची मोठी जंत्री दिली... हे सगळे अविश्वसनीय वाटल्याने प्रशासनाने ती माहिती ताडून पाहिली आणि त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही.

आलोक सागर नावाची ही व्यक्ती भूतपूर्व आयआयटी प्रोफेसर होती! आलोक यांनी आयआयटी, दिल्लीमधून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगमध्ये बॅचलर आणि मास्टर्स (१९७३) स्तराच्या पदव्या मिळविल्या आहेत व अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ह्युस्टन विद्यापीठातून पीएच.डी. पूर्ण केली आहे. त्यानंतर ते आयआयटी, दिल्लीमध्ये इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग विभागात प्रोफेसरच्या पदावर रुजू झाले. आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन त्यांच्या अनेक नामवंत विद्यार्थ्यांपैकी एक आहेत.

भारताचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, तळाच्या स्तरापासून (grassroots) विकासाला सुरुवात केली पाहिजे, असे त्यांचे मत आहे. त्यासाठी प्रथमस्तराच्या शहरातली उत्तम पगाराची आणि मानाची नोकरी सोडून आलोक यांनी सन १९८६मध्ये वीज आणि रस्ते यासारख्या मूलभूत सोयींचाही अभाव असलेल्या अविकसित भागांतील सामाजिक कार्यकर्त्याचे व्रत स्वीकारले. गेली ३२ वर्षे ते मध्य प्रदेशातील बेतूल व होशंगाबाद या दोन जिल्ह्यांतील आदिवासींमध्ये काम करत आहेत. आदिवासींमध्ये पर्यावरणाची जाणीव निर्माण करत त्यांनी आतापर्यंत ५०,०००पेक्षा जास्त वृक्षांची लागवड केली आहे.

या काळात ते आदिवासींत पूर्णपणे मिसळून गेले आहेत... इतके की त्यांची पार्श्वभूमी माहीत नसूनही, त्यांना आपल्यातले एक मानण्यात गेली तीन दशके आदिवासींना काहीच अडचण वाटली नाही. त्यांच्या मालमत्तेच्या यादीत तीन कुर्ते-लुंग्या आणि एक सायकल इतकीच सामग्री आहे. आदिवासींमध्ये प्रचलित असलेल्या अनेक स्थानिक भाषा व उपभाषा त्यांना येतात. त्यांचा बहुतेक वेळ आदिवासीचे प्रबोधन करणे आणि त्यांना वृक्षलागवडीसाठी बियाणे पुरवणे यात व्यतीत होतो.

"आपल्या शिक्षणाचा उपयोग विकासासाठी करण्याऐवजी, प्रमाणपत्रे दाखवून आपल्या बुद्धीचे प्रदर्शन करण्याकडे लोकांचा कल आहे" हे त्यांचे मत बरेच काही सांगून जाते!

***************

०६ : बेबी हलदर - अशिक्षित कामवाली बाई ते प्रसिद्ध लेखिका

घरकाम करणार्‍या अशिक्षित बाईला एखाद्या मान्यवर साहित्य परिषदेत भाषण करायला मानाचे आमंत्रण मिळाले, तर ते पाहून आपल्याला जरा चक्रावल्यासारखेच होईल, नाही का? बेबी हलदर नावाच्या एका प्रतिभावान स्त्रीने हे अशक्य, शक्य करून दाखवले आहे!

काश्मीरमध्ये जन्मलेली बेबी चार वर्षांची असताना दारुड्या बापाने तिच्या आईला घराबाहेर काढले. काश्मीर ते बंगालमधील मुर्शिदाबाद व नंतर दुर्गापूर असा प्रवास करत व्यसनाधीन बाप आणि सावत्र आई यांच्या छळणुकीत बेबीचे बालपण गेले. शाळेच्या आतबाहेर करत करत सरतेशेवटी १२ वर्षांची असताना सहावीनंतर बेबीला शाळेला रामराम ठोकावा लागला... कारण, तिच्यापेक्षा १४ वर्षांनी मोठ्या असलेल्या नवर्‍याशी तिचे लग्न झाले. वयाच्या तेराव्या वर्षी ती आई झाली आणि पुढच्या एकदोन वर्षांत ती एकूण तीन मुलांची आई झाली. घर चालविण्यासाठी ती घरकामे करत असे. नवर्‍याच्या छळाला कंटाळून वयाच्या २५व्या वर्षी नवरा व घर सोडून तिने आपल्या तीन मुलांसह दिल्लीची रेल्वे पकडली. दिल्लीमध्ये घरकाम करून तिने आपले घर चालविले आणि मुलांचे शिक्षण चालू ठेवले. तेथेही तिला दुष्ट प्रवृत्तीच्या अनेक घरमालकांच्या कारवायांना तोंड द्यावे लागले.

