तो मीच आहे .......!

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
1 Apr 2009 - 3:02 pm

"साहेब मी गुन्हा कबुल करायला आलो आहे ! असे बघताय काय माझ्याकडे मी कामिनी पटवर्धनचा खुन केलाय, डोक्यात फ्लॉवरपॉट मारुन.", तो अगदी ठामपणे सांगत होता.

सावंतांनी एकवार त्याच्यावर आपादमस्तक नजर फिरवली आणि मग शांतपणे हवालदाराला म्हणाले," २२४४ , घ्या यांचाही जबाब नोंदवुन घ्या.आणखी एक जण कामिनीबाईंच्या खुनाची जबाबदारी स्विकारणारा !"

"अरे काय चाललेय काय, पोलीसांना काय समजताहेत काय हे लोक !", अचानक सावंतांचा तोल सुटलाच.

"ओ साहेब, ओरडायला कशाला? मी माझा गुन्हा कबुल करतोय, तुमचे श्रम वाचवतोय. यु शुड से थॆंक्स ! उलट तुम्ही भडकताय काय ?"

"३१४० या @#$ला टायरमध्ये घाल रे, $#@ मला शाणपण शिकवतोय. साल्याला थर्ड डिग्री दाखवा म्हणजे कळेल. खुन करताहेत @#$%& ! बाय द वे , काय नाव काय म्हणालास तुझं ? आणि तुला माहितीय ?.... तु तिसरा आहेस, हा खुन मी केलाय म्हणुन सांगणारा ! दोघा जणांनी आधीच क्लेम लावलाय. च्यायला कामिनी पटवर्धन म्हणजे काय विमा पॉलीसी वाटलीय की काय तुम्हा लोकांना ! "

"काय ? कसं शक्य आहे हे? खुन मीच केलाय साहेब. तुम्ही त्यांच्या ऑफ़िसातल्या लोकांना विचारा..कामिनीला शेवटचा भेटणारा माणुस मीच होतो."

"काय, अच्छा म्हणजे तुच तो राजन गावंड काय ? कुठे फरारी झाला होतास ?" आता चमकायची पाळी सावंतांची होती.

"मी घाबरलो होतो साहेब, तिला मारताना काही वाटले नाही. पण ती मेली आहे हे लक्षात आल्यावर तंतरली माझी साहेब म्हणुन पळुन गेलो. चार दिवस लपुन होतो साहेब ! पण आता हजर झालोय साहेब ! मला अटक करा. मी सगळं सांगतो तुम्हाला. ती साली मरायच्याच लायकीची होती. साली कुणा-कुणा बरोबर फिरायची, मी विचारलं तर डोळे दाखवायला लागली. म्हणे तु पटवर्धनांचा पगारी नोकर, आपली पातळी ओळखुन राहा. साली माझी लायकी काढते. उचलला फ्लॉवरपॉटआणि घातला डोक्यात....!"

"कदम, घ्या याला पण आत घ्या !"

सावंतांच्या हातात कामिनी पटवर्धन केसची फाइल होती. ही केस विलक्षण वळणावर आली होती. फाइल चाळता चाळता सावंत भुतकाळात शिरले ......

चार दिवसांपुर्वी पटवर्धन गृपच्या मॅनेजींग डायरेक्टर कामिनी पटवर्धनांची त्यांच्या ऑफ़ीसमधील, त्यांच्याच केबिनमध्येच भर दुपारी हत्या करण्यात आली होती. कोणीतरी डोक्यात काहीतरी जड वस्तु (नंतर कळले की तो एक पितळी फ्लॉवरपॉट होता) मारली होती. आणि आता चार दिवसात आजचा राजन गावंड धरुन तीन जण सांगत होते.......

तो मीच आहे....!!
......
.........
..............

"प्रांजल बंगला" आज सकाळपासुनच गजबजला होता. दादासाहेब सारखे घड्याळाकडे बघत आतबाहेर करत होते. नोकरांवर ओरडत होते...

"रखमा, भरल्या वांग्याची भाजी तु चाखुन बघीतलीस ना? अजयला मीठ कमी लागतं माहीत आहे ना तुला ?"

रखमाकाकी गालातल्या गालात हसायला लागल्या, हसणार नाही तर काय ?

