वरीस पाडवा (१)

अरुण वडुलेकर's picture
अरुण वडुलेकर in जनातलं, मनातलं
16 May 2009 - 5:41 pm

दुपारचे बाराचे टळटळीत उन डोक्यावर घेत दिना त्या दहा मजली इमारतीच्या गच्चीवर उभा होता. डोळ्यावर हाताचा पालथा पंजा धरून दूरवर चिंचोळ्या होत गेलेल्या कच्च्या सडकेच्या टोकापर्यंत त्याने बुबुळांना कळ लागेपर्यंत नीट न्याहाळले. कंत्राटदार किंवा त्याचा मुकादम येण्याचा मागमूसही नजरेला पडत नव्हता. वीस जिने चढून पिंढरीला आलेला पेटका जरासा अलवार झाला तसा दिना पुन्हा पायर्‍या खाली उतरू लागला.

एका पसरटशा टेकाडावार ती जवळजवळ पूर्णावस्थेला आलेली उघडी बोडकी इमारत उभी होती. गावाच्या बरीचशी बाहेर स्वस्तात मिळालेली जागा पटकावून एका बिल्डरने ही इमारत उभी केली होती. पण भोवतालचा परिसर व्यावहारिक दृष्ट्या पुरेसा गजबजलेला होण्याची वाट पहात इमारतीचे अखेरचे बांधकाम स्थगित केले गेलेले होते. सध्या, त्या बिल्डरने नेमेलेला रखवालदार, दिना थिटे, त्याची घरवाली आणि एक चार वर्षाचा मुलगा कृष्णा एवढेच तीघे इमारतीवर वसतीला होते. बांधकाम स्थगित झाल्यापासून गेले सहा महिने कंत्राटदार कधी तिकडे फिरकला नव्हता. सुरुवातीचे चार महिने दर बुधवारी मुकादम एक चक्कर टाकून जाई. जागेवरच्या उरलेल्या वस्तूंवर एक नजर टाकी. थोडी पहा़णी करी आणि हप्‍त्याचा पगार दिनाच्या हातावर टेकवून आल्या पावली परत जाई. पण गेले दोन महिने तोही पुन्हा फिरकला नव्हता. दिनाची घरवाली, कौशी जवळपासच्या चार सहा घरात धुण्या-भांड्याची कामे करी. तिच्या कमाईवरच कशीबशी गुजराण चालली होती.

टिनाच्या खोपट्यात दिना परतला तेंव्हा कौशी चुलीवरच्या तव्यावरच्या शेवटच्या भाकरीवर पाणी फिरवीत होती. डेर्‍यातून लोटाभर पाणी घेऊन दिना घटाघटा प्यायला लागला तशी कौशी त्याच्याकडे पहात म्हणाली,

" सैपाक झालाया. खाउन घिवा. अन् मंग पानी पिवा"
" व्हय की. वाढ."

उरलेले पाणी घेऊन दिना पुन्हा बाहेर गेला. तोंडावर पाण्याचा हबका मारला आणि आत येऊन भुकेल्या मांजरीगत चुलीसमोरच्या जागेवर बसला. कुठूनसा कृष्णा धावत आला आणि बापाशेजारी उकिडवा बसला. पुढ्यातल्या भाकरीचा तुकडा वाटीतल्या लालजर्द कालवणात बुचकळीत म्हणाला,

" बा, तू गावात कंदी जानार?"
" कां रं? "
" नै, म्हंजी कनै.....तू कडं कवा......"
" ए, गप कि रे. जेव की गुमान." कौशी कां तडकली ते दिनाला समजे ना.
" कां चिरडायलीस? बोलू दे की त्याला."
" काय बोलायचंय! हे कवा आननार अन्‌ ते कवा आननार हेच की."
" आत्ता! पोरानं आनि काय करावं म्हन्तीस?"
" तेच की पोरानं तेच करावं आनि तुमी बी तेच करावं."
" म्हंजी?"
" घरात न्हाई दाना आन्‌ म्हनं हवालदार म्हना."
" कोडं कां बोलायलीस. शिध्धी बोल की."
" काय बोलू? वरीस पाडवा परवाला आलाय. कार्टं, हार कडं कवा आननार म्हून बेजारतंय."
" बरं मग?"
" कर्म माजं! घरातल्या दुरड्या कवाधरनं पालथ्या पडल्यात. सनाला काय करनार? तुमी बसा हितच त्या मुकाडदमाची वाट बगत."
" मंग काय करावं म्हन्तीस?"
" पवरा हिरीत पड्ला तर काय वाट पहात बसान कां तो कवा वर येईल म्हून?"

