नारायणगावचा थरार!!! अन्तिम भाग

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in जनातलं, मनातलं
6 Jun 2009 - 4:33 pm

डिस्क्लेमर: हे जनातलं मनातलं आहे.. काथ्याकूट नाही.. मी अंधश्रध्द नाही तशीच अश्रद्ध ही नाही..त्यामुळे या अनुभवावरून मी व्यक्तिशः कोणतेही निष्कर्ष काढलेले नाहीत..पण एक अविस्मरणीय प्रसंग म्हणून तो आजवर बर्‍याचजणांना सांगून झालाय.. आज इथे त्याचं आणखी एक पारायण!! बाकी नारायणगांव, जुन्नर, खोडद..ला मी एकदाच गेले, तिथे आमची अशी वाट लागली.. की पुन्हा म्हणून त्यांच्या वाटेला गेले नाहीये..त्यामुळे तिथला भौगौलिक परिसर.. मार्ग, अंतरं, ती कापायला लागणारा वेळ याबद्दलचे तपशील चुकीचे असू शकतील. कारण हे ही असेल की काही माहिती ऐकीव होती अन काही गोष्टी तितक्या अचूकपणे लक्षात नाहीत... नि .. तेव्हा चू.भू. दे. घे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सकाळी जाग आली तीच मुळे फोन च्या आवाजाने... आतेभावाचा फोन होता.. व्यवसायाच्या निमित्ताने तो मुंबईला येत होता.. सवड मिळेल तसे भेटू म्हणाला.. बिच्चारा.. कधी नव्हे तो त्याने फोन केलेला नि मी नेमकी तिथे नव्हते.. चालायचे.. इलाज नव्हताच.. आह्निकं पटापट उरकून ज्यांची तिथेच न्याहारी करायची तयारी होती त्यांच्या पोटात दोन घास ढकलून नि इतरांना तसेच घेऊन खोडदला GMRT मध्ये आम्हाला दिलेल्या वेळेत पोचलो.. तिथे आधीच वेळ घेउन ठेवली असल्याने एक गृहस्थ वाट पाहत होते.. त्यानी केंद्राची छान माहिती दिली. तिथे खगोलशास्त्राचे नि weather forecasting बद्दल संशोधन चालते.. [अधिक नि अचूक माहितीसाठी संपर्क:: आदिती] तिथे कोणत्याही देशाचे संशोधक यायला परवानगी आहे असे कळाल्यावर "पाकिस्तानचे सुद्धा??" हाच सगळ्यांचा प्रश्न होता. नि उत्तर अपेक्षेच्या अगदी उलट म्हणजे.. "हो" असे होते.. [आता काय परिस्थिती आहे हा प्रश्न आता मलाही आहे.] आणि हो.. महत्वाची गोष्ट म्हणजे.. तिथे वाचनात अचूकता यावी म्हणून भ्रमणध्वनी च्या लहरी divert करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तिथे फोन वर कोणी बोलू शकत नाही असा त्यांचा दावा होता.. पण अवघ्या पाचच मिनिटात आमच्या एका अवलक्षणी कार्ट्याने निवांत फोनवर गप्पा हाणून तो खोटा होता हे दाखवून दिले... बाकी येथे आल्याचा पुरावा म्हणून GMRT च्या नावाची पाटी नीट दिसेल असा "प्रवेशद्वार आणि आम्ही" यांचे चार-दोन समुह फोटो काढून तेथून निघालो..
मधल्या वेळात.. त्या शुद्ध शाकाहारी उपहारगृहात पायाला खिनभर विश्रांती- नि तोंड अन पोटाला थोडेसे काम देऊन लेण्याद्रीला कूच केले.. बाकी लेण्याद्रीची कथा मम पामराने काय सांगावी ? काही कारणास्तव मी अन तीन मुली पाठीमागे राहिलो होतो.. बाकीचा चमू वरती देवस्थानाजवळ पोचला होता.. नि मग हातातल्या प्रसादाच्या मागे लागलेले प्रचंड हुप्पे.. त्यांनी आम्हाला अक्षरश: घातलेला घेराव... त्या मुलींचे आधी साहेबाच्या भाषेत.. नंतर देशाच्या भाषेत.. अन सगळे प्रयत्न हरल्यावर आपापल्या आईच्या भाषेत रडणे.. या रडगाण्याला माझ्या "कमावलेल्या" आवाजातल्या किंकाळ्यांच्या पार्श्वसंगीताची साथ.. अगतिक होऊन आधी साखरफुटाणे नि नंतर नारळावर सोडलेले पाणी.. एवढे सोडले तर काही विशेष नाही घडले..

या सगळ्या प्रकारात खूपच उशीर झाला.. शिवनेरीला जायचे तर मुंबईला वेळेत पोचणे कठीण होते... अन काही कारणाने पुणे मुंबई महामार्गाने न जाता आलो त्याच म्हणजे कल्याण मार्गाने परत निघालो..पुन्हा एकदा गाणी-गप्पा यांना उत आला.. आयोजकांपैकी एक मुलगा चालक केबिन मध्ये जाऊन चालक-क्लीनर सोबत गप्पा मारत होता... बघता बघता नारायणगाव अन जुन्नर मागे पडले.. साधारण सायंकाळी सहाची वेळ...बस कुठेतरी दोन गावांच्या मध्ये होती..मी उजव्या बाजूच्या खिडकी शेजारी बसले होते.. बाहेर रस्त्यावर क्वचित एखादे वाहन दिसत होते.. दूर कुठेतरी शेतात एक म्हातारा डोक्याला मुंडासे बांधून काहीतरी काम करत होता..

अन............ ते घडले.............................

