टाळण्याची कला

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
29 Jan 2008 - 6:13 pm

आजच्या "सुपरफास्ट' जगात सर्वांना भेडसावणारी प्रमुख समस्या कुठली असेल...? नको असलेल्या लोकांना टाळायचं कसं, याची. व्यक्तिमत्त्व विकास, बुद्धिमत्ता वर्ग वगैरे घेतले जातात, तसा टाळण्याच्या कलेचा वर्गही घेण्याची नितांत गरज आहे...ही कला अवगत असलेल्या आणि नसलेल्यांविषयी एक "स्वैर' चिंतन...
-----------

एका सहकाऱ्यानं टाळण्याच्या कलेवर लेख लिहायला सुचवलं, तेव्हा प्रथम टाळण्याचाच प्रयत्न केला; पण नंतर टाळण्याची कला अवगत आहे की नाही, असा विचार केला, तेव्हा अंतरात्म्याचं (या अंतरात्म्याचा भाव हल्ली फारच वाढलाय) नकारार्थी उत्तर आलं. (आपली गोची इथंच होते!) त्यामुळं लेख लिहिणं टाळणं टाळता येण्यासारखं नव्हतं.

तर...टाळणं. आयुष्यात काय काय टाळावं लागतं नाही! आणि काय काय टाळावंसं वाटतं, तरीही जमत नाही! आपल्याला आपल्या अपत्याचा जन्मही टाळता येतो; पण स्वतःचा जन्म मात्र नाही. एक वेळ दुसऱ्याला टाळता येतं; पण स्वतःला टाळता येणं अशक्‍यच. लोकांना टाळणं हा काही जणांचा हातखंडा खेळ असतो. काही जणांना मात्र टाळण्याची कलाच अवगत नसते. कुणाकुणाला टाळावंसं वाटतं, याची यादी करायची म्हटली तर भलीमोठी होईल. दूधवाला, पेपरवाला, कचरेवाली, लाइट बिलवाले, टेलिफोन बिलवाले, मोबाईल बिलवाले, मेंटेनन्सवाले, प्रॉपर्टी टॅक्‍सवाले हे महिन्याच्या महिन्याला किंवा ठरलेल्या तारखेला हजर म्हणजे हजर! एक वेळ रोजचा रतीब चुकवतील, खाडा मांडायला चुकतील; पण बिल न्यायला ठरलेल्या तारखेला यायला चुकतील तर शपथ!! बरं, तोंडावर भाव असा, की आठ-आठ दिवस उपाशी आहेत आणि आपल्या शंभर-दोनशे रुपयांच्या बिलानं त्यांच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे.

काही दूधवाले, पेपरवाले मात्र प्रेमळ असतात. महिन्याच्या महिन्याला बिलं पाठवत नाहीत; पण जेव्हा पाठवतात, तेव्हा ती आपले डोळे पांढरे करणारी असतात. एकदम सहा-सहा महिन्यांची बिलं. म्हणजे "भीक नको पण कुत्रं आवर'सारखी अवस्था. त्यावर व्याज लावत नाहीत, हे नशीब. ही झाली आपण घेतलेल्या सेवेसाठी पैसे मागणाऱ्या लोकांची उदाहरणं. आपल्याला नको असलेल्या सेवेबद्दलदेखील पिडणारे कमी नाहीत. त्यांना टाळावं कसं, याचे प्रशिक्षण वर्ग घेतले, तर धो धो चालतील. काही काही सोसायट्यांवर पाट्या दिसतात- "फेरीवाले, विक्रेते यांना सोसायटीत प्रवेश बंद.' पण फोनवरून कुठल्या कुठल्या उत्पादनांबद्दल गळ घालणारे आणि "आमच्याकडून यंदा कर्ज घ्याच...' अशी प्रेमळ विनंती करणाऱ्या फेरीवाल्यांना कसं अडवणार?

बॅंका हल्ली "फ्रॅंचायझी' नेमतात आणि आपला व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांना ग्राहकांवर "छू' करतात. हे "फ्रॅंचायझी' खरोखर भुकेल्या कुत्र्यासारखे आपल्यावर तुटून पडतात. सगळ्यात वात आणतात ते क्रेडिट कार्डवाले. एक वर्षासाठी फुकट, अमक्‍या रकमेच्या खरेदीवर तमकं फुकट असल्या "ऑफर' घेऊन हे विक्रेते दिवसभर फोनमध्ये तोंड घालून बसलेले असतात. त्या ऑफरची माहिती देऊन झाली, की लगेचच आपण त्याला होकार देऊन टाकणार आणि काही क्षणांत त्यांचा प्रतिनिधी आपल्या घरात येऊन आपल्या कुठे कुठे सह्याही घेऊन जाणार, हे त्यांनी अगदी गृहीतच धरलेलं असतं.

