चित्रपट ओळख - गुडबाय लेनिन!

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
16 Jun 2009 - 3:54 am

काही दिवसांपूर्वी मिपावर कम्युनिस्ट विरुद्ध इतर असा एक जबरदस्त कलगीतुरा रंगला होता. पब्लिक नुसतं तुटून पडलं होतं. बरीच राळ उडली होती. त्या निमित्ताने लहानपणी वाचलेली रशियन भाषेतून (बहुतेक अनिल हवालदार यांनी) मराठीत भाषांतरित केलेली पुस्तकं, एका मित्राच्या घरी (त्यावे वडिल सीपीआयचे मेंबर) येणारे सोविएत साहित्य (मासिकं, पुस्तकं) वगैरे आठवणी जाग्या झाल्या. मग काही दिवस जालावर कम्युनिस्ट विचारसरणी, सोविएत युनियन, पोलादी पडदा वगैरे बद्दल वाचत होतो. शीतयुद्धाच्या काळात पोलादी पडद्यामागचं जग खरंच कसं होतं हे कुतूहल तेव्हाही होतंच. कशी काय माणसं वर्षानुवर्षे एखाद्या यंत्रासारखी वागू शकतात (इंग्रजीमधे रेजिमेंटेशन हा अगदी चपखल शब्द आहे), करोडो लोकांचं आयुष्य म्हणजे प्रचंड शक्तिशाली पण एखाद्या लहानशा बटणाच्या मर्जीवर नाचणार्‍या वीजेसारखं कसं काय नियंत्रित होऊ शकतं हे प्रश्न माझ्या बालमनात तेव्हाही यायचे. ही प्रचंड जनशक्ती कशी हळूहळू दबत जाऊन तिचा एक मोठ्ठा सुरूंग झाला आणि एके दिवशी अगदी लहानशा घटनेमुळे त्याचा स्फोट झाला. पण त्याहूनही रंजक त्याआधीचा इतिहास आहे.

आता आंतरजालामुळे, जवळजवळ सगळीच माहिती उपलब्ध आहे. मला जर्मनीबद्दल पहिल्यापासूनच विशेष आकर्षण आहे. त्यामुळे पूर्व जर्मनीबद्दल विशेष लक्ष देऊन वाचत होतो. कम्युनिझमच्या दडपणाखाली सुध्दा पूर्व जर्मनीने अचाट अशी प्रगती केली होती. पोलादी पडद्याआडचे ते सगळ्यात जास्त प्रगत राष्ट्र (सोविएत युनियनपेक्षाही जास्त प्रगत) होते. आर्थिक निकषांवर त्यांनी काही पश्चिम युरोपातल्या भांडवलशाही देशांनाही मागे टाकले होते. जर्मनांची उद्यमशीलता आणि राष्ट्रप्रेम कम्युनिझमचा वरवंटापण दडपू शकले नाही. तर एकंदरीतच खूप मनोरंजक माहिती कळत होती.

वाचताना एका वेगळ्याच धाटणीच्या चित्रपटाबद्दल कळलं. चित्रपटाचं नाव, "गुडबाय लेनिन!". नावामुळेच कुतूहल चाळवले गेले. आधी वाटले की कसा लोकांनी उठाव केला, कम्युनिस्ट सत्ता उलथून टाकली वगैरे बद्दल एखादा माहितीपट असेल. पण नाही... काहीतरी वेगळंच होतं हे प्रकरण. मग ठरवलं की बघायचाच. जर्मनीमधे २००३ साली बनलेला हा चित्रपट पूर्णपणे जर्मन भाषेत आहे. त्यामुळे सबटायटल्स असतील तरच कळणार ना. म्हणून मग जालावर सबटायटल्ससकट कुठे उपलब्ध आहे का त्याचा शोध सुरू केला... आणि काल परवा मिळाला एकदाचा.

ही आहे केर्नर कुटुंबाची गोष्ट, ऑक्टोबर १९८९ मधे सुरू होते जेव्हा पूर्व जर्मनीला शेवटचे आचके यायला नुकतीच सुरूवात झाली होती आणि साधारण ऑक्टोबर १९९० पर्यंत संपते, जेव्हा पूर्व जर्मनीचे पश्चिम जर्मनी मधे विलिनीकरण होऊन परत एकदा एक एकसंध जर्मनी दिमाखात जगाच्या नकाशावर अवतरतो.