रस्त्याला हलकासा उतार होता.. तिथे एका दहा एक वर्षाच्या मुलाची सायकलवरून येणारी आकृती दिसू लागली.. हाफ शर्ट.. हाफ चड्डी.. अशा वेशात तो आपल्याच मस्तीत रस्त्याच्या बरोबर मधोमध सायकल चालवत होता.. नि पाहता पाहता.. त्याची सायकल कोलमडली.. सायकल आणि तो.. दोघांनीही दोन-चार कोलांट्या खाऊन मुलगा डाव्या बाजूला तर सायकल रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन पडली.. चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून पाच-सहा फुट अलीकडेच बस थांबवली.. चालक केबिन मधला मुलगा जवळ जवळ चालत्या बसमधूनच उतरला.. नि त्याच पावली परत फिरून

Hey Girls... Don't come down!!!

असे ओरडून प्रथमोपचाराची पेटी घेऊन खाली गेला.. बहुतेक त्या मुलाला लागले असावे..खाली गेले... तो गुरासाखे ओरडत होता.... अंत:करण विदीर्ण करणारा आकांत.. हृदय पिळवटून टाकणारा टाहो.. असे जगातले सगळे शब्द एकत्र केले तरी त्या रडण्याचे वर्णन करायला अपुरे पडतील असा भयानक रडत होता.. पाहिलं.. त्याच्या हाताची एकूण एक बोटं उभी चिरली नाही तर चक्क फुटली होती.. त्यातून सगळं मांस बाहेर आलं होतं.. ओठ फुटून रक्ताची धार लागली होती..(आईशप्पथ शब्द न शब्द खरा आहे.) गपकन डोळे मिटले.. पण कान..??? त्याचे रडू असह्य होतं.. बाकी कुठेच काही लागले नव्हते.. सगळेजण थिजून गेले होते.. त्याच्या भोवतीचे कोंडाळे हलवले.. त्याच्याशी बोलायला आधी त्याचे रडू तर थांबायला हवे होते.. एकाने त्याला अक्षरश: जबरदस्तीने पाणी प्यायला लावले .. कापसाने वरवरचे रक्त पुसून काढले.. पाच एक मिनिटांनी तो थोडा शांत झाला.. म्हणजे नीट माणसा सारखे भोकाड पसरून रडू लागला..

"बाळ तुझे नांव काय??"
"तूझे गाव कुठेय? जिथून आलास ते कि जिकडे चालला आहेस ते?"
"इथं आसपास कुठे दवाखाना आहे??"

या सगळ्याला त्याचे उत्तर "भाँ" हेच होते.. काय करावे? ना इथला परिसर माहित.. तो मुलगा कोण कुठला हेही माहित नाही.. कुठून एखादा दवाखाना कुठे आहे हे जर कळाले.. नि त्याला तिथे घेऊन गोलो.. तर नंतर काय? कधी ना कधी आम्हाला तिथून निघायचे होते.. त्याला कुणाच्या भरवशावर दवाखान्यात सोडून जाणार होतो? तेवढ्यात लक्षात आले कि त्याच्या हाताला हात लावला कि तो आणखी जोरात ओरडतोय.. बहुतेक fracture असावं.. बिचार्‍याची खूप दया येत होती.. सायकल पाहिली.. तिची दोन्ही चाके गणितातल्या infinity सारखी झाली होती..रस्त्याचा उतार इतका पण काही तीव्र नव्हता.. जमिनीशी जास्तीत जास्त २० अंशाचा कोण असेल.. नि दोन कोलांट्यांमध्ये चाकांची चक्क चक्क infinity ?? हे जरा जास्तच होतं.. इथे रस्त्याने पण कुणी येईना..त्या दूर शेतातल्या आजोबांना हाका मारल्या.. त्यांच्याकडूनही काही प्रतिसाद नाही.. ते कदाचित या मुलाला ओळखत असतील या आशेने एक मुलगा त्यांना बोलवायला गेला.. दरम्यान एक मोटारसायाकालस्वार आला.. तो बिचारा दूर कुठल्या गावाचा होता. नि या मुलाला ओळखत नव्हता.. थोड्यावेळाने एक फट्फट आली.. मोटारसायकल नव्हे.. फट्फट्च.. तीवरचे दोघे याला ओळखत होते.. हा छोटा त्यांच्या गावातल्या एक माणसाकडे सालगडी म्हणून काम करत होता.. पण आधीच ते दोघे होते.. त्यातच याचा हात फ़्राक्चर.. तिघांना गाडीवर बसताही आले नसते, एकजण उतरला ती जागा अशी होती कि त्याचे परत जायचे वांदे होते.. नि तो मुलगाही एकटा फटफटीवर मागे बसु शकला नसता.. म्हणून त्यांनी याला न्यायला असमर्थता दर्शवली.. [आपण या दोघांना अच्चा नि बच्चा म्हणू.. बाकी नावात काय आहे?? मला कुणाबद्दल बोलायचंय हे तुम्हाला कळाले म्हणजे झाले ना??] त्यांच्या गावी जाऊन कुणाला तरी पाठवून देण्याचे वचन देऊन ते गेले.. ते आजोबा दिसायला जवळ दिसले होते.. पण आमचा गडी अजून त्यांच्यापर्यंत पोचूही शकला नव्हता.. आणखी पाच मिनिटे अशीच गेली.. नि एक मारुती ८०० आली.. हात केला तशी थांबली.. या नवीन माणसालाही झाला प्रकार सांगितला.. तो या मुलाला ओळखत होता.. नि नशीब या मुलाला न्यायला नि त्याची जबाबदारी घ्यायलाही तयार होता.. तो स्वत: डॉक्टर होता नि त्याच्या मित्राच्या शेतावर हा मुलगा काम करत होता.. पुन्हा पुन्हा त्याचे आभार मानून मुलाला त्याच्या गाडीत ठेवले.. त्याचे रडू अजुनही बंद झालं नव्हतं..

