दिलीप प्रभावळकरांनी साकारलेल्या माझ्या आवडत्या भूमिका... भाग एक

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
21 Mar 2009 - 2:33 am

दिलीप प्रभावळकर म्हणजे एकदम भन्नाट चतुरस्त्र अभिनेता.रंगमंच, टीव्ही, सिनेमा सर्व माध्यमांमध्ये ते लीलया वावरले आणि प्रेक्षकांची मने जिंकली.
dilipprabhawalkar.com या त्यांच्या संस्थळावरती त्यांच्या सर्व भूमिकांचा तपशील उपलब्ध आहे.

त्यातली बरीचशी नाटके पाहिली आहेत... प्रत्यक्ष आणि व्हिडिओवरती.

त्यांनी लिहिलेले ’एका खेळियाने’ हे त्यांच्या भूमिकांबद्दलचे आत्मकथनपर पुस्तक नुकतेच वाचले... परत परत वाचले.आधी त्या पुस्तकाची ओळख करून देणारा लेख लिहिणार होतो.
( हे पुस्तक म्हणजे अभिनय प्रवासाची कथा आहे. अलबत्या गलबत्यातल्या चेटकिणीपासून ते बटाट्याच्या चाळीपर्यंतचा प्रवास यात आहे... आबा टिपरे आणि अप्पा नि बाप्पामधले तर्कटी अप्पा या भूमिकांबद्दल (का कोण जाणे विस्तारभयास्तव ?) यात लिहिलेले नाही.भूमिकांच्या अभ्यासाचे वर्णन उत्तम... मात्र गॉसिप, भांडणे, उखाळ्यापाखाळ्या यांचे थोडेही उल्लेख नाहीत.. :) वगैरेवगैरे असे पुस्तकाचे वर्णन लिहिण्यापेक्षा आपण सर्वांनीच त्यांच्या भूमिकांबद्दल लिहिणे अधिक मजेदार ठरेल असे वाटले.
या लेखाच्या निमित्ताने आपल्याला आवडलेल्या त्यांच्या भूमिका आपण आठवूया....

चिमणराव,नातीगोती,हसवाफ़सवी,चौकटराजा,एक डाव भुताचा, कलम तीनशेदोन,वासूची सासू,एक झुंज वार्‍याशी ही त्यांची काही उल्लेखनीय कामे.
या सार्‍या भूमिका मला आवडतातच.त्यावर पुष्कळ जणांनी भरपूर लिहिले आहे, चर्चा केल्या आहेत

त्यामुळेच प्रभावळकरांच्या भूमिकांबद्दल लिहिताना त्यांच्या ( तुलनेने कमी माहिती असलेल्या आणि कमी चर्चिल्या गेलेल्या ) काही भूमिकांबद्दल आधी लिहावेसे वाटते...
मला मान्य आहे की ही त्यांची भूमिका ऑल टाईम ग्रेट नाही, पण ज्यावर अधिक चर्चा व्हायला हवी असे वाटते ,अशी निश्चित आहे..

आज मी लिहिणार आहे, ते १९९९ साली दाखवल्या गेलेल्या "गुब्बारें’ नावाच्या ( यात एक तासाच्या गोष्टी असायच्या) झी टीव्ही वरच्या "साथी एक सफ़र का" या कथेमधल्या प्रभावळकरांच्या टायगर देशपांडे या भूमिकेबद्दल. या कथेचे दिग्दर्शन केले होते मुकुल अभ्यंकर यांनी.हा एपिसोड १९९९ मध्ये बर्‍याच वेळा दाखवला गेला होता. त्यातल्या दोन वेळा मी पाहिला होता..पण आता अगदी सारे तपशील आठवत नाहीत.कष्टाने काही फोटोही मिळवले.