लेखक आणि निवृत्त मानववंशशास्त्र प्राध्यापक प्रबोध कुमार हा तिचा शेवटचा घरमालक. मात्र ते तिच्या दु:खात सुखाचा किरण ठरले. मान्यवर हिंदी लेखक मुन्शी प्रेमचंद यांचे नातू असलेल्या प्रबोध कुमारांनी बेबीची पुस्तकांमधली रुची हेरली आणि त्यांनी आपला अग्रगण्य लेखकांच्या पुस्तकांचा खजिना तिच्यासाठी उघडा केला. त्यातले पहिले पुस्तक होते, तस्लिमा नसरीन याचे आत्मचरित्र, आमार मेयेबेला (माझे बालपण). त्यातील गरिबीत आणि छळात वाढलेल्या मुलीच्या मनात खदखदणार्‍या दु:खाच्या आणि प्रक्षोभाच्या वर्णनाने बेबीच्या मनाला पुरते झंझोडून टाकले. त्याच्या स्वतःच्या आयुष्याशी असलेल्या विलक्षण साम्यामुळे, ते वाचन बेबीच्या आयुष्यातला निर्णायक टप्पा ठरला. त्यानंतर तिने अनेक पुस्तके अधाशासारखी वाचून काढली.

एकदा दक्षिण भारताच्या प्रवासाला जाण्यापूर्वी कुमार यांनी बेबीला वह्या आणि पेन्स आणून दिली व आत्मकथा लिहायला प्रवृत्त केले. मग तर घरकामातून फुरसत मिळाली की मातृभाषा बंगालीत, साध्या सोप्या सरळ शैलीत आपली कर्मकथा लिहिणे, हा बेबीचा छंदच झाला. कुमार परत येईपर्यंत तिची १०० पाने लिहून झाली होती. सर्व लेखन पुरे व्हायला आणखी काही महिने गेले. त्यानंतर थोडासा संपादकीय हात फिरवून कुमार यांनी ते लेखन आपल्या लेखक मित्रांना दाखवले आणि त्याचे हिंदीत भाषांतर करून घेतले. सन २००२ साली कोलकात्याच्या 'रोशनी पब्लिशर्स' या छोट्या प्रकाशकाने पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध केली. ती इतकी लोकप्रिय झाली की पुढच्या दोन वर्षांत आणखी दोन आवृत्त्या काढाव्या लागल्या. मूळ बंगाली लेखनाचे प्रकाशन, 'आलो अंधारी (प्रकाश आणि अंधार)' या नावाने २००४ साली झाले. त्यानंतर, पुस्तकाच्या मल्ल्याळम (२००५) आणि इंग्लिश (Aalo Aandhari {A Life Less Ordinary}, २००६) आवृत्त्याही प्रसिद्ध झाल्या. आजतागायत हे पुस्तक १३ अभारतीय (फ्रेंच, जर्मन, जपानी, कोरियन, इ) भाषांसकट २१ भाषांत प्रसिद्ध झाले आहे.

आपले पुस्तक व इतर साहित्य परिषदांच्या परिसंवादात भाग घेण्यासाठी लेखिकेला भारतातून व परदेशातून आमंत्रणे मिळाली आहेत. 'एशात रूपांतर' या तिच्या दुसर्‍या पुस्तकाचेही वाचकांनी उत्तम स्वागत केले आहे. सध्या तिसर्‍या पुस्तकाचे लेखन चालू आहे.

असे असले, तरी बेबीने प्रबोध कुमारांच्या गुरुग्राममधील घरी काम करणे सोडलेले नाही. लेखनापासून मिळालेल्या पैशातून कोलकात्यात घर बांधून तेथे आपले उर्वरित आयुष्य व्यतीत करण्याची लेखिकेची मनीषा आहे.

