श्रीगणेश लेखमाला - २०१८ !

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
18 Jul 2018 - 2:28 pm

एक राजपुत्र होता. सेवकांच्या गराड्यात वाढलेला. लाडाकोडात वाढलेला. शब्दही खाली पडू न दिला जाणारा. त्याला एक सवय होती - जेवण झालं, की एकातरी भोजनपात्राचा चक्काचूर केल्याशिवाय त्याला चैन पडत नसे. उगाच, काही कारण नसताना.

राणी अस्वस्थ होई.
राजा म्हणे : "अगं, आपल्याला परवडतंय रोज एक भांडं फुटलं तरी. आपण राजपदावर उगाच आहोत का?"
पण राणीला पटत नसे. तिने राजपुत्राची ही सवय मोडायचं ठरवलं.

तिने राजकुंभकाराला बोलावून घेतलं. राजपुत्राला सांगितलं, तू यांच्याकडून मातीचे घडे बनवायला शिकायचंस. भविष्यात राजा होण्यासाठी हे गरजेचं आहे. थोडीफार कुरकुर करत का होईना, राजपुत्र गेला.

दिवस सरले, राजपुत्राचं कुंभकाराकडचं शिक्षण पूर्ण झालं. राजपुत्र परतला. राणीने त्याला जेवायला वाढलं. जेवण झालं, आणि अहो आश्चर्यम्! भोजनपात्रांना काही अपाय करायचं दूरच राहिलं, त्यांना चक्क नमस्कार करून राजपुत्र मागे सरकला. राजाला घेरीच यायची बाकी होती, पण राणी मात्र समजून उमजून हसली. स्वतःशीच.

--

सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचे दाही दिवस मिपावर श्रीगणेश लेखमालेचा उत्सव असेल. एका संकल्पनेवर/थीमवर आधारित लेखन आपण त्या दिवसांत प्रसिद्ध करतो.

या वेळची थीम असेल - DIY. डू इट युअरसेल्फ! यामध्ये तुम्ही स्वतःच्या हाताने केलेल्या नवनिर्मितीचा अनुभव, सृजनशीलतेचा गोषवारा, स्वानंदाचं निधान तुम्हाला द्यायचं आहे. श्रीगणेश लेखमाला असल्याने त्यासंबंधित DIY - स्वतः केलेली, कमीत कमी तयार वस्तू वापरून केलेली - सजावट हेही त्यात अंतर्भूत आहे.

DIY करणाऱ्या लोकांचे सगळेच प्रयोग यशस्वी होतात असं नाही. एखाद्या फसलेल्या प्रयोगाचं वा फजितीचं खुमासदार वर्णनही तुम्ही देऊ शकाल!

स्वनिर्मितीचं मोल आपल्याला कळतंच. सुरुवातीच्या गोष्टीतल्या राजपुत्राप्रमाणे ते इतरांनाही कळावं अशी धडपड, आणि त्यासाठी आपला हा लेखमालेचा प्रयत्न!

आपलं लेखन 'साहित्य संपादक' या आयडीला व्यनिमार्फत पाठवा, किंवा sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail.com या पत्त्यावर ईमेल करा. लेखन पाठवण्याची अंतिम मर्यादा- ३१ ऑगस्ट २०१८!

टीप : थीमव्यतिरिक्त अन्य दर्जेदार/उल्लेखनीय लेखसुद्धा घेता येतील. यासाठी साहित्य संपादकांशी संपर्क साधा.

संस्कृती

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

18 Jul 2018 - 3:16 pm | यशोधरा

आली का घोषणा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jul 2018 - 3:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

यात उदाहरणे कथा नसली पाहिजेत, असे वाटते.जे काय सांगायचं ते स्पष्ट सांगितलं पाहिजे, बाकी लेखमालेला शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे
(स्पष्ट)

गवि's picture

18 Jul 2018 - 5:50 pm | गवि

ओ सर, तुमच्या "स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग" पुस्तकाची आवृत्ती संपली का? कुठे मिळेना झालंय हल्ली.

-(अस्पष्ट) गवि

ज्योति अळवणी's picture

18 Jul 2018 - 4:03 pm | ज्योति अळवणी

अरे वा! छान संकल्पना आणि तिची मांडणी देखील. आवडलं

DIY तत्वाने केलेल्या अनेक गोष्टींपैकी एक स्वनिर्मित रसगुल्ला पकवण्याचा प्रयत्न. काय पण पदार्थ शोधला होता, ऑफ ऑल पदार्थ, थेट रसगुल्लाच.

खपून खपून शेवटी एक रबरगुल्ला सिद्ध झाला. बाकी अपमान सांगावा मनात. (... आणि यंदा लेखमालेत..) असं आवाहन सर्वांना करतो.

शुभेच्छा आणि उत्सुकता.

पैलवान's picture

18 Jul 2018 - 5:29 pm | पैलवान

रबरगुल्ला नाव आवडण्यात आलेले आहे :)

रबरगुल्ल्याच्या किश्श्याच्या प्रतिक्षेत....

ते इतर सदस्यमित्रांना आवाहन आहे. ;-)

प्रचेतस's picture

18 Jul 2018 - 5:38 pm | प्रचेतस

हे अस्सं पाहिजे नायतर काही ज्येष्ठ सदस्य स्पष्ट बोलून उगीच खुसपट काढत बसतात.

लेखाच्या प्रतिक्षेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jul 2018 - 5:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एखादी गोष्ट करायची तर ती व्यवस्थितच झाली पाहिजे. उगाच उत्साहाच्या भरात, भावनेच्या भरात, कोणी म्हणतय लय भारी म्हणून करण्यापेक्षा काही गोष्टींचा एक प्रोटोकॉल असतो तो पाळला गेला पाहिजे.