काही काही अनुभव तर भीषण असतात. आता हेच एक उदाहरण पाहा... एका खासगी बॅंकेच्या मधाळ आवाजाच्या युवतीनं एका ग्राहकाला फोन केला आणि कुठल्याशा "पर्सनल लोन' योजनेची माहिती दिली. कुठल्याही कागदपत्रांशिवाय, काही क्षणांत 50 हजारांचं कर्ज मिळू शकतं वगैरे. तिचं बोलणं संपल्यावर म्हणाली, "मग हवंय ना तुम्हाला कर्ज?' तो म्हणाला..."नाही'. तर म्हणाली, "का सर?'...तिला भयंकर नैराश्‍य आलं होतं. एवढी चांगली योजना असूनही हा बाबा कर्ज का घेत नाही, याचं. अरे...? पण त्याला कर्ज नकोच असेल, तर कशाला घ्यायचं? उद्या तुम्ही म्हणाल, हजार रुपयांच्या हप्त्यावर विमान देतो. ते काय गच्चीवर उडवू की काय? अशा लोकांना टाळणं अवघड जातं. विशेषतः अशा मधाळ आवाजाच्या युवतींना.

या लोकांची घरी फोन करण्याची वेळही झक्कास असते. सकाळी नऊ, रात्री आठ, भर दुपारी दोन किंवा तीन...वाट्टेल तेव्हा! आपण दुपारी वामकुक्षी घेत पहुडलेले असताना घणघणणारा फोन उचलण्यासाठी चरफडत उठायचं आणि ऐकायचं काय, तर कुठल्यातरी बॅंकेच्या क्रेडिट कार्डाची, कर्ज योजनेची, नाहीतर कुठल्या तरी कंपनीच्या बक्षीस योजनेची माहिती. आपण बाहेर निघालेलो असताना अचानक येऊन टपकणाऱ्या पाहुण्यांना, नको असताना पत्र पाठविणाऱ्यांना / फोन करणाऱ्यांना, आपल्यालाच फोन करायला लावून अघळपघळ बोलत बसणाऱ्यांना, शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या उखाळ्यापाखाळ्या करणाऱ्यांना कसं टाळायचं, हीदेखील एक समस्याच. लोकांच्या उधाऱ्या घेऊन वर त्यांनाच काहीबाही कारणं सांगून आपल्याविषयी सहानुभूतीच वाटायला लावणारे महाभाग काही कमी असतात? पैसे वेळेवर परत केले नाहीत म्हणून आपल्याला टाळणं, ही त्याच्यासाठी समस्या नसतेच. उलट, तो पुन्हा पैसे मागू नये म्हणून त्याला टाळणं ही आपल्यासाठीच समस्या बनते.

टाळण्याची कला ज्यांना येते त्यांच्याकडून ती शिकून घ्यावी, हे बरं. उद्या त्यांनाच टाळायचं झाल्यास "गुरूची विद्या गुरूला' वापरता येईल. असो. टाळाटाळीवर बरीच टकळी चालवली.

आता "टळलेलं' बरं.

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

29 Jan 2008 - 10:36 pm | स्वाती राजेश

..........प्रतिक्रिया लिहायची टाळली.

चतुरंग's picture

29 Jan 2008 - 11:14 pm | चतुरंग

"टाळलेली" प्रतिक्रिया जाम आवडली!! अतिशय मार्मिक.

चतुरंग

स्टँडअप कॉमेडियन साईनफिल्ड च्या एका एपिसोड मधे त्याने अश्या टेलीमार्केटीयर ला दिलेलं उत्तर बघा..

http://www.youtube.com/watch?v=hllDWSbuDsQ

प्राजु's picture

30 Jan 2008 - 12:13 am | प्राजु

स्वातीची प्रतिक्रीया आवडली...
मी सुद्धा प्रतिक्रिया टाळणेच पसंत करेन :))

- प्राजु

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jan 2008 - 12:24 am | बिपिन कार्यकर्ते

अजून पुढे लिहायचे टाळतोय.... (आमचे प्रेरणास्थानः स्वाती राजेश)

बिपिन.