अजय , दादासाहेब पटवर्धनांचा एकुलता एक मुलगा. पटवर्धन गृपचा भावी एम. डी. ! दादासाहेबांच्या पत्नी करुणाबाई गेल्यापासुन रखमाकाकींनीच अजयला लहानाचा मोठा केला होता. त्याच्या आवडी निवडी त्यांना माहीती नसतील तर कुणाला? रखमाबाई करूणाबाईंच्या माहेराहुन आलेल्या, खुप वर्षापासुन या घरातली काम करत होत्या. . अजयच्या लहानपणीच साध्या दम्याचे निमित्त होवुन करुणाबाई देवाघरी गेल्या, तेव्हा अंत्यसमयी करुणाबाईंनी अजयला त्यांच्या हाती सोपवला. आणि त्यांनीही आईच्या मायेने त्याला वाढवलं होतं. त्यांना स्वत:चं अपत्य नव्हतंच. त्यामुळे अजयलाच त्यांनी आपल्या सख्ख्या मुलासारखे वाढवले होते. त्यांची माया, अजयवरचं त्यांचं प्रेम दादासाहेब ओळखुन होते. म्हणुनच ते रखमाला नोकर न मानता घराची एक सदस्यच मानत होते.

दोन वर्षापुर्वी पुढे शिकण्यासाठी अमेरिकेत जातो म्हणाला, म्हणुन जाण्यापुर्वी दादासाहेबांनी त्याचं लग्न आटपुन घेतलं. "आता सुनबाईला घेवुन जा बरोबर म्हणजे इकडे मी निर्धास्त राहु शकेन."

उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात गेलेला अजय जवळ जवळ दोन वर्षांनी परत येत होता घरी ! वर्षभर कामिनी आणि अजय अमेरिकेत होते. दररोज फोनवर बोलणे असायचेच. पण अचानक दादासाहेबांना ह्रुदय विकाराचा झटका आल्याने दोघेही भारतात परत आले. दादासाहेबांना थोडे बरे वाटायला लागल्यावर जेव्हा अजयने परत जायचा विषय काढला, तेव्हा कामिनीने दादासाहेबांना अशा अवस्थेत सोडुन जायला ठाम नकार दिला. त्यांच्या देखभालीसाठी म्हणुन भारतातच राहण्याचा तिने निर्णय घेतला. त्यामुळे अजयही निश्चिंतपणे अमेरिकेला गेला. पण यामुळे कामिनी मात्र दादासाहेबांची लाडकी बनली होती. आज अजय परत येणार होता. त्यामुळे दादासाहेब फारच अधीर झाले होते.

रखमा अगं कामिनी कुठेय ? त्या लेकराकडे बघ गं जरा..दोन वर्षानी नवर्‍याला भेटतेय पोर. मोठी धीराची आहे माझी पोर....!

सकाळपासुन कामिनीची लगबग चालुच होती. अजय येणार, किती दिसांनी भेट होणार होती. तसं व्हिडीओ चॅटींग असायचं रोज. फोन तर सारखेच...पण प्रत्यक्ष भेटीचा आनंद.....काही वेगळाच असतो. तो कसा दिसत असेल आता ? बारिक झाला असेल का? की जाड झाला असेल ?
हजार शंका..खरेतर गेल्या महिन्यातच अजयने स्वत:चीच एक सीडी शुट करुन पाठवली होती तिला. पण मानवी मन.... कुणाला कळलंय...!!! तिची सारखी आत बाहेर चालुच होती.

पण हा अजुन कसा नाही आला ? फ्लाइटची वेळ गृहित धरुन आत्तापर्यंत यायला हवा होता तो.
"काकी, लिमयेकाकांना फोन लावुन विचारा ना काय झालेय ते? अजयला आणायला विमानतळावर तेच गेले आहेत ना ? शेवटी तिला राहवलं नाहीच.

लिमये काका म्हणजे दादासाहेब पटवर्धनांचे फ़ॆमिली डॊक्टर कम जिवलग मित्र ! अजयला आणायला विमानतळावर तेच गेले होते. कामिनीला विचारलं होतं दादासाहेबांनी ,जातेस का म्हणुन ? पण अजयच्या स्वागताची तयारी करण्यासाठी म्हणुन कामिनी घरीच राहिली होती.