कथेची सुरुवात होते ती देशपांडे नावाच्या एका साध्यासुध्या सरळमार्गी क्लार्कला त्याचा बॉस एका बिझनेस ट्रिपसाठी रेल्वेने पाठवायचे ठरवतो... आणि या रंगेल बॉसने आधीच त्या रात्रीच्या प्रवासामध्ये देशपांडेसाठी एका एस्कॉर्ट सर्व्हिस गर्ल (निकी अनेजा)ची सोबत मुक्रर केली आहे.या गोष्टीची देशपांडेला कल्पना नाही.
तो त्या अलिशान फ़र्स्ट क्लास कंपार्टमेंटमध्ये सेटल होईपर्यंत ही आधुनिक पेहरावातली मुलगी तिथे येते...तिला हे नेहमीचंच, देशपांडे फ़र्स्ट क्लासची सवय नसल्याने थोडा गांगरलेला... टीसी येऊन तिकिटे चेक करून जातो, देशपांडेकडे 'मजाय बुवा तुमची” असे अर्थपूर्ण कटाक्ष टाकून जातो....तो गेल्यावर देशपांडेची झोपण्याची तयारी सुरू होते..पाण्याची बाटली, घड्याळ वगैरे..आणि त्याला कपडे बदलायचे आहेत, म्हणून तो तिला विनंती करतो की तुम्ही बाहेर जा...ती सहजपणे म्हणते की ’मी थांबते इथे” तरी देशपांडे तिला जाण्यास सांगतो...तिला हसू फ़ुटते,आणि ती बाहेर जाते...बाहेर तिला तिचा पूर्वीचा प्रवासातला साथीदार दिसतो.तो पुन्हा कधी भेटणार असं तिला विचारतो..ती आत आल्यावर देशपांडे बाहेर जातो, तिला कपडे बदलण्यासाठी... तिच्या लक्षात येते की हा माणूस नेहमीसारखा नाही.वेगळाच आहे....

त्यांच्या गप्पा सुरू होतात. देशपांडे त्याच्या मध्यमवर्गीय जगण्याच्या नेहमीच्या गोष्टी सांगतो....चाळ, नोकरी , लोकलचा प्रवास ...
...हळूहळू तिचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतोय, व्यावसायिक कृत्रिम सहजता आता गेली आहे आणि ती त्याच्यातल्या माणसामध्ये रस घेत त्याला बोलायला उद्युक्त करतेय, त्याच्या इच्छा आकांक्षा आवडी निवडी ऐकत आहे....

तोच देशपांडेचा चेहरा एकदम बदलतो, डोळे चमकायला लागतात, तिच्याकडे अर्थपूर्ण कटाक्ष टाकून तो म्हणतो की दिवा बंद करून माझ्या शेजारी येऊन बस, तुला एक गंमत दाखवायची आहे... तिचा चेहराच पडतो; हाही त्यातलाच निघाला या विचाराने ती क्षणभर दु:खी... पण ती त्याच्या शेजारी जाऊन बसल्यानंतर तो तिला अंधारात चमकणारे पोस्टाचे स्टँप दाखवतो....देशोदेशीची पोस्टाची तिकिटे जमवणे हा माझा छंद आहे म्हणतो...तिला हायसं वाटतंय हे तिच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसतं.... तीही त्याला स्वत:बद्दल थोडंसं सांगते...तो आपल्या पत्नीची नक्कल करून दाखवतो, सोसायटीच्या गणपती उत्सवाबद्दल सांगतो.मराठी गाणं म्हणतो..तीही पंजाबी टप्पा म्हणून दाखवते....तिला आता झोप यायला लागलीय... तो काहीतरी बडबडत असतानाच त्याच्या लक्षात येतं की ही त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपून गेलीय.

देशपांडेही ब्लॆंकेट घेऊन झोपून जातो....सकाळ होते.. रेल्वे स्टेशनवर या सरळमार्गी सहप्रवाशाचा निरोप घेताना तिचे डोळे भरून आलेले आहेत आणि त्याचा चेहरा मुलीला निरोप देणार्‍या बापासारखा का बरं दिसतोय?...

कलानाट्यसाहित्यिकआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Mar 2009 - 2:47 am | बिपिन कार्यकर्ते

मास्तर!!! क्या याद दिलायी तुमने भी.

तो भाग मी पण बघितला होता. अप्रतिम देशपांडे उभा केला होता प्रभावळकरांनी. खासच होता तो भाग. असं क्वचित होतं की फ्रेम मधे निकी अनेजा आहे पण माझं लक्ष मात्र दुसर्‍या कलाकाराकडे आहे. ;)

उस्ताद आहेत हो ते!!!