टाळ्..या

विसोबा खेचर's picture

30 Jan 2008 - 6:25 am | विसोबा खेचर

आम्हीही स्वातीताईंचेच शिष्यत्व पत्करून प्रतिक्रिया देण्याचे टाळतो आहोत! :)

तात्या.

अवांतर -

टाळण्याची कला ज्यांना येते त्यांच्याकडून ती शिकून घ्यावी, हे बरं. उद्या त्यांनाच टाळायचं झाल्यास "गुरूची विद्या गुरूला' वापरता येईल. असो. टाळाटाळीवर बरीच टकळी चालवली.

अभिजितराव, लेख बाकी छान आहे...

आपला,
(टाळाटाळ करणारा) तात्या.

सुनील's picture

30 Jan 2008 - 9:09 am | सुनील

मला वाटते, असे टाळण्यापेक्षा थेट "नाही" म्हणणे अधिक श्रेयस्कर!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

छोटा डॉन's picture

30 Jan 2008 - 10:07 am | छोटा डॉन

"अशा लोकांना टाळणं अवघड जातं. विशेषतः अशा मधाळ आवाजाच्या युवतींना."
बरोबरच आहे. पण सभ्यपणे त्यांना न दूखवता "टाळण्याचे " काही उपाय देत आहे. बघा जमलं तर एखद्यावेळी प्रयोग करून बघा .......
[ अर्थातच नेटवरून साभार .......... ]

१. फोनवरून त्याने/तिने बोलणं संपवताक्षणी म्हणायचं , '' तुझा आवाज मला खूप आवडला. मी प्रेमातच पडलो/लेय तुझ्या. लग्न करशील माझ्याशी ?''

२. टेलिमाकेर्टिंगवाल्याला सांगा , '' मी आत्ता जरा बिझी आहे. तुमचा घरचा नंबर द्याल का प्लीज! मी मोकळा झाल्यावर करतो तुम्हाला फोन. ''

३. एकदा माहिती दिली की पुन्हा विचारा , '' हं , काय सांगत होतात तुम्ही ?'' असं तीन चार वेळा करा.

४. तुम्ही जेवत असताना असा फोन आला की सांगा , '' मी जेवतोय. दोन मिनिटं जरा होल्ड करा हां. '' मग स्पीकर फोन ऑन करून फोन बाजूला ठेवा आणि आरामात जेवत राहा. खाण्याचे मचमच आवाज करा आणि इतरांशी गप्पाही मारत राहा.

५. फोनवरच्या माणसाला सांगा, ''माझे सर्व व्यवहार माझा मुलगा पाहतो, त्याच्याशी बोला.' आणि फोन आपल्या पाच वर्षांच्या मुलाच्या हातात द्या (किंवा स्वत:च पाच वर्षांच्या मुलाच्या आवाजात बोलू लागा.)

६. ''हॅलो, हां कोण बोलतंय? हॅलो, कोण बोलतंय? जरा मोठ्यानं बोला... आणखी मोठ्यानं बोला हो जरा... अजिबात ऐकायला येत नाहीये तुमचं... फोन आहे का चुन्याची डबी? हॅलो... आणखी मोठ्याने बोला...'' ही वैश्विक युक्ती टेलिमाकेर्टिंगवाल्यांवरही लागू पडतेच.

७. त्यांना सांगा, ''एक मिनिट. एकेक शब्द बोला. मी तुमचं सगळं बोलणं लिहून घेतोय. माझ्या काहीही लक्षात राहात नाही. एकेक शब्द आणि अगदी हळूहळू... घाई नको... हां कुठून फोन केलाय तुम्ही... आय... सी... आय... हळू हळू सांगा...''

७. त्यांनी विचारलं, ''हाऊ आर यू सर?'' की लगेच सुरुवात करा, ''मला हे तुमचं फार आवडलं. तुम्ही फक्त व्यापार करत नाही. माणुसकी जपता. आजकाल कोण कुणाला विचारतं हो की कसे आहात? माझे तर तुम्हाला सांगतो इतके प्रॉब्लेम सुरू आहेत...''