ट्रिंग..ट्रिंग.........ट्रिंग..ट्रिंग....
सगळेच फोनकडे धावले.
" हॅलो, कामिनी पटवर्धन बोलतेय ........!"

" बच्चु, मी अरुकाका बोलतोय", फोनवर लिमयेकाकाच होते. बच्चु, दादाला घेवुन सिटी हॉस्पिटलला ये लगोलग. अजयच्या गाडीला अपघात झालाय.

कामिनीच्या हातातुन हँडसेट निसटलाच , ती मटदिशी खालीच बसली.

"काय झालं बच्चु ?", अनिष्टाची शंका येवुन दादासाहेब, रखमाकाकी दोघेही तिच्याकडे झेपावले.

"दादा, यांच्या गाडीला अपघात झालाय, काकांनी त्यांना सिटी हॉस्पिटलला नेलंय आपल्याला तिथेच बोलवलेय. दादासाहेबांना जणु सगळा बंगलाच आपल्याभोवती फिरत असल्याचा भास झाला. कसेबसे त्यांनी स्वत:ला सावरले आणि .....

सिटी हॉस्पिटल...

"अरु, कुठेय माझा अज्जु, त्याला फार लागलं तर नाहिये ना ? आणि तु होतास ना बरोबर , कसा काय झाला अपघात? दादा कमालीचे भेदरले होते. त्यांना काही म्हणता काही सुचत नव्हते.

"दादा, तु शांत हो आधी, मी सगळे सांगतो. अज्जुने ऐनवेळी आपले तिकिट रद्द करुन आधीची फ्लाइट बुक केली होती. थेट घरी पोहोचुन आपल्याला आश्चर्यचकित करण्याचा त्याचा इरादा होता बहुतेक. इथे उतरल्यावर त्याने एक खाजगी टॅक्सी ठरवली आणि घरी यायला निघाला. पण मध्येच अंधेरीपाशी एका भरधाव वेगात येणार्‍या ट्रकने त्याच्या टॅक्सीला धडक दिली. लोकांनीच त्याला इथे हॉस्पिटलमध्ये आणुन पोचवले. नेमका मी त्याला फोन केला होता. सुदैवाने त्याचा मोबाईल सुस्थितीत असल्याने जवळच असलेल्या कुणीतरी घेतला आणि मला ही घटना कळाली. मी मग तुला कळवण्यासाठी म्हणुन घरी फोन केला तर तो नेमका बच्चुनेच घेतला.

चल आधी डॉक्टरला भेटु. डॉ. साठे माझे चांगले मित्र आहेत. ते बघ साठे इकडेच येताहेत..चल........

डॉ. साठेंचा चेहरा कमालीचा गंभीर होता.," माफ कर, अरुण, अजय इज नो मोअर ! डोक्यातुन प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. आम्हाला काही करायची संधीच मिळाली नाही !

दादासाहेब कोसळले...हाता तोंडाशी आलेला गुणी मुलगा काळाने ओढुन नेला होता.

"अरुण, हे सदगृहस्थ......!"

"संदीप, हे दादासाहेब पटवर्धन, अजयचे वडील. पटवर्धन गृप ऑफ इंडस्ट्रीज चे सर्वेसर्वा. सद्ध्या फक्त एक असहाय बाप !", डॉ. साठे अरुकाकांकडे पाहातच राहिले.

या घटनेनंतर दादासाहेब ढासळुनच गेले. तशातच त्यांना पॅरालिसिसचा झटका आला. काल परवा पर्यंत हसरं खेळतं असणारं घर....आज त्याला स्मशान कळा आली होती. कामिनीने तर अजय गेल्यापासुन स्वत:ला आपल्या रुममध्ये कोंडुनच घेतलं होतं जणु. कुणाशी बोलणं नाही, कुठे जाणं नाही. तिचे आई वडील तिला न्यायला आले तेव्हा मात्र तिने त्यांच्याबरोबर जायला स्पष्ट नकार दिला.