-दिलीप बिरुटे

आपल्या नातवंडांसारखी तरुण पोरं पोरी उत्साहाने लेखमाला सजवताहेत तर बुवा आशीर्वाद द्यावे, हातावर काही खाऊ, वडी ठेवावी.. पण नाही.. स्पष्ट विचार करत बसते जुनी पिढी..

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jul 2018 - 5:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

एकमेकाबद्दलचे हे प्रेमालाप थांबवा आणि सगळे लिखाणकामाला लागा कसे ! ;) =))

प्राडाँनी आता डब्बल बॅरल खाली ठेवली पाहिजे.

उदाहरणातली कथा रुपकात्मक असून 'थीम'ला पुढे नेणारीच आहे. उलट मला हा अभिनव प्रयोग फार आवडला.
बाकी प्रोटोकॉल प्रोटोकॉल खेळायला हे काय राष्ट्रपती भवन आहे का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jul 2018 - 6:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही गोष्टी पाळायच्या असतात, एक अलिखित नियम असतात, पद्धती असतात, राष्ट्रपती भवन असो की आपलं घर असो तिथे काही अलिखित नियम आपण पाळतो. तसंच नोटीस, सुचना, घोषणा यांची सांगण्याची एक पद्धत असते. मला घोषणा वाचून कुठे प्रवचन ऐकायला बसलो की काय असा फिल आला. मग कथा संपल्यावर बुवा कथेचा आणि उद्देशाचा मेळ घालण्याचा प्रयत्न करीत आहेत असं वाटलं.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

18 Jul 2018 - 6:14 pm | प्रचेतस

ओक्के.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Jul 2018 - 6:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं कल्पना ! सिद्धहस्त मिपाकर चला लागा कामाला.

अजून तसं काही केलं नसलं तर धडपड करून आता काहीतरी करा आणि त्याची कहाणी लिहा ! -;)

पिलीयन रायडर's picture

18 Jul 2018 - 7:51 pm | पिलीयन रायडर

घोषणा झाल्या झाल्या 16 प्रतिसाद कसे म्हणून लगबगीने आले तर ज्येष्ठांचा पापड मोडलेला दिसतोय!

घोषणा आवडली, मोडा हो बिनधास्त प्रोटोकॉल. जे जे वेगळं नवीन करावं वाटतंय ते जरूर करायला हवं. (थीमच ती आहे!!) उलट मी तर म्हणते प्रा.डॉनचा पापड मोडत असेल तर माझा जाहीर दुप्पट पाठिंबा आहे :p

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jul 2018 - 8:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काकू... ! तुमच्या प्रतिसादची जिल्बी पाहिली आणि डोळे नेहमीप्रमाणे भरून आले. डोळे पुसले आणि प्रतिसाद लिहायला घेतला. आता वळुया नवीन पापडाकडे सॉरी घोषणेकडे. बाकी, निरूपणाची प्रथा तुम्हाला नवीन वाटली हे वाचून हहपूवा झाली हं !

श्री गणेश लेखमाला २०१८ हे शीर्षक आणि मजकुरातले ''एक राजपुत्र होता'' इथपासून ते ''राणी मात्र समजून उमजून हसली'' या कथेचा गणेशलेखमालेचा सबंध कसा लागतो ते भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोकावर बोट ठेवून मला नक्की खरड़वहीत समजून सांगा. (इकडे आपलं अवांतर नको म्हणून)

बाकी, लेख नक्की लिहा. लेखमाला आपलीच आहे. बरेच दिवस झाले ना तुमचं कुठे भांडण पाहिलं ना कुठे लेखन पाहिलं, तेव्हा नक्की लेख लिहा...!

-दिलीप बिरुटे

पिलीयन रायडर's picture

18 Jul 2018 - 9:58 pm | पिलीयन रायडर

कमी हसा! दम लागेल!

भांडू... आपलं.. बोलू खवमध्ये!

कपिलमुनी's picture

18 Jul 2018 - 10:56 pm | कपिलमुनी

2014 पासून प्राडॉ असेच करतात

पळा आता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jul 2018 - 11:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणत्या विषयावर लिहिताय तुम्ही ? लिहिला पाहिजे तुम्ही लेख.

-दिलीप बिरुटे

प्राची अश्विनी's picture

20 Jul 2018 - 9:09 am | प्राची अश्विनी

संकल्पना आणि घोषणा आवडली.

पैलवान's picture

20 Jul 2018 - 12:46 pm | पैलवान

आधी केलेची पाहिजे!

पद्मावति's picture

22 Jul 2018 - 2:25 pm | पद्मावति

मस्तच. येउ द्यात लेख लवकर आता.

स्वाती दिनेश's picture

22 Jul 2018 - 8:59 pm | स्वाती दिनेश

लेखमालेच्या प्रतीक्षेत,
स्वाती

स्वीट टॉकर's picture

30 Jul 2018 - 10:00 am | स्वीट टॉकर

लेखमालेला शुभेच्छा !

पारुबाई's picture

29 Aug 2018 - 9:23 pm | पारुबाई

माझा लेख पोचला असेल अशी आशा करते.
आपण पोचपावती दिल्यास बरे होईल.

साहित्य संपादक's picture

29 Aug 2018 - 9:51 pm | साहित्य संपादक

नमस्कार पारुबाई. लेख मिळाला. धन्यवाद. सगळे लेख चेक करतोय. सगळे लेख चेक करून हळूहळू एकेकाला पोच देतोय. वेळ लागतोय त्याबद्दल क्षमस्व.

पारुबाई's picture

31 Aug 2018 - 8:04 pm | पारुबाई

हरकत नाही.
धन्यवाद.