टेलिमार्केटिंगमुळे 'टाळके' हललेला [ छोटा डॉन ]

ध्रुव's picture

30 Jan 2008 - 10:49 am | ध्रुव

छान आहे....
बाकी लेखाला प्रतिक्रिया मी पण टाळली आहे :)

--
ध्रुव

पिवळा डांबिस's picture

1 Feb 2008 - 10:56 am | पिवळा डांबिस

झकास आयडिया आहेत एकेक! आमचे हे २ पैसे...
१. फोनवर त्याने/तिने प्रस्तावना केल्यावर आपण लगेच गंभीर खर्जातल्या स्वरात म्हणायचं, "यू हॅव रीचड अ सिक्युअर नंबर. धिस कॉल इज बीइंग रेकॉर्डेड फॉर सिक्युरिटी रीझन्स. अ कॉपी विल बी फॉरवर्डेड टू *** (इथे तुम्ही जिथे रहात असाल त्याप्रमाणे सीबीआय, एम आय, एफबीआय वगैरे!)" बरयाच टेलेमार्केटर्सचा धीर सुटतो.
२. आपली भाषा बदलत रहायची. म्हणजे असं की तो/ती इंग्रजीतून बोलली की आपण हिंदीतून सुरवात करायची. त्याला/तिला हिंदी येत असेल तर मग तो/ती हिंदीतून जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी आपण लगेच मराठी सुरु करायचं. मग वरहाडी/ कोकणी असं हळूहळू सुक्ष्मात जात रहायचं. हा एक चांगला खेळही आहे, कोण हरतो ते पहायचा! बहुतेक वेळा आपण जिंकतो कारण कधी कोणत्या भाषेत बदल करायचा हे आपल्याच हातात असतं. समोरचा/ची हरतात तरी किंवा कंटाळून फोन ठेवतात तरी. :)

आपला,
पिवळा डांबिस
ता. क. : मध्येच कुठे गायब झाला होता इतके दिवस? तुम्हाला आम्ही मिस केलं राव!

धमाल मुलगा's picture

30 Jan 2008 - 11:21 am | धमाल मुलगा

च्यायला...
हे म्हणजे अथपासून इतिपर्य॑त सगळच "हाण तिच्याआयला" (काय करणार, आमच्यामध्ये शिरलेले रावसाहेब काही केल्या बाहेरच पडत नाहियेत.)

अभिजीत, एकदम "कल्ला" लिहिलय, अन् डॉनभाव, ते तुमच॑ एक एक कल्पना तर यकदम फर्मास हा॑ !

हे सगळे क्रेडिट कार्डवाले तिच्याआयला नेऊन घातले पायजेत तिकड॑...सात गडगड्याच्या विहीरीत.

- ("कोल्ड कॉल" वाल्या॑नी विस्कटवलेला) धमाल.

वरदा's picture

30 Jan 2008 - 10:38 pm | वरदा

सहीच्..खरंच टाळाटाळ करणं सोप्पं नाही....चांगला लेख्...डॉन तुमच्या सगळ्या आयडीया झक्कास...

वरदा's picture

30 Jan 2008 - 10:42 pm | वरदा

महत्वाच्या किंवा आपल्या चांगल्या मैत्रीणींशी मेसेंजर वर बोलत असताना नको त्या ऑनलाईन असलेल्या लोकांना कसं टाळावं? जीमेल वर स्टेल्थ सेटींग्ज पण नाहीयेत. बिझी स्टेटस असूनही बोलणारे लोक असतात आणि उत्तर दिलं नाही की ओळख नाही ठेवत असं म्हणायला मोकळे.....जाम कंटाळा येतो कधी कधी.....

एक's picture

31 Jan 2008 - 2:32 am | एक

अश्या लोकांना ब्लॉक करता येतं. (नावापुढे राईट क्लिक करून सिलेक्ट ब्लॉक)

माझ्या एका मैत्रिणीला मी ही ट्रीक सांगितली होती.. बरेच दिवस झाले पण त्या नंतर ती कधी ऑनलाईन आलीच नाही. :-(

सुनील's picture

31 Jan 2008 - 2:35 am | सुनील

बरेच दिवस झाले पण त्या नंतर ती कधी ऑनलाईन आलीच नाही.

