मी कोण होणार? : भाग १

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
22 Feb 2008 - 3:40 pm

खाली दिलेले आत्मकथन नाही. पन्नास वर्षांपूर्वी खेड्यात वाढलेल्या मुलांच्या अनुभवाची मिसळ आहे. त्यात चवीसाठी पदरचे तिखटमीठ घातले आहे.

मी मोठ्ठा होणार!

कांही लोक मोठे झाल्यावर कोण होणार हे लहानपणापासूनच ठरवतात म्हणे. ते ध्येय गांठण्याचा रस्ता त्यांच्या नाकासमोर असतो आणि ते हलतडुलत आरामात तिथपर्यंत जाऊन पोचतात. धन्य आहे त्या लोकांची! हल्ली तर आज जन्माला आलेले पोर मोठेपणी सॉफ्टवेअर इंजिनियर नाही तर टीव्ही प्रोग्रॅमचा अँकर होणार अशी भविष्ये वर्तवणारे ज्योतिषी निघाले आहेत. कांही आईवडील आपल्या मुलामुलींची करीयर्स त्यांच्या जन्माआधीपासून ठरवून ठेवतात आणि त्यासाठी सारे नियोजन करतात.

माझ्या लहानपणी असले कांही नव्हते. "ज्याने चोच दिली आहे तो चारासुद्धा देईल" अशा विचाराने सगळा भार देवावर टाकून पालकवर्ग आपल्या मुलावर कसे चांगले संस्कार करता येतील इकडे लक्ष पुरवायचा. सर्व वडील मंडळींच्या पाया पडायचा रिवाज होता. तेंव्हा ते "मोठा हो, शहाणा हो." असे आशीर्वाद देत असत. कधी कधी "तू मोठा झाल्यावर कोण होणार आहेस?" असे कोणी विचारले तर "मी मोठ्ठा होणार" असे उत्तर देऊन मी मोकळा होत असे. सगळे जण जर मला मोठा होण्याचा आशीर्वाद देत होते तर मी मोठाच होणार असा माझा साधा तर्क होता. "किती मोठा होणार?" या प्रश्नावर "आभाळाएवढा!" यापेक्षा चांगले दुसरे उत्तर काय देणार?

खरोखरच आपल्याला पाहिजे तेंव्हा मारुतीरायासारखे अगडबंब होता आले असते आणि आमच्या गांवातला मेरुगिरीलिंगप्पाचा डोंगर तळहातावर ठेऊन आकाशात उडता आले असते तर किती मज्जा आली असती असे वाटायचे. पण असले चमत्कार देवबाप्पाच करू शकतो हे कधीतरी समजले आणि त्या स्वप्नाचा नाद सोडावा लागला. अखेर कुठल्या तरी मोठ्या माणसासारखे आपणही मोठे व्हावे अशी माफक इच्छा मनात डोकावू लागली.

या मोठ्या माणसांची यादी मात्र रोजच्या रोज बदलत जायची. कधी महात्मा गांधी सर्वात मोठे वाटायचे तर कधी पंडित नेहरू, कधी नेताजी सुभाषचंद्र बोस तर कधी वीर सावरकर यांचे आकर्षण वाटायचे. हे राष्ट्रीय नेते झाले. सर आयझॅक न्यूटन आणि लुई पाश्चर यांसारखे महान शास्त्रज्ञ, मुकेश आणि रफीसारखे लोकप्रिय गायक, विजय हजारे व लाला अमरनाथ यांसारखे खेळाडू अशी नाना क्षेत्रातली मोठी माणसे डोळ्यासमोर येत जात असत. जसजशी ज्ञानात भर पडत गेली तसतशी ही यादी लांबत गेली. पण या सगळ्या मोठ्या लोकांच्या गर्दीत एक ओळखीचा चेहेरा ठळकपणे दिसायचा तो माझ्या वडिलांचा!