झाल्या प्रकारात २०-२५ मिनिटे गेली होती.. पुन्हा एकदा आमचा प्रवास चालू झाला.. आता मात्र गाणी वगैरे सगळे थांबून गप्पा त्या मुलाच्या अवतीभवती चालल्या होत्या.. आम्ही मिनिटभरही तिथून आधी गेलो असतो तर कदाचित त्याला मदत मिळू शकली नसती.. त्याच्या भयानक जखमा डोळ्यांसमोरून हलत नव्हत्या.. आईगं!!! कसे त्याने सहन केले असेल.. त्याचे त्यालाच माहित..!!! गाडी पुन्हा एकदा घाटातून चालली होती.. नि अचानक चालकाने ब्रेक्स लावले..

"काय झाले???"

"काही नाही हो.. एक M80 वाल्याने वेड्यासारखे ओव्हरटेक केले.. थांबा जरा त्याला शेलकी सुभाषिते ऐकवून येतो.."

त्याला सुभाषिते ऐकवण्याच्या ऐवजी.. तोच.. बसच्या समोर उभा राहून "ए चला.. खाली उतरा" असे ओरडला.. विभागप्रमुख नि काही मुले काय झाले म्हणून खाली गेली..

तो: "काय हो.. माझ्या मुलाला उडवून पळून जाता??"

आमचा गट: "अच्छा तुमचा मुलगा का तो?? आम्ही नाही त्याला उडवलं.. उलट त्याला मदत मिळवून दिली.. तो पडला त्याच्या कितीतरी अलीकडे आमची बस उभी होती"

तो: "खोटं बोलू नका.. त्याने पोलिसांपुढे जबाब दिलाय.. तुम्हीच ठोकलं म्हणून.."

आमचा गट:"अहो विश्वास ठेवा.. आम्ही असं काही केले नाही.."

तो: "काही सांगू नका.. मी जुन्नर पोलिसांत फिर्याद केलीय.. असेच जर पुढे गेलात तर हिट अँड रन ची केस दाखल होईल.. तुम्हालाच जड जाईल"

तोवर पाठून अच्चा नि बच्चा आले.. तेही मुलाच्या बाबांना समजावत होते.. हे लोक खूप चांगले आहेत.. त्याच्या मुळेच तुमच्या मुलाला वेळीच मदत मिळाली.. तो स्वतःहून पडला होता.. आम्ही पाहिलेय बस तो पडला त्याच्या अलीकडे होती..पण कुठचं काय?? तो माणूस काही ऐकण्याचा पलीकडे गेला होता... त्याचं म्हणणं एकच होतं, तो एकतर विभागप्रमुख किंवा मुख्य आयोजक मुलाने त्याच्यासोबत जुन्नरच्या पोलीस ठाण्यात यावे.. बहुतेक त्याला प्रकरण दाबायला पैसे हवे होते... विभागप्रमुख या दोन्ही गोष्टींसाठी बिलकुल तयार नव्हते.. एक तर आमची काही चूक नव्हती.. केलेली मदत महागात पडलीच होती.. आता जे काही होईल.. ते सगळ्यांचे सोबतच ह.. आम्ही सगळेजण पोलिसांत यायला तयार आहोत असे त्यांना सांगितले.. अच्चा-बच्चा चांगले होते.. त्यांनी त्यांचा दूरध्वनी क्रमांक दिला.. माझं नाव गायकवाड आहे.. काही गरज लागली तर लगेच फोन करा.. आम्ही तुमच्या सोबत आहोत.. काही काळजी नका करू.. असे सांगून ते लोक नोघून गेले.. पाठोपाठ त्या मुलाचे बाबाही गेले..

मोठा बाका प्रसंग आला होता.. हे भगवान..!!! काय करता काय होऊन बसले होते.. त्या मुलाने अशी खोटी जबानी का द्यावी? तो म्हणतोय तशी जर केस दाखल झाली असती तर प्रकरण आणखीच चिघळले असते.. आम्ही तसेच पुढे जाऊ शकलो असतो.. पण पुढच्या परिणामांची काळजी होती.. असे म्हणून सगळ्यात आधी जिथे परत वळण्यापुरती जागा मिळाली.. तिथे बस वळवली..
आता.. आजवर पोलिसांशी संबंध म्हणजे फक्त एक शून्य शून्य.. प्रभाकर.. गेला बाजार सी आय डी एवढाच आलेला.. आमची काही चूक नव्हती.. पण त्याचा काही पुरावा आमच्याकडे नव्हता.. नि जर त्या मुलानेच असे सांगितले असेल.. तर जगातला कुठलाही माणूस त्याच्या जखमा पाहिल्यानंतर आमच्यावर विश्वास ठेवणार नव्हता.. त्यामुळे आपली बाजू वाचवण्यासाठी एकच गोष्ट करणे आमच्या हातात होते.. ते म्हणजे.. कोणत्याही विसंगतीशिवाय आमची बाजू पोलिसांपुढे नीट मांडणे.. नाहीतर चित्रपट-मालिकांसारखे त्यांनी सुतावरून स्वर्ग गाठला तर आमचे मरणच होते.. मग जुन्नरला जाईपर्यंत.. कुणी कुणी पोलीस ठाण्यात जायचे.. त्यांना काय काय नि कोणत्या क्रमात सांगायचे, हे ठरले.. जर का पोलीस बसपर्यंत आले, नि त्यांनी बसमधल्या लोकांना काय झाले असे विचारले तर तेव्हा काय सांगायचे, तेही ठरवून झाले.. ते काय काय प्रश्न विचारू शकतील, त्यांची काय उत्तरे द्यायची हा खल.. नि त्याची रंगीत तालीम पण केली.. उगाच करण नसताना लष्कराच्या भाकरी भाजण्याची वेळ आली होती.. पण आलेल्या भोगासी सादर होण्यावाचून पर्याय नव्हता.. एकदा मनासारखी "मनाची" नि उत्तरांचीही तयारी झाली.. नि लक्षात आले.. की आता मुंबईला परतायला वेळ लागणार.. सगळ्यांच्या घरी कळवायला हवे.. नि इतका वेळ विसर पडलेल्या मोबाईलची आठवण आली.. पहिले.. तर नेटवर्क च्या दांड्या वाकुल्या दाखवत होत्या.. एकमेकांचे-सगळ्यांचे मोबाईल तपासून झाले.. कुणाच्याच मोबाईलला रेंज नव्हती.. घाटात नसेल येत.. थोड्या वेळाने प्रयत्न करूयात असे म्हणून गप्प बसलो.. जरा गाव आले.. आता रेंज आली असेल म्हणून पुन्हा एकदा तपासणी झाली.. पण उपयोग शून्य..