ती तुम्हाला टाळत असावी!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

व्यंकट's picture

31 Jan 2008 - 3:49 am | व्यंकट

मला एकदा आय सी आय सी आय मधून फोन आलेला की १ लाखाचे कर्ज १८% च्या कमी व्याज दरावर देण्यास तयार आहेत; मी काही कर्ज मागितलं नव्हतं, पण आवाज गोड होता, लगेच फोन ठेऊन द्यावा वाटला नाही.
त्यांना १६% च्या दरानी २ लाखाचे कर्ज मी बँकेला देतो अशी ऑफर दिली.

विसोबा खेचर's picture

31 Jan 2008 - 9:29 am | विसोबा खेचर

त्यांना १६% च्या दरानी २ लाखाचे कर्ज मी बँकेला देतो अशी ऑफर दिली.

मी इंटरेस्टेड आहे बरं का व्यंकटराव! :)

आपला,
(धंदेवाईक) तात्या.

विवेकवि's picture

31 Jan 2008 - 5:56 pm | विवेकवि

काय लिहावे सुचत नाहीये.........
पण टाळलेलीच बरी नाही का ?
असो

मिनु जोशी.

विजुभाऊ's picture

21 Feb 2008 - 2:55 pm | विजुभाऊ

टेली मार्केटर ला टाळ्ण्याचा आण्खी एक प्रकारः
कोणि काहि म्हणाले कि त्यान म्हणयचे कि थाम्बा ....एक मिनिट्......एक मिनिट हं.....
मी जरा टोइलेट ल जाउन येतो .....तो पर्यन्त थाम्बा हं.....
किंवा मी आत्ता टोइलेट मधे आहे. तुम्ही बोल्णे चालु ठेवा....
ह प्रकार मी मझ्या एक नातेवैकान्सठी वापरला होता......
त्यानी त्यानन्तर आयुश्यात पुन्हा फोन नाही केला.....( अरे नातेवाइकाना टाळण्याची एक नविन युक्ति मि तुमच्याशी शेअर केली .........) वापरून बघा.
(कोणाचातरी नातेवाइक)विजुभाऊ

आपला अभिजित's picture

13 Nov 2008 - 1:08 pm | आपला अभिजित

एक लेख पूर्वी इथे लिहिला होता.

या पोस्टशी संबंधित त्यातील काही मुद्दे :

काही काही अनुभव तर भीषण असतात. आता हेच एक उदाहरण पाहा... एका खासगी बॅंकेच्या मधाळ आवाजाच्या युवतीनं एका ग्राहकाला फोन केला आणि कुठल्याशा "पर्सनल लोन' योजनेची माहिती दिली. कुठल्याही कागदपत्रांशिवाय, काही क्षणांत 50 हजारांचं कर्ज मिळू शकतं वगैरे. तिचं बोलणं संपल्यावर म्हणाली, "मग हवंय ना तुम्हाला कर्ज?' तो म्हणाला..."नाही'. तर म्हणाली, "का सर?'...तिला भयंकर नैराश्‍य आलं होतं. एवढी चांगली योजना असूनही हा बाबा कर्ज का घेत नाही, याचं. अरे...? पण त्याला कर्ज नकोच असेल, तर कशाला घ्यायचं? उद्या तुम्ही म्हणाल, हजार रुपयांच्या हप्त्यावर विमान देतो. ते काय गच्चीवर उडवू की काय? अशा लोकांना टाळणं अवघड जातं. विशेषतः अशा मधाळ आवाजाच्या युवतींना.

वरील अनुभव माझ्या बाबतीतला आहे.

एकदा मी ऑफिसात असताना असाच एका मधाळ आवाजाच्या युवतीचा फोन आला. मी तिच्या प्रतिनिधीला (तिला नव्हे बरं का राजकुमारा!) भेटण्याची वेळ दिली. ऑफिसचा पत्ता दिला. जवळची खूण (लॅंडमार्क) विचारल्यावर `शनिवारवाडा' असं सांगितलं. त्यावर ती म्हणते,
`सर, कोई `लॅंडमार्क' नहीं हैं क्या?`
मी कोसळायचाच बाकी होतो. शनिवारवाड्याव्यतिरिक्त कुठला दुसरा लॅंडमार्क ह्या बयेला हवा होता?
`वो पेशवा का पुराना हवेली है ना, उसके बाजू में जो नीरा का दुकान है ना, उसके सामने हैं हमारा कार्यालय' असं सांगायला हवं होतं का हिला?