बिपिन कार्यकर्ते

संदीप चित्रे's picture

23 Mar 2009 - 7:25 pm | संदीप चित्रे

मी एकदा अचानक इथे झी किंवा सोनी टीव्हीवर तो भाग पाहिला होता.
बाप माणूस !

विजुभाऊ's picture

23 Mar 2009 - 7:30 pm | विजुभाऊ

मास्तर "एक झुंज वार्‍याशी " मधला तो सर्व सामान्य माणूस सुद्धा एकदम वेगळाच आहे

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

समिधा's picture

21 Mar 2009 - 2:49 am | समिधा

त्यांच्या सगळ्याच भुमिका मस्त असतात. पण टायगर देशपांडे ही भुमिका मी बघितली नाही पण तुम्ही दिलेल्या लि़खाणावरुन बघावी वाटली.
मला त्यांची टिपरे भुमिका खुप आवडली.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

नाटक्या's picture

21 Mar 2009 - 3:08 am | नाटक्या

फारच छान लेख. हा भाग बघायला मिळेल का हो कुठे? वाचून खरोखरच बघावासा वाटला.

- नाटक्या

भडकमकर मास्तर's picture

21 Mar 2009 - 9:30 am | भडकमकर मास्तर

मी गूगलून शोध पुष्कळ घेतला... काही टीव्ही फोरम्सवर शोधायला हवे.
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

तुम्ही मास्तर असून काही उपयोग नाही ...घ्या बघा तो भाग

http://www.zeetv.com/shows/gubbare/video/gubbare-episode-4-03-09-1999.html

नंदन's picture

21 Mar 2009 - 3:08 am | नंदन

लेख आवडला. हा भाग बघितल्याचा आठवतो. मध्यमवर्गीय पापभीरू भूमिका म्हणजे प्रभावळकरांचा हातखंडा. वॉटरबॉटलमधून पाणी पिण्याच्या लकबीतून, मोठा मुलगा अमेरिकेला गेला म्हणून त्या देशावर केलेल्या चिडचिडीतून त्यांनी ही भूमिका चोख वठवली आहे. शेवटी निकी अनेजाचे हृदयपरिवर्तन होऊन ती स्वतःशीच 'गणपती बाप्पा मोरया' म्हणते आणि हा भाग संपतो, असं आठवतं.

या लेखमालेच्या पुढील भागांची (मास्तरांच्या इतर लेखमालांप्रमाणेच) वाट पाहतो आहे. :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

धनंजय's picture

21 Mar 2009 - 5:00 am | धनंजय

मध्यमवर्गीय पापभीरू भूमिका म्हणजे प्रभावळकरांचा हातखंडा.

सहमत

चौकट राजा वेगळा होता, पण तो त्यांचा हातखंडाही नव्हता.

सहज's picture

21 Mar 2009 - 5:42 am | सहज

अरे हो! बरी होती ती मालीका, आवडायची बघायला. बहुतेक झी टीव्हीवर होती ना. हा एपीसोड हे वाचुन आठवला.

शिर्षक गीत शोधताना ब्लॉग ढापाढापी / पुनरावृत्ती दिसली. :-) इथे लिहलेले जसेच्या तसे इथे पण अर्थात ते देखील कुठून दुसरीकडून आले असेल . गंमत म्हणजे मास्तरांनी लिहलेल्या भागाचाच उल्लेख दिसला.

... आयी रे आयी रे हसी आयी.... अशी काही तरी ओळ त्या मालीकेच्या शिर्षक गीतामधे होती ना?

विसोबा खेचर's picture

21 Mar 2009 - 8:25 am | विसोबा खेचर

मास्तर, आपल्या व्यासंगाला सलाम. जियो...!

प्रभावळकरवरांवरील एका सुंदर लेखमालिकेची वाट पाहतो..

तात्या.