अलेक्झांडर केर्नर हा १८ वर्षांचा मुलगा आपल्या आई (ख्रिस्तिआन) आणि बहिण (अरिआन) बरोबर राहत असतो. सुरूवातीच्या काही दृष्यातून आपल्याला अलेक्झांडरच्या लहानपणाबद्दल फ्लॅशबॅक्स मधून कळतं... त्याचे वडिल तो १० वर्षांचा असताना पश्चिम जर्मनीला पळून गेलेले असतात. त्यानंतर त्याची आई भ्रमिष्ट होते, पण काही उपचारांनंतर सुधारते. त्यानंतर ख्रिस्तिआन स्वतःला कम्युनिस्ट पार्टीच्या कामाला वाहून घेते. ती एक शिक्षिका असते आणि विद्यार्थ्यांमधे खूपच लोकप्रिय असते. ती लोकांच्या समस्या स्वतःच्या पार्टीकनेक्शन्सच्या जोरावर सोडवून देते, त्यामुळे तिला आजूबाजूच्या वर्तुळात एक मानाचे स्थान असते. असं सगळं सुरळित चालू असताना, एक दिवस येतो आणि सगळं उलटपालट करून जातो.

निमित्त असतं पूर्व जर्मनीच्या ४०व्या वर्धापनदिनाचं. कम्युनिस्ट जगात गोर्बाचोवनी आणलेल्या बदलाच्या वार्‍यामुळे पूर्व जर्मनीच्या तत्कालिन सत्तावर्तुळात अतिशय मूलभूत बदल होतात. आणि त्यामुळे भीड चेपलेल्या पूर्व जर्मनांची जोरदार निदर्शनं सुरू होतात. त्यांना इतर देशात (म्हणजे पश्चिम बर्लिन) जायचे मुक्त संचार स्वातंत्र्य हवे असते. आपले नुकतेच १८ वर्षाचे झालेले अलेक्झांडरभाऊ पण त्यात सामिल होतात. त्याला यथासांग अटक आणि मारहाण होते. आणि नेमकी त्याची आई (ख्रिस्तिआन) ते बघते आणि तिला हार्ट अ‍ॅटॅक येऊन ती तिथेच कोसळते. अलेक्झांडर तिला बघतो पण पोलिस त्याला मारहाण करून गाडीत घालून घेऊन जातात. तो काहीच करू शकत नाही. पण इकडे पोलिस ख्रिस्तिआनवर उपचार करतात, आणि तिच्या एकंदरीत प्रतिष्ठेमुळे अलेक्झांडरची पण सुटका होते. तो हॉस्पिटलमधे येतो आणि त्याला कळते की उपचारांत उशिर झाल्याने त्याची आई कोमात गेली आहे. पुढचे सगळेच अनिश्चित झालेले असते. तिला हॉस्पिटलमधे ठेवून फक्त शुश्रूषा करत राहणे एवढेच शक्य असते.

हळूहळू दिवस जात असतात. बाहेर अतिशय वेगाने घटना घडत असतात. कम्युनिस्ट राजवट जाते. पूर्व जर्मनीमधे पहिल्यांदाच मुक्त निवडणुका होतात. नवीन राज्यकर्ते येतात. जर्मनीच्या एकीकरणाची बोलणी चालू असतात. इकडे अलेक्झांडरचे त्याच्या आईची सेवा करणार्‍या लारा नावाच्या नर्सबरोबर सूत जुळते. आयुष्य अडखळते पण मग परत हळूहळू वेग घेऊ लागते. आणि एक दिवस अचानक आईसाहेब चक्क व्यवस्थित शुध्दीत येतात. सगळ्यांना आनंद होतो. पण डॉक्टर मात्र अगदी स्पष्टपणे सांगतात, तिचे हृदय अतिशय नाजुक झालेले आहे आणि तिला कोणत्याही प्रकारचा धक्का सहन होणार नाही. आता मात्र सगळेच घाबरतात. कारण हे की, ती कोमात असताना जी काही उलथापालथ झाली आहे, ज्या विचारसरणीवर एवढा विश्वास ठेवून आयुष्यभर काम केले ती विचारसरणी, तो देश अगदी पाचोळ्यासारखे उडून गेलेले बघितले तर तिचा मृत्यू नक्की. आता काय करणार? प्रत्यक्षातून पुसला गेलेला पूर्व जर्मनी हा देश परत कसा आणणार? आणि तो सुद्धा किती दिवस? सगळेच प्रश्न.