***************

श्रीगणेश लेखमाला २०१८

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

15 Sep 2018 - 9:49 am | कुमार१

अरुणीमा सोडून इतरांची माहिती प्रथमच वाचली .
मस्त लेख
धन्यवाद

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Sep 2018 - 10:07 am | ज्ञानोबाचे पैजार

पण म्हात्रे सर, सर्व परिचय फारच त्रोटक वाटले. तुम्हाला अजून काहीतरी माहीत आहे / सांगायचे आहे हे प्रत्येक वेळा जाणवत होते.
या प्रत्येकावर एका स्वतंत्र लेख / लेखमाला लिहा ही आग्रहाची विनंती.
पैजारबुवा,

सुबोध खरे's picture

15 Sep 2018 - 11:06 am | सुबोध खरे

+१००

तुषार काळभोर's picture

15 Sep 2018 - 12:47 pm | तुषार काळभोर

प्रत्येक व्यक्तिमत्वावर स्वतंत्र लेख अशी एक लेखमाला होऊन जाऊद्या डॉक्टर साहेब.
प्रो अलोक सागर व बेबी हलदर यांच्या कहाण्या खरोखर "सांगायलाच हव्या अशा गोष्टी" आहेत

अभ्या..'s picture

15 Sep 2018 - 1:08 pm | अभ्या..

अ‍ॅक्चुअली एक्काकाका,
एक स्वतंत्र लेखमालाच होऊन जाऊदे अशा व्यक्तिमत्त्वांवर.

जव्हेरगंज's picture

15 Sep 2018 - 1:23 pm | जव्हेरगंज

+१२३४

वरुण मोहिते's picture

15 Sep 2018 - 12:57 pm | वरुण मोहिते

समयोचित लेख..

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Sep 2018 - 1:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

कुमार१, ज्ञानोबाचे पैजार, सुबोध खरे, पैलवान व वरुण मोहिते : अनेक धन्यवाद !

@ ज्ञानोबाचे पैजार, सुबोध खरे, पैलवान :

असे काही अचाट करणार्‍या लोकांची यादी फार मोठी आहे. त्यांची संख्या आणि कर्तृत्व पाहिले की आपण फार मोठे दिवे लावलेले नाहीत याची प्रकर्षाने जाणीव होते ! गेल्या केवळ दोनएक वर्षांतच छंद म्हणून जमा करायला सुरुवात केल्यानंतर आज माझ्याकडे अश्या १५० पेक्षा जास्त गोष्टी जमा झालेल्या आहेत. या प्रत्येक व्यक्तीवर स्वतंत्र पुस्तक लिहिता येईल इतके त्यांचे कर्तृत्व महान आहे. या लेखमालेच्या निमित्ताने त्यातील सहा नावे निवडणे हेच मोठे आव्हान होते !

फक्त एखाद्या व्यक्तींवर जास्त लिहिल्यास, बर्‍याच व्यक्तींचा परिचय करून देणे शक्य नव्हते. म्हणूनच लेखाच्या सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे, "मोजक्या शब्दांतला लिखित मजकूर, एक फोटो आणि एक छोटी चलत्चित्रफीत" असे लेखमालिकेचे स्वरूप ठेवले आहे. ही लेखमालिका पुढे चालू ठेवून, माध्यमांत लक्षणीयरित्या न झळकलेल्या पण "सांगायलाच हव्या अश्या", अनेक गोष्टी सांगायचा मानस आहे.

लोकांच्या मनात प्राथमिक माहितीचे बीज पेरून, त्यांना पसंत पडलेल्या व्यक्तीबद्दल अजून जास्त माहिती मिळविण्यास उद्युक्त करणे, इतकाच सीमीत उद्येश या लेखमालेचा आहे.

मुक्त विहारि's picture

15 Sep 2018 - 10:01 pm | मुक्त विहारि

....माध्यमांत लक्षणीयरित्या न झळकलेल्या पण "सांगायलाच हव्या अश्या", अनेक गोष्टी सांगायचा मानस आहे.

ह्या अशा लेखमालांमुळेच, मिपा सोडवत नाही...

प्रकाश घाटपांडे's picture

16 Sep 2018 - 11:24 am | प्रकाश घाटपांडे

हे सगळ कुठून येतं? हा प्रश्न मला फार सतावतो

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Sep 2018 - 7:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

नरातच नारायण बनण्याचे बीज लपलेले असते, पण बहुदा मानवी स्वभावाच्या काही कमींमुळे त्याचे लक्ष तिकडे जात नाही. माणसांचे दोन मुख्य प्रकार असतात :

पहिल्या प्रकारची माणसे आजूबाजूच्या व्यवस्थेला दोष देत व्यवस्थेप्रमाणे स्वतःला बदलण्याची धडपड करत, आपल्याच कोषात कुंथत जीवन व्यतीत करतात;

तर दुसर्‍या प्रकारची माणसे आजूबाजूच्या व्यवस्थेतील संधीचा सतत शोध घेत असतात आणि व्यवस्थेवर मात करून तिला स्वतःला हवी तशी बदलून टाकतात.