"नाही आई, इथे दादांना माझी गरज आहे. त्यांना अशा अवस्थेत सोडुन जाणे मला नाही जमणार. काकींचं पण वय झालंय, हे घर आता मलाच जपावं, सांभाळावं लागणार आहे"

"सावित्रीबाईसाहेब, पटवर्धनांचं नशीब मोठं, म्हणुन अशी सुन लाभली हो त्यांना. स्वत:वर आकाश कोसळलंय, पण ते दु:ख बाजुला ठेवुन सगळं घर सांभाळायला निघालंय लेकरु." रखमाकाकींचे डोळे आणि उर भरुन आले होते.

कामिनीच्या आई वडीलांना आपल्या लेकीचा खुप अभिमान वाटला. ते भरल्या अंत:करणाने परत गेले.

त्यानंतर काही दिवसातच दादासाहेबांनी कंपनीच्या कामातुन लक्ष काढुन घेतलं आणि जबाबदारी कामिनीच्या खांद्यावर सोपवली. आणि कामिनीने काम बघायला सुरुवात करुन अवघे सहा महिनेही झाले नव्हते. आणि काळाने दुसरा आणि मोठा धक्का दिला होता.

कोणीतरी भर दिवसा ऑफीसमध्येच कामिनीची हत्या केली होती आणि गंमत म्हणजे पोलीसांकडे आत्तापर्यंत तीन जणांनी खुनाची कबुली दिली होती. तिघेही जण छातीवर हात ठेवुन, मुद्देसुदपणे सांगत होते की..

" तो मीच आहे ............... !"

सावंतांच्या डोक्यावरचे उरलेसुरले केस पण उडणार होते बहुतेक ही केस संपेपर्यंत.

कदम, आण रे एकेकाला ! राउंडला घे, बघु काय म्हणतात ते पुन्हा एकदा !"

पहीला भीत भीतच त्यांच्या ’स्पेशल खोली’त शिरला. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अशी एक स्पेशल खोली असतेच. ही खोली गुन्हेगारांचा कबुलीजबाब घेण्यासाठीच वापरली जाते. गुन्हेगाराकडुन त्याचा गुन्हा वदवुन घेण्यासाठी विविध प्रकारची कायदेशीर (आणि बेकायदेशीर सुद्धा) साधने तिथे असतात.

तो भिंतीवर लटकवलेल्या एकेक गोष्टी पाहात घाबरतच आत आला. वेगवेगळ्या प्रकारचे लोखंडी हुक, टायर्स, छताला बांधलेली रस्सी, पाच पाच फ़ुट लांबीचे बांबु. वेताच्या छड्या. खरेतर सावंतांनी आजपर्यंत या साधनांचा कधीच वापर केला नव्हता. मुळात गुन्हेगार हा ही एक माणुस असतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता. सायकालॉजी घेवुन एम. ए. झालेले इन्स्पे. अनिरुद्ध सावंत म्हणजे एक अजब रसायन होते. गुन्हेगारापेक्षा गुन्हेगारी संपवण्यावर त्यांचा भर होता. कुठल्याही गुन्हेगारावर ते आपल्या पद्धतीने उपचार करत. हो... त्यांच्या मते गुन्हेगार म्हणजे एक आजारी पेशंटच असतो. त्याची गुन्हेगारी वृत्ती म्हणजे एक विकार, त्याच्यावरच घाव घातला की काम जास्त सोपे होते, असे त्यांचे साधे सरळ तत्वज्ञान होते.

तर स्वत:ला कामिनीचा खुनी म्हणवणारा पहिला माणुस..आत शिरला.

"या , नाव काय सांगितलं होतस बरं तु, म्हणत सावंतांनी पुन्हा एकदा केस फाईल हातात घेतली.

"जी सायेब, अभंगराव...!"

"अं, हा बरोबर अभंगराव मोडतोड आपलं तडमोड, सोलापुरचा का बे तु ? कामधंदा काय करतोस?"

जी सायेब, आपला बिजिनेश हाये. आमी बटनं बनवतो."

"बटनं, म्हणजे शर्टाची...!"

"व्हय सायेब, समद्याच कपड्यांला लावता येतील अशी बटनं बनतात सायेब आपल्या फॅक्टरीमदे !"

"आयला, तुझी पण फॅक्टरी आहे..सावंतांनी त्याच्याकडे वरुन खालपर्यंत पाहिलं. हा माणुस फॅक्टरीच काय, एखाद्या पान टपरीचा मालक देखील वाटत नव्हता. जेमतेम सवा पाच फुट उंची, पाउण फुट रुंदी, काळ्या चेहर्‍यावर कमालीचे तेलकट भाव.