network settings-> manual settings-> seach for network->no network found सगळ्यांच्या फोन मध्ये हीच हालत होती.. मोबाईल बंद करून पुन्हा चालू केला..
पुन्हा एकदा network settings-> manual settings-> seach for network->no network found हेच गाणे वाजले...
आधी सांगितल्याप्रमाणे कमीत कमी २५ लोकांकडे मोबाईल होते.. माझा बीपीएल, विभागप्रमुखांचा ऑरेंज, उल्हासनगरला रोमिंग पडते म्हणून त्या लोकांचा बीएसएनएल, बाकी लोकांकडचे एअरटेल.. सगळ्यांनी माना टाकल्या होत्या.. एखादे नेटवर्क नाही मिळाले तर समजू शकतो.. आणि लहरी खोडदला divert केल्या होत्या.. पण फोन तर तिथेही लागत होते.. आणि इतक्या दूर का कुणाचाच फोन लागत नाहीये?? शेवटी एकदा पोलिसांचे प्रकरण आटोपले, की एखादा एस टी डी बूथ पाहून फोन करूयात असे ठरले.. जुन्नर ला पोचायला ९:०० वाजले.. विभागप्रमुख नि काही निवडक लोक निघाले.. जाण्यापूर्वी कुणीही बस सोडून बाहेर यायचे नाही अशी आम्हाला सूचना केली..
जिथे बस थांबवली होती.. तिथे पाण्याची एक बाटलीही मिळू शकेल असे एखादे दुकानही नव्हते.. समोर एक पटांगण होते.. अन आसपासची घरे अगदी साधी होती.. बसल्या बसल्या कंटाळा आला.. एक मुलगा तोवर माझ्याकडे आला.. त्याला "एकी"ला जायचे होते.. जरी कुणी बसमधून बाहेर पडायचे नाही असे विभागप्रमुख सांगून गेले होते,याला नाही म्हणणे शक्यच नव्हते.. नि हळूहळू सगळ्यांनाच जायची गरज भासेल असे वाटत होते..
मग, एकावेळी जास्तीत जास्त दोघांनी जायचे.. त्यांनी जास्तीत जास्त दहा मिनिटात परतायचं नि ते परतल्याशिवाय पुढच्या दोघांनी जायचे नाही असे मी त्यांना सांगितले.. ना जाणो सगळेच बाहेर गेले.. नि पोलीस ठाण्यात गेलेले लोक परत आले.. तर सगळ्यांना गोळा करण्यात अडचण नको.. म्हणून हा मधला मार्ग होता.. थोडा वेळ गेला.. आता एक महाराणी उठून आल्या.. तिला काय हवंय हे वेगळं सांगायची गरज नव्हती.. मुलांचे एक ठीक आहे हो.. "होल वावर इज अवर.." पण मुलांना लावलेले नियम मुलीना लावून त्यांना असे वार्‍यावर सोडून देऊ शकत नव्हते.. आजूबाजूला तसा आडोसाही नव्हता.. कुणाच्या तरी घरी जायला हवे होते.. पण आसपासची घरे पण खूप साधी होती.. तिथे जायचे नि घरातल्या बाईने शेजारचा बोळ दाखवायचा असे नको होते व्हायला.. एका मुलावर बस सोपवून सगळ्या मुलीना घेऊन वरात निघाली .. ना जाणो.. आम्ही काही जणी पुढे जायचो.. नि परत कुणाला जायची इच्छा व्हायची.. एक बर्‍यापैकी ठीकठाक घर पाहून आत गेलो.. काकू काकू म्हणून हाका मारल्या..[कुत्रा असेल तर??] काकू बाहेर आल्या.. त्यांना सांगितले.. आम्ही मुंबईहून आलोत.. आमची गाडी खराब झालीये.. त्या काही ना बोलता आत गेल्या..क्षणभर कळाले नाही.. प्रश्नचिन्ह विरायच्या आत आतून एक पुरुष आला.. काय काम आहे म्हणून त्याने विचारले.. पुन्हा एकदा "रचलेली" गोष्ट सांगितली.. त्याने (आम्हाला) अगम्य अशा भाषेत त्या बाईला काहीतरी सांगितले.. आता डोक्यात प्रकाश पडला.. ती बाई अमराठी होती..!!!!!
तिथून परतलो तरी ठाण्यात गेलेले लोक अजून परतले नव्हते.. काय झाले असेल?? त्या मुलाने आणखी काय काय सांगितले असेल?? त्याचा बाबा केवढे मोठे धेंड असेल?? त्यांनी काय प्रतिप्रश्न केले असतील??? नाही नाही ते विचार हो मनात.. एकदाचे ९:५० ला हे लोक आले.. सगळ्यांनी त्यांच्या वर प्रश्नांचा भडीमार केला.. तर डोंगर पोखरून उंदीर निघाला होता.. म्हणजे..अगदी सिनेमातलं वाटावं असंच काहीसं घडलं होतं... हे लोक ठाण्यात पोचले.. ती त्यांच्या ड्युटी बदलाची वेळ होती.. मग तेव्हा वंदे मातरम झाले.. एक हवालदार "टाईट" होऊन आला होता.. त्याची निरिक्षकाने बिनपाण्याने करण्यात १० मिनिटे गेली होती.. मग एका बाईने नि तिच्या दारुड्या नवर्‍याविरुद्ध तक्रार केली होती.. त्यांची तिथेच जुंपून त्याची परिणीती बाईने त्याला चोपण्यात झाली होती.. नि सगळे पोलीस ठाणे त्याला वाचवण्यात गुंतून गेले होते.. नि या सगळ्या प्रकारात.. आमच्या चमूचा नंबर लागायला वेळ लागला होता.. तालीमीबरहुकुम सांगायला गेले तर पोलिसांना यातली काही माहितीच नव्हती.. म्हणजे.. त्यांच्याकडे तक्रारच कुणी दाखल केली नव्हती.. बहुतेक त्या माणसाने पैसे मिळवण्यासाठी हा सगळा बनाव केला होता.. विभागप्रमुखांनी निरीक्षकाला अच्चा-बच्चा चा फोन नंबर नि नाव दिले.. त्या क्रमांकावर फोन केला.. तर तो एका वाडीच्या गाव चावडीतला फोन होता.. नि त्या वाडीत सगळ्यांची आडनावे "गायकवाड"च होती.. आता यावर काय म्हणणार कप्पाळ??