केदार_जपान's picture

21 Mar 2009 - 9:45 am | केदार_जपान

दिलीप प्रभावळकर खरच एक हाडाचा जातिवंत कलाकार माणुस...
कुनासाठी ते टिपरे तर कुणासाठी ते तात्या विंचु, कुणाला मुनाभाइ तले साकार केलेले गांधी आवडले, कुणाला चौकट राजा मधला वेगळा-वेगळा माणुस रडवुन गेला..कुणाला सरकारनामा तले इरसाल कोकणी राजाकारणी आवडले तर कुणाला आपले चिमणरावच हसवुन गेले...पछाडलेला मधले डोळे बघ्-डोळे बघ म्हणणारा इनामदार पाहिला कि अजुनही भीती वाटते..

पण मला मात्र रात्र आरंभ मधली त्यानी केलेली भुमिका अजुनही आठवते...द्विव्यक्तिमत्व ना पछाडलेला माणुस, त्यात दोन्ही भुमिका त्यानी ज्या ताकतिने उभ्या केल्यात त्याला खरच तोड नाही...एकटा माणुस अक्खा चित्रपट आपल्याला खिळवुन ठेवतो...

मास्तरांनी वर्णन केलेला भाग मलही आठवतो...परत त्या गोष्टींना उजाळा दिळ्याबद्दल धन्यवाद!!...

-------------------
केदार जोशी

पण गुब्बारे ह्या मालिकेबद्दल मात्र ऐकून होतो. प्रभावळकर हे एक चतुरस्र अभिनेते आहेत ह्यात वाद नाही.
प्रत्येक पात्र रंगवण्याची त्यांची स्वतःची अशी एक धाटणी असते. खलनायक ते मध्यमवर्गीय पापभीरु ही रेंज ते कोणतेही वेडेवाकडे चेहरे, आक्रस्ताळीपणा, आरडाओरडा न करता केवळ कायिक, वाचिक आणि मुद्राभिनयाने पेलतात. प्रेक्षकांपर्यंत ती भूमिका पोचवण्याचे अवघड काम ते सोपे भासवतात!
मास्तुरे ही मालिका रंगू दे! :)
वाचायला आवडेलच!!

चतुरंग

मेघना भुस्कुटे's picture

21 Mar 2009 - 12:32 pm | मेघना भुस्कुटे

अगदी असंच म्हणते.
खूप मजा आली, पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला हे वाचताना.
लिहा, लवकर लिहा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Mar 2009 - 11:10 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

'गुब्बारे' आता विस्मरणातही गेलं होतं, तुम्ही मस्त आठवण करून दिलीत. सवयीप्रमाणे खूपच कमी पाहिला टी.व्ही. पण काही चांगलं पाहिल्याचा आनंद 'गुब्बारे'नं दिला.

अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

क्रान्ति's picture

21 Mar 2009 - 7:32 pm | क्रान्ति

मस्त लेख आहे. प्रभावळकरांच्या सगळ्याच भूमिका सुन्दर आहेत. एक मालिका, नाव आटवत नाही, ज्यात त्यांनी खलनायकी भूमिका देखिल केली होती. त्यांच्या बरोबर तुषार दळवी, दिलिप कुलकर्णी, नीना कुलकर्णी होते. अगदी छद्मी, बेरकी आणि स्वार्थासाठी वाट्टेल ते करणारा त्यांचा खलनायक मी प्रथमच पाहिला. अगदी त्याला बदडून काढावे, असे वाटत असे ती मालिका पहाताना! इतका जीवन्त अभिनय आहे प्रभावळकरांचा!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

मैत्र's picture

23 Mar 2009 - 10:58 am | मैत्र

जुना वाडा.. अत्यंत कपटी हलकट माणूस उभा केला होता. कणा नसलेला दिलिप कुलकर्णी हा एक भाऊ. आणि याच्या कारस्थानाने हतबल झालेली नीना कुलकर्णी ही त्याची बायको. मला वाटतंय स्मिता तळवलकर होती दिलिप कुलकर्णीची बायको...
जबरदस्त अभिनय...

विसोबा खेचर's picture

23 Mar 2009 - 11:08 am | विसोबा खेचर

सहमत..!