अलेक्झांडर मात्र एकदम हिकमती पोरगा असतो. तो आईला घरी आणतो, घराला परत जुनं रूप देतो. जुन्या पध्दतिचे कपडे परत वापरायला काढतो. त्याची बहिण आरिआन पण सामिल होते. आता एकामागे एक अशी संकटं यायला लागतात. सगळ्यात पहिलं म्हणजे, आईला हवा असतो टिव्ही. आता टिव्ही लावला तरी त्यावर दाखवणार काय? मग अलेक्झांडर त्याच्या एका मित्राच्या सहाय्याने खोट्या बातम्या, खोटे व्हिडिओ वगैरे तयार करून ते सगळे व्हीसीआर टिव्हीला जोडून तिला दाखवत राहतो. मग एक दिवस नेमका त्यांच्या घराच्या समोरच्या उंच इमारतीवर कोकाकोलाची जाहिरात लावली जाते आणि नेमकी ख्रिस्तिआन ती बघते. आता हे कसे काय? साक्षात भांडवलशाहीचा देव कोकाकोला पूर्व जर्मनी मधे? ती हादरतेच. मग अलेक्झांडर आणि त्याच्या मित्राची पळापळ. ते एक अशी बातमी तयार करून दाखवतात की कोकाकोला कम्युनिझमला शरण आला आहे, कोकाकोलाचा फॉर्म्युला हा खरंतर कम्युनिस्टांनीच शोधून काढला होता पण तो अमेरिकनांनी पळवून नेला होता असं सिध्द झालंय वगैरे !!! असे बरेच किस्से घडतात. पण पठ्ठ्या अलेक्झांडर सगळ्याला पुरून उरतो. त्याची आपल्या आईला जगवण्याची धडपड आणि त्यातल्या गंमती एकीकडे हसायला लावतात पण मनाला चटका लावून जातात. सगळे त्याला सांगत असतात की बाबारे असं किती दिवस करणार तू? पण हा पोरगा आपला हट्ट सोडत नाही. इतक्यात त्याच्या वडिलांचा पत्ता लागतो. ते आता पश्चिम जर्मनी मधे एक सुखवस्तू डॉक्टर झालेले असतात. त्यातच त्याची आई त्याला वडिलांच्या जाण्यामागची खरी कारणं सांगते आणि फक्त एकदा आपल्या नवर्‍याला भेटायची इच्छा व्यक्त करते. अलेक्झांडर अगदी ती सुध्दा पूर्ण करतो.

ज्या दिवशी पूर्व जर्मनी विलिन होतो त्यानंतर बरोब्बर तीन दिवसांनी ख्रिस्तिआन शांतपणे मरते. एका खूप मोठ्या ताणातून सगळेच मुक्त होतात. अलेक्झांडरने शेवटपर्यंत केवळ आपल्या आईचं मन मोडू नये म्हणून एक अस्ताला गेलेला देशच्या देश अगदी यशस्वीपणे तिच्या त्या छोट्याशा खोलीमधे उभा केलेला असतो. चित्रपट संपतो तेव्हा आपण नकळतपणे अलेक्झांडरच्या बाजूला उभे राहून ख्रिस्तिआनला शेवटचा निरोप देत असतो. आणि एकीकडे वाईट वाटत असूनही, "चला!!! आता अलेक्झांडर सुटला बिचारा धावपळीतून" असं वाटून हायसं वाटतं.

कथेच्या अनुषंगानेच पण त्या एक वर्षात घडलेल्या घटनांचा जो काही विदारक सामाजिक परिणाम झाला त्याचे पण चित्रण सुंदर केले आहे. बळजबरीने उभारलेली का होईना, पण एक आख्खीच्या आख्खी जीवनपध्दती जेव्हा इतक्या पटकन लयाला जाते, तेव्हा नुसत्याच भौगोलिक सीमारेषा नव्हे तर लोकांची आयुष्यं उद्ध्वस्त करून जाते. ज्या व्यवस्थेच्या आधारावर लोकांनी आयुष्यं घालवली ती एका रात्रीत नष्ट होऊन लोकांना, विशेषतः म्हातार्‍या पेन्शनर लोकांना अक्षरशः रस्त्यावर आणते, वैफल्यग्रस्त करते.