निरीक्षक तसे चांगले होते.. त्यांचा नि विप्रांचा संवाद थोडाफार असा झाला::
निरीक्षक: "अशा लोकांकडे कशाला लक्ष देता.. तुमच्यासोबत इतकी मुले आहेत.. कल्याणचा रस्ता पकडा.. नि लवकर घरी जा.. "
विभागप्रमुख: "अहो पण आता खूप रात्र झालीये.. नि तिकडे लुटालुटीचे प्रकार चालतात ना? "
निरीक्षक: "अहो नाही.. त्यांचा पूर्ण बंदोबस्त झालं.. तुम्ही नि:शंक मानाने जा.."

विभागप्रमुख: "हो.. जबाबदारी आहे.. विषाची परीक्षा कशाला?? वेळ लागला तरी चालेल.. पण आम्ही मुंबई पुणे महामार्गानेच जाऊ.. "
निरीक्षक: "ठीक आहे.. जशी तुमची मर्जी.. पण जर विचार बदलला.. तर बिनधास्त जा याही रस्त्याने.. काळजीचे कारण नाही.."

बसमध्ये बसून आम्ही मोबाईलदेव आणि रेंज देवी यांना वारंवार आवाहन करूनही त्यांनी कुणालाच दाद दिली नव्हती.. आता लवकरात लवकर एखादा फोन बूथ गाठणे गरजेचे होते.. पण गावात बूथ शोधात बसण्यापेक्षा हमरस्त्यावर एखादा बूथ मिळेल तिथे थांबू.. मिळाले तर थोडे बिस्किटाचे पुडे नि पाण्याच्या बाटल्या घेऊ.... तसे नऊ वाजे पर्यंत घरी पोचू म्हणून काही खाल्ले ही नव्हते.. रात्री दहानंतर इथे काही मिळेल की नाही हि शंकाच होती..पुढे नाक्यावर एक बूथ मिळाला.. पण तिथे फोन सोडून दुसरे काहीच नव्हते.. कावळ्यांनी पोटात उच्छाद मांडला होता.. चला आधी फोन मिळालाय.. तो तर करून घ्या.. बाकी सगळ्यांना "घरी काय झालंय ते आताच खरं खरं सांगत बसू नका.. विनाकारण काळजी करत बसतील.. बसचे चाक पंक्चर झाले होते म्हणून सांगा.. सगळे मिळून एकच थाप मारा.. नाहीतर एका पालकाने दुसर्‍याला फोन केला की आपले पितळ उघडं पडेल.. उद्या गेल्यानंतर त्यांना काय सांगायचे ते सांगा " अशा सगळ्यांना सूचना देऊन झाल्या.. चालकाच्या अंदाजाप्रमाणे आता पोचायला २:३० वाजणार होते.. इतक्या रात्री सगळ्यांना आपापल्या घरी जाणं तर काही शक्य नव्हते.. "तेव्हा मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या घरी थांबू.. नि तिथे पोचल्या पोचल्या घरी फोन करू" असेही सांगायला सांगितले.. फोन करून पुन्हा एकदा यात्रा चालू झाली.. मी अन विभागप्रमुखांनी मुलांशी चर्चा करून कोण कोण कुणाच्या घरी थांबू शकते हे विचारून सगळ्यांची व्यवस्था लावली.. मोबाईल चालू झाले तर त्या त्या मुलांच्या पालकांना शक्य असेल तर गाडी घेऊन विशिष्ट ठिकाणी न्यायला या असे सांगता आले असते.. मुलांसाठी पिठले भात का होईना तयार ठेवा असेही सांगू अशा योजना चालू होत्या.... होता होता तो तिठा आला.. की जिथून कल्याणच्या दिशेने एक फाटा जातो नि दुसरा पुणे महामार्गाच्या दिशेने.. नि आतापावेतो पुणे मार्गाने जाऊ म्हणणाऱ्या विभाग प्रमुखांनी शेवटच्या क्षणी विचार बदलला.. त्यांना पोलिसांनी इतके आश्वासन दिले होते, त्यामुळे आपण सुखरुप जाऊ.. तेही कमी वेळात.. असे त्यांना वाटले.. नि पुणे महामार्ग सोडून कल्याणचा रस्ता पकडला.. आता थोडे निवांत झालो होतो.. गप्पाचा विषय अर्थातच घडला प्रसंग होता.. दहा वर्षाच्या पोटाच्या गोळ्याला सालगडी म्हणून ठेवणारा माणूस तो.. त्याचा डाव त्याच्यावरच उलटला. बरं झालं.. चांगला धडा मिळाला त्याला.. बरे झाले आपण परत गेलो ते.. नाहीतर मनात नेहेमी टांगती तालावर राहून गेली असती..कधी पोलिस येतील नि पकडुन नेतील.. हे आणि असं बरंच काही..