भडकमकर मास्तर's picture

23 Mar 2009 - 5:15 pm | भडकमकर मास्तर


______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

21 Mar 2009 - 7:47 pm | स्वाती दिनेश

दिलिप प्रभावळकरांची तुम्ही उल्लेख केलेली भूमिका पाहिलेली नाही,पण आता कुठे मिळाली तर पहाविशी वाटत आहे, लेख तर सुंदरच आणि लेखाचा विषय तर जास्तच छान!
त्यांच्या तुम्हाला आवडलेल्या अजून भूमिका वाचायला आवडतील.
स्वाती

परिकथेतील राजकुमार's picture

21 Mar 2009 - 8:10 pm | परिकथेतील राजकुमार

मास्तर हा भाग माझ्या बघण्यात आला नाही आणी खरे तर आता त्याची गरज पण नाही. काहि क्षणात तुम्ही सगळा भाग डोळ्यासमोर उभा केलात त्याबद्दल शतशः धन्यवाद. अभिनयाची महाविद्यालय असा ज्यांचा उल्लेख करावा अशा काहि मोजक्या नावांमध्ये एक नाव दिलिप प्रभावळकर यांचे येते.
त्यांच्या 'साळसुद','आपली माणस' मधल्या भुमीकांबद्दल तुमच्या कडुन ऐकायला आवडेल.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

पिवळा डांबिस's picture

21 Mar 2009 - 10:22 pm | पिवळा डांबिस

मला दिलीप प्रभावळकरांची सगळ्यात आवडलेली भूमिका म्हणजे पोर्ट्रेट मधल्या सेनाधिकार्‍याची. हा सबंध मोनोलॉग आहे....
दुसरी आवडलेली भूमिका म्हणजे पुण्यात शिकलेल्या फार-ईस्ट मधल्या राजपुत्राची!! त्यातलं "मागलं दर्शन" वगैरे झकास आहे!!:)
आणि चिमणराव कसा विसरता येईल?
बाकी "एका खेळियाने" मी वाचलंय. त्यांना नाट्य-चित्रपटक्षेत्रात आलेले विविध अनुभव त्यांनी मांडले आहेत. चांगलं पुस्तक आहे...

मैत्र's picture

23 Mar 2009 - 11:01 am | मैत्र

आणि आइ चि :)
पिडा काका हसवा फसवी मधली सर्वात झकास भूमिका म्हणजे कोंबडीवाला नाना पुंजे...

प्राजु's picture

22 Mar 2009 - 8:19 am | प्राजु

मस्त लेख.
मला ही मालिका आठवत नाही. याचा व्हीडीओ कुठे मिळेल का पहायला.
मास्तर, तुमच्याकडून प्रभावळकरांच्या प्रत्येक भूमिकेबद्दल एक तरी लेख अपेक्षित आहे.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विशाल कुलकर्णी's picture

23 Mar 2009 - 1:49 pm | विशाल कुलकर्णी

वा मास्तर, धन्यवाद एक सुरेख आठवण जागवल्याबद्दल !!

सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

समीरसूर's picture

23 Mar 2009 - 2:36 pm | समीरसूर

ही मालिका वीसेक वर्षांपूर्वी मराठी दूरदर्शनवर यायची आणि दिलीप प्रभावळकरांचे काम यात एक नंबर होते. दात पुढे असलेला, मोठ्या भावापुढे पैशासाठी लाचारी करणारा, हलकट, अप्पलपोटा आणि सगळ्यात संतापजनक म्हणजे स्वतःच्याच वयात येणार्‍या मुलीवर वाकडी नजर टाकणारा नराधम त्यांनी अतिशय सुरेख सादर केला होता. त्यांना (त्यांच्या भूमिकेला) बघून संताप यायचा. यातच त्यांच्या भूमिकेचे यश दडलेले आहे. अतिशय नैसर्गिक अभिनय करण्यात त्यांचा हातखंडा आहे. पडद्यावर एखादा कलावंत अभिनय करतोय असे न वाटणे हे खरे अभिनेत्याचे यश. 'अगं बाई..अरेच्चा' मध्येही त्यांचा अबोल बाप छान होता. दुर्दैवाने इतकी अफाट अभिनयक्षमता असणार्‍या कलाकारांना त्यांच्या क्षमतेला साजेसे चित्रपट किंवा भूमिका आपल्या इथे मिळत नाहीत/बनत नाहीत. 'पहेली' मधला बेरकी काका पण त्यांनी छान साकारला होता. 'झपाटलेला' मधला खलनायक पण चांगलाच वठवला होता. ६-७ वर्षांपूर्वी (२००३ बहुधा) मसुमेह मखीजा नावाच्या नव्या नायिकेचा 'चुपके से' हा एक बरा चित्रपट आला होता. त्यात नायिकेच्या मध्यमवर्गीय मराठी बापाची भूमिका त्यांनी खूप छान केली होती. टेमघरे नाव असतं त्यांचं त्यात. एक कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक आयकर अधिकारी असलेले दिलीप प्रभावळकर आपल्या मुलीलाच मॉडेलिंग मध्ये लाँच करणार्‍या श्रीमंत आणि प्रसिद्ध रति अग्निहोत्रीला आयकर चुकवल्याच्या आरोपावरून सळो की पळो करून सोडतात अशी काहीतरी त्या चित्रपटाची कथा होती. एक वेगळी कथा होती पण चित्रपट चालला नाही कारण कुठलाच खान, चोप्रा, जोहर चित्रपटात नव्हता. 'लगे रहो...' मधले बापूजी पण छानच रंगवले होते त्यांनी.

छान लेख आणि विषय.

--समीर

सूहास's picture

23 Mar 2009 - 2:41 pm | सूहास (not verified)

ईतक्या जुन्या मालिका आणी नाटके पाहीली नाहीत "दिप्र"(आमचा आख्खा ग्रुप हेच म्हणतो). दिप्र आपल्या आवडले ते मुन्नाभाई मध्ये,'अगं बाई..अरेच्चा',मधला "अबोल" गिरणी कामगार.

सुहास..
(द गुड)

सूहास's picture

23 Mar 2009 - 2:41 pm | सूहास (not verified)

ईतक्या जुन्या मालिका आणी नाटके पाहीली नाहीत "दिप्र"(आमचा आख्खा ग्रुप हेच म्हणतो). दिप्र आपल्या आवडले ते मुन्नाभाई मध्ये,'अगं बाई..अरेच्चा',मधला "अबोल" गिरणी कामगार.

सुहास..
(द गुड)

नितीनमहाजन's picture

23 Mar 2009 - 4:14 pm | नितीनमहाजन

आणखी एकः
पु. ल. देशपांडे यांच्या "तिय्या" या एकांकिका संचातील "सदू आणि दादू "एकांकिकेमधील सूत्रधार.

दिग्द. दिलीप कोल्ह्टकर.

यातील

सॉक्रेटिस हा माणूस होता.
माणूस मर्त्य असतो.
म्हणून सॉक्रेटिस मर्त्य आहे.


या वाक्यांमधील शब्दांची आदला बदल व त्यातून निर्माण झालेला निखळ विनोद दिलीप प्रभावळकर ज्या निर्व्याज्यतेने सादर करतात ते केवळ अवर्णनीय आहे.

नितीन

टायबेरीअस's picture

23 Mar 2009 - 10:19 pm | टायबेरीअस

शेवरी चित्रपटातील त्यांची भुमिका ही चांगली आहे. कोणाला त्यांचा 'पुनप्पा झोलम झोल' आठवतोय का?

ही व्यक्तीरेखा एकदम सॉलिड आहे...:)
हसवा फसवी हे नाटक पाहताना ही व्यक्तीरेखा सरळ प्रेक्षकांतुन रंगमंचावर प्रेवेश घेते....
आणि या पात्राच्या तोंडच माझं आवडत वाक्य :-- युगांडा युगांडा इश्तारा पोपेस्तु पोपेस्तु (असंच काहीस आता नक्की आठवत नाही हे नाटक पाहुन बरेच वर्ष झाली...)
याच नाटकातले नाना पुंजे आणि कृष्णराव हेरंबकर या व्यक्तीरेखाही अप्रतिम आहेत...:)
एन्कांउटर -द -किलिंग या चित्रपटातील पुनप्पा आवाढे ही भूमिका सुद्धा मला फार आवडली...
आणि ऐ काऊ म्हणुन हाक मारणार्‍या चिमणरावांना कसे विसरता येईल ??? :)
आणि हो आबा टिपरे( श्रीयुत गंगाधर टिपरे) तर सर्वांचेच लाडके. :)
मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