कोणत्याही प्रकारची ड्रामेबाजी, रडारड वगैरे (वाव असूनसुद्धा) नाही, एकही प्रसंग / फ्रेम भडक नाही. अगदी वेगळीच कथा आणि अलेक्झांडर, ख्रिस्तिआन, अरिआन, लारा या मुख्य पात्रांचा अतिशय सहजसुंदर अभिनय एक सुखद कलानुभव देऊन जातो. पूर्ण चित्रपट एका वेगात जातो, कुठेही रटाळ अथवा कंटाळवाणे होत नाही. सतत, "आता काय नवीन भानगड होईल? पुढे काय आता?" असं वाटत राहतं. चांगले चित्रपट बघायची इच्छा असणार्‍यांनी अगदी जरूर बघावा हा चित्रपट.

हा चित्रपट मला जालावर टॉरेंटच्या माध्यमातून मिळाला. कोणाला इच्छा असल्यास टॉरेंट फाईल पाठवेन.

चित्रपटशिफारसमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

चंबा मुतनाळ's picture

16 Jun 2009 - 5:32 am | चंबा मुतनाळ

सुंदर परिक्षण!
नक्कीच बघायला आवडेल हा चित्रपट
-चंबा

अनिता's picture

16 Jun 2009 - 6:01 am | अनिता

<सुंदर परिक्षण!

असेच म्हणते...

क्रान्ति's picture

16 Jun 2009 - 8:09 am | क्रान्ति

सहजसुंदर परीक्षण.

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

अवलिया's picture

16 Jun 2009 - 6:30 am | अवलिया

बिपिनशेट ! सुंदर परिक्षण !!!!
नक्कीच बघायला आवडेल हा चित्रपट :)

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

विकास's picture

16 Jun 2009 - 6:44 am | विकास

परीक्षण आवडले आणि चित्रपट पण पहावासा वाटला. जेंव्हा राज्यकर्ते अगदी लोकशाही देशातपण बदलतात तेंव्हा ते जर टोकाचे एखाद्या विचाराचे असले तर त्याचा तोटा पण सामान्यांना कुठल्यान कुठल्या पद्धतीने बसू शकतो. क्लिंटन नंतर ८ वर्षे लोकांनी(च) निवडणून दिल्यामुळे आलेली बूशची राजवट हे अमेरिकेस बरेच काही सांगून गेली असे वाटते.

कम्युनिस्ट विचारसरणीची सुरवात आणि अंत हे दोन्हीही असेच सामान्य जनतेस त्रासदायक ठरले होते. कम्युनिस्ट देशातील जनतेबद्दल बोलले जायचे की त्यांना अन्न-वस्त्र-निवारा मिळतो, वगैरे मात्र जेंव्हा पोलादी पडदा फाटला तेंव्हा त्याच्या आतली ठिगळेच दिसली. त्यांच्यातील आहेरेंचे ठिक होते पण नाहीरेंची अवस्था ही "मुकी बिचारी कुणिही हाका" अशीच झाली होती.

बाकी बदल हा हवाहवासा वाटत असला तरी त्याच्या "साईड इफेक्टस" सोबत तो सहजासहजी पचवणे अवघडच असते. साधी नोकरी बदलताना, घर बदलताना, वगैरे पण हे व्यक्तीस अवघड जाते, तर अख्या समाजास एका रात्रीत सर्व बदलायला लावणे हा प्रकार रशिया संदर्भात २२ साली स्थापनेच्या वेळेस पण अवघड होता आणि ९१ साली विस्थापित होताना पण...

सहज's picture

16 Jun 2009 - 7:01 am | सहज

अतिशय सुंदर सिनेमा तितकेच प्रभावी परिक्षण.

झपाट्याने बदणारे जग, मातृप्रेम, एकामागे एक उभ्या रहाणार्‍या समस्या व त्याचा सामना करणारा तो हरहुन्नरी मुलगा, बर्‍यापैकी वेगवान व विनोदी प्रसंग असलेला एक सुंदर सिनेमा!

धन्यु बिपिनकाका. :-)

मुक्तसुनीत's picture

16 Jun 2009 - 7:41 am | मुक्तसुनीत

परीक्षण खूप आवडले. हा चित्रपट आता यादीत टाकतोच.

या चित्रपटावरून द लाईव्ह्ज ऑफ अदर्स या आणखी एका, कम्युनिस्ट काळातल्या जर्मनीचा काळ रंगविणार्‍या चित्रपटाची आठवण झाली. हा देखील अगदी जरूर पहाण्यासारखा.