चालक त्या मुलाचे बाबा घाटात भेटले तेव्हाच थोडा वैतागला होता... पण त्याला बसचे जे काही होतील ते अधिक पैसे देऊ.. हवे तर तुम्हाला थोडे अधिक पैसे देऊ.. नि तुम्ही पाहाताहात की आमची काही चूक नाहीये.. असे बाबापुता करून त्याला शांत ठेवले होते.. आता तो खुशीत होता.. का काय विचारता?? अहो समोरचा रस्ता पूर्ण मोकळा.. मग काय हॉर्न नाही.. कुणाची पाठून ओव्हरटेक करण्यासाठी पीं पीं पिर पिर नाही.. मस्त सुसाट वेगाने बस निघाली.. अर्धा एक तास गेला.. नि त्याच्या नि पर्यायाने आमच्याही.. आनंदाची जागा काळजीने घेतली.. सगळी वाहने समोरून येत होती.. नि आमच्या दिशेने फक्त आमचीच बस चालली होती.. पूर्ण तासाभरात एकही वाहन आमच्या दिशेने जाणारे दृष्टीस पडले नव्हते.. त्यात भर म्हणून समोरून येणाऱ्या एका ट्रक वाल्याने थांबण्याचा इशारा केला.. "क्यों खुदको लुटवाने का बहोत शौक चढा हैं?? आगे पांच पांच गाडीयाँ लुटी हैं तुम भी जाओ.. रस्ता ही देख ऱ्हे हैं वो लोग.. इतने बच्चे साथमे.. और बिलकुल अकल नहीं हैं.. " असे म्हणून तो निघून गेला.. चालक नि आम्ही.. सगळेच सुन्न.. रस्ता इतका अरुंद..नि समोरून तर गाड्या येत होत्या त्यामुळे आहे त्या परिस्थितीत बस वळवणे शक्यच नव्हते.. पहिल्यांदा जिथे जागा मिळेल, तिथून परत वळायचे ठरवले.. गाणी.. गप्पा सगळे बंद.. दिवे मालवले.. खिडक्यांवरती पडदे ओढले.. सगळे चिडीचूप.. विभागप्रमुख चालकाच्या केबिनमध्ये जाऊन बसले..
माझ्या मनात नाही नाही ते विचार.. अजूनही उजव्या खिडकीशीच बसले होते.. देव करो अन दरोडेखोर ना येवोत.. पण आले तर काही मिस नको व्हायला.. थोडा पडदा किलकिला करून रस्त्यावर नजर ठेवून होते.. कसे दिसत असतील ते? शिनिमातल्या उत्तर भारतीय डाकुंसारखे काळा कुर्ता नि धोतर, कपाळावर कुंकुमतिलक आणि कमरेला बन्दुकींच्या गोळ्यांचा पट्टा असेल, की गब्बरसिंग सारखे खाकी कपडे घातले असतील??? नशीब तोवर सावरखेड पहिला नव्हता.. नाहीतर ते टकलू हैवान पण दिसले असते.. सुदैवाने दरोडेखोर येण्याआधी एक ढाबा आला.. बस वळवण्याइतकी जागा तर मिळाली.. ढाबा चालू होता.. खाली जाऊन पाणी तरी घेऊन येऊ म्हणून दरवाजा उघडला.. तर समोर अच्चा नि बच्चा.. अच्चा कुणाशीतरी मोबाईल वर बोलत होता..आणि आम्हा दरवाजातल्या लोकांची बोलती बंद !!!! चालक गर्भगळीत.. साहेब आता थांबणार नाही लवकर चला.. नि एक क्षणही तिथे न दवडता त्याने उलट दिशेने गाडी सुसाट सोडली..

"काय झाले??" बसामधून पृच्छा..
"काही नाही.. उशीर होईल म्हणून नाही थांबलो " इति दरवाजातले लोक..

दरोडेखोरांच्या विचाराने जेवढी भीती वाटली नव्हती तितकी आता वाटू लागली.. आम्ही कुठे जाणार हे या अच्चा-बच्चाला कसे कळाले? जिकडे जाऊ तिथे हे कसे पोचताहेत?? मी उजवीकडे नजर ठेवून होते.. पण एकही वाहन आम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेले नव्हते..नि गेले सहा सात तास आम्ही जवळच्या २०-२५ मोबाईलसोबत झगडतो आहोत.. एकही नेटवर्क नाही.. आणि हे कसे बोलत आहेत?? हा दरोडेखोरांचा सापळा तर नव्हे??? काल पौर्णिमा होती.. चकवा.. भुताटकी तर नसेल?? मनोजवं पुन्हा एकदा खिंकाळलं नि मारूततुल्य वेगाने खुदडूक खुदडूक धावू लागलं.. आता बसला करकचून ब्रेक लागेल.... समोर तो संध्याकाळचा मुलगा पुन्हा एकदा गुरासारखा ओरडत असेल.. मग त्याचा आकार बदलेल..तो त्याचं रडू भेसूर हास्यात बदलेल.. प्रचंड आकाराचा तो प्राणी रामसेच्या शिनिमातले बोटाच्या फटीतून घाबरत घाबरत पाहिलेले किळसवाणे नि भयंकर चेहेरे धारण करेल.. "आज तो तुम्हें यहाँ आना ही था.. " (आयला... भूत मराठी असेल का हिंदी..??? ) नि आतापर्यंत पाहिलेल्या भयपटांची नि काल ऐकलेल्या भूतकथांची भेळ होऊन नवीनच काहीतरी घडेल.. कोण तो काल ज्याने भुतांच्या गोष्टी सांगण्याची टूम काढली?? ? गम्मत नाय हो.. पण काल संध्याकाळी पाच वाजता जिथे होतो.. आता पहाटेचे जवळ जवळ २:30 वाजताहेत.. अजून तिथेच चकरा मारत असल्यावर काय होणार माणसाचे?? नि त्यात आमचे मोबाईल चालत नव्हते.. काल सकाळी माझ्या भावाचा नारायणगावात फोन आला.. तेव्हा नेटवर्क होते.. इतकेच काय पण त्या GMRT च्या केंद्रात पण होते.. नि आता तिथून इतके दूर निघून आलो.. तरी एकही फोन चालत नाही म्हणजे काय? शी: असलं घाबरण्यापेक्षा दरोडेखोर परवडले.. पण ही चाल नक्कीच त्यांची नसेल..आपल्याकडचे दरोडेखोर IMEI based selective mobile frequency jammer वापरण्याइतके हायटेक कधीपासून झाले?? ते जास्तीत जास्त एक गोळी घालतील.. नि काम तमाम होईल..पण घाबरून असं तीळ तीळ मरण्यापेक्षा ते खूप बरं!!!
प्रसंगाचे गांभीर्य सगळ्यांनाच जाणवलेलं... माझ्या बाजूची मुलगी माझा हात हातात घट्ट धरून काही न बोलता टक्क डोळ्यानं समोर पाहत होती.. बहुतेकांची अवस्था अशीच असावी.. मग बराच वेळ काहीच झाले नाही..