दिव्यश्री's picture

21 Apr 2014 - 12:21 pm | दिव्यश्री

माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक . :)
चौकटराजा , झपाटलेला , अग बाई अरेच्चा , गंगाधर टिपरे आणि अजून बर्याच . यांच्या खूप आवडणाऱ्या व्यक्तिरेखा आहेत . टिपरे मधील सगळे भाग मस्तच . सुनेची काळजी घेणारा , कुटुंबावर प्रेम करणारा , वेळ प्रसंगी मुलाला व्यवस्थित समज देणारा , नातीवर अतिशय प्रेम करणारा , नातवाच्या चुका लपवून पाठीशी घालणारा , देशभक्त ई. असे वेगवेगळे कलाविष्कार त्यांनी खूप सुंदर रीतीने सादर केले . काही काही भाग पाहताना कधी डोळ्यातून पाणी यायचे कळायचे नाही .

बाकी लेखकाने दिलेली माहिती नवीन आहे . :)

राजा मनाचा's picture

21 Apr 2014 - 1:15 pm | राजा मनाचा

ही घ्या youtube लिंक...
Gubbare : Episode 4 - 03-09-1999
http://www.youtube.com/watch?v=siLsD_xZubY

किसन शिंदे's picture

21 Apr 2014 - 1:38 pm | किसन शिंदे

मास्तरांचा हा लेख वाचलाच नव्हता. वर काढल्याबद्दल दिव्यश्री यांचे पुस्प्गुच्च देऊन हाबार.! प्रत्येक मराठी माणसाप्रमाणे दिलिप प्रभावळकर माझेही अत्यंत आवडते अभिनेते. त्याच्या सगळ्या भुमिका माईलस्टोन आहेत, अगदी अलीकडच्या नारबा पर्यंत..पण मला त्यांचा चौकटराजामधला अभिनय सर्वात जास्त आवडतो. त्यातला विशेषतः तो प्रसंग ज्यात त्यांची आई (सुलभा देशपांडे) मृत्यूमुखी पडल्यानंतरचा ”आई...आई...आई" असा केलेला आक्रोश! सिम्पली सुपर्ब!!

दिव्यश्री's picture

22 Apr 2014 - 1:22 am | दिव्यश्री

मास्तरांचा हा लेख वाचलाच नव्हता. वर काढल्याबद्दल दिव्यश्री यांचे पुस्प्गुच्च देऊन हाबार.! >>> ठ्यांक्यू ठ्यांक्यू :D ...मिसळीच्या तर्रीत किती रत्ने , माणके दडली आहेत कोण जाणे . :)

अत्रुप्त आत्मा's picture

22 Apr 2014 - 12:43 pm | अत्रुप्त आत्मा

@मिसळीच्या तर्रीत >>> :D तर्री नव्हे... http://www.easyfreesmileys.com/smileys/free-scared-smileys-414.gif...गाळ!!! =))

======================
अता पळा...http://www.easyfreesmileys.com/smileys/free-scared-smileys-1044.gif लै जणं मारायला येतील! :D

अत्रुप्त आत्मा's picture

21 Apr 2014 - 1:46 pm | अत्रुप्त आत्मा

सुरवातीपासून आजपर्यंत पुढच्या काळासह प्रभावळकर मान्य सन्माम्य आहेतच..पण माझं मत म्हणाल तर,
प्रभावळकर म्हणजे..
रात्र आरंभ ... बस्स....
http://3.bp.blogspot.com/_ShlBVb_9w60/S38I2SNkdrI/AAAAAAAABfY/Aj1Pm36kDIs/s1600/ratra2.jpg
और कुछ बोलने की जरुत ही नही!