दुसर्‍या प्रकारात नराचे नारायण होतात, तर पहिल्या प्रकारात नराचे नार्‍या बनतात !

स्वधर्म's picture

17 Sep 2018 - 11:40 am | स्वधर्म

अत्यंत प्रेरणादायक. फक्त अापल्या प्रतिसादात खालील वाक्य बहुधा उलट लिहीले गेले अाहे.
>पहिल्या प्रकारात नराचे नारायण होतात, तर दुसर्‍या प्रकारात नराचे नार्‍या बनतात !

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Sep 2018 - 1:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

नजरचुकीने वाक्यात झालेली गडबड ध्यानात आणून दिल्याबद्दल परत एकदा धन्यवाद. योग्य तो बदल करून घेतला आहे.

रागो's picture

15 Sep 2018 - 2:01 pm | रागो

स्वतंत्र लेखमाला लिहा ही आग्रहाची विनंती

ज्योति अळवणी's picture

15 Sep 2018 - 2:08 pm | ज्योति अळवणी

अप्रतिम माहिती.

प्रचेतस's picture

15 Sep 2018 - 2:50 pm | प्रचेतस

सर्वच व्यक्तिमत्वे अतिशय प्रेरणादायी. धन्यवाद ह्या लेखाबद्दल.

अनन्त्_यात्री's picture

15 Sep 2018 - 2:57 pm | अनन्त्_यात्री

उत्कट वास्तव!

श्वेता२४'s picture

15 Sep 2018 - 3:12 pm | श्वेता२४

आजकाल समाजात वाईट काय चाललंय हे दाखवून टीआरपी व ब्रेकींग न्यूजच्या आर्थिक समिकरणात अडकलेल्या मिडीयाच्या काळ्याकुट्ट वार्तांकनातून समाजात प्रकाश पसरवणाऱ्या व्यक्तींना स्थान मिळणं दुरापास्तच. त्यामुळे ज्यांच्याविषयी सांगांयलाच हवे नेमके तेच दुर्लक्षिले जातात. तुमच्या लेखतून सांगितलेला हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे व याविषयी अधिक वाचायला आवडेल.

आवडलं.

अभिजीत अवलिया's picture

15 Sep 2018 - 8:01 pm | अभिजीत अवलिया

उत्तम माहिती.

पद्मावति's picture

15 Sep 2018 - 8:21 pm | पद्मावति

उत्तम लेख.

चित्रगुप्त's picture

15 Sep 2018 - 11:27 pm | चित्रगुप्त

अत्यंत प्रेरणादायक, माहितीपूर्ण, वाचनीय लेख. पुढील भाग अवश्य लिहावेत ही विनंती.

निशाचर's picture

16 Sep 2018 - 3:20 am | निशाचर

उत्तम लेख!

सुमो's picture

16 Sep 2018 - 5:34 am | सुमो

ही लेखमालिका पुढे चालू ठेवून, माध्यमांत लक्षणीयरित्या न झळकलेल्या पण "सांगायलाच हव्या अश्या", अनेक गोष्टी सांगायचा मानस आहे.

नक्की वाचायला आवडेल अशा व्यक्तींबद्दल. लेखमालिका लवकरच लिहायला घ्यावी ही विनंती.

चौकटराजा's picture

16 Sep 2018 - 7:20 am | चौकटराजा

खरे तर यामुळे मला मिपावरचे हिरो म्हणून डॉ म्हात्रे , डॉ खरे , कंजूस , प्रचेतस ,एस,, अभ्या , मोदक अशी काही नावे लेखासाठी तरळून गेली ! माझया सारखा नास्तिक माणूस अशी चरित्रे वाचली की म्हणतो " देवा , धन्स अशी माणसे निर्माण केल्याबद्दल ! "

यातली बरीच माहिती माझ्यासाठी नविन होती. फार सुंदर लेख. आलोक सागर सारख्या माणसांची कमाल आहे. हा लेख येथपर्यंत मर्यादित न ठेवता लेखमाला केलीत तर वाचायला नक्कीच आवडेल. लेखमाला कराच.

शान्तिप्रिय's picture

16 Sep 2018 - 11:40 am | शान्तिप्रिय

सुन्दर लेख

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Sep 2018 - 3:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितीपूर्ण लेखन केल्याबद्दल आभार...!