भाकरीचा शेवटचा कुटका दिना चघळीत होता आणि कौशीकडे कौतुकाने बघत होता. कौशीचं हे असं कोड्यातलं आणि म्हणी उखाण्यांनी सजलेलं बोलणं त्याला फार आवडायचं. तशी ती दहावी पर्यंत शिकलेली होती. दिनाची मजल मात्र चौथीपुढे गेली नव्हती. कौशीचं माहेर तसं बर्‍यापैकी शिक्षित होतं. तिचा बा परभणी जवळच्या एका खेड्यात परंपरेने येसकर आणि चार बुकं शिकला म्हणून ग्रामसेवक होता. दिनाचा तो चुलत मामा लागत होता. दिनाचं गांव हिंगोली जवळचं मंठा आणि बाप गावच्या सावकाराच्या जमिनीचा सरकती होता. दिना बापाचा एकुलता एक मुलगा. लहानपणापासून तालमीचा शौकीन. आणि त्यामुळेच की काय डोक्याने जरा जडच. किल्लारीच्या भूकंपानंतर भोवतालच्या परिसराची एकूणच झालेली वाताहत, लागोपाठ पडत गेलेला दुष्काळ आणि राजकीय मागासलेपण या दुष्टचक्रात जी कांही सार्वत्रिक अवदशा झाली त्यामुळे हजारो माणसे देशोधडीला लागली. गांव सोडून पोटापाण्य़ासाठी शहराकडे धांवली. त्या सुमारास नाशिक पुणे परिसरात शहरविस्तारासाठी नव नवीन बांधकामे सुरु झाली. त्यात मग कारागिरीसाठी ही माणसे सामावत गेली. या सार्‍यांना कारागिरी येत होतीच असें नव्हे. पण पोटातल्या आगीने हातांनाही अक्कल दिली. कुणी गवंडी, कुणी सुतार, कुणी कॉन्‍क्रीट कामाचे सेन्‍टरिंग करणारे, कुणी अन्य कांही कामे शोधून पोट भरू लागले. ज्यांना हेही साधले नाही ती माणसे दिनासारखी रखवालदाराचे काम करू लागली. कौशीला दिनाच्या नांवाचं कुंकू ती पाळण्यात असतांनाच लागलं होतं. ती शहाणी सुरती झाली तशी या येड्या बागड्याचा संसार टुकीनं सांभाळू लागली. आत्ताही हा येडाबागडा ओठातून फुटू पहाणारं हसूं दाबून धरण्याचा प्रयत्न करीत मिष्किलपणे कौशीकडे पहात होता. काळीसांवळी असली तरी कौशी ठसठशीत होती. दिनाच्या जिवाची अस्तुरी होती.

" दात काडाया काय झालं?"
" काय न्हाई. ते पवर्‍याचं काय म्हनालीस?" दिनाचा बतावणी पाहून कौशीही हंसायच्या बेतात होती.
" उटा. चहाटाळपणा बास्‌ झाला. तो मुकाडदम कुटं घावतोय का बगा. न्हाईतर त्या बिल्ड्याचा बंगला गावांतच हाय म्हनं. बगा जाऊन एकदा."

कौशीनं बिल्डरचा बिल्ड्या केलेला पाहून दिनाला पुन्हा हसूं फुटलं. पण आता तिच्या समोर अधिक वेळ काढणं शहाणपणाचं नव्हतं. मळालेले कपडे बदलून स्वच्छ कपड्यात खोपटा बाहेर पडणार तेवढ्यात कौशीनं खाटेखालची पत्र्याची ट्रंक पुढे ओढली आणि खालच्या एका पातळाच्या घडीत दडवलेली एक दहा रुपयाची बारीक घडी घातलेली नोट काढून दिनाच्या हातावर ठेवली. दिनाच्या डोळ्यात पाणी तरारलं. गेले दहा बारा दिवस घरात कसे काढले गेले ते त्याला माहिती होतं. कृष्णानं परवा बिस्किटाच्या पुड्यासाठीं हट्ट करून शेवटी कौशीच्या हाताचा फटका खाल्ला होता. आणि आता गावांत जातांना जवळ असावे म्हणून कौशीने बाजूला टाकलेले दहा रुपये दिनाच्या हाती ठेवले होते. त्या क्षणी कौशीला कवेत घ्यावं असं दिनाला वाटलं पण डोळ्यातलं पाणी लपवीत खालमानेने तो तडक बाहेर पडला.

कच्ची वाट सरून वस्ती सुरू झाली तशी दिनाची नजर दिसलेल्या पहिल्या पानटपरीवर गेली. अजून चार फर्लांग चालायचं आहे, गुटक्याची एक पुडी चघळायला घ्यावी म्हणजे जरा तरतरी येईल म्हणून पाय तिकडे वळाले खरे. पण टपरीवर एका बाजूच्या काचेच्या कपाटांत बिस्किटाचे पुडे लावलेले पाहून दिनाची मान आपसूक खाली गेली आणि तसाच तो तरातरा चालायला लागला ते थेट मुकादमचे घर येईपर्य़ंत. मुकादम त्याची फटफटी फडक्याने पुसत होता. अंगावर ठेवणीतले कपडे होते. दिनाची नजर जरा पुढे गेली तर मुकादमाची बायकोही हातातल्या गोठ पाटल्या सांवरत इरकलीत उभी.जोडी कुठे बाहेर जायच्या तयारीत दिसत होती.