चौकटराजा's picture

21 Apr 2014 - 2:43 pm | चौकटराजा

दिलीप प्रभावळकर यानी पोट्रेट मधली केली त्यावेळी मला वाटले होते त्यांचा हा " काउ ए काउ ..." या टाईपातून सुटण्याचा प्रयत्न फार यशस्वी होणार नाही. पण दिलीप प्रभावळकर यांची गुणवत्ता इतकी अफाट की त्यानी आपल्या व्यक्तिमत्वातील मर्यादांवर मात करीत अनेक भूमिका अजरामर केल्या. आपण देहबोली वगैरे म्हणतो पण प्रभावळकर यांची आपल्या हरेक स्नायूवर जी पकड आहे ती स्तिमित करणारी आहे. त्यांची नाना पुंजे ही भूमिका करणे कोणालाही शक्य होणार नाही. माझ्या निरिक्षणानुसार ते जेंव्हा एखादे बेअरिंग असलेली व्यक्तिरेखा उभी करतात त्यावेळीच त्यांच्या भूमिकेचा ठसा अधिक गडद असतो. बाकी प्रभावळकर या व्यक्तिसादृश भूमिका असेल तर ते फारसे प्रभावी वाटत नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांची रात्र आरम्भ मधील ठोंबरेची भूमिका. तिला बेअरिंग आहे. म्हणून ती फडके या व्यक्तिरेखे पेक्षा जास्त लक्षात रहाते.

छान लेख.
हरहुन्नरी कलाकार… मध्यंतरी स्पीलबर्गच्या एका चित्रपटासाठी त्यांचा विचार चालला होता असे ऐकले, पण दुर्दैवाने… आपल्या की स्पीलबर्गच्या ? ;-) ती भूमिका त्यांना मिळाली नाही.

पुनप्पा आवडे आठ्वतोय का कुणाला

समीरसूर's picture

22 Apr 2014 - 5:19 pm | समीरसूर

'एनकांऊंटर' चित्रपटातला ना? हो तर, आठवतो की.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 Apr 2014 - 1:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

दिलीप प्रभावळकर म्हणजे चौकट राजा, हसवा फसवी मधल्या सहाच्या सहा भुमिका (त्यातल्या त्यात दिलीप प्रभावळकरांच्या बहिणीचं पात्र आणि शेवटचं गाणार पात्र तर अफलातुन बरीच वर्ष झाली नाटक पाहुन नावं आठवत नाहीयेत) आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे रात्र आरंभ मधली भुमिका.

समीरसूर's picture

22 Apr 2014 - 5:18 pm | समीरसूर

'साळसूद' मधला बेरकी, नालायक, आणि स्वतःच्याच सख्ख्या तरुण मुलीवर डोळा ठेवणारा निर्लज्ज बाप त्यांनी जबरदस्त रंगवला होता. शिवाय 'आपली माणसं' या चित्रपटात (अशोक सराफ, सुनिल बर्वे) भूक सहन न झाल्याने कर्ता मुलगा वारल्यानंतरही वचावचा जेवणारा अगतिक आणि वृद्ध बाप त्यांनी छान उभा केला होता. बाकी 'लगे रहो मुन्नाभाई' मधले गांधी, 'पहेली' मधला नायकाचा लबाड काका, 'चुपके से' मधला नायिकेचा इन्कम टॅक्स अधिकारी बाप, 'नारबाची वाडी' मधला नारबा अशी कामे दीर्घकाळ लक्षात राहतील. मला त्यांच्या विनोदी भूमिकांपेक्षा इतर भूमिकाच जास्त आवडतात. त्यांची विनोदी अभिनेता म्हणून पडून गेलेली ओळख खरच दुर्दैवी!

तुमचा अभिषेक's picture

24 Apr 2014 - 2:56 pm | तुमचा अभिषेक

लेखात उल्लेखलेला एपिसोड पाहिल्याचे धूसरसे आठवतेय, अर्थात लहानपणीच्या आठवणी असल्याने त्यातील त्यांच्या अभिनयावर वगैरे उगाच भाष्य करत नाही. मात्र एका कलाकाराची अदाकारी बघायला पैसे खर्च करून जावे अश्या जगभरातल्या मोजक्याच अभिनेत्यांपैकी एक.

त्यांच्या आबा टिपरे भुमिकेमुळे ते माझ्या कित्येक अमराठी मित्रांना देखील आवडू लागलेले.