"सायेब, मोहनदास चाळीत खोली नं. ३ मध्ये बारकं युनीट हाये बगा आपलं बटनं बनवायचं. काये सायेब, फॅक्टरी म्हणलं की कसं येकदम वजनदार वाटतं" त्याच्या चेहेर्‍यावरची ओशाळवाणी लाचारी त्याची लायकी सांगत होती.

"असो, बोल बाबा काय झालं त्या दिवशी" सावंत अगदी शांतपणे एकेक प्रश्न विचारीत होते.
मांजर कसं झुरळाला पंजांनी खेळवुन खेळवुन मारतं ना तसं.

"सायेब, पटवर्धन फेब्रिक्सला आमी बटनं सप्लाय करतो बगा. चार महिना झाली बगा, त्यांनी माझं पेमेंट केलं नव्हतं की! त्या दिवशी त्यासाठीच बाईंना भेटायला गेलतो ना. आमी जाम समजावुन पायलं बगा, लई इनंत्या केल्या की वो पण बाई ऐकाया तयारच न्ह्याय. आमी पैशाची मांग तशीच रेटली तर म्हणाल्या गुमान चालता हो, न्हायतर गार्डांना बोलवुन धक्का मारुन भायेर काढीन. आपलं पण डोकं सरकलं बगा आन तीची पाठ फिरली की रागाच्या भरात तिथलंच येक पितळ्याचं फुलदाणी उचललं आन घाटलं कि वो डोक्यात. बाईला वरडाय पण नाय आलं बगा. तसाच तितुन गपचुप बाहेर आलो. "

"मग इतके दिवस कुठे गायब झाला होतात."

"’घाबरलो की वो सायेब, पन मग दोसलोग म्हनलं कीं आपुनहुन गुन्हा कबुल केला तर शिक्षेत सुट मिळतय म्हणं. आमी रागाच्या भरात मारलं की वो तिला. आमी गरीब मानुस हाये सायेब, तुमच्याच हातात असतंय बगा सगळं, सोडवा की यातुन. काय नाय तर, सजा तरी कमी होतय का बगा ना जरा!"

"ठिक आहे तु जा आता ! ", हवालदार कदम..दुसर्‍याला पाठव आत.

"दुसरा माणुस आत आला. सावंत त्याच्याकडे बघतच राहीले. साधारण पन्नाशीचं वय. साडे पाच ते पावणे सहा फुट उंची, चेहेर्‍यावर कमालीचे सात्विक भाव. अतिशय साधा, गरिब वाटणारा हा माणुस ..अं..जयंत साठे बरोबर. साठेंनी आत येताच त्या खोलीकडे एकदा पाहिलं , स्वत:शीच हसले.

"खोली छान सजवलीये साहेब, नमस्कार. पण माझा जबाब मी आधीच दिलेला आहे. आता नव्याने काय हवंय माझ्याकडुन तुम्हाला."

सावंत चमकले. त्यांनी ही खोली खास बनवुन घेतली होती. तिच्या दर्शनानेच गुन्हेगार अर्धा होत असे. आणि हा माणुस तर सराईत गुन्हेगारही वाटत नव्हता.

"साठे, तुम्ही पटवर्धनांच्या ऑफीसात स्टोअर किपर म्हणुन काम करता."