" कोण? दिना! कां रं हितं कशापायी येणं केलंस? आन साईट कुनाला इच्यारून सोडलीस?" मुकादमानं एकदम सरबत्तीच लावली.
" न्हाई जी. साईट कशी सोडंन. पाच सा हप्ते झाले. कुनी काई आल्यालं न्हाई साईटवर. म्हून आलो."
" कुनी काई आलं न्हाई म्हन्‍जे? साईट सध्या बंद ठेवलीया. बुकिंग न्हाई. साहेब बी वैष्णोदेवीला गेलेत. सध्या स्ल्याकच हाय."
" पर आमी काय करावं?"
" म्हंजी?"
" म्हंजी, सा हप्ते झालेत. हाजरी न्हाई मिळाली. लै तारांबळ व्हाय लागलीया. काय पैशे मिळतीन म्हणतांना आलो."
" कां कौशी कामाला जातीया ना?" मुकादम डोळा बारीक करीत म्हणाला. दिनाच्या कपाळाची शीर तडतडायला लागली. तरीही सांवरून म्हणाला,
" तिचं काय पुरतं पडायलं? त्यांत जरा वल्ली सुक्की खायाला मिळतिया यवडंच."
" आन लेका, साईट बंद पडलीया तर साइटरवचा माल हाय की."
" ............."
" काय डोळे वासून पहायलास रे ए शहाजोगा. साइटवरचं परचुटन भंगार, ढप्पे ढुप्पे वोपून किती मिळाले ते कां नाही सांगत?"
" काय बोलताय काय साहेब. कां गरीबाला बालंट लावतांय्‌?"
" तुज्या मायचा गरीब तुज्या! काय पहिलाच साईट वाचमन पहालोयं कां मी."
" मुकादम, मी त्यातला न्हाई. काय गैरसमजूत करून घिऊ नका. आज लैच नड लागलीया. काय उचेल तरी द्या बापा."
" आज तर काई जमायचं न्हाई. साहेब बाहेर गेल्यात. माजं बी पेमेन्‍ट झाल्यालं न्हाई. म्होरल्या बुधवारी साईटवर येतो. तवा काय तरी बगू"

एवढं बोलून मुकादम फटफटीला किक मारून चालता झाला.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

16 May 2009 - 5:49 pm | परिकथेतील राजकुमार

वाचतोय. वेगळ्या भाषाशैलीतली उत्तम कथा.

काय बोलू? वरीस पाडवा परवाला आलाय. कार्टं, हार कडं कवा आननार म्हून बेजारतंय."
ते 'हार कडं' काय उमगुन नाही राहिल बॉ.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

यशोधरा's picture

16 May 2009 - 7:56 pm | यशोधरा

छान लिहिलय, पुढचा भाग लवकर येउदेत.

समिधा's picture

16 May 2009 - 11:27 pm | समिधा

खरचं खुपच छान लिहीलयत

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

विसोबा खेचर's picture

17 May 2009 - 12:06 am | विसोबा खेचर

छानच..

तात्या.

मिसळपाव's picture

17 May 2009 - 12:24 am | मिसळपाव

"... पण पोटातल्या आगीने हातांनाही अक्कल दिली..."
अगदि खरंय.

अवलिया's picture

17 May 2009 - 6:41 am | अवलिया

हेच बोल्तो

--अवलिया

पाषाणभेद's picture

17 May 2009 - 8:00 am | पाषाणभेद

पुढच्या भागाची वाट बघतोय.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

प्राजु's picture

17 May 2009 - 8:44 am | प्राजु

कथेची वातावरण निर्मिती, कथेची भाषा दोन्ही उत्तम.
खूपच छान.
एक संदर्भ थोडा चुकीचा वाटला.. पहिल्या पॅरा मध्ये दिनाचा ४ वर्षाचा मुलगा "राम" असे म्हंटले आहे.. आणि नंतरच्या पॅरा मध्ये दिना जेवायला बसतो तेव्हा "कृष्णा पळत येऊन बसला" असे म्हंटले आहे.. थोडा गोंधळ वाटतो आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अरुण वडुलेकर's picture

17 May 2009 - 9:16 am | अरुण वडुलेकर

चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
पण एका गोष्टीचं समाधान वाटलं की आपण कथा नीट बारकाईने वाचतां आहात.
पुन्हा एकदा धन्यवाद.