"कुणी जागं आहे?? "

"हो.. मी आहे.." बरेचसे दबके आवाज आले..

"चला आपण एक खेळ खेळू.."

"....." कुणाची काहीच प्रतिक्रिया नाही..

मग ज्याने सुचवले, तो मुलगा स्वत:च मध्ये आला.. एक दोघे त्याच्याकडे तोंड करून बसले..

"मी गोष्टीचा शेवट सांगेन.. तुम्ही पूर्ण गोष्ट काय आहे ती ओळखायची.. त्यासाठी तुम्ही प्रश्न विचारू शकता.. पण मी उत्तर हो किंवा नाही.. इतकंच देणार "..... तो

"ठीक आहे "

"एक ओवरकोट घातलेला माणूस हातात डबा घेऊन चाललेला असतो.. तो एका घराची घंटी वाजवतो.. दरवाजा उघडतो.. आत दोघेजण असतात.. ते दोघे त्याच्याकडे निरखून पाहतात.. नि पुढच्या क्षणी त्याचा खून करतात. झाला कथेचा शेवट!! "

"ते तिघे मित्र असतात?"

"नाही "

"ते एकमेकानां ओळखत असतात? "

"हो"

"ही घटना युरोपात घडते? "

"हो "

अनिच्छेनं का होईना.. सगळेजण तिथे जमू लागले..दबक्या आवाजात हळूहळू प्रश्न वाढायला लागले.. ताण थोडासा हलका होता होता.. बसमधले दिवे लावले नाहीत.. पण जरा पडदे उघडले..चौदा पंधरा तासांच्या प्रवासाने शिणलेल्या शरीराला गार हवेने थोडं बरं वाटले.. पहाटेपर्यंत खेळ संपत आला होता.. कथा काय होती.. याची उत्सुकता होतीच.. तर म्हणे.. कि तीन एकमेकांना न ओळखणारी माणसे एकदा एका विमानाने प्रवासाला निघाली होती.. ते विमान अचानक त्या तिघांना एका निर्जन बेटावर सोडून निघून गेलेले असते.. थोडे दिवस ते गवत.. कंदमुळे.. झाडपाला खाऊन दिवस काढतात..मग तेही अन्न एक दिवस संपते.. मग जीव जगवण्यासाठी पर्याय म्हणून ते एकमेकांचा एक एक अवयव आळीपाळीने द्यायचा ठरवतात.. अशा तर्‍हेने दोघांचे हात ते कापून खातात.. पुढची पाळी तिसर्‍याची असते.. त्याने ही हात द्यायचा असतो.. पण तोवर एक बचाव पथक येते.. नि ते या तिघांना सोडवून घेऊन जाते.. पहिले दोघे तिसर्‍यावर संतापतात.. त्या दोघांनी आपला हात दिल्याने तो तिसरा वाचलेला असतो.. म्हणून आज त्यांच्याकडे खायला अन्न असले तरी.. बदला म्हणून यांना त्याचा हात हवा असतो.. ते दोघे मिळून या माणसाचा पत्ता शोधून काढतात.. नि त्याला स्वत: तो शिजवून आणायला सांगतात.. त्याप्रमाणे तो एका डब्यात शिजवलेले अन्न घेऊन हे दोघे जिथे वाट पाहत असतात तिथे जातो.. त्याने पांघरलेल्या ओव्हरकोटातून त्या दोघांना कळते की त्याने स्वत:चा हात कापला नाहीये तर शर्टाच्या आत लपवला आहे.. त्यामुळे संतापून ते याचा खून करतात.. हुश्श!!! प्रश्नोत्तरांनी कथा संपली तेव्हा पहाटेचे ५:३० वाजले होते.. बस पनवेलच्या आसपास होती.. आजवर इतक्या वेळा मुंबईला आले.. पनवेल आल्याचं कधीच इतकं अप्रूप वाटलं नव्हतं पण आज ओळखीचा भाग बघून अक्षरश: मन भरून आले.. मोबाईल चालू केला.. नोकियाचे connecting people चे हात.. पाठोपाठ home network selected हा संदेश!!! आईगं!! जीव दाणकन मोठ्या भांड्यात जाऊन आदळला!!! सहा वाजेतो चेंबूर-घाटकोपर आले.. बसचा तो सगळ्यात शेवटचा थांबा होता..