"गेली तीस वर्षे ! पटवर्धन फार्मासुटिकल्स मध्ये. कधी इकडची काडी तिकडं नाही झाली साहेब तीस वर्षात. पण कामिनी बाईंनी गृपचा चार्ज घेतल्यानंतर एके दिवशी म्हणजे मागच्या महिन्यात ४ जानेवारीला, बाईंनी स्टोअरच्या चाव्या माझ्याकडुन मागुन घेतल्या आणि मला त्या रात्री माझी ड्युटी असताना देखील सुटी घ्यायला सांगितली. मला संशय आला म्हणुन मी गुपचुप रात्री तिथं गेलो तर पाहिलं की स्टोअरमधुन रात्रीच्या अंधारात औषधांची चोरी चालली होती. मी आरडाओरड केली तसे आजुबाजुला लोक जमा झाले आणि ते लोक पळुन गेले. पण मी कामिनीबाईंकडे दिलेल्या स्टोअरच्या चाव्या तिथे कुलुपात लटकत होत्या. म्हणुन मग मी याचा उलगडा करुन घेण्यासाठी बाईंकडे गेलो. तर त्यांनी माझ्यावरच खोटे नाटे आरोप केले. साहेब गेली तीस वर्षे इमाने इतबारे नोकरी केलेली. तो आरोप नाही सहन झाला मला. रागाच्या भरात तिथलाच पितळी फ्लॉवरपॉट उचलला आणि कमिनीबाईंच्या डोक्यात घातला. तिला ओरडायला पण झालं नाही. पण लगेचच आपल्या हातुन काय घडलय याची जाणीव झाली. मग तेथुन बाहेर पडलो. बाईंची केबीन थोडी एका बाजुला आहे. त्यामुळे सहसा काय चाललंय ते बाहेरच्यांना कळत नाही आणि केबिनमध्ये जाणारा माणुससुद्धा लक्ष ठेवुन बसल्याशिवाय दिसत नाही. मला त्यादिवशी केबिनमध्ये शिरताना कुणीही पाहिले नव्हते. त्यामुळे मी गुपचुप बाजुच्या दरवाजाने बाहेर पडलो. घरी गेलो. घरुनच रजेचा अर्ज दिला. बायको मुलांसमवेत एक दिवस मजेत काढला. दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांना काय घडले आहे याची कल्पना दिली. आणि त्यांची समजुत काढुन मग स्वत:ला तुमच्या स्वाधीन केले."

ह्म्म्म ! इंटरेस्टींग !! खरं सांगु , साठे का कोण जाणे पण मला अजुनही वाटतंय की तुम्ही खोटं बोलताय. कदाचित... कदाचित .....! असो, तुमच्याशी नंतर बोलुच पुन्हा. तुम्ही या, कदम त्या हिरोला घेवुन ये. हो तोच राजन गावंड.

राजन गावंड, हा माणुस अतिशय देखणा, साधारण ६.१ फुट उंची, गोरा पान रंग, सुशिक्षित वाटणारा एकंदर प्रथमदर्शनी प्रभाव पाडणारा असा होता. कामिनीच्या खुनानंतर घेतलेल्या ऑफीसच्य स्टाफच्या जबाबातुन सावंतांना समजले होते की हा माणुस कामिनीकडे नेहेमी येत असे. ज्या दिवशी कामिनीचा खुन झाला त्या दिवशी देखील कामिनीला भेटणारा शेवटचा माणुस राजनच होता. म्हणुनच त्याचे नाव कळताच सावंत दचकले होते आधी. त्यांना त्याच्यावर संशय आला होता.
पण आता तो स्वत:च सांगत होता की "तो मीच आहे !"

"बोल हिरो, का मारलंस कामिनीला ! "

ही केस म्हणजे सावंतांना गंमतच वाटायला लागली होती. एक खुन होतो आणि तिघे जण येतात काय, मीच खुन केलाय म्हणुन हट्ट धरुन बसतात काय ! सगळंच अजब !!

"आणि हे बघ, आता खरं बोल, आधीच्या दोघांनीही बर्‍याच थापा मारल्यात . आता तु अजुन पकवु नकोस."