संदीप चित्रे's picture

16 Jun 2009 - 8:05 am | संदीप चित्रे

बघायलाच हवा रे...

अवांतर : टॉरंट किती सुरक्षित आहे? नाहीतर एखादी खिडकी उघडायला जायचं आणि धाडधाड दुनियेभरच्या खिडक्या उघडल्या जायच्या !!!
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

नीधप's picture

16 Jun 2009 - 9:31 am | नीधप

नक्कीच बघायला हवा. टोरेंट लिंक पाठवा. कसं वापरायचं तेही कळवावे.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

यशोधरा's picture

16 Jun 2009 - 9:37 am | यशोधरा

नक्कीच बघायला हवा. टोरेंट लिंक पाठवा.

सुबक ठेंगणी's picture

17 Jun 2009 - 10:06 am | सुबक ठेंगणी

मस्त लिहिता तुम्ही....अजून तुम्हाला आवडलेल्या चित्रपटांबद्दलही लिहा...
टोरंट लिंक शोधते...

निखिल देशपांडे's picture

16 Jun 2009 - 9:44 am | निखिल देशपांडे

चित्रपटाची मस्तच ओळख करुन दिली आहे...
बघायला नक्की आवडेल
==निखिल

सायली पानसे's picture

16 Jun 2009 - 10:43 am | सायली पानसे

मला पाठव रे लिन्क बिपिन्दा... नक्किच पाहते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Jun 2009 - 10:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तीनेक वर्षांपूर्वी हा चित्रपट पाहिला होता. अलेक्झांडर पॅक्ड फूडचे डबे "कम्युनिस्ट" दिसण्यासाठी काय कष्ट करतो, बेक्ड बीन्स का असाच काहीतरी खाद्यप्रकार मिळवण्यासाठी काय कष्ट करतो, ती शाळेतली छोटी पोरं पैशांसाठी कम्युनिस्ट गाणी काय म्हणतात, ते पहायला मजा आली होती. खूपच मस्तपैकी हाताळलेला आहे तो चित्रपट!
इथे क्लिक करून टॉरंट मिळेल.

परिकथेतील राजकुमार's picture

16 Jun 2009 - 11:55 am | परिकथेतील राजकुमार

मस्तच परिक्षण बिपिनदा.

मागच्या महिन्यात सकाळ मध्ये या चित्रपटाचे अत्यंत उत्कृष्ट असे अजुन एक परिक्षण आले होते. ते वाचुन हा चित्रपट बघितला. खरेतर सबटायटल्स वगैरे काही न्हवते पण ख्रिस्तीयनच्या अभिनयाने त्याची शेवटी शेवटी गरजही वाटली नाही.

गोष्ट माहित असल्याने प्रसंगांचा संबंध आठवुन आठवुन चित्रपट पाहिला. अप्रतीम चित्रपट.

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

स्वाती दिनेश's picture

16 Jun 2009 - 11:57 am | स्वाती दिनेश

परीक्षण उत्तमच लिहिले आहेस,
चित्रपट 'पहायलाच हवा' ह्या यादीत समाविष्ट !!
स्वाती

कपिल काळे's picture

16 Jun 2009 - 1:42 pm | कपिल काळे

परिक्षण सुदंर!

श्री बिपिन ह्यांची कम्युनिझम-विरोधातील विचारसरणी आम्हाला माहीत आहेच. तरी त्यांनी असा कम्युनिझविषयक चित्रपट कसा काय पाहिला? आपली विचारसरणी कम्युनिस्ट आजीवन कशी टिकवून ठेवतात हेच ह्या चित्रपटातून दाखवले गेले आहेत.
एका बूर्झ्वाने अशा चित्रपटाचे परिक्षण लिहावे हा आम्ही कम्युनिझमचा विजय समजतो==

कॉ. विकांबा काळे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Jun 2009 - 1:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

श्री बिपिन ह्यांची कम्युनिझम-विरोधातील विचारसरणी आम्हाला माहीत आहेच. तरी त्यांनी असा कम्युनिझविषयक चित्रपट कसा काय पाहिला?

एका कॉम्रेड (पक्षी: लेनिन) ला 'गुडबाय' करत असल्यामुळे, शिवाय आय.एम.डी.बी. वर याचे जॉन्र कॉमेडी असं लिहिल्यामुळे श्री. बिपिन यांनी हा चित्रपट बघितला असावा.
अर्थात हा स्वतःवरून अंदाज केला आहे, सत्य परिस्थिती काय आहे हे श्री. बिपिनच सांगू शकतात.