हे सगळे मोठे लोक नेमके काय काम करतात याची जशी मला माहिती नव्हती तसेच माझे वडील घरातून बाहेर गेल्यानंतर काय करतात याची देखील सुतराम कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांच्या कार्याची तुलना करता येणे माझ्या बालबुद्धीला अशक्यप्राय होते. त्यातून लोकमान्य टिळक किंवा विनू मांकड यांची मला भीती वाटण्याचे कारण नव्हते, पण वडिलांचा धांक होता. त्यामुळे ते जास्तच मोठे वाटत असण्याची शक्यता आहे.

एकदा मी एका तीन चार वर्षांच्या बडबड्या चिमुरडीला विचारले, "तुझे बाबा काय काम करतात?"
"आंघोळ करतात, जेवण करतात, झालंच तर माझ्याशी खेळतात." तिने उत्तर दिले.
"म्हणजे ते दिवसभर घरीच असतात कां?" मी खोदून विचारले.
"नाही. दिवसभर ते ऑफीसात जातात." तिने सांगितले.
"ऑफीसमध्ये ते कसले काम करतात?" तिच्या सामान्यज्ञानाची परीक्षा घेत मी विचारले.
"तिथं ना, ते सगळी कामे करतात. झाडू लावतात, भांडी घासतात, कपडे धुतात, वाळत घालतात, स्वैपाक करतात वगैरे वगैरे." तिने निरागसपणे बाबांच्या अब्रूचे धिंडवडे उडवले.

तिच्या इवल्याशा शब्दकोषात 'काम' या शब्दाच्या अर्थाची एवढीच व्याप्ती तोपर्यंत जमा झालेली होती. ही व्याप्ती जन्मभर वाढतच असते. "मी इथे किती काम करतो ते माझ्या बॉसला समजतच नाही." असे गार्‍हाणे नव्याण्णऊ टक्के चाकरमाने करतात तर "मी घरी किती काम करते ते माझ्या नवर्‍याला कळत नाही." असे शंभर टक्के महिलांना वाटत असते.

असे असतांना मोठ्ठी माणसे काय काम करतात हे मला बालवयात कसे समजणार? "मोठा झाल्यावर तू काय करणार?" असे कोणी विचारलेच तर "ज्या गोष्टी मोठ्ठी माणसे करतात त्या मी पण करणार." असा माझा हजरजबाब तयार असे. ही पुस्तकांतली मोठी माणसे काही प्रत्यक्षात आपल्याला कधी भेटत नाहीत आणि आपल्या वास्तव जगात मात्र जे लोक स्वतः कांहीच न करता दुसर्‍या लोकांनी केलेल्या कामाचे श्रेय उपटतात त्यांना बाकीचे लोक मोठे म्हणतात हे सत्य समजायला उभे आयुष्य घालवावे लागते.

हे ठिकाणविरंगुळा

प्रतिक्रिया

लबाड मुलगा's picture

22 Feb 2008 - 6:11 pm | लबाड मुलगा

आपल्या वास्तव जगात मात्र जे लोक स्वतः कांहीच न करता दुसर्‍या लोकांनी केलेल्या कामाचे श्रेय उपटतात त्यांना बाकीचे लोक मोठे म्हणतात हे सत्य समजायला उभे आयुष्य घालवावे लागते.

खरे आहे

(छोटा ) पक्या

प्राजु's picture

22 Feb 2008 - 11:10 pm | प्राजु

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

बेसनलाडू's picture

23 Feb 2008 - 12:13 am | बेसनलाडू

म्हणतो.
(वाचक)बेसनलाडू

चतुरंग's picture

23 Feb 2008 - 12:20 am | चतुरंग

चतुरंग

ऋषिकेश's picture

23 Feb 2008 - 12:43 am | ऋषिकेश

असेच म्हणतो

- ऋषिकेश

धनंजय's picture

23 Feb 2008 - 3:01 am | धनंजय

माझाही +१

आनंद घारे's picture

23 Feb 2008 - 11:34 pm | आनंद घारे

धन्यवाद + १+१........ + अनेक!

सुधीर कांदळकर's picture

24 Feb 2008 - 10:53 am | सुधीर कांदळकर

भागाच्या प्रतीक्षेत.

शुभेच्छा.