"मला सुपारी मिळाली होती कामिनीच्या खुनाची. सुपारी म्हणण्यापेक्षा एकप्रकारे माझा नाईलाज होता. मी कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणुन होतो. पैसा दिसला आणि मोह आवरला नाही...मारला हात. पण दुर्दैवाने पकडला गेलो. पोलीसांपासुन मला वाचवण्याचे आमिष दाखवुन कामिनीच्या खुनाची भानगड माझ्या गळ्यात मारली त्याने. आणि गंमत बघा, आता मी स्वतःच स्वतःला पोलीसांच्या स्वाधीन केलय. तेही खुनी म्हणुन.
असो, खुप सभ्य वाटायची पण एक नंबरची पाताळयंत्री बाई होती साहेब. मी माझ्या दिसण्याचा फायदा घेवुन कामिनीची ओळख करुन घेतली. कम्पनीचा कर्मचारीच असल्याने ते फारसे कठीण गेले नाही. तिला भेटुन भेटुन तिचा विश्वास संपादन केला. आणि एक दिवस संधी मिळताच ठरल्याप्रमाणे मी तिला मारली. काय करणार.मान अडकली होती ना. पण त्याने दगा दिला सायेब, सगळ्या लफड्यातुन सोडवणे तर दुरच, गेल्या दोन दिवसात त्याने मलाच ठार मारण्याचा प्रयत्न केलाय. दोनदा मरता मरता वाचलो. तेव्हा ठरवलं की बास. आपल्याला दगा देणार्‍याला सोडायचं नाही. बाहेर राहुन मरण्यापेक्षा माफीचा साक्षीदार होवुन कोर्टापुढे कबुली दिली तर सजा तरी कमी होइल. निदान जीव तरी वाचेल !"

आता सावंत सावरुन बसले. राजनबद्दल त्यांनी बरीच माहिती काढली होती. त्याच्या अनेक उद्योगां (?) बद्दल त्यांना माहिती मिळाली होती. पटवर्धन गृपच्याच एका लहानशा कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणुन काम करणारा हा माणुस अनेक कारणांसाठी बदनाम होता.

"बोल राजन, कोणी सुपारी दिली होती तुला कामिनीला मारण्याची ?"

"मी सांगतो साहेब, पण मला वाचवाल ना?"

"मी प्रयत्न करेन पण शब्द देत नाही, शिक्षा तर होणारच..फक्त ती कमी करता येइल का एवढे मी पाहीन."

"साहेब, राजनने एकदा इकडे तिकडे पाहिले..जणु काय भिंतींना पन कान नाहीत ना ते चेक करुन घेत होता. मग पुढे सरकुन हळुच म्हणाला." साहेब त्या माणसाचे नाव आहे "दादासाहेब पटवर्धन !"

सावंत उडालेच.

भें............., तुला माहिती तु कुणावर आरोप करतोयस ते? दादासाहेबांचं स्वत:च्या मुलापेक्षाही जास्त प्रेम होतं कामिनीवर. म्हणुनतर त्यांनी आपल्या कंपनीची सगळी जबाबदारी कामिनीच्या खांद्यावर सोपवली होती. सावंतांनी सरळ राजनच्या मानगुटीलाच हात घातला. दादासाहेबांसारख्या देवमाणसावर थेट आरोप म्हणजे. सावंत स्वत: वैयक्तिकरित्या दादासाहेबांना ओळखत होते. खरेतर म्हणुनच ही साधी खुनाची केस असुनसुद्धा त्यांनी डिपार्टमेंटकडुन मागुन घेतली होती. अर्थात सुरुवातीला साध्या वाटलेल्या केसने आता एकदम वेगळेच वळण घेतले होते ही गोष्ट अलाहिदा.

साहेब, खरं तेच सांगतोय. मला माहीती होतं तुमचा काय कोणाचाच विश्वास नाही बसणार या गोष्टीवर. पण हेच सत्य आहे.....सावंतांच्या आक्रमक पवित्र्याने राजनची पाचावर धारण बसली होती. पण तो आपल्या जबानीवर ठाम होता.

३१४०, याला टाक कोठडीत आणि पोस्टमार्टेम रिपोर्टची कॉपी दे बरं मला. पुन्हा एकदा पाहु दे तो.

हवालदाराने पोस्टमार्टेम रिपोर्टची फाईल आणुन सावंतांच्या हातात दिली. सावंतांनी पुन्हा एकदा रिपोर्ट चाळायला सुरुवात केली. आणि हळुहळु त्यांच्या चेहर्‍यावर हासु फुलायला लागलं.

ह्म्म ! अस्सं आहे तर ! पण मग नक्की कोण ? आनि दादासाहेबांचं नाव घेण्याचा राजनचा उद्देश्य काय?
की दादासाहेब खरोखरच ? सावंत स्वत:शीच बडबडत होते. त्यांनी पुन्हा पुन्हा दोन तीन वेळा रिपोर्ट वाचुन काढला. आणि....