प्रवास संपला.. पण बरीचशी प्रश्नचिन्हे देऊन गेला.. असं का घडलं???
भूतबित.???. त्यांची भीती वाटते.. पण त्यांचे अस्तित्व मन मानत नाही..

मग आम्हाला लुटण्यासाठी दरोडेखोरांचा प्लान..??? पण मग त्या मुलाचे ओरडणे हा अभिनय असणे शक्यच नव्हते....

मग काय योगायोग..??? अलीबागसे आयेली है क्या?? हा बॉलीवूडचा येडपट शिनिमा थोडाच हाये येवढे सगळे योगायोग असायला..

शेवट काय, उत्तर तेव्हाही नव्हते.. आजही नाहीये.. पण हा प्रसंग मनावर कायमचा कोरला गेलाय..

अवांतर:
१. आजही ही पूर्ण रात्र जणू काही कालची रात्र असावी अशी मला नेहेमी आठवते.. परवा रात्री पहिला भाग लिहिला.. पुन्हा एकदा तो प्रसंग जिवंत झाला.. आज माझ्या लेखी त्या मुलाला चेहरा नाही.. पण त्याची फुटलेली बोटे नि त्याचं भयानक रडणं.. पुन्हा एकवार डोळ्यासमोर अभं राहिलं.. रात्री बराचवेळ उशिरापर्यंत मी झोपू शकले नाही..

२. मी हा प्रसंग जसा मला जाणवला तसा लिहिलाय.. कोणत्याही वर्णनात एका शब्दाचीही अतिशयोक्ती नाही.. माझे विभागप्रमुख मिपा वर नाहीत.. राहिलेल्या ४५ जणांपैकी अर्धी जनता तरी मराठी होती.. जर त्यापैकी कुणी इथं मिपावर असेल.. तर त्यावेळी तुम्हाला काय वाटलं होतं.. हे सांगितले तर खूप बरे होईल.. तसेही त्या बॅचचे कुणी भेटलं कि हटकून हा विषय निघतोच.. पण आपल्या या मित्रमंडळीना एकच प्रसंग दोन किंवा अधिक द्दृष्टीकोनातून वाचावयास मिळेल.

प्रवासप्रकटनअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

6 Jun 2009 - 4:46 pm | घाशीराम कोतवाल १.२

मस्त कलंदर मॅडम तुमचा नारायणगावचा थरार अतिम भाग वाचला हे खर आहे कि माळाशेज घाटात किति तरी लोकांना भुता खेताचे अनुभव आले आहेत विश्वास ठेवा अगर नका ठेवु पण मी जुन्नर जवळील आंबेगाव तालुक्यातला रहिवासी आहे माझे गाव मंचर नावाच्या गावापासुन ८ किमि वर आहे तुम्हाला खुप भयानक अनुभव आला होता कोणी विष्वास ठेवु अगर न ठेवो पन मला माहित आहे हे खर असेल ते कारण मी एकदा ह्यांच्या पासुन वाचलो आहे फक्त मी पाहिले ते मानवी शरिर नसुन एक जंगली प्राण्याच्या रुपात होते आता ते काय होते हे देव जाणे

**************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!

Anticlimax होणे.

सायली पानसे's picture

7 Jun 2009 - 10:15 am | सायली पानसे

जबरदस्त आहे ग लेख.... वाचतानाच कसतरी होत... तुम्हि कसे अनुभवले असेल... पण लेख मस्त लिहिला आहेस.

शैलेन्द्र's picture

7 Jun 2009 - 9:07 pm | शैलेन्द्र

साधारण १९९७-९८ पासुन कीतितरी वेळा या घाटाने गेलो. कित्येकदा एकटाच स्वताच्या गाडीने रात्री ११-१२ वाजता डोंबिवलिवरुन निघालोय. घाटात पोचायला साधारण १.३०-२ वाजतात. या घाटातले वातावरण गुढ असते, कारण मुंबै-पुणेकरांना अपेक्शित वस्ति आणि व्यापरीकरणाचा अभाव्(गेले ते दिन गेले.) घाटात व ईतरत्र बरेच धुकेहि असते. तसेच नवख्या माणसाला ओतुर ते मुरबाड हा विरळ लोकवस्तीचा १०० कीमीचा पॅच गोंधळात टाकतो. अजुन काहिच कसे आले नाही असे वाटायला लागते. पण कित्येक गावकरी दुचाकीवरुन रात्री अपरात्रीही ये जा करत असतात. इथला भुगोल नवख्या माणसाला गोंधळवतो. तुमच्या ग्रुप्चे बहुदा तसेच झाले असावे. बाकी प्रत्येक अनुभव शेवटी पर्सनल असतो.

माझ्या अत्यंत आवडत्या रस्त्याबद्दल ऊगिच भिति निर्माण होवु नये हाच या प्रतिसादाचा ऊद्देश आहे. माळशेज घाटाने बिन्धास्त जा. तिथल्या दरोडेखोरांची मोडस ऑपरेंडी म्हणजे खिळे टाकुन गाडी पंक्चुर करुन लुटणे अशी होती. तेही शक्यतो भाजीचि जीप कींवा छोटी कार. बस वगैरे लुटण्याची तर या लोकांची कधिच हिंमत झाली नही. आता टोकावड्याला पोलिस स्टेशन झाले, तेंव्हापासुन हे सगळे अगदी बंद. एक साधा ऊपाय म्हणजे एस टीच्या मागे कींवा पुढे गाडी चालवणे.

पाषाणभेद's picture

8 Jun 2009 - 7:40 am | पाषाणभेद

धन्यवाद प्रेषक शैलेन्द्र. उपयुक्त माहिती दिली त्या बद्दल.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

विसोबा खेचर's picture

9 Jun 2009 - 8:59 am | विसोबा खेचर

लै भारी बुवा!

तात्या.