(बूर्झ्वा) अदिती

नीधप's picture

16 Jun 2009 - 2:14 pm | नीधप

याचे जॉन्र कॉमेडी असं लिहिल्यामुळे <<
कॉमेडी की कॉम्रेडी?

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

धमाल मुलगा's picture

16 Jun 2009 - 4:17 pm | धमाल मुलगा

=)) =))
लय भारी हो!!!

-ध :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

घाटावरचे भट's picture

17 Jun 2009 - 6:54 pm | घाटावरचे भट

ऐसेच बोल्ता.
=)) =))

- भ

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Jun 2009 - 2:15 pm | बिपिन कार्यकर्ते

कॉ. काळे, सर्वप्रथम म्हणजे मी कम्युनिस्टविरोधी असे नाही म्हणणार. मला जे चूक वाटले त्याला विरोध करतो. उद्या त्यांनी जर का चांगले काम केले तर कौतुकही करेन. मी हा चित्रपट पाहिला तो त्याबद्दल जालावर चांगले वाचले म्हणून. आणि जरी जॉन्र कॉमेडी असले तरी तसा काही चित्रपट रूढार्थाने विनोदी नाहीये.

अदिती, धन्यवाद.

बिपिन कार्यकर्ते

धमाल मुलगा's picture

16 Jun 2009 - 4:20 pm | धमाल मुलगा

बिपीनदा, मस्त परिक्षण!

एक प्रश्नः हा शिनेमा मला कळेल का? :? नाही कॉमेडी वगैरे आहे म्हणुन म्हणलं ;)

बाकी, त्या अलेक्झांडराची बिचार्‍याची कशी आणि काय फरफट झाली असेल ते पहायला नक्कीच आवडेल.

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

श्रावण मोडक's picture

16 Jun 2009 - 6:21 pm | श्रावण मोडक

चित्रपट परिचय!!! आता चित्रपट पाहतानाही कळायला हरकत नाही.

सूहास's picture

16 Jun 2009 - 7:55 pm | सूहास (not verified)

शीर्षक वाचुन थोडासा गो॑धळ ऊडाला होता खरा..पण परीक्षण एकदम ऊत्तम्..मला वाटते हा चित्रपट थोडीसा "लाईफ ईज ब्युटीफुल" च्या वळणावर गेला होता.मी दोन्हीही पाहिले आहेत पण चित्रपट रिलीज कुठल्या वर्षी झाला याबद्दल काही माहीती उपलब्ध नसल्याने नेमक कळल नाही...

सुहास

मराठमोळा's picture

17 Jun 2009 - 6:34 pm | मराठमोळा

परिक्षण आवडले. सिनेमा नक्की बघायला आवडेल.
सुहास भौ. काय पण सिनेमाची आठवण केलीस.
"लाईफ ईज ब्युटीफुल" छान सिनेमा आहे.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

नितिन थत्ते's picture

16 Jun 2009 - 9:25 pm | नितिन थत्ते

उत्तम परीक्षण. चित्रपट पहायला हवा.

खराटा
(रंग माझा वेगळा)

मुशाफिर's picture

17 Jun 2009 - 12:09 am | मुशाफिर

खुप छान परिक्षण लिहिलयं बिपिनदा! 'हा चित्रपट पहायलाच हवा' असं वाटायला लावणारं. अजुन येवु द्या.

मुशाफिर.

हा चित्रपट मला फार आवडला. परीक्षणही आवडले. मुक्तसुनीत यांनी म्हटल्याप्रमाणे "लाइव्स ऑफ अदर्स" हा चित्रपटही पाहण्यासारखा.

भाग्यश्री's picture

17 Jun 2009 - 3:02 am | भाग्यश्री

वा... आवडलं परिक्षण... कुठेतरी खूप खूप वाचल्यासारखे वाटतेय..
नक्की पाहीन आता !

http://www.bhagyashree.co.cc/

अभिरत भिरभि-या's picture

17 Jun 2009 - 11:58 am | अभिरत भिरभि-या

परिचय वाचताना चित्रपटाचाच इफेक्ट आला.

अवांतरः
जालावर काल हा ऑफसाईड नावाचा अवघ्या पाच मिनिटांचा सुंदर लघुपट पाहण्याचा योग आला.