३१४०, २२४४ चला थोडं पटवर्धन गृपच्या ऑफीसला भेट देवुन येवु. थोडीफार लिंक लागतेय मला. कदाचित आज आपल्याला या केसचा सुत्रधार सापडेल.

क्रमश:

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

1 Apr 2009 - 3:07 pm | घाशीराम कोतवाल १.२

शू$$$$$$$$$$$$$$$$$
हे कोरा आहेत विशाल कुलकर्णी

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

विशाल कुलकर्णी's picture

1 Apr 2009 - 3:15 pm | विशाल कुलकर्णी

कोरा>> म्हणजे काय ?

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

1 Apr 2009 - 3:18 pm | घाशीराम कोतवाल १.२

आधी मला सर्व लेख कोराच दिसत होता
काहि कळत नव्हते वाटल एप्रिल फूल मग दिसला
बाकि मस्त वळण घेतले आहे कथेने एकदम झकास
लवकर टाक पुढला भाग

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

विशाल कुलकर्णी's picture

1 Apr 2009 - 3:22 pm | विशाल कुलकर्णी

मी खरे तर पुर्ण कथाच टाकली होती, पण मलापण सगळे कोरेच दिसायला लागले, म्हणुन दोन तुकडे केले आणि टाकली, तर व्यवस्थित दिसतेय आता. टाकेन उद्या पुढचा भाग.

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

1 Apr 2009 - 3:28 pm | घाशीराम कोतवाल १.२

अरे तयार असेल तर टाक ना बाबा पुढचा भाग मस्त वेगवान कथानक आहे
एक विचार दादासाहेबांचा मुलगा खुनी नसेल कशा वरुन ?
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Apr 2009 - 3:15 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

विशाल लवकर टाक रे पुढचे भाग ... बी.पी. वाढवू नकोस फार!

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

दशानन's picture

1 Apr 2009 - 3:20 pm | दशानन

हेच म्हणतो !

जबरदस्त वेग घेतला आहे कथेने !

मृगनयनी's picture

1 Apr 2009 - 3:27 pm | मृगनयनी

विशाल'जी प्लीज........ लवकर टाका... अंतिम भाग......

"विवेक अग्निहोत्री" फोनवर ऑन्लाईन आहेत!!!!

;) ;) ;)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

ढ's picture

1 Apr 2009 - 3:26 pm |

आधीच सांगून टाक की किती भाग आहेत ते.
म्हणजे शेवटीच लिहीतो काय ते!

मस्त, छान, आवडलं, लौकर टाक,वाट पहातोय, अजून येऊ दे,सुरेख लिहितोस...
हे पुढील सात भागांचे प्रतिसाद समज!!!

स्मिता श्रीपाद's picture

1 Apr 2009 - 3:50 pm | स्मिता श्रीपाद

मी खरे तर पुर्ण कथाच टाकली होती, पण मलापण सगळे कोरेच दिसायला लागले, म्हणुन दोन तुकडे केले आणि टाकली, तर व्यवस्थित दिसतेय आता. टाकेन उद्या पुढचा भाग.

असे नका हो अंत पाहु ..
कृपया लगेच टाका ना पुढचा भाग्....प्लीज प्लीज :-)

शाल्मली's picture

1 Apr 2009 - 3:51 pm | शाल्मली

एकदम वेगवान कथा..
उत्सुकता वाढली आहे. पुढचा भाग लगेच टाका..
उद्याची तरी कशाला वाट बघताय..:)

--शाल्मली.

अभिजीत मोटे's picture

1 Apr 2009 - 5:00 pm | अभिजीत मोटे

वा विशालराव मस्त जमलीय कथा. पुढील भाग लवकर टाका..........

............अभिजीत मोटे.

अनिल हटेला's picture

1 Apr 2009 - 5:12 pm | अनिल हटेला

पू भा प्र !!!

सुप्पर !!!!! ~~~~~!!!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सुमीत's picture

3 Apr 2009 - 3:09 pm | सुमीत

काय छान रहस्य उभे केले आहेस, अष्ट्पैलू लेखनगुण आहे तुझ्यात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2009 - 5:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विशाल,
कथा मस्त रंगलीय, दुसरा आणि शेवटचा भाग लवकर येऊ दे !

मनातल्या मनात : चांगला लेखक मिळाला मिपाला

-दिलीप बिरुटे