-दिलीप बिरुटे

डॉ श्रीहास's picture

16 Sep 2018 - 7:15 pm | डॉ श्रीहास

मस्त ....

काय लोकं असतात , जिगर म्हणतात ती ही !!

नाखु's picture

16 Sep 2018 - 8:08 pm | नाखु

अशी माणसं पाहिली कि आपला फोलपणा लक्षात येतोय.
एक्का काका खरं विस्तृतपणे लेखमाला आली पाहिजे.

चिल्लर पै सुद्धा नसलेला नाखु

सुधीर कांदळकर's picture

17 Sep 2018 - 7:17 am | सुधीर कांदळकर

अरुणिमा आणि सागर यांच्याबद्दल चित्रवाणीवर अहवाल पाहिला होता. सागर यांच्याबद्दल तर हल्लीच गेल्या दोनचार महिन्यात. अरुणिमाबद्दल नि:शब्द. छवी असामान्य. एवढ्या पदव्या मिळवल्यावर मातृभूमीची ओढ एवढी तीव्र! गावातल्या लोकांची मोट बांधणे खरेच कठीण असते. हॅट्स ऑफ. कपानीसाहेब जीनिअस, सिंपली ग्रेट. आलोक सागर वंदनीय. बेबी हलधरचे कौतुक वाटले. सहाही व्यक्ती असामान्य यात संशय नाही. अरुणिमा आणि छवी राजावत यांना परिस्थिती जास्त प्रतिकूल होती असे वाटते. इतरांचा पाठिंबा मिळवून पुढे जाणे इतरांना मागे टाकून पुढे जाण्यापेक्षा जास्त कठीण आहे असे वाटते.

एका अप्रतिम लेखबद्दल धन्यवाद.

रियल लाईफ हिरो-हिरोईन्स चे व्यक्ती परिचय खूप आवडले!

clap

नंदन's picture

17 Sep 2018 - 1:07 pm | नंदन

लेख आवडला. सातत्याने निराशाजनक बातम्या आणि उद्वेगजनक चर्चा कानी पडत असताना, अशा सकारात्मक कामांची दखल घेतली जाणंही महत्त्वाचं.

सुंदर परिचय म्हात्रे साहेब.

Patil 00's picture

17 Sep 2018 - 11:07 pm | Patil 00

मस्त सर छान लिहलेय

अनिंद्य's picture

18 Sep 2018 - 12:17 pm | अनिंद्य

डॉ म्हात्रे,

लेखनाचा फॉरमॅट आणि व्यक्तिमत्वांची निवड दोन्ही आवडले.
शुभेच्छा,

अनिंद्य

टर्मीनेटर's picture

18 Sep 2018 - 3:46 pm | टर्मीनेटर

सगळ्याच व्यक्ती ग्रेट आहेत. पण गेली १० वर्षे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असून, आत्ता पर्यंत काही शे वा हजार किलोमीटर्स ऑप्टिकल फायबर स्वतःच्या आणि क्लायंटसच्या नेटवर्क साठी वापरली असेल, पण तिचे जनक डॉ नरिंदर सिंग कपानी यांच्या विषयी हा लेख वाचेपर्यंत अगदीच माहितीशून्य असल्याबद्दल खजील झालो आहे. खूप छान माहितीपूर्ण लेख. _/\_

Nitin Palkar's picture

18 Sep 2018 - 8:32 pm | Nitin Palkar

अतिशय उत्तम लेख. तुमच्याबद्दलचा आदर अनेक पटींनी वाढला. _/\_

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Sep 2018 - 11:40 am | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !

ही मालिका पुढे चालू ठेवण्याची इच्छा आहेच.

अतिशय सुंदर लेख आणि प्रतिसाद. सर्वांनी सांगितल्याप्रमाणे अशा व्यक्तीमत्वांची ओळख स्वतंत्र लेखमालेद्वारे होउद्या.

प्रशांत's picture

24 Sep 2018 - 10:59 am | प्रशांत

अत्यंत प्रेरणादायक लेख.

"सांगायलाच हव्या अश्या" लेखामालेची वाट बघतोय...

नूतन सावंत's picture

29 Sep 2018 - 10:48 pm | नूतन सावंत

वा!अरुणीम आणि बेबी हलदर यांच्याविषयी माहिती होती.पण तुम्ही होटी त्यापेक्षा जास्त माहिती मोजक्या शब्दात